एक रिंगण ‘रिंगण‘चं

सचिन परब

‘रिंगण‘ची कल्पना कशी सुचली? नामदेव विशेषांकाला कसा प्रतिसाद मिळाला? गेल्या वर्षी अंक का आला नाही? असे अनेक प्रश्न आम्हाला सतत विचारले जातात. त्या प्रश्नांत प्रेम असतं, अधिकार असतो आणि आशीर्वाददेखील. आता रिंगणच्या दुसर्याध अंकाच्या निमित्तानं रिंगणच्या दोन वर्षांचा हा हिशेब.

माझ्या बाबतीत कायम अनेक चांगल्या गोष्टी घडत आल्यात. पैकी एक खूप चांगली गोष्ट म्हणजे भारतकुमार राऊत संपादक असताना मी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये होतो. त्यांनी ‘मटा सांस्कृतिक’ नावानं आषाढी एकादशीचा अंक केला होता. जयंत पवारांचा हात फिरल्यानं त्याचं सोनं झालं होतं. तो प्रयोग तुफान यशस्वी होता.

तरीही पुढच्या वर्षी आषाढीला अंक निघायची काही चिन्हं नव्हती. राऊत सर राजीनामा देऊन खासदार बनले होते. तरीही ते टाइम्स ग्रुपचे संचालक वगैरे होते. फोन केला की प्रत्यक्ष भेटून बोललो आठवत नाही, पण सांगितलं, आषाढी अंकाचं बघा ना! ते म्हणाले, आता मी नाही, तुम्ही करा काय ते? मी काय करणार होतो. मी मटाच्या इंटरनेट आवृत्तीचा प्रमुख होतो. आषाढी येताच आम्ही तिथे काम करणार्‍या मित्रांनी आषाढीच्या नावानं दोन वर्ष वेबसाईटवर धमाल उडवून दिली.

पुढे ‘मी मराठी’त नोकरीला लागलो. तिथे पाठोपाठ माझा मित्र श्रीरंग गायकवाड माझ्यासारखीच नोकरी सोडून आला होता. कामाच्या आधी, काम करताना, काम झाल्यावर आम्ही खूप गप्पा मारायचो. आषाढी जवळ आली. अंक डोक्यातून जात नव्हता. अंकाचा आराखडा बनवला. वारकरी परंपरा, संतपरंपरा याविषयी वर्षभर चर्चेत असलेल्या गोष्टींवर सविस्तर लेख त्यात असणार होते. त्याचं स्वरूप न्यूज मॅगझिनसारखंच होतं. तो आराखडा कागदावरच खपला. पण गप्पांमध्ये जिवंत राहिला. गप्पांमधून न्यूज मॅगझिनच्या ऐवजी दरवर्षी एका संताच्या कामाचा सामाजिक सांस्कृतिक आढावा घेण्याचं ठरलं. पहिलं काम नामदेव महाराजांवर, याविषयी चर्चाही झाली नाही.

पुन्हा नवा आराखडा बनवला. कुणा जाणकाराला दाखवायचा म्हणून मोरे सरांकडे पुण्याला गेलो. मी, श्रीरंग, पराग पाटील, दिलीप जोशी आणि डॉ. सदानंद मोरे नामदेवांच्या निमित्तानं आम्ही आराखडा सोडून अनेक तास गप्पा मारल्या. मध्ये बरेच दिवस गेले. आषाढी पुन्हा जवळ आली. मी संपादक आणि श्रीरंग पुरवणी संपादक म्हणून ‘नवशक्ति’त होतो. होतो म्हणजे नोकरी सोडण्याच्या बेतात होतो. नोकरी सोडली. दोनेक महिने कसेबसे असतील हाताशी. मोरेसरांना पुन्हा भेटलो. लेखक ठरले.  धावपळ सुरू झाली. मुंबईत जाहिरातींमागे धावायचं आणि पुण्यात लेखकांपाठी. फार कुणीच नाराज केलं नाही. लातूरचे ज्येष्ठ पत्रकारमित्र महारुद्र मंगनाळे यांच्या ओळखीनं अरुण लकशेट्येंकडे प्रिंटिंग झालं.

प्रकाशन आषाढीला पंढरपूर मंदिरात करायचं हे ठरलं. महापूजेनंतरच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी होकार कळवला. त्यांच्याहस्ते प्रकाशन झालं. तिथे टीव्हीचे पत्रकार आपले जवळचे मित्र होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षाही ‘रिंगण’च जास्तवेळ दाखवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून फोन आले. आमचे ज्येष्ठ मित्र ‘मनोविकास प्रकाशन’च्या अरविंद पाटकरांनी अंकाचं वितरण सांभाळलं.

प्रकाशनानंतर लगेच दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी पुण्यात ‘रिंगण’नं सदानंद मोरे सरांचा साठीनिमित्त सत्कार आयोजित केला. त्यात बाबा आढावांच्या हस्ते सत्कार आणि राजीव खांडेकर, दत्ता बाळसराफ यांनी घेतलेली प्रकट मुलाखत झाली. कार्यक्रमाला पुण्यातले अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यापर्यंत अंक गेला. पुढे नामदेव पुण्यतिथी आली. त्यानिमित्त मराठी पंजाबी संस्कृतीचं संगमस्थळ असणार्‍या नांदेडमध्ये ‘रिंगण’च्या वेबसाईटचं ringan.in चं लॉन्चिंग झालं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ तिवारी, जगदीश कदम आणि शीख धर्माचे अभ्यासक हरमहेंद्र सिंग होते. सामाजिक, साहित्यिक, धार्मिक अशा तिन्ही अंगांनी रिंगणचं कौतूक करण्यात आलं. आज या वेबसाईटवर रिंगण जसंच्या तसं ई-बूक स्वरूपात वाचता येतं. शिवाय सगळे लेख अधिक सविस्तरदेखील वाचता येतात.

यानंतर अचानक फोन आला तो नाशिकच्या नंदन राहणेंचा. नामदेव भक्तिपीठ म्हणून त्यांची संस्था आहे. त्यांनी नामदेव जयंतीनिमित्त आम्हा दोघांची जाहीर मुलाखत ठेवली होती. आमचा सत्कारही केला. आजवर मुलाखत घेणार्‍या पत्रकारांची मुलाखत झाली. प्रत्येक ठिकाणी लोक अंक मागत असत. अंक संपलेले होते. तरीही भरपूर मागणी होती. अरविंद पाटकर ते बघत होते. त्यांनी ‘मनोविकास’तर्फे रिंगणचं पुस्तक काढायचं ठरवलं. अंकात कापलेले आणि न घेतलेले सगळे लेख पुस्तकात घेतले. त्याचं आशिष पाटकरनं अत्यंत सुंदर पुस्तक तयार केलं, ‘महानामा’. त्यावर्षीच्या चिपळूण साहित्य संमेलनात अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके तसंच प्रभा गणोरकर, उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन झालं.

‘महानामा’चीही बरीच चर्चा झाली. पुस्तकामुळे ‘रिंगण’ चिरंतन झालं. ‘आम्ही सारे फाऊंडेशन’नं ‘महानामा’वर चर्चा आयोजित केली. मुक्काम अमरावती. गाडगेबाबांचं गाव. सर्वात आधी स्थानिक गुरुद्वारातल्या पुजार्‍यांनी गुरुग्रंथसाहेबांमधली नामदेवरायांची पदं गायली. अमर हबीब, चंद्रकांत वानखडे, प्रा. अशोक राणा, अरविंद पाटकर, सुनील यावलीकर, अविनाश दुधे पुस्तकावर बोलले. जाणकार श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण वर्‍हाडातून मंडळी आली होती. अमरावतीच्या नामदेव शिंपी समाजातर्फे आमचा सत्कार झाला. अप्रतिम कार्यक्रम पार पडला. सन्मान सुरूच राहिले. पंजाबी परंपरेनुसार नामदेव पुण्यतिथीला नाशिक येथे माझ्या हस्ते नामदेवांचं नाव दिलेल्या एका रस्त्याचं उद्घाटनही झालं. नंतर गोव्यात ‘गोमंतक मराठी अकादमी’तर्फे ‘महानामा’वर कार्यक्रम झाला. संजय सोनवणींचं बीजभाषण आणि ‘गोमंतक’चे निवासी संपादक श्रीराम पचिंद्रे, ‘पुढारी’चे निवासी संपादक प्रभाकर ढगे यांच्या उपस्थितीत छान चर्चा झाली. ‘रिंगण’ सगळीकडे पोचत होतं. त्यानिमित्तानं नामदेव सर्वत्र पोचत होते. आम्ही भरून पावलो होतो.

दरम्यान मी गोव्याला शिफ्ट झालो. पुढे श्रीरंग पिंपरी चिंचवडला. नोकर्‍या बदलल्या. नव्या कामांत अडकलो होतो. त्यात आळस होताच. जाहिरातीही वेळेत जमा करता आल्या नाहीत आणि लेखही. एक वर्ष ‘रिंगण’ रखडलं. आषाढी आली आणि लोकांच्या विचारणा सुरू झाल्या, नवं ‘रिंगण’ कुठे आहे? एका ‘रिंगण’नं इतकं भरभरून दिलं तरीही दुसर्‍या वर्षी वेळेत अंक काढता आला नाही. स्वतःचीच लाज वाटत होती.  आम्हालाही आनंदानं जगायचं बळ हवंच होतं. पुन्हा कामाला लागलो. अडचणी आल्या. म्हटलं त्यात तर मजा आहे. रोजची कामं करत करत चोखोबांच्या अंकाची धावाधाव सुरू झाली. कळलं नामदेवांवर अंक करणं सोपं होतं. त्यांच्या सर्वात लाडक्या शिष्यावर अंक करणं भलतंच कठीण आहे.

चोखोबांची धावपळ सुरू असतानाच अचानक एक बातमी आली. नामदेवांच्या घुमानमध्ये यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार. विश्‍वास बसत नव्हता कितीतरी वेळ. घुमान काय ते बघायला अनेकांनी ‘रिंगण’, ‘महानामा’ चाळले. या निर्णयात ‘रिंगण’नं घडवलेल्या चर्चेचाही हात आहे, असं मित्रांनी आवर्जून सांगितलं. पण वाटत नाही. असलाच तर तो खारीचा वाटा आहे. त्या वाट्यात खार खूप समाधानी आहे.

0 Shares
चोखोबांच्या संदर्भखुणा रिंगण कशासाठी?