सर्व संतांनी श्रीविठ्ठलाच्या सुंदर रूपाचं वर्णन आपल्या अभंगांमधून केलं आहे. मात्र देवाच्या सौंदर्याचं वर्णन करणार्या या संतांनी व्यक्तिचित्रं काही रेखाटली नाहीत. अर्थात मध्ययुगात देशात रेखाटन ही कलाच लुप्त झालेली दिसते. त्यामुळं शब्दांमधून संतांचं व्यक्त होणं विचारात घेऊनच त्यांची चित्रं रेखाटण्याशिवाय पर्याय उरत नाही.
वारीत सहभागी झालेल्या महिलांशी बोलल्यावर संत जनाबाई अजूनही आपल्यात आहेत, असं जाणवतं. जनाबाईंचे अभंग, ओव्या या निरक्षर महिला अत्यंत सहजपणानं म्हणत असतात. १३व्या शतकात वैदिक आणि अवैदिक विचारांचं मिश्रण होऊन नवा समाज तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यात महत्त्वाची भूमिका बजावत होती ती, भाषा. या काळात बोलीभाषांचा आवाज वाढू लागला होता. बोलीभाषांना स्वर, नादाची लय असते. ही लय ओव्यांच्या रूपानं प्रकट होत होती. ही ओव्यांची लय रोजच्या जगण्यातील श्रमाची होती. कष्टाला एका लयीत जोडलं की त्यातून एक शक्ती तयार होते. जहाज, आगगाडी यांच्या इंजिनात वाफ कोंडलेली असते. शिट्टीद्वारे ती बाहेर पडते. घरकामाचा रगाडा उपसणार्या सामान्य स्त्रीची ओवी अशीच उत्स्फूर्तपणे ऐकायला येते. आपल्या विचारांना, भावनेला उद्गार देणारा हा ओवी काव्यप्रकार संत जनाबाईंनी लोकप्रिय केला. समज-उमज एक झाली की, भाषा समृद्ध होत राहते. अशाच प्रकारे जनाबाईंचं शरीर आणि मन गाता-गाता ओव्यांच्या अर्थात विरघळू लागलं. हे गायनं एवढं मनोभावे की, नामदेवांचा विठ्ठल जनाबाईंचा होऊन बसला. स्वर शब्दाला आळवू लागले आणि ओवी ओळीत आली. या ओव्यांची माळ झाली अन् ती गळ्यागळ्यांत ओवली गेली. अंत:करणाच्या व्यथा, गाठी आणि गुंते जनाबाई गुंफत बसल्या. नात्या-गोत्यातील बंध सोडवत बसल्या.
हे झालं जनाबाईंच्या शब्द संवेदनांचं, पण जनाबाई प्रत्यक्ष कशा दिसत असतील, याची कल्पना करता येत नाही. अनेक शतकांचा काळ उलटल्यानंतर जनाबाईंचा मुखडा कसा असेल, त्या स्थूल असतील की सडपातळ, हे प्रश्न प्रत्येक चित्र-शिल्प कलावंतापुढे असतोच. शब्द काळ ओलांडतात, परंतु रूप, लावण्य, सौंदर्याचं तसं होत नाही. संतकाव्यात समाज जीवनाची वर्णनं आहेत, परंतु व्यक्तिचित्राची रेखाटणं नाहीत. त्यात निसर्ग वर्णन आहे, पण दृष्य देखावा चितारलेला नाही. बहुधा मध्ययुगीन काळातच हे जास्त आढळतं. भारतवर्षात अक्षराच्या अनुषंगानं रेखांकनाचं महत्त्व नगण्यच राहिलं. १६व्या शतकापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं रेखांकन करणं वा त्याचा हुबेहूब पुतळा बनवणं या कलेचा र्हास झाला होता. खजुराहो मंदिर असो वा लेण्यांमधील शिल्पकला तिचा र्हास सुरूच राहिला. या कलेचा राजाश्रयही कमी झाला.
रेखाटन ही कला अस्तित्वात राहिली नाही. हुबेहूब रेखाटन करणं हा नजरेचा बारकावा आहे. तो संवेदना आणि दृष्टीचा एक उच्चतम आविष्कार आहे. लयदार अक्षर रेखाटन होतं तसंच लयदार रूपलेखनही होतं. या कलांना आधुनिक काळात अनेक पर्याय उपलब्ध झाल्यानं रेखांकन लुप्त होत चाललं आहे. मराठीत मध्ययुगातील संत महात्म्यांना रूपवर्णन ही कला अवगत होती, असंच म्हणावं लागेल. विठ्ठलाचं वर्णन प्रत्येक संतानं केलं आहे. रेखाटन मात्र कुणी केलेलं दिसत नाही.
जनाबाई कशा दिसत असतील याचा काही एक अंदाज येत नाही. त्यामुळंच वरील विचार डोक्यात येत राहतात. जनाबाईंचं चित्र रेखाटताना यापूर्वी रेखाटलेल्या संताच्या चित्रांचा अनुभव पदरी होता. जनाबाईंच्या जीवनातील कष्टप्रद क्षण मनात घोळत होते. संताच्या समाजातील प्रचलित चित्रांचा जनमानसावर मोठा प्रभाव आहे. संतांच्या चेहर्याचे पुरावे कुठंच उपलब्ध नाहीत. त्यामुळं त्याबाबत सतत विचार करत राहणं एवढंच हातात उरतं. जनाबाई ८० हून अधिक वर्ष जगल्या. त्यांनी कोणत्या वयात अभंग, ओव्या लिहायला सुरुवात केली हे सांगता येत नाही. जनाबाईंची सिनेमांमधील प्रतिमाच समाजात रुजली आहे.
कव्हरवर मी मुद्दामहून प्रौढ जनाबाई चितारल्या आहेत. त्यावर कोणत्याही सिनेमाचा प्रभाव नाही. ओव्या आणि अभंगातून जनाबाईंनी जे परिपक्व विचार व्यक्त केले आहेत, ते चेहर्यावर जाणवावेत, असा प्रयत्न होता. यात जनाबाई जात्यावरच्या ओव्या म्हणत आहेत. चित्रातील हिरवा रंग प्राण या संकल्पनेशी संबंधित आहे. पाणी आणि आकाशात आपल्याला हा रंग आढळतो. जनाबाई ‘उभर वट्याचं’ नऊवारी हिरवं लुगडं नेसल्या आहेत.
जनाबाई ज्ञानदेव-सोपान मुक्ताबाई यांच्यापेक्षा वयानं मोठ्या होत्या. त्या ज्ञानदेवांच्या ओव्यांच्या चाहत्या होत्या. नामदेवांच्या वाळवंटातील कीर्तनाच्या साक्षीदार होत्या. जनाबाईंचं चित्र रेखाटताना या सर्व प्रतिमा डोळ्यापुढं येत होत्या.
आकाशात अखंडपण बदलणारे विविध रंग, आकार रूपं कोण निर्माण करतो, असा प्रश्न जनाबाईंना पडला.
नाही आकाश घडणी| पाहा स्वरूपाची खाणी॥
स्वरूप हे अगोचर| गुरु करिती गोचर॥
गोचर करिताती जाणा| दृष्टी दिसे निरंजना॥
नाही हात पाय त्यासी| जनी म्हणे स्वरूपासी॥
विठ्ठलाच्या सगुण साकार रूपाची भक्ती करणार्या जनाबाईंना ईश्वराचं हे निर्गुण निराकार रूप भावलं. या निराकार परमेश्वराचं शब्दांमधून असं दर्शन घडवणार्या जनाबाईंचं दर्शन जसं झालं तसं मी कव्हरवर साकारलं आहे.
जनाबाई कोण होत्या? ठायीठायी जनाई