कोलटकर, चित्रे, ढसाळ, नेमाडे, मोरे या वर्तुळाला जोडलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडेही गेली अनेक वर्ष तुकोबामय झालेले आहेत. संतसाहित्य विदेशात पोहचवणार्याी साहित्यिकांच्या शब्दांना चित्र-शिल्परूप देण्याचं मोठं काम हांडेंनी केलं आहे. यंदाही त्यांनी ‘रिंगण’साठी चोखोबाचं कव्हर करून दिलं आहे. त्यानिमित्तानं हे चित्रचिंतन.
गेले सहा महिने मी चोखामेळा या संताचा विचार डोळ्यात घेऊन आहे. त्यांचं चित्र काढण्याची तयारी करत असताना हाताशी जी माहिती आली ती सर्व काल्पनिक. त्यामुळं चित्र कसं काढावं, हा विचार करण्यातच बराच काळ निघून गेला. या काळात माझं ‘Liberal Pursuits’ हे पुस्तक लिहून झालं. त्यात मी भारतीय अहिंसात्मक क्रांती आणि युरोपियन हिंसात्मक क्रांतीच्या इतिहासाचा मागोवा घेतला. यानिमित्तानं मला भारतीय प्रज्ञावंतांच्या विचारविश्वा चाही उलगडा झाला. त्याचवेळी चोखामेळा यांच्या इतिहास, भूगोलाचा आणि त्याच्या वैश्विचक विचारांचा अवकाश सापडला. सोबतच या थोर संताचं चित्रही डोळ्यासमोर साकारलं. चोखामेळादी संतांचे हे वैश्विहक विचार अर्थात उदारउचित ‘लिबरल’ तत्त्व काय आहे, त्याबद्दल या चित्राच्या निमित्तानं बरंच चिंतन झालं.
सांख्य, न्याय, मीमांसा, वैशेषिक, योग आणि वेदांत हे भारतीय हिंदू तत्त्वज्ञानातील सहा मुख्य प्रवाह. युरोपातील लिबरल विचार हे प्रामुख्यानं कलेतून अनुभवास येतात. युरोपात भारताप्रमाणं विविध पीठे तयार झाली नाहीत; मात्र ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या चर्चनी विचारवंतांच्या लिखाणाची जपणूक केली. शिवाय मुद्रणकलेचा फायदा करून घेत हे विचार जगभर पसरवले. तेथील राजे राजवाड्यांनी विचारवंतांना प्रोत्साहन दिलं. कोलंबस, मारको, पोलो वगैरेंच्या सफरींची वर्णने वाचल्यावर हे लक्षात येतं. यामध्ये सामान्य जनतेचा सहभाग काय होता, ते समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वतभूमीवर आपला चोखामेळा दृगोचर होतो. चोखामेळा यांचा भौगोलिक परिघ ज्ञानदेव, नामदेवांएवढा नक्कीच नसणार. तरीही त्यांच्या उदारउचित होण्याच्या प्रक्रियेचा काळ आणि ते राहत असलेल्या परिसराचं अवलोकन करणं महत्त्वाचं ठरतं. स्वतःच्या गुणांनी सामाजिक प्रतिष्ठांवर मात करत चोखामेळा देवगुणांच्या थरात जाऊन मिसळले. आयुष्य काबाडकष्टात घालवलेल्या या माणसाचं आत्मतत्त्व मात्र त्यांच्या काव्याविष्कारामुळे अमर झालं. अनुकरणाच्या विळख्यात न राहता प्रज्ञेच्या जवळ पोहोचलं.
चोखामेळा ज्या पंढरपूर परिसरात वावरले त्या पंढरपूरचा सांस्कृतिक परीघ साधारणतः कबिराच्या जन्म, कर्म भूमीपर्यंत जाऊन पोहोचतो. नामदेवांच्या उत्तर आणि दक्षिण भारताच्या प्रवासक्षेत्रात सामावतो. या विस्तृत क्षेत्रात चोखामेळा यांचा मर्यादीत परिसर अंतर्भूत आहे. १३व्या शतकात मुस्लीम धर्मानं उचल खाल्ली होती. युरोपीय आणि आशियाई खंडातील राजकारणात धार्मिक बदल होऊ घातले होते. त्यात राजे आणि राजवटी एकमेकांवर सत्ता गाजवण्याच्या प्रयत्नात होत्या. अशा काळात चोखामेळा राहत असलेला प्रदेश सामाजिकदृष्ट्या अस्वस्थ होता. तिथं मानवी मूल्यं झिडकारली जात होती. मूलभूत शिक्षणापासून वंचित असलेले चोखामेळा यांच्यासारखे प्रज्ञावंत सामाजिक प्रतिष्ठेपासून दूर राहून जीवनक्रम व्यतीत करत होते. अर्थात चोखामेळा लिबरल, उदारउचित झाले ते फक्त स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी. आज ज्या उदारमतवादी विचारसरणीचा जगभर अंगिकार केला जात आहे, त्याचा पाया चोखामेळा यांच्यासारख्या सामाजिक स्तरातील अगदी शेवटच्या वीटेनं घातला आहे.
चोखोबा आपल्या अभंगांतून पंढरीच्या विठुरायाचं मनोहर रूप आपल्या डोळ्यासमोर उभं करतात; मात्र खुद्द चोखामेळा कसे दिसत असतील, याचा अंदाज बांधणं चित्रकाराला मोठं कठीण जातं. मुखपृष्ठावर गुळगुळीत चित्र रंगवण्याचा प्रघात २०व्या शतकात मोठ्या प्रमाणावर पडला. आज २१व्या शतकातही त्यातून बाहेर पडण्याची आपली मानसिकता नाही. असो. चोखामेळा यांचं वास्तववादी चित्र रेखाटणं अवघड आहे. कारण त्यासाठी फारसे संदर्भ नाहीत. त्यामुळं सांकेतिक चित्र रेखाटणं एवढंच हातात राहतं. अर्थात त्यातही तत्कालीन समाज, इतिहास, भूगोलाचा विचार करावाच लागतो. चोखामेळा डोक्यावर पगडी नक्कीच घालत नसणार किंवा त्यांच्या डोक्यावर साधा फेटाही नसणार. कारण त्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती तशी नव्हती. पण मोलमजुरी करताना उन्हापासून बचाव करण्यासाठी ते किमान एखादं उपरणेवजा कापड डोक्याला नक्कीच गुंडाळत असणार. डोकं उघडं ठेवण्याची सवय २०व्या शतकात युरोपियन प्रभावातून भारतात आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात पोषाखाबाबत चोखोबांची तुलना नामदेव, ज्ञानदेवांसोबतही करता येणार नाही. कारण नामदेव पिढीजात कपड्यांच्या व्यापारात होते. तर ज्ञानदेवादी योगी भावंडं एकच लांबलचक कपडा शरीराभोवती गुंडाळत असणार.
बाराव्या-तेराव्या शतकातील यादवकालीन समाज समृद्ध असला तरी सामाजिक उच्चनीचतेमुळे पेहरावाच्या पद्धतीही भिन्न होत्या. शिवाय हवामानानुसार विचार करता कोपरापर्यंतची बंडी, गुडघ्यापर्यंत धोतर अन् डोक्याला कापडाचा एखादा तुकडा असाच चोखोबांचा वेष असावा. त्यात चोखोबा एखाद्या गवंड्याप्रमाणं दिसत असावेत. त्या काळातील हा पेहराव आपल्याला महाराष्ट्रातील लेण्यांमधून पाहायला मिळतो. ११व्या शतकाच्या आसपास कोरलेल्या लेण्यांमध्ये शेतीकाम करणार्याा व्यक्तीचं शिल्प अशाच पेहरावातलं आहे. चेहरा मात्र काल्पनिकच चितारावा लागतो. कारण त्याबाबत थोडेही संदर्भ उपलब्ध नाहीत. उलट त्यामुळे चित्रकाराला अधिक मोकळीक मिळते. चोखामेळ्याचं चित्र रंगवताना मला या विचारचक्रातून जावंच लागलं. अर्थात प्रत्यक्ष चित्र रंगवणं हे वाटलं तेवढं सोपं नव्हतं.
दरवर्षी एका संताचा समग्र अभ्यास करण्याच्या ‘रिंगण’च्या संपादकांच्या निर्णयाला मी अनुमोदन दिलेलंच आहे. त्यामुळं शब्द पाळणं मला भाग आहे. अर्थात त्यात संतांच्या सेवेचं समाधानही आहे.
वेदनेचा कॅथार्सिस संस्कृतीच्या पायाचा तडा