संतकाव्य समाजाला प्राणवायू पुरवतात, या धारणेनं निर्मलकुमार फडकुले यांनी अखेरपर्यंत संतांचे विचार आपल्या ओघवत्या लेखणी-वाणीतून समाजापर्यंत पोहोचवले. प्रबोधनाची पताका खांद्यावर घेतलेल्या या वारकर्यापनं संत चोखामेळ्यावर अत्यंत हृदयस्पर्शी लिहिलं. चोखोबांचा प्रत्येक अभंग म्हणजे चोखोबांनी गाळलेला एकेक उष्ण अश्रू आहे. चोखोबांची कविता अटळ दु:ख वेदनेनं वेढलेली कविता आहे. चोखोबांची कविता म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचं काळवंडलेलं पान आहे, असं दाहक सत्य ते या लेखात सांगतात.
चोखामेळा हे ज्ञानेश्व र आणि नामदेव यांना समकालीन असलेले भक्त आणि कवी. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे हे त्यांचं गाव, पण पंढरपुरातच त्यांचा बराच काळ गेला. त्यांच्या जन्मदिनांकाची नोंद इतिहासात नाही. मृत्यूचा दिनांक मात्र नोंदलेला आहे. वैशाख वद्य पंचमी शके बाराशे साठ म्हणजे सन १३३८. मंगळवेढ्याला गावकुसाचं बांधकाम करीत असताना ते अंगावर कोसळून चोखोबांना मृत्यू आला. या संत कवीची जीवनकहाणी कारुण्यानं अंतर्बाह्य भिजलेली आहे. चोखोबा महार होते. शूद्राला समाजाच्या चौकटीत सर्वात कनिष्ठ स्थान आमच्या शास्त्र पुराणांनी दिलं होतं. एकच देव सर्व विश्वा ची निर्मिती करतो. हे मान्य करूनही काही विषमतावादी शास्त्रांनी परमेश्वकरानं चार वर्ण निर्माण केले, असं मानलं आहे. त्यांच्या मते ब्राह्मण हा ईश्व्राच्या मुखातून, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांडीतून तर शूद्र हा पायापासून निर्माण झाला. म्हणजे ब्राह्मण हे मस्तक तर शूद्र म्हणजे पाय किंवा पायाखालचे असा अजब तर्कवाद लढवला गेला. शास्त्र लिहिणारे ब्राह्मणच होते. तेव्हा त्यांनी आपलं स्थान सर्वोच्च महत्त्वाचं आहे हे पुन्हा पुन्हा घोषित करावं यात आश्चपर्य नाही. शूद्र आणि अतिशूद्र यांना गावात राहायला बंदी करण्यात आली. त्यांनी गावाबाहेर राहून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची चाकरी करावी, सगळी हलकी समजली जाणारी कामं त्यांनी करावीत, अशी तरतूद करण्यात आली. समाजजीवनात शूद्र वर्गाला जागा नव्हती. उपेक्षा आणि तिरस्कार, उपासमार आणि वेदना, बहिष्कार आणि अन्याय हे शूद्रवर्णाच्या जीवनाचे घटक होते. संत चोखोबांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे,
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वाोन |
तैसा मी एक दीन आहे तुमचा ॥
चोखा म्हणे मी एका घासाची भाकरी |
करितो मी द्वारी तुमचिया |
हा अभंग उद्धृत करताना आज माझ्या मनाला वेदना होतात. संकोच वाटतो. लाजेनं मान खाली जाते. पण हा अभंग उच्चारताना आणि स्वतःला ‘उच्छिष्टाची आशा करणारा श्वाहन’ म्हणवून घेताना संत चोखोबांच्या मनाची काय अवस्था झाली असेल? चोखोबांना हे उद्गार काढावे लागले हेच धर्म आणि संस्कृती यांचं अधःपतन आहे. माणसासारखा माणूस भाकरीसाठी लाचार बनतो आणि त्याला आमची समाजव्यवस्था लाचार बनवते हे चित्र ओंगळ, असंस्कृतपणाचं आहे. चोखामेळा यांचा अपराध काय होता? ते महार होते? ते शूद्र होते, हाच ना? ब्राह्मणाचा सद्गुण कोणता? तो ब्राह्मणाच्या घरी जन्मला हाच ना? जन्म हा श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचा निकष मानणं हे किती हास्यास्पद आहे, याचं स्पष्टीकरण करण्याचं कारण नाही. कोणत्या अर्थानं संत चोखामेळा कनिष्ठ होता? विद्येची परंपरा नसलेल्या झोपडीत जन्म होऊनही तो उत्कट भावकवी झाला. त्याच्या कवितेत जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, भक्तीचा उद्रेक आहे. कवित्वात प्रसाद आणि माधुर्य हे गुणधर्म आहेत. आपल्या दु:खांचा आणि आकांक्षांचा अत्यंत वास्तव आविष्कार त्यांच्या काव्यात आहे.
ज्ञानेश्विर आणि नामदेव यांच्या इतकीच त्याच्याही मनात भक्तीविचारांची उदात्तता आहे. तीनशेपेक्षा अधिक अभंग लिहून मराठी अभंग काव्याला चोखोबांनी समृद्ध केलं. निढळाच्या घामावर जगणारा हा कष्टकरी कवी आणि संत हे महाराष्ट्र संस्कृतीचं एक लेणं आहे. पण त्यांची योग्यता ओळखणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक तत्कालीन समाजात होते. तेराव्या शतकातले काही संत त्याचा आदर करीत होते. पण ते देखील अस्पृश्याच्या पदरात न्याय टाकू शकत नव्हते. परंपरेच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याची राहोच पण बोलण्याचीही शक्ती कोणात नव्हती. त्यामुळं गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई, कान्होपात्रा, भागू, सोयराबाई, निर्मळा, कर्ममेळा आणि बंका आणि अन्य कित्येक खालच्या स्तरातले भक्त कवी उपेक्षेच्या चरकात पिळले जात होते. यांच्या अश्रूंची दखल कोणत्याही शंकराचार्यानं घेतली नाही. उलट त्या काळातले धर्ममार्तंड विषमता ही ईश्वतरप्रणीत आहे, असं सांगून तिचं समर्थन करीत होते.
संत चोखामेळा यांचं संपूर्ण कुटुंब कवींचंच होतं. चोखोबांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणा बंका विठ्ठलाचं नामस्मरण आणि भजन करीत काव्यरचना करीत होते. विठ्ठल हाच त्यांना आधार होता. त्यांच्या नामसंकीर्तनातच त्यांना थोडाफार आशेचा आणि आनंदाचा अनुभव येऊ शकत होता. संत चोखोबांपासून कुटुंबातल्या सर्वांनीच प्रेरणा घेतली होती. चोखोबांना संत नामदेवांची अनेक कीर्तनं ऐकायला मिळाली. चंद्रभागेच्या वाळवंटात शेकडो भक्तांच्या मेळाव्यात एका कोपर्याखत बसून नामदेवांची रसाळ वाणी त्यांनी कानामनात साठवून ठेवली. ज्ञानेश्वचर माऊली (चोखोबांनी ज्ञानेश्ववरांचा उल्लेख माऊली असाच केला आहे) त्यांना पंढरीतच भेटली. अमृतालाही पैजेवर जिंकणारी ज्ञानेश्वखरांची मराठी भाषा चोखोबांनी आसुसलेल्या मनानं ग्रहण केली.
चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्ञानेश्वार आणि चोखामेळा हे ब्राह्मण आणि महार एकमेकांना उराउरी भेटत होते. भक्तीच्या वातावरणात भेदाला जागा नव्हती. सातशे वर्षांपूर्वी समतेची आणि ममतेची सुंदर अक्षरं या दोन संतांनी चंद्रभागेच्या तीरावर लिहून ठेवली. नामदेवांचं कीर्तन हा देखील समत्व विचाराचा वस्तुपाठ होता. अठरापगड जातीजमातीचे लोक कीर्तनाला एकत्र येत होते. तेव्हा कोणालाही जात आठवत नसे. एका अर्थानं ही समतेची अंधुक पहाट उगवायला सुरुवात झाली होती. भक्तीच्या क्षेत्रातली ही क्रांती होती. ही सामाजिक क्रांती मात्र नव्हती. शास्त्र आणि परंपरा यांना वळसा घालण्याचा हा प्रकार होता. भक्तीच्या क्षेत्रातली ही समता सामाजिक क्षेत्रात मात्र येऊ शकली नाही. समाजजीवनात ठाण मांडून बसलेली विषमता, कूळ, वंश आणि जात यांचं वर्चस्व कायम राहिलं. संतांचा मार्ग समतेचा होता यापेक्षा अधिक तो ममतेचा होता. भूतदयेचा होता. पण त्यांनासुद्धा विषम सामाजिक व्यवस्था उखडून टाकता आली नाही. तसा प्रयत्नही त्यांनी केला नाही. संत एकनाथांनी नदीच्या वाळवंटावर उन्हात कासावीस झालेल्या महाराच्या पोराला कडेवर घेऊन महारवाड्यात पोचवल्याची कथा आहे. ही त्यांच्या वत्सल मनाची साक्ष देते. सामाजिक विषमतेला त्यांनीही उत्कटतेनं विरोध केला असं दिसत नाही. संत चोखामेळा आणि संत तुकाराम यांच्या काव्यात विषमतेवर जसे तीव्र प्रहार त्यांनी केले आहेत तसा आवेगपूर्ण विचार अन्य संतकाव्यात आढळत नाही. संत रामदासांनी तर वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं आहे.
पण भक्तीच्या मार्गात जातीयतेला स्थान मिळू नये या दृष्टीनं संतांनी केलेलं कार्य महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक सुधारणावादाच्या चळवळीला संतांच्या कार्यामुळं वैचारिक बळ मिळत गेलं हा इतिहास आहे. ज्ञानेश्वैर आणि एकनाथ हे संत सोडले तर अनेक संत आणि कवी बहुजन समाजातून आणि दलित, उपेक्षित समाजातून उदयाला आलेले आहेत. वारकरी पंथानं सामान्य माणसाला आधार दिला. त्याच्या मनातून यातीहीनत्वाची न्यूनगंडात्मक जाणीव काढून टाकली. भक्तीयोग आणि कर्मयोग यांचा त्यानं समन्वय करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी आदर निर्माण केला. याचा परिणाम होऊन सामाजिक दृष्ट्या खालचे समजले गेलेले लोकस्तर जागे झाले. तेही आत्मविश्वाासानं लिहू लागले. आपली सुख-दुःखं व्यक्त करू लागले. अशिक्षित स्त्रियादेखील लेखनातून आत्मविष्कार करू लागल्या. वारकरी पंथांचं हे कार्य पुरोगामी स्वरूपाचं आहे यात कसलीही शंका नाही. क्रांती हा शब्द व्यापक अर्थाचा द्योतक आहे. त्या अर्थाला मर्यादा घातली आणि वारकरी संतांचा काळ आणि त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली तर क्रांतीच्या दिशेनं संतांनी महत्त्वाचं पाऊल टाकलं, असंच विधान करता येईल.
महानुभाव पंथानं यापूर्वी जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चक्रधर स्वामींनी वर्णरहित समाजाची भूमिका मांडली होती. त्यांचे आचार – विचार क्रांतिकारक होते. पण महानुभाव पंथ सर्वसामान्य माणसाशी समरस होऊ शकला नाही. वारकरी पंथाच्या तुलनेत त्याला लोकाश्रय फार कमी मिळाला. नामदेव, तुकाराम जसं लोकांचं भक्तिमार्गात नेतृत्व करीत होते तशा उंचीचा लोकाभिमुख संत महानुभाव पंथात आढळत नाही. म्हाईंभंट, नागदेवाचार्य, केशवराजसूरी वगैरे विद्वान पंडित या पंथात झाले. महानुभवीयांनी मराठी भाषेचा ध्वज उंच उचलून धरला. महाराष्ट्रप्रेमाचा घोष केला. पण लोकांत मिसळण्यासाठी जी वृत्ती लागते ती त्यांच्यात कमी पडली. महानुभवीय पंडितांचा विचार पुरोगामी असूनही तो लोकांत पसरु शकला नाही.
वारकरी पंथानं मात्र लोकप्रबोधनाचं कार्य ज्ञानेश्वीरांपूर्वीपासून अखंड चालू ठेवलं होतं. समाजातल्या कनिष्ठ वर्गाशीही त्यांचा सतत संवाद होत होता. किंबहुना ब्राह्मणांपासून स्त्री-शूद्रांपर्यंत हा पंथ प्रसार पावत गेला. भक्ती, करुणा आणि ‘भेदाभेदभ्रम अमंगळ’ ही समतेची शिकवण यामुळं महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीला आधार आणि आकार देणारा एक प्रमुख धर्मपंथ म्हणून या भागवत संप्रदायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. आजही भक्तिपंथ, पंढरीचा विठ्ठल आणि आषाढी, कार्तिकी वारी यांना महाराष्ट्र जीवनात प्राप्त झालेली महती कायम आहे. पंढरपूरच्या वारीत केवळ भोळेभाबडे वारकरी सामील होतात असं नाही. सुशिक्षित, उच्चविद्यासंपन्न भक्तिमार्गी जनतेचाही या वारीत सहभाग असतो. वारकरी कीर्तन ऐकताना नामघोष करीत नाचणारे वैष्णव पाहिले म्हणजे भक्तिभावनेच्या लाटा किती प्रचंड असतात याची कल्पना येते. ईश्विरभक्ती शुद्ध बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहता येत नाही. ती अंतःकरणाची ओढ आहे. या भक्तीच्या बळावरच तुकोबांसारखा संत म्हणाला, ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठिण वज्रासी भेदू ऐसे’. जन्मभर उपेक्षित आणि अपमानित अवस्थेत राहिलेले चोखामेळाही म्हणतात,
ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल | नाके काळ वेळ जपे आधी ॥
चोखा म्हणे मज भरवसा नामाचा | येणे कळिकाळाचा भेव नाही ॥
भक्तिरसाची एक वादळलाट वारकरी पंथानं महाराष्ट्रात आणली. पण भक्तीबरोबरच समतेचा विचार सर्व जीवनव्यवहारात या पंथानं आणला नाही. त्यामुळं सामाजिक परिवर्तन झालं नाही. ही या पंथाची एक मर्यादा म्हणून उल्लेखावी लागते. चोखामेळा हे विठ्ठलाचे अत्युत्कट शुद्ध भक्त होते. पण त्यांना उभ्या जन्मात मंदिरात जाता आलं नाही आणि विठ्ठलाला समोर उभं राहून नमस्कारही करता आला नाही. ‘विठ्ठल – विठ्ठल’ असा त्यांच्या कवितेत जो ध्यास आणि आक्रोश ऐकू येतो तो पाहिला म्हणजे जातीय विषमतेचे भेसूर परिणाम जाणवतात. चोखोबांची कविता ही एका अशा वेदनेची कहाणी आहे, की जी वेदना कित्येक शतकं केवळ पूर्वजन्माचं संचित म्हणून लक्षावधी, कोट्यवधी अस्पृश्यांना सहन करावी लागली. धर्माला आणि ईश्वयराला विषमता मान्य असावी यापेक्षा माणुसकीची दुसरी विटंबना कोणती? चोखामेळा यांची कविता त्यांच्या जीवनवैफल्याची करुणभीषण कहाणी सांगते. मराठी संतकाव्यात इतकी करुणार्त कविता दुसरी नाही. अनेक अंभंगांतून चोखोबांच्या दुःखी मनाचे उष्ण उसासे प्रकट झाले आहेत. ते अनेक ठिकाणी म्हणतात,
देवा कां हे साकडे घातिले | निवारा हे कोडे माझे तुम्ही ॥
समर्थे आपुल्या नामासी पाहावे | मनी उमजावे आपुलिया ॥
यातिहीन आम्हां कोण अधिकार | अवघे दूरदूर करिताती ॥
चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह | पडिला संदेह काय करु ॥
चोखोबा याची कविता एका अटळ सामाजिक दुःखाची किंकाळी आहे. रानात वणवा लागल्यावर सारेच पक्षी ओरडतात. पण ज्याचे पंख जळाले त्याचा चीत्कार सर्वाधिक हृदयभेदक असतो. चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब म्हणजे समाजातली सर्वात खालची पायरी होती. अनेक पिढ्या त्यांनी अंधारात काढल्या. त्याचं दर्शन या कवितेत होतं.
महार जातीत जन्माला येणं हे आपलं दुर्भाग्य आहे. पूर्वजन्मीच्या पातकांमुळं हीन जातीत जन्म होतो असला तर्कशून्य, भोंगळ युक्तिवाद पोथ्यापुराणांत सापडतो. त्यावर बहुसंख्य लोक अज्ञानानं विश्वावस ठेवतात. आपल्या हीनत्वाची कारणमीमांसा करताना चोखामेळा देखील हीच अंधश्रद्धा बोलून दाखवतात. आपण पतित आहोत, अकुलीन आहोत यात आपलाच अपराध आहे. परमेश्व राला दोष देण्यात अर्थ नाही, अशा समजुतीनं हा संत म्हणतो,
शुद्ध चोखामेळा | करी नामाचा सोहळा |
मी यातिहीन महार | पूर्वी निळाचा अवतार ॥
कृष्णनिंदा घडली होती | म्हणोनि महार जन्मप्राप्ती ॥
चोखा म्हणे विटाळ | आम्हां पूर्वीचे हे फळ ॥
‘विटाळ’ हे पूर्वकर्मांचं फळ आहे. मागील जन्मी कृष्णनिंदा घडली म्हणून आपण अस्पृश्य झालो, अशी भ्रांती त्यांच्या मनात उत्पन्न झाली. अस्पृश्यतेची असह्य धग शतकानुशतकं सहन करणारी आणि त्या धगीतच जळून जाणारी असंख्य माणसं प्रारब्धवादी बनली होती. दैववादी असणं हा अज्ञानाचाच भाग आहे. सात शतकांपूर्वीच्या कालखंडात चोखोबा आणि त्यांचं कुटुंब आपल्या पूर्वकर्माला दोष देत वाट्याला आलेली सारी दुःखं सहन करीत राहिले यात आश्चोर्य नाही. पण समाजव्यवस्था ईश्वारावर अवलंबून नाही. तिची निर्मिती आणि तिचा विद्ध्वंस माणूसच करीत असतो. काही कुटिलबुद्धीची माणसं स्वार्थी वृत्तीनं इतरांवर गुलामगिरी लादत असतात. अस्पृश्यतेची प्रथा माणसाच्या किडलेल्या बुद्धीतूनच जन्माला आली. या विषमतेमुळं आपल्या देशाची चिरफाड झाली. समाजजीवनाचे तुकडे तुकडे झाले. त्यातल्या एका हीनदीन तुकड्याची करुण किंकाळी चोखामेळा यांच्या कवितेत प्रभावानं उमटली आहे. त्याची पत्नी सोयराबाई हिच्या काव्यातही याच किंकाळीचे प्रतिध्वनी उमटले आहेत. ती देखील आपल्या अभंगात परमेश्विराला विनवते.
हीनदीन म्हणोनी का गा मोकलिले |
परि म्यां धरिले पदरी तुमच्या ॥
असं म्हणून शरण आलेल्याकडे पाठ फिरवू नका अशी विठ्ठलाची विनवणी केली आहे. चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा संतप्त तरुण आहे. तो विठ्ठलाला जाब विचारतो. ‘जन्म गेला उष्टे खाता | लाज न ये तुमचे चित्ता ॥’. आम्हाला मात्र हीनत्व लाभलं आहे. पण हा संताप व्यक्त झाल्यावर देखील आपल्याच कर्माला दोष देतो.
‘चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा | हाचि आमुचा ठेवा |’
निर्मळा आणि बंका यांच्या काव्यातही हेच रात्रंदिवस ठसठसणारं दुःख प्रकट झालं आहे. एका फार मोठ्या लोकसमूहाच्या अंतरीची ही तीव्र वेदना आहे. हे केवळ व्यक्तीच्या वाट्याला आलेलं दुःख नाही. ही अनेक शतकांची काळीकुट्ट कहाणी आहे. चोखामेळ्यांची कविता ही जितकी एका विठ्ठलभक्ताची भावकविता आहे, तितकीच ती अस्पृश्यतेच्या वणव्यात होरपळणार्याख व्यक्तींची आणि लोकांची दुःखकविता आहे. या परिस्थितीवर मात करण्यात मध्ययुगात तरी कोणताही मार्ग नव्हता. म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी या अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंगलं. अटीतटीचा संघर्ष करून विषमतेच्या राक्षसी कल्पनेला त्यांनी भडाग्नी दिला. भारताची राज्यघटना समतेवर उभी राहिली. पंढरीचा पांडुरंग साने गुरुजींच्या चळवळीमुळं मुक्त झाला. आता कोणताही चोखामेळा विठ्ठलाच्या दाराशी दर्शनाची याचना करीत थांबणार नाही. तो प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायांवर आपलं मस्तक टेकू शकतो. क्रांतीचं चक्र फिरलं हे खरं. पण डॉ. आंबेडकरांच्या मते ते अर्धंच फिरलं, ते पूर्णपणानं गतिमान करणं आपल्या हाती आहे.
आज एकविसाव्या शतकात जात, संप्रदाय आणि वर्ण यांच्या भिंती अजूनही उभ्या आहेत. फुले, आंबेडकरांनी विषमतेला भडाग्नी दिला, असं विधान मी केलं पण हा अग्नी देऊनही या पोलादी भिंती ठामपणानं उभ्या आहेत. सामाजिक सुधारणावादी चळवळ राजकीय पक्षांनी मारुन टाकलेली दिसते. कारण जातीपातीच्या शिडीवरुनच सत्तेचं सिंहासन मिळू शकतं हे राजकारण्यांना उमगलेलं आहे. प्रत्येक पक्षात जातिवाद आहेच आहे. म्हणूनच क्रांतीचं चक्र पूर्णपणानं फिरलं पाहिजे. संतांनी सांगितलेली समता आणि क्रांतिकारकांनी समतेसाठी केलेला संघर्ष सफल होण्यासाठी मनुष्याच्या मूलभूत प्रतिष्ठेवर विश्वाघस ठेवण्याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. समता आणि बंधुभाव ही आपली स्वप्नं प्रत्यक्षात येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जरुर आहे.
संतकवी चोखामेळा यांचं अभंगकाव्य वेदना आणि अश्रू यांनी ओथंबलेलं असलं तरी काव्याच्या निकषांवर परीक्षा करताना ही कविता रसानुभव देणारी श्रेष्ठ कविता आहे हे लक्षात येतं. काव्यशास्त्रातली एकही ओळ न वाचता चोखामेळा उत्कृष्ट कविता लिहू शकले यात आश्च र्य वाटण्याचं कारण नाही. जेव्हा अंतरीचे अनिवार हुंदके शब्दाकार घेऊन समूर्त होतात तेव्हा ती रसात्मक कविता होते. चोखोबांना भावपूर्ण लिहिण्यासाठी प्रयास करावे लागले नाहीत. झाडाच्या फांदीला पानं फुटावीत त्याप्रमाणं चोखोबांनी कविता सहजगत्या आकाराला आली. कृत्रिमतेचा तिला कुठंही लेप लागलेला नाही. जे हृदयात होतं ते शब्दांत उतरलं आणि कविता सिद्ध झाली. संतकाव्याच्या इतिहासातलं एक हिरवं पान चोखामेळा यांच्या कवितेचं आहे. त्याची कविता सामाजिक वास्तवाशी निगडित आहे.
(‘संत चोखामेळा : अश्रूंची कहाणी’ या सुविधा प्रकाशनच्या पुस्तकातून साभार)
आमुचे आम्ही वायां गेलों अनंतभट्टाच्या निमित्ताने