आध्यात्मिक मुक्ती ते भौतिक मुक्ती

शुद्धोदन आहेर

आजच्या पिढीचे आंबेडकरी अभ्यासक चोखोबांकडे कसं पाहतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. आंबेडकरी विचारांचा जागतिकीकरणानंतरच्या काळाशी सुसंगत अन्वयार्थ मांडणारे लेखक आणि त्यावर चर्चा घडवून आणणारे संघटक म्हणून शुद्धोदन आहेर यांची ओळख आहे. चोखोबा ते बाबासाहेब या स्थित्यंतराकडे आध्यात्मिक मुक्ती ते भौतिक मुक्ती या वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला हवं, अशी मांडणी त्यांनी केली आहे

मानव हा मुळात एक प्राणी आहे. जोपर्यंत हा मानवप्राणी निसर्ग सानिध्यात राहून उदरनिर्वाह करीत होता तोपर्यंत त्याचं जीवनमान हे जंगलातील इतर प्राण्यांसारखंच होतं. अन्नासाठी इतस्ततः भटकणं, त्यासाठी कठोर जीवनसंघर्षाला सामोरं जाणं आणि त्यापायी प्रसंगी प्राणाला मुकणं या सगळ्या प्रक्रियेतून मानवप्राणी गेलेला आहे. तत्कालिन जीवनात मानवी समाजाला एक स्वाभाविक नैसर्गिक सुरक्षितता होती. आज एक समाज म्हणून आपण सर्वजण एका सामायिक मानवी संस्कृतीचे निर्माते, वाहक असलो तरी, मानव मुळात एक प्राणी आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

यथावकाश मानव प्राण्यानं निसर्गाशी झुंजत आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. टोळीतून विकसित होता होता शिकार आणि वस्तुविनिमय करता करता मानवी समाजातील स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. त्यामुळं मानवी समाज स्थिरावला. पुढे चलनाच्या शोधामुळं व्यापार विनिमय वाढला, साम्राज्यं उदयास आली, लोप पावली. या प्रक्रियेत कालौघात निर्माण झालेल्या विविध कारणांमुळं मानवी समाजातील विविध गटांचं विघटन, पुनर्घटन, पुन्हा विघटन पुनर्घटन होत राहिलं. मात्र, मानव पुन्हा निसर्गाकडे गेला नाही.

तथापि, या प्रक्रियेत मानवानं आपली नैसर्गिक सुरक्षितता गमावली. या नैसर्गिक सुरक्षिततेची जागा एका असुरक्षिततेनं घेतली. या असुरक्षिततेतून आलेल्या दुःखाने मानवी समाजाचं अवघं आयुष्य व्यापून टाकलं आहे. मानवी समाजाचे सगळे प्रयत्न या असुरक्षिततेवर म्हणजेच दुःखावर मात करण्याचेच आहेत. मानवी मुक्तीचा खरा अर्थ या दुःखावर मात करणे, असाच आहे.

मानवी समाजाच्या इतिहासात दोन मुक्ती संभावतात. पहिली आहे आध्यात्मिक मुक्ती तर दुसरी आहे भौतिक मुक्ती. संतांच्या कामगिरीचा आणि समकालीन समाजाच्या प्रश्नांचा वेध घेताना या दोन्ही मुक्तींचा कालखंड, बलस्थानं, मर्मस्थानं आणि कालसुसंगतता पाहणं उद्बोधक ठरावं.

आध्यात्मिक मुक्ती म्हणजे काय? आपल्या दुःखाला आपण स्वतः म्हणजेच आपले स्वतःचे विकार जबाबदार आहेत, असं समजून आपल्या विकारांवर मात करणं म्हणजे आध्यात्मिक मुक्ती मिळविणं. उदाहरणार्थ, समजा एक भव्य असा बंगला आहे. तो पाहिल्याबरोबर मनात इच्छा निर्माण होते की मला हा बंगला मिळायला हवा. ही इच्छा आसक्तीतून निर्माण झालेली आहे, हे उघड आहे. आपल्या स्वतःच्या मनात असलेली ही आसक्ती निव्वळ बंगल्यापाशीच थांबेल, असं समजणं अज्ञपणाचं ठरेल. ही आसक्ती कोणत्याही बाह्य गोष्टींबाबत निर्माण होऊ शकते, तिला काही अंत नाही. याबाबतीत आपलं मन हे अगदी लहान मुलांसारखंच वागत असतं. लहान मुलालाही एखादं खेळणं हवंहवंसं वाटतं. मात्र ते खेळणं मिळाल्यावर थोड्याच वेळात त्याला दुसरं खेळणं हवंहवंसं वाटतं. त्यामुळे होतं असं, की तो बंगला मिळाला नाही तर दुःख होतंच होतं, परंतु जरी तो बंगला मिळाला तरी काही काळानं आणखी काही वेगळ्या गोष्टींची इच्छा निर्माण होते आणि त्यातून माणूस पुन्हा दुःखी होतो. म्हणजे बंगला अथवा कोणतीही बाह्य वस्तू हे केवळ निमित्त आहे. मूळ कारण आहे आपल्या मनातील आसक्ती! या आसक्तीच्या विकारावर मात केली, की मग कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे इच्छा निर्माण होत नाही आणि त्यापायी दुःखी होण्याचा प्रश्नही निकाली निघतो. ही आहे आध्यात्मिक मुक्ती! या मुक्तीचा कोणत्याही देवाधर्माशी संबंध नसून केवळ आपल्या स्वतःच्या विकारांच्या निर्मूलनाशी संबंध आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेतल्यावर कोणत्याही धर्माच्या नावानं आध्यात्मिकता खपवू पाहणारे हे मानवी समाजाच्या असुरक्षिततेचा गैरफायदा घेऊन कसा भामटेपणा करीत आहेत, हे सहजच समजून येतं.

मानवी समाजात औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी निर्माण झालेल्या सर्वच धर्मांनी, धर्मसंस्थापकांनी आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. आपल्या मध्ययुगीन संतांचा कालखंडसुद्धा औद्योगिक क्रांतीपूर्व असल्यामुळं त्यांनीदेखील आध्यात्मिक मार्गानेच दुःखाची कारणमीमांसा केली आहे. त्याच मार्गानं दुःखमुक्तीचा उपदेश केला आहे. उदाहरणार्थ संत चोखामेळा म्हणतात, मी पूर्वजन्मी देवाची निंदा केली म्हणून या जन्मी मी तथाकथित नीच समजल्या जाणार्याी जातीत जन्माला आलो. म्हणजे संत चोखामेळा आपल्या पूर्वास्पृश्य जातीत आणि त्या जातीत जन्माला आल्यामुळं भोगाव्या लागणार्याल दुःखाचं कारण पूर्वजन्मात केलेले पाप आहे, असं समजतात. म्हणजेच दुःखाचं कारण स्वतःमध्ये शोधतात! ज्या जातजन्य दुःखाचं कारण स्वतःमध्ये असेल तर त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी स्वतःलाच विकारमुक्त करणं गरजेचं आहे. म्हणून भक्तीच्या माध्यमातून स्वतःला विकारमुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न चोखामेळा यांनी केला. परंतु जशी रामायणातील शूद्र शंबुकाची आध्यात्मिक मुक्ती अयोध्येतील मृत बालकाच्या ब्राह्मण पित्याला आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाला धोकादायक वाटली तशीच चोखामेळा यांची आध्यात्मिक मुक्तीची वाटचालदेखील तत्कालिन ब्राह्मण पुरोहितांना आणि त्यांच्या लंपट राज्यकर्त्यांना धोकादायक वाटली असणार, हे निःसंशय! म्हणूनच ‘चोखा डंगा परि भाव नाही डोंगा’ अशी काळीज पिळवटून टाकणारी आर्त वेदना शब्दबद्ध करणारा हा बंडखोर संत मंगळवेढ्याच्या बुरुजांत जिवंत गाडला गेला. संत चक्रधरांचं शिष्यत्व पत्करणार्याि एका प्रवचनकार चांभारालादेखील चुनखडीच्या खड्ड्यात बसवून आणि वरून त्या खड्ड्यात पाणी सोडून असह्य यातना देत ठार मारण्याची शिक्षा देवगिरीच्या राजा रामदेवरायाच्या प्रधानानं, हेमाद्री पंडितानं दिली होती. पुढे संत तुकारामांचीसुद्धा हत्या केल्याचं डॉ. आ. ह. साळुंखे सांगतात. कुणबी तुकारामाची हत्या होत असेल तर पूर्वास्पृश्य चोखामेळा यांना जिवंत गाडणं सहजच शक्य आहे! अशातर्हे नं या देशातील शूद्रादिअतिशूद्रांनी आध्यात्मिक मुक्तीदेखील रक्त सांडवूनच मिळविली आहे. युरोपमध्ये १८व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर भौतिक मुक्तीचा उदय झाला. भौतिक मुक्ती म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि उदरनिर्वाहाचं साधन या पंचधर्माची सन्माननीय प्राप्ती म्हणजे भौतिक मुक्ती. औद्योगिक क्रांतीमुळं उपरोक्त ‘पंचधर्म’ सर्व जनतेला प्राप्त होण्याची शक्यता दृष्टीपथात आली, मात्र अद्यापही ती वास्तवात आलेली नाही. सर्व अभावग्रस्त जनतेचा संघर्ष हा आजच्या काळात अपरिहार्यपणे भौतिक मुक्तीशी जाऊन भिडतो.

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचा कालखंड हा औद्योगिक क्रांतीनंतरचा असल्यामुळं ते भौतिक मुक्तीच्या दृष्टिकोनातून जातिसंस्थानिर्मूलनाकडे बघतात. भौतिक मुक्तीच्या काळात दुःखाचं कारण स्वतःच्या विकारांत न शोधता बाह्य सामाजिक परिस्थितीमध्ये शोधलं जातं. म्हणून तर डॉ. आंबेडकर आपल्या जातजन्य दुःखाचं कारण बाह्य जातीसंस्थेमध्ये शोधतात आणि त्याप्रमाणं तर्कशुद्ध मांडणी करतात. चोखामेळा यांच्या पूर्वजन्मी देवाची निंदा केल्याच्या आध्यात्मिक कारणापेक्षा हे कारण पूर्णपणे वेगळं आहे, हे ध्यानात घ्यायला हवं.

भौतिक मुक्तीच्या काळात आपल्या दुःखाला बाह्य समाजव्यवस्था जबाबदार असल्यानं ती समाजव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय, किमानपक्षी बदलल्याशिवाय, दुःखमुक्ती मिळणं असंभव होय. म्हणून तर डॉ. आंबेडकर बाह्य जातिसंस्था संपवण्याचा कार्यक्रम देतात. या बाह्य जातिसंस्थेच्या समर्थनार्थ कोणताही नेता उभा राहिल्यास त्याची कोणतीही भीडभाड न ठेवता ते त्याची वैगुण्यं आक्रमकपणे मांडतात. या संदर्भात आंबेडकर गांधी संघर्षाकडे पाहिल्यास थोडंफार सत्याजवळ जाता येतं. गांधींचा जातीप्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आध्यात्मिक होता तर डॉ. आंबेडकरांचा भौतिक. त्यामुळे गांधी – आंबेडकर संघर्षात कालसुसंगत भूमिका कोणाची आहे, असा प्रश्न उद्भवल्यास त्याचं उत्तर नि:संशयरित्या डॉ. आंबेडकर असंच आहे.

या पार्श्वभूमीवर ‘विपश्यना’ समजून घेणं अधिक सुलभ जाईल. हल्ली हल्ली आंबेडकरी समाजात विपश्यना समर्थक आणि विपश्यना विरोधक असे दोन गट पडल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. या दोन्ही गटांत अनेक महानुभाव असल्यानं सर्वसामान्य माणूस गोंधळला आहे. विपश्यना ही साधना तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीशी निगडीत आहे. तथागतांचा काळ हा औद्योगिक क्रांतीच्या अगोदरचा असल्यानं विपश्यना ही आध्यात्मिक मुक्तीची साधना आहे, हे स्पष्ट होतं. नुकतेच कालवश झालेले विपश्यनाचार्य गोयंका गुरूजी हेसुद्धा विपश्यना ही आध्यात्मिक साधना आहे, असंच निक्षून सांगत. त्यामुळं या आध्यात्मिक साधनेकडून भौतिक मुक्तीच्या प्रश्नांची उत्तरं मागणारे आपल्या ऐतिहासिक अज्ञपणाचं प्रदर्शन करीत असतात. याउलट विपश्यना सरसकट नाकारणारे मानवी इतिहासात आध्यात्मिक मुक्तीनं दिलेले योगदान नाकारुन सत्याशी फारकत घेत असतात. ‘बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’ या ग्रंथराजात डॉ. आंबेडकरांनी आजच्या भौतिक मुक्तीच्या काळात विपश्यना या आध्यात्मिक साधनेच्या मर्यादा जशा स्पष्ट करतात तसंच तथागतांनी ध्यान-समाधी केल्याचेही दाखले देतात. त्यामुळे डॉ. आंबेडकरांना आध्यात्मिक आणि भौतिक मुक्तीच्या कालसुसंगत गरजांची जाणीव असल्याचं सिद्ध होतं. ही जाणीव सर्वच भारतीय समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

प्रश्न असा आहे, की आध्यात्मिक आणि भौतिक मुक्तीचा परस्परसंबंध आहे काय, असल्यास कसा? तथागत गौतम बुद्ध यांनी प्रतिपादन केलेल्या ‘अनित्यता’ या तत्त्वानुसार, आध्यात्मिक आणि भौतिक यांनी कार्यकारणभावाच्या आधारे परस्परांत रूपांतरीत होणं अभिप्रेत आहे. त्यामुळे निव्वळ आध्यात्मिक किंवा निव्वळ भौतिक अशी एकांगी भूमिका घेणं अनुचित ठरेल. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे भौतिक सुखसुविधा ओसांडून वाहत आहेत त्यांपैकी काही जण केदारनाथ, मानस सरोवर, मक्का मदिना, बोधगया सारनाथ, श्रावणबेळगोळ, व्हॅटिकन सिटी इत्यादी धार्मिकस्थळांना विलक्षण आनंदानं आणि ओढीनं भेट देत असल्याचं आपण पाहातो. म्हणजेच भौतिक मुक्ती मिळूनही ही मंडळी असुरक्षित आहेत. या असुरक्षिततेवर मात करण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थानांना भेटी देऊन आध्यात्मिक मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात. अर्थात आध्यात्मिक मुक्तीचा खरा मार्ग हा आपल्या स्वतःच्या विकारांवर मात करण्याचा आहे, या वस्तुस्थितीशी त्यांतील बहुतेकांना काहीही देणंघेणं नसल्यानं त्यांना सुरक्षितता म्हणजेच मुक्ती मिळण्याची सूतराम शक्यता नाही.

ज्यांना भौतिक मुक्ती हवी आहे त्या अभावग्रस्तांपैकी काही जणदेखील भौतिक सुखसुविधा मिळविण्यासाठी अक्षरक्षः काहीही करायला तयार असल्याचंही आपण पाहातो. त्यासाठी फसवणूक, लुबाडणूक, चोर्याामार्यास, खूनखराबा असं काहीही करण्यास ही मंडळी तयार असतात. त्यात बरेचजण फसतात पण काही यशस्वी होताना पण दिसतात. मात्र जरा त्यांच्या मनात डोकावून पाहण्याची संधी मिळाल्यास तेथे अपराधीपणाची भावना आणि त्यापोटी येणारे विकार यांचंच कुदर्शन झाल्याशिवाय राहाणार नाही. सबब त्यातून सुटका मिळवण्यासाठी ही मंडळी धार्मिक स्थळांना भेटी देऊन भरपूर दानदक्षिणा करून, संपत्तीचं प्रदर्शन करून, समाजात दानशूरपणाचा आव आणून अपराधगंड दूर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र खर्याड अध्यात्माशी त्यांचा दुरान्वयानंही संबंध नसल्यानं त्यांनादेखील सुरक्षितता म्हणजेच मुक्ती मिळण्याची सूतराम शक्यता नाही.

उपरोक्त विवेचन विचारात घेता, डॉ. आंबेडकरांनी ‘बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’ या ग्रंथराजात स्वीकारलेला ‘सम्यक’ मुक्तीचा मार्ग आजच्या काळात सर्वच भारतीयांना उपयुक्त ठरू शकेल, असं मला वाटतं.

0 Shares
परि भाव नोहे डोंगा परिवर्तनाचा अग्रदूत