संत नामदेवरायांनी देशभर फडकावलेल्या समतेच्या पताकेखालीच स्त्री-पुरुष भेदभावाचा अंधार साचलाय. वारकरी महिलांना मंदिरात कीर्तन-प्रवचन करण्यास मज्जाव केला जातोय. त्यांचा अधिकार नाकारला जातोय. महिला संतांना बरोबरीचं स्थान देणार्या संत नामदेव-ज्ञानदेवांच्या वारकरी सांप्रदायात हे घडतंय. कटू असलं तरी हे सत्य आहे.
‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी…’ असं तत्कालीन कर्मठांना ठणकावणार्या जनाबाईंच्या वारसांना अर्थात आजच्या महिला कीर्तनकारांना मला भेटायचं होतं. त्यांना बोलतं करायचं होतं. त्यांना वारकरी, कीर्तन, प्रवचनकार म्हणून समाजानं स्वीकारलंय का, त्यांना कशी वागणूक मिळते? हे चाचपायचं होतं.
पहिल्याच भेटल्या मुंबईतील भगवतीताई दांडेकर-सातारकर. त्या दीडशे वर्षांची मोठी परंपरा असलेल्या सातारकर फडाची सर्व जबाबदारी सांभाळतात. खरं तर वडील बाबामहाराज सातारकरांना झालेल्या अपघाताचं निमित्त होऊन भगवतीताईंना फडावर कीर्तनासाठी उभं राहावं लागलं. अर्थात त्यांच्यासाठी ते अवघड नव्हतं, कारण घरातच कीर्तन पाहत त्या मोठ्या झाल्या होत्या, मात्र दडपण होतंच. पहिलंच कीर्तन ताई अर्ध्या तासातच उरकतं घेतील, असं टाळकर्यांनाही वाटलं होतं पण ताईंचं कीर्तन अडीच तास रंगलं. तेव्हापासून आज १८ वर्ष त्या कीर्तन करत आहेत. महिला कीर्तनकार म्हणून भगवतीताईंना सुरुवातीला बराच जाहीर विरोध झाला. पण ताईंनी स्वतःला सिद्ध केलं. आजही काही लोकांचा त्यांना विरोध असल्याचं त्या सांगतात. त्याबद्दल अधिक विचारता त्या म्हणाल्या, ‘समाजात तीन प्रवृत्ती आहेत. त्यापैकी पहिल्या प्रवृत्तीतील लोक स्त्रिया पुढे आल्या तर आपलं स्थान डळमळीत होईल असा विचार करतात. दुसर्या विचारांच्या लोकांना स्त्रियांनी फक्त कौटुंबिक जबाबदार्या सांभाळाव्यात, असं वाटतं, तर तिसर्या प्रवृत्तीच्या लोकांना स्त्रिया ही केवळ उपभोगाची वस्तू वाटतात. त्यापैकी तिसर्या प्रवृत्तीला आपण फार महत्त्व देत नाही. आपण आपल्याला दहापटीनं अधिक सिद्ध करावं, हे या सगळ्यावरचं उत्तर.’ सातारकर फडाची उदार परंपरा यानिमित्तानं त्या नमूद करतात. या फडावर परंपरेत मुलगा आणि मुलीला समान मानलं जातं. त्यामुळंच बाबामहाराजांनी फडाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्याचं त्या आवर्जून सांगतात.
‘बाहेर महिला कीर्तनकारांना अजूनही विरोध होतो. काही वारकरी फडांमध्ये तर महिला कीर्तनकारांची परंपराच नाही, पण बाबामहाराजांनी ठामपणे माझी निवड केली. त्यानंतर मलाही विरोध झाला, पण बाबा त्यांच्या निर्णयापासून हटले नाहीत. आज मी समर्थपणे सातारकर फड सांभाळतेय. जेव्हा कुठेही महिलांना कीर्तनात टाळ घेऊनही उभं राहू दिलं जात नव्हतं, तेव्हा सातारकर फडात महिला सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होत्या. त्यावेळी ‘सातारकर फडात महिला टाळ घेऊन नाचतात’, अशी कुत्सित टीकाही झाली होती. महिलांना कीर्तन करायला बंदी असतानाच्या काळात आमच्या फडात तीन महिला कीर्तनकार होत्या’, असंही भगवतीताई नमूद करतात. स्त्री-पुरुष समानतेविषयी सर्व संतांनी आपल्या अभंगांमधून लिहून ठेवलंय, आपण त्याचं आचरण करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. ‘ज्यांनी आम्हाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही सोबत घेऊन चालण्याची शिकवण आम्ही ज्ञानेश्वरमाऊलींकडून घेतली आहे. स्त्रीची अनेक अनेक रूपं आहेत. तिचं श्रेष्ठ रूप म्हणजे माता. चुका पोटात घालते ती माता. माऊलींनीही त्यावेळच्या समाजाने त्यांना दिलेले कष्ट, त्यांना दिलेली वागणूक सारं काही पोटात घालून त्या समाजाच्या हिताचं कार्य केलं. त्यातूनच एक वेगळा समाज जन्माला आला. स्त्रीत्त्व तुमच्याकडे असल्याशिवाय हे होणारच नाही’, अशी वारकरी विचारधाराही भगवतीताई सांगतात.
या भेटींमध्ये दुसर्या होत्या, प्रसिद्ध अभंगगायिका गोदावरीताई मुंडे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीनेनं वारकर्यांच्या घराघरांत स्थान मिळवलेल्या गोदावरीताईंनी जनाबाईंचे बहुतेक अभंग, गवळणी गायल्यात. त्या आहेत, जनाबाईंच्या गावच्या अर्थात परभणीतील गंगाखेडच्या. गेल्या २५ वर्षांपासून भजनं गाणार्या गोदावरीताईंनी आजवर हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. चाळीशी ओलांडलेल्या गोदावरीताई अनेक वर्षांपासून संप्रदायाशी जोडलेल्या आहेत. सर्वत्र प्रसिद्धी मिळाली खरी पण महिला म्हणून वाट्याला आलेले अपमानही त्यांनी पचवले, अर्थात त्याचा सलही मनात आहेच. एक अनुभव त्या सांगतात. ‘या वारीला त्या प्रसंगाला तीन वर्षं होतील. तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या देहूच्या बापूसाहेब मोरे यांचं वारीच्या वाटेवर वाखरीमध्ये कीर्तन होतं. त्यावेळी मला त्या कीर्तनात अभंग म्हणण्याचा आग्रह झाला. पण महिलांना कीर्तनात ‘चाल धरण्याचा अधिकार नाही’, असं सांगून मला खाली बसविण्यात आलं. खरं तर अशा अपमानांनी आपल्या मनात सूडबुद्धी निर्माण होईल किंवा परमार्थावरून मन उडून जाईल. पण संतांचे बोलच सर्व अपमान पचवायला शिकवतात. मग ‘कुणी जरी निंदा कुणी जरी वंदा आपला सुहिताचा धंदा’…, असा संतवचनाचा दाखला देत गोदावरीताई आपल्या कामात मग्न होतात.
महिला कीर्तनकार, प्रवचनकारांशी भेटणं, बोलणं सुरू असताना चंदाताई तिवाडींशी बोलणं अपरिहार्य होतं. चंदाताई म्हणजे सुप्रसिद्ध भारुडकार. समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमांमधून नेहमी दिसणार्या चंदाताईंनी १९८१ला पुणे आकाशवाणी केंद्रावर पहिल्यांदा भारुड सादर केलं. राज्य सरकारच्या नशाबंदी मंडळापेक्षा चंदाताई तिवाडींची भारुडं अधिक लोकापर्यंत पोचली, असं बर्याचदा उपहासानं म्हटलं जातं. त्यात वावगंही नाही. संतांनी समाजप्रबोधनासाठी रचलेल्या भारुड या काव्यप्रकाराच्या सादरीकरणाला साजेसा आवाज, कला चंदाताईंकडे आहे. त्यामुळं सरकारच्या नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून चंदाताईंनी एचआयव्ही, कुष्ठरोग, टीबी, नशामुक्ती अशा विविध विषयांवर भारुडं लिहिली आणि सादर केलीत. आजही त्याचं समाजप्रबोधनाचं काम सुरूच आहे.
चंदाताई भारुड करायला लागल्या तेव्हा बाई भारुड करते आणि नाचते हे पाहायला गर्दी जमे. त्यामुळं चंदाताईंना विरोध होऊ लागला. भजनी मंडळी, पुरुष वारकरी यांनीही विरोध केला. ‘अजूनही फडकरी लोकांचा विरोध आहे. देहूकर, वासकर यांच्या फडावर महिलांनी कीर्तन करण्याची किंवा टाळ घेऊन कीर्तनात उभं राहण्याची पद्धत नाही. त्यांच्या व्यासपीठावर, सप्ताहात किंवा त्यांच्या ठरलेल्या गावातील सप्ताहात महिलेचं नाव असेल तर महाराज लोक कडाडून विरोध करतात. हभप बंडातात्या कराडकर, वासकर महाराज, देहूकर महाराज हे लोक आजही आम्हा स्त्रियांना भारुड आणि कीर्तन करण्यास मान्यता देत नाहीत. स्त्रियांनी दिंडीचं नेतृत्व करण्यासही विरोध असतो.’ चंदाताई अनुभव सांगत असतात. अर्थात या विरोधाला न जुमानता भारुड करत राहिले. समाजानंही स्वीकारलं, असंही त्या नमूद करतात.
‘विरोध करायला, भांडण करायला आमच्याकडे वेळ नाही. लोक विरोध करतात कारण, त्यांना भीती आम्ही पुढं जाण्याची आहे. प्रत्येक स्त्री कल्पना चावला, झाशीची राणी होऊ शकत नाही, पण अभ्यास करून स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करू शकते. तेच आम्ही केलं. डबक्यात राहणारा बेडूक डबक्यालाच राज्य समजतो. तसंच स्त्रियाचं आहे. त्यांनी त्यातून बाहेर पडलंच पाहिजे.’ असे विचार चंदाताईंनी यानिमित्तानं व्यक्त केले.
याबाबतीत थेटपणे बोलल्या, पुण्याच्या हभप भीमाताई लोंढे. १९८५ पासून त्या संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत नामदेव या संतांवर कीर्तन करतात. स्वत: संगीतविशारद असलेल्या भीमाताई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेतात. घरात वारकरी परंपरा. वडील निवृत्तीबुवा गायकवाड यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या कीर्तन करू लागल्या.
भीमाताई सांगतात, ‘पुरुष माणसं सहन करत नाहीत महिला कीर्तनकारांना. तुम्हाला सांगते, पुरुषांपेक्षा महिलाच चांगलं कीर्तन करतात. पण आपल्याकडं कीर्तनाला कुणी महाराज आले नाही, तर महिला कीर्तनकाराला संधी दिली जाते. कीर्तनाचं मानधन देतानाही भेद केला जातो. महिला कीर्तनकारांच्या तुलनेत पुरुष कीर्तनकारांना अधिक मानधन दिलं जातं. ते असो, पण महिलांनी या क्षेत्रात यायलाच हवं. आता महिला खंबीर होऊ लागल्या आहेत. पूर्वीच्या महिला बुजर्या होत्या. वाद नको म्हणून अनेक ज्येष्ठ कीर्तनकार महिला अधिकारांविषयी फार आग्रही राहत नाहीत.’
महिला म्हणून मिळणार्या सापत्नभावाचा एक अनुभव भीमाताईंनी सांगितला. त्यांच्या माहेरी म्हणजे आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या गावात वासकरमहाराजांचं कीर्तन होतं. त्यावेळी ‘आमच्या भीमाताई कीर्तनात चांगली साथ देतात, त्यांना सहभागी करून घ्या,’ अशी विनंती गावकर्यांनी केली. महाराजांनी या गोष्टीला तात्काळ विरोध केला. ‘तुम्ही बायकांना टाळ घेऊन उभं करणार असाल तर मला ते अजिबात मंजूर नाही. हा अस्सा निघून जाईन’, असं ते म्हणाले. तेव्हा भीमाताईंनीही वासकरमहाराजांसोबत आपण कीर्तन-भजनात सहभागी होणार नाही, असं जाहीर करून टाकलं! असे कितीतरी प्रसंग असल्याचं भीमाताई सांगतात. जीवनात संघर्ष हा करावाच लागतो, असं तत्त्वज्ञानही मग त्यांनी बोलून दाखवलं. ‘एकदा कार्यक्रमात माईक हातात आला की, मग कोणाची पर्वा करायची नाही. आपलं कीर्तन चांगलं, अभ्यासपूर्ण झालं पाहिजे, यावर लक्ष केंद्रीत करायचं, अशी पद्धत मी अवलंबते’, असं भीमाताईंनी सांगितलं. भीमाताई लोंढे म्हणतात, ‘स्त्री आणि पुरुष असा भेद कोणत्याही संताकडे नाही. आजच्या लोकांकडे हा सगळा भेद आहे. स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वेगळी आहे. ते स्त्रीत्वाकडे पाहतात. संतांनी भेदभाव न करता शरिरातला आत्मा पाहिला होता.’
भीमाताईंनंतर भेटल्या, पन्नाशीच्या यमुनाबाई शिंदे. बीडच्या. खास मराठवाडी ठसक्यात बोलणार्या. १२व्या वर्षापासून कीर्तन करणार्या. संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत जनाबाई आणि संत ज्ञानेश्वरांवर त्या कीर्तन करतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यात ६२ क्रमांकाच्या दिंडीच्या चालक-मालक आहेत. यमुनाताईंनी आजवर पाचशेहून अधिक कीर्तनं केलीत. तुकाराम महाराजांच्या जिजाऊंवरही त्या बोलतात. हे करत असताना त्या अनाथ महिलांसाठी आश्रम चालवतात. यमुनाताई सांगतात, ‘कीर्तन करण्यासाठी अभ्यास आणि तयारी बरीच लागते. पूर्वी महिला कीर्तनकारांना चांगली वागणूक मिळत नव्हती. तुलनेत आता बरं आहे. कीर्तनातून मान सन्मान आणि पैसाही मिळतो. बीडमध्ये कीर्तनासाठी चांगलं वातावरण आहे. जिल्ह्यात ‘गड’ भरपूर आहेत. तिथं कीर्तनं होत असतात, पण महिलांना कीर्तनाचे कार्यक्रम देत नाहीत. भगवान बाबा, वामन भाऊ, ओंकार स्वामी या महाराजांसोबत बीडच्या लोकांची माऊलींवर मोठी श्रद्धा आहे.’ यावेळी यमुनाबाई जनाबाईंबद्दल भरभरून बोलल्या. जनाबाईंची परंपराच आपण पुढे नेत होत आहोत, असं बोलल्या. या क्षेत्रातील पुरुषांच्या वर्चस्वाबद्दल विचारलं असता, ‘पुरुषांना महिला कीर्तनकारांबद्दल ‘अढी’ असते. त्यांच्या सांगण्यानुसार, सोयीनुसारच कीर्तन करावं लागतं. काही लोकांचा तर आजही महिलांच्या कीर्तनाला विरोध आहे. आता कायद्यानं महिलांना ५० टक्के आरक्षण दिलंय, पण वारकर्यांमध्ये महिलांना फार तर २५ टक्केच संधी आहे’, असं निरीक्षण यमुनाताईंनी मांडलं. अनेकदा वाटलं, याबद्दल वारकरी समाजातील ज्येष्ठांशी बोलायला पाहिजे, शेवटी पुरुष वारकर्यांच्या सहकार्यानंच परमार्थ करायचा आहे. त्यामुळं त्यांच्याशी जुळवून घेणं भाग पडतं. अशी समजूतदार पण नाईलाजाची भूमिका यमुनाबाई घेतात.
नाशिकच्या कीर्तनकार सुशिलाताई कामत एम. ए. बी. एड., एल. एल. बी. अशा उच्चशिक्षित आहेत. सुशिलाताई कोकणातले कीर्तनकार गोविंद कामत यांच्या नात. आजोबांची प्रेरणा घेऊन त्या कीर्तनकार झाल्या. १२व्या वर्षीच त्यांनी गीता पाठ केली. सुशिक्षित असूनही परमार्थाचा मार्ग निवडला. १९८५मध्ये दिंडी सुरू केली. त्या सध्या दिंडी क्रमांक ६६च्या मालक आहेत. त्यांची यंदाची ४६वी वारी आहे. त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली तेव्हा कीर्तन करणार्या महिला हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याही नव्हत्या. त्या सांगतात, ‘ज्या होत्या, त्यांना नाना प्रकारच्या अडवणुकीला सामोरं जावं लागलं. महिला कीर्तनकाराचं कीर्तन बंद पाडणं, हातातून टाळ हिसकावून घेणं अशा गोष्टी व्हायच्या. परिस्थिती आता हळू हळू बदलतेय. असं असलं तरी अजूनही बर्याच ठिकाणी महिला कीर्तनकारांना विरोध होतोच. सुशिलाताई सांगतात, ‘कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा हाताशी नोकरी असल्यानं कीर्तनातून पैसे मिळावेत, अशी अपेक्षा ठेवली नाही. मानानं जे मिळायचं ते दिंडीसाठी वापरायचे. आता काळ बदललाय. महिला कीर्तनकारही मानधनासाठी आग्रही असतात.’ सुशिक्षित महिलांनाही आता हे विश्व खुणावत असल्याचं सुशिलाताईंशी बोलताना जाणवलं.
पुणे जिल्ह्यातील हभप सोनल चौधरी लहान वयातच कीर्तन करू लागल्या. चांगला आवाज, वक्तृत्त्व कौशल्य यामुळं त्यांच्या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमातही त्यांना प्रवचनासाठी बोलावतात. कीर्तनकार म्हणून समाज मानसन्मान देतो हे सांगत असतानाच सोनल एक खंत व्यक्त करतात, त्या म्हणतात ‘सध्या कीर्तन, प्रवचन म्हणजे काही लोकांचा ‘व्यवसाय’ बनला आहे. मोठमोठे महाराज ‘अकाउंट’वर पैसे जमा केल्याशिवाय कार्यक्रमाला उभे राहत नाहीत. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत सद्विचार पोहोचले पाहिजेत’, याच विचारांनी आपण कीर्तन, प्रवचनसेवा करत असल्याचं सोनल नम्रपणे नमूद करतात.
या सगळ्याजणींशी बोलताना काही नवीन आणि धक्कादायक बाबी कळल्या. त्यातील एक बाब म्हणजे, जिथं पुरुष कीर्तन करतात तिथं महिला कीर्तन करू शकत नाहीत. खुद्द पंढरपूरचं श्रीविठ्ठल मंदिर, ज्ञानदेवांची आळंदी आणि तुकोबारायांच्या देहू येथील मंदिरातील वीणा मंडप, देहूजवळील तुकाराम महाराजांची तपोभूमी असलेला भंडारा डोंगर इथं महिलांना कीर्तन करता येत नाही! अर्थात समतेची थोर उदार परंपरा सांगणार्या वारकरी परंपरेच्या पाईकांकडून या ठिकाणी महिलांना कीर्तन करण्याची मुभा दिली जाते, ती महिलांसाठीच्या वेगळ्या हरिनाम सप्ताहात! त्यासाठी वेगळी जागा दिली जाते. पुरुष आळंदीतल्या वीणा मंडपात कीर्तन करतात, देहूतल्या वीणा मंडपात कीर्तन करतात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगासमोर कीर्तन करतात. पण महिलांना ती परवानगी नाही. त्या आळंदीत देवाच्या समोर नाही तर देवळाच्या डाव्या, उजव्या भागात कीर्तन करू शकतात. मुक्ताई मंडपातही त्या कीर्तन करू शकतात. पंढरपूर मंदिरात मंदिराच्या मागं किंवा आजूबाजूला महिलांना कीर्तन करता येतं! देहू येथील भंडारा डोंगरावर तर महिलांना कीर्तन, प्रवचन करण्यास बंदीच आहे. कीर्तनकार महिलांनी तिथं फिरकायचं नाही असा दंडकच आहे. तेथील पांडुरंग महाराज घुले यांचा महिलांच्या कीर्तनाला कडवा विरोध असल्याचं कळलं.
दुसरी एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट कळली. आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या आवारात असलेल्या अजान वृक्षाखाली अभ्यास केला तर चांगला अभ्यास होतो, पाठांतर होतं, अशी श्रद्धा आहे. पण इथंही ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी महिलांना बंदी आहे! वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे, समता. सर्व प्रकारचे भेद नष्ट होऊन समाजात बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून साडेसातशे वर्षांपूर्वी समचरण सावळ्या विठोबाचं प्रतीक घेऊन संत नामदेव-ज्ञानदेवांनी ही चळवळ सुरू केली. त्यात नामदेवांसोबत जनाबाई आणि ज्ञानदेवांसोबत मुक्ताबाई शेवटपणे खंबीरपणे उभ्या राहिल्या. नंतर तब्बल चारशे वर्षांनी याच वारकरी पंथाच्या समतेच्या शिकवणीवर ‘कळस’ चढवतणार्या तुकोबारायांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी त्यावर ‘ध्वजा फडकवली’ हे सारं वाचलं होतं. कीर्तनकार महिलांची मनं जाणून घेतल्यानंतर वारकरी सांप्रदायाच्या धुरीणांची मतं समजणं आवश्यक होतं. तीही अचंबित करणारी होती…
पहिल्यांदा संपर्क झाला, संप्रदायातील अधिकारी आणि वासकर फडाचे प्रमुख विठ्ठलराव तात्यासाहेब वासकर महाराज यांच्याशी. ६६ वर्षे वयाचे वासकर सांगतात, ‘परमार्थात लिंगभेद नाही. परमार्थाचा अधिकार सर्वांना आहे. पण लोक महिला कीर्तनकाराकडे कोणत्या दृष्टीनं पाहतील हे सांगता येत नाही. त्यामुळं स्त्रियांनी कीर्तन करू नये, अशी रूढ पडली असेल. त्याला अनुसरूनच आम्ही महिलांना आमच्या फडात कीर्तन करू देत नाही.’ आपलं म्हणणं माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी महाराजांनी अधिक थेट, सोप्या भाषेत उदाहरणांसह सांगण्यास सुरुवात केली. ‘म्हणजे असं आहे की, स्त्रियांकडे एकटक पाहत राहिल्यानं पुरुषांची कामप्रवृत्ती जागृत होते. कीर्तनात कीर्तनकाराकडं नीट लक्षपूर्वक पाहावं लागतं. त्यांचं ऐकावं लागतं. त्यामुळं एखाद्या महिलेला कीर्तन करण्यास परवानगी दिली म्हणजे स्त्रियांकडे पाहण्यासाठी ‘लायसन’च दिल्यासारखं होणार. कीर्तनात नाचावं लागतं. महिला कीर्तनकार नाचल्या की, साडी इकडे तिकडे होते… समाजात आंबट शौकीन माणसं असतातच ना? वारकरी असला तरी तो संत, समदृष्टी तर नाही ना? स्त्री आणि पुरुषाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सारखी झालेली आहे, असं नाही ना? काही जरी असलं तरी पुरुषांमध्ये ‘ती’ वृत्ती असतेच.’ हे सांगत असताना वासकरमहाराज परंपरा ऐकवू लागतात. ‘स्त्रियांनी ऐकावं, पाठांतर करावं पण टाळ घेऊन कीर्तनाला उभं राहू नये. आमच्या फडावर हे पाळलं जातं.’
मग महाराज आपण देवींची पूजा करतो. महिला संतांना मानतो. त्याचप्रमाणे एखादी स्त्री जर समाज प्रबोधनाचं कार्य करत असेल तर, तिच्याबद्दल ‘तसे’ विचार माणसाच्या मनात कसे येतील?, या माझ्या सवालावर त्यांनी ‘माणसाच्या मनाचं काही सांगता येत नाही’, हे पुन्हा ऐकवलं. कीर्तन करणारी महिला सुंदर असेल तर जमलेल्या लोकांची भावना ‘वेगळी’ असते हा मुद्दा पटवताना ते म्हणाले, ‘एकीकडं बाबा महाराजांचं कीर्तन असेल आणि दुसरीकडे ऐश्वर्या रायचं कीर्तन असेल तर समाज ऐश्वर्या रायच्या कीर्तनाला गर्दी करणार. म्हातारे लोकही ऐश्वर्या रायला पाहायला गेलो होतो असं सांगतील.’
गेली अनेक वर्ष ज्या महिला कीर्तन करतात त्यांना काय लोक फक्त बघायलाच जात असतील, असं म्हणायचं का? पुरुषानं पुरुषाकडं पाहिल्यावर तसा भाव निर्माण होऊ शकतो, असा प्रतिवाद करत मी एका वारकरी शिक्षणसंस्थेमध्ये आलेल्या लहान मुलांवर पुरुषाकडून झालेल्या अत्याचाराचं उदाहरण दिलं. त्यावर ‘स्त्री उपलब्ध झाली नसेल म्हणून झाले असतील लहान मुलावर अत्याचार’, असं महाराज उत्तरले. तसंच अशा प्रकारे स्त्रिया पुढे येऊ लागल्या तर मनामध्ये येणार्या विचारांना कंट्रोल करता येणार नाही, असं महाराज ठामपणे म्हणाले. शिवाय कीर्तनामधून सात्त्विक भाव निर्माण होण्याऐवजी कामप्रवृत्ती निर्माण होत असेल तर, असला परमार्थ करावा का? असा सवाल वासकर महाराजांनी उपस्थित केला. त्यामुळं महिलांना कीर्तन करण्यास आमच्या फडाचा विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा बजावलं. वर महिलांच्या कीर्तनाला जाऊ नका किंवा महिलांनी कीर्तन करू नये, असा विरोध करायला आम्ही जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वारकरी सांप्रदायातील अधिकारी व्यक्तीमत्व या नात्यानं आळंदी आणि पंढरपूर मंदिरात महिलांना कीर्तन करण्यास परवानगी देण्याबाबत विचारलं असता, ‘सर्व फडकरी यावर विचार करून निर्णय घेऊ’, असं ते म्हणाले. शिवाय महिला कीर्तनकाराच्या कीर्तनाला महिलाच श्रोत्या, वादक असतील तर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असा निर्वाळाही महाराजांनी दिला.
दुसरे होते, सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर. बाबामहाराज कीर्तनासाठी वगैरे खूप मानधन घेतात, असं ऐकलं असल्यानं मनात त्यांची प्रतिमा काहीशी ‘निगेटिव्ह’ होती. पण आश्चर्य म्हणजे ते अत्यंत ‘पॉझिटिव्ह’ म्हणजे महिलांच्या बाजूनं बोलले. ते म्हणाले, ‘स्त्रियांनी कीर्तन करावं का, हा प्रश्नच उपस्थित होऊ नये. कारण आमच्या सातारकर फडावर माझी मुलगी भगवतीताई कीर्तन करते. एवढंच नाही तर ७० ते ८० वर्षांपूर्वीच माझे आजोबा दादामहाराज यांनी स्त्रियांना फडावर कीर्तन करायला परवानगी दिली. केवळ परवानगीच दिली नाही तर त्यांनी सोमवतीबाई कीर्तीकर, आनंदीबाई कुलकर्णी तसंच आणखी दोन-तीन स्त्रियांना कीर्तन शिकवलं. शिवाय इथं तिथं नाही तर आनंदीबाईंना थेट पंढरपुरात फडावर कीर्तन करायला लावलं. म्हणजे आम्ही आमच्या कृतीतून ८० वर्ष तुमच्या प्रश्नाला उत्तर देत आहोत.’ महिलांच्या कीर्तनाला तुमच्या फडावरच्या किंवा कुटुंबातील लोकांनी विरोध केला का, असं विचारता, ‘कोणी तसा विरोध केला नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं. मग वारकरी परंपरेत स्त्रियांनी कीर्तन करू नये, असं कोणी सांगितलं आहे का? असं विचारल्यावर ‘असं कोणीही सांगितलेलं नाही,’ असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याबाबत वारकरी परंपरा, संतांचे विचारही सांगितले.
‘सकळांसी येथे आहे अधिकार|
स्त्री, शुद्र आदी अंत्यज जन| आदी करोनी वेश्याही॥’
असा संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला बाबामहाराजांनी दिला. शिवाय याबाबत त्यांनी संत जनाबाईंचंच उदाहरण दिलं. ‘नामदेव महाराजांनी जेव्हा पहिलं कीर्तन वाळवंटात केलं, तेव्हा पहिल्या फडकरी जनाबाई होत्या. याचं प्रमाण म्हणजे,
नामदेव कीर्तन करी| पुढे देव नाचे पांडुरंग॥
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग॥
हा अभंग आहे. फडामध्ये अभंग म्हणायला सांगण्याचा अधिकार फडप्रमुखाला असतो. याचा अर्थ जनाबाई फडप्रमुख होत्या. त्यांना तेवढा अधिकार होता. त्यांचा अधिकार ज्ञानोबारायांनी मानला. आता इतर कोणी तो मानावा की मानू नये, हा माझा प्रश्न नाही. आम्ही संतांनी घालून दिलेल्या पद्धतीनंच चालतो.’ स्त्रीपुरुष भेदाविषयी बाबामहाराज म्हणतात, देह अवयव लिंग दर्शन| तेणे स्त्री पुरुष नामाभिधान॥ या संतवचनानुसार आपण लिंगावरून ठरवतो मुलगी झाली की मुलगा. ‘परी आत्मी आत्मा नाही| जाण दोघे समानची॥ बाईच्या आणि पुरुषाच्या शरिरात ‘आत्मा’च असतो. बाईच्या शरिरात ‘आत्मी’ आहे असं आपण म्हणतो का? तसं नसेल तर आपण का भेद करतो, असा सवालही बाबामहाराजांनी उपस्थित केला.
तिसरे होते, बंडातात्या कराडकर. त्यांच्या शब्दाला वारकर्यांमध्ये मोठा मान आहे. देहूशेजारी ‘भोपाळ दुर्घटना फेम’ दारू कंपनीचा कारखाना उभा राहत होता. वारकर्यांनी त्याविरोधात मोठं आंदोलन करून तो प्रयत्न हाणून पाडला. त्या आंदोलनाचं नेतृत्व बंडातात्या करत होते. तेव्हापासून ते ‘फोकस’मध्ये आहेत. त्यांच्या मते ‘वारकरी संप्रदायामध्ये महिला कीर्तकारांना संमती नाही. संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत जनाबाई या कीर्तन करत होत्या, असे कुठेही दाखले नाहीत. महिलांची कीर्तनाची परंपराच नसल्यानं देहू, आळंदीच्या वगैरे वीणामंडपात महिलांना कीर्तनाची परवानगी देण्याची पद्धत नाही. त्यात ‘शुचिता’ वगैरे अशाही बाबी असाव्यात. भविष्यात महिलांना अशी परवानगी हवी असेल तर त्यांनी तशी संमती घ्यावी. अर्थात तशी वेळ आली तर मात्र त्यात दोन गट पडतील. एक असेल पारंपरिक आणि दुसरा असेल उदारमतवादी’, असं बंडातात्यांचं म्हणणं पडलं. आपलं बोलणं संपवताना वारकरी संप्रदाय महिला कीर्तनकारांना विरोध करत नाही, याचा अर्थ बंडातात्यांचा महिलांच्या कीर्तनाला पाठिंबा आहे, असा घेऊ नका, असं बजावायलाही ते विसरले नाहीत.
जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वारसा सांगणारे देहूचे हभप बापूसाहेब मोरे यांनी महिलांना ४०० वर्षांपूर्वीच संतांनी आरक्षण दिल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांनी ‘यारे यारे लहान थोर यातिभलती नारीनर’, ‘सकळांसी येथे आहे अधिकार…’ या अभंगांचा दाखलाही दिला. त्याचवेळी स्त्रियांचा परमार्थ ‘वेगळा’ असल्याचं त्यांनी नमूद केलं. तो मुद्दा आणखी विस्तारानं स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘स्त्री-पुरुष एकत्र आले तर तिथं वेगळा भाव निर्माण होतो. हरिनामापासून कोणालाच वंचित ठेवलेलं नाही. पण स्त्री आणि पुरुषांचा परमार्थ स्वतंत्रपणेच असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. भजनगायिका गोदावरीबाई मुंडेंना तुम्ही कीर्तनात रोखलं होतं, याबद्दल विचारलं असता, ‘मला त्यांच्याबद्दल वैयक्तिक आदर आहे, पण पुरुषांच्या कीर्तनात महिलांनी साथ करू नये, असं माझं ठाम मत आहे’, असं बापूसाहेब म्हणाले.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे मालक असलेल्या बाळासाहेब आरफळकर यांना याबाबत विचारलं असता, ‘मला यातलं फारसं माहिती नाही. परंपरा असल्यानं महिलांना विरोध होत असावा’, असं म्हटलं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार मात्र आळंदीच्या मंदिरातील महिला कीर्तन व्यवस्थेबद्दल सविस्तर बोलले. ते म्हणाले, ‘फडकर्यांची जी परंपरा आहे त्यात महिला कीर्तन करत नाहीत, टाळ घेऊन उभ्या राहत नाहीत. महिला आणि पुरुष एकत्रित कीर्तन करत नाहीत. अलिकडच्या काळात महिला स्वतंत्र कीर्तन करू लागल्या आहेत. टाळ घेऊन उभ्या राहू लागल्या आहेत. महिलांचे स्वतंत्र सप्ताहसुद्धा होऊ लागले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात महिलांना वीणा मंडपात कीर्तन करायला परवानगी नाही, पण वीणा मंडपाच्या पुढं असलेल्या कारंजे मंडपात महिला कीर्तन करतात. कारंजे मंडप माऊलींच्या समाधीच्या अधिक जवळ आहे. वीणा मंडपाची परंपरा आम्ही पाळली आहे. कारंजे मंडप, मुक्ताई मंडपात, मंदिराच्या आवारात महिला कीर्तन करू शकतात.’
वीणा मंडपात कीर्तन करताना पुरुषांनाही टोपी, पायजमा, लुंगी घालून कीर्तन करायला परवानगी नाही. शिवाय तिथं बसून कीर्तन करता येत नाही. धोतर, नेहरू शर्ट, फेटा या गणवेशात उभं राहूनच या मंडपात कीर्तन करण्यास परवानगी आहे. सुसूत्रता, शिस्तीसाठी महिला आणि पुरुषांची स्वच्छतागृहं वेगळी ठेवली जातात, तशाच प्रकारे महिलांना कीर्तनासाठी वेगळी जागा ठेवलेली आहे.
मंदिराच्या आवारातील अजानवृक्षाखाली महिलांना ज्ञानेश्वरी पारायण करू दिलं जात नाही. त्या बद्दल विचारता, ‘अजानवृक्षाजवळील पायर्या चढून गेल्यानंतर जो कट्टा आहे तिथं एका वेळी ८ ते १० लोक बसू शकतात. तिथं पुरुष बसतात. पायर्या उतरल्यानंतर जी जागा आहे, तिथं महिला बसतात. त्यांनीही ती व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे अजानवृक्षाच्या खालीच महिलांनाही बसता येतं. आम्हाला वरतीच बसायचंय अशी भूमिका जे घेतात, ते तिथं कधीच येऊन बसत नाहीत. पारायण करत नाहीत. ज्यांना पारायण करायचंय, त्यांचं काहीच म्हणणं नसतं. त्यासाठी आंदोलन भलतेच करतात. दुसरं म्हणजे महिलांच्या कीर्तनाला पुरुषही जाऊ शकतात.’
मंदिरातील महिलांच्या कीर्तनाच्या विषयावर अधिक विचारल्यावर राजाभाऊ मंदिराचा इतिहासच सांगतात. ‘माऊलीचं सध्याचं मंदिर हे सुरुवातीला सिद्धेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरालगत माऊलींनी समाधी घेतली. मग मंदिराची रचना बदलली. श्रीमंत शिंदे सरकारांनी वीणा मंडप बांधून दिला. महाद्वार आणि नगारखाना यांचं बांधकामही शिंदे सरकारांनीच केलं. पाणदरवाजा आणि त्यासमोरच्या ओवर्या पेशव्यांनी बांधल्या. गणेश दरवाजाच्या वरचा नगारखाना हैद्राबादच्या निजामानं बांधला. मंदिराच्या बांधकामात असे सुमारे १०० वर्षांत बदल होत गेले. मंदिर रचनेत असे बदल होत असताना हैबतबाबांनी वीणा मंडपात विण्याचा पहारा सुरू केला. सध्या तिथं अखंड वीणा झंकार सुरू असतो. तो सुरू झाल्यानंतर नियमावली सुरू झाली. दिंड्यांना जशी नियमावली आहे तशी या मंडपाचीही नियमावली आहे. त्यावेळी महिला कीर्तन करत नव्हत्या. त्यामुळं महिलांच्या कीर्तनाचा वगैरे विषयच पुढं आला नव्हता. नंतर महिलांनी परवानगी मागितली तेव्हा त्यांना मंदिराच्या आवारात कीर्तन करण्याची परवानगी दिली गेली. मुक्ताई मंडपात कीर्तन करू दिलं गेलं. त्यानंतर कारंजे मंडपातही कीर्तन करू दिलं गेलं. त्याला कोणाचीही हरकत नाही.’ हे सांगत असतानाच ‘वीणा मंडपात कीर्तन करण्याचा आग्रह महिलाच धरणार नाहीत’, असा ‘विश्वास’ राजाभाऊ चोपदारांनी व्यक्त केला.
या सर्व कारभार्यांमध्ये काहिसा वेगळा सूर ऐकायला मिळाला, श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य शिवाजीराव मोहिते यांचा. वारकरी सांप्रदायात महिलांवर काही बाबतीत अन्याय होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. ‘आळंदीच्या वीणा मंडपात कीर्तन करण्यास आणि अजान वृक्षाखाली पारायणासाठी महिलांना असलेली बंदी या परंपरा मोडल्या पाहिजेत. त्यासाठी महिलांनीही एकत्रित आलं पाहिजे. त्यांना पाठबळही मिळालं पाहिजे,’ असं ते म्हणाले. स्वत: मोहिते यांनी चार वर्षांपूर्वी यासाठी पुढाकार घेतला होता. त्याबाबत सांगताना ते म्हणतात, ‘या प्रश्नावर मी फडकर्यांशी बोलणीही केली होती. पण फडकर्यांनी विरोध केला. स्त्री ‘रजस्वला’ असल्यामुळं तिला वीणामंडपात कीर्तनाला बंदी घालण्यात आली आहे. तुम्ही महिलांच्या कीर्तन अधिकारासाठी प्रयत्न केल्यास आंदोलन होईल, असा इशाराही मला देण्यात आला. त्यावेळी पुरेसं पाठबळ न मिळाल्यानं आमचा प्रयत्न फसला.’
मुळात तत्कालीन सनातन्यांना विरोध करण्यासाठी म्हणूनच वारकरी चळवळ जन्माला आली. त्यात महिला संत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या म्हणून ही चळवळ फोफावली. आताही कीर्तनाच्या माध्यमातून महिला संतांचेच विचार सांगत असतात. संतांनी देव आणि भक्ताचं नातं आई आणि मुलासारखं असल्याचं सांगत इथं ‘वात्सल्यभक्ती’ रुजवली. वारकर्यांमध्ये या वात्सल्यभक्तीला अर्थात महिलांना किती महत्त्व आहे, यासाठी संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण पुरेसं आहे. सर्व वारकरी ज्ञानदेवांना ‘माऊली’ म्हणजे आई मानतात, म्हणतात. एवढंच नाही तर वारकरी एकमेकांनाही ‘माऊली’ म्हणूनच संबोधतात. त्यात आई आणि मुलाच्या नात्यातला निर्मळपणा आहे. महिलांना कीर्तनाचा वगैरे अधिकार नाकारून काही प्रतिगामी प्रवृत्ती ही माऊलीरूपी इंद्रायणी गढूळ करतायत. खर्या वारकर्यांनी या प्रवृत्तीला आता तडाखा देण्याची वेळ आलीय. संत ज्ञानदेव-तुकोबारायांनाही तेच तर अपेक्षित आहे.
‘बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम…’
सेवा करीन मनोभावे जनीला नाही कोणी