संत गोरा कुंभारांचं संसारात राहून विरक्ती अनुभवणं. जातीची बंधनं तोडून अध्यात्माचं शिखर गाठणं. इथपासून गोरा हे नाव, तेर हे गाव आणि कुंभाराचं काम इथपर्यंत सारंच कुतूहल वाढवणारं आहे. त्या कुतूहलातून समोर आलेलं एक मोकळं ढाकळं चिंतन.
महाराष्ट्रात भागवत धर्माचं तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं कार्य केलं ते वारकरी संप्रदायानं. तंत्रोपासना, विरक्तीची परिसीमा गाठणारा नाथसंप्रदाय, शैव-वैष्णव संघर्ष या सार्या संभ्रमाच्या अवस्थेतून अठरापगड जातींना भक्तीच्या धाग्यात एकत्र गुंफण्याचं काम संतांनी केलं. सामान्यांची ईश्वरभक्तीचं कर्मकांड, पौरोहित्य यांच्या तावडीतून सुटका करून प्रपंचाला परमार्थ पातळीवर नेण्याचं शिकवलं ते संतांनी. या भागवत धर्माची पताका सर्वप्रथम फडकावली ती तेरच्या संत गोरोबा कुंभार यांनी.
प्राचीन भारतीय संस्कृतीत रुजलेल्या जीव शीव ऐक्य मानणार्या अद्वैत भावनेतून धार्मिक पातळीवर सर्वांना सहज उपासना करता येईल, असा हा भक्ती संप्रदाय लोकप्रिय होऊ लागला. समाजातील तळागाळातील लोकांनी ही उपासना पद्धती आनंदानं अंगीकारली. संत मांदियाळीनं ज्येष्ठतेचा मान दिलेले गोरोबा काका याच सर्वसामान्य, तळागाळातील जनतेचे प्रतिनिधी म्हणावे लागतील. कोणत्याही जातीच्या माणसाला भक्तीपंथाद्वारे आध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल, त्यामुळं या संप्रदायात ब्राह्मण, क्षत्रिय, कुणबी, माळी, तेली, सोनार, कुंभार अशा जातीतील लोक सामील झाले.
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ म्हणून ज्या वारकरी संप्रदायास तात्त्विक पातळीवर मान्यता मिळवून देण्याचं श्रेय ज्ञानदेवांना दिलं जातं. त्या ज्ञानदेवांचे गुरू निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे गुरू प्रत्यक्ष गोरखनाथ. ही गुरुशिष्य परंपरा पाहिली असता निवृतीनाथ, ज्ञानदेव यांची परंपरा ही नाथ परंपरा आहे. म्हणूनच वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाचीच एक लोकप्रिय आवृत्ती म्हणून महाराष्ट्रात पाहावी लागते. गृहस्थाश्रमाचा विरोध केल्यामुळं नाथ संप्रदाय हा केवळ आदराचा आणि कौतुकाचा विषय बनला. समाजात नाथ योग्यांबद्दल प्रचंड आदर होता. मात्र त्याच्या विस्तारास मर्यादा होत्या. अशावेळेस गृहस्थाश्रमात राहूनही ईशभक्तीतून मोक्षप्राप्ती होते, हा भगवद्गीतेतील भक्तीचा अर्थ मानणारा वारकरी संप्रदाय मात्र सर्वत्र पसरला.
गोरोबा काका हे संत मांदियाळीत ज्येष्ठ आहेत. शिवाय ते गृहस्थाश्रमी संत आहेत. स्त्रीला मोक्ष प्राप्तीच्या मार्गातील अडसर समजणार्या काळात त्यांचे दोन विवाह झालेत. आध्यात्मिक आणि पारमार्थिक उन्नतीस गृहस्थाश्रम अडथळा समजला जात असताना ते गृहस्थाश्रमी संतपुरुष होते आणि ज्येष्ठ म्हणून त्यांना मानसन्मान दिला जातो, हे विशेष.
गृहस्थी जीवनातील कर्तव्यांची पूर्तता ईश्वराच्या प्राप्तीपेक्षा अधिक महत्त्वाची, हा संदेश सर्वसामान्य गृहस्थी जनतेला भावणारा आहे. तोच भाव आपल्या दैवताला प्रिय आहे, ही मनोवस्था आनंददायक आहे. गोरोबांच्या चरित्रात याच गृहस्थी जीवनाचा प्रत्यय ठळकपणे येतो.
गोरोबा काकांचा जन्म शके ११८९म्हणजेच इसवी सन १२६७मध्ये तेर इथं झाला. काकांना लाभलेलं आयुष्य केवळ ५०वर्षांचं. त्यात अंदाजे ३० ते ३५वर्षांचा त्यांचा संसार पाहता त्यात अलौकिक घटनांची संख्या तुलनेनं जास्त आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांच्यासह संत नामदेवांनी त्यांना काका म्हणून संबोधणं, काकांनी बाळ पायाखाली तुडवणं, पुन्हा हात कापून घेणं आणि पुन्हा बाळ आणि हात देखील त्यांना प्राप्त होणं आणि या दरम्यानच्या काळात हात नसल्यामुळं त्यांचा चरितार्थ चालावा म्हणून प्रत्यक्ष विठ्ठल आणि रखुमाई यांनी त्यांच्या घरी येऊन कुंभार काम करणं या सर्व घटना पाहता, एखाद्या संत पुरुषाच्या जीवनात एवढ्या अलौकिक बाबी असणं ही खूप विलक्षण गोष्ट आहे. गोरोबा किंवा गोरा या नावाचा उगम शोधणं फारच रोचक आहे. तेर इथल्या वस्तुसंग्रहालयात इसवी सन पूर्व २४०ते इसवी सन २६० या सातवाहन काळातील विविध वस्तू आहेत. त्यात मुख्य प्रमाण हे मातीच्या भांड्यांचं आहे. जगात रोमन कुंभार कला ही अतिशय उच्च दर्जाची समजली जाते. पैठण, तेर, कोल्हापूर अशा शहरात रोमन लोकांची वस्ती असल्याचेही काही संदर्भ आहेत. पण गोरोबा अथवा गोरा या नावाचा उगम पाहताना काकांचं गोरेपण हे अशा अनुषंगानं त्यांच्या रोमन लोकांशी असणार्या संबंधाचं प्रतीक तर नसेल, असं सातत्यानं वाटतं. अर्थात हा निव्वळ अंदाज आहे, त्यास ठोस काही आधार नाही.
गोरोबा काकांच्या तेरचा इतिहास आजपासून जवळपास अडीच हजार वर्षांचा आहे. सातवाहनानंतर क्षत्रप, पूर्व चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलहार, कलचुरी, कदंब, यादव यासह अनेक मध्ययुगीन राजवटींनी तेरवर राज्य केलंय. तेर इथं झालेल्या उत्खननात सामान्य लोकांच्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू सापडल्या. त्यात दगडी वस्तू म्हटलं तर केवळ ‘पाटा-वरवंटा’ आणि ‘जाते’ एवढ्याच आहेत. याचाच अर्थ, या दोन वस्तूंशिवाय दैनंदिन वापराच्या इतर वस्तू या मातीच्या असल्या पाहिजेत.
सातवाहन काळात धातूंची नाणी आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तू मात्र धातूच्या नाहीत. पाणी साठवणं, पाणी वाहणं, धान्य साठवणं, अन्न शिजवणं, अन्न भाजणं, यासाठी मातीच्या वस्तूच वापरल्या जात. तेर, पैठण या सातवाहनकालीन वसाहतीच्या उत्खननात खूप सारी मातीचीच भांडी सापडली. यात विविध आकारांची वाडगी, गाडगी, मडकी, रुंद तोंड असणारे माठ, मातीचे तवे, रांजण, मोठे डेरे, घर बांधायच्या विटा, छतावरील कौलारू आदी वस्तू आहेत. मातीच्या वस्तूंचं प्राबल्य ही अवस्था सातवाहन काळातच होती आणि नंतर बदलली असं नाही. मध्ययुगीन कालखंड, ब्रिटिश काळ आणि अगदी स्वातंत्र्यानंतरही काही काळापर्यंत सर्वसामान्यांच्या जीवनात मातीच्या भांड्यांचं महत्त्व होतं.
‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र अन्न शिजवून खाणं हे संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेचं प्रथम पाऊल आहे. शेती असो वा नसो, प्रत्येक समाज घटकास व्यवस्थेतील बलुतेदारीमुळं धान्य मिळायचं. त्या धान्याचं अन्नात रूपांतर करण्यास लागणारं दैनंदिन जीवनातील साहित्य देणारा एकमेव समाज म्हणजे कुंभार समाज. गृहस्थी जीवन जगणार्या प्रत्येकाच्या जीवनात मातीच्या भांड्यांचं म्हणजेच व्यावहारीक अर्थानं कुंभार समाजाचं महत्त्व होतं. ते त्यांच्या समाजातही ईश्वरी वरदहस्त लाभलेली व्यक्ती म्हणून लोकप्रिय होते.
कुंभार समाजातील व्यक्तीस संतश्रेष्ठतेचा मान देऊन त्यांनासंत पारखी हा सन्मान देणं, वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी खूप महत्त्वपूर्णअशी गोष्ट होती. प्रत्यक्ष विठ्ठलानं आणि रुक्मिणीनं त्यांच्या घरी राहूनत्यांच्या कामात मदत केली होती. यातून विठ्ठल या देवतेस समाजात लोकप्रियता मिळण्यासोबतच कुंभार कला एका वेगळ्या उंचीवर पोचली. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोचण्याचं महत्त्वपूर्णकार्यवेगानं घडू शकलं, याचंश्रेय नक्कीच गोरोबाकाकांनादेणं योग्य ठरेल. गृहस्थाश्रम आणि कुंभार बनवतात ती मातीची भांडी, यांचं अद्वैत सामाजिक अंगानं समजूनघेतल्यास अनेकबाबींचं आकलन नव्यानं होऊ शकेल.
गोरोबा काकांचं चरित्र आजही तेरच्या परिसरात आराध्यांच्या ओव्यातून, गोंधळ्यांच्या गीतातून, वासुदेवाच्या पाऊडातून वारंवार ऐकलं जातं. अनेकवेळा ऐकूनही त्याची गोडी तसूभर कमी झालेली नाही. पाण्यात राहूनही कमळ ज्याप्रमाणं कोरडं राहतं, त्याप्रमाणं काकांनी संसारात राहूनही वैराग्याची महती सांगितली.
आज त्यांचे अगदी मोजके अभंग उपलब्ध असून त्यातलं त्यांचं चिंतन खूप सखोल आहे. वारकरी संप्रदायाच्या शिकवणीबरोबर, सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे जाण्याचा मार्ग सांगताना खरा देव प्रपंचात आहे, अशी शिकवण त्यांनी दिली.
गोरा म्हणजे देव प्रपंची असता ।
तरी का अवस्था भोगताती ॥
प्रपंचात त्यांनी वैराग्याचं महत्त्व सांगितलं आणि सर्व समाजास व्यवहारिक पातळीवर मार्गदर्शन करून सामान्य जनांना ‘अध्यात्म्य विद्येचे रूप दावीले’ आणि याच सामान्यांतील ‘चैतन्याचा दीप उजळीला’.
गोरोबांचा महाराष्ट्रधर्म जग हे करणे शहाणे बापा