वारकरी सर्वजनवादच!

राजा कांदळकर

डॉ. सदानंद श्रीधर मोरे, देहूकर. जन्म २५ जून १९५२. संत तुकारांमाचे दहावे वंशज. पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक. संतविचारांचे भाष्यकार. लोकव्यवहाराचे अभ्यासक आणि चिंतक. आजच्या काळाचे अव्वल संशोधक म्हणून महाराष्ट्र त्यांना जाणतो. ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’ ही त्यांची पुस्तकं गाजली. ‘उजळल्या दिशा’ हे नाटक लक्षवेधी ठरलं. असा चतुरस्र लेखक, विचारवंत आणि क्रियाशील पंडित त्यांच्या वयाची साठी यावर्षी पूर्ण करतोय. त्यानिमित्तानं त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली ही मुलाखत.

प्रश्न – संत साहित्य, विचार, वारकरी शैली, धर्म यांच्या महाराष्ट्रावरील प्रभावाविषयी तुम्ही सतत बोलत-मांडत आला आहात. अलीकडेच नाशिकमध्ये वारकरी साहित्य परिषदेचं पहिलं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन झालं. त्याचे तुम्ही अध्यक्ष होता. त्यात तुम्ही भूमिका मांडली की, महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणा-यांचं घर बांधण्यात मुख्य वाटा संतांचा आहे. त्यांच्या साहित्याचा आहे.

डॉ. मोरे – होय, महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणा-यांचं हे घर बांधण्यात मुख्य वाटा संतांचा आहे. संत साहित्याच्या या प्रभावाचं आश्चुर्य वाटायचं खरं तर कारण नाही. भाषा हा मानवी अस्तित्वाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पंच महाभूतांनी मनुष्याचा देह घडतो. परंतु मानवाची मानसिकता, विचारपद्धती अभिव्यक्तीच्या रीती या भाषेनेच घडत असतात. म्हणून माणूस हा मुख्यत्वे भाषिक प्राणी आहे. पाश्चातत्य विचारवंत हायडेगर यांनी भाषा हे मानवी अस्तित्वाचं घर – हाऊस ऑफ बीईंग – असल्याचं सांगितलंय. पण माणसाचं भाषा नावाचं हे घर त्याच्या दगडविटांच्या घरापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं आहे. हे घर आपल्यामधून निर्माण करून तो त्यात राहतो. गोगलगाईच्या कवचासारखं किंवा कोळ्याच्या जाळ्यासारखं हे घर आहे. ते त्याच्यापासून वेगळं करता येत नाही. त्याचं हे घर आणि तो यांच्यामध्ये एक प्रकारचा जैविक संबंध आहे. हे घर त्याच्या ओळखीचा – आयडेंटिटीचा- भाग आहे. आपलं मराठी माणसांचं हे घर बांधण्यात संतांचा मोलाचा वाटा आहे.

प्रश्न – पण आधुनिक विचारवंत, लेखक, समीक्षकांना संतसाहित्य परकं किंवा दूरचं वाटतं…

डॉ. मोरे – आपल्यावर ब्रिटिशांची राजवट आली. त्यामुळे नवा विचार, नवी जीवनशैली, आधुनिकता आली. या काळात संत साहित्य आधुनिक कवी, लेखकांना परकं, दूरचं वाटायला लागलं. खरं तर असं त्यांना का वाटायला लागलं हा खरा प्रश्न आहे. याची काही जबाबदारी संतांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार्या. सांप्रदायिकांचीही आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारात एकेकाळी अग्रभागी असलेल्या सांप्रदायिकांनी, नव्या इंग्रजी वळणामुळे आपला संप्रदायच भ्रष्ट होईल या भीतीनं स्वत:ला आधुनिकतेपासून अलिप्त ठेवलं. म. फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, प्रा. वा. ब. पटवर्धन या आधुनिकांना काय म्हणायचंय हे समजून घ्यायच्या भानगडीत सांप्रदायिक मंडळी पडली नाहीत. परंपरा जपणं हेच आपलं काम आहे, असा समज त्यांनी करून घेतला. परंपरेचा विस्तार करणं, तिच्यात काळानुरूप बदल करणं यात ते कमी पडले. अर्थात परंपरा जपण्याचं काम त्यांनी केलं ते महत्त्वाचं होतं आणि त्याबद्दल आपण त्यांचं सदैव ऋणीच राहिलं पाहिजे.

पारंपरिकांनी अशा तर्हेंनं स्वत:च स्वत:ला अलिप्तपणानं दूर ठेवल्यानं आधुनिकांची चांगलीच सोय झाली. त्यांचं निम्मं काम परस्परच झालं. संतसाहित्य हे देवधर्माशी संबंधित आहे, मध्ययुगीन आहे, प्रतिगामी आहे, असा पवित्रा आधुनिकांनी घेतला. या उलट हे स्वत: आधुनिक आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत हे ओघानं निष्पन्न होणारच! वस्तुस्थिती काय आहे? ज्या युरोपियन साहित्यानं (आणि ज्ञान-विज्ञानानं) प्रभावित होऊन त्यांनी ही भूमिका घेतली, त्यातली उदाहरणार्थ मिल्टनचं ‘पॅरेडाइज लॉस्ट’, डान्टेचं ‘डिव्हाइन कॉमेडिया’, गटेचं ‘गाऊस्ट’ अशी महाकाव्यं देवाधर्माशी संबंधित होती. बायबलच्या शब्दप्रामाण्यावर आधारित होती. मध्ययुगीन म्हणता यावीत, अशीही होती. परंतु हे सारं वाङ्मय आदरपूर्वक डोक्यावर घेऊन त्याचं त्यांनी तोंड भरून कौतूक केलं. या कलाकृती चांगल्या आहेत, कौतुकास पात्र आहेत, याबद्दल दुमत नाही. पण इथे महत्त्वाचा मुद्दा असा की, या आधुनिक मंडळींनी या मातीतल्या पाच-सहाशे वर्षांच्या, साहित्यिक निकषांवर उत्तम दर्जाचं साहित्य ठरू शकणार्याा मराठी संतांच्या अशाच प्रकारच्या काव्याचं ‘संत साहित्य’, असं वर्गीकरण केलं. त्याला इतिहासजमा करून टाकलं. या दुटप्पीपणावर मात्र आक्षेप घ्यायला हवा. हा आक्षेप पहिल्यांदा दिलीप पुरुषोत्तम चित्रेंनी नोंदवला. त्यांच्याकडे पहिलं कोणी लक्षच देईना. चित्र्यांनी तुकोबांना मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी ठेवून, तुकोबांची कविता हा निर्णायक निकष मानला. त्याच्या प्रकाशात आधुनिक साहित्याच्या मर्यादा दाखवायला सुरुवात केली. चित्र्यांनी तुकोबांच्या कवितेची जागतिक पातळीवरून समीक्षा केली. ते या निष्कर्षापर्यंत पोचले की, तुकोबांच्या कवितेशिवाय कविता हा वाङ्मय प्रकार अपूर्ण राहील. तुकोबांच्या कवितेशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही, असं मोरोपंतांनी नोंदवलं होतंच. १९व्या शतकातील इंग्रजी विद्या शिकलेल्यांनी शेक्सपियर वाचला. मराठीत तसा लेखक तुकारामच याची त्यांना जाणीव झाली. शेक्सप्रियरचं भाषांतर मराठीत आणि तुकोबांचं भाषांतर इंग्रजीत करणार्यां वि. मो. महाजनींपासून ते विं. दा. करंदीकरांपर्यंत सर्व संबंधितांनी ही भूमिका जपली.

प्रश्न – तरीही संत साहित्याची आजची प्रस्तुता किंवा तत्सम विषयावर परिसंवाद साहित्य संमेलनात झडत राहिले. असे परिसंवाद हवेत कशाला, असं काही लोक बोलत राहिले. त्यात चेष्टेचा सूरही होता…

डॉ. मोरे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही संत साहित्याला स्थान दिलंच पाहिजे, असा आमचा मुळीच आग्रह नाही. कारण या साहित्याचं महत्त्व तुमच्या संमेलनांवर कधीच अवलंबून नव्हतं. प्रस्तुततेचा मुद्दा काढत संत साहित्याची चेष्टा करणं थांबवलं पाहिजे. माणूस हा जसा भाषिक म्हणजे भाषा निर्माण करणारा आणि भाषेचा उपयोग करणारा प्राणी आहे. तसाच तो ऐतिहासिक प्राणी आहे. म्हणजे त्याच्या अस्तित्वाला इतिहासाचं परिमाण आहे. त्यामुळे त्याच्या कोणत्याही गोष्टीची चर्चा करताना ऐतिहासिक परिप्रेक्ष्य सोडता येत नाही. या परिप्रेक्ष्यातून पाहिलं तर काय दिसतं?

तेराव्या शतकात वारकरी आणि महानुभाव धर्मपंथांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. या पंथांनी मराठी भाषेचं संवर्धन केलं. संस्कृती संवर्धन केलं. नवी मराठी भाषा विकसित केली. महाराष्ट्रातली आजची मूल्यं वारकर्यांरनी आपल्याला दिलीत. आपण ज्ञानेश्वीर-नामदेवांकडे वारंवार जातो. तेराव्या शतकात रामदेवराय यादव यांची मराठी राजवट होती. या राजवटीनं मराठी भाषा स्वीकारली. राज्यकारभार, न्यायदान त्यावेळी मराठीत होत असे. त्या अगोदरचे ताम्रपट, राजांचे आदेश संस्कृतमध्ये होते. यादव राजवटीतला नरेंद्र नावाचा कवी होता. त्याची मराठी कविता राजदरबारात सादर होई. एकदा राजाची इच्छा झाली. नरेंद्राच्या कवितेवर माझं नाव असावं. राजाच्या इच्छेखातर नरेंद्रनं दरबारात मान्य केलं, मी बरोबर करतो, असं तो म्हणाला. पण नंतर पळून गेला. कवीचं कवितेवर एवढं प्रेम होतं. राजदरबारात मराठीला आणि कवितेला एवढी इज्जत होती.

चक्रधरांनी त्यांचा सारा उपदेश महानुभावपंथीयांना मराठीत केला. लीळाचरित्र म्हाइंभटाने मराठीत लिहिलं. चक्रधरांविरोधात त्यावेळी राजानं खटला भरला. या खटल्याची माहिती लीळाचरित्रात आहे. या खटल्यात आरोप मराठीत ठेवले गेले. आरोपी चक्रधरांचं म्हणणं मराठीत ऐकून घेतलं गेलं. त्यांना न्यायालयानं शिक्षाही मराठीतून सुनावली. चक्रधरबद्दलचं हे दुर्दैवी प्रकरण आहे, पण मराठीही तेव्हा राज्यकारभाराची भाषा होती हे आपल्या लक्षात येतं. तेराव्या शतकात वारकरी संप्रदायानं आपल्याला कवी, तत्त्वज्ञानी दिले. साहित्य दिलं. मराठी समृद्ध केली त्यामुळे आपण तग धरू शकलो. शिवाजी महाराज जन्माला येईपर्यंत आपण तगलो ते वारकरी संप्रदायानं दिलेल्या शिदोरीमुळे; अन्यथा आपण पुन्हा उभे राहिलो नसतो.

प्रश्न – वारकरी आणि महानुभाव हे समकालीन धर्मपंथ. मराठी साहित्याचं भरणपोषण दोघांनीही केलं. दोन्ही पंथ भक्ती पंथच. या दोन्ही पंथांकडं तुलनात्मक तुम्ही कसं पाहता?

डॉ. मोरे – वारकरी आणि महानुभाव दोघेही कृष्णाला दैवत मानतात. कृष्णाचे दोन्ही ग्रंथ-गीता आणि भागवत- दोघांनाही मान्य आहेत. महानुभावांनी चक्रधरस्वामींना ईश्वणरी अवतार मानलं. म्हाइंभटांनी त्यांचं ‘लीळाचरित्र’ लिहिलं. मराठीच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेला हा ग्रंथ वाचताना मराठीच्या सामर्थ्याची आणि सौंदर्याची कल्पना येते.

वारकरी आणि महानुभावांत काही फरक आहेत. वारकरी विठ्ठलाला दैवत मानतात. महानुभावांना ते मान्य नाही. वारकरीही महानुभावांच्या चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू आणि चक्रधर यांना ईश्व री अवतार म्हणून स्वीकारत नाहीत. दोन्ही पंथांचा अहिंसेवर विश्वांस आहे. मराठीबद्दल दोघं आग्रही राहिले. समांतर पण अविरोधी प्रवाह म्हणून या दोन्ही संप्रदांयांना नांदायला हरकत नसावी. महानुभाव महंत नागराजबाबा यांनी यासाठी प्रयत्न केले होते. महानुभावांच्या देवतांबद्दल जर काही गैरसमज प्रचलित असतील तर ते निर्मिण्यात, पसरवण्यात वारकर्यांनचा हात नाही. हे करणारे दुसरेच लोक आहेत. वारकरी पंथास प्रथमपासून पुरेसे अनुयायी मिळाले. त्यास दुसर्याी कोणत्याही पंथाचं असं कधी वाटलं नाही. वारकरी पंथ स्वत:त मग्न राहिला. इतर पंथियांची दैवतं, पुण्यपुरुष यांच्याबद्दल निंदाव्यंजक कथा निर्माण करण्यात त्याला कधीच रस वाटला नाही. महानुभाव पंथात मात्र विठ्ठल आणि ज्ञानदेवादी संतांबद्दल काही आक्षेपार्ह कथा आढळून येतात. ते उत्तरकाळातील प्रक्षेप असण्याची शक्यता अधिक आहे. अशा कथा वारकरी संप्रदायानं चक्रधरांबाबत कधीही निर्माण केल्या नाहीत.

अशीच गोष्ट समर्थ संप्रदायाबाबतही सांगता येईल. चक्रधरांनी महानुभाव पंथाचा प्रचार करायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात पंढरीचे श्रीविठ्ठल दैवत लोकमान्य आणि राजमान्य झाले होते. चक्रधरांना आपल्या पंथाला या पार्श्वनभूमीवर प्रतिष्ठित करायचं होतं. त्यामुळे महानुभाव संप्रदायास विठ्ठलाविषयी स्पष्टीकरण कथांची निर्मिती होणं स्वाभाविक मानता येईल. सतराव्या शतकात वारकरी संप्रदायक बळकट झाला होता. संत एकनाथ नुकतेच समाधिस्थ झाले होते. तुकोबांचं कार्य १६३०-३५ नंतर जोमानं सुरू होतं. या पार्श्वतभूमीवर स्वतंत्र संप्रदाय उभारताना रामदासीपंथियांनाही अशाच काही कथा निर्माव्या लागल्या असणार हे उघड आहे. रामदासी पंथाचं दैवत श्रीराम वारकर्यां च्या ‘रामकृष्ण हरी’ मंत्रात ते प्रथम अवतीर्ण होतं. संत नामदेवराय हे महाराष्ट्रातील आद्य रामकथाकार. रामदासांपूर्वीच एकनाथांनी ‘भावार्थ रामायण’ लिहून रामकथा लोकप्रिय केली होती. सामाजिक बाबतीत वारकरी आणि रामदासी पंथात मतभिन्नता आहे. पण वाद-विसंवाद ऐकिवात नाही.

अलिकडच्या काळात उतावीळ संशोधक वि. का. राजवाडे यांनी मात्र या दोन पंथांत दरी निर्माण करण्याचे उपद्रवी कृत्य केलं. इतिहासाकडून सर्वांनीच धडे घ्यायची गरज आहे. एकमेकांच्या दैवतांची निंदा नालस्ती करणं, कोर्टात खटले दाखल करणं असे प्रकार थांबवले पाहिजेत. मराठी भाषेचा आग्रह धरणार्याप, महाराष्ट्राच्या चतु:सीमा स्पष्ट करून या सात्त्विक भूमीतच वास्तव्य करण्याचा उपदेश करणार्या: महानुभाव पंथाचे महाराष्ट्रावर ऋण आहेत. मात्र महानुभाव साहित्य सांकेतिक लिप्यांमुळे फक्त त्याच संप्रदायाच्या साधकांसाठी उपलब्ध होत असे. त्यामुळे एकूण मराठी जनतेला सुरुवातीच्या तीन शतकांपर्यंत तरी वारकरी संतांच्या साहित्याशिवाय पर्याय नव्हता.

प्रश्न – संत साहित्यातील मूल्ये कळत नकळत, ते साहित्य प्रत्यक्षपणे वाचले नाही तरी आपल्या भाषेतून, सामाजिक विचारांतून आपोआप आपल्या मानसिकतेत उतरत असतात. रानडे, फुले यांच्यावरही संतसाहित्याचा प्रभाव दिसतो.

डॉ. मोरे – संत साहित्याची महती काही थोरांना पुरतेपणी ठाऊक होती. त्यापैकी न्यायमूर्ती रानडे एक होते. त्यांना संत साहित्याच्या बाबतीतला वजावटीचा व्यवहार मुळीच आवडला नाही. रानडेंना प्रश्नम विचारणार्याे जोतीराव फुले यांनाही आवडला नसता. फुल्यांना गुरुस्थानी मानणार्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटला नसता. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश होण्यासाठी तळमळणारे रानडे या भाषेची वकिली संत साहित्य वगळता कशाच्या आधारे करू शकले असते? प्रार्थना समाजाचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक ठरलेल्या तुकोबांना नायक मानणार्याच रानड्यांना प्रार्थना समाज हा आजचा नवभागवत धर्मच आहे, अशी भूमिका घेताना ज्ञानेश्वर, एकनाथांशिवाय आणखी कोणाचा आधार मिळाला असता? समकालीन ब्राम्हणांच्या व्यवहारांचं सामान्यीकरण करून संत परंपरेतील ब्राम्हण संतांच्या हेतूविषयी संशय घेणार्याप जोतीरावांना ‘अखंड’ लिहिताना तुकोबांचंच अनुकरण करावं लागलं. त्यांचे अनेक अखंड आणि तुकोबांचे अभंग यांच्यातील अंतर एका कार्बन पेपरच्या जाडी इतकंच आहे. सार्वजनिक सत्यधर्माचं दैवत असलेल्या आदिसत्याची आरती फुल्यांनी ‘आरती ज्ञानराजा’ या प्रख्यात आरतीबरहुकूमच लिहिली. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिताना त्यांना ‘विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला’ हेच आठवलं. मग त्यांची ज्ञानोबारायांबद्दलची वा विठ्ठलाविषयीची बाकीची मतं काहीही असोत. मराठी भाषेतील आणि संस्कृतीतील संत साहित्याचा आणि वारकरी शैलीचा प्रभाव फुल्यांना पुरतेपणी येत नव्हता. तुकोबा हे तर त्यांचं स्वत:चं, सत्यशोधक समाजातील त्यांच्या सहकार्यांझचं आणि त्यांना ब्राह्मणी वाटणार्या, प्रार्थना समाजिस्टांचंही रोल मॉडेलच होते!

प्रश्न – डॉ. बाबासाहेब गाथा आणि ज्ञानेश्व्री सोडून इतर सर्व ग्रंथ समुद्रात बुडवले तरी फारस नुकसान होणार नाही, असं सांगायला कचरले नाहीत…

डॉ. मोरे – डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हिंदू धर्माचा भाग बनलेल्या जातिव्यवस्थेवर आणि त्या जातिव्यवस्थेला कोणत्याही कारणानं कोणत्याही प्रमाणात मान्यता देणार्याक प्रत्येकावर टीकाही करावी लागली. त्यात त्यांनी संतांचाही अपवाद केला नाही, हे मान्य. पण वस्तुस्थिती अशीच आहे की, जोपर्यंत मराठी भाषेचा आणि साहित्याचा संबंध आहे, तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वेरीला पर्याय नाही. याविषयी बाबासाहेबांना शंका नव्हती. स्वत: बाबासाहेबांच्या मराठी लेखनावरील आणि भाषणांवरील संत साहित्याचा प्रभाव वादातीत आहे.

‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या त्यांच्या वृत्तपत्रांवरील ब्रीदवाक्यं अनुक्रमे तुकोबा आणि ज्ञानोबा यांचीच होती. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही आपल्या अनुयायांनी संत नामदेवांच्या ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या धर्तीवर ‘बुद्धपदी दृढ भावो’ अशा गाथा लिहिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करत होते. वर्हालडच्या दीनबंधू शेगावकरांसारख्या कवींनी ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला. नामदेव ढसाळांसारखे प्रतिभावंत कवीही आपल्या कवितेवर ज्ञानोबा-तुकोबांचा प्रभाव नाकारत नाहीत.

प्रश्न – संतांचं साहित्य देवाधर्माशी निगडीत आहे. त्यात सामाजिक, व्यावहारिक जीवनाला दिशा देण्याची ताकद नाही, असा आरोप होत आला आहे…

डॉ. मोरे – संत साहित्य माणसाला केवढी प्रेरणा देऊ शकतं याचं एक उदाहरण म्हणून शाहू चरित्राकडे पाहता येईल. पुरोहितांनी शाहू महाराजांना शूद्र ठरवलं. त्यांचे धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीनं करण्याचं नाकारल्यानंतर महाराज खूपच अस्वस्थ झाले. त्यांच्या हृदयात एक खोलवर जखम झाली होती. आणि शांती मिळावी म्हणून ते तुकोबाची गाथा वाचू लागले. सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीतील तुकोबांच्या स्थानाविषयी मी बरंच मांडलं आहे. शाहू महाराज गाथा वाचताना तुकोबांच्या एका अभंगांवर थबकले-

बरे देवा कुणबी केलो, नाही तर दंभेची असतो मेलो
भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया

तुकोबांसारख्या संतश्रेष्ठांवर समकालीन सनातन्यांनी, असं म्हणण्याची वेळ आणली. आपण त्यांच्यापुढे कुणीच नाही, असं शाहूंनी आपल्या मनाचं समाधान करून घेतलं. पण ते तात्कालिक होतं. गाथा आणखी वाचताना त्यांची नजर एका अभंगावर गेली. ते तेथेच थांबले-

हा अभंग त्यांच्या पुढच्या राज्य कारभाराचं मार्गदर्शक सूत्र ठरला.

जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा,
मृदु सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्र,
ज्यासी अपंगीता नाही त्यासी धरी जो हृदयी,
दया करणे जे पुत्रासी तेची दाया आणि दायी,
तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती

छत्रपतींनी ही हकिकत त्यांचे निकटचे सहकारी थिऑसॉफीचे अनुयायी वासुदेवराव तोफखाने यांना सांगितली होती. ती तोफखान्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केली आहे.

तुकोबांचा हा अभंग न्या. रानडे यांचाही आवडता अभंग होता. मद्रास काँग्रेसहून परतत असताना रेल्वेच्या डब्यात पहाटे उठून रानडे हा अभंग तल्लीन होऊन गाऊ लागले. त्या आवाजाने शेजारच्या बर्थवरील गोपाळ कृष्ण गोखले उठले. न्यायमूर्तींची ती भावसमाधी बघून गोखले चकीत झाले. रानड्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. गोखल्यांना पुढे रानडे आठवायचे ते त्यांच्या याच रूपात. एवढे ते ठसठसीत आणि प्रभावी होते. रानडेच काय रानड्यांना गुरुस्थानी असलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सर अलेक्झांडर ग्रँट यांच्या वाचनात हा अभंग आला तेव्हा तेही खूप प्रभावीत झाले. या अभंगात तुकोबांनी गाठलेल्या नैतिक उंचीला त्यांनी सलाम केला. आणि अगदी अलीकडचे सांगतो-

भारताचे राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या कन्येनं सूत्रं हाती घेतली तेव्हा केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी तुकोबांचा हाच अभंग म्हटला. करवीर संस्थानच्या अधिपतीपासून भारताच्या राष्ट्रपतीपर्यंतच्या या अभंगाचा हा प्रवास फारच विलोभनीय आहे यात शंका नाही.

तुकोबा आणि इतर संतांचं लेखन मुख्यत्वे लोकशिक्षकाच्या भूमिकेतून झालं होतं, हे विसरता कामा नये.

आम्हा हे कौतुक, जगा द्यावी नीत
करावे फजित चुकतीते
शब्दांचा त्यांनी शास्त्र आणि शस्त्र असा दोन्ही प्रकार उपयोग केला.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका
तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू

मराठीत निर्मिती करणार्याा आद्य साहित्यिकांना म्हणजे संतांना साहित्याच्या सामर्थ्याची किती यथार्थ कल्पना होती हे समजून घेणं गरजेचं आहे. तथाकथित आधुनिकतेच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणामुळे होत असलेल्या आक्रमणाच्या पुढे देशी परंपरा, देशी उद्योग, व्यवसाय आणि देशी भाषा संकटात सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत मराठीच्या सामर्थ्याचा साक्षात्कार नव्या पिढीला करून देण्याची गरज आहे. अमूर्त संकल्पना पेलण्याची शक्ती असेल तर भाषा नक्कीच श्रेष्ठ ठरणार. काही सहस्त्रकांची परंपरा लाभलेल्या संस्कृत भाषेतील अमूर्त संकल्पना मराठी भाषेत व्यक्त करताना ज्ञानेश्वीरांना काहीच अडचण येऊ नये यात सर्व काही आले.

प्रश्न – सर, तुम्ही संत साहित्याचा अभ्यास आणि मांडणी करताना परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घातलेला दिसतो. याविषयी काय सांगाल?

डॉ. मोरे – मला तुकारामांचा वारसा मिळाला. घरातच अध्यात्म, कीर्तन, प्रवचनाची परंपरा मिळाली. आमच्या घराण्याला मानणारा मोठा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते. वडील श्रीधर बुवा मोरे देहूकर हे अभ्यासक आणि सामाजिक क्षेत्रातले अग्रणी होते. बेचाळीसच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तेव्हा त्यांचं शिक्षणही अर्धवट राहिलं. असं असलं तरी वडिलांना विविध विषयांचा व्यासंग होता. संतांनी वारकर्यांतना फक्त अध्यात्म शिकवलं नाही तर अध्यात्म साधनं शिवाय इतरवेळी व्यवहारात माणूस म्हणून चांगलं कसं वागावं, याविषयी अभंगातून मार्गदर्शन केलं आहे. वारकरी काही २४ तास अध्यात्मात दंग असत नाही. भक्ती करण्याची वेळ सोडली तर इतरवेळी अध्यात्म नसतं. त्यावेळी सामान्य माणसासारखंच त्याचं जगणं असतं. समाजातले सगळे लोक पूर्णवेळ परमार्थ करू शकत नाहीत. काही मोजके लोक सर्ववेळ परमार्थ जरूर करू शकतात. काही धर्मांत अशी तरतूद आहे, की काही लोकांनी सर्ववेळ अध्यात्म साधना करायची. अशा लोकांना यती म्हणतात. संन्याशीही म्हणतात. या संन्याशांची व्यवस्था समाजातल्या इतरांनी करायची. वारकरी संप्रदायात मात्र अशी व्यवस्था नाही. वारकरी प्रापंचिक असतात. हे कीर्तन, प्रवचन, उपदेश करतात. संसार करून परमार्थ करणं हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचं मानलं जातं. स्वत: तुकोबा असे वारकरी होते. त्यांनी त्यादृष्टीने जीवनवादी उपदेश केला.

शिवकाळाचं उदाहरण बघा. या काळात वारकरी संप्रदाय बहरात होता. वारकरी नेते सक्रिय होते. हे नेते अध्यात्म आणि भौतिक जीवन यांची सांगड घालण्याचं तत्त्वज्ञान सांगत होते. त्यानंतर मात्र वारकरी संप्रदायानं भौतिक जीवनाकडची जबाबदारी कमी केली. फक्त अध्यात्माकडे लक्ष दिलं.

ब्रिटिश काळात तर आपल्या सामाजिक जीवनाचं संस्थीकरण झालं. समाजात काम करायचं तर संस्था काढून त्याद्वारे काम करण्याची परंपरा सुरू झाली. अनेकांनी शिक्षण संस्था काढल्या. आरोग्य संस्था काढल्या. समाजोपयोगी विविध संस्था समाज जीवनात अस्तित्वात आल्या. वारकर्यांपनी स्वत:च्या संस्था काढल्या नाहीत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं संस्थीकरण केलं गेलं नाही. त्यातून वारकर्यां्चा ऐहिक जीवनाशी काहीच संबंध राहिला नाही. त्यामुळे लोक म्हणू लागले, संत साहित्य, त्याचा अभ्यास ही देवाधर्माशी संबंधित गोष्ट आहे. जगण्याशी त्याचा फारसा संबंध नाही. हे खरं नव्हतं. मी मात्र आपलं जगणं, संत साहित्याचा अभ्यास आणि आपला समाज यांचं नातं एकच आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला.

माझा आजचा पिंड घडला माझ्या वडिलांमुळे. ते आमच्या घराण्याला देहूकर म्हणून ओळखतात. आमच्या घराण्यात कीर्तनाची परंपरा होतीच. वारकर्यांममध्ये विविध फड आहेत. वेगवेगळी घराणी आहेत. हे फड, घराणी स्वत:च्या प्रथा, परंपरा, शिकवण यानुसार वर्तन करत. एका फडकर्यातनं दुसर्यार फडकर्याीचं ऐकायचं नाही. स्वत:च्या फडाची शुद्धता जपायची असा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जण करीत. माझ्या वडिलांनी मात्र सर्वांचं ऐकायचं. चांगलं ते घ्यायचं, वांगलं ते टाकून द्यायचं, असं ठरवलं. त्यांनी मामा दांडेकर, जोग महाराज, सोनोपंत दांडेकर आजरेकर महाराज, केशवराव देशमुख, दादा महाराज सातारकर अशा मोठमोठ्या वारकरी कीर्तनकार, नेत्यांबरोबर सलोखा जोपासला. वडील पायी पंढरीला जात. वेगवेगळ्या फडांचा अभ्यास करत. माहिती घेत. वेगवेगळ्या संप्रदायांचा अभ्यास करत. वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या आध्यात्मिक तत्त्ववेत्यांचा त्यांनी अभ्यास केला. स्वामी विवेकानंद, कृष्णमूर्ती यांचं तत्त्वज्ञान अभ्यासलं. त्याविषयीची पुस्तकं जमा केली. आचार्य रजनीश, रमणमहर्षी यांचे विचार समजावून घेतले. कृष्णमूर्तींना तर ते भेटलेही होते. वडिलांनी अशा वेगवेगळ्या संप्रदायांचा अभ्यास करून त्यातून चांगलं ते घेतलं. त्यामुळे त्यांची दृष्टी, विचार करण्याची पद्धत व्यापक झाली. हा अभ्यास केल्यानंतर वडिलांना जाणवलं की, वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र धर्म आहे. वेगळं दर्शन आहे. राजाराम शास्त्री भागवत यांनी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं. जसं महानुभाव हा पंथ स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या अनुयायांना त्याची सुरुवातीपासूनच कल्पना होती. वारकरी संप्रदायात मात्र तशी जाणीव नव्हती. स्वतंत्र दर्शनासंबंधीची मांडणी वारकरी संप्रदायात कुणीही केली नाही. विठोबा आजरेकर यांचा फड या दृष्टीनं वेगळा होता. या फडात त्यांनी वारकरी संप्रदायाची ‘प्युरिटी’ जपली होती. स्वत: वेगळा धर्म असल्याचं आचरण या फडातले लोक करत. इतरांनी मात्र असा प्रयत्न केला नाही.

माझ्या वडिलांविषयी सांगत होतो. त्यांनी ख्रिश्चेन धर्माचा अभ्यास केला. आधुनिक तत्त्वज्ञानाच्या विविध ज्ञानशाखा, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र याविषयीची पुस्तकं आमच्या घरात भरलेली होती. नवभारत, मराठी साहित्य पत्रिका, अमृत, सोनोपंत दांडेकरांचं प्रसाद, आचार्य अत्रेंचा मराठा हे अंक घरी येत. वडील पुण्याला वारंवार जात. आमच्या जमिनीचे खटले चालत. त्यासाठी जावं लागे. पुण्यातून येताना वडील विविध विषयांवरची पुस्तकं घेऊन येत. आइनस्टाइन मार्क्स, लेनिन यासह वेगवेगळ्या व्यक्ती आणि विषयांवरची पुस्तकं आमच्या घरात येत. मला ती वाचता येत असत.

प्रश्न – वडिलांमुळे तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या बाहेरचं वाचन लहानपणीचं करायला मिळालं. त्यातून तुमच्या विविधांगी अभ्यासाला विचार करण्याला चालना मिळाली. तुमची अगदी लहानपणीच ही जडणघडण होत होती…

डॉ. मोरे – अगदी शाळेत होतो तेव्हापासूनच घरात मला विविध पुस्तकं वाचायला मिळाली. माझी आई शिक्षिका तिनंच मला संस्कृत शिकवलं. माझ्या वडिलांइतका विविधांगी दृष्टीचा माणूस देहूत दुसरा नव्हता. मोठमोठे लोक घरी येत. त्यामुळे वि. का. राजवाडे यांनी वारकरी संप्रदायाला चॅलेंज करणारी मांडणी केली होती. त्या मांडणीला भा. प. बहिरट यांनी सडेतोड उत्तर दिलं होते. बहिरट मोठे विद्वान होते. ते वडिलांचे मित्र. आमच्या घरी येत. त्यांच्या चर्चा मी ऐकत असे. दादा महाराज घरी येत. आमच्या बंगल्यात मुक्काम करत. माझे चुलते भागवत देहूकर. ते फडकरी होते. माझे वडील फडकरी नव्हते. फडकरी असणं हे खूप कष्टाचं. ते वर्षभराचं काम. पंढरीत त्यांना वारंवार जावं लागतं. थांबावं लागतं. हे माझे चुलते म्हणजे एक अवलिया माणूस. खूप उपक्रमशील, प्रतिभावंत होते. त्यांची स्मरणशक्ती कमालीची. कथा, आख्यायिका, किस्से, उदाहरण त्यांच्या तोंडपाठ असत. एम. ए. पर्यंत मला लोक त्यांचा शिष्य म्हणून ओळखत. मी त्यांच्या जवळपास वावरलो. खूप उचापती केल्या. माझ्यातला कार्यकर्ता त्यांच्या अवतीभवती घडला. या चुलत्यांनी स्वत:चं लग्न सत्यशोधक पद्धतीनं केलं होतं. वारकरी असून एवढे क्रांतीकार होते ते.

प्रश्न – त्यावेळी वारकरी संप्रदायात साखरे महाराज, जोग महाराज, दांडेकर महाराज हे ब्राम्हणी मांडणी करत होते. तुमच्या ही मांडणी तेव्हा लक्षात येत होती…

डॉ. मोरे – होय, त्यांची मांडणी ब्राम्हणी वळणाची होती. खरं तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी वारकर्यां.ना ‘अर्धे ब्राम्हण’ म्हटलं होतं. म. फुलेंचाही वारकर्यांऐवर आरोप होता. हे धड इकडचे नाहीत आणि तिकडचेही. मधेच लोंबकळत असणारे आहेत, असं सुधारक म्हणत. वारकर्यां चं ब्राम्हणीकरण झालंय, असं निदान करत म. फुल्यांनीही त्यांना ब्राम्हणी परंपरेकडं ढकलून दिलं. पण वास्तव हे होतं की सत्यशोधक समाज तुकोबांनाच नायक मानत होता. फुलेंना सत्यशोधक समाजासाठी पाठिंबा मिळाला तो वारकरी संप्रदायाचा प्रभाव असणार्याळ जुन्नर, आंबेगाव, चाकण या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातूनच. हा परिसर देहू-आळंदीच्या पुढे येतो.

संत गाडगे महाराज देहूनं येत असत. ते खरे वारकरी. त्यांना वारकर्याेतलं क्रांतीकारकत्व पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली. हिंदू धर्माचा सामाजिक वारसा सांगण्याचं, त्यातलं क्रांतिकारत्व उजळून दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तसंच काम गाडगे महाराजांनी वारकरी संप्रदायांच्या बाबतीत केलं.

मी कॉलेजात असतानाच वडील मला पुण्यातल्या जेधे मॅन्शनमध्ये घेऊन गेले. तेव्हा केशवराव जेधे मोठे नेते. काँग्रेसची सूत्रं तिथून हलत. महाराष्ट्रातील निवडणुकीचं तिकीट वाटप तिथून होई. यशवंतराव चव्हाण तेव्हा नवीनच होते. ते इथल्या बैठकीत कोपर्या त बसत. त्यांना अजून एवढं महत्त्व आलेलं नव्हतं. लहान असतानाच मी असा वडिलांबरोबर वावरल्यानं मला समाजातले वेगवेगळे प्रवाह कळत गेले. राजकारण, समाजकारण समजून घ्यायला सोपं गेलं. शाळेतही मी हुशार होतो. मॅट्रिकला असताना मला पदवीपर्यंतचं ज्ञान होतं. एवढा मी मॅच्युअर होत गेलो.

वडिलांबरोबर मी बरोबरीच्या नात्याने विविध विषयांवर चर्चा करायचो. आमच्या दोघांतलं वयातलं अंतर गळून पडलं. घरी मोठी माणसं येतं. त्यांच्याशी मी त्यांच्या पातळीवर जाऊन चर्चा करायचो. त्यांच्याशी माझं ज्ञानसाधना करणार्यांमचं नातं तयार झालं. अशी माझी जडणघडण होत होती. देहूत कीर्तन ऐकणं, पुण्यात कॉम्रेड डांग्यांचं भाषण ऐकूणं हे मला काही वेगवेगळं आहे, असं वाटत नसे. मी त्यात समान धागा शोधत असे. तशी विचारांची सवय लागली.

प्रश्न – तुम्ही विद्यार्थीदशेत देहूत आचार्य अत्रेंच्या प्रचाराची सभा घेतली होती.

डॉ. मोरे – तेव्हा मी ७वी इयत्तेत होतो. अत्रेंचा ‘मराठा’ मी वाचत असे. त्यात विविध वाद कळत. साहित्य-राजकारणावरची मत मतांतरं वाचायला मिळत. भाऊ पाध्ये यांच्या ‘राडा’ या कादंबरीवरून झालेला वाद ‘मराठा’त मी वाचला. दि. पु. चित्रे ‘मराठा’तच भेटले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ कळली. अत्रे आणि ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांचा वाद समजला. १९६२ सालची निवडणूक होती. अत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून आमच्या मतदारसंघात निवडणूक लढवत होते. ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली होती. त्यांना उमेदवार नव्हता. त्यांनी अत्रेंना उमेदवारी दिली. माझ्यावर ‘मराठा’मुळे अत्रेंचा प्रभाव. मला आनंद झाला. आता आपल्याला अत्रेंचा प्रचार करायला मिळणार होता. मी वडिलांना म्हणालो, आपल्या गावात अत्रेंची सभा अजून कशी झाली नाही? इतर उमेदवारांच्या सभा होऊन गेल्या. वडील म्हणाले, अत्रेंना उमेदवारी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दलित वस्तीत आहेत. गावात कोण सभा घेणार? मग मी दलित वस्तीत गेलो. माझे तरुण मित्र जमा केले. पोस्टर, खळ, शिडी घेतली. गावभर अत्रेंचे पोस्टर डकवले. त्यानंतर अत्रेंची सभा घेतली. पण ती गावात नाही. दलित वस्तीतच घेतली. तिथल्या कार्यकर्त्यांनी माझी ओळख आपल्या पक्षाचा कार्यकर्ता अशी करून दिली.

या सभेच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष, त्यातली गटबाजी, समाजातला जातीवाद, त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं राजकारण कळलं. पुढे मी ‘उजळल्या दिशा’ हे आंबेडकरी चळवळीवरचं नाटक लिहिलं. त्यात मी दलितांचे प्रश्नव मांडले. राजकारण, समाजकारण, संस्कृती हे एकमेकांशी एका धाग्यानं गुंफलेल्या, एकजिनसी असतात हे मला कळत गेलं. मी अकरावीत होतो. तुकाराम बीजेला मी ‘समाजसुधारक तुकाराम’ हा लेख लिहिला. ‘मराठा’त अत्रेंनी तो छापला. हा माझा छापून आलेला पहिला लेख. त्या दिवशी अत्रे देहूला आले. गावकर्यांखना म्हणाले, तुकारामांवर लेख लिहिलेला तो लेखक कुठाय? लोक म्हणाले, कुठला लेखक? तो पोरगा आहे. मग अत्रेंची भेट झाली. त्यांनी मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं. नंतर कीर्तन करायला लागलो. लोक ऐकायचे. आदर करायचे. लिहायलाही लागलो.

पुढे अहमदनगरला कॉलेजात नोकरी लागली. तिथं लाल निशाण पक्षाचे दत्ता देशमुख, भापकर, भास्कर जाधव यांच्या विचारांना समजावून घेता आलं. ‘श्रमिक विचार’ हे लाल निशाण पक्षाचं मुखपत्र, त्यात लिहिलं. अगदी सिनेमा, नाटक, चळवळी अशा सर्व विषयांवर लिहायचो. मार्क्सवादाचा अभ्यास केला. पाश्चाोत्य विचारवंत वाचले. त्यातून व्यापक जग समजून घेता आलं.

प्रश्न – तुकाराम महाराजांच्या साहित्य आणि विचारांचा अभ्यास करून तुम्ही ‘तुकाराम दर्शन’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या लेखनाचा प्रवास कसा झाला?

डॉ. मोरे – तुकोबांचा अभ्यास तर लहानपणापासूनच सुरू होता. देहूत होतो तेव्हाही आणि बाहेर पडलो त्यानंतरही सुरूच राहिला. सदा डुंबरे हे साप्ताहिक सकाळचे संपादक होते. ते पुणे जिल्ह्यातील ओतूरचे. हा परिसर वारकरी आणि सत्यशोधकांच्या प्रभावाखालील. ते एकदा मला म्हणाले, तुकोबांवर सदर लिहिशील का? मी म्हणालो, लिहिन की! हे सदर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अंगानं विचार मांडणारं हवं. त्यात नुसतं तुकाराम चरित्र नको, तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रवाहांवर तुकारामांचा पडलेला प्रभाव, त्याचे परिणाम यांची चर्चा हवी, अशी डुंबरेंची इच्छा होती. त्यावेळी मी पी. एचडी करायला पुण्यात आलो होतो. अभ्यासासाठी भरपूर वेळ होता. तुकारामांवर सदर लिहायला लागलो ते वाचकांना आवडायला लागलं. नंतर माझ्या लक्षात आलं की, तुकाराम हा महाराष्ट्रातला एक माथा आहे. तिथून तुम्हाला सर्व दिसतं. ते दिसलेलं मी ‘तुकाराम दर्शन’मध्ये मांडलं. त्यानंतर ग्रंथ सिद्ध झाला. त्याला साहित्य अकादमीसह एकूण १५ पुरस्कार मिळाले. बक्षिसांचा वर्षाव झाला. ‘तुकाराम दर्शन’ हे खरं तर ‘महाराष्ट्र दर्शन’च आहे. हे मी करू शकलो कारण माझा विविधांगी अभ्यास. म. फुले आणि तुकोबा, सत्यशोधक समाज आणि तुकोबा, त्यातले राजकारणाचे पदर यासह महाराष्ट्रातले विविध प्रवाह विषय यांची चर्चा या पुस्तकात मी करू शकलो कारण माझ्या जडणघडणीत मला त्याविषयीची दृष्टी मिळाली होती.

प्रश्न – तुकोबांवरच्या सदर लेखनानंतर साप्ताहिक सकाळमध्ये तुम्ही ‘लोकमान्य ते महात्मा’ हे सदर सुरू केलं.

डॉ.मोरे – हो, तुकोबानंतर ‘लोकमान्य ते महात्मा’ हे सदर लिहू लागलो. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर १९२० सालानंतर महाराष्ट्रात टिळकांच्या जागी महात्मा गांधींचं नेतृत्व आलं. हे स्थित्यंतर कसं घडलं, त्याचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर काय परिणाम झाले हे यात मांडलंय. टिळक गेले. त्यांच्या अनुयायांत दोन गट पडले. गांधींचं नेतृत्व मानणारा पहिला गट. दुसरा गांधींना नाकारणारा. गांधी आणि टिळक दोन केंद्रांभोवती मराठी संस्कृती घोटाळली. टिळक ते गांधी असं नेतृत्वाचं संक्रमण होताना समाजकारण, धर्म, कला, नीतीशास्त्र, कपडे, बोलणं-चालणं, नाटक, सिनेमा, पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रांवर या वादाचा प्रभाव पडला.

या वादात जहाल टिळकवाघांनी मवाळ गांधीजींची तुलना तुकारामांशी केली. गांधी आणि तुकाराम दोघंही नेभळट, मिळमिळीत, अशी ही तुलना होती. म्हणजे या विषयात पुन्हा तुकाराम आलेच. टिळक आणि गांधी या दोन केंद्रांभोवतीचं महाराष्ट्राचं फिरणं लिहित गेलो. त्यातून ‘लोकमान्य ते महात्मा’ हे पुस्तक साकार झालं. या पुस्तकालाही महाराष्ट्र शासनाच्या म. फुले पुरस्कारासह १५ पुरस्कार मिळाले. बहुविद्याशास्त्रीय संशोधनपद्धतीचा मला हे लेखन करताना फायदा झाला.

प्रश्न – तुमच्या पी. एचडीचं संशोधन कृष्णावर आधारित आहे.

डॉ. मोरे – ‘कृष्ण : द मॅन अॅण्ड द मिशन’ या विषयावर मी संशोधन केलं. त्यावर पीएचडी मिळाली. कृष्ण हा वारकर्यांलचा देव. वारकर्यां चं मूळ शोधण्याचा माझा एक प्रयत्न हे संशोधन करताना होता. तेव्हापासून मला बहुविद्याशास्त्रीय संशोधन पद्धतीचं महत्त्व लक्षात आलं. पुढे मी त्याच पद्धतीनं अभ्यास करत राहिलो.

प्रश्न – ‘तुकाराम दर्शन’ लिहिताना तुम्ही सर्वजनवादाची मांडणी केलीत. तुम्ही ‘सर्वजनवाद’ हा शब्द प्रथम वापरला. नंतर उत्तर प्रदेशात बहुजन पक्षाच्या मायावती यांनी उच्चारला…

डॉ. मोरे – वारकरी संप्रदाय सर्वजनवादी आहे, हे राजारामशास्त्री भागवत यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं. मी ‘तुकाराम दर्शन’मध्ये त्याची मांडणी केली. वारकरी संत सर्व जातींतून आलेत. ज्ञानबा-तुकाराम ते चोखाबांपर्यंत आपल्याला ते दिसतं. हा सर्वजनवाद बहुजनवादापेक्षा वेगळा आहे. बहुजन हा शब्द प्रथम टिळकांनी वापरला. टिळकांनी गोखले, रानडे या उच्चशिक्षित, अर्ज-विनंत्यांचं राजकारण करणार्याब पुढार्यांकना अभिजन म्हटलं. त्यांच्याबरोबर जे नाहीत त्यांना बहुजन संबोधलं. म्हणजे मवाळांविरुद्धचे सर्व बहुजन, असं टिळकांना म्हणायचं होतं. मवाळांनी टिळकांना ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी’ म्हटलं. म्हणजे टिळक बहुजन झाले. नंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन पक्ष काढला. बहुजन शब्दाची मांडणी त्यांनी आर्थिक पायावर केली. बहुजन म्हणजे ब्राम्हणेतर नाही तर जो जो गरीब तो बहुजन. म्हणजे गरीब, किराणा दुकान चालवणारा ब्राम्हणही बहुजन होय, अशी शिंदेंची मांडणी होती.

शिंदे म्हणत, की राखीव जागा द्या. पण त्या फक्त अस्पृश्यांना द्या; अन्यथा भांडणं लागतील. पुढे तेच दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद उफाळला. काँग्रेसनं ब्रिटिशांकडं शक्य तेवढं आमचं राज्य आम्हाला करू द्या, अशी मागणी केली होती. जिना, टिळक हे नेते असा आग्रह धरण्यात एक होऊन आघाडीवर होते. ब्राम्हणेतर चळवळीचं मात्र असं मत होतं, की स्वराज्य नकोच. कारण ते मिळालं तरी ब्राम्हणांच्या हातात जाणार. मग उपयोग काय? शिंदे यांनी त्यावेळी म्हटलं की, अरे आपण राज्यकर्ते होतो. ब्रिटिश सरकार स्वातंत्र्य देणारच आहे. तर घ्यायला काय हरकत आहे. यावरून खल झाला. जातीवाद उफाळला. त्याला ब्रिटिशांनी खतपाणी घातलं. इथला जातीवाद ब्रिटिशांनी वाढवला हे खरं नाही. तो पूर्वी होताच. ब्रिटिशांनी त्यावर त्यांची पोळी भाजली. त्याला पोसला. ब्रिटिशांनी राखीव जागांच्या प्रश्नाघवर सगळ्यांना झुलवलं. ब्राम्हणेतर चळवळ फुटली. मुस्लीम, मराठा यांना राखीव जागा नको, ते राज्यकर्ते होते, अशी शिंदे यांची मांडणी होती. शाहू महाराज राखीव जागांचे पुरस्कर्ते होते.

राखीव जागांचा खेळ पुढे धोकादायक बनला. शिंदे यांनी या धोक्याचा पहिल्यांदा इशारा दिला होता. त्यात एक जात विरुद्ध इतर जाती, असं भांडण सुरू झालं. त्याला इतरेतर वाद, असं म्हणता येईल. ब्राम्हण विरुद्ध इतर, मराठा विरुद्ध इतर असे वाद आज आपण पाहिले. मंडल आयोगानंतर या वादांची तीव्रता जास्त वाढली. पूर्वी ब्राम्हण, अस्पृश्य, मराठा आणि तत्सम यांच्यात वाद उफाळले. आता ब्राम्हण, दलित, मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद खेळले जातात. या वादात एक जात विरुद्ध इतर सर्व जाती असा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळला जातो. वि. रा. शिंदे यांनी त्याबद्दल वारंवार सजग केलं होतं. यावर उपाय सर्वजनवादाचा आहे. एक समाज म्हणून आपण प्रश्नांसकडे पाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं मला वाटतं.

प्रश्न – वारकरी संप्रदायात वेगवेगळे प्रवाह आज घुसलेले दिसतात. त्याविषयी…

डॉ. मोरे – लोकहितवादींनी वारकर्यांपना अर्धे ब्राम्हण म्हटलंच होतं. आजही वारकर्यांरना चांगलं नेतृत्व मिळालेलं नाही. त्यामुळे ते अर्धे इकडे, अर्धे तिकडे असे लोंबकळत आहेत. आपल्याकडे पैठण विरुद्ध पंढरपूर हा झगडा जुना आहे. पैठण हे हिंदू धर्मशास्त्राचं गाव. पंढरपूरच्या वाळवंटात समतेचं केंद्र आहे. वारकरी संप्रदायाची धार मराठ्यांना सत्ता मिळाली अन् बोथट झाली. समृद्धी आली की प्रत्येकाला पोटापुरतं मिळतं. समाज संतुष्ट बनतो. आठराव्या शतकात मराठे भारतभर पसरले. महाराष्ट्रात मराठ्यांना, ब्राम्हणांसह इतर जातींनाही सैन्यात कामं मिळाली. सैन्य लुट करून आणी. लुटीचा हिस्सा थोडा घरातही येत असे. समृद्धीचं वाटप होत होतं. अजिबात नाही, असं कमी झालं. काही मिळवायचं हा सामाजिक संघर्ष कमी झाला. समाज गाफील राहिला. वारकरीही बेसावध राहिले. नंतर ब्रिटिश आले. त्यांनी उत्तर भारतातल्या ब्राम्हणांसह शिखांना सैन्यात घेतलं, पण मराठ्यांना घेतलं नाही. मराठे ही लढावू जमात आहे. ते दगाफटका करतील याची ब्रिटिशांना भीती होती.

अशा वातावरणात मराठी समाजाची पिछेहाट होत गेली. वारकरी संप्रदाय या काळाची पावलं ओळखू शकला नाही. ब्रिटिशांनी नवी विद्या आणली. नवा विचार आणला. वारकरी जास्त शिकले नाहीत. त्यांच्यातलं कुणी इंग्रजी विद्या जाणत नव्हतं. त्यावेळी वारकर्यांयचं ब्राम्हणीकरण होत गेलं. अठराव्या शतकाच्या शेवटी बाबा पाध्ये यांनी हिंदू धर्मशास्त्रावरचा शेवटचा ग्रंथ लिहिला, तो पैठणमध्ये नव्हे तर पंढरपुरात लिहिला. धाकटे बाजीराव पेशवे लवाजम्यासह पंढरपूरला वारीला जाऊ लागले. वारकर्यांवत भांडणं होऊ लागली.

हिंदू धर्माची चौकट जात व्यवस्थेसह या काळात वारकरी संप्रदायात घट्ट झाली. पूर्वी वारकर्यां त जात होतीचं. पण ती एकमेकांना टोचत नव्हती. पुढे टोचणं चालू झालं. संतांचा क्रांतीकारी उपदेश वारकर्यांसना पुढे नेता आला नाही. ब्रिटिश राजवटीचे फायदे घेता आले नाहीत. वारकरी संप्रदायानं पाश्चाचत्य शिक्षण घेण्यात कसर ठेवली.

गाफील वारकरी समूहात मग ब्राम्हणी विचार बळकट झाला. पुढे हिंदुत्ववादी घुसले. विश्व हिंदू परिषदेनं पंढरपुरात संतपुजा केली. हा घुसखोरीचा एक प्रकार होता. याउलट पुरोगामी, डावे, अभ्यासक यांनी वारकर्यांाची टिंगलटवाळी करणं चालू ठेवलं. हे वर्णजात मानणारे, दैववादी अशी दूषणं दिली. त्यांच्यात जाऊन काही सुधारणा करण्याचं टाळलं. संतांच्या क्रांतीकारी उपदेशाला दूर लोटलं. याचा बरोबर फायदा हिंदुत्ववाद्यांना झाला. वारकरी संप्रदायातल्या पोकळीत हिंदुत्ववादी उभे राहिले.

पुण्यात पालख्या आल्या की, ज्ञानप्रबोधिनी ही संस्था वारकर्यांाना औषधपाणी पुरवते. त्याला काय लागतं? दोन-तीन डॉक्टर आणि सर्दी-खोकला-तापाची औषधं-गोळ्या. पण बोर्ड लावतात. आरोग्य सेवा देतात. याउलट बघा, हडपसरमधून पालखी दरवर्षी जाते. तिथं समाजवाद्यांनी सुरू केलेला मोठा साने गुरुजी दवाखाना आहे. या दवाखान्याचे लोक, संस्था-चालक, डॉक्टर कधीही वारकर्यांतना ज्ञानप्रबोधिनीसारखी आरोग्य सेवा देत नाहीत. याला काय म्हणायचं? जिथं आपली सत्ता आहे तिथं ती वापरली पाहिजे. ते ना कम्युनिस्टांनी केलं, ना समाजवाद्यांनी. मग वारकरी तुमच्याकडे कसे येतील? त्यांना तुम्ही जवळचे कसे वाटाल?

संत नामदेवांनी त्यांची सत्ता पंढरपुरात वापरली. संत चोखोबांच्या देहाचे अवशेष गोळा केले. विठ्ठलाच्या मंदिराच्या दारात समाधी बांधली. एका अस्पृश्याची समाधी विठोबाच्या दारात. हिंदुस्थानात असं दुसरं उदाहरण नसेल. नामदेवांना हे करताना विरोध झालाच नसेल, असं मला वाटत नाही. ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं त्यांना चोखोबाचं दर्शन घ्यावंच लागेल हे ठणकावून सांगण्यासाठी नामदेवांनी हे केलं. नामदेव एकदा औंढ्याला गेले होते. देवळापुढे कीर्तन करायला त्यांना मना केलं गेलं. त्यांनी देवळाच्या मागे जाऊन कीर्तन केलं. देऊळ फिरवलं. ही कथा त्यातून आली. कीर्तन महत्त्वाचं, देऊळ नव्हे हा त्यातला संदेश. नामदेव हा पहिला मराठी संत देशभर गेलेला. राष्ट्रीय झालेला. त्यांनी दिंड्यांचं संघटन केलं. फड जागविला. वारकर्यां चं नेटवर्किंग केलं. हे क्रांतिकारकत्व नंतरच्या वारकरी नेत्यांना पुढे नेता आलं नाही.

एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे सूत्र सांगत संतांनी सहकाराचा मंत्र दिला. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी ही ओळ उद्योग आणि दानशूरतेची शिकवण देते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे, पक्षीही सुस्वरं आळविती हा विचार पर्यावरण रक्षणाचा पाठ देतो. आज तो महत्त्वाचा आहे. बळबुद्धी वेचोनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी या वचनात शेतीचं सार आलं आहे. आजच्या काळाविषयी संतांनी हे मार्गदर्शन केलं, असं आपल्या लक्षात येतं. चांगलं वागावं, परपीडा देऊ नये हे सांगताना संत भ्रष्टाचार विरोधाचं आणि चांगला माणूस बनण्याचं तत्त्वज्ञानच सांगत आलेत.

प्रश्न – वारकरी संप्रदायाचं नेतृत्व संतांचा शहाणा विचार पुढे न्यायला कमी पडलं, असं तुम्ही मांडत आलात. तुम्हाला तुकोबांचा वारसा आहे. तुमचा व्यासंग मोठा आहे. तुम्ही चळवळीत कार्यकर्ते म्हणूनही काम केलंय. वारकरी संप्रदायाचं नेतृत्व तुमच्यासारखा क्रियावान पंडित का करत नाही?

डॉ. मोरे – माझ्यात एवढी मोठी क्षमता नाहीए. मी ४० वर्ष काम करतोय. मांडणी करतोय. हळूहळू बदल होतोय. काही महिन्यांपूर्वी आम्ही वारकरी साहित्य परिषद स्थापली. फडकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार त्या व्यासपीठावर एकत्र आलेत. प्रबोधनाची भूमिका पुढे जात आहे. संतांचे विचार बालवयात रुजले पाहिजेत. शालेय अभ्यासक्रमात संतसाहित्याचा समावेश व्हायला हवा. संत साहित्य-विचार याविषयी संशोधन, अभ्यासाला गती मिळाली पाहिजे. अभ्यास केंद्र, ग्रंथालय स्थापन झाली पाहिजेत. प्रवचन-कीर्तनकारांच्या शास्त्रशुद्ध शिक्षण देणार्याक वारकरी शाळा निघाल्या पाहिजेत. आजच्या गोंधळमय आणि भरकटलेल्या जीवनाला दिशा देण्याची ताकद संतांमध्ये आहे. त्या विचारांचं सतत जागरण झालं पाहिजे, असं मला वाटतं. मी त्या चळवळीतला एक पाइक म्हणून काम करतोय.

0 Shares
विद्यापीठ झाले पंढरपूर महानामा