चोखोबा माझा गणपती

विश्वास मोरे

अधिकारहीन जातीतील चोखोबांना सातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी केवळ बरोबरीचंच नाही तर अत्यंत मानाचं स्थान दिलं. म्हणून तर महाराष्ट्रात गावोगावी चोखोबांची मंदिरं उभी राहिली. त्यात देहूच्या मंदिराचं विशेष महत्त्व आहे. कारण तुकाराममहाराजांनी आपल्या अभंगातून चोखोबांची आद्यपूजा केली. त्यांना श्रीगणेशाचं स्थान दिलं आहे.

संत ज्ञानदेव, नामदेवांनी जो समतेचा विचार सांगितला तोच चारशे वर्षांनंतर तुकाराम महाराजांनी सांगितला. समतेचा हाच झेंडा गाडगेबाबांनी पुढं नेला. अधिकारहीन जातीतील चोखोबांना संतांनी केवळ बरोबरीनंच वागवलं नाही तर त्यांना अत्यंत मानाचं स्थान दिलं. हे मानाचं स्थान नेमकं काय होतं हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘चोखोबा माझा गणपती, राधाई महारीण सरस्वती’ :

कोणत्याही कामाची सुरुवात ज्याच्या पूजनानेनं, स्मरणानं होते, त्या श्री गणेशाचं स्थानच तुकोबारायांनी संत चोखोबांना दिलंय. याशिवाय चोखोबांचं मोल सांगताना ते म्हणतात,
रायाचे सिपाई हाजाराचे बारा| लाखाचा मोहोरा प्राणी एक॥
सवा रुपयाची येती पाच मोती| हजाराची येती जोडी येक॥
रुपयाच्या कवड्यामधे भरे गोणी| मोहोर बांधुनी पदरी न्यावी॥
शंभर लोकात सद्गुणी ऐका| तुका म्हणे चोखा पंढरीचा॥

अशा चोखोबांचं मंदिर तुकोबारायांच्या देहूत असणं क्रमप्राप्तच होतं. अठराव्या शतकात देहूत इंद्रायणीच्या काठी ते उभारलं गेलं. देहूत एकीकडे स्वयंभू विठ्ठल रूक्मिणीचं मंदिर, तर दुसरीकडं संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर यांच्या मधे इंद्रायणीच्या काठावर हे मंदिर उभं आहे. तुकोबारायांच्या चिंतनस्थळाकडे अर्थात भंडारा डोंगराकडे जाताना इंद्रायणीच्या अलीकडेच रस्त्यात हे मंदिर लागतं. मंदिर अठराव्या शतकात निर्माण केल्याचे संदर्भ येथील शिलालेखावर वाचता येतात. उत्तम दगडी बांधकाम, गोल घुमटाकार कळस, मंदिरात दगडी चौथरा आणि त्यावर चोखोबांची पाषाणातील मूर्ती आहे.

मधल्या काळात मंदिरापुढं पत्र्याचं शेड उभारलं होतं. ते आता काढून टाकलं आहे. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत नदीघाटाचं सुशोभिकरण केलं आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर अधिक चांगला झाला आहे. गावातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून हे मंदिर शंभर मीटर अंतरावर आहे. येथून गोपाळपुराही शंभर मीटरवर आहे. मंदिराचं बांधकाम कोणी केलं, याची ठोस माहिती गावात उपलब्ध झाली नाही. काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं येथील तरूण उत्तम चव्हाण सांगतात. २५ वर्षापूर्वी मंदिराच्या कळसाची पडझड झाली होती. चोखोबांच्या पाईकांनी जीर्ण झालेला कळस दुरुस्त केला. या मंदिरात आजही नित्य पूजा पाठ आणि भजन कीर्तन होत असतं. तसंच वारीसाठी देहूनगरीत येणारी चोखोबा महाराजांची दिंडीही इथं येत असते. वारकरी या मंदिरात येऊन चोखोबांचं दर्शन घेतात. अलिकडे मंदिराकडे काहीसं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. पुरातत्व विभागानं मंदिराच्या देखभालीकडं लक्ष द्यावं, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. हे मंदिर वारकरी संप्रदायाच्या समतेची आणि ममतेची साक्ष देणारं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची तयारी चालवली होती, त्याचदरम्यान देहूरोड परिसरातील दलितांनी बाबासाहेबांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. हे निमंत्रण होतं देहू गावाजवळील देहूरोड येथील चोखोबा मंदिराच्या उद्घाटनाचं. निमंत्रण देणारे सर्वजण देहूरोड दारुगोळा कारखान्यातील आणि परिसरातील कामगार होते. बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘तुम्ही मंदिराऐवजी बुद्धविहार बांधला तर मी येतो…’ भेटायला गेलेल्या मंडळींनी ती अट मान्य केली आणि बाबासाहेबांनी शब्द पाळला. २५ डिसेंबर १९५४ रोजी ते सोबत बौद्ध भक्खू आणि बुद्धाची प्रतिमा घेऊन आले. मंदिराच्या ऐवजी तिथं बौद्ध विहार तयार झाला. नव बौद्धधर्मियांची ती देशातील पहिली इमारत ठरली.

0 Shares
भेदाभेद भ्रम अमंगळ एक गाव एक हातभट्टी