संत चोखामेळांनी छळ सोसला पण समाजाची रूढ चौकट मोडली नाही. अनिष्ट गोष्टींवर त्यांनी कोरडे ओढले पण अत्यंत विनम्र शब्दांत. पण त्यांचा मुलगा बाप से सवाई निघाला. त्यांनी अत्यंत कडक शब्दांत देवाचाही समाचार घेण्यास मागंपुढं बघितलं नाही. त्यामुळे नामदेव ढसाळांनी त्यांना पहिला विद्रोही कवी म्हटलं तर श्री. म. माटेंनी आंबेडकरांचा पूर्वजन्म म्हटलं.
कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच विचाराच्या असतील, याची काही खात्री नसते. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून आलेले भाऊ ही एखाद्या गोष्टीसंबंधात एकसारखाच विचार करतील याची हमी कोणीही देऊ शकत नाही. एकाच कुटुंबातील सर्व घटक काव्यरचना करत असतील, अशी कल्पना ही तर त्याही पुढची पायरी झाली. त्यातही पुन्हा, एकच भाव व्यक्त करणार्याढ काव्यरचना एकाच कुटुंबातील सदस्य करताना दिसणं, ही तर दुर्मिळातीळ दुर्मीळ बाब ठरते. परंतु भागवतधर्मीय मराठी संतांच्या मांदियाळीमध्ये ही बाब अपवादात्मक म्हणता येत नाही. नामदेवरायांच्या कुटुंबात त्यांची मुलंच केवळ नव्हे तर त्यांच्या घरी लहानाच्या मोठा झालेल्या अश्राप जनाबाईदेखील विलक्षण भावगर्भ रचना करताना दिसतात. ज्ञानदेवादी चारही भावंडं तर कवीच होती. त्याच परंपरेत पुढे भानुदासांनंतर त्यांचे पणतु एकनाथ आणि पुढे चालून त्यांचे नातू मुक्तेवर काव्य करताना दिसतात. तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाही अभंगरचना करतात. एकाच कुटुंबातील घटक अभंगांसारखी भक्तिरचना करत असल्याची अशी ही उदाहरणं वारकरी संप्रदायात सरसहा आढळतात.
या सगळ्या प्रभावळीमध्ये आणखी एक विलक्षण कुटुंब आपल्याला विसरून चालत नाही आणि ते म्हणजे चोखोबारायांचं. चोखोबांचं अक्षरश: संपूर्ण कुटुंब भक्तिकाव्याच्या रचनेमध्ये न्हाऊन निघालेलं दिसतं. चोखोबा, चोखोबांची अर्धांगिनी सोयराबाई, या दांपत्याचा मुलगा कर्ममेळा, चोखोबांची बहिण निर्मळा आणि सर्वांत अप्रुपाची बाब म्हणजे चोखोबांचे मेहुणे (निर्मळेचे पती) बंका हे सगळे उत्कट भक्तिरचनाकार आहेत. संख्येचा विचार केला तर चोखोबांचे आज उपलब्ध होणारे अभंग सर्वाधिक म्हणजे ३५८ इतके आहेत. अभंगांच्या संख्येची उतरती भाजणी लावायची तर चोखोबांच्या नंतर दुसर्या् स्थानावर आहेत सोयराबाई. आजघडीला सोयराबाईंचे ६२ अभंग आपल्याला उपलब्ध होतात. सोयराबाईंनंतर मग ४१ अभंगांमध्ये नाममुद्रा असलेले बंका तिसर्याा क्रमांकावर येतात. अनुक्रमे २७ आणि २४ अभंग उपलब्ध होणारे कर्ममेळा आणि निर्मळा त्या नंतर चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. इथे एक बाब मात्र आवर्जून नोंदवायला हवी आणि ती अशी की चोखोबांच्या कुटुंबातील सगळ्यांच्याच अभंगरचनेचा प्रेरणास्रोत चोखोबा असले तरी बाकी चौघांची रचना म्हणजे चोखोबांच्या उद्गारांची पुनरावृत्ती नक्कल अथवा अनुकरण नव्हे. सोयराबाई, बंका, कर्ममेळा आणि निर्मळा या चारही भक्तश्रेष्ठांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि ते व्यक्तिमत्त्व त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांसह त्यांच्या त्यांच्या रचनेमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यातही चोखोबांचे सुपुत्र कर्ममेळा हे एक अलौकिक आणि धगधगतं रसायन असल्याचा प्रत्यय त्यांच्या २७ अभंगांतील शब्दाशब्दांतून येतो. कर्ममेळा यांच्या अभंगांचं अंतरंग न्याहाळणं हा एक रोमांचक अनुभव ठरतो.
चोखोबांची जीवनयात्रा तशी अवचितच आणि निव्वळ अपघातानं संपुष्टात आली. तत्कालीन सरासरी जीवनमानाच्या दृष्टीनं दीर्घ असं ७० वर्षांचं आयुष्य चोखोबांना लाभलं. परंतु, मंगळवेढाचे कूस कोसळून चोखोबा निवर्तल्यानंतर सोयराबाई आणि कर्ममेळा यांची जीवनगती काय व कशी झाली, याबाबत काहीही थांगपत्ता हाती लागत नाही. चोखोबांच्या आधीच बंका निजधामास गेले होते. चोखोबा आणि बंका यांच्या पश्चानत निर्मळा यांना काय काय भोगावे लागले याचाही मागमूस कोठे लागत नाही. कर्ममेळा यांच्या २७ अभंगांतील काही अभंगांच्या शब्दकळेवरून ते अभंग चोखोबांच्या निर्वाणानंतर स्फूरलेले असावेत, असा कयास बांधता येतो. मुळात, तत्कालीन समाजव्यवस्थेनं चोखोबा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गावकुसाबाहेरच ठेवलेलं असल्यानं त्यांच्या संदर्भातील फारसा तपशील दस्तऐवजांमधून हाती येत नाही. त्यामुळे चोखोबा, ते ज्या समाजसमूहांचं प्रतिनिधित्त्व भक्तीच्या प्रांतात त्या काळी करत होते त्या समाजाच्या आशाआकांक्षा, पीडावेदना, उपेक्षा, शल्यं यांचा मागोवा घेण्यास चोखोबांचे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे आज उपलब्ध होणारे अभंग एवढाच एक साधनस्रोत आपल्या हाती उरतो. कर्ममेळा यांचं अत्यंत लखलखीत आत्मभान, ठायीठायी शब्दबद्ध झालेले त्यांचे अभंग हा या संदर्भात सर्वांत अमूल्य ठेवा ठरतो.
अभंगांची संख्या केवळ २७ अशी मोजकीच असली तरी त्या मूठभर अभंगांतूनही प्रतीत होतं ते कर्ममेळा यांचं कमालीचं संवेदनशील, तरल, चौकस, बंडखोर, प्रगल्भ चिंतनशील, पराकोटीचं अंतर्मुख असणारं आणि संपर्कात येणार्या् कोणालाही तितक्याच प्रकर्षानं आत्मशोधन करण्यास भाग पाडणारं रसरशीत व्यक्तिमत्त्व. कर्ममेळा स्वरूपत: चौकस होते, याची साक्ष त्यांच्या प्रत्येक अभंगातून मिळत राहते. ते सतत प्रश्ना उपस्थित करताना दिसतात. त्या प्रश्नांेची उत्तरं ते थेट पांडुरंगालाच विचारतात. प्रसंगी देवालाही धारेवर धरायला ते कमी करत नाहीत. कर्ममेळा हे अहोरात्र संघर्षशील व्यक्तिमत्त्व होतं, याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका उरू नये इतके त्यांचे अभंग जळजळीत आहेत. किंबहुना, हे २७ अभंग म्हणजे कर्ममेळा यांचं जणू प्रश्नोबपनिषदच आहे. परमार्थाच्या प्रांतात प्रश्नळ उपस्थित करू नयेत, अशी मखलाशी आपल्या परंपरेत मोठ्या चाणाक्षपणे केली जाते. परंतु निखळ श्रद्धेला चौकसपणाचं, प्रश्नल उपस्थित करण्याचं वावडं नसतं असा भक्कम दिलासा आपल्याला कर्ममेळा देतात. अत्यंत विवेकी दृष्टीनं कर्ममेळा तत्कालीन लोकव्यवहार आणि भागवत धर्माच्या पताकेखाली संतमंडळानं पायाभरणी केलेली आध्यात्मिक लोकशाही यांच्यातील व्यावहारिक संघर्षाचं निरीक्षण करून त्यांतील विरोधाभासामुळे प्रश्नांषकित बनलेले दिसतात.
कर्ममेळा यांच्या ठायीची ती चिंतनशीलता हा चोखोबा आणि सोयराबाई या दोघांच्या ठायी वसणार्याच विवेकशीलतेचा पडसाद दिसतो. किंबहुना परंपरेला, तत्कालीन धर्माचार्यांना, शास्त्रार्थाची मीमांसा करण्याची मालकी कडोसरीला वागवणार्याथ तथाकथित ज्ञानमार्तंडांना निरुत्तर करणारे बिनतोड प्रश्नी विचारणं हे चोखोबा-सोयराबाई-कर्ममेळा या त्रिकुटाचं जणू जन्मब्रीदच असावं, असं अभंग वाचताना वाटत राहतं. दांभिक आणि बिनबुडाच्या थोतांडी कल्पनांची समाजमनावर दाटलेली काजळी विवेकशीलतेचा प्रकाश उजळत झटकून टाकण्याचा आपल्या आई-वडिलांचा तोच वसा कर्ममेळा सांभाळताना दिसतात. आईवडिलांची चिंतनशीलता हा कर्ममेळा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असला तरी चोखोबा आणि सोयराबाईंच्या तुलनेत ते अधिक रोखठोक आणि आक्रमक आहेत यात वादच नाही. प्रत्येक पुढची पिढी ही आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक प्रगल्भ असते, हा निसर्गनियमच आहे. त्याच वेळी कर्ममेळा हे तरुण आहेत, हे वास्तवही आपल्याला नजरेआड करून चालत नाही. प्रौढांच्या तुलनेत तरुणाई ही केव्हाही अधिक आक्रमक असतेच. त्याचमुळे तुझ्यावर विसंबून असणार्यां्चं पालन करणं तुला शक्य होत नसेल तर भक्तवत्सल हे तुझं ब्रीद तू सोडून दिलेलं बरं, असं प्रत्यक्ष पांडुरंगालाच, ‘ब्रीद बांधिले कासयां चरणी| ते सोडी चक्रपाणी पांडुरंगा॥’, असं सडेतोड भाषेत सुनावण्यास कर्ममेळा मुळीसुद्धा कचरत नाहीत. मात्र एक बाब अधोरेखित केलीच पाहिजे, ती अशी की व्यवस्थेवरचा संताप व्यक्त करत असतानाही कर्ममेळा यांच्या ठायी सतत जागृत असणार्यात विवेकावर विकाराची मात झालेली दिसत नाही. त्यांच्या संतापाचा विस्फोट होतो परंतु त्यांतूनही पुन्हा चिंतनशील विवेकाचीच प्रभा आसमंतात पसरते.
भवतालची भेदमय, विषम, क्रूर आणि पिळवणूक करणारी व्यवस्था आणि भागवत धर्मानं भक्तीच्या प्रांतात पुकारा केलेली समता यांच्यातील द्वंद्वाचे कर्ममेळा हे साक्षीदार होते. संतांनी आध्यात्मिक क्षेत्रातील लोकाशाहीची द्वाही फिरवलेली असली तरी, चोखोबांसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला व्यवहारात गावरहाटीतील शिवाशिवीला आणि तिच्यातून निपजणार्या उपेक्षा आणि मानहानीला पदोपदी तोंड द्यावं लागत होतंच. एकाच वेळी दोन भिन्न पातळ्यांवरील हे जगणं खास करून कर्ममेळा यांना विलक्षण अस्वस्थ बनवतं, हे त्यांच्या मोजक्याच अभंगांतील अनेक चरणांवरून स्पष्टपणे जाणवतं. भक्त म्हणून पांडुरंगानं आपल्याला आध्यात्मिक विश्वात पोटाशी घेतलेलं असलं तरी व्यावहारिक जगातील आपले भोग काही सरत नाहीत, हे उमगलेले कर्ममेळा,
तुझ्या संगतीचे काय सुख आम्हां | तुम्हा मेघयामा न कळे काही ॥
हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी | हीनत्व आम्हांसी देवराया ॥
असा प्रश्नम अगतिक होऊन अखेर पांडुरंगालाच विचारतात. इतकंच नाही तर, तुझं भक्तपण मिरवलं तरी मुळात आमचं दैव काही बदलत नाही, या विषम वास्तवाची जाणीव ते विठ्ठलालाच, ‘चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा | हाचि आमुचा ठेवा भागाभाग ॥’ अशा नेमक्या शब्दांत करून देतात. भगवंताचं नाव अमृताहूनही गोड असतं अशी साक्ष परमार्थाच्या प्रांतातील अधिकारी वारंवार देत असले तरी, पांडुरंगा, तेच नाम अहोरात्र जपणार्यास आम्हांला या व्यवहारी जगात गोडान्नाचा एखादा घासही लाभत नाही, याचा झाडा तू कसा देणार आहेस हेही कर्ममेळा ‘गोड कधी न मिळेचि अन्न | सदा लाजीरवाणे जगामध्यें ॥’ अशा दाहक भाषेत देवालाच विचारतात. कर्ममेळा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि पर्यायानं त्यांच्या अभंगवाणीचं हे असाधारण वैशिष्ट्य आणि महत्त्व होय.
निम्न जातसमूहांमध्ये जन्माला येऊनही भक्तीच्या प्रांतातील सर्वोच्च अवस्था प्राप्त केलेल्या चोखोबांसारख्या तत्कालीन संतविभूतींची व्यावहारिक जगातील भेदाभेदापासून मात्र अणुमात्रही सुटका नव्हती, हे ऐतिहासिक सत्यच कर्ममेळा त्यांच्या वचनांद्वारे समाजासमोर मांडत आहेत. तत्कालीन समाजानं कनिष्ठ गणलेल्या जातसमूहांमध्ये जन्माला येऊन परंतु अतीव कष्टानं संतत्वाला पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वांना आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशा दोन जगांमध्ये त्या काळात दोन पातळ्यांवरील जे द्विखंड जीवन जगावं लागत होतं त्याचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन कर्ममेळा आपल्याला घडवतात. भगवद्भक्तीमध्ये रममाण झालेल्या संतव्यक्तींच्या वचनांत केवळ पारमार्थिक जीवनातील अनुभवविश्वाचं प्रतिबिंबच बव्हंशी उमटत राहतं. व्यावहारिक जगापासून असे महात्मे भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या जवळपास विभक्तच झालेले असतात. त्यामुळे व्यावहारिक जगातील चटके, चिमटे त्यांच्या भक्तिरचनेमध्ये अभावानंच व्यक्त होतात. कर्ममेळा यांची अभंगवाणी मात्र या वस्तुस्थितीला अपवाद ठरते. संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तीचा आणि व्यावहारिक जगाचा संबंध नेमका कसा असतो याबाबत खुद्द संतांच्या साहित्यातून फारसं भाष्य आढळत नाही. संत आणि समाजव्यवहार यांच्यातील परस्परनात्याचे पदर-आडपदर समजून घेण्यास त्यामुळे आपल्या हाती काही साधनच उरत नाही. कर्ममेळा यांचे अभंग म्हणजे अशा साधनांचा एक महत्त्वाचा स्रोत होय. त्यामुळे भक्तिकाव्य म्हणून कर्ममेळा यांच्या अभंगसंपदेचं महत्त्व जितकं आहे त्यापेक्षाही, समाजव्यवस्थेनं तिरस्कृत केलेल्या जातसमूहातील संतव्यक्तीचं आध्यात्मिक विश्वातील जगणं आणि त्याच व्यक्तीच्या वाट्याला येणारी व्यावहारिक जगातील वागणूक यांचे ताणेबाणे विलक्षण प्रगल्भपणे उलगडणारा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्यांच्या अभंगांचं मोल काकणभर अधिकच ठरावे.
भागवतधर्मीय संतांनी १३व्या शतकात महाराष्ट्रामध्ये जे नवजागरण घडवून आणलं त्याचा आध्यात्मिक पाया हा वेदांतदर्शनावर उभारलेला नसल्यामुळेच आध्यात्मिक व्यवहाराच्या जोडीनं सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरही इथे साकारू शकलं. प्रथम आध्यात्मिक विश्वात आणि मग क्रमानं सामाजिक व्यवहारात संक्रमित होऊ पाहणारं ते नवदर्शन, तत्कालीन समाजव्यवस्थेनं तळागाळात लोटलेल्या चोखोबा, कर्ममेळा यांच्यासारख्या विचारी, प्रगल्भ व्यक्तिमत्त्वांना एक आगळं आत्मभान कसं प्रदान करत होते, याचा दीपवून टाकणारा प्रत्यय आपल्याला कर्ममेळा यांच्या अभंगांमध्ये येतो, हे कर्ममेळा यांच्या अभंगोक्तींचं आणखी एक अजोड वैशिष्ट्य. ही पायाभरणी केली ती ज्ञानेश्वरांनी. वेदांतदर्शनाला त्यांनी पर्याय उभा केला तो शिवदर्शनाचा. डोळ्यांना दिसणारं उभं जग हा मायेचा लटका पसारा आहे, ही वेदांताची शिकवण स्थिर झालेल्या समाजात आणि त्या समाजाच्या वैचारिक विश्वात एका पर्यायी विचाराचा सशक्त प्रवाह त्यामुळे वाहू लागला. दृश्यमान होणारं जग म्हणजे मायेचा मायावी कारभार नसून संपूर्ण जग हे परतत्त्वाचं विलसन आहे, असं प्रमेय ज्ञानदेवांनी मांडलं. परतत्त्व हे सत्य आणि ज्ञानवान असल्यामुळे त्या परतत्त्वाचं विलसन असणारं जगही तितकंच सत्य आणि ज्ञानमय आहे, असं प्रतिपादन करीत ज्ञानदेवांनी जगाकडे बघण्याची सर्वसामान्यांची दृष्टी मुळातूनच बदलण्याची मोहीम हाती घेतली. सत्य आणि ज्ञानस्वरूप असलेलं परतत्त्वच जगरूपानं नटलेलं असल्यानं जगाचं दर्शन हे जगदीश्वराचंच दर्शन आहे, असं सांगत ज्ञानदेवांनी जीव, जगत आणि जगदीश्वर यांच्या दरम्यानच्या नात्याला वेगळेच आयाम प्राप्त करून दिले. हे वैचारिक आणि दार्शनिक स्थित्यंतर कर्ममेळा यांना अतिशय अचूकपणे उमगल्याचं त्यांच्या,
जें जें दिसें व्यापलें तें तें फलकट | वाउगा बोभाट करोनी काई |
विश्वीं विश्वंभर संतांचे वचन | तेचि प्रमाण मानू आता |
या उद्गारांत स्पष्ट होतं. व्यवहारातील समाजपुरुष हेच विश्वात्मक देवाचं दर्शन होय, हा विश्व आणि विश्वंभर हे एकच आहेत या तत्त्वज्ञानाचा व्यावहारिक अर्थ. ही खूण कमालीच्या तरलपणे टिपलेले कर्ममेळा, विषमतापूर्ण व्यवहाराचं दान आपल्या सगळ्या कुटुंबाच्या पदरात घालणार्याा त्या समाजपुरुषाला म्हणजेच पर्यायानं विश्वात्मक देवाला ज्या जळजळीत शब्दांत जाब विचारतात ते तितक्याच संवेदनशीलतेनं मुळातून बघण्यासारखं आहे.
आमुची केली हीन याती | तुज कां न कळे श्रीपती ॥
जन्म गेला उष्टे खाता | लाज न ये तुमच्या चित्ता ॥
हे कर्ममेळा यांचे ज्वालामय शब्द म्हणजे ज्ञानदेवांनी मांडलेल्या चिद्विलासाच्या तत्त्वज्ञानाचं सामाजिक स्तरावरील उपयोजन होय. अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची बाब म्हणजे कर्ममेळा यांच्या या कल्पनातीत प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचं नीट आकलनच आम्हांला झालेलं नाही.
मानवतेचं गाणं मेड फॉर इच अदर