एक गाव एक हातभट्टी

डॉ. सदानंद मोरे

धर्मांतर झाल्यानंतर चोखोबांची देवळं ओस पडली. त्याचा वापर कसा होऊ लागला, याचा विषण्ण करणारा वेध घेणारी सदानंद मोरे यांची एक कविता. ‘बखर’ या संग्रहातून साभार.

आटपाट गावच्या पोलिस पाटलाला
एक दिवशी वरून आला, तातडीचा खलिता
नाही झाला जर आठवड्याच्या आत
एक गाव एक पाणवठा
तर बंद करण्यात येईल तुमचा
रेशनिंगचा पुरवठा

पाटील, सरपंच, ग्रामसेवक सारेच झाले चाट
अरे, आपल्या गावच्या नदीचे तर ऐतिहासिक थाट
ब्राम्हण घाट, कुणबी घाट आणि सर्वात खाली
महार घाट
ऐतिहासिक अवशेषांचे जरा करू द्यात जतन
(पोलिस पाटलांच्या शेतीजवळ
इनामदारांनी बळकावलेले- महार वतन)
समतेच्याच आमच्या पाहायची आहे ना परीक्षा
मग हवी आहे कशाला आठवड्याची प्रतीक्षा?
कधीही या, आठवड्याच्या आत
सरप्राईज व्हिजिट असू द्यात
वर्दी देऊन या नहीतर या
साध्या वेशात
हरकत नाही असली जरी रविवारची सुट्टी
आमच्या येथे आहे
एक गाव एक हातभट्टी!

वेशीलाच लागून आहे देऊळ चोखा मेळ्याचे
ग्रामप्रदक्षिणेच्या रस्त्यावरून जाताना
बाहेरूनच हात जोडले जात
आमच्या पूर्वजांचे
आता मात्र कोणीच जात नसे
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा
अभंगाचे गायन बाहेरूनच होत असे

पूर्वजांच्या मानाने आम्ही खूप पुढे आहोत
सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत
फार काय, सुधारक देखील आहोत
विसाव्या शतकाची जाण ठेऊन आहोत

गावाबाहेरच्या लोकांनी धर्मांतर केलं तेव्हापासून
आम्हीच त्या देवळाची
काळजी वाहात आहोत

धर्मांतरापूर्वी महाराचा भिवा
तिन्ही सांज झाली की देवळात
रोज लावायचा दिवा
त्यासाठी त्याला इनाम होती जमीन
पण डोळा ठेवून होता चांदभाईचा अमीन
एक दिवस अमीनने घेतला तिचा ताबा
कुठली काशी, गया कोठली कुठे राहिला काबा?
(स्वार्थ आला की धर्म विसरतो मानव पटकन बाबा)

भिवा झाला बेकार! चोखोबाचा झाला आकार!!
त्याची बेकारी बघवेना

मदत केल्याशिवाय राहवेना
बेकारी हटाव, भिवाको बचाव
कडाडत होते दिवसेंदिवस
जीवनानश्यक वस्तूंचे भाव

आम्ही त्याला काढून दिला देवळातच एक लघुउद्योग
भांडवल आमचे, जाहिरात आमची
आमचाच सारा उद्योग

तेव्हापासून त्या देवळाची झाली, एक
सामाजिक उपयोगाची इमारत
धाड आली तर आमची तयारी जय्यत

कसेही या, कधीही या, आम्हाला मिळते इशारत
नित्यनियमाने, रोज सायंकाळी
आलीच जर कोणी पाहुणे मंडळी
तर वेळी अवेळी
आम्ही सारे जमतो तेथे
स्पृश्य-अस्पृश्य, सवर्ण-अवर्ण
हिंदू मुस्लिम ख्रिस्ती नवबौध्द
ब्राम्हण क्षत्रिय वेश्य शूद्र
सर्वांना समान अधिकार, आहे तेथे
मांडीला लावून मांडी आणि प्याल्याला प्याला
सारे भेदाभेद टाकतो त्यात बुडवून
सारी विषमता टाकतो धुवून
समतेच्या गंगेचे रोजच होते पान
तेथे नसतो कोणाला
कशाचाही अभिमान

“चोखा डोंगा परी शराब नोहे डोंगा”

गावाला आमच्या कशाला हवी ही
सुधारणेची नवी मोजपट्टी
आमच्या येथे आहे
एक गाव एक हातभट्टी!

0 Shares
चोखोबा माझा गणपती वेदनेचा कॅथार्सिस