चोखोबांचे अभंग वाचताना उलगडणारी चोखोबांची कहाणी अस्वस्थ करणारी आहे. देवाच्या पायाशीही निर्लज्जपणे उभ्या ठाकलेल्या उच्चनीच रुढी आणि त्याखाली पिचल्या गेलेल्या शेकडो दलित पिढ्यांचं दर्शन आहे. रौरवालाही मागे टाकेल, अशी दुर्गंधी या परंपरेला आहे. तशातही चोखामेळा ठामपणे उभा राहिला.
काय वानू तुमचे पवाडे| तुम्हापुढें देवराया॥
मोठा ठकवाणा मोठा ठकवाणा| पंढरीचा राणा विठ्ठला तूं॥
मद्याचिया गोडी लावियेले जगा| गोवियेलें पैं गा लिंगाडासी॥
चोखा म्हणे देवा न कळे तुमची माव| आमुचा हा जीव पायीं असे॥
पंढरपुरात चंद्रभागेच्या पलिकडच्या तटावरूनच विठ्ठलाची भक्ती करणार्यार संत चोखामेळा यांची भक्तीची तर्हात अशी न्यारी होती. विठ्ठलाच्या भक्तीसाठी चोखामेळा यांनी जे काही भोगलं, त्याच्या कथा ऐकल्या, तरी अंगावर काटा उभा राहतो. केवळ त्यावेळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजात जन्म घेऊनही विठ्ठलाची निस्सीम उपासना करण्याचा ध्यास घेतल्यामुळेच चोखामेळा यांना आयुष्यभर समाजाचा जाच सहन करावा लागला. हा जाच केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक अत्याचारांचाही होता. त्याकाळच्या तथाकथित उच्च समाजानं चोखामेळा यांच्यावर निघृण सामूहिक हल्ले आणि अत्याचार केले. त्यांना बैलांच्या पायांना बांधून निर्दयपणे तुडवलं. अखेर त्यांचं राहतं घरही तोडलं आणि कोसळणार्याह तुळईखाली सापडूनच चोखामेळ्याचा अंत झाला.
चोखामेळा निघून गेले, त्यांच्याबरोबर त्यांची असामान्य आणि मातीतून फुललेली अभंग संपदाही नष्ट झाली. असं म्हणतात की, चोखामेळा सतत अभंगच गुणगुणत असत. पण त्यांच्या रचनांच्या ‘गाथा’ बनल्या नाहीत. केवळ निवडक अभंगच काय ते मागे उरले, तेही त्यांची पत्नी सोयराबाई आणि संतशिरोमणी नामदेव यांच्या प्रयत्नांमुळे. चोखामेळा यांची कहाणी हे भारतीय समाजात पूर्वापार चालत आलेल्या आणि देवाच्या पायाशीही निर्लज्जपणे उभ्या ठाकलेल्या उच्चनीच रुढी आणि त्याखाली पिचल्या गेलेल्या शेकडो दलित पिढ्यांचं दर्शन आहे. रौरवालाही मागे टाकेल, अशी दुर्गंधी या परंपरेला आहे. तशातही चोखामेळा ठामपणे उभे राहिले. त्यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळाबाई, बंका महार, कान्होपात्रा यांच्या सारख्या दलित प्रतिभावंतांनी ती परंपरा अबाधित राखून मराठी संत साहित्यात मोलाची भर टाकलीच, शिवाय दलितांच्या दुःखाची लक्तरं भर रस्त्यावर टांगली, हे महत्त्वाचं.
संत नामदेवांनी अनेकदा साक्षात विठ्ठलाविरुद्धच बंडखोरी केली. चोखामेळा यांच्यावर अनेकदा आरोप झाल्यामुळे आणि पीडा सहन कराव्या लागल्यामुळे त्यांनीही आपली दुःखद व्यथा अभंगांतून मांडलीच, तरीही त्यांचा भाव नामदेवांप्रमाणं बंडखोरीचा नव्हता. त्यांच्या शब्दांतून त्यांच्या मनावर झालेल्या जीवघेण्या वेदनाच प्रतिबिंबीत होतात. त्या अर्थानं चोखामेळा यांच्या रचना दुःखवाहक आहेत.
विठ्ठलभक्त म्हणून पंढरपूर पंचक्रोशीत चोखामेळा प्रसिद्ध होते. ते चोखोबा या नावानं ओळखले जात. बाह्मण आणि बडव्यांचा त्यांच्यावर राग असला, तरी गोरगरीबांचा अतीव लोभ होता. तरीही हा बहुजन समाज त्यांना अत्याचारांपासून वाचवू शकला नाही, हे दुर्दैव! चोखामेळा यांना तीन वेळा मारहाण झाल्याचे ठोस पुरावे वेगवेगळ्या तत्कालीन रचनांमधून सापडतात. असं म्हणतात की, चोखोबाची भक्ती अशी की, साक्षात देवालाही त्यांचा लोभ जडला. एकदा देव त्यांच्या झोपडीत जाऊन दही- भात खाऊन आले. दह्याचे डाग विठ्ठलमूर्तीवर सकाळी दिसल्यानं बडवे भडकले. चोख्यानं देवाला बाटवलं, असा आरोप करत त्यांनी बैलांच्या पायाला बांधून चोखामेळा यांना फरफटत नेण्याची शिक्षा फर्मावली. तिची अंमलबजावणीही झाली. त्या विषयीचं दुःख आणि राग नामदेवांनी शब्दबद्धही केला आहे.
पण या प्रसंगाचं सोयराबाईंनी केलेलं वर्णन डोळ्यात पाणी आणतं. त्या म्हणतात,
म्हणती या महाराने देव बाटविला|
जीवे मारा त्याला बैला जुंपा॥
बांधोनिया पाय हाकियेले बैल|
धरुनी शिवळ विठो उभा॥
उडती आसूड बैलांच्या पाठी|
मारितां हिंपुटी थोर झाली॥
तयाची ते कांता उभी राहूनियां|
म्हणे देवराया हा काढी॥
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार|
दुबळीचा भ्रतार मारूं पाहसी॥
पाळिलें पोसिले माझिया धन्यासी|
उतराई झालासी ओढावया॥
अन्नाची त्वां क्रिया नाही रे राखिली|
रांडकी त्वां केली चोखियाची॥
काढी हात आतां जाय परता उसण्या|
जाय पोट पोसण्या येथूनियां॥
सोयराबाईंचा राग असा अनावर होता. दुसर्याय प्रसंगात चोखामेळा यांच्यावर विठ्ठलाच्या कंठातला मौल्यवान हार चोरल्याचाच आरोप झाला. त्याची कथा अशी सांगतात की, विठ्ठलाची चोखोबांशी मंदिरातच भेट झाली. देवांनी आपल्या गळ्यातला कंठहार काढून तो चोखोबांच्या गळ्यात घातला. बडवे आणि पुजार्यांढनी चोखामेळा यांच्यावर मंदिरातील देवाच्या हाराची चोरी केल्याचा आळ घातला आणि त्यांना बेदम चोप दिला. मारहाण चालू असताना चोखामेळा विव्हळत होते आणि तरीही देवाचा धावा करतच होते. त्यातूनच प्रसिद्ध अभंगरचना जन्माला आली,
धांव घाली विठु आतां चालुं नको मंद|
मज मारिती बडवे कांहीतरी अपराध॥
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला|
शिव्या देऊनी मारा म्हणती देवा कां बटला॥
तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा|
अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा॥
कर जोडोनी चोखा विनवितो देवा|
बोलिलों उत्तर याचा राग नसावा॥
हकनाक मार खातानासुद्धा चोखोबा देवाचा अधिक्षेप करू इच्छित नाहीत, हा भाग महत्त्वाचा. ही मारहाण झाल्यानंतर चोखामेळा यांना पंढरपुरातून हद्दपार करण्यात आले. गावात आता तोंड कसं दाखवायचं, असा विचार करून चोखोबांनी चंद्रभागेच्या पलिकडच्या तटावर झोपडीवजा घर बांधलं. तिथूनच ते मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत विठुरायाची भक्ती करत राहिले. तिथंच त्यांनी एक दीपमाळही बांधली. ती १९६९पर्यंत उभी होती. नंतर मात्र ती कुणी तरी पाडून टाकली. चोखामेळा नावाच्या एका शापित संताची उरलीसुरली निशाणीही महाराष्ट्रसमाजानं मिटवून टाकली. पण त्याबद्दल ना कुणाला खंत ना खेद. आणखी एकदा चोखामेळा यांच्यावर सवर्ण समाजानं हल्ला केला. विठ्ठल मूर्तीच्या शेल्यात एकदा हाड सापडलं. ते चोखोबानंच ठेवलं, असा आरोप करून त्यांना मारण्यात आलं. हे असं होत राहीलं तेव्हा एकदा वैतागून चोखामेळा लिहितात,
असेंच करणें होतें तुला| तरी कां जन्म दिला मला॥
जन्म देवोनी सांडीलें| कांहो निष्ठुर मन केलें?॥
कोठें गेलां माझे वेळी| केलें कोणाचें सांभाळी॥
चोखा म्हणे देवा| नको मोकलूं केशवा॥
चोखामेळा जन्मानं महार. ही जात दलित असली, तरी त्यांची ख्याती प्रमाणिकपणाची. त्यामुळेच त्याकाळी जबाबदारीची रखवालीची कामं महारांना मिळत. तसंच मंदिर रखवालीचं काम चोखोबा करत होते. पण त्यामुळेच त्यांच्यावर अत्याचार आणि आरोप होत राहिले. त्यामुळेच एकदा वैतागून त्यांनी लिहिलं,
आता कोठवरी| भीड तुमची धरूं हरि॥
दार राखीत बैसलों| तुम्ही दिसे मोकलिलों॥
ही नीत नव्हे बरी| तुमची साजे तुम्हां थोरी॥
चोखा म्हणे काय बोलों| आमुचे आम्ही वायां गेलों॥
चोखामेळा यांना आपल्या जातीतील दुष्प्रवृती आणि व्यसनाधीनतेचा कमालीचा तिटकारा होता. महार समाजाच्या स्थितीचं वर्णन करताना त्यांनी या अपप्रवृत्तींवर हल्लाही चढवला. ‘येथे संग आहे दुर्जनांचा’, असं म्हणण्याचा स्पष्टवक्तेपणा त्यांच्या ठायी होता. चोखामेळा यांना संत नामदेवांबरोबरच संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, जनाबाई आदी ज्येष्ठ, प्रतिभावंत आणि ज्ञानी संतांचा निकट सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षाही रुंदावल्या. वेदनेनं विव्हळतानासुद्धा त्यांच्या तोंडून चांगले उच्चारच बाहेर पडले. आपल्या समाजाची स्थिती अशी नाही, याची वेदना त्यांना होती. म्हणूनच ते म्हणतात,
चहाड चोर जार भ्रष्ट ते साचें| हिनत्व जन्माचे पदरीं आहे॥
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों| बहु हे पीडिलों वियोगानें॥
चोखामेळा यांचं चरित्र हा दलित, शोषित समाजाच्या दुःखाचा हुंकार आहे. त्यांच्या रचनांमध्ये विठ्ठलाविषयी श्रद्धा, प्रीती आणि भक्ती आहेच, पण तिला समाजाच्या बहिष्काराची किनार आहे. ही किनार बोलकी आहे. पूर्वी बहिष्कृत समाजाचे लोक दारात यायचे आणि आणि ‘जोहार मायबाप जोहार’, अशा आर्त स्वरात करुणेची भीक मागायचे. तशीच चोखामेळा यांची ही रचना त्यांच्या मानसिक स्थितीचं दर्शन घडवते,
जोहार मायबाप जोहार| तुमच्या महाराचा मी महार॥
बहु भुकेला जाहलों| तुमच्या उष्ट्यासाठी आलों॥
बहु केली आस| तुमच्या दासाचा मी दास॥
चोखा म्हणे पाटी| आणिली तुमच्या उष्ट्यासाठी॥
एका इतक्या मोठ्या प्रतिभावंताला केवळ अन्नासाठी अशी याचना करायला लागावी, हे दारिद्य्र त्या समाजाचं नव्हे, तर तेव्हाच्या आणि आताच्याही सुशिक्षित, तथाकथित पुढारलेल्या आणि सवर्ण समाजाचं. चोखामेळा यांच्या संस्कारात राहिलेल्या सोयराबाईंच्या रचनाही तितक्याच मौल्यवान आणि शब्दकळा काळीज चराचरा फाडणारी,
देहासी विटाळ म्हणती सकळ|
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध॥
देहींचा विटाळ देहींच जन्मला|
सोंवळा तो झाला कवणधर्म॥
विटाळा वांचोनी उत्पत्तीचे स्थान|
कोण देह निर्माण नाहीं जगी॥
म्हणुनी पांडुरंगा वनितसे चोरी|
विटाळ देहांतरी वसतसे॥
देहाचा विटाळ देहीच निर्धारी|
म्हणतसे महारी चोखियाची॥
चोखामेळा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, बंका महार, संत कर्ममेळा ही सर्वच मंडळी जनरुढीचा मार खात ईश्वरभक्ती करत राहिली. त्यांना मंदिर प्रवेश वर्ज्य होता. तरीही विठ्ठलाचं रूप डोळ्यातच साठवून ते उपासना करत होते. ही त्यांची अमूर्त ईश्वरभक्तीच. त्यामुळेच ती अमूल्य ठरते. चोखामेळा यांचं निधन झालं, तेव्हा त्यांचं वय ७० असावं, असं अनुमान प्रा. देविदास इथापे यांनी काढलं आहे. याचा अर्थ त्यांना मोठं आयुष्य लाभलं. त्यांची सर्व अभंगसंपदा जतन झाली असती, तर त्यांच्या गाथांचे निश्चितच खंड झाले असते. पण दुर्दैवानं तसं झालेलं नाही. चोखामेळा यांना आपल्या उतारवयात परलोकीचा विचार ग्रासू लागला होता. त्यांना मृत्युचं भय नव्हतं. जगण्याची आसक्तीही नव्हती, पण खंत होती ती एकाच गोष्टीची; विठ्ठलाचं दर्शन नंतर होणार नाही याची. पांडुरंगरायाच्या वियोगाचं दुःख शब्दबद्ध करताना अखेरच्या चरणांमध्ये ते म्हणतात,
माझा तो समय निकट दिसे आला|
लेख तो लेखिला तैसें झालें॥
जन्मोनी पोसणा तुमचाच दास|
आता निकट सहवासी अंतरलों॥
उच्छिष्टाची आस सरलीसे दिसे|
प्रारब्धा सारसें वोढवलें॥
चोखा म्हणे माझा दंडवत पायीं|
करी आता साई कृपेची तूं॥