एकाच वेळेस संत चोखामेळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही तितक्याच आपुलकीनं आणि विचारांती स्वीकारणार्यांिमध्ये ज. गो. संत यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं. चंद्रपूरच्या ‘चोखामेळा वसतिगृहा’चे सचिव म्हणून वंचितांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. चोखोबांवरील त्याचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ‘परि भाव नोहे डोंगा’ हे आंबेडकर अभ्यास मंडळानं प्रकाशित केलंय, यातच सारं आलं. या पुस्तकातील लेखकाचं मनोगत इथे लेखरूपानं...
आज हे माझे दुसरे पुष्प. प्रथम संपादित केलेले पुस्तक ‘असा मी जगलो’, यानंतर ‘चोखा डोंगापरी भाव नव्हे डोंगा’, हे लिहायला घेतले. आज ते लिहून पूर्ण केले. हे पुस्तक लिहायला घेतले व मी लिहीत आहे, असे कळल्यावर बर्यानच जणांनी ‘चोखोबावर आज लिहायची गरज काय? त्याची आवश्यकता नाही,’ असे मला म्हटले. काहींनी तर हेही म्हटले की, ‘तुम्ही बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करता, अन् हे संत चोखोबाचे चरित्र का लिहिता?’
आज जिकडे तिकडे धर्माकडे लोकांचा कल अधिक झुकला असला तरी एकाच चाकोरीतून जाणार्यांलची संख्या वाढत आहे. जातीयता अशी वाढत्या प्रमाणावर आहे, तितक्या प्रमाणात जरी धर्माकडे कल नसेल तरीपण आज तो वाढत्या प्रमाणात आहे, हे नाकबूल करता येणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ दिनी बौद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेऊन उपस्थित असलेल्यांना दीक्षा दिली. त्यानंतर दलित व अस्पृश्यांनी बौद्ध धम्माची कास धरणे मोलाचे व आत्मीयतेचे आहे. त्यांचे राजकीय मतभेद तीव्रतम असतील पण बौद्ध धम्माचे बाबत मात्र तेवढी तीव्रतेची मतभिन्नता दिसून येत नाही. तेवढ्यात हे भाग्य. अशाहीवरून मला वरील प्रश्न , माझ्या अगदी जवळच्या माणसांना तसेच कारण नसताही विरोधकांना विचारणे आवश्यक वाटले असावे.
मी १९४४ सालापासून चोखामेळा वसतिगृह, चंद्रपूर या संस्थेचा सचिव म्हणून काम करीत आहे. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर या संस्थेचे नावच बदलून टाका, असे काहींनी मला म्हटले. पण मी त्यांना प्रतिप्रश्नौ केला, ‘या नावात वाईट काय? नुकसान काय?’ उत्तर मात्र काहीच नाही. मी त्यांना म्हणालो की, चोखामेळा हा अस्पृश्यातील एक थोर संत. इतर झालेल्या संतांपेक्षा निराळा.
`Chokha is an eminant example of the power of God`s grace. That grace had been magnified in Azamela and other sinners of outcaste origin. But those did not possess the added gift of song. It should be added further that Chokha`s influence on the Vaishnava mind is due to a fact which is ture of Tukaram in a later generation, their speech being that of the common folk probably exercised a more potent influence on a popular religious movement than the more learned and polished language of the brahmins culture in Dnyanoba and his brethrem. Moreover the thought of Chokhoba is more intensely devotional than that of his contemporaries.
‘Mahar Folk’ – By Alexander Robertson N. A.
यावरून इतर संतांपेक्षा चोखोबा अगदीच निराळे होते, हे उघड दिसते. फक्त चोखोबांनाच अभंगवाणीचे सामर्थ्य होते. इतर वैष्णवांवर चोखोबांचे फार वजन होते. कारण त्याचे कवित्व. त्या काळात म्हणजे १३व्या व १४व्या शतकात त्यांचे इतर समकालीन संत व इतर चोखोबास मानीत. शिवाय आपल्यातून आजपर्यंत असा संत झाला नाही व पुढे होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्याकाळी संत लोकांनी संतांकडेच पाहिले. संतांचा विटाळ केला नाही. पण इतर अस्पृश्यांकडे संतांनी दुर्लक्ष केले. माणूस म्हणून माणसाकडे पाहिले नाही, हे विधान खरे आहे. पण त्या काळच्या मर्यादा सांभाळून आपल्या समाजाकरिता काही कार्य चोखोबांनी केले नाही काय? किंवा आपल्या लोकांची कळ त्यांनी सोसली नाही काय? किंवा समाजासाठी काहीच केले नाही काय? चोखोबांचे अभंग बारकाईने वाचले व अभ्यासिले तर त्या काळातदेखील त्यांनी आपल्या समाजासाठी फार झीज सोसली. ‘त्यांच्यासाठी क्रांतिकारक असे कार्य केले. कारण चोखोबाचा छळ पदोपदी व क्षणोक्षणी झाला, सारे जीवन त्यांना छळातून व अपमानातून काढले लागले. असे का? एक तर ते महार होते. त्यांची थोरवी धर्म मार्तंडांना व ब्राह्मणांना, बडव्याला पाहवत नव्हती. ती त्यांना सहन होत नव्हती. शिवाय दुसरे असे की, सामाजिक व आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असली तरी आपल्या समाजाची कड ते घेत असले पाहिजेत,’ कारण त्यांनी जे अभंग केले आहेत, ते पहा. यावरून समाजाची कड ते घेत असत हे अगदी उघड आहे.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ | पुराणे अमंगळ विटाळाची ॥
ब्रह्मिया विटाळ विष्णुसी विटाळ | शंकरा विटाळ अमंगळ ॥
जन्मता विटाळ मरता विटाळ | चोखा म्हणे विटाळ आदि अंती ॥
हे सर्वच विटाळलेले आहेत, वेद, पुराण, ब्रह्मा, विष्णू अन् शंकरासीही विटाळ आहे. यातून कोणीच सुटले नाही.
चोखा म्हणे मज नवल वाटते | विटाळा परते आहे कोण ॥
माझा व माझ्या समाजबांधवांचा तुम्ही विटाळ करता. पण खरे काय ते तुम्हास कळत नाही. केवळ आमचेवर सारा भर दिसतो. चोखोबा म्हणतात,
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ | चोखा तो निर्मळ नाम गाय ॥
जो विटाळ करतो त्यास तेच फळ मिळते. माझा व महार समाजाचा विटाळ करून काय उपयोग?
अरे चोखा कसा आहे | चोखा तो निर्मळ गाय नाम ॥
चोखा अगदी निर्मळ आहे. पवित्र आहे. चोखोबा म्हणतात…
धिक् तो आचार धिक् तो विचार | धिक् तो संसार धिक् जन्म ॥
धिक् ते पठण धिक् ते पुराण | धिक् यज्ञ हवन केले तेणे ॥
धिक् ब्रह्मज्ञान वाउग्या ह्या गोष्टी | दया क्षमा पोटी शांती नाही ॥
अशा प्रकारे सर्वांचाच ते धिक्कार करतात. कारण जेथे ‘जया क्षमा पोटी शांति नाही’ ते सर्व अगदी धिक्कारण्याजोगेच आहे.
अशाप्रकारे टीका करणार्या’चा हक्क बजावला आणि अभंगाद्वारे आपली बाजू सार्यांरसमोर मांडली आणि म्हणूनच ‘धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मारती कोण हा अपराध’, असा खोटाच आळ आणण्याची गरज काय? केवळ चोखोबांकडे इतर संत व ब्राह्मण आले किंवा चोखा मावंद्याचे वेळी इतर संतांकडे जेवायला गेले तर चोखोबा म्हणत ‘पंढरीचे ब्राह्मण देखतील कोन्ही | बरे मज लागुनी न पाहती जन|’. ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रा करून नामदेव पंढरपूरला परत आल्यावर देवाने मावंदे घातले. त्याला सर्व संतमेळा उपस्थित होता.
चोखामेळा बंका भक्तवत्सल लाडका | तो बोलविला देखा आरोगणे ॥
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार | आवडता डिंगरू केशवाचा ॥
ऐसे थोर साने सकळ भक्तराणे | देवे आरोगणे बोलाविले ॥
अशा पंगती झडत. त्यावेळी चोखा उपस्थित राहत. पण चोखोबा भीत असत. ‘मला मारतील, छळतील’, असे ते म्हणत. कारण चोखोबाची कोणतीही सामाजिक उन्नतीची कृती त्यांना आवडत नव्हती. सहन होत नव्हती. हे चोखोबाचे थोर कार्य मी लोकांसमोर मांडू लागलो. सांगू लागलो. समजणार्यांमना ते पटत होते.
पण त्यातल्या त्यात प्रश्नप विचारणार्यां्ना संतांची कार्यप्रणाली पसंत नव्हती हेच खरे कारण. त्यांना तत्कालीन परिस्थितीची सामाजिक, धार्मिक पकड अस्पृश्यादी अतिशूद्रांवर व शूद्रांवरदेखील किती पक्की व जाचक होती, याची कल्पनाच नसावी. आपल्या केवळ स्वार्थासाठी, बडेजावासाठी धर्माची बाजू मांडून लोकांचा छळ करण्यात ब्राह्मणांनी काहीही शिल्लक ठेवले नाही. धार्मिक व सामाजिक तसेच आर्थिक बंधनांनी सारा समाजच दुबळा व संघटितदृष्ट्या खिळखिळा करून टाकला होता. ग्रंथप्रामाण्यापलीकडे माणुसकीची पाऊलवाट त्यांना दिसतच नव्हती. समजून उमजून डोळ्यावर कातडे ओढले होते. ते केवळ आपला स्वार्थ व महत्त्व कायम ठेवण्यासाठी आणि अशा या जाचक परिस्थितीतून वारकरी पंथाचे अध्वर्यू ज्ञानेश्वारदेखील सुटले नाहीत. त्यांचा पण छळ. का? तर म्हणे संन्याशाची मुले. केवळ एवढ्याचसाठी ज्ञानेश्व रादी भावंडांचा छळ ब्राह्मणांनी केला आणि याची जाणीव ठेवून व प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ज्ञानेश्वबरांनी स्त्री – शूद्रांना भक्तिपंथाची वाट मोकळी केली. संत चोखामेळास, संत म्हणून समान वागणूक दिली जात होती. ज्ञानदेव व नामदेवाबरोबर चोखोबादेखील यात्रेस गेले होते हेही एक कारण असले पाहिजे. या भावंडांना इतका जाच, छळ व अपमान भोगावा लागला की, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वकरा’, असे म्हणण्याची पाळी मुक्ताईवर आली आणि म्हणूनच ज्ञानेश्व्रांनची स्त्री-शूद्रांची कड घेतली. त्यांना भक्तिपंथांची द्वारे सताड उघडी केली. संस्कृत ऐवजी माझा मराठाची बोल कवतुके मिळवीन, असे स्पष्ट म्हणून ज्ञानेश्वोरी मराठीत लिहिली. म्हणूनच ज्ञानदेवांनी, शंकराचार्य, रामानुज, गोरक्षनाथ प्रभृतींच्या तत्त्वप्रमाणालीतील जे स्वतःला श्रेय आणि प्रेय वाटले ते आत्मसात करून, धड शैव नव्हे आणि धड वैष्णव नव्हे, असा स्वतःचा स्वतंत्र संप्रदाय निमार्ण केला. ज्ञानेश्व्री हा त्या संप्रदायाचा आकार ग्रंथ आहे. शंकराचार्यांचे अव्दैत आणि नैष्कर्म्य व गोरक्षनाथाचा योग आणि नैर्गुण्य ही दोन्हीही लोकांच्या डोक्यावरून जातील, अशी त्यांची खात्री होती. तोंडाने अद्वैत बोलायचे आणि आचरण मात्र सर्व विषमतेने ग्रस्त झालेले असायचे, तोंडाने जनग्निध्यात्व बोलायचे आणि जीवमात्र सदा प्रपंचात गुरफटलेला असावयाचा व तोंडाने नैर्गुण्य बोलावयाचे आणि देवळात मात्र मूर्तीचा मेळावा मांडलेला असावयाचा हा सगळा समाजात बोकाळलेला दंभ आणि मिथ्याचार ते पाहत होते. वर्णाश्रम धर्माच्या होमकुंडात आपल्या आई – वडिलांची कशी आहुती पडली आणि ब्रह्मवृंदाच्या कर्मठपणामुळे आळंदीहून पैठणपर्यंत आपल्या भावंडाची कशी ससेहोलपट झाली, याचा अनुभव तर त्यांनी स्वतः प्रत्यक्षच घेतलेला होता. धर्माचा आणि देवाचा कृपाकटाक्ष आपल्यावर पडावा म्हणून समाजातले कोट्यावधी यातिहीन, चातुर्वर्ण्याच्या शिवेबाहेर कसे ताटकळत आणि तळमळत उभे होते, याचीही त्यांना जाणीव होती. म्हणून ‘नाही श्रुति परौति | माऊली जगा’, अशी ज्या या ज्ञानराजाची वेदांविषयी भावना होती, त्याने ती श्रुतिमाऊली समाजातल्या सगळ्या हीनदीनांना पाठमोरी झालेली पाहून, त्यांच्या उद्धाराच्या तळमळीने ज्ञानेश्वेरी हा असा ग्रंथ निर्माण केला की, जो जनतेने ‘माऊली’ म्हणून नितांत भक्तिभावाने आपल्या शिरी धारण करावा.
वेदु संपन्नु होय ठाई | परी कृपणु ऐसा आगु नाही ॥
जे कानीं लागला तिही | वर्णाच्याची ॥
येरा भवव्यथा ठेलिया | स्त्री शुद्रांदिका प्राणिया ॥
अनवसरु मांडुनिया | राहिला आहे ॥
तरी मज पाहता ते मागील उणे | केशक्या गीतापणे वेदु वेठला भलतेणे | सेव्य हेआवया ॥
इतकेच नव्हे, तर नवव्या अध्यायात, भगवंताच्या सुखाने, त्यांनी असे अभिवचनही भरीला दिलेले आहे की,
म्हणौनि कुळ जाती वर्ण | हे आघवेचि गा अकारण ॥
एक अर्जुना माझे पण| सार्थक एक ॥
जैसे तंवची वहाळ वोहळ | जंव न पवती गंगाजळ
मग होऊनी ठाकली केवळ गंगारुप ॥
तैसै क्षत्री वैश्य स्त्रिया | कां शूद्र अंत्यजादी |
जाती तंवची वेगळालिया | जंव न पवती माते ॥
या लागी पापयोनीही अर्जुना | कां वैश्य शूद्र अंगना ॥
माते भजता सदना | माझिया येती ॥
त्यांचे परात्पर गुरू गोरखनाथ यांनी संस्कृतप्रमाणे लोकभाषेत केलेली ग्रंथरचना त्यांच्या डोळ्यापुढे होती. त्याचप्रमाणे आद्य मराठी नाथपंथीय कवी मुकुंदराज यांनी लोकांच्या भाषेतून केलेला ब्रह्मविद्येचा सुकाळही त्यांनी बघितलेला होता व महानुभाव पंथाने तर मराठी हीच मुळी आपली धर्मभाषा केलेली होती. या पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानदेवांनीही हे ‘धर्मकीर्तन’ मराठीतून केले. तरीपण ज्ञानोबांनी एक पथ्य पाळलेच. वेदांताची व ब्राह्मणी वर्चस्वाची बाजू त्यांनी उचलून धरलीच. शिवाय ज्ञानेश्वररांना वेदांतावर, विषमतेवर, ब्राह्मण्यावर आणि परंपरा, रुढी व अंधश्रद्धेवर भगवान बुद्धासारखा तीव्र हल्ला करावासा वाटला नाही. कारण लोकांच्या सामाजिक व धार्मिक भावना दुखवू नये, त्यांना गोंजारुन सावरुन घ्यावे अन् लोकांशी गोडी गुलाबीने वागून त्यांच्यात मनपरिवर्तन घडवून आणावे, हा हेतू त्यामागे असावा. म्हणून वारकरी पंथाची ज्ञानदेवांनी आखून दिलेली चाकोरी कोणाही संताने ओलांडलेली नाही, उल्लंघिली नाही. शिवाय ज्ञानदेव म्हणतात,
सांये शूद्राघरी आघवी | पक्वाने आहाति वरबी ॥
ती द्विजें केवी सेवावी | दुर्बळु जरी जाहला ॥
जातिभेद हा नैसर्गिक व क्रमप्राप्तच आहे. ज्याप्रमाणे स्वतःच्या काळे गोरेपणाबद्दल कोणी तक्रार करीत नाही, त्याप्रमाणे विशिष्ट जातीत जन्मल्यामुळे पाळाव्या लागणार्या निर्बंधाबद्दल तक्रार करण्यात काही औचित्य नाही, अशीच त्यांची शिकवण होती.
तैसे वर्णाश्रमवशे | जे करणीय आले असे ॥
गोरेया अंगा जैसे | गोरेपण ॥
म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणाची कल्पना याबाबतीत तरी सहज काय ती दिसून येते. अशा परिस्थितीत चोखोबा काय करू शकत होते? त्यांनाही वारकरी पंथाचे एक म्हणून पथ्य पाळावेच लागले. याची जाणीव त्यांना होती. तरीपण या जाचक रुढींना चोखोबांनी विरोध दर्शविला नाही काय? त्यांनी परंपरा, जातियता, ब्राह्मण्य आणि ग्रंथप्रामाण्य यांचेवर हल्ला चढविला नाही काय? त्याचा निषेध केला नाही काय? ह्याच प्रश्नां चा संत चोखोबांचेबाबत विचार करू.
चोखोबांनी फक्त पंढरीच्या विठोबालाच शरण जाण्याचे ठरविले. याचे कारण तेथे जाती कुळाचा, विषमतेचा विचारच नाही. म्हणून चोखोबा म्हणतात.
बहुत कनवाळु बहु हा दयाळू | जाणे लळा पाळू भाविकांची ॥
जात वित गोत न पोहेचि काही | घालावी ही पायी मिठी उगी |
न मागता आभारी आपोआप होती | भाविकांसी देतो भक्तीमुक्ती ॥
चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी | भवभय वारी दरुशने ॥
न पाहे उंचनीच याती कूळ | स्त्री शूद्र चांडाळ सरते पायी |
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला | म्हणोनिया स्थिरावला भीमातटी ॥
वर्ण अभिमान न घरी काही चाड | भक्तिसुख गोड तयालागी ॥
म्हणजे चोखांबांचे अंतःकरण कुठे स्थिरावले होते. याची कल्पना येते. म्हणून हा प्रश्न दूरवर विचार करायला लावतो. चोखोबाने येथे अगदी मुळातच हात घातला. दुसर्या कोणत्याच देव – देवतांवर, ग्रंथावर अन विचारावर अंतिम श्रद्धा ठेवली नाही. आपले अंतर डगमगू दिले नाही. हाच त्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा, साधुत्वाचा केंद्रबिंदू. याचा विचार केला की वाटू लागते भगवान बुद्धाच्याच तत्त्वांचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला, असे का म्हणू नये? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती ही भगवान बुद्धाचीच आहे, असे स्पष्टपणे सांगितले नाही काय? इतर क्षूद्र संतांनीदेखील हाच घोष पांडुरंगाबाबत ठेवला. पण चोखोबाचा मानबिंदू समता, अभेद हाच होता. तोच त्यांचा देव अन् चोखोबा तोच देव अंतरी पाहतात.
माझा मज देव दावियेला देही | मी तू पण गेले ठायीच्या ठायी॥
म्हणजे सर्व मानवी प्राण्यांच्या देहात तोच देव आहे, दुसरा नाही. म्हणजे चोखोबांनी येथेच समतेचा व बंधुत्वाचा पुरस्कार केला, पुकार केला, असेच म्हणावे लागते. चोखोबांचे ६ अभंग केवळ विटाळावर आहेत. हे अभंग एकदा वाचा म्हणजे यात विटाळावर चोखोबाने किती तीव्र अन् प्रखर हल्ला केला हे दिसून येईल. या विटाळापासून अगदी अलिप्त असा कोण आहे, असा प्रश्नत करून चोखोबा म्हणतात, ब्रह्मा, विष्णु व महेश हेदेखील विटाळापासून अलिप्त नाहीत. मग माझा विटाळ करण्यात वैशिष्ट्य काय? इतकेच नव्हे तर विटाळ आदि अंती आहे. असे कोणते स्थळ आहे की जे विटाळाशिवाय आहे?
इतका प्रखर व तीव्रतम हल्ला विटाळावर त्याच्या समकालीनांपैकी कुणीच केला नाही. फक्त ते अतिशूद्र चोखाबाच करू शकले. इतरांनी हे मनोधैर्य दाखविले नाही. इतका उघड व स्पष्ट आवाज ब्रह्मा – विष्णु – महेशा विरुद्ध फक्त चोखाच काढू शकतो. विटाळ केवळ चोखोबांचाच केला जात होता. म्हणून नव्हे तर त्यांच्या सार्याण समाजाचाच विटाळ केला जात होता. हाच शूद्ध हेतू चोखोबाचा असला पाहिजे आणि मग चोखोबांचा छळ व्हायचे खरे कारण हेच की नाही? कारण ब्राह्मणांचे, धर्ममार्तंडांच्या अंतरीचे मर्मस्थान वेदांत व गीतेवर प्रखर टीका. जो कोणी वेद, वेदांत व गीता यावर टीका करील त्याची हे लोक मुळीच दया करीत नाहीत. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करायला ते मागेपुढे पाहणार नाही. अन् चोखोबांनी तर हेच केले. वेदशास्त्रे, पुराणे यांना त्यांनी मोकळे सोडले नाही. त्याची चोखोबांनी मुळीच गय केली नाही. त्यांचेवर प्रखर टीका केली आणि म्हणून चोखोबांचा इतका अनन्वित छळ झाला. हे २०वे शतक असे असताना बाबासाहेबांचेबाबत ते कायदेमंत्री असताना देखील असेच घडले. नवोदित स्वतंत्र भारताची कायद्याची चौकट मजबूत करण्यासाठी कायदेमंत्रीपद, काँग्रेसचा स्वातंत्र्यपूर्व काळातील तीव्र विरोध विसरुन डॉ. बाबासाहेबांनी स्वीकारले. त्यानंतर ते रंगूनला गेले. तेथे डॉ. आंबेडकरांनी वेद व गीतेवर अत्यंत जहाल व प्रखर टीका केली म्हणून डॉ. आंबेडकरांना मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करा म्हणून ब्राह्मणांनी व धर्ममार्तंडांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडे गळ घातली, हे अगदी उघडच आहे. मग चोखोबांनी वेद – शास्त्रे – पुराणे धिःकारली त्या काळचा म्हणजे १३व्या १४व्या शतकाचा विचार करता, चोखोबांचा छळ होणे अगदी साहजिक होते. चोखोबांचा आणखी एक अभंग पहा.
धिक् तो आचार, धिक् तो विचार | धिक् तो संसार धिक् जन्म ॥
धिक् ते पठण धिक् ते पुराण | धिक् यज्ञ हवन केले तेणे ॥
धिक् ब्रह्मज्ञान वाऊग्या ह्या गोष्टी | दयाक्षमा पोटी शांती नाही॥
चोखा म्हणे धिक् जन्मला तो तर | भोगी नरक घोर अंतकाळी ॥
चोखोबा या सर्वांचाच धिक्कार करतात. त्यासाठी चोखोबांनी त्या काळात जे असाधारण, विलक्षण धैर्य दाखविले त्याचे मोल फार मोठे आहे. अजोड आहे. अतुलनीय आहे. याचा आपण विचार केला म्हणजे चोखोबांनी हे सारे आपला जीव पणास लावूनच केले व तेदेखील सार्याी समाजाकरिताच केले, असेच म्हणावे लागते.
तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात. ‘अधिकार तैसा करु उपदेश’. या म्हणण्यात बरेच तथ्य आहे. संत नामदेव हे संत चोखोबांचे गुरू. त्यांनीच चोखोबांस दीक्षा दिली. चोखोबांची तेवढी पात्रता होती, योग्यता होती म्हणून त्यांना संत नामदेवांनी गुरुमंत्र दिला. याचाच अर्थ असा, की चोखोबांनी आपल्या तपःसार्थ्याने तेवढी पात्रता कमविली.
संत चोखोबांनी आपल्या गुरुची थोरवी गायिली आहे. त्यावर त्यांचे ३२ अभंग आहेत. त्यात ते म्हणतात,
धन्य धन्य नामदेव | माझा निरसिला भेव ॥
विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी | खुण सांगितली निर्धारी ॥
ठेवोनिया माथा हात | दिले मज माझे हित ॥
दावियले तारु | चोखा म्हणते माझा गुरू ॥
गुरुची स्तुती गायिली. पण गुरुला परमात्मा, ब्रह्मा, विष्णू असे म्हटले नाही. ज्ञानदेवांनी आपल्या गुरुला ब्रह्मा, विष्णू, परमात्मा असे गौरविले, तसे चोखोबांनी संत नामदेवास गौरविले नाही. त्यांनी संत नामदेवास देही देव दाखविला, असेच म्हटले आहे. त्याचेबद्दल आदर दाखविला. महती गायिली. पण ते एक माणूसच होते ही धारणा गुरुबद्दल कायम ठेवली. यावरून असे म्हणता येईल, की त्यांना विभूतीपूजा मान्य नव्हती. हे चोखोबांचे एक आगळे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
आपल्या समाजात बरेच संत झाले. त्यांनी तपःसामर्थ्याच्या बळावर फार मोठे स्थान लोकमानसात पटकाविले होते. पण चोखोबांच्या हृदयातून जी अभंगवाणी स्रविली, ती जशी साधी, सोपी, सरळ व ओघवती आहे तशी ती हृदयाचा ठाव घेणारी आहे. ज्या अंतरातून ती अभंगगंगा उत्स्फुरली ते अंतःकरण अती पवित्र, विमल अन् विशुद्ध आहे. म्हणूनच चोखोबांचे काव्य वाचकांच्या हृदयात घर करून बसते. तो काव्यरस थोडा चाखून पहा. तिच्यातील अवीट गोडीची कल्पना येईल. चोखोबांना हे सर्व करण्यात, मनोधैर्य दाखविण्यात एवढा दांडगा आत्मविश्वा स कुठून आला? त्याला उत्तर एकच.
शुद्ध चोखामेळा | करी नामाचा सोहळा ॥
यातच आहे. चोखोबांनी स्वतःच एका अभंगात म्हटले आहे की, माझी समाधी कसल्याच भीतीने भंग पावत नाही. ती सर्वच व्यवहार करीत असताना कायम असते. याला कारण ते म्हणतात, ‘अंतर शुद्धि’ आणि म्हणून असे लोक लक्षामांजि एक असतात. यात पवित्रतम अंतःकरणाचे बळावर ते या महतीला, थोरवीला पोहोचले, हे अनेक साधुसंतांनी गायिले आहे, गौरविले आहे. त्याला विरोध करायची, ती खोटी ठरवायची, त्याचेवर ‘तुझेच कंठी हार कैसा आला’ असा खोटाच आळ घेऊन कलंकित करण्याची कोणाची प्राज्ञा आहे? अशा माणसाचे शब्दसामर्थ्य किती प्रभावी असेल. किती लोकांना मोहून टाकीत असेल. ती पवित्रतम वाणी कानावर पडावी म्हणून कित्येकांचे कान एकाग्रतेने टवकारलेले असतील. किती तरी लोक ती वाणी ऐकायला चातकवृत्ती धारण करीत असतील, हे कुणी सांगावे. चोखामेळा अभंग गात होते हे निश्चिकत. पण ते कीर्तन करीत होते की नाही हे सांगता येत नाही. पण त्या काळात जे संत थोर अन् प्रभावी म्हणून गणले गेले त्या तिघांपैकी ज्ञानदेव, नामदेव, चोखाबा – चोखोबा एक होते. अशा थोरवीचा, समाजाबद्दल कळकळ बाळगणारा, झटणारा माणूस प्रचार करण्याचे त्या काळातील माध्यम जे कीर्तन होते ते करीत नसेल कशावरून?
जशी परिस्थिती १३व्या, १४व्या शतकात होती व त्या काळात ज्ञानेश्वथर, नामदेव व चोखामेळा हे तिघे प्रभावी संत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात म. गांधी, बॅ. जीना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन नेते आपल्या सामर्थ्याचे तेजाने तळपत होते. या तिघांच्याही शब्दांत सामर्थ्य होते. म. गांधींचे शब्दांवर, ‘राजा बोले दळ हाले’ ह्याप्रमाणे सारा भारत स्वातंत्र्याचे अग्निकुंडात आहुती द्यायला एका पायावर तयार होता. वाटेल तो त्याग करायला तयार होता. तर बॅ. जीनांच्या एका शब्दावर पाकिस्तानची री ओढायला त्यांचा मुस्लीम समाज तत्पर होता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, अस्पृश्यांचे हक्क, स्वातंत्र्य मिळाल्यावरदेखील, सुरक्षित राहावे म्हणून जी घोषणा केली, तिची अंमलबजावणी करण्याकरिता सारा अस्पृश्य भारत बाबासाहेबांचे एका शब्दावर, प्राणाहुती द्यायला एका पायावर तयार होता.
आणि अशीच परिस्थिती १४व्या शतकात होती, असेच म्हणावे लागेल. वारकरी पंथाची पायाभरणी करण्यासाठी ज्ञानदेवाने वारकरी पंथाच्या तत्वज्ञानाची चौकट बसवून ‘माझा मराठाची बोल पैजा जिंके’चा ओवीबद्ध ज्ञानेश्व‘री ग्रंथ शिरोधार्ह मानून ब्राह्मण व इतरही समाजाने नामघोषांनी जशी सारी पंढरी दुमदुमून टाकली, तसेच नामदेवाने वारकरी पंथाची पाळेमुळे खोल रुजावीत म्हणून भक्तीसामर्थ्याचे बळावर वारकरी पंथांचे प्रचारार्थ महाराष्ट्र व उत्तर भारत पायाखाली तुडवून सारा शुद्र व इतर समाज जागृत केला. त्याप्रमाणे आपल्या पवित्रतम साधुत्वाच्या बळावर, चोखोबाने सार्याण समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त करून, वारकरी पंथांची धुरा उचलण्यास अतिशूद्रांना आवाहन करून जागृत व प्रवृत्त केले आणि पंढरी नगरीत चंद्रभागेच्या पोटात नामाचा सोहळा करून सारा पंढरी परिसर टाळ-मृदंगाच्या घोषाने निनादून सोडला हे विसरता येणे शक्य नाही.
अखेर चोखोबांची थोरवी, त्यांचे निष्कलंक चारित्र्य अन् संतत्व ब्राह्मण व धर्मंमार्तंडांपासून तर तळातील लोकांपर्यंत सर्वांना कळून चुकले होते. त्याची महती आता सर्वच जाणत होते. म्हणूनच मंगळवेढ्यास इतर महारांबरोबर मरण पावल्यावर त्याच चोखोबांच्या अस्थी असतील या दृढ विश्वापसावर त्यांचे गुरू संत नामदेवांनी आपल्या आचणी धरुन पंढरपुरास, दिंडी पताकासह मोठ्या समूहासह आणल्या आणि सार्यार जनसागरासमक्ष नामघोषांचे व टाळ-मृदुंगाचे गजरात विठ्ठल मंदिराच्या पहिल्याच पायरीत त्या पुरविल्या. हे थोर भाग्य केवळ चोखोबांना लाभले. ज्या देवळात देवदर्शनास जाऊ दिले नाही. त्याचा पदोपदी छळ केला, ज्याला चंद्रभागेच्या दुसर्याल तीरावर बसून दीपमाला तयार करून तेथूनच विठ्ठलाचे ध्यान करावे लागले, अशा त्या चोखोबांच्या अस्थी पहिल्या पायरीजवळ पुरविल्या जाण्याचे भाग्य लाभले हे काय कमी मोलाचे झाले?
लाज येईल तुमच्या नावा आध्यात्मिक मुक्ती ते भौतिक मुक्ती