पंधरावी ती जनी

डॉ. अशोक कामत

अनाथ जनाबाईंना पंढरपुरातील संत नामदेवांच्या कुटुंबानं सांभाळलं. स्वत:ला ‘दासी’ म्हणवणार्याु जनाबाई नामदेव कुटुंबाच्या अविभाज्य भाग बनल्या. नामदेवांच्या कार्याशी त्या जेवढ्या एकरूप झाल्या, तेवढ्याच त्यांच्या कुटुंबाशी एकजीव होऊन गेल्या. मर्हाेटी मुलुखानं हे आगळे वेगळे कौटुंबिक भावबंध जपून ठेवले आहेत.

मराठीच्या आदिकाळात ज्या श्रेष्ठ संतस्त्रिया झाल्या, त्यात नामदेवांची दासी अर्थात् शिष्या जनाबाई यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. तेजस्वी ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाई त्यांनी अनुभवली आहे. कदाचित् गोरक्ष-गहिनीनाथांचंही दर्शन त्यांना घडलं आहे. प्रत्यक्ष ‘परमेश्वराला भुलविणारा, भला माणूस’, चोखामेळा त्यांनी जवळचा मानला आहे.

‘ज्ञानाचा सागर’ ज्ञानेश्वर त्यांना आपला सखा वाटला. त्यानं आपल्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असाही विचार त्यांच्या मनात आला आहे. ‘ज्ञानेश्वरू’ हे सर्वांसाठी ‘परलोकींचे तारू’ ठरलं असा त्यांना विश्वास आहे. ‘सखा विरळा ज्ञानेश्वर’ हा नामदेवरायांचा ‘जिवींचा जिव्हार’ म्हणून त्यांनी अनुभवला आहे.

जनाबाईंचा जन्ममृत्यू, आईवडील, मूळ गाव, पूर्व जीवन निश्चितपणानं सांगता आलं नाही तरी त्या पंढरपुरात संत नामदेवरायांच्या परिवारात, सामावून गेल्या होत्या आणि त्यांनी उत्कट विठ्ठलभक्तीची भावकविता लिहिली, हे निर्विवाद आहे.

‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावें उदास| साधुसंता ऐसें केलें मजी॥’

अशी जनाबाईंची दृढ श्रद्धा आहे. ‘विठोबाने दिली प्रेमकळा’, असं त्या सांगतात. ‘नामयाचे जनी आनंद पै जाला’ या बरोबरच ‘धन्य माझा जन्म धन्य माझा वंश’ कारण ‘धन्य विष्णुदास स्वामी माझा’ अशीही कृतज्ञ नोंद त्या करतात. त्यांचा हा एक प्रसिद्ध अभंग असा आहे…

नामदेवा घरीं| चौदा जणें स्मरती हरी|
चौघे पुत्र चौघी सुना| नित्य स्मरती नारायणा॥
आणिक मायबाप पाही| नामदेव राजाबाई|
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी| पंधरावी ती दासी जनी॥

नामदेवरायांच्या पंढरपुरातील संयुक्त परिवाराचा तपशील आहे. या चौदा माणसांच्या कुटुंबात सामावून गेलेल्या त्या जनाबाई! आपला उल्लेख त्या विनम्रपणे करतात. नामदेवांच्या घरची कौटुंबिक क्षणचित्रंही जनाबाई फार छान शब्दात टिपत राहतात. एका अभंगात आलेलं हे पारिवारिक नात्यांचं समूहचित्र फार बोलकं आहे. इथंही शेवटी जो जनाबाईंचा उल्लेख मिळतो तो त्यांची भक्तिसुखात रमलेली आनंदस्थिती सांगणारा आहे…

गोणाई राजाई दोघी सासूसुना|
दामा नामा जाणा बाप लेक॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र|
जन्मले पवित्र त्याचे वंशीं॥
लाडाई गोडाई येसाई साखराई|
चवघी सुना पाही नामयाच्या|
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी|
वेडीपिशी दासी त्याची जनी॥

श्रीक्षेत्र पंढरपुरात, श्रीविठ्ठलमंदिरालगत, एक निष्ठावान वारकरी कुटुंबात जनाबाई वावरल्या. हे आपले अहोभाग्य कसं नि कोणत्या शब्दात वर्णन करू असं त्यांना होऊन जातं. संत नामदेवांचा जीवनकाळ १२७० ते १३५० असा सर्वमान्य आहे. जनाबाई या त्यांच्यापेक्षा वयाने थोड्या वडील असाव्यात, असं त्यांच्या अभंगांतील काही उल्लेखांवरून म्हणता येतं. पंढरीरायांच्या नगरीत स्थायिक होऊन विठ्ठलमय जीवन जगणारा दामा नामा परिवार. त्यानं जनाबाईंना आपल्या कुटुंबात सामावून घेतलं, याविषयी दुमत नाही.

श्री विठुरायाचे बालभक्त असणार्‍या नामदेवरायांचा नित्य सत्संग लाभला आणि आपलं स्त्रीत्व, कुळगोत्र सारं बाजूला झालं. ‘दासी जनी नाहीं आतां’, ‘देहभाव पूर्ण जाय तेव्हा हे धैर्यसुख होय’ असा अद्वैतानुभव सतत त्यांना अनुभवता आला.

‘सोहं आत्मा प्रकट जो दाखवी वाटे| वरिष्ठ तोचि जाणा॥’ अशा शब्दात जनाबाईंनी नामदेवरायांचं ऋण व्यक्त केलेलं आहे.

राजाई-गोणाई या नामदेवांच्या घरच्या सासू-सून मायलेकीसारख्या. त्यादेखिल ‘अखंड विठ्ठलाच्या पायी’ पुढं राहिल्या. ‘केव्हा क्षेम दासी| आपुली म्हणोनि जनी दासी॥’ अशी जनाबाईंची मनःस्थिती. ही दासी मोलकरीण नव्हे ईश्वराला ‘दास’भावानं शरण आलेल्या नामदेवाची दासी-शिष्या आहे. पिंडही नामदेवांसारखाच आर्त भक्ताचा आहे.

सृष्टीचं स्वरूपवर्णन करणारा एक अभंग जनाबाईंनी रचला आहे. त्यात सांख्यतत्त्वं, पंचमहाभूतं, त्रिगुणे, चार वाचा, जीवनाच्या चार अवस्था, पंचज्ञानेंद्रियं आणि पंचकर्मेंद्रिये, पंचविषय असे विविध उल्लेख आले आहेत. अभंगाच्या आरंभीचा चरण असा बरंच काही सांगून जाणारा आहे… ‘बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरूरायांपाशी!’ नामदेव महाराजांनी जनाबाईंचं लौकिक-पारमार्थिक शिक्षण केलं अशी ही उत्कट उक्ती आहे.

‘नामयाची जनी’ ही जनाबाईंची केवळ अभंगमुद्रा नाही. ती त्यांची खरी ओळखच आहे. नामदेव चरित्रातील काही महत्त्वाच्या घटना त्या सहज नोंदवितात.

‘गोणाईने नवस केला| देवा पुत्र देई मला|
ऐसा पुत्र देई भला| ज्याला आवडे पंढरीनाथ॥’

गोणाईचा हा शुद्ध भाव ध्यानी घेऊन ‘पोटीं आले नामदेव!’ दामाशेटी अर्थातच ‘हरूषले’ म्हणून ‘दासी जनीने त्यांना ओवाळिले!’ एकदा ‘दिवाळीचा सण आला| नामा राऊळासी गेला॥’ आणि ‘हातीं धरूनी देवासी’ घरी घेऊन आला. मग देवाचं सर्वांनी उत्तम अतिथ्य केलं. ‘दासी जनीने विडे दिले!’ या नाट्यमय प्रसंगाचं हे काव्यात्म शब्दचित्र पाहावं…

सण दिवाळीचा आला| नामा राऊळासी गेला॥
हाती धरूनी देवासी| चला आमुच्या घरासी॥
गोणाईने उटणें केले| दामाशेटीने न्हाणिले॥
पदर काढिला माथ्याचा| बाळ पुशिला नंदाचा॥
हातीं घेऊनी पंचारती| चक्रपाणि ओवाळिती॥
देव जेवुनि तृप्त जाले| दासी जनीने विडे दिले॥

कधी सोसाट्याचा वारा सुटला. पावसाच्या धारा कोसळल्या. घराचं छप्पर मोडलं. ‘द्वारीं उभा पंढरीराव!’ त्यानं सारं छप्पर पुन्हा शाकारून दिलं. देवाजीची दया होते. सारं काही पुन्हा नीट होऊन जातं. जनाबाई हे सतत अनुभवतात. बालभक्त नामदेव आणि श्रीविठ्ठलाचं ‘अद्वैत’ही त्या असं प्रत्यक्ष पाहतात आणि त्यांची साक्ष अशा लोभसवाण्या क्षणचित्रात टिपतात…

सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी|
नामा वाळुवंटी कथा करी॥
ब्रह्मादिक देव येवोनि पाहाती|
आनंदें गर्जति जयजयकार॥
जनी म्हणे त्याचें काय वर्णू सुख|
पाहाती जे मुख विठोबाचे॥

ही नामदेवरायांची कीर्तनसमाधी जनाबाई नित्य अनुभवीत असत. पंढरीच्या वाळवंटात सर्वांसाठी कीर्तन करणारे नामदेव किती साधे होते, त्यांच्या कीर्तनाचे वेळी श्री विठ्ठलही येऊन तल्लीन होऊन उभा राहायचा, रंगायचा आणि स्वतः जनाबाई देखिल!

नामदेवांविषयी असं जनाबाईंनी बरंच लिहून ठेवलं. त्यामानानं संत नामदेवरायांनी जनाबाईविषयी फारसं लिहिलेलं नाही. असं का झालं असेल? जनाबाईंचं पूर्वजीवन अल्पज्ञात आणि काहीसं करूणापूर्ण म्हणून? ती त्यांच्या परिवारातीलच एक होती म्हणून? उत्तर नीटसं देता येत नाही हेच खरं! पण पुढे पेशवाईतील संतचरित्रकार महीपतिबोवांनी ही उणीव भरून काढलेली दिसते. जनाबाईंच्याच अभंगांचा आधार घेऊन त्यांनी जनाबाई आणि नामदेव कुटुंबियांच्या भावजीवनाचं चित्र स्पष्ट करीत त्यांचं सुसूत्र चरित्रच सादर केलेलं आहे.

जनाबाईंची सुमारे ३५० अभंगांची संपदा आज मिळते. त्यात विठ्ठलाबरोबर त्यांचे झालेले प्रेमळ सुखसंवाद आहेत. लटकी भांडणं आहेत. नामदेवज्ञानदेवांविषयीं वाटणारा प्रेमभाव आहे. विशुद्ध वात्सल्य आणि आत्मसमर्पणाची भावना आहे.

जनाबाईंचं काव्य नितळ आहे. पारदर्शी आहे. इथं कुठलाही आडपडदा नाही. ऐहिक जीवनात जे काही वाट्याला आले ते भोग, काबाडकष्ट आनंदानं सोसले तर आहेतच परंतु त्या सर्व जीवन व्यवहारात त्यांनी श्रीविठ्ठलाचं-भगवंताचं रूप पाहिलं आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ ही श्रीज्ञानदेवांची शिकवण जनाबाईंच्या कर्मयोगात आपण पाहू-अनुभवू शकतो.

जनाबाईंच्या जीवनात, काव्यात नामदेव, ज्ञानदेव आहेत. पण त्यांच्या अभंगरचनेत अनुकरण नाही. ‘जनीचे हे बोल स्वानंदाचे डोल’ हे त्यांचेच शब्द अक्षरशः खरे आहेत.

0 Shares
बह गये कोट कबीर झाले सोयरे त्रिभुवन