कोकणचा ज्ञानेश्वर

विठोबा सावंत

तळकोकणावरच्या नाथ संप्रदायाच्या प्रभावाचं ठसठशीत उदाहरण म्हणजे संत सोहिरोबानाथ त्यांच्या काव्याचा आणि विचारांचा गाभा वारकरी प्रेरणेचाच आहे. म्हणूनच बा. भ. बोरकर त्यांना ‘कोकणचा ज्ञानेश्व.र’ म्हणतात.

‘हरिभजनाविण काळ घालवूं नको रे, अंतरिंचा ज्ञानदिवा मालवूं नको रे’ हे गाणं कुणाचं? या प्रश्नावर शेकडा नव्याण्णवांचं उत्तर असतं, पंडित जितेंद्र अभिषेकी. पण यातला सगळ्यांना भावणारा संदेश आहे, संत सोहिरोबानाथांचा. सोहिरोबानाथांचे असे आणखी अभंगही भजनात सर्रास गायले जातात. पण अंतरीचा ज्ञानदिवा न मालवण्याचा संदेश देणारा हा अभंग म्हणजे सोहिरोबानाथांच्या आध्यात्मिक भक्तीमार्गाची ओळख बनली आहे. नाथपंथीय सोहिरोबानाथांनी गुरु गहिनीनाथांच्या उपदेशानंतर भक्तीरसाची अनेक पदं, अभंग, ओव्या रचल्या. मोठी ग्रंथरचना केली. संत नामदेवांनंतर हिंदीतून काव्यरचना करणारे आणि उत्तर भारतात ओळख असलेले संत रोहिरोबानाथ हे महत्त्वाचे संत होत. ते गोव्यातील एकमेव प्रसिद्ध संत. त्यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्तानं गोव्यात सोहिरोबानाथांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला. सरकारी कार्यक्रम झाले. गोवा विद्यापीठात त्यांच्या नावानं मराठी भाषा आणि गोव्यातील मराठी साहित्याच्या संशोधनासाठी अध्यासन स्थापन करण्याची घोषणा सरकारनं केली. पेडणे येथील सरकारी महाविद्यालयाचं नामांतर ‘संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स’ असं करण्यात आलं. याशिवाय सोहिरोबानाथांचं जन्मगाव असलेल्या गोव्यातील पालये गावात कार्यक्रम झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात प्रवेश केला की मुंबई-गोवा हायवेवरून उजव्या हाताला थोडं आत गेलं की पेडणे शहरात पालये गावाकडे जाणारा रस्ता विचारायचा. थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला तेरेखोल नदी दिसते. ही नदी महाराष्ट्र आणि गोव्याची सीमारेषा. डोंगरामधला सुंदर रस्ता आणि त्याच्या दुतर्फा असलेली टुमदार घरं, मंदिरं, चर्च, त्या भोवतीची झाडी आणि पुढे उंच उंच होत जाणार्‍या डोंगरावरच्या काजू-आंब्याच्या बागा. दुपारच्या वेळी सुशेगाद गोव्यात पत्ता विचारायला कुणी सापडणं कठीणच. कुणी स्थानिक असेल तरच पालयेचा रस्ता अचूक सांगू शकतं. तिथे लहानथोरांच्या तोंडात आपला एकेरी उल्लेख बर्‍याच दिवसांनी ऐकल्यानंतर सांगणारा छोटा मुलगा असला तरी आपला लहानपणीचा मित्रच भेटला की काय असं वाटून जातं. महत्त्वाची बाब ही की आजूबाजूच्या गावांतील लोकांना संत सोहिरोबानाथ परिचित आहेत. पेडण्यापासून १३ किलोमीटरवर पालये गाव दिसतं आणि पुढे झाडांनी वेढलेल्या काही घरांमधील एक जुनं पण मजबूत दुमजली घर दिसतं ते संत सोहिरोबानाथ आंबियेंचं.

सोहिरोबानाथांच्या वंशजांनी हे जूनं घर दुरुस्त करून मूळ ढाच्यासह निटनेटकं ठेवलंय. अर्थात आंबिये मंडळी नोकरी व्यवसायानिमित्तानं मुंबईत स्थायिक झालीत. त्यामुळं महिन्या-दोन महिन्यातून ते गोव्याला येतात. तोपर्यंत घराची चावी त्यांचे शेजारी पंडित यांच्याकडंच असते. पंडित कुटुंबीयांना भेटलं की सोहिरोबानाथांचं घर दाखवतात. या घराची देखभाल करणारे नाथवंशज डॉ. रामकृष्ण आंबिये मुंबईत असतात. हे घर सुमारे ३०० वर्षांपूर्वीचं असल्याची माहिती डॉ. आंबियेंनी दिली. चिरे आणि मातीच्या घराची सोहिरोबानाथांच्या वंशजांनी चांगली डागडुजी केली आहे. हे दुमजली घर पुढे व्हरांडा, माजघर, देवाची खोली, दोन बेडरूम्स असं प्रशस्त आहे. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मजबूत जिनाही आहे. आंबियेंच्या या घरात देवाच्या खोलीत सोहिरोबानाथांचा फोटो आहे. दत्तजयंतीचा सण आंबिये कुटुंबीय साजरा करतात. तसंच माघ महिन्यात गुरुप्रतिपदेला प्रवचन, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. सोहिरोबानाथांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्तानं इथं काही कार्यक्रम झाले.

आंबिये मूळ कुठ्ठाळीचे संझगिरी. पोर्तुगीजांच्या बाटवाबाटवीमुळं नाथांचे पूर्वज सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील पालये गावात आले. पेडणे, साखळी, डिचोली या भागाचं कुळकर्णीपदही नाथांचे वडील अनंत यांच्याकडं होतं. इ. स. १७१४ साली एका मंगळवारी नाथांचा इथे जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्मिक गोष्टींमध्ये ओढा होता. मोठे झाल्यावर वडिलांच्या आज्ञेवरून वडिलोपार्जित कुळकर्णीपदाचा स्वीकार केला आणि लग्न करून गृहस्थाश्रमही स्वीकारला. संसारिक सुखापेक्षा त्यांचा ओढा भक्तीमार्गाकडे अधिक होता. पण त्यांनी आपली नोकरीही उत्तम केली आणि संसारही.

सोहिरोबांच्या आयुष्याची पुढची गोष्ट ऐकण्यासाठी बांद्याला जावं लागतं. चांदा ते बांदा म्हणतात त्यातलं ते बांदा. मुंबई-गोवा हायवेवर महाराष्ट्राच्या सीमेचं टोक. हायवेहून चिंचोळ्या रस्त्यानं आत गेलं की कोणत्याही छोट्या शहराच्या बाजारपेठेत असतात तशी रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांना खेटून असलेली जुनी-नवी घरं-दुकानं. या रस्त्यानं जाताना समोर एका मंदिरावरच कळसाऐवजी मूर्ती दिसते. हे सोहिरोबानाथांचं स्मारक मंदिर. त्याला खेटूनच उत्तर दिशेला मुख्य दरवाजा असलेलं नाथांच्या वंशजांचं घर.

सावंतवाडी संस्थानचं कुळकर्णीपद वडिलांनंतर सोहिरोबांनी पुढे चालवलं. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्याकडे शेतीवाडी सोपवून ते पालये आणि सावंतवाडीच्या मध्यावर सोयीच्या असलेल्या बांद्यात आईसह येऊन राहिले. आधी बांद्यात आल्यानंतर आता जिथं मंदिर आणि घर आहे तिथंच त्यांचं घर होतं. पुढे पुराच्या पाण्यात ते वाहून गेल्यानंतर नाथांचे नातू रघुनाथ अनंत आंबिये यांनी १८१८ साली कोकणात पूर्वी असत तसं छोट्या माळीचं नवं घर बांधलं जे १९८ वर्षांनंतर आजही उभं आहे आणि नाथांच्या आठव्या पिढीचे वंशज प्रसाद गजानन आंबिये आणि त्यांचे बंधू तिथं वास्तव्यास असतात. प्रसाद गोव्यातील शाळेत शिक्षक आहेत. ते आणि त्यांचे बंधू नाथांच्या वास्तव्याच्या स्मृती मंदिरात जपतायत.

या घराच्या बाजूला आधी एक घुमटी होती. त्यात सोहिरोबानाथांच्या पादुका ठेवलेल्या होत्या. त्या जागेवर ४५ वर्षांपूर्वी १९७०मध्ये मंदिर बांधलं गेलं. २०१३मध्ये त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. आता मंदिरावरच सोहिरोबानाथांची मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे. मंदिरात नाथांच्या पादुका आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्यानं आता त्या काचेच्या पेटीत बंदिस्त करून ठेवण्यात आल्या आहेत. नाथांचा बसण्याचा पाटही मंदिरात आहे. नाथांचा जन्म मंगळवारचा असल्यानं दर मंगळवारी इथं भजन केलं जातं. हनुमान जयंतीला नवनाथ भक्तीसार पारायण केलं जातं. गावकरी दर्शन आणि भजनाला येतात. सोहिरोबानाथ नाथपंथीय असले तरी त्यांनी भगवं घातलं नाही, हे वैशिष्ट्य. मंदिरात फारसं सोवळंओवळंही नसतं. ‘आम्ही सारस्वत. त्यामुळे आम्ही मासेही खातो,’ प्रसाद मोकळेपणाने सांगतात.

‘इतर कुठल्याही आडनावाचे अनेक वंश सापडतील. आंबिये आडनाव हे फक्त नाथवंशजांचंच आहे. त्यांच्यासारख्या महान संतसत्पुरुषाचे आपण वंशज आहोत याचा खूप खूप आनंद आहे आणि अभिमानही,’ प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी आंबिये सांगतात. नाथांचे बांद्यात जे नातू होते त्या रघुनाथ यांचे पुत्र आत्माराम वेंगुर्ल्यातील मातोंड इथं स्थायिक झाले आणि त्यांच्या पुढच्या वंशावळींतील किशोरी आंबिये. मात्र आता मातोंड इथं आंबियेंचं काहीही नाही. ‘आता कधी गेलो तर बांद्यात मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतो’, असं त्या सांगतात.

‘बांद्यात सोहिरोबानाथांनी बराच वेळ देवपूजा, धर्मग्रंथांचं वाचन आणि पदरचना यात घालवला. संगीताची आवड, रसाळ अभंगवाणी यामुळं श्रोतेही भजनात दंग होऊन जात. प्रापंचिक असले तरी त्यांचा परमार्थाकडे ओढा असलेले नाथ त्यांच्या आतिथ्यशीलतेमुळं बांदा परिसरात लोकप्रिय होते,’ प्रसाद आंबिये त्यांच्या कुटुंबीयांकडून कळलेली आणि नाथांच्या चरित्रात नमूद केलेली माहिती सांगतात. पुढे परमेश्वर चिंतनात नाथ आणखीच गढून जाऊ लागले. संसारात त्यांचं मन रमेना. भजनं म्हणावीत, ज्ञानेश्वरी वाचावी यातच ते रमू लागले. संसारापासून अलिप्त राहू लागले. याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली.

सोहिरोबानाथांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं ठिकाण म्हणजे इन्सुलीतील डोबाशेळ. बांद्यातून सावंतवाडी शहराकडे जाताना मुख्य रस्त्यावरच इन्सुली गावात एक छोटं पण टुमदार मंदिर आहे. समोर कमानीवर ‘संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर’ असं लिहिलंय. मंदिरासमोरच एक मोठा पाषाण आहे. तिथं एक मोठं वडाचं झाडही होतं. वडाच्या झाडाखाली पाषणावर बसले असतानाच सोहिरोबांना गहिनीनाथांनी आत्मसाक्षात्कार दिला होता. इन्सुलीतील ग्रामस्थांसाठी म्हणूनच हे स्थान पवित्र आणि महत्त्वाचं. पाषाण इथं अजूनही आहे. वडाचं झाड मात्र ३५ वर्षांपूर्वी मोठ्या वार्‍यानं उन्मळून पडलं.

मंदिराच्या परिसरात जाताच स्पीकरवरच्या अभंगांचे मंद स्वर कानी पडतात. गाभार्‍याच्या मुख्य दरवाजावर बसवलेल्या फलकवजा छोट्या आडव्या एलईडी स्क्रीनवरही अभंगांच्या ओळी सरकत असतात. गाभार्‍यात एका गोलाकार शिळेवर संत सोहिरोबानाथांची बसलेली सुंदर संगमरवरी मूर्ती आणि पाठीमागच्या भिंतीवर कोरलेलं नवनाथांचं शिल्प. गाभार्‍यावर घुमटी आणि त्यावर कळस. गाभार्‍यासमोर कोकणातील मंदिरात असतो तसा लांबलचक मोकळा हॉल असलेला सभामंडप. गाभार्‍याच्या चिर्‍याच्या भिंती बाहेरून पॉलीश केलेल्या.

विशेष म्हणजे गावकर्‍यांनी पुढाकार घेऊन, वर्गणी जमवून आणि अंगमेहनत करून हे मंदिर उभारलं आहे आणि त्याची व्यवस्थाही तेच पाहतात. त्यासाठी गावकर्‍यांनी श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती स्थापन केलीय. खरं तर ३० वर्षांपूर्वी इथं एसटीचा बसथांबा होता. एसटीची प्रतीक्षा करत गावकरी इथं उन्हातान्हात उभे राहत. म्हणून मुंबईतील चाकरमान्यांनी वर्गणी काढून इथं बस स्टॉप बांधण्यासाठी पैसे पाठवले. पण स्थानिकांनी या निधीतून मंदिर बांधावं अशी कल्पना मांडली आणि १९९० साली इथं मंदिर उभं राहिलं. आधी छोटं मंदिर होतं. मग गाभारा मोठा केला आणि पुढे हॉल बांधला. केवळ मंदिर बांधून गावकरी थांबले नाहीत. तर मंदिराच्या बाजूला एक सुंदर भक्तनिवासही त्यांनी उभारलं आहे. कोकणात भूखंडांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. पण मुख्य रस्त्याला लागून असलेली ही लाखो रुपये किंमतीची जागा गावकर्‍यांनी नाथांच्या प्रेमापोटी मोफत दिली. बरं ही काही फार श्रीमंत मंडळी नव्हेत. पण या ठिकाणाला असलेलं ऐतिहासिक, आध्यात्मिक महत्त्व आणि नाथांबद्दलचा आदर यामुळं भाविक आणि सात्विक वृत्तीच्या गावकर्‍यांनी निर्मळ मनानं ही जमीन दान केली आहे.

सोहिरोबानाथांच्या चरित्रात त्यांना झालेल्या साक्षात्काराची माहिती विस्तृतपणे दिलीय. उन्हाळ्याच्या दिवशी दुपारी सोहिरोबा बांद्यातील त्यांच्या घरी देवपूजा करत असताना सावंतवाडीहून दूत घोड्यावरून आला आणि राजेसाहेबांनी तातडीनं बोलावल्याचा निरोप दिला. देवपूजेत व्यत्यय आल्यानं दुःखी झालेले नाथ भरदुपारी पत्नीचा जेवण करून जाण्याचा आग्रह मोडून निघाले. आईने रसाळ फणस हातात दिला आणि वाटेत खाण्यास सांगितला. बांद्याची नदी ओलांडून नाथ पुढं निघाले. वाटेत इन्सुलीच्या जंगलात आता मंदिरासमोर असलेल्या मोठ्या पाषाणावर बसून त्यांनी फणस फोडला. परमेश्वराला हात जोडले आणि फणस खाणार इतक्यात जंगलातून आवाज आला. ‘बाबू हमको कुछ देता है?’ नाथांनी हात जोडले आणि समोर नाथपंथी वेशातील योगी प्रकट झाले. नाथांनी फणस त्यांच्यासमोर ठेवला. योग्यानं फणसाची चव चाखून पाच गरे नाथांच्या हातावर ठेवले. नाथांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, ‘मी गहिनीनाथ. गैबीनाथ. तुझं वैराग्य पाहून संतुष्ट झालो. तू यापुढे अच्युत आंबिये नव्हेस, तू सोहिरोबा. सोऽहं मंत्राचा जप कर. अमर होशील.’ गहिनीनाथ अदृश्य झाले.

आत्मानुभव प्राप्त झालेले सोहिरोबानाथ थेट सावंतवाडी दरबारी पोचले आणि कुळकर्णी पदाचा राजीनामा दिला. नाथांच्या वाणीतून छंदोबद्ध पदं निर्माण होऊ लागली. लेखणीला कायमची रजा दिलेल्या नाथांनी ती लिहून ठेवली नाहीत. नाथांची शेकडो पदं उपलब्ध आहेत ती नाथांच्या बालविधवा बहिणीनं लिहून घेतलेली आहेत. नाथांच्या मुखातून संतवाणी निघे आणि त्यांची बहीण ती लिहून काढी.

नाथांच्या दोन्ही मुलांची लग्नं होऊन नातवंडही झाली होती. एकेदिवशी सगळा संसाराचा गाडा सुनेवर टाकून दोन्ही मुलांना घेऊन त्यांनी गृहत्याग केला आणि ते तीर्थाटनास निघाले. कोल्हापुरात अंबामातेच्या सेवेत काही दिवस घालून ते पुढं पंढरपुरात गेले. पाडुंरंगाला भेटून ‘आनंदे नाचे श्रीरंग’ हे पद त्यांच्या मुखातून बाहेर पडले. त्यांनी अक्कलकोट, सुरत इथं मठ स्थापन केले. गिरनार पर्वतावर तप केलं. मध्य भारतातल्या उज्जैनमध्ये जाऊन ते थांबले. तिथल्या मठात १७९२ साली रामनवमीनंतरच्या दिवशी सगळेजण सकाळी उठून बघतात तर नाथ तिथं नव्हते. त्यांच्या अंथरुणावर केवळ एक पदरचना सापडली. ‘दिसणें हे सरले, अवघें प्रक्तन हें मुरले.’

गेल्या पिढीपर्यंत सोहिरोबानाथांची पदं गोवा आणि तळकोकणातल्या अनेक लोकांच्या तोंडी होती. सिद्धांतसंहिता, अक्षयबोध, महदनुभवेश्वरी, पूर्णाक्षरी, अद्वयानंद अशी नाथांची ग्रंथरचना आहे. या सर्वच साहित्यावरचा ज्ञानेश्वरांचा प्रभाव स्वयंस्पष्ट आहे. कविवर्य बा. भ. बोरकर त्यांना ‘कोकणचा ज्ञानेश्वर’ अशी उपाधीही देतात. सोहिरोबानाथांच्या नावानं इंटरनेटवर सर्च केला तर ते नाथांमधल्या वारकरी पंथाचे असल्याचं दाखवलं जातं. निवृत्तीनाथांना ज्यांनी अनुग्रह दिला त्याच गहिनीनाथांनी जवळपास पाचशे वर्षांनंतर सोहिरोबांना दीक्षा दिली, असा अनेकांचा विश्वास होता. गहिनीनाथ म्हणजे गैबीनाथ यांचा अत्यंत आदरानं केलेला उल्लेख सोहिरोबांच्या साहित्यात कायम येत राहतो. गोव्यासह तळकोकणावर नाथांचा प्रभाव जुना आहे. पूर्णप्रकाशानंदनाथ नावाचे आणखी एक संतकवी गोव्यात होऊन गेले आहेत. नाथपंथीयांचा इथं कायम राबता होता. रवळनाथ, वेताळ, कालभैरव, चंद्रनाथ अशा अनेक नाथपंथीय देवता गावागावात सापडतात. नाथपंथीयांच्या जुन्या मठांचे अवशेष सापडतात. इथल्या गावर्‍हाटीवरही तो प्रभाव आहे. अशावेळेस कुणी तत्कालीन गैबीनाथ नावाचा प्रभावी सत्पुरुष सोहिरोबानाथांना मार्ग दाखवून गेला असेलही.

खरं तर इन्सुलीपासून नव्वदेक किलोमीटर अंतरावरच्या गगनबावड्याला गैबीनाथांचं प्रसिद्ध मंदीर कम दर्गा आहे. कोल्हापुराला कोकणाशी जोडणारा हा जुना घाट. तिथला गगनगड आज प्रसिद्ध आहे तो नाथपंथी तपस्वी गगनगिरी महाराजांमुळे. पण या गडाचं मूळ नाव गहिनीगगनगड असंच आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध सरदार पाटणकर घराण्यातील गगनगिरी महाराजांनी गगनगिरीवर खडतर तपश्चर्या केली होती. तिथं गगनगिरी महाराजांचं भव्य मंदिर उभारण्यात आलंय. त्यांना मानणार्‍या भक्तांची संख्या मोठी असल्यामुळं तिथं गर्दी असते. पण त्यात गहिनीनाथांचं मंदिर लपून राहतं. गडाच्या टोकाला उंच टेकाडावर हा सुफी पद्धतीचा दर्गा आहे. त्यात दोन कबरी आहेत. तोच गैबीपीर आणि तोच गहिनीनाथ. हिंदू, मुसलमान एकत्र येऊन तिथं उत्सव साजरे करतात. मात्र नेहमी तिथं फारसं कुणी फिरकताना दिसत नाही. दर्ग्याला लागूनच एक चौथरा आहे. त्यावर छोटं देऊळ आणि एक झाड आहे. त्यावर लिहिलेलं नाव आहे श्री विठलाई देवी देवस्थान. विठ्ठलाला आई करून पूजणारं हे नाव बुचकळ्यात टाकणारं आहे.

सावंतवाडी ते बांदा या वाटेत नाथांचं आणखी एक महत्त्वाचं ठाणं आहे, ते म्हणजे कुडाळ शहराजवळचा देवाचा डोंगर. मुंबई- गोवा हायवेवर कुडाळच्या आधी दोन किमी अंतरावर एक रस्ता जातो. अडुळ गावाकडे जाणार्‍या या रस्त्यानं आत गेलं की काही अंतरावर आंबा, केळी, नारळी आणि कनकीच्या झाडाझुडपांनी वेढलेला रस्ता वळणं घेत डोंगरावर जातो आणि उजव्या बाजूला कुडाळ शहर दिसू लागतं. डोंगराच्या माथ्यावर पोचलो की एक मंदिर दिसतं. मच्छिंद्रनाथाचं मंदिर.

वर्षानुवर्ष हा डोंगर देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. मच्छिंद्रनाथांनी अस्त्रदेवता कालिकेशी युद्ध करून कालिकाअस्त्र प्राप्त केलं तीच ही भूमी. पूर्वी डोंगरात वाघाची गुहा होती आणि वाघिण बछड्यांसह फिरायची असं जुनेजाणते सांगायचे. गावकरी फार कधी या डोंगरावर जायचे नाहीत. पण कुठून कोणी साधू यायचे. डोंगरावर झेंडा रोवून जायचे. जुन्या काळातील काही नाणीही येथे सापडायची, असंही आता या मंदिरात मठाधिपती म्हणून सेवा करणारे प्रभाकर अनंत सावंत सांगतात. श्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या सहाव्या अध्यायात अडूळ गावचा उल्लेख आहे. बारा मल्हार या पवित्र स्थानी अष्टभैरवांवर विजय मिळवल्यानंतर मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतातील अडुळ गावी आल्याचं या अध्यायात नमूद केलंय. या ठिकाणी कालिका अस्त्राच्या साहाय्यानं शाबरी विद्येस पूर्णत्व दिलं. तीन दिवस तपश्चर्या केली. त्यांच्या आशीर्वादासाठी स्वतः श्री भगवान शंकर प्रकटले. या भूमीत मच्छिंद्रनाथ, कालिकादेवी आणि भगवान शंकर अवतरले असा उल्लेख या ग्रंथात आहे.

कुडाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी देवाच्या डोंगरावर मोठी टाकी बांधण्याचं काम १९७९ साली सुरू होतं. टाकी बांधण्यासाठी देवाच्या डोंगराच्या माथ्यावर खोदकाम सुरू होतं. पण रोज खड्डा खोदला की सकाळी तो पुन्हा मातीनं भरून जायचा. तीन दिवस हे असं सुरू होतं. त्यानंतर काम सुरू असतानाच कामावर देखरेख करणार्‍या मुकादमाला मातीच्या ढिगार्‍यावरील दगडातून शक्तीचं अस्तित्व असल्याचे अनुभव आले. म्हणून तिथं दिवाबत्तीसाठी चौथरा बांधला गेला आणि पाण्याची टाकी थोडी लांब गेली. गगनगिरी महाराजांच्या आज्ञेनं एक चव्हाण गुरुजी नावाचे निवृत्त शिक्षक नामस्मरणासाठी इथं आले. त्यांनी अनंत सावंत यांना घेऊन इथल्या चौथर्‍यावर झोपडीवजा देऊळ बांधलं आणि पूजाअर्चा आणि ध्यानधारणा सुरू झाली. साधारण ८० सालापासून या देवळाला आकार आला.

देव डोंगरावरच्या मच्छिंद्रनाथांच्या या मंदिरात भक्त रोजच येत असतात. रोज संध्याकाळी सव्वा सात वाजता हरीपाठ होतो. दुपारी साडेबारा आणि रात्री आठ वाजता प्रसाद दिला जातो. दर गुरुवारी अन्नदान केलं जातं. दत्त जयंतीचा उत्सवही साजरा होतो. गुरु पौर्णिमेला नऊ दिवस गुरुचरित्र पारायण केलं जातं. महाशिवरात्रीचा उत्सव ११ दिवस चालतो. ज्ञानेश्वरांचे भक्तही इथं येतात. दर वर्षी मार्च अखेरीस मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह होतो. कधी येथे नेपाळ, आसाममधूनही भक्त येतात. नागासाधूही अचानक येऊन जातात. मच्छिंद्रनाथांच्या या तपोभूमीनं कुडाळकरांचं लक्ष वेधून घेतलं त्याला फार वर्षही झाली नाहीत. पण नाथपंथी साधू इथे शेकडो वर्ष हजेरी लावत आहेत.

0 Shares
मज लावियेले नाथपंथा नंदादीप