‘तराळ अंतराळ’कार डॉ. शंकरराव खरात हे दलित साहित्यातलं अत्यंत मोठं नाव. उतारवयात त्यांनी संतसाहित्याविषयी बरंच लेखन केलेलं दिसतं. त्यातलं ‘चोखोबाचा विद्रोह’ हे छोटं पुस्तक. इतर दलित साहित्यिक चोखोबांना टाळत असताना शंकररावांनी चोखोबांच्या बंडखोरीचं केलेलं कौतुक महत्त्वाचं होतं. या पुस्तकातला एक लेख.
चोखोबाला सामाजिक विषमतेच्या समाजात बदल व्हावयास पाहिजे होता. चोखोबा आणि त्याचे कुटुंबातील भक्तीपंथातले पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, मेव्हणा बंका हे हीन जातीचे म्हणून, अस्पृश्य म्हणून, अतिशूद्र, खालच्या जातीचे म्हणून दैनंदिन जीवनात भरडले गेले होते. उच्चवर्णीय समाजातले लोक त्यांना माणूस म्हणून मानतच नव्हते.
पांडुरंगाच्या दर्शनाला चोखोबा मंदिराच्या वाटेने निघाला तर त्याला हीन जातीचा म्हणून ‘दूर, दूर हो म्हणत’. त्यांचे ते खोचक, बोचक, चावरे, अवहेलनात्मक बोल चोखोबाच्या अंतःकरणाला लागत. त्याच्या हृदयाला त्या निंदात्मक खवचट बोलीने वेदना होत असत. त्यातच तो महाद्वाराच्या पायरीवरून विठ्ठलाला हात जोडी, ‘पांडुरंगा, मला तर हे दूर, दूर हो म्हणतात, मग मी तुझी भक्ती कशी करु?’ हेच गार्हा णे, हीच तक्रार आक्रोश करून, टाहो फोडून तो पांडुरंगाला सांगत असे की, हे माझा विटाळ मानतात, मला स्पर्श केल्याने यांना शुद्ध होण्यासाठी पाणी घ्यावे लागते. हे कशासाठी? विषमता मानणार्या् उच्चवर्णीयांना हे कळायला पाहिजे की, विटाळावाचून कोण आहे? असे स्पष्ट बोलून उच्चवर्णीयांच्या अंगावर विटाळाच्या अभंगाद्वारे तीक्ष्ण धारदार विचाराचे बाण सोडले.
चोखामेळासारखा अस्पृश्य मानलेला, हीन जातीचा मानलेला, अतिशूद्र मानलेला संत शेवटी आपल्या आक्रोशाकडे, आक्रंदाकडे, टाहोकडे कोणी लक्ष देत नाही, त्याचा विचार करत नाही म्हणून तो वर्णाश्रम धर्माच्या ग्रंथांवर म्हणजे वेद, पुराण शास्त्रे यांच्यावर टीका करतो की, ग्रंथांना विटाळ आहे, शास्त्राला विटाळ आहे आणि पुराणे तर अमंगल आहेत.
वर्णाश्रमवादी धर्मशास्त्रे आणि देवदैवते यांच्याविरुद्ध बंडखोरीची भूमिका फक्त चोखोबानेच घेतलेली आहे. चोखोबा अस्पृश्य म्हणून, हीन जातीचा म्हणून हे गुलामगिरीचे जीवन रोजच प्रत्यक्ष जगत होता, भोगत होता. त्याला या जातिभेदाच्या विटाळाच्या, गुलामगिरीतून मुक्त होऊन सामाजिक विषमता नष्ट करावयाची होती. त्यांच्या भूमिकेला व विचाराला साथ देत त्यांची पत्नी सोयराबाई यांनी विटाळासंबंधी लिहून विटाळ पाळणार्याो आणि हीन जाती म्हणून हेटाळणार्यांवना, उच्चवर्णियांना समजही दिलेली आहे. चोखोबाचा मुलगा कर्ममेळा याने तर विठ्ठलाला स्पष्ट स्वरूपात जाबच विचारला
आमुची केली हीन याती | तुज कां कळे श्रीपती |
जन्म गेला उष्टें खाता | लाज न ये तुमचे चित्ता ॥
असे म्हणून तो विठ्ठलाला निर्वाणीचा प्रश्न करतो, ‘तुमच्या संगतीचे काय सुख आम्ही’, असे स्पष्ट म्हणून स्वतंत्र अशी भूमिका घेऊन, आपल्या पित्याच्या, चोखोबाच्या सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या, जातिभेदाची विषमता नष्ट करण्याच्या भूमिकेला आपल्या अभंगातून प्रकट असा पाठिंबा देतो. तशीच संत बंका याचीही हीनजातीविरोधी, विटाळ मानण्याविरोधी भूमिका त्याच्या अभंगातून प्रकट झालेली आहे. त्यालाही जातिव्यवस्थेच्या समाजात बदल घडवावयाचा होता.
चोखोबाने वर्णाश्रमवादी धर्मशास्त्रे आणि देवदैवते यांच्या विरोधी बंडखोरीची भूमिका घेतलीच, पण त्याचबरोबर अस्पृश्यतेविरोधी, हीन जात मानणार्यां विरोधीही प्रखर भूमिका घेतलेली आहे.
हीन मज म्हणती देवा | कैसी घडो तुमची सेवा ॥
मी तो पतित पतित | तुमचाच शरणागत ॥
लाज येईल तुमच्या नावा | मज उपेक्षिया |
चोखोबा एवढ्यावरच थांबले नाहीत. उच्चवर्णीय हे धर्मशास्त्राप्रमाणे वेदशास्त्राचे पठण करतात, पण या वेदांचे पठण करण्याचा आम्हाला अधिकार का नाही, याचीही तक्रार ते करतात. चोखाबा म्हणतात,
कर्मातें वाळीले धर्मातें वाळीले | सर्व हारपले जेथिचें तेथें ॥
वेदानें वाळीले शास्त्रातें वाळीले | सर्व हारपले जेथिचें तेथें ॥
आपल्याला वेदांचे पठण करण्याचा अधिकार नाही म्हणून ते शेवटी म्हणतात, ‘चोखा म्हणे माझा संदेह फिटला| देहिच भेटला देव आम्हा|’ त्यामुळे आता आम्हाला वेदाच्या पठणाची जरूरी नाही, असेही ते म्हणतात. चोखोबाच्या विचारधारेचे आणखीन महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने दारिद्य्रासंबंधी, गरिबीसंबंधाने, दारिद्य्राच्या दुःखासंबंधी आपल्या अभंगवाणीतून तीव्र संताप, तीव्र विरोध प्रकट करून गरिबी, दारिद्य्राविरोधी भूमिका घेऊन, दारिद्य्रातून मुक्तीचा विचार मांडलेला आहे. चोखोबा एका अभंगात विठ्ठलाला म्हणजे समाजाला सवाल विचारतात,
काही केशिराजा दुजे पैं धरिता |
हें तो आश्चजर्यता वाटे मज ॥
एकासीं आसन, एकासी वसन |
एक तेची नग्न फिरताती ॥
एकासी कदान्न एकासी मिष्ठान्न |
एका न मिळे कोदान्न मागतांची ॥
एकासी वैभव राजाची पदवी |
एक गावों गावीं भीक मागे ॥
हाचि न्याय तुमचे दिसतो कीं घरीं |
चोखा म्हणे हरि कर्म माझे ॥
असे म्हणून चोखोबा पांडुरंगाला स्पष्ट म्हणतो, ‘कशासाठी तुम्हां शरण रिघावें | आमचें वारावें सुख दुःख ॥’ यापुढे या दारिद्य्राच्या प्रश्नाुचे किती भेसूर भयानक स्वरूप आहे हे सांगताना चोखोबा म्हणतात,
चोखा म्हणे काय करू आतां | तुमची ही सत्ता अनावर ॥
जिकडे पाहे तिकडे बांधलों हरी | सुटायाचा करी बहु यत्न ॥
संत चोखोबांनी याप्रमाणे आपल्या अभंगातून समाजातील दारिद्य्राच्या संबंधात, समाजातील गरिबीच्या प्रश्ना॥बाबत उघड उघड भूमिका घेतलेली आहे आणि तेही तेराव्या शतकात हे विशेष होय. चोखोबाच्या या विचारात समाजवादी विचारांची मूळ बीजे आहेत. त्याचे हे समाजवादी विचारच आहेत हे स्पष्ट दिसते आणि त्यासाठी दारिद्य्राच्या दुःखातून ते मुक्तीच्या मार्गाची मागणी देवापाशी करतात. त्याला संतवाङ्मयात तोड नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही.
आम्ही चोखोबा का नाकारतो? परि भाव नोहे डोंगा