खांद्यावर पताका समतेची

ह. भ. प. निवृत्तीबुवा गायकवाड

काळ बदलला. पूर्वीचा जातीभेद आता राहिला नाही. अर्थात या जातीभेदाला वारकर्यां्नी सातशे वर्षांपूर्वीच मूठमाती दिली होती. सर्व जातींच्या संतांना, दिंड्यांना सामावून घेतलं होतं. असं असलं तरी नंतरच्या काळात या लोकांना भेदाचे चटके सोसावे लागलेच, पण ते सोसूनही त्यांनी संतांची समतेची पताका खाली ठेवली नाही. संत चोखामेळा यांनी खांद्यावर दिलेली ही पताका निष्ठेनं घेऊन जाणार्याम त्यांच्या एका पाईकाचं हे मनोगत. खरं तर त्याचं शब्दांकन.

खटलं मोठं होतं. गावात चिरेबंदी वाडा. मळ्यात जमीनजुमला, बैलबारदाना, आमराईत चौसोपी पडाळ. घरात समृद्धी, दारात लक्ष्मी पाणी भरत होती. पण पोटी मूल नव्हतं. मग आजीनं आळंदीच्या ज्ञानोबामाऊलीला नवस केला. चार पिढ्यांची वारीची पुण्याई कामी आली. आजीला दोन मुलं झाली. त्यांचं नाव ठेवलं ग्यानबा-तुकाराम. तुकाराम माझे वडील आणि ग्यानबा चुलते. आजीचं नाव सावित्रीबाई अन् आजोबांचं नारायण.

ग्यानबा-तुकाराम मोठे झाले. शेती, व्यवसाय सांभाळू लागले. दोघांचा जीवभाव एवढा की, एक गावाला गेला तर दुसरा जेवायचा नाही. दोघांनी बसून एकच पान खायचं. सकाळीच गावात जाऊन देवदर्शन करून घरी येऊन आईचं दर्शन घ्यायचं. नंतर आई म्हातारी झाली. तिची नजर गेली. दोघं तिला अंघोळ घालायचे. वेणीफणी करायचे. एवढं प्रेम. एवढा विचार. जणू राम-लक्ष्मणाची जोडी.

पण या एकविचारात फूट पडली. दुर्दैवानं त्याला कारण ठरली, आळंदी-पंढरीची वारी. त्याचं झालं असं की, वारी आणि आळंदीच्या धर्मशाळेचं कारभारपण समाजानं आमच्या घराकडं दिलेलं. कारण आमचं घर संतांनी सांगितलेल्या नीतीनं वागणारं. तुकारामबुवा कीर्तनकार. ते माझे वडील. शेती करता करता वारी करायचे. बैल चारत चारत आळंदीला जायचे. आमच्या समाजानं म्हणजे मातंग समाजानं ठरवलं, की आळंदीला धर्मशाळा बांधायची. म्हणजे वारीला गेल्यावर राहण्याखाण्याची सोय होईल. त्यासाठी वर्गणी काढून एक हजार रुपये जमा केले. सर्वजण आम्हाला चोखोबा समाजाचेच म्हणायचे, म्हणतात. कारण वारी करणारा अस्पृश्य समाज म्हणजे संत चोखोबांचाच वारसा चालवणारा… तर, जमा झालेले हजार रुपये खजिनदार म्हणून ग्यानबाकडे ठेवायला दिले. त्यानं ते कमरेला धोतराच्या कसणीत बांधून ठेवले. १९२८मध्ये इंद्रायणी नदीच्या कडेला ४०० रुपयांची नऊ गुंठे जागा घेतली. त्यावेळी गाडगेबाबांनी अस्पृश्य, बहुजन समाजासाठी आळंदी, पंढरीत धर्मशाळा बांधण्याचा उपक्रम चालवला होता. या मंडळींनी गाडगेबाबांची भेट घेतली. त्यांना धर्मशाळा बांधून देण्याची विनंती केली. जमा झालेल्या रकमेत आणखी भर घालून बाबांनी धर्मशाळा बांधून द्यायचं ठरवलं. त्यांचे कारभारी गंगा भागूजी कीर यांच्यावर धर्मशाळा बांधण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी बाबांच्या सूचनेनुसार नदीच्या बाजूने घाटाप्रमाणे ओटे बांधायला सुरुवात केली. धर्मशाळेचं काम सुरू झालं. वडिलांनी स्वत: पाया खोदण्याचं काम केलं. पण कीर यांना समाजातील लोकांची साथ मिळेना. मग बाबांनी मुंबईहून मजूर आणि श्रीरंग नावाचा गवंडी पाठवून दिला. तो नित्कृष्ट काम करतो म्हणून लोकांनी त्यालाही विरोध केला. त्यानंतर बाबांनी स्वत:च प्रयत्न सुरू केले. आपला शिष्य मोतीराम पिराजी मांग याला तिथं रखवालदार म्हणून नेमलं. मोतीराम विदर्भातील ऋणमोचन गावचा. तो मग आळंदीचाच रहिवासी झाला. त्यानं त्याची माणसं जमविली. त्यात मोतीरामबाबा, तुकाम्हणीबाई, लैजाबाई, जनाबाई, रघुनाथ लक्ष्मण वानखेडे आदी माणसं होती. गाडगेबाबांनी आणि त्यांनी धर्मशाळा परिसरात झाडं लावली. परिसर रमणीय झाला. बाबांनी धर्मशाळेसाठी पत्रे जमवले. धर्मशाळा कशीबशी उभी राहिली. बाबांचं या धर्मशाळेवर बारीक लक्ष असायचं. त्यांनी धर्मशाळेसाठी भांडीही मिळवून दिली. ते आणि कैकाडीबाबा कार्तिकी यात्रेला मुक्कामाला धर्मशाळेत येत. गप्पा मारत जेवत. बर्या्चदा मी त्यांचा वाढपी असे. पुढं बाबा गेल्यानंतर या धर्मशाळेची जबाबदारी माझ्या डोक्यावर आली. धर्मशाळा म्हणजे सर्व समाजानं आषाढी, कार्तिक वारीच्या निमित्तानं एकत्र येण्याची जागा. मातंग समाज अशिक्षित, मागास, विखुरलेला. धर्मशाळा आणि वारी, भजन, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना जोडण्याचं काम मी सुरू केलं, जे आधी माझे वडील, आजोबा करत होते. गावोगावी विठ्ठलाची मंदिरं बांधणं, तिथं भजन, कीर्तन, पारायण, सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित करणं, त्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं, त्यांना व्यसनापासून दूर नेणं, पोराबाळांना शाळा शिकवण्यासाठी आग्रह करणं, असं त्या कामाचं स्वरूप.

बांधकाम नीट न झाल्यानं काही वर्षांतच आळंदीची धर्मशाळा मोडकळीस आली. ती नव्यानं उभारण्याचा मी संकल्प केला. त्यात अनंत अडचणी आल्या. जे काम करताना गाडगेबाबा जेरीस आले, तिथं माझी काय पत्रास! कच्चं बांधकाम झालेली धर्मशाळा अनेकदा पडली. मी पै पै जमवून, उन्हापावसात डोक्यावर दगडविटा वाहून, रात्रंदिवस मुक्काम करून तिची वेळोवेळी डागडुजी केली, नव्यानं बांधली. नंतर धर्मशाळा हेच माझं जणू जिवीतकार्य बनलं. सध्याही या धर्मशाळेचं बांधकाम सुरू आहे. ते खूप दिवस चाललंय. कारण त्यासाठी कुणी दाता पुढं येत नाही. आमचा समाज मागास, निर्धन त्यामुळं पैसे जमा होत नाहीत. तर दलितांच्या धर्मशाळेला काय मदत करायची म्हणून सवर्ण समाज त्याकडं दुर्लक्ष करतो. नगरसेवक, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवले पण कुणीही मदत केली नाही. सध्या मला मिळत असलेलं राज्य सरकारचं कलाकार मानधन मी या धर्मशाळेच्या कामासाठी देतो. भेटेल त्याला मी धर्मशाळेविषयी सांगतो. देणगी देण्याची विनंती करतो. धर्मशाळा पुरी होणं हे माझं मोठं स्वप्नच बनून राहिलंय. माझ्या पत्नीनं तर ज्ञानोबामाऊलीलाच नवस केलाय, ‘धर्मशाळा पुरी होऊ दे, मी तुझ्या दर्शनाला दंडवत घालीत येईन!’

आषाढी-कार्तिकीला समाज धर्मशाळेत येतो. इतर वेळी मीच वर्षभर समाजात जात असतो. समाजाची महाराष्ट्रभरातील माणसं मी जोडलीत. माझे वडील कीर्तनकार होते पण अंगठेबहादूर होते. बैलांमागे राहून ते एकेक अक्षर शिकले. तुकोबाचा गाथा जवळपास पाठ केली. त्यांची कीर्तनं सीताराम बाळाजी गावडे या शिक्षकानं लिहून ठेवलीत. ते नित्यनेमानं आळंदी-पंढरपूर वारीला जायचे. तिथं कीर्तन, भजन करायचे. समाजात ज्ञानोबा-तुकारामांचे समतेचे विचार पोचवायचे.

असो, सांगत असं होतो की, याच धर्मशाळेवरून आमच्या घरात फूट पडली. समाजानं धर्मशाळेसाठी दिलेले पैसे ग्यानबानं संसारासाठी वापरले असावेत, असा तुकारामाला म्हणजे माझ्या वडिलांना संशय आला. ते त्यावेळी दिंडीप्रमुख होते. पंढरपूरच्या वाटेवर चालत होते. वाखरीच्या रिंगणाच्या वेळी दोघांची त्याविषयी चर्चा झाली आणि नंतर मोठं महाभारत घडलं. जेवढं प्रेम होतं, तेवढंच टोकाचं वैर झालं. ते विकोपाला गेलं. त्याची परिणीती माझ्या आजीच्या खुनात झाली. आमचं कुटुंब भंगलं. आम्हाला गाव सोडून परागंदा व्हावं लागलं. कुटुंबाची झालेली ही पांगापांग पुन्हा वारी आणि विठ्ठलानंच जवळ आणली. मला भजनाचा, वारीचा नाद लागला. वडील जे करायचे तेच मी करू लागलो. समाजानंही मला स्वीकारलं. मी अनेक गावांमधील मातंग समाज वस्तीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरं उभारलीत. त्यानिमित्तानं वस्तीमधील वातावरण सौहार्दपूर्ण आणि संस्कारमय होण्यास मदत झाली आहे. त्या माध्यमातून व्यसनमुक्तीसारखे प्रबोधनात्मक उपक्रम राबवता आले आहेत.

आज आम्ही अजामेळा दिंडी क्रमांक २६ ही दूरवस्थेत असलेली दिंडी सुस्थितीत आणली आहे. या आषाढी कार्तिकीला आम्ही आळंदी पंढरीला जातोच, पण दिंडीतर्फे वर्षभर विविध उपक्रमही राबवत असतो. आळंदी धर्मशाळेसोबतच आमचा एक महत्त्वाचा सप्ताह असतो भामचंद्र डोंगरावर. हे ठिकाण म्हणजे जगद्गुरू संत तुकाराममहाराजांची तपोभूमी. अजूनही ही जागा उपेक्षित आहे. गेली ३५ वर्ष तिथं हरिनाम सप्ताह करत आम्ही तुकोबारायांची ही भूमी जागती ठेवली आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, इतिहासात कधी घडलं नाही ते आमच्या हातून माऊलींनी करवून घेतलं आहे. आळंदी येथील ज्ञानेश्वतरमाऊलींच्या मंदिरात, तुकोबारायांच्या देहूत आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात अजामेळा दिंडीतर्फे आम्ही हरिनाम सप्ताह केला आहे, करतो आहोत.

पूर्वी या मंदिरांमध्ये साधा प्रवेशाचाही अधिकार नाकारलेल्या आमच्या समाजाला तिथं सप्ताहाची परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होतीच. पण, १९९६मध्ये आळंदी संस्थाननं आम्हाला होकार दिला. त्या वर्षी आळंदीत मराठी साहित्य संमेलन होतं. त्यानिमित्तानं आळंदीत आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमचा मंदिरातील सत्कार स्वीकारला. पुरोगामी चळवळीशी संबंधीत असलेले केशवमहाराज कबीरबुवा त्यावेळी संस्थानावर होते. माझ्या पाठीवर थाप टाकून ते म्हणाले, वा व्वा गायकवाडबुवा, चांगला सप्ताह केला. तुमच्या सप्ताहात संस्थानावरची बामणं जेवायला आणतो. खरोखरच त्यांनी सगळ्यांना जेवायला आणलं. संत रोहिदास धर्मशाळेत जेवण होतं. सर्वजण पोटभर जेवले. समाधान पावले.

१९९६ सालीच देहूत तुकाराममहाराजांचा त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळा होता. त्यानिमित्तानं आम्ही देहूत गोपाळपुर्याेत गाथापारायण, कीर्तन, भजन, प्रवचन केलं. त्यावेळी तुकोबारायांच्या मंदिरात प्रा. रामकृष्ण मोरेंनी आमचा सत्कार केला होता.

त्याहीपुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही केली ती म्हणजे, पंढरपूर मंदिरातील सप्ताह. संत चोखोबांनाही ज्या मंदिरात जाता आलं नाही, सानेगुरुजींच्या सत्याग्रहानंतरही जे झालं नव्हतं, ते भाग्य अजामेळा दिंडीला मिळालं. अजामेळा दिंडीनं मंदिरातच सप्ताह सुरू केला.

सप्ताहाच्या नियोजनासाठी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो तेव्हा कीर्तनाची तारीख घेण्यासाठी दादामहाराज मनमाडकरांकडे गेलो. रांगेत उभे राहून त्यांचं दर्शन घेतलं आणि येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी बाजूला बसवून घेतलं. सविस्तर चौकशी केली. कोण तुम्ही? कसली तारीख मागता? कुठं? कशाला? आदी. सप्ताहाच्या आयोजनाबद्दल ऐकून उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘ही क्रांतीच केलीत तुम्ही! पांडुरंग विटेवर उभा राहिल्यापासून अजामेळा या नावानं कुणीही सप्ताह केला नाही. तोंड गोड करा, ही घ्या माझी ५० किलो साखर तुमच्या सप्ताहासाठी.’ मग त्यांनीच बद्रीनाथ महाराज तनपुरेंचीही कीर्तनाची तारीख घ्यायला सांगितली. त्यासोबतच भानुदास महाराज देगलूरकरांचीही तारीख घेण्यास सुचवलं. त्यांनी स्वत: त्या दोघांनाही फोन केले. हे तिघेही आनंदानं आमच्या सप्ताहात कीर्तनसेवेसाठी आले. यापैकी देगलूरकरांकडे जाण्यास मी जरा कचरत होतो. कारण सानेगुरुजींच्या उपोषणामुळं दलितांचा मंदिर प्रवेश झाल्याने विठोबा बाटला म्हणत अनेक महाराज मंडळींनी विठोबाच्या दर्शनासाठी मंदिरात येणं बंद केलं होतं. त्यात भानुदास महाराजांचे वडील धुंडा महाराजही होते, पण भानुदास महाराज आले. त्यांनी सप्ताहात कीर्तन केलं. ज्या गाडगेमहाराजांना वारीच्या वाटेवर माऊलींच्या मुख्य सोहळ्यात कीर्तन करण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्या अनुयायांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आमच्या सप्ताहात कीर्तन करावं, ही बाब मनाला खूप समाधान देऊन गेली. विशेष म्हणजे बडव्यांचे प्रतिनिधी म्हणून शंकरमहाराज बडवे यांचंही कीर्तन आमच्या सप्ताहात पहिल्याच दिवशी होत असतं. अर्थात अजूनही काही रुढी पाळल्या जातातच. संत मुक्ताई, जनाबाई, सोयराबाई अशा अनेक महिला संतांना वारकर्यां नी बरोबरीचा अधिकार, स्थान दिलं. वारकर्यां मधीलच काही लोक मात्र अजूनही महिलांना कीर्तन, भजनात संधी देणं नाकारतात. माझी मोठी मुलगी भीमाताई लोंढे कीर्तनकार, भजनगायिका आहे. पंढरपुरातील सप्ताहात मात्र तिला टाळ घेऊन उभं राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. अर्थात आता वातावरण खूपच बदलतंय. प्रत्यक्ष विठुरायाची पूजाही सर्वजातीय जातीतले पुजारी करणार आहेत.

आमच्या दिंडीत, सप्ताहांमध्ये भोळेभाबडे, निरक्षर, कष्टकरी लोक सहभागी होतात. ज्याची इच्छा होईल त्याला आम्ही प्रवचनाची, कीर्तनाची संधी देतो. संतांनी हेच तर केलं होतं. आता पुढची पिढी हे कितपत जपते कोणास ठाऊक, पण एक नक्की ही भोळीभाबडी माणसं आणि त्यांच्या सावळ्या विठुरायाला नवी पिढी नक्कीच विसरणार नाही, अंतर देणार नाही.

0 Shares
साक्षात्कार नाचू कीर्तनाचे रंगी