जनाबाईंनी लौकिक आणि अलौकिकांमधील सीमारेषा पुसून टाकल्या, असेसं म्हटलं तरी चालेल. ईश्वराची साधना करण्यासाठी संसार-प्रपंचाचा त्याग करून कड्याकपारीत वास करण्याऐवजी नित्याची कर्म करता करता हसतखेळत सहजपणे भक्ती करता येते, असं जीवनाभिमुखतेचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भावविश्वात संत जनाईंना महत्त्वाचं स्थान आहे. एकनाथांनी श्रीकृष्णानं केलेल्या उपदेशाचे काही अभंग लिहिले आहेत. संतांची माझ्यावर कृपा आहे. त्यांनी मला नावारूपाला आणलं. माझ्याकडे येण्याचा रस्ता दाखविला, असं नाथांचा श्रीकृष्ण सांगतो. पुढे या संतांची नावंही तो घेतो. या नामनिर्देशांच्या अभंगामधील एक चरण असा आहे, ‘दामानामा जनाबाई| राजाई आणि गोणाई| येशि आणि साकराई| जिवलग माझे उद्धवा॥’
या चरणात जनाबाईंचा उल्लेख संतपरंपरेतील त्यांचं स्थान स्पष्ट करण्यास पुरेसा ठरावा.
तुकोबांनीही जनाईचा उल्लेख आदरपूर्वक केला आहे. भगवंताला उच्चनीचपणा मान्य नाही. तो भावभक्तीचीच दखल घेतो या आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ तुकोबा ‘नामयाची जनी सवे वेची शेणी॥’ असं उदाहरण देतात. शाहीर सगनभाऊंची विरहिणी आपल्या सख्यांना विनवते, ‘ज्ञानेशाची ओवी कुणी जनीचा अभंगगा रे’.
जनाईचा उल्लेख सहसा ‘दासी जनी’ असा होत असतो आणि तो स्वत: जनाईपासूनच होत आलेला आहे. स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेण्यात जनाईंना अभिमान वाटतो. दास/दासी शब्दाचा एक अर्थ शिष्य असा आहे. त्यानुसार ज्ञानदेव आपला उल्लेख ‘निवृत्तिदास’ तर तुकोबा ‘बाबाजी सद्गुरुदास’ असा करतात. त्याचप्रमाणं जनाईही नामदेवांच्या दासी म्हणजे शिष्या असाव्यात, असं मानणारा एक वर्ग आहे. परंतु जनाईच्या बाबतीत त्या शिष्या या नात्यानं जशा नामदेवांच्या दासी होत्या तशाच त्या नामदेवांच्या कुटुंबाच्या सेवक या नात्यानंही दासी होत्या. अर्थात या संदर्भात एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. ती ही की, नामदेव-तुकोबांनी वर्णिलेल्या ‘दया करणे जे पुत्रासी| तेचि दासा आणि दासी|’ या कोटीमधील संत होते. त्यामुळं जनाबाई नामदेवांच्या कुटुंबामधील एक सदस्यच असल्यासारख्या होत्या. त्या स्वत:च आपली गणना नामदेवांच्या कुटुंबामध्ये करतात.
जनाई नामदेवचरित्राचा पहिल्यापासून साक्षीदार आणि भागीदारही आहेत. नामदेवांचा जन्म इ. स. १२७०मध्ये झाला तो त्यांच्या आईनं-गोणाईनं विठ्ठलाला नवस केल्यामुळे, असं जनाई सांगतात. इतकंच नव्हे, तर त्या तेव्हा चांगल्या जाणत्या होत्या आणि त्यांनी या छोट्या अर्भकाला ओवाळलंसुद्धा. लहानग्या नामदेवाला त्यांनी लहानपणी सांभाळलेलं असणार. अर्थात पुढे नामदेवांचा आध्यात्मिक अधिकार लवकरच वाढत गेला तेव्हापासूनच जनाईंनी आपलं नामदेवशिष्यत्व जाहीर केलेलं दिसतं. नामदेवांशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या, की त्यांनी नामदेवांबरोबरच आषाढ वद्य १३ शके १२७२ या दिवशी पंढरीत समाधी घेतली. एका बाजूला वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी विद्युतसमाधी पावलेल्या मुक्ताई तर दुसर्या बाजूला साधारणपणे निदान पंच्याऐंशी वर्ष आयुष्य लाभलेल्या जनाई. म्हणायला जरी जनाई दासी असल्या तरी त्या नामदेव आणि ज्ञानदेवादी भावंडं या सर्वांपेक्षा वयानं मोठ्या असल्यानं त्यांना वडीलकीचा मान मिळत असणार यात शंका नको.
नामदेवांची दासी या भूमिकेशी जनाई इतक्या एकरूप झालेल्या होत्या, की हे नाते जन्मोजन्मीचं असल्याचं त्यांना वाटतं. प्रल्हाद, अंगद, उद्धव या नामदेवांच्या पूर्वावतारांमध्येही आपण त्यांच्याबरोबर जन्म घेतले होते, असं त्या सांगतात. त्या प्रल्हादावतारात पद्मिनी, अंगदाच्या काळात म्हणजे रामावतारात मंथरा; तर उद्धवाच्या अवतारात कुब्जा होत्या, असं निवेदन करणारा त्यांचा एक अभंगच आहे. खरं तर नामदेवांची सेवा करण्याची संधी मिळणार असेल तर पंढरीत ‘करी पक्षी का सूकर| श्वान श्वापद मार्जार’, असंही त्या भगवंताला विनवतात.
लहानपणीच जनाईंना दामाशेटीच्या हाती सुपूर्द करणारे जनाईचे आईवडील लवकरच स्वर्गवासी झालेले दिसतात. ‘माय मेली बाप गेला| आता सांभाळी विठ्ठला’, अशी तळमळीची हाक त्यांनी विठ्ठलाला दिली आणि आपण त्या धर्मताताची धर्मलेक असल्याचं सांगितलं. नामदेव मोठे झाले तेव्हा त्यांचा अधिकार पहिल्यांदा जनाईंनी ओळखला. या काळात नामदेवांच्या भक्तीला त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यावहारिकदृष्ट्या विरोध झालेला दिसतो आणि तो स्वाभाविकच आहे. एकत्र कुटुंबामधील थोरला मुलगा मोठा होईतो बाप वृद्धत्वाकडे वळलेला असतो आणि मुलाकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. नेमक्या याच वेळी नामदेवांचं लक्ष कुटुंबाऐवजी विठ्ठलाकडे लागलं आणि घरात संघर्ष सुरू झाला. या तणावग्रस्त वातावरणात नामदेवांचा कल, क्षमता आणि अधिकार जनाईंनी ओळखला आणि त्या नामदेवांच्या मागे उभ्या राहून त्यांना प्रोत्साहन देऊ लागल्या, त्यांची विशेष सेवा कौतुकानं करू लागल्या, असं दिसतं. त्यामुळंही नामदेवांवरील कुटुंबीयांचा राग त्यांच्यावरही निघालेला असण्याची शक्यता आहे. नामदेवांच्या भक्तीचा प्रभाव पडून जनाई त्यांना अनुसरल्या आणि त्या धन्य मायबाप नामदेव माझा| तेणे पंढरिराजा दाखविले॥, असं सांगू लागल्या. नामदेवांना त्यांनी सद्गुरू मानलं आणि त्या शिष्या या अर्थानंही त्यांच्या दासी झाल्या. नामदेवांनी त्यांना लिहिणं-वाचणं शिकवलं, असं दिसतं. बाई मी लिहिणं शिकले सद्गुरुरायापासी, असं त्याच म्हणतात.
याच काळात नामदेवांची ज्ञानदेवादी भावंडांशी ओळख झाली. समकालीन अन्य संतही त्यांना पंढरीच्या वाळवंटात भेटले आणि एक नव्या धर्माचं प्रवर्तन झालं. या भागवत धर्मात अथवा वारकरी पंथात स्त्रीशूद्रादिअतिशूद्रासकट सर्वांना स्थान होतं आणि अधिकारही होता. यापूर्वीच्या काळात स्त्रियांना धर्मात स्थान नव्हतं. संतांनी त्यांना फक्त स्थानच दिलं असं नाही तर प्रतिष्ठाही दिली. त्यांच्या या उपकाराबद्दल जनाई लिहितात, स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास| साधुसंता ऐसे केले मज॥
धर्मात आणि परमार्थात स्त्रीशूद्रांना स्थान देण्यातली तात्त्विक भूमिका ज्ञानेश्वरांनी सिद्ध केली म्हणून जनाईंना त्यांच्याबद्दल एवढा आदर आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने त्याच्या आश्रयाला आलेल्या स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांचं विशेषण न मानता ते स्वतंत्र पद मानून त्यांच्या जन्माशी पूर्वजन्मातील पापकृत्यांचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या मुक्तीची प्रक्रिया अशा प्रकारे तेराव्या शतकातच सुरू झालेली आहे. अठरापगड जातींच्या स्त्रीपुरूषांना ज्ञानेश्वरांविषयी पूर्ण विश्वास आहे. ‘अहो बैसले दळणी| धाव घाली म्हणे जनी॥’ म्हणून दळण दळू लागण्यास जनाई त्यांना पाचारण करतात. अलौकिक-पारमार्थिक पातळीवरून तर या साधुसंतांनी धर्मकार्य केलंच; परंतु लौकिक पातळीवर सुध्दा त्यांनी सहजीवनाचा, सामुदायिकतेचा एक निकोप आदर्श घालून दिला. किंबहुना त्यांनी लौकिक आणि अलौकिकांमधील सीमारेषा पुसून टाकल्या, असं म्हटलं तरी चालेल. ईश्वराची साधना करण्यासाठी संसारप्रपंचाचा त्याग करून कड्याकपारीत वास करण्याऐवजी नित्याची कर्म करता करता हसतखेळत सहजपणे भक्ती करता येते असं जीवनाभिमुखतेचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. जनाई लिहितात-
दळू कांडू खेळू| सर्व पाप ताप जाळू॥
सर्व जीवांमध्ये पाहू| एक आम्ही होऊन राहू॥
जनी म्हणे ब्रह्म होऊ| ऐसे सर्वा घटी पाहू॥
नामदेवांच्या आणि अन्य संतांच्या सहवासानं जनाईही अभंगरचना करू लागल्या. अर्थात त्याचं श्रेय त्या खुद्द विठ्ठलालाच देतात. तुझी कृपा होय जरी| दासी जनी धृपद करी॥ जनाईंना सद्गुरूंकडून अक्षरओळख झाल्याचा उल्लेख याआधी आलेला आहेच. अर्थात कविता हे प्रतिभेचं स्फूरण असल्यामुळे ती केव्हा सुचेल हे सांगता तर येत नाहीच; परंतु त्याचबरोबर निदान मराठीच्या आदिपर्वात तरी मौखिक परंपरेला अधिक प्राधान्य असल्यामुळे कवी लेखणी, कागद हातात घेऊन काव्यलेखनाची आराधना करीत आहे, असंही नेहमी घडत नव्हतं. तेव्हा काही गुणग्राहक व्यक्ती स्वत: होऊन पुढे येऊन कवींच्या रचना लिहून घ्यायचे. ज्ञानेश्वरांचे अभंग सच्चिदानंदबाबा लिहून घ्यायचे; तर चोखोबांच्या अभंगांना लिखित रूप देण्याचं काम अनंतभट अभ्यंग या ब्राह्मणानं पत्करलं होतं. आपले अभंग स्वत: पांडुरंगच लिहून घेतो, अशी जनाईची श्रद्धा होती. अर्थात जनाईच्या दळणकांडणापासून तर वेणीफणीपर्यंतच्या अनेक कृत्यांमध्ये पांडुरंगाचा हातभार असतो अशी जनाईची तसंच समकालीन आणि उत्तरकालीनांची समजूत आहे. या कृत्यामध्ये अभंगलेखनाचाही समावेश असल्यास आश्चर्य नाही. जनाईंनी परात्पर परमेश्वराला मानवाच्या लौकिक व्यवहारांमध्ये आणलं. अर्थात यामुळं जनाईंच्या काव्यरचनेला समाजात प्रतिष्ठा मिळाली हे वेगळं सांगायला नकोच. जनाईंचा भक्तिभाव हा समकालीनांच्या आदराचा विषय झाला आणि ते जनाईच्या कीर्तनरूपी उपदेशाच्या अधिकाराला मानू लागले. एक सर्वसामान्य स्त्रीनं एवढा अधिकार प्राप्त करून घ्यावा ही बाब खचितच दखल घेण्याइतकी महत्त्वाची आहे. नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लाऊ जगी ||, असं म्हणणार्या नामदेवांचंच कार्य जनाईंनी स्वतंत्रपणानं सुरू केलं. त्या म्हणतात-
करू हरीचे कीर्तन | गाऊ निर्मळ ते गुण ॥
सदा धरू संतसंग | मुखी म्हणू पांडुरंग ॥
करू जनांवरी कृपा | रामकृष्ण म्हणवू लोका ॥
जनी म्हणे कीर्ती करू | नाम बळकट धरू ॥
विठ्ठल हे जनाईच्या कवित्वाचं केंद्रस्थान आहे. विशेष म्हणजे त्या विठ्ठलाकडे वेगवेगळ्या नात्यांच्या दृष्टीनं पाहतात, नव्हे त्याच्यापाशी आपणाला अनेक नात्यांनी जोडतात. तो त्यांचा बाप, माय, बहीण, भाऊ, मूल, सखी, सखा सर्व काही आहे. विटेवरचा विठ्ठल ही यशोदेची कन्या आहे. कशी तर-
आळविता धाव घाली | ऐसी प्रेमाची भुकेली ॥
ते हे यशोदेची बाळा | बरवी पाहतसे डोळा ॥
विटेवरी उभी नीट | केली पुंडलिके धीट ॥
स्वानंदाचे लेणे ल्याली | पाहुनी दासी जनी धाली ॥
हा विठ्ठल, ब्रह्मदेवाचा बाप आणि लक्ष्मीचा कांत एवढा थोर आहे. पण तो जनाईचा सखा आहे. त्याला त्या त्याच्या थोरवीची आठवण करून देऊन ‘सख्या घेतले पदरी | आता न टाकावे दुरी॥’, अशी विनंती करतात. तर आणखी एका अभंगामध्ये विठाबाई मायबहिणी | तुझ्या कृपे तरली जनी॥, अशी कृतज्ञतापूर्वक ग्वाही देतात. प्रसंगी ते तू माझे धावे आई| सखे साजणी विठाबाई॥, अशी आर्त विनवणीही करतात. एखाद्या वेळी एके बापा हृषीकेशी| मज ठेवी पायापाशी॥, असा लडिवाळ हट्टही करतात. विशेष म्हणजे प्रसंगी अंगणात उभ्या राहून विठ्ठलाला चार शिव्या हासडायलाही त्या मागंपुढं पाहात नाहीत.
जनाईच्या चरित्रातील फारसे तपशील ज्ञात नाहीत. मात्र विठ्ठल घरी आला असता त्याचं सुवर्णाचं पदक तो जनाईकडे विसरतो. दुसर्या दिवशी जनाईवर पदक चोरल्याचा आळ येतो. बडवे मंडळी त्यांना सुळावर देण्याचं ठरवतात, पण अखेर त्या सुळाचं रूपांतर वृक्षात होऊन त्या वृक्षाचंही पाणी झालं, अशी चमत्कारकथा प्रचलित आहे. जनाईंनी मराठी मनात आणि विशेषत: स्त्रियांच्या हृदयात अढळपद मिळवलं आहे हे मात्र वादातीत. दळणकांडण, झाडलोट करणार्या सर्वसामान्य मराठी गृहिणींना असल्या कामात विठ्ठलाला सहभागी करून घेणार्या जनाईचं अप्रूप वाटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. प्रसिद्ध मराठी शाहीर सगनभाऊ जनाईच्या अभंगांचा उल्लेख ज्ञानदेवांच्या ओव्यांच्या बरोबरीनं करतो यात सर्व काही आलं. मात्र याचा अर्थ जनाई केवळ लोककवयित्री राहिल्या असा मात्र नाही. डॉ. भिंगारकरांनी दाखवून दिल्याप्रमाणं मुक्तेश्वरांसारख्या व्युत्पन्नपंडित कवींवर सुध्दा जनाईचा प्रभाव आहे. हा प्रभाव विशेषत: आख्यानकवयित्री म्हणून येतो. राजा हरिश्चंद्र, थालीपाक, द्रौपदी वस्त्रहरण यांवरील त्यांची आख्यानं प्रसिद्ध असून, उत्तरकालीन कवींना त्यांनी सामग्री पुरवली. मूळ संस्कृत ग्रंथामध्ये न आढळणारे अनेक प्रसंग जनाईंनी आपल्या निर्मितीक्षम प्रतिभाशक्तीच्या जोरावर रचलेले दिसतात. थोडक्यात, जनाईकडे केवळ एक साधीभोळी बाळबोध कवयित्री असं न पाहता प्रतिभावंत म्हणूनच पाहिलं पाहिजे.
दासी म्हणून जन्मलेल्या जनाईंनी स्वकर्तृत्वाच्या बळावर असा अधिकार प्राप्त करून घेतला, की त्याच्या योगे त्या शेवटी ‘धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश’, असं आत्मप्रत्ययानं आणि आत्मविश्वासानं म्हणू शकल्या. हे त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे यात शंका नाही.
झाले सोयरे त्रिभुवन धगधगती ठिणगी