झाले सोयरे त्रिभुवन

ह. भ. प. निवृत्तीबुवा गायकवाड

सावळ्या समचरण विठोबाचा समतेचा संदेश घेऊन देशभर भ्रमंती केलेल्या दीर्घायुषी नामदेवांनी आपला आध्यात्मिक वारसा ना कोणा शिष्याला दिला ना मुलाबाळांना. तो मिळाला दासी जनीला! जनाबाईंचा हा मान वारकर्यां नी अबाधित राखलाय. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या कीर्तन भजनापर्यंत जनाबाईंचे अभंग, गवळणी, ओव्या वारकरी रोज तल्लीन होऊन म्हणतात.

कमरेवर हात ठेवून युगानुयुगे उभारलेल्या विठ्ठलाला चालता बोलता केला तो त्याच्या लाडक्या भक्तानं, संत नामदेवांनी. नामदेवरायांनी या सावळ्या मूर्तीला घराघरांत पोचवून खर्‍या अर्थानं लोकदेव बनवला. विठोबाच्या माध्यमातून देशभर समतेची चळवळ उभारणार्‍या या कर्तृत्ववान महापुरुषाच्या मागं आयुष्यभर खंबीरपणे उभी राहिली, ती दासी जनी. संत नामदेवांची पाठराखण करणार्‍या या खमक्या बाईचं, कष्टाचं जिणं जगत संतपदाला पोचलेल्या या माऊलीचं स्मरण वारकरी रोज करतात.

पहाटेची काकड आरती म्हणजे सुखशय्येवर झोपलेल्या श्री पांडुरंगाला भक्तांनी जागं करण्याचा उपक्रम. टाळमृदंगाच्या गजरात सुस्वर गायनातून देवाच्या सुंदर रूपाचं वर्णन केलं जातं. या रूपाच्या अभंगांचा अर्थात मंगलाचरणाचा शेवट होतो, जनाबाईंच्या ‘येगं येगं विठाबाई…’ या अभंगानं. हा अभंग असा गातात की तो ऐकून देवानं असेल तिथून येऊन तातडीनं हजर व्हावं. जनाबाईंनी त्यात मायलेकरांच्या भेटीच्या ओढीची व्याकुळता भरली आहे. पांडुरंगाला त्या ‘विठाबाई’ आणि ‘माझे पंढरीचे आई’, असं संबोधतात. खरं तर काकड आरतीचे अभंग म्हणजे देवाला जागं करण्याचं केवळ निमित्त. खरा उद्देश समाजाला जागं करण्याचा. कर्तव्यापासून दूर पळणार्‍यांना भानावर आणण्याचा. समतेच्या वारकरी विचारांची पेरणीच काकड आरतीच्या अभंगांतून होत असते.

या काकड आरतीच्या तिसर्‍या मंगलाचरणात तुकोबारायांचा पहिला अभंग आहे, ‘उंच नीच काही नेणे भगवंत…’ या अभंगात समाजातील सर्व स्तरांतील जाती-धर्मातील संतांना देव कशी कामं करू लागला ते सांगितलं आहे. त्यात चोखा महार, रोहिदास चांभार, सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार दासीपुत्र विदुर, सजन कसाई, कबीर यांच्यासोबत ‘नामयाचें जनीसवे वेची शेणी’, असा उल्लेख आहे. तर पुढच्या ‘पवित्र ते कूळ पावन तो देश…’ या अभंगात तुकाराम महाराजांनी ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा’, असं सांगत असताना ‘नामयाची जनी कोण तिचा भाव| जेवी पंढरीराव तियेसवें|’, असं नमूद केलं आहे. जनाबाईंचे दाखले देणारे हे अभंग वारकरी काकड आरतीच्या निमित्तानं रोज म्हणतात. काकड आरतीत संत नामदेवांचे अनेक अभंग आहेत. वारकरी पंथाच्या या थोर प्रणेत्याच्या पाठीशी, कार्याशी जनाबाई कशी उभी होती याचा उल्लेख जनाबाईंच्याच ‘उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला…’ या अभंगात येतो. अभंगाच्या शेवटी ‘चौ युगांचा भक्त नामा उभा कीर्तनी| पाठीमागे डोळे झाकुंनी उभी ती जनी|’, असं जनाबाई स्वत: सांगतात. कीर्तन ही वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाची उपासना. या सामूहिक कार्यक्रमात जनाबाईंचं स्थान काय होतं, हे अधोरेखित करणारा हा अभंग आहे. वारकरी तो रोज नित्यनेमानं म्हणतात यातच जनाबाईंचा गौरव सामावलेला आहे. श्री ज्ञानेश्‍वरमाऊलींच्या पालखी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६मध्ये पंढरीच्या वाटेवर चालताना पहिल्या अभंगमालिकेच्या शेवटी आम्ही जनाबाईंचे अभंग म्हणतो. त्यात ‘विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी| मग सुखा काय उणे| झाली सोयरे त्रिभुवणे| देव करा धनी म्हणे नामयाची जनी|’ हा अभंग आवर्जून म्हणतो. सर्व त्रिभुवनच ‘सोयरे’ करण्याची साडेसातशे वर्षांपूर्वीच्या जनाबाईंची विश्‍वबंधुतेची भावना चकित करणारी आहे.

सर्व संतांचे अभंग गात, नाचत वारकरी पंढरीची वाटचाल करत असतात. मुक्कामाच्या तळावर पोचल्यावर सर्वजण एकत्र येतात आणि जनाबाईंचा ‘संतभार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत…’ हा अभंग म्हणतात. त्यानंतरच आरती होते. रात्रीच्या कीर्तन, जागरातही आवर्जून जनाबाईंचे अभंग, गवळणी म्हटल्या जातात.

वारकरी नियमाप्रमाणं जनाबाईंचे अभंग म्हटले जातातच, परंतु त्यापलीकडं जाऊन भोळ्या भाबड्या बायका जनाबाईंच्या ओव्या मोठ्या आवडीनं म्हणत असतात. वाटेनं चालताना, स्वयंपाक करताना, विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी ‘सुंदर माझे जाते गं फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला…’, ‘येई वो कान्हाई मी दळीन एकली…’, अशा ओव्यांचं गायन सुरू असतं. जनाबाईंनी लिहिलेल्या ओव्यांसोबतच आपणच रचलेल्या आणि मौखिक परंपरेनं चालत आलेल्या ओव्याही महिला गातात. ‘देव बसले जेवाया पोळी ठेविती ताटाआड, रुक्मिणीला बोलती माझ्या जनीला पहिलं वाढ…’ तसंच ‘मेथीची भाजी माझ्या विठ्ठलाला आवडती, सावता माळ्याच्या मळ्यात जनी भाजी खुडती…’ अशा प्रकारच्या ओव्या वाटेवर ऐकायला मिळतात. यादरम्यान मधेच एखादी महिला गोड गळ्यानं जनाबाईंचा एखादा अभंग म्हणते. सर्वजण तिच्याभोवती गोळा होऊन कौतुकानं ऐकत असतात. ‘नाही केली तुझी सेवा, दु:ख वाटे माझ्या जीवा…’ हा जनाबाईंचा अभंग वाटेवरच्या वारकरी मेळ्यात माझी निरक्षर पत्नी सुभद्रा म्हणते तेव्हा जीव गलबलून येतो.

‘गोपाळकाला’ म्हणजे वारकरी परंपरा, विचारांचा कळस आहे. कोणताही भेदभाव न करता गोकुळात श्रीकृष्ण यमुनेकाठी वाकड्या, पेंद्या आदी गोरगरीब, दुबळ्या, अधिकारहीन समाजातील सवंगड्यांना, गोपाळांना सोबत घेऊन एकत्र जेवण करत असे. सामाजिक समतेचा हा उच्च आविष्कार होता. तीच परंपरा वारकर्‍यांनी जपली आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवट गोपाळकाल्यानं होतो. गोकुळाष्टमीच्या वेळी तर मोठा उत्सव साजरा होतो. पंढरपूरच्या वारीचा शेवटही गोपाळकाल्यानंच होतो. हा कार्यक्रम होतो, संत जनाबाईंच्या गोपाळपुर्‍यात. संत नामदेवांनीच या ठिकाणी गोपाळकाला सुरू केल्याची वारकर्‍यांची श्रद्धा आहे. इथं सर्व दिंड्या येऊन गोपाळकाल्याचे अभंग म्हणतात. ‘काला वाटू एकमेंका…’ म्हणत दह्या लाह्यांचा काला एकमेकांना भरवतात. प्रत्येक वारकरी काल्यासाठी लाह्या आणतो. यानंतर जनाबाईंचं जातं फिरवून ‘सुंदर माझे जाते गं फिरते गरगरा…’ ही जनाबाईंची ओवी म्हणतात. मग जनाबाईंच्या दर्शनानंतर ‘काल्याची लाही’ घेऊन वारकरी माघारी फिरतात. सोबत गोपाळकाल्याच्या मडक्याचं खापरही उपरण्यात गुंडाळून आणतात. घरी आल्यावर ते धान्याच्या कोठीत, पीठाच्या डब्यात ठेवतात. त्यामुळं अन्नधान्याची ‘बरकत’ राहाते, अशी श्रद्धा आहे.

वारकर्‍यांनी समन्वयाची वाट चोखाळत शैव-वैष्णव वाद मिटवून टाकला. त्या ऐक्याची कहाणी अनेक लोकगीतांमधून ऐकायला मिळते. त्यात जनाबाईंचा संदर्भ हटकून ऐकायला येतो. खंडोबाच्या जागरणात वाघ्या-मुरळी ‘आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात’, ‘कारे भागलासी देवा, कारे शिणलासी…’ अशी गाणी म्हणतात. धनगरी गाण्यांमध्येही जनाबाईंचा मोठ्या आपुलकीनं उल्लेख येतो.

वारीच्या वाटेवर सर्वच दिंड्यांमध्ये, तसंच फडांवर जनाबाईंचे अभंग, गौळणी म्हटल्या जातात. अपवाद फक्त वासकरांच्या फडाचा. अर्थात या फडावरही गोकुळाष्टमीला ‘गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला…’ हा जनाबाईंचा अभंग म्हणत फुलं टाकतात.

संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या फडावर जनाबाईंच्या अभंगांवर कीर्तन केलं जातं. जनाबाईचं चरित्र सांगितलं जातं. आषाढ वद्य दशमीला या फडावर जनाबाईंचे चरित्र सांगण्याची प्रथाच आहे. आणखी एक विशेष म्हणजे नित्यनेमाचा हरिपाठ, कीर्तन, भजन, ज्ञानदेवांचं भजन झाल्यानंतर ‘ज्ञानेश्‍वर माऊली, ज्ञानराज माऊली’ हे भजन होतं. त्यानंतर ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर ‘नामदेव-जनाबाई’ असं भजन म्हटलं जातं! याशिवाय गंगूकाका शिरवळकरांच्या फडावर जनाबाईंचा ‘संतभार पंढरीत’ हा अभंग म्हटल्यानंतर ‘नामदेव-जनाबाई’ भजन म्हटलं जातं. संत नामदेव मंदिरात आणि गंगूकाकांच्या फडात हे भजन दररोज नित्यनियमानं बाराही महिने होतं. तसंच ठाकूरबुवांच्या फडावरही जनाबाईंच्या अभंगावर कीर्तन करण्याची पद्धत आहे. नामदेवरायांचे वंशज पूजाअर्चा करत असलेल्या केशवराज मंदिरातील नामदेवांच्या मूर्तीशेजारी जनाबाईंचीही काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिथं जनाबाईंची रोजच पूजाअर्चा होते.

जनाबाईंचा एक अभंग आहे. त्यात त्यांनी देवाकडं एक मागणं मागितलंय.

देवा देई गर्भवास| तरीच पुरेल माझी आस|
परि हे देखा रे पंढरी| सेवा नामयाचे द्वारी|
करीं पक्षि का सुकर| श्वान, श्वापद, मार्जार|
ऐसा हेत माझे मनी| म्हणे नामयाची जनी|

याचा अर्थ जनाबाईंना कुठल्याही प्रकारची धनसंपदा नको किंवा जन्मांच्या फेर्‍यांतून मुक्तीही नको. उलट पक्षी, प्राणी असा कोणाचाही जन्म पुन्हा पुन्हा दे. म्हणजे पंढरीला जाता येईल. नामदेव पायरीचं दर्शन घेता येईल. आम्हा वारकर्‍यांचंही मागणं यापेक्षा वेगळं नाही. पंढरीचा वारकरी| वारी चुको नेदी हरी| हीच जनाईचरणी प्रार्थना.

0 Shares
पंधरावी ती जनी जनी म्हणे