अमर अगाध अभंग

अप्पासाहेब पुजारी

चोखोबांचे अभंग काळाला जिंकून अमर झाले आहेत. त्यातलं बंडखोरीचं स्फुल्लिंग बावनकशी आहे. मराठी साहित्यात त्याला तोड नाही. सांगत आहेत चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबीयांची अभंगगाथा आधुनिक रूपात मांडणारे अभ्यासक आप्पासाहेब पुजारी.

‘चोखोबांची अभंगगाथा’ ही मराठी सारस्वताला मिळालेली अतुलनीय आणि अलौकिक देणगी आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतर रचना केल्याचा आज तरी स्पष्ट खुलासा होत नाही. आज त्यांचे केवळ ३५८ अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकानं त्यांचे नव्यानं उपलब्ध झालेले ९ अभंग गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.

चोखोबांनी ‘विवेकदीप’ नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्यनिर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्ने निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहितावाचता येत होतं का? एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असं वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते. मग या सर्वांचं वाचन चोखोबा कसं करीत असत? ज्ञानदेव, नामदेव आणि इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील? सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचं दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसं करू शकले?

एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार आणि अमरत्व प्राप्त झालेलं साहित्य चोखोबांनी कसं निर्माण केलं, हाही एक मोठा प्रश्नेच आहे. सातशे वर्षांपासूनचं जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणार्या् लेखकाकडे, चोखोबांकडे, अगाध आणि अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्याव्यतिरिक्त त्यांचं चिंतन आणि मनन हे अधिक महत्त्वाचं वाटतं. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती त्यांना सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे आणि मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असं वाटतं. कारण त्यांच्या अभंगांचं विश्लेेषण करतेवेळी याचं दर्शन प्रकर्षानं झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव आणि नामदेव आदी संतांच्या सोबतीनं पुष्कळसं देशाटन आणि तीर्थाटन केलं. त्यामुळे अनेक संतांचा आणि सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असं वाटतं. त्यांना लिहितावाचता येत नव्हतं हे गृहीत धरून पुढे लिहायचं झालं, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी त्या संतांच्या मुखातून बाहेर पडत त्याच वेळी त्यांचा अर्थ आणि मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असावा. अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.

चोखोबांना आपल्या साहित्यनिर्मितीत संतांचा हा सहवास अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पद्धतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना दूर लोटलं असलं तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केलं होतं. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीनं संतमेळ्यात त्यांनी फार मोठं स्थान प्राप्त करून घेतलं होतं. ज्ञानदेव आणि नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानानं आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंगरचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होतं, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंगरचना केली असावी, असं गृहीत धरलं तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी, असं वाटतं. परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता आणि त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही.

चोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचं स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. ‘वाणी नाही शुद्ध धड न ये वचन’, असं त्यांचं मत होतं. यावरून असं दिसतं की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिद्धांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता. चोखोबांच्या अभंगांत भक्तीविषयक आणि पारमार्थिक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैतअद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचं, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचं, करुण स्वभावाचं गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसंच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वअर आणि नामदेवांचं वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.

ज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. तत्कालीन समाजानं हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचं स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचं मुक्त कंठानं गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.

ज्ञानेश्व रांच्या समकालीन संतकवी आपले अभंग रचायचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पद्धती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतरानं त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी आणि लेखनिकांनी ते अभंग उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडलं आहे. त्या काळी बिंदुमाधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान राहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचं लेखन केल्याचा उल्लेख जनाबाईंच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.

चोखोबांच्या मरणोत्तर ७५० वर्षांनंतर देखील त्यांचे ३५८च्या आसपास अभंग आज ग्रंथरूपानं शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचं मोठं भाग्य समजावं. एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचं वारंवार लेखन झालं नसावं. ज्ञानदेव, नामदेव आणि तुकारामांच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंगरचनेच्या संदर्भात असं घडलं नसावं. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. मला मिळालेल्या एका हस्तलिखितात चोखामेळा हे नाव चोखामेला, असं लिहिलं आहे. याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारांमुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.

चोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमकं काय सांगायचं होतं तेच अनंतभट्टांनी उतरून घेतलं कशावरून? त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून? वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण, अनंतभट्ट, चोखोबांच्याकडे जातो हे किती पुरोगामी पाऊल होते! या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळलं असावं, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीतदेखील टाकलं असावं. हे सर्व सहन करूनदेखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचं लेखन केलं यात चोखोबांप्रमाणं अनंतभट्टदेखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचं अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणलं असावं. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केलं असावं. दुसरं असं की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का? इतक्या शतकांनंतरदेखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचंदेखील योगदान निश्चिातच महत्त्वाचं आहे.

प्रत्येक महापुरुषानं आपापल्या काळात महान काम केलं म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हानं होती, त्या आव्हानांना समर्थपणे ते सामोरे गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखलं जातं आणि काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केलं जातं, परंतु असं होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तशी समाजासमोरील आव्हानंदेखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असंच काहीसं झाल्यासारखं वाटतं. चोखोबांच्या काळी आव्हान होतं ते समाजातील उच्चनीचतेचं, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचं समजणार्यांसकडून होणार्यान अमानुष छळाचं आणि मुख्य प्रश्न‍ होता तो कमालीच्या दारिद्य्राचा. या सर्व प्रश्नां विषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटलासमोर म्हणजे आजच्या भाषेत सरकारसमोर आपलं गार्हाुणं मांडलं आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होतं हे महत्त्वाचं. चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबियांचं हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजलं तर ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सहभागी होणं आणि अन्यायाविरुद्ध लढा देणं, ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढंच म्हणावं लागेल.

आपल्या ज्ञानाचं सामर्थ्य सिद्ध करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचं स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांमध्ये वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणं पुढे करून चोखोबांचा छळ दंडुकेशाहीच्या आधारे केला. प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड केल्यानं अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले समाजात रग्गड सापडतात.

प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकावली आणि या झेंड्याखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते. चोखोबादेखील आपले अभंग घेऊन या बंडाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजानं मानलेल्या उच्चकुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणिक वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचं प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव आणि नामदेवांनी खतपाणी घातलं, हे कौतुकाचं आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा आणि आपुलकी निश्चिततच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसानं आणि जिद्दीनं सहभागी झाले होते. कथित हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचं जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केलं तितकंच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून संतांच्या कार्यात मनोभावे सामील होऊन चोखोबांनी केलं.

अभंगांतून डोकावणारं चोखोबांचं व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचं होतं. प्रस्थापित समाजानं त्यांना कितीही छळलं तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतरदेखील आजही टवटवीत वाटते.

परंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारायलाच हवं होतं, असंही मत व्यक्त केलं जातं. तेव्हा चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असं वाटतं. अन्यायाविरुद्ध त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे, असं त्यांचे अभंग बारकाईने वाचून काढले तर समजतं. क्षमागुणातून कोणत्याही बलाढ्य ताकदीला सहज जिंकता येतं या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.

0 Shares
समानधर्मा चोखोबांचा काळ