जनीला नाही कोणी

नीलेश बने

संत जनाबाई. विचार केला तर त्या एकल महिला. रोजच्या भाषेत ‘सिंगल वुमन’. जनाबाईंच्या मराठवाड्यात आजही हजारो एकट्या महिला आपलं आयुष्य ढकलताहेत. जनाबाईंच्या अनेक अभंगातून त्यांच्या एकटेपणाचं आणि त्याला चिकटलेल्या सनातन उपेक्षेचं दर्शन घडतं. जनाबाईंच्या निमित्तानं मराठवाड्यातील एकल महिलांच्या प्रश्नाणचा घेतलेला हा वेध.

संत जनाबाईंच्या आईवडिलांना दृष्टांत झाला आणि त्यांनी आपली सात वर्षांची पोर पंढरपुरातील दामाशेटींच्या घरी सोपवली. त्यानंतर काही दिवसांनी ते दोघंही सुखाने मरण पावले… अशी जी गोष्ट पिढ्यानपिढ्या सरधोपटपणे सांगितली जाते, ती काही मनाला पटणारी नाही. ज्ञानेश्‍वर माऊलींनी ज्या विवेकाची दिवाळी करण्यास सांगितलं आहे, त्या विवेकदृष्टीनं पाहिलं, तर या गोष्टीचे अनेक पदर दिसतात. त्याची सत्यासत्यता पडताळणं आज शक्य नाही, पण प्रश्‍न पडणं संपत नाही हेही तेवढंच सत्य आहे.

जनाबाई या परभणीमधील गंगाखेड गावातल्या. गेली कित्येक शतकं हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातोय. आजही मध्ययुगीन वाटावी अशी समाजव्यवस्था या भागात आहे. बाईचं आणि त्यातही खालच्या समजल्या जाणार्‍या जातीतील बाईचं स्थान तर विचारायलाच नको. जनाबाई अशाच जातीतल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आली. आजही मुलगा हवा म्हणून गर्भातच मुली मारण्याच्या घटना घडणार्‍या या भागात तेराव्या शतकात काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

शतकानुशतके मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या दुष्काळाचा इतिहास तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंतही मागं नेता येतो. अशाच दुष्काळी परिस्थितीनं जनाबाईंच्या आईवडिलांना जनीला लहानाची मोठी करणं अशक्य तर झालं नसेल? पंढरपुरात मुलं सोडून देणं ही भयानक प्रथा आजही पाहायला मिळते. कशावरून जनाबाईंना असंच सोडून दिलं नसेल? किंवा दामाशेटींसारख्या सुस्वभावी, सधन, धर्मपरायण शिंप्यांकडे धुण्याभांड्याच्या कामाला लावून दिली, तर काम करता करता पोर मोठी होईल, असा विचार जनीच्या आईवडिलांनी केला नसेल?

अशा प्रश्‍नांमधून अलौकिकाला लौकिकाशी जोडणं अनेकांना पटणार नाही. संत जनाबाईंसारख्या विठ्ठलावर अधिकार सांगणार्‍या विभूतीला सामान्य चष्म्यातून पाहणंही अनेकांना चुकीचं वाटेल. पण प्रश्‍न विचारत राहणं आणि त्यांची उत्तरं मिळेपर्यंत शोध घेत राहणं, हीच महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. जनाबाईंनीही आपल्या अभंगातून थेट विठ्ठलाला प्रश्‍न विचारत ही परंपरा जपली आहे. जनाबाईंचा अधिकार आपल्याकडे नसला तरी, आपल्यापरीनं ही परंपरा पुढे चालू ठेवायला हवी.

जनाबाईंच्या उपलब्ध आणि लोकज्ञात अशा चरित्रामध्ये अनेक जागा अशा आहेत की, जिथं प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं समकालीन किंवा उत्तरकालीन अशा कोणत्याही साहित्यात सापडत नाहीत. जे काही अभंग, लोकगीतं सापडतात त्यातून जी जनाबाई उभी राहते ती फक्त एक संताची कहाणी नाही, तर सोडून दिलेल्या मुलीपासून संतपदापर्यंतच्या आत्मशोधाची कहाणी आहे. आज उपलब्ध असलेली सर्व साधनं या कहाणीतील नाजूक जागांबाबात सूचक मौन बाळगतात. हे मौन जे काही सुचवतं, खुणावतं त्या सर्व शक्यतांचा अभ्यास करणं आज महत्त्वाचं ठरतं ते एवढ्यासाठीच की, जनाबाईंच्या काळात पडलेले हे प्रश्‍न आजही संपलेले नाहीत. मराठवाड्याच्या कपाळावरचा दुष्काळही संपलेला नाही आणि तिथल्या मुलींच्या, तरुणींच्या, म्हातार्‍यांच्या वाट्याला आलेले भोगही संपलेले नाहीत.

एकल महिला हा आज मराठवाड्यातला भीषण प्रश्‍न ठरला आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात सास-बहूच्या सिरियल पाहणार्‍या सर्वांना या प्रश्‍नाची दाहकता अद्याप जाणवलेली नाही. मराठवाड्यातील कोणत्याही मोठ्या गावात गेलात तर शे-सव्वाशे एकल महिला सहज सापडतील. आज त्यांच्याकडे लक्ष द्यायला दुष्काळानं कोलमडलेल्या समाजव्यवस्थेलाही वेळ नाही आणि मायबाप सरकारलाही. त्यामुळेच जनाबाई आणि तिच्यापर्यंत न पोहचलेल्या या जनाईच्या लेकींचे, एकल महिलांचे प्रश्‍न समजून घ्यायला हवेत.

एकल महिला म्हणजे नक्की काय, असा प्रश्‍न कुणाला पडला असेल तर उत्तर दिसतं तेवढं सोपं नाही. एकल म्हणजे एकटी महिला, असा साधासरळ अर्थ लावता येतो. पण हे एकटेपण येतं कुठून? याचा जर आपण शोध घेतला तर, त्यातील गुंतागुंत एवढी किचकट आहे की प्रत्येक महिलेची गोष्ट आपल्याला वेगळ्याच वाटेवर नेऊन ठेवते. आईबापानं गर्भातच संपवण्यापासून पोरीला विकून टाकण्यापर्यंत आणि नवर्‍यानं दुसरी बाई आणण्यापासून पोटच्या पोरांनी टाकून दिलेल्या म्हातारीपर्यंत हे एकटेपण वेगवेगळ्या अवतारात सापडत राहतं.

दुष्काळ म्हणून दूरवरून पाणी आणण्यासाठी घरात बाई हवी म्हणून तेरा-चौदा वर्षांची मुलगी बायको किंवा सून म्हणून आणायची. तिच्या बापाकडून जमेल तेवढा हुंडा घ्यायचा, ज्यामुळं घरात पैसा येईल. पोरीच्या बापाच्याही डोक्यात तेच की, जेवढ्या लवकर पोरीचेचं लग्न होईल तेवढा डोक्याला त्रास कमी. मग सावकाराकडून कर्ज घेऊन किंवा जमीन विकून हुंडा दे. कायद्याला धाब्यावर बसवून इथं सर्रास बालविवाह झालेले आढळतात. या मुलींचं शिक्षण सुटतं, अवेळी मातृत्व आणि कामाच्या ओझ्यानं त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, अनेकजणींचा सासरी होणारा छळ, नवर्‍यानं दुसरं लग्न करण्याला असलेली अप्रत्यक्ष समाजमान्यता, नवर्‍याला दारू किंवा वाईट नाद असेल तर वैधव्य अशा अनेक कारणांमुळं या महिलांच्या नशिबी पुन्हा एकटेपण येतं. मग, त्यांना ना सासरी स्थान मिळतं ना पुन्हा माहेरी.

लग्नच न केलेल्या, स्वतःहून अविवाहित राहिलेल्या मुलींचं प्रमाण कमी असलं तरी, लग्न होऊन १८ वर्षांच्या आतच विधवा, घटस्फोटिता किंवा परित्यक्ता होणार्‍या मुलींचं प्रमाण खूप मोठं आहे. या सर्वांमध्ये विधवेचं स्थान तुलनेनं बरं, कारण तिच्या कपाळावर पुसलेलं का असेना पण कुंकू होतं. ज्यांना कुंकू लावलंच नाही आणि अशीच नांदवली त्यांना सोडून देणंही तेवढंच सोपं. अशा लग्न झालेल्या किंवा न झालेल्या बायकांना सोडून देण्यासाठी घटस्फोटही द्यावा लागत नाही. तोंडी किंवा स्टँप पेपरवरचा घटस्फोटही सहजपणे सापडतो. या सोडून दिलेल्या काही महिलांना तर पोटच्या पोराबाळांसह घराबाहेर पडावं लागतं. कारण नवर्‍याला, सासरच्या लोकांना ती नकोशी आणि परत आलेली म्हणून आईवडील, भाव-भावजयीलाही नकोशीच.

काही जणींच्या वाटेला हे ‘नकोशी’पण गर्भातच येतं किंवा जन्माला आल्यानंतर आईवडिलांना पोरगी पोसणं जड झाल्यामुळं येतं. या पोरीला कुठंतरी सोडून द्यायचं किंवा एखाद्या बर्‍या माणसाच्या गळ्यात बांधून द्यायचं. हे बांधून देणंही वेगवेगळ्या प्रकारचं. कुणाकडे कामासाठी सोडून द्यायचं, कुणाला तरी मजूर म्हणून विकायचं किंवा थेट कुंटणखान्यात. दुष्काळी भागातील किती मुली आज शहरी भागातील वेश्यावस्तीत आहेत याचा शोध घेतला तर या प्रश्‍नाचं वास्तव अंगावर शहारा आणल्याखेरीज राहणार नाही.

एकल महिला हा दुष्काळग्रस्त समाजव्यवस्थेनं जन्माला घातलेला आणि दुष्काळाचा सर्वात मोठा फटका बसणारा घटक. हा दुष्काळ फक्त पाण्याचा नाही, तर विचारांचा आहे, शिक्षणाचाही आहे. मराठवाड्यात फिरताना अशा अनेक एकट्या पडलेल्या महिला पाहिल्या. अशाच एका प्रवासात गंगाखेडच्या तिठ्यावर जनाबाई सापडतात. गंगाखेडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक कमान लागते, त्यावर संत जनाबाई मंदिर, गंगाखेड, जिल्हा परभणी असं लिहिलंय. गाडी तिठ्यावरून पुढे गेली आणि डोक्यात विचार आला, अरे जनाबाईही एकल महिलाच होत्या की. खेळा बागडायच्या वयात आईवडिलांनी दामाशेटींच्या घरी कामाला ठेवलेल्या जनाबाई आयुष्यभर एकट्याच राहिल्या. आपल्या एकटेपणाच्या दुःखाला त्यांनी आधार शोधला नाम्याच्या दासीपदाचा आणि विठोबाच्या ‘गर्लफ्रेंड’चा. इरावती कर्वे ज्या नात्यानं विठ्ठलाला आपला ‘बॉयफ्रेंड’ म्हणतात, त्याच नात्यानं जनाबाई विठ्ठलाची ‘गर्लफ्रेंड’ ठरतात.

‘नामदेवाचे ठेवणे जनीस लाभले| धन सापडले विटेवरी| धन्य माझा जन्म धन्य माझा वंश| धन्य विष्णुदास स्वामी माझा|’, असं म्हणणार्‍या जनाबाई या धन्यत्वाच्या स्थितीपर्यंत पोचतात खर्‍या, पण त्यांचा हा प्रवास एकटेपणाच्या काटेरी वाटेवरूनच जातो. या एकटेपणाचा आधार म्हणून त्या विठ्ठलाला आपला सहचर बनवतात. अत्यंत काबाडकष्ट आणि हालअपेष्टांमध्ये कोणीच आपल्या मदतीला नाही, याची व्यथा त्यांना सतत सलत असते. अखेर त्यांचा विठ्ठलच भावविश्‍वात येऊन त्यांना मदत करतो आणि जनाबाईच्या शब्दांना पाझर फुटतो की…

माझे जनीला नाही कोणी| म्हणूनी देव घाली पाणी॥
जनी सांगे सर्व लोका| न्हाऊ घाली माझा पिता॥

एकीकडे याच एकाकी मार्गावरून संतपदापर्यंत पोचलेल्या जनाबाई आणि दुसरीकडे आजही एकटेपणाच्या दुःखाच्या झळा सोसत अक्षरशः फेकून दिलेलं आयुष्य जगणार्‍या एकल महिला यांच्यात काहीतरी जोडणारं आहे हे सारखं जाणवत होतं. जनाबाई जर याच आयुष्याला सोलत, ज्ञानेश्‍वर-नामदेवांच्या संतपंक्तीला जाऊन बसतात, तर तिच्यासारखंच आयुष्य लाभलेल्या एकल महिलांनाही कदाचित यातून जगण्याची प्रेरणा मिळू शकेल. म्हणूनच शक्यतांच्या पातळीवर जनाबाईंच्या आयुष्याचा आणि एकल महिलांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

ज्ञानेश्‍वर-नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटात जी आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला त्यात चोखोबा, जनाबाई हे उपेक्षितांचे नेते होते. पंढरपूर ही या लोकशाहीची राजधानी आहे. जनाबाई या राजधानीत महिलामुक्तीसह उपेक्षितांचा आवाज बुलंद करत उभ्या राहिल्या. पण, सर्वसाधारणपणे कोणत्याही लोकचळवळीचं जे होतं तेच पुढे याही उपेक्षितांच्या चळवळीचं झालेलं दिसतं. जनाबाई ज्या महिलांसाठी, उपेक्षितांसाठी आपले विचार मांडत होत्या, त्यांनाच त्यांचं म्हणणं कळलं नाही आणि जनाबाईंचा संघर्ष त्यांच्यापुरताच मर्यादित राहिला. आज सातशे वर्षांनंतर तरी ‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास’ म्हणणार्‍या जनाबाई आपण समजून घेतल्या तरी, एकल महिलांच्या प्रश्‍नांची थोडीशी तरी उकल झाल्याखेरीज राहणार नाही.

जीवघेणा एकटेपणा आणि आपण कुणाला नको असल्याचा उपेक्षितपणा हे दोन धागे सतत जनाबाई आणि आजच्या एकल महिलांना जोडत राहतात. पण तरीही आजच्या एकल महिलांचे प्रश्‍न नवे संदर्भ घेऊन आपल्यापुढं येतात. जनाबाई आईवडिलांनी टाकून दिलेली आणि नामदेवाच्या घरी काम करणारी मोलकरीण किंवा आश्रित आहे. तिथं नामदेवांच्या घरी घडत असलेल्या सामाजिक क्रांतीचं वारं जनाबाईंच्याही कानावरून गेलं आणि मोलकरणीची संत कवयित्री झाली. पण, आजच्या एकल महिलांचे प्रश्‍न वेगळे आहेत. क्रांतीचं वारं सोडा, पण साधं शाळेचं दारही त्यांच्यापासून लांब राहतं आणि अनेकदा या महिलांना दोन वेळच्या अन्नासाठीही स्वतःला पणाला लावावं लागतं.

या अशा एकल महिलांच्या प्रश्‍नावर पुणतांबा येथील आशा केंद्र गेले काही वर्ष काम करत आहे. आरोग्य आणि शाश्‍वत शेतीच्या क्षेत्रात काम करताना, आशा केंद्रासमोर ग्रामीण भागातील विशेष करून मागास वस्तीत राहणार्‍या विधवा, परित्यक्ता, निराधार आणि भूमिहीन महिलांचे प्रश्‍न आले. या एकल महिलांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ मिळावे म्हणून ‘आशा एकल महिला व बालविकास मंच’ची स्थापना करण्यात आली. महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा मंच आज अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गावपातळीवरील एकल महिलांच्या प्रश्‍नावर काम करतो आहे.

या एकल महिला मंचाच्या समन्वयक रेणुका कड म्हणाल्या की, एकीकडे आपण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याच्या चर्चा करतो. दुसरीकडे ग्रामीण भागाची, विशेषतः एकल महिलांची परिस्थिती बघितली की, हेच का ते पुरोगामी राज्य? असा निरुत्तरित करणारा प्रश्‍न पडतो. या महिलांशी जेव्हा आम्ही संवाद साधतो तेव्हा या महिलांचं होणारे कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण कळतं. आज एकीकडे जागतिक पातळीवर महिला नवनव्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहेत. पण दुसरीकडे मराठवाड्यासारख्या भागातील एकल महिला या सामाजिकरणाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत. कुटुंब आणि समाज अशा दोन्ही ठिकाणी त्यांचं अस्तित्वच नाकारलं गेलं आहे.

शेतीचा शोध महिलेनं लावला, असं मानववंशशास्त्रानं मान्य केलं आहे. पण, जमिनीचा मालकी हक्क आजही महिलेकडे नाही. जमिनीचा ७/१२ हा पुरुषांच्याच नावे आहे. काही ठिकाणी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली तिथं ७/१२चा उतारा महिला-पुरुष दोघांच्याही नावे आला. प्रत्यक्ष एकल महिलांसोबत संवाद साधताना महिलेला सासर सोडावं लागल्यानंतर सासरच्या संपत्ती, शेतीमध्ये वाटा मिळालेला दिसत नाही. तसंच माहेरच्या संपत्ती आणि शेतीमध्येही वाटा मिळत नाही. उलट वैवाहिक नातं विस्कळीत झाल्यानंतर मुलीला माहेरी राहण्याचा हक्कही नाकारला जातो. त्यामुळे ना सासरी ना माहेरी अशी तिची फरफट होत राहते.

या सगळ्याच्या जोडीला आजही गावांमध्ये जात हा घटक कमालीचा कडवा आहे. ८०च्या दशकात म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्याच्या ३०-३२ वर्षांनंतर पडलेल्या दुष्काळात दलितांनी वापरलेल्या विहिरी उच्चवर्णीय शेतकर्‍यांनी पूजापाठ करून शुद्ध करून घेतल्या होत्या. यामुळं नंतर दलित महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागलं. २००२मध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये दलित महिलांना तर पाण्याच्या प्रश्‍नावरून हिंसेला सामोरं जावं लागलं. २०१२च्या दुष्काळामध्ये काही स्वयंसेवी संस्थांनी पाण्याच्या टाक्या आणि टँकर दिले होते.  त्यातील एक टाकी दलित वस्तीत ठेवली गेली, तेव्हा तेथील सवर्णांनी, आता आम्ही महाराच्या दारात पाणी भरायचं का, असा प्रश्‍न उपस्थित केला. गावात साधारण दलितांची अशी परिस्थिती असताना दलित एकल महिलांची अवस्था तर अधिकच बिकट होते. गाव सोडून दुसरीकडं जावं, तीही त्यांची परिस्थिती नसते. त्यामुळं आहे तिथंच कुढत आयुष्य जगणं त्यांच्या नशिबी उरतं.

पाण्यासाठी वणवण, उत्पन्नाचं साधन नाही, जातीवरून छळ या यातनांसोबत या एकल महिलांना एकटं असण्याच्या शापालाही सामोरं जावं लागतं. एकटी महिला म्हणजे वासनांध पुरुषाच्या विकृत नजरेसाठी सॉफ्ट टार्गेट ठरते. गावागावांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या भयानक कहाण्या ऐकायला मिळतात. त्याविरोधात न्याय मागावा तर व्यवस्थाही त्यांच्या बाजूनं उभी राहत नाही. कधीकधी ही व्यवस्थाच त्यांच्या आत्मसन्मानाचे लचके तोडते. त्यामुळे एका बाजूनं हा ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करताना, दुसरीकडे ‘ही म्हणजे त्यातलीच बाई’ आहे, अशी हेटाळणीही सहन करावी लागते.

रेणुकाताईंनी पुढे जालन्यातील एक किस्सा सांगितला. गवळी पोखरी गावात त्या एकल महिलांशी संवाद साधत होत्या. सुरुवातीला महिलांनी थोडे आढेवेढे घेतले, पण नंतर त्या मनमोकळेपणानं बोलू लागल्या होत्या. तेवढ्यात अंदाजे ६० वर्ष वय असणार्‍या एक आजी तिथं आल्या. काही सरकारी योजना घेऊन आम्ही गावात आलो आहोत, असं त्यांना वाटलं असावं. आम्हाला पाहून त्यांनी विचारलेला प्रश्‍न फार टोचणारा होता. त्यांनी विचारलं की, ‘आमच्या सारख्या रांड मुंड बायांसाठी काही आहे का?’ आपल्या समाजव्यवस्थेनं त्यांचा आत्मसन्मान कोणत्या स्तराला नेऊन ठेवलाय हे त्या प्रश्‍नानं डोळ्यात बोट घालून दाखवून दिलं होतं.

पोटाची आग विझवण्यासाठी काही महिला देहविक्रयाच्या धंद्यात ओढल्या जातात. याचा अर्थ सर्वच एकल महिला ‘त्यातल्या’ नसतात. पण, आपल्या समाजव्यवस्थेनं काही शिक्के तयार केले आहेत. हे शिक्के मारून आधीच एकटेपणानं गांजलेल्या या महिलांच्या जखमेवर मीठ चोळलं जातं. काही ठिकाणी तर डाकीण, पिशाच्च, भुताटकीसारख्या अघोरी गोष्टींचा आळ घेऊन त्यांना गावाबाहेर काढलं जातं. कधीकधी त्यांच्यावर खोटेनाटे आरोपही केले जातात.

खोट्यानाट्या आरोपांचा विषय आला आणि विठ्ठलाच्या गळ्यातला हार चोरल्याचा आळ आलेली जनाबाई डोळ्यापुढं आली. काय झालं असेल त्या वेळी? ज्या जनाबाईला विठोबाच्या देवळातही प्रवेश नव्हता, तिच्यावर त्याच्या गळ्यातला हार चोरल्याचा आरोप आला. तिला सुळावर चढवण्याची शिक्षाही झाली. यावेळी जनाबाईंनी विठोबाचा ‘मूळ मायेचा कारटा’ म्हणत जो उद्धार केला आहे, त्यातून तिची वेदना काय टोकाची होती याची कल्पना येते.

विठोबाच्या गळ्यातील हार चोरल्याचा आरोप फक्त जनाबाई आणि चोखोबांवरच का झाले? संतसाहित्यात अशी अन्य उदाहरणं का सापडत नाहीत? खालच्या जातीचं असणं हेच या आरोपांमागचं कारण आहे का? असे प्रश्‍न आजही अनुत्तरित राहतात. पण या अशा आरोपांना पुरूनही चोखोबा आणि जनाबाई काळाच्या छाताडावर आपल्या प्रतिभेच्या जोरावर ठामपणे उभे राहतात.

विठोबाला प्रश्‍न विचारणं म्हणजे साक्षात समाजाला आव्हान देणं. या संतांच्या शब्दांना ही धार कुठून आली? तत्कालीन कर्मठ व्यवस्थेच्या अरेला कारे करण्याची ही ताकद कुठून आली? याचा शोध जेव्हा आपण घेतो तेव्हा कळतं की, हे सामर्थ्य जनाबाई किंवा चोखोबांकडे येतं ते त्यांनी स्वतःच्या विस्तारलेल्या जाणिवांमधून. जनाबाईंनी नामदेवाच्या घरात परोक्ष अपरोक्षपणे जे काही ज्ञान मिळवलं त्याच आधारावर त्यांनी आपल्यातल्या न्यूनभावावर मात केली.

एका अभंगात जनाबाई म्हणतात, ‘परीसाचेनि संगे लोहो, होय सोने | तयाची भूषणे श्रीमंतांसी|’ खरं ज्ञान अशा शिक्षणातून मिळतं जे बुद्धीला प्रतिभेकडे नेतं. स्वतःच्या प्रतिभेला फुलवणारं हे शिक्षण मिळवण्यासाठी जे पडतील ते कठोर श्रम जनाबाईंनी पंढरपूरच्या भागवत विद्यापीठात घेतले. ज्ञानेश्‍वर, नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांसाठी खुला ज्ञानयज्ञ मांडला, त्यातून जनाबाईंना विठोबाचा अधिकार मिळाला. अधिकार मागून मिळत नसतात, ते मिळवावे लागतात हेच जनाबाईंनी आपल्या संघर्षातून जगाला दाखवून दिलं.

लोखंडाचं सोनं करणारं नेमकं हेच शिक्षण आजच्या एकल महिलांपर्यंत पोचताना दिसत नाही. म्हणायला सरकारी योजनांमध्ये मुलींना शिकवणार्‍या योजना आहेत, पण या शिक्षणासाठी शाळेत पाठविण्याची मानसिकता हवी ना. या महिलांना आम्ही जिथं भेटलो ती जिल्हा परिषदेची शाळा होती. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं शाळा बंद होती. पण आम्ही या महिलांनाच विचारलं की, मुलं शाळेत जातात का? तर त्यापैकी एकीनं सांगितलं की, या शाळेत जवळपास १०० मुलांचा पट आहे. पण जेमतेम ३०-४० मुलंच शाळेत येतात. कारण बाकीची मुलं त्यांच्या आईबापांसोबत ऊसतोडीला नाहीतर वीटभट्टीवर जातात. सरकारनं मुलांना मोफत शिक्षण दिलं तरी मुलं शाळेत यायला तर हवीत ना? त्यामुळं शिक्षण सुटणार्‍या मुलांची इथली संख्या खूप मोठी आहे. त्यातही मुलींची आणखी जास्त आहे.

ग्रामीण भागातील सरकारी शिक्षणाची आज काय अवस्था हे नव्यानं सांगायला नको. काही ठिकाणचे सन्माननीय अपवाद वगळले, तर या शाळांमध्ये शिक्षण पाठ्यपुस्तकापेक्षा हजेरीपुस्तकावरच दिसतं. एखादी मुलगी शिकलीच तर बाप १३-१४व्या वर्षीच लग्नाला उभं करतो. त्यानंतर पोरंबाळं आणि सुरू होते ती तिच्या आयुष्याची अवकाळी फरफट.

शिक्षणाच्या वाटेवरून असेच एकटं झालेलं एक आयुष्य आम्हाला गोदावरीकाठच्या सावखेडगंगा या गावात भेटलं. आम्ही जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा गोदावरी दुष्काळानं कोरडीठाक पडली होती. गोदावरीला सर्वच जण तिथं गंगा म्हणतात. म्हणून इथल्या गावांचीही नावं बाभुळगावगंगा, सावखेडगंगा अशीच. वैजापूर तालुक्यातील या गावांच्या नावात गंगा असली तरी गावामध्ये पाण्याचे वांदे. मराठवाड्याचे वैजापूर-गंगापूर हे तालुके गेली कित्येक वर्ष दुष्काळानं होरपळलेले.

पाण्याच्या या दुष्काळासोबत आयुष्याच्या दुष्काळाशी लढणार्‍या एका १८ वर्षांच्या मुलीनं आमचे शहरी डोळे उघडले. बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्या मुलीचं घरच्यांनी एक-दीड वर्षांपूर्वी लग्न लावून दिलं. खरंतर तिच्या डोळ्यात स्पर्धा परीक्षांचं स्वप्न होतं. पण लवकर लग्न लावून द्यायच्या अडाणी पद्धतीनं तिचं आयुष्य बिकट झालं आहे. लग्नानंतर तिला कळलं की तिचा नवरा पुरुष म्हणून अक्षम आहे. एवढंच नाही तर, त्याच्या घरचेही अडाणी, बुरसटलेले आहेत. त्यामुळं सासरी फक्त मरमर काम आणि मारहाण एवढंच. हिनं विरोध केला तर आणखी छळ, मांत्रिक, अंगारे, धुपारे असे अघोरी उपाय. एक दिवस सासरा म्हणाला, ‘पोरगा असा असला म्हणून काय झालं, मी आहे ना?’ शेवटी घाबरून ही पळून माहेरी आली. आता पुन्हा शिकून उभी राहीन, असं ती म्हणतेय, पण अजून घटस्फोट नाही की काही नाही. ज्या वयात शिकायचं, करिअर घडवायचं त्या वयात तिचं आयुष्य अवघड होऊन बसलंय.

या मुलीसारख्या अनेक महिला या गावात होत्या. त्या महिलांकडे काहीच नाही. कनवटीला पैसे नाहीत, शेतीसाठी जमीन नाही. कुठंतरी स्वतःपुरता आडोसा करून या स्त्रिया आपलं आयुष्य ढकलताहेत. दुष्काळामुळं गावात काम नाही, पाण्यासाठी कोसकोस करावी लागणारी पायपीट, सरकारी योजना यांच्यापर्यंत पोहचत नाहीत, तसंच एकट्या म्हणून गावाच्या वाईट नजरेचा शाप. या सार्‍यावर मात करत आता त्या संघटित होताहेत. सन्मान आणि हाताला काम मिळावं यासाठी धडपडताहेत. आज आशा केंद्राच्या पाठपुराव्यामुळं यातील अनेक जणींना रेशन कार्ड, सरकारी मदत वगैरे लाभ होऊ लागलेत. बालविवाह थांबावेत, हुंडा बंद व्हावा, या महिलांना समाजात स्थान मिळावं, पोटगीचा अधिकार मिळावा यासाठी त्यांच्या लढ्याला सुरुवात झाली आहे.

या महिलांना संघटित करणार्‍या बेबीताई तुपे यासुद्धा एकल महिलाच. १५व्या वर्षी लग्न झाल्यानंतर नवर्‍यानं, सासरच्यांनी बेबीताईंना खूप छळलं. एक दिवस तर त्यांचा नवरा एक दुसरी बाई घेऊन घरी आला. बेबीताईंनी जाब विचारला आणि शेवटी घर सोडलं. माहेरीही त्यांना बळंबळंच घेतलं. नेमकी त्याचवेळी आशा केंद्रात आरोग्य सेविकेची भरती होती. प्रशिक्षणानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यांनी कोर्टात नवर्‍याविरोधात खटला भरला. कोर्टानं नोटीस पाठवली तर नवरा गायब. दुसरीकडं राहायला गेलेल्या नवर्‍याला बेबीताईंनी शोधून काढलं, कोर्टापुढं उभं केलं. नवरा कोर्टापुढे म्हणाला, ही माझी बायकोच नाही. आहेरात आलेली भांडीकुंडी दाखवून कोर्टानं ताईंचा बायको म्हणून अधिकार मान्य केला. त्यांनी नवर्‍याला आणखी एक संधी देऊन, पुन्हा जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. पण तरीही त्याचं वाकडं शेपूट जेव्हा सरळ झालं नाही, तेव्हा ताईंनी पोटगीसह फारकतीचा दावा घातला. आपला न्याय्य हक्क मागणार्‍या ताईंना लोकांनी वेड्यात काढलं. पण, त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि तीन एकर जमीन पोटगी म्हणून मिळवली. लोक काय म्हणतील याचा विचार न करता, कायद्याची लढाई जिंकणार्‍या बेबीताई आज आपल्यासारख्या हजारो जणींना मदत करताहेत.

असाच एक संघर्ष तीसएक वर्षांपूर्वी औरंगाबादेतील एक मुस्लीम कुटुंबात झाला. मुलगा हवा म्हणून त्या आईवर सात बाळंतपणं लादली गेली. शेवटची मुलगी झाली आणि दुसर्‍या दिवशी आई वारली. झालं, आईचा जीव घेणारी म्हणून शेवटची मुलगी वडिलांनी स्वीकारलीच नाही. त्यामुळं आधीच्या बहिणींनी आपल्या धाकट्या बहिणीला कसंबसं सांभाळलं. घरून मुलींच्या शिक्षणाला काडीचंही प्रोत्साहन नाही. उलट विरोधच अधिक. तरीही मोठ्या बहिणीनं संघर्ष करत, लपत छपत स्वतः शिक्षण घेतलं आणि बाकीच्यांनाही शिकवत ठेवलं. नातेवाइकांनी कधीच संबंध तोडले होते. अखेर मोठी बहीण एके ठिकाणी नोकरीला लागली. तिनं सर्व बहिणींची जबाबदारी स्वीकारली. पाठच्या बहिणींना खूप शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. मरणानंतर अंत्यविधीला येऊ नका, असं सांगणार्‍या वडिलांचं अंत्यदर्शनही त्यांनी घेतलं नाही. मुली मोठ्या झाल्या, पण त्यांच्या आईला सर्व मुलीच असल्यानं त्यांच्याशी कोणी लग्नच करायला तयार नाही. अखेर सर्व जणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज या सर्व मुली डॉक्टर, प्राध्यापक अशा मोठमोठ्या पदांवर आहेत. लौकिकदृष्ट्या यशस्वी आहेत, पण अशा एकल महिलांना समजून घेण्यास समाज म्हणून आपण सर्व अपयशी ठरलो आहोत.

बाईच्या या एकटेपणाबद्दल नक्की काय अडचण आहे आपल्या समाजाला?

प्राचीन काळापासून या प्रश्‍नाचं उत्तर आजवर उलगडलं नाही. आधुनिक विदुषी आणि स्वतः एकल म्हणून आयुष्य जगलेल्या दुर्गाबाई भागवत या प्रश्‍नाचा शोध घेताना सांगतात की, वेदकाळात स्त्रियांबद्दलचे संदर्भ अदितीपासून सुरू होतात. अदिती ही देवांची माता समजली जाते. तिला अनेक पुरुषांशी संबंध ठेवायचा अधिकार होता. नंतरच्या काळात विवाहसंस्था अस्तित्वात आली. त्यानुसार पुरुषाला अधिक बायका करण्याची मुभा मिळाली. बाईचा तो अधिकार मात्र हिरावला गेला. त्या काळात संततीचं फार कौतुक होतं. कारण अपुर्‍या साधनांनिशी, नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मनुष्यप्राण्याला आपला वंश सतत वाढवायचा होता. त्या वेळी मुलगा आणि मुलगी असा फरक केला जात नव्हता. मुलगी झाली तरी दुःख न करता ती पुढील पिढ्यांची माता म्हणून मुलीच्या जन्माचं ओझं बाळगलं जात नसे. पुढे मात्र जसजसा मनुष्यप्राण्याचा वंश वाढीस लागला, स्थिरावला, तसा फरक पडत गेला. मध्ययुगात तर मुलगी झाली, की मारून टाकण्याची पद्धतच पडली होती. प्राचीन काळी तसं नव्हतं. ऋषी हा वेद रचणारा. एखाद्या ऋषीची मुलगीदेखील वेदातील ऋचा रचू शकत असे. अविवाहित राहण्याचा अधिकारही तिला होता. पण अशा अविवाहित ऋषिकन्येला बापाच्या माघारी कोणी आसरा देत नसे. तिला जवळजवळ वाळीतच टाकलं जाई. वेदकाळात मुलींना आपला नवरा शोधण्याचं स्वातंत्र्य होतं. सावित्रीसारखं बापाच्या इच्छेविरुद्धही एखादी मुलगी आपल्या पसंतीच्या वराशी लग्न करू शकत होती. तसं शंकर-पार्वतीचं उदाहरण तर आहेच. पण लग्न न करता एकटीनंच जगेन, असं म्हणण्याचं स्वातंत्र्य तिला नव्हतं. बाईला आधार द्यायला पुरुष हा हवाच. कुमारिकेला लग्नाच्या बंधनात न पडता स्वतंत्रपणे जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच. (संदर्भ- ‘ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी’, प्रतिभा रानडे, पृष्ठ-१६५) इतिहासातील असे अनेक दाखले देत दुर्गाबाई हे सिद्ध करतात की विवाहसंस्थेच्या स्थापनेनंतर समाजानं कायमच महिलेला एकटं राहण्याचा अधिकार नाकारला आहे. पण, नावातच ‘दुर्गा’ असलेल्या दुर्गाबाईंनी ज्ञानाच्या साहाय्यानं एकटेपणाचं हे शिवधनुष्य पेलून दाखवलं. निसर्गलेखनापासून लोकसाहित्यापर्यंत, महाभारतापासून बौद्धविचारापर्यंत आणि शिवणकामापासून स्वयंपाकापर्यंतच्या ज्ञानक्षेत्रात लीलया वावरणार्‍या दुर्गाबाईंनी समर्थपणे एकट्यानं जगता येतं, हे सप्रमाण सिद्ध केलं. आज जग बदलत आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात स्त्री-पुरुषाचं नातंही बदलत आहे. त्यामुळे एकल महिलांच्या या प्रश्‍नाकडे नव्यानं बघण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरी आणि ग्रामीण परिस्थितीत फरक असला तरी एकल महिलेची अवस्था फारशी वेगळी नाही. शहरातील एकल महिला थोड्याशा अधिक स्थिरस्थावर असल्या तरी त्यांच्या वाट्याला येणारं एकाकीपण आणि उपेक्षा संपलेली नाही. सरकार-दरबारी तर विधवा सोडल्यास अन्य एकल महिलांना एकल म्हणून मान्यताही नाही. त्यामुळं या सर्व प्रकारच्या एकल महिलांचा अभ्यास होऊन त्यांच्यासाठी धोरण आखलं जाण्याची तातडीची गरज आहे. या महिलांना शिक्षण, रोजगार, कायदेशीर मदत, वारसा हक्क यांच्यासह मूलभूत हक्क कसे मिळतील याचा विचार व्हायला हवा. सरकारी योजना नुसत्या असून उपयोग नाहीत, तर त्या त्यांच्यापर्यंत पोचायला हव्यात.

पण हे सारं मिळवायचं असेल तर जनाबाईंची चिकाटी हवी. आईवडिलांनीच दिलेलं पोरकेपण, उपेक्षित असं एका मोलकरणीचं आयुष्य वाटेला आलेल्या जनाबाईंना काय भोगावं लागलं नाही? काबाडकष्ट तर होतेच, पण त्यासोबत चोरीचा आळ आला, विठ्ठलावरील श्रद्धेची लोकांनी हेटाळणी केली, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले. अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस कोलमडेल. परंतु अत्यंत कठीण अथवा सचोटीच्या क्षणीही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. हा संघर्ष आपल्या एकटीचा नाही, तर सर्वांचा आहे याची जाणीव जनाबाईंना होती. एका अभंगात त्या म्हणतात…

दळू कांडू खेळूं| सर्व पाप ताप जाळूं|
सर्व जीवांमध्ये पाहूं| एक आम्ही होऊनी राहूं|
जनी म्हणे ब्रह्म होऊं| ऐसें सर्वा घटी पाहूं|

जनाबाई कधी प्रेमानं, कधी रागानं, तर कधी टोकाला जाऊन विठोबाशी म्हणजे तत्कालीन व्यवस्थेशी आपला संघर्ष मांडत उभ्या राहतात. ‘नामयाची दासी’ म्हणून सुरू झालेला हा प्रवास शेवटी ‘जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ’ म्हणणार्‍या आत्मबोधापर्यंत पोचतो. जनाईच्या लेकी असणार्‍या या सर्व एकल महिलांनाही हा संघर्ष करावा लागणार आहे. तो अवघड आहे, पण अशक्य नक्की नाही.

जनाईचं दळण

मूळ गंगाखेडचे, सध्या परभणीत बहुविध प्रशाला येथे शिक्षक असणारे शिवाजी मिरगीळ यांनी विविध प्रकारचं साहित्य लिहिलं आहे. मराठीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत. ‘जनाईची वाकळ’ नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यात जनाबाईंवरचं एक दीर्घकाव्य साकार होतं आहे. ‘जनाईचं दळण’ नावाच्या कवितेतील दोन कडवी वानगीदाखल…

जनी दळिते दळण
गोड जनाईचा गळा
वाळवंटी फुलवला
भावभक्तीचा गा मळा|
जनी दळिते दळण
देव करितो चाकरी
नाम देवाचा निवध
खाई कोरडी भाकर|

अभंगदूत

जाय जाय राऊळाशी । नको येऊं आम्हांपासी ।।
जाऊं आम्ही बरोबर । जाला तिचा हो नोकर ।।
तिज संगे काम करी । ऐसें जाणा देव हरी ।।
चहूं हाती धुणे केले । जनी म्हणे बरा जाले ।।

श्रीपांडुरंगाचं जनाबाईंशी असलेलं नातं सांगणारा हा अभंग. त्या देवळात जा, तरीही तो त्यांच्याच बरोबर येतो. नोकरासारखा त्यांच्यासोबत काम करतो. चारही हातांनी देव त्याचे धुणेही धुवून देतो. काम लवकर झाल्यामुळे जनाबाई बोलतात बरंच झालं .

0 Shares
पताकेखाली अंधार दळिता कांडिता