चोखोबांच्या नावानं मुलींची शाळा सुरू करणारे, चोखोबांवरील पहिला अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे आणि ‘चोखामेळा’ नावाचं वृत्तपत्र सुरू करणारे किसन फागुजी बनसोड. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भभर परिवर्तनाचे विचार पोहोचवणारे हे चोखोबाभक्त.
विदर्भात पहिल्यांदा सामाजिक परिवर्तनासाठी झगडणारे आणि सामाजिक क्रांतीचे अग्रणी मानले जाणारे किसन फागुजी बनसोड यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८७९ रोजी नागपूर पासून २४ किलोमीटर अंतरावर असणार्यार मोहपा या गावी झाला. ते त्या काळातील महाराष्ट्रातील पहिले नॉर्मल स्कूलचे ट्रेण्ड अध्यापक होते. परंतु त्यांनी अध्यापकाची नोकरी केली नाही. अस्पृश्य समाजात जन्माला आल्यामुळे तसेच त्याकाळी अस्पृश्यांशी सवर्णांची असणारी हीनतेची वागणूक बघून, आपला समाज अज्ञानात, दारिद्र्यात आणि गुलामीत जीवन जगत असल्याची जाणीव त्यांना झाली.
आपला हिंदू धर्म आपल्याला जनावरापेक्षाही हीन वागणूक का देतो, याविषयी त्यांच्या मनात सतत वैषम्य असे. त्यांनी १९०९ साली ‘मुंबई वैभव’मध्ये जो लेख लिहिला त्यात ही भूमिका अधिक स्पष्ट होते. ते आपल्या या लेखात म्हणतात, ‘हिंदू बांधवांनो, आमच्या मांग चांभारादी लोकांत कोणती वाईट चाल आहे म्हणून आपण आम्हास दूर करिता? मेलेली गुरे ओढण्याचा धंदा करितात म्हणून अस्पर्श मानिता काय? मेलेली गुरे ओढीपर्यंत ओढणारास अस्पर्श समजा. पण गुरे ओढीत नाही तेव्हाही त्यांना का अस्पर्श मानिता?’ किंवा ‘एखादेवेळी श्वान पंगतीतून गेलेले पुरवते पण आम्ही महारमांगादी लोक दुरून जाता कामा नये. रक्तपितीच्या आजाराने रोगग्रस्त झालेल्या मनुष्याचा पदर लागला तर दिक्कत वाटत नाही पण चांगल्या सशक्त निरोगी महारमांगाचा पदर लागल्याचा संशय आल्यावरून सचैल स्नान का करिता?’ असा प्रश्न अत्यंत नम्रपणे ते इथल्या आपल्या हिंदू बांधवांना विचारतात.
किसन फागुजी बनसोड यांच्या या आणि अशा विचारांवर संत चोखामेळा यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचं दिसून येतं. चोखामेळा यांनाही विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता, मंदिराच्या पायथ्याशी उभं राहून त्यांनी परमेश्वराची भक्ती केली. चोखामेळा यांना इथल्या धर्माच्या कर्मठ ठेकेदारांकडून जो त्रास सहन करावा लागला, तशीच स्थिती किसन फागुजी बनसोड यांच्या काळातही होती. विसाव्या शतकातही अशी भेदभावाची आणि उच्चनीचतेची समाजव्यवस्था बघून त्यांचं मन पिळवटून जायचं. त्यामुळे हिंदू समाजात असणारी अस्पृश्यता नाहीशी व्हावी आणि माणसाला त्याच्या मनुष्यत्वाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ‘सन्मार्गबोधक अस्पृश्य समाज’ या नावाची संस्था १९०१ साली नागपूर येथे काढली. तसंच नागपूरच्याच पाचपावली भागात १९०७ साली ‘चोखामेळा मुलींची शाळा’ काढली. त्यांनी वसतिगृहं, फिरतं
वाचनालय, नवसाक्षर प्रौढ वर्ग यांच्या माध्यमातून आपलं कार्य सुरू ठेवलं. या शैक्षणिक, सामाजिक कार्यासोबतच त्यांनी साहित्यनिर्मितीही केली.
पूर्वीच्या विदर्भात म्हणजे १९२०-३०च्या कालखंडात किसन फागुजी बनसोड यांनी केलेल्या कामांवरून महारांना धार्मिक हक्क मिळवून देण्यावर त्यांचा भर असल्याचं दिसून येतं. तसंच या भागात भक्ती चळवळ पुरेशी रुजली नसतानाही ते स्वतः पंढरपूरला गेलेत. त्यांनी चोखामेळा यांचे अभंग गोळा केले. त्यांनी महार लोकांना धैर्य मिळावं म्हणून चोखामेळांवर कविताही लिहिली. १९४२ साली प्रकाशित झालेलं ‘संत चोखामेळा चरित्र’, ‘सत्यशोधकी जलसा’ आणि ‘चोखामेळा दर्शन’ ही त्यांची साहित्य संपदा होय. त्यांनी १९०१च्या दरम्यानच शाहिरी रचनाही केल्यात. तमाशा आणि शाहिरी क्षेत्रात त्यांनी स्वतःचं ‘जलसा मंडळ’ काढलं.
‘एका साधूची फजिती’, ‘पारतंत्र विमोचन’ अथवा ‘अंत्यज सुधारणेचा मार्ग’ आणि १९३३ साली लिहिलेला ‘सनातन धर्माचा पंचरंगी तमाशा’ या त्यांनी लिहिलेल्या तमाशांनी पारंपरिक विषयांना छेद देऊन समाजाला परिवर्तनाचा नवा मार्ग दाखविला.
आपले विचार आपल्या समजातील सर्व लोकांपर्यंत पोचावेत म्हणून त्यांनी १९०१ साली ‘ह्यांड प्रेस’ काढून ‘निराश्रित हिंद नागरिक’, ‘मजूर पत्रिका’(१९१८), ‘चोखामेळा’(१९३१-१९३६) ही वृत्तपत्रं चालवली. त्याशिवाय ‘ज्ञानप्रकाश’, ‘सकाळ’, ‘सुबोध पत्रिका, ‘काळ’, ‘केसरी’, ‘राष्ट्रवीर’, ‘महाराष्ट्र’, ‘मुमुक्षु’ या वृत्तपत्रांमधून स्फूट लेखन केलं. त्यांच्या लिखाणात सामाजिक भान होतं. त्यांनी अत्यंत परखडपणे इथल्या विषमतेवर प्रहार केले. दलित-पीडित समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी लिहिलं,
साहू नका कुणाचा जुलूम
होऊ नका कुणाचा गुलाम
सोडून द्या रे सारे बदकाम
अस्पृश्य समाजानं आपलं जीवन स्वाभिमानानं व्यतीत करावं, आत्मसन्मान मिळवावा हीच यामागची भावना दिसून येते. अस्पृश्यांच्या पूर्वजांनी पराक्रम गाजवूनही त्यांच्यावर गुलामी का यावी? भीत-भीत जगण्याची वृत्ती का यावी? याविषयी ते लिहितात,
भीड धरुनी भ्याड वृत्तीने का रे जागले
सांगा तुमचे पूर्वज नाही युद्धी का लढले
शत्रूचा त्या करुनी वध
स्थापिला तुम्ही जयस्तंभ
कोरेगावी होता संबंध
महारांवर इथल्या ब्राह्मणांनी जे पशुतुल्य जीवन लादलं, त्याबद्दलही चीड व्यक्त करून ते लिहितात,
महार विसरतील कैसे
कृत्य तुमच्या पूर्वजांचे
या देशाचे मालक आम्ही
परी भोगतो रे गुलामी
भट-ब्राह्मणांनी अस्पृश्य समाजाला संस्कृतीहीन, अस्वच्छ, अपवित्र मानलं. परंतु किसन फागुजी बनसोड त्यांचीच लक्तरं वेशीवर टांगताना दिसतात. ते म्हणतात,
नका झोकू बढाया बाता
भट तुम्ही मांस खानेवाले
यज्ञात मारिता बैल
घोड्याचे करून हाल
खाता की प्रसाद खुशाल
अस्पृश्य समाजानं पेटून उठावं, त्यांच्यात स्वतःच्या लाचारीबद्दल चीड निर्माण व्हावी आणि त्यांनी त्यांच्यावर लादलेलं पशूतुल्य जगणं नाकारावं म्हणून ते म्हणतात,
थूः तुमच्या तोंडावर लेक हो
कसले वतनदार महार तुम्ही, कसले वतनदार
वतनदाराची बघा लेकरे फिरती दारोदार !!
धरुनी काठी, खेतर हाती
परि ऐट झोकदार, दावता तुम्ही
जोहार ना करी त्या मारी पाटील खेटर तोंडावर
थूः तुमच्या तोंडावर…..
गुरे ओढणे लाजिरवाणे
धिक हा संसार तुमचा रे
उच्छिष्टाची आस सदाची धड मिळेना भाकर
थूः तुमच्या तोंडावर…..
अंगण झाडणे, केर फेकणे
नित्याचा व्यवहार तुमचा रे
ह्या कामगिरीचे हक्क केव्हढे, उष्टे तुकडे चार
थूः तुमच्या तोंडावर…..
अस्पृश्यांच्या जगण्यावरचा जरी हा राग असला तरी त्यामागं त्यांची कणव आहे, हेही इथं लक्षात येतं. ही कणव अशी,
दलित बांधवा जाण रे
समजून घे ही खूण रे
भट पाशातून मुक्त व्हाया
कर काही यत्न रे
अस्पृश्यांनी शिकावं, लेखणी हाती घ्यावी आणि अपमानावर मात करून स्वाभिमान मिळवावा, म्हणून किसन फागुजी बनसोड यांची तळमळ दिसून येते.
उठ शिक तातडी बाराखडी, खडी तालीम सोड आता
धर स्वाभिमान, मिळवी मान, अपमान चुकवी तू पुरता
किसन फागुजी बनसोड यांनी कवी आनंद कृष्ण टेकाडे यांच्या ‘हा हिंद देश माझा’ यांच्या कवितेचं विडंबनही केलं आहे. त्या कवितेत हिंदुस्थानातील विषमतेचं वर्णन केलं आहे. त्यांनी तमाशासाठी लिहिलेल्या संहितांमधूनही सामाजिक विषमता आणि सामाजिक सुधारणा हाच विषय मांडला आहे. त्यांच्या ‘सनातन धर्माचा पंचरंगी तमाशा’तील सूत्रधाराचं स्वगत या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ‘या तमाशाच्याद्वारे समाजसुधारणेचं आणि धर्मसुधारणेचं शिक्षण देणं हाच आमचा उद्देश आहे.’
किसन फागुजी बनसोड यांच्या नव्या जाणीवेचा, उमेदीचा तमाशा उपरोधगर्भतेतून सामाजिक आणि सांस्कृतिक व्यंगावर मार्मिकपणे बोट ठेवणारा होता. त्यांच्या ‘एका साधूची फजिती’ आणि ‘पारतंत्र्य विमोचन’ या तमाशातही अज्ञान, अंधश्रद्धा आणि दांभिकता यावर त्यांनी प्रहार केला असून, सामाजिक जीवनातील विसंवादाचं स्फोटक दर्शन घडवलं आहे.
सर्वच समाजसुधारकांप्रमाणं किसन फागुजी बनसोड यांनाही शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. त्यांनी मुलींची शाळा काढली पण सवर्णांनी त्यांची झोपडी जाळून टाकली होती. पण तशातही ते डगमगले नाहीत तर त्यांनी अनेक ठिकाणी वसतिगृहं काढली, मजुरांचे-शेतकर्यांोचे प्रश्न हाताळले. ‘तरुण महार संघ’ या संस्थेचं नेतृत्वही केलं.
सतत संघर्षरत राहिलेल्या किसन फागुजी बनसोड यांचं वार्धक्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. तशातच १० ऑक्टोबर १९४६ला त्यांची जीवनयात्रा संपली. शेवटपर्यंत आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि सुधारणेसाठी लढलेला हा एकाकी शिलेदार काळाच्या पटलावरही दुर्लक्षितच राहिला. मात्र त्यांचं कार्य निश्चितच ऐतिहासिक स्वरूपाचं होतं.
आध्यात्मिक मुक्ती ते भौतिक मुक्ती वरळीचा वारकरी