चोखोबांसारख्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या संतानं भक्तीचा आदर्श उभा केला. असेच इतरही अनेक संत आहेत. त्यांपैकी तिरुप्पन अलवार, नंदनार, वीर कक्कय्या आणि रविदास या चोखोबांच्या समानधर्मांविषयी एक अभ्यासपूर्ण लेख.
काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका कविताविषयक कार्यक्रमात बोलताना मराठीमधील विद्रोही कवितांबाबत काही मुद्दे मांडले होते. त्यावेळचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे, समीक्षक डॉ. अंजली सोमण आदी मान्यवर या चर्चेत वक्ते होते. माझ्या भाषणात मी मराठीतील विद्रोही कवितेचा उल्लेख करताना संत चोखामेळा यांच्या रचनांचा संदर्भ दिला. मानवी हक्क आणि माणसाचा आत्मसन्मान याचा पहिला उच्चार चोखोबांनी केला, असं मी सांगितलं. मराठी भाषेत चोखोबांच्या अभंगांचं वेगळेपण हे माणसाची प्रतिष्ठा ज्यानं पहिल्यांदा उच्चारली, त्या या संताच्या लेखणीत आहे.
दलित आत्मचरित्रांचा अभ्यास करताना महाराष्ट्रातल्या संतपरंपरेतील आद्य समजले जाणारे संत ज्ञानेश्वार आणि त्यांची संत भावंडे यांच्याबाबत ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी केलेलं विवेचन त्यांच्या लेखनात वाचलं. दलित या संकल्पनेबाबत मी काही माहिती घेत होतो, त्या संदर्भात कुरुंदकरांचे लेखन वाचलं. त्यांनी या लेखात ज्ञानेश्वकरादी भावंडांना संन्याशाची मुलं म्हणून समाजानं बहिष्कृत केलं होतं, त्यामुळे एक प्रकारचं उपेक्षित आणि वंचित जीवन त्यांच्या वाट्याला आलं होतं, म्हणूनच तेही दलित वर्गात मोडतात, असं त्यांचं प्रतिपादन होतं. अर्थात ज्ञानेश्वारादी भावंडांना समाजाचा खूप जाच आणि त्रास झाला असला, ते बहिष्कृत झालेले असले, तरी विठ्ठलपंत कुलकर्ण्यांची ही मुलं म्हणून त्यांचा समावेश दलित वर्गात केला गेलेला नसावा. ज्या संयमानं आणि सोशिकतेनं या भावंडांनी आपलं आयुष्य सोसलं आणि हरिनामाच्या गजरात नंतर उभंही केलं, ही फक्त मराठी नव्हे, तर विश्वतसाहित्यातील एक अधोरेखित करावी, अशीच गोष्ट आहे. त्यांच्या वाटेवर नंतर जे संत मंडळ आले, त्यांनीही ज्या गोष्टी समाजाला सांगितल्या आणि स्वत: अनुसरल्या, ते सारेच संत मंडळ मराठी आणि भारतीय साहित्याचा एक अलौकिक बिंदू आहे. विशेषत: तेराव्या शतकातील चोखामेळा आणि सोळाव्या शतकातील तुकाराम यांच्या अभंगांतील बंडखोरी आणि मानवी हक्कांचा उच्चार या गोष्टी आवर्जुन नोंदवल्या पाहिजेत.
महाराष्ट्रातील संतपरंपरा आणि विशेषत: पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य आणि अन्यमागासवर्गीय (किंवा बलुतेदार वर्गातील) समाजातील संतांच्या रचना यांचा अभ्यास करताना हे जाणवतं की, या सर्वांचीच ‘जातकुळी’ काही वेगळी आहे. भारताच्या पश्चि्म टापूत उदयाला आलेल्या या संतपरंपरेचं आणि त्याला जोडलेल्या विचारांचं भारताच्या अन्य भागातील संतपरंपरेशी काही नातं आहे का, असं कुतूहल निर्माण होतं. भारताच्या उत्तर टापूत अनेक संत उदयाला आले आणि त्यांचा महाराष्ट्रातील भागवत धर्म परंपरेशी जवळचा संबंध आला. संत नामदेव भारत भ्रमण करीत वर उत्तरेला पंजाब राज्यातील घुमानपर्यंत गेले. नामदेवांच्या अनेक हिंदी रचना शीख धर्मीयांच्या आदि ग्रंथात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याखेरीज उत्तरेतील कातडी वस्तू बनविणार्यात समाजाचं श्रद्धास्थान असलेले संत रविदास (रोहिदास आणि रायदास ही दोन्ही संबोधनं त्यांना आहेत) यांच्याही काही रचना या आदि ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. उत्तर भारतात चर्मकार समाज हा पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रविदासांची मंदिरं आणि त्यांचे मठ यांची संख्या तेथे लक्षणीय आहे. मुख्यत: या समाजाचे ते आद्य संत मानले जातात. आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारा वर्ग या प्रदेशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरूक आहेच, शिवाय तो अग्रणीही आहे. शिवाय संत कबीर, संत सूरदास, गुजरातमधील संत नरसी मेहता, राजघराण्यातील स्नुषा असलेल्या संत मीराबाई, संत तुलसीदास आणि बंगालमधील चैतन्य प्रभू या संतांचंही महत्त्व निश्चि तच ठळक राहिलं आहे.
या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील संतपरंपरेचे धागे शोधायला हवेत. एका बाजूनं तेथील केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांतील प्रस्थापित व पुरोहितप्रधान धार्मिक व्यवस्थेतील अवडंबर आणि दुसर्यात बाजूनं वर्णाश्रमाच्या आणि जातीभेदाच्या व्यवस्थेखाली अस्पृश्य समाजाचा होणारा कोंडमारा या गोष्टी लक्षात घेताना तेथील संतपरंपरेचं वेगळेपण काय असू शकतं, हे विचारात घेतलं पाहिजे. आजही या तिन्ही राज्यांतील आणि लगतच्या आंध्र प्रदेशातही अनेक देवळांत अस्पृश्यांना अथवा मागासवर्गीयांना प्रवेश मिळत नाही. याबाबतीत जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नसल्याबद्दल गांधीजींनी त्यावेळी आपला विरोध व्यक्त केला होता. हा कुठला जगन्नाथ, हा तर गल्लीचा देव, अशी टीकाही त्यांनी केली होती.
अभ्यासकांनी आणि संतपरंपरेच्या जाणकारांनी याबाबत जे लेखन केलं आहे, त्यातून दक्षिण भारतातील संतांच्या कामगिरीचे तपशील आता उपलब्ध झाले आहेत. शैव आणि वैष्णव या दोन पंथांत विभागलेले तेथील प्रस्थापित आणि त्यांना बाजूला ठेवून शंकर आणि विष्णू या दोन देवतांना थेट भेटणारे आणि त्यांच्यात सामावणारी अस्पृश्य संतांची मांदियाळी यांचा शोध विविध साहित्यांतून घेतला गेला आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमधून संतसाहित्य आणि त्यातही तत्कालीन समाजातील अस्पृश्य आणि बलुतेदार वर्गातील संतांचं साहित्य सामान्यांपर्यंत सुकरपणे पोहोचलं आहे. या तुलनेत दक्षिण भारतातील संतांच्या रचना आणि त्याचे सामूहिक वाचन त्या प्रदेशात होत असलं तरी ते प्रभावी सामाजिक स्वरूप धारण करू शकलेलं नाही, असं वाटतं. दक्षिणेतील अनेक मंदिरांत तत्कालीन अस्पृश्य समाजातील संतांनी केलेल्या शंकर आणि विष्णू यांच्या भक्तीमय रचना आजही म्हटल्या जातात आणि घरांघरांतूनही त्याचं गायन-श्रवण होत असतं.
साधारणत: ९-१०व्या शतकात दक्षिणेतील अस्पृश्य समाजातील संत, त्यानंतर ११-१२व्या शतकापासून महाराष्ट्रातील या समाजातील संत मांदियाळी आणि नंतरच्या कालखंडात उत्तर भारतातील या वर्गातील संतांची कामगिरी अशा स्वरूपाचा हा आलेख आहे. हा आलेख एक अभ्यासक म्हणून पाहताना तीव्रतेनं जाणवतं की, महाराष्ट्रातील चोखामेळा आणि त्याचं कुटुंब, जनाबाई, एकनाथ या संतांनी ज्या रचना केल्या आहेत, त्या केवळ ईश्वटराचं गुणवर्णन याच्यापुरत्या मर्यादित नसून माणसाची प्रतिष्ठा आणि त्याचं आत्मभान यांनाही महत्त्व देणार्याा आहेत. उत्तर भारतात कबिराच्या रचना यादृष्टीनं मराठी संतांच्या रचनेतील आत्मभावाशी संगती ठेवणार्यात वाटतात.
दक्षिण भारतातील या संतांच्या सामाजिक स्थानात त्यावेळच्या समाजव्यवस्थेमुळे आणि कठोर धार्मिक रिवाजामुळे एक प्रकारचे न्यूनत्व निर्माण झालं होतं. तथापि, भक्ती संप्रदायाच्या प्रभावामुळे सामाजिक आणि धार्मिक स्थानाच्या पलीकडे जाऊन हे संत परमेश्विराशी एकरूप झाले. चामड्याच्या वस्तू करणारे, मातीकाम करणारे, ढोल आणि मृदुंग वाजवणारे, शेतात काम करणारे, कपडे शिवणारे अशा सगळ्या व्यवसायातले आणि म्हणूनच मागासवर्गीय असणारे तत्कालीन संत – यात मुस्लीमही आले, या सगळ्यांची एकरूपता ईश्व राच्या भक्ती करण्याच्या साधनेमुळे झाली होती.
दक्षिणेतील अस्पृश्य संतकवींच्या संदर्भात डॉ. एलिनॉर झेलियट आणि रोहिणी मोकाशी-पुणेकर यांनी जो विशेष संशोधनपर अभ्यास केला आहे, तो या सगळ्याच दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. डॉ. झेलियट या भारतातील आंबेडकर चळवळीचा गेली अनेक वर्ष सर्वांगांनी अभ्यास आणि संशोधन करीत आहेत. झेलियट यांच्या सहकारी असलेल्या रोहिणी पुणेकर या वारकरी संप्रदायातील रचनांवर अभ्यास करणार्याह संशोधक आहेत. या दोघींनी संपादित केलेला ‘अनटचेबल सेंट्स – अॅन इंडियन फेनॉमिनन’, हा तो ग्रंथ आहे. भारताच्या नकाशातील या समाजवर्गातील संतांच्या धर्मधारणा आणि त्यांच्या एकूण योगदानाची जाणत्या लेखकांच्या लेखांतून दखल घेण्याचा या विदुषींचा प्रयत्न आहे. यामुळे पहिल्यांदाच भारताच्या आध्यात्मिक आणि धार्मिक नकाशावरील दबलेल्या वर्गातील भक्तीमार्गात असलेल्या संतकवींचं जीवन ठळकपणे समोर आलं आहे. तमीळ संतांच्या संदर्भात ज्या स्वरूपाचं संशोधन त्यांनी केलं आहे, ते पाहता धार्मिक कवनांतून आणि कथांमधून अजून अनेक तपशील मिळू शकतील, असं वाटतं. या अस्पृश्य संतकवींचा उल्लेख आठव्या-नवव्या शतकात येतो.
तिरुप्पन अलवार हा यातला सर्वात अग्रणी अस्पृश्य संतकवी. एकच कवन या संतकवीच्या नावे असून, ते वैष्णवपंथीयांच्या सर्व मंदिरांत भक्तीभावानं म्हटलं जातं. हे कवन अकरा कडव्यांचं असून, तमीळनाडूमधील श्रीरंगम मंदिरातील रंगनाथाचं वर्णन त्यात आहे. विष्णूची स्तुती देखील या कवनात आहे. तमीळनाडूत या काळात रचल्या गेलेल्या पवित्र भक्तीगीतांची संख्या चार हजार एवढी आहे. या संग्रहात तिरुप्पनचे फक्त एकच कवन आहे. हे कवन एक प्रकारचं स्तोत्र आहे आणि त्यात म्हटल्याप्रमाणे विष्णूचं एका भक्तानं परम श्रद्धेनं केलेलं वर्णन आहे.
यातल्या एका कडव्यात तिरुप्पन लिहितो-
‘लॉंग चेन्स ऑफ ग्लोइंग जेम्स
हेवी रोप्स ऑफ पर्ल्स
ब्युटी विदाऊट एन्ड
डॅझलिंग ब्ल्यू बॉडी
फील्स माय हार्ट… !’
हे सगळंच वर्णन तमीळनाडूतल्या श्रीरंगम मंदिरातील विष्णूचं जसं आहे, तसंच तिरुमला डोंगरावरील तिरुपतीच्या बालाजीचंही आहे. तिरुप्पनचं कवन निद्रिस्त अवस्थेतील विष्णूच्या पायांचं वर्णन करणारं आहे. या रचनेत शेवटी ईश्वणराचं मुख वर्णन आहे आणि असं सांगितलं जातं, की ही रचना पूर्ण केल्यावर श्रीरंगम देवतेचा पदस्पर्श होताच तो तेथे एकरूप होतो. एका अर्थानं वर्णाश्रम व्यवस्थेतील अस्पृश्यांचं स्थान धर्मानं जे सांगितलं आहे, तेथेच तो जातो, हे या समजुतीशी सुसंगत असल्याचं मत संपादक विदुषींनी व्यक्त केलं आहे.
तिरुप्पनचा तमीळ भाषेतला अर्थ असा आहे, तिरु म्हणजे श्री. त्याला जोडलेला पन हा या कवीच्या अस्पृश्य जातीचा संदर्भ आहे, म्हणजे गायन किंवा वादन करणार्या जातींपैकी तो असल्याचे हे सूचन आहे. अलवार हे विशेषण वैष्णवपंथीयांनी काही निवडक संतकवींना दिलं आहे. त्याचा अर्थ विष्णूच्या भक्तीत तल्लीन झालेला भक्त. अर्थात अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाही तो नाहीच. ईश्वअरानं चमत्कार केले, आपल्या या सच्च्या भक्तांसाठी प्रेमानं बाहू पुढे केले, तरी तत्कालीन धर्मव्यवस्था मात्र देवळाचे दरवाजे बंद करण्यातच धन्यता मानत होती.
तिरुप्पन अलवार हा विष्णूचा लाडका भक्त. त्याला देवांनी भेटायला बोलावलं. त्यावर अस्पृश्याला प्रवेश कसा मिळणार, असं त्यानं सांगितलं. यावर देवानं ब्राह्मणांना त्याला घेऊन यायला सांगितलं. श्रीरंगम मंदिरात ब्राह्मण पुजार्यांरनी त्याला खांद्यावरून देवळात आणलं आणि त्याची देवाशी भेट घडवली. याचा भावार्थ असाही सांगता येईल, की तिरुप्पननं या निमित्तानं जातीची उतरंडच कलंडवली आणि ती उलटी केली, ज्यामुळे तो पुरोहितांच्या खांद्यावरून देवळात येऊ शकला. अस्पृश्य बांधवांना मात्र वर म्हटल्याप्रमाणं मंदिरात प्रवेशाला बंदी होतीच. आध्यात्मिक लोकशाहीचं हे ढोंग म्हणायचं की त्यावेळच्या प्रस्थापित समाजाचा गंड असलेला कर्मठपणा म्हणायचा? परमेश्वरानं एखादा चमत्कार केला, तरच या तळागाळातील संतांना देवाजवळ स्थान मिळे, मात्र ते ज्या समाजातले आहेत, तो सगळाच समाज दाराबाहेर ताटकळत उभा राहिलेला असे.
तमीळनाडूतील तिरुप्पन अलवार यांच्या संदर्भातील पाच चरित्रं नंतरच्या काळात लिहिली गेली. ‘दिव्य सुरी चरितम्’ हे संस्कृतमधलं त्याच्यावरील पहिलं चरित्र. याखेरीज वैष्णवांच्या उपपंथातील काहींनी नंतर दोन चरित्रं लिहिली आहेत, तीही संस्कृतमधूनच. तमीळ भाषेतील एक चरित्र ‘अलवार कालवैभवम्’ या नावानं लिहिलं गेल्याचं नोंदविण्यात आलं आहे. अलवार यांच्या रचना आणि त्यांचा परिचय याचा तपशील त्यात आहे. पारंपरिक तमीळ संतसाहित्यातील माहितीनुसार तिरुप्पनचा जन्म हा विष्णूच्या छातीतून झाल्याचंही सांगितलं जातं. मात्र अनेक चरित्रकारांनी यात तथ्य नसल्याचं सांगून ही गोष्ट नाकारली आहे. उच्चवर्णीयांनीच या भाकडकथा रचून अस्पृश्य संताला आपल्या बरोबरीनं आणण्याचा, कारण तो ईश्वआराचा अवतार म्हणून प्रयत्न केलेला दिसतो, असं अनेकांना वाटतं. यासारख्या अनेक गोष्टी बहुधा मध्ययुगीन काळात समाविष्ट केल्या गेल्या का, हेही तपासून बघितलं पाहिजे, असं या संपादक विदुषींनी म्हटलं आहे. या संदर्भातील एक अभ्यासक विद्या दहेजिया यांनी ‘स्लेव्हज ऑफ दी लॉर्ड : दी पाथ ऑफ दी तमीळ सेंट्स’ या आपल्या ग्रंथात वैष्णव आणि शैव पंथीयातील अस्पृश्य संतकवींची माहिती दिली आहे.
तिरुप्पनच्या नंतर नंदनार हा शैव पंथीयातील अस्पृश्य संत मानला गेला आहे. या शैव पंथीयांनी जे ६३ तमीळ संत मानले आहेत, त्यात नंदनार एक आहे. याच्याही जीवनात शैवपंथीय असल्यामुळे शंकराचं विशेष महत्त्व आहे. या संतांची माहिती ‘पेरिया पुराणम्’ (गोष्ट देवाच्या दासांची) या पुस्तकात सेक्किलार या लेखकानं दिली आहे. नंदनार हा जरी अस्पृश्य असला तरी शिवभक्तीनं त्यानं सामाजिक निर्बंधांच्या पलीकडे आपलं जीवन उभं केलं, असं चरित्रकार सांगतात. ज्याप्रमाणं वैष्णव पंथीय तिरुप्पन हे विष्णूला मुक्तीचा मार्ग मानतात, त्याप्रमाणं नंदनार हेही शंकरामुळे मोक्ष आणि मुक्ती मिळेल, असं मानतात.
नंदनारचा शंकराकडे जाण्याचा मार्ग हा तसा सोपा नाही. आपल्या मंदिरात नंदनारनं येण्यासाठी शंकर मंदिरातील नंदीची दिशा बदलतो, अशी श्रद्धा तेथे आहे. आपल्या भक्ताला आपलं मुख दिसावं यासाठी शंकरानं असं केलं, असं तेथील कथांमधून सांगितलं जातं. नंदनार हा पुलाई जातीतला, शेतीशी संबंधित असलेल्या समाजातला होता, असं म्हटलं जातं. मंदिराबाहेर तो गाणी म्हणायचा, ढोल आणि वीणावादन करायचा शिवाय नृत्यही. चिदंबरम् या गावी असलेल्या नटराजाच्या दर्शनाची आस त्याला असते. तो ज्या ब्राह्मणाकडे चाकरी करीत असतो, त्याला तो आपली आस व्यक्त करतो. ब्राह्मण डाफरून त्याला सांगतो की, तुझं काम शेती करण्याचं आहे. ते पूर्ण कर आणि मग नटराजाच्या दर्शनाला जा. शिवाची प्रार्थना करून नंदनार शेकडो एकरचं शेत चार दिवसात फुलवतो आणि ब्राह्मणाला सांगतो, की आता मला जायची परवानगी द्या. ते शेत बघून ब्राह्मण जाणतो की, नंदनार हाच शिवाचा अवतार आहे आणि तो त्याला नमन करतो. दुसर्याच एका कथेत शिवाच्या दर्शनासाठी तुला अग्नीपरीक्षा द्यावी लागेल, असं त्या प्रदेशातील चिदंबरम या ब्राह्मण प्रभुत्वाच्या टापूतील प्रस्थापित नंदनारला सांगतात. तो ही अग्नीपरीक्षा देऊन बाहेर येतो, तेव्हा त्यानं जानवं घातलेलं असतं, असं ब्राह्मण मंडळींच्या लक्षात येतं. ही सगळीच कथा पुरोहित वर्चस्वानं भरलेली असली तरी नंदनारवर भक्ती असलेला समाज ती आजही ऐकत असतो. नंदनारच्या चरित्रातील अशा अनेक कथा त्या भागातील मागासवर्गीय आणि अन्य मागासवर्गीय समाजातील लोक मोठ्या श्रद्धेनं सांगत असतात. शिवाय आज मोठ्या प्रमाणात नाट्यरूप देऊन विद्यापीठातील कला शाखा किंवा रंगमंचावर आविष्कृत करण्याचा प्रयत्न केला जातो. नंदनारच्या कथा सांगताना एक गोष्ट कळत नकळत या परंपरेतून आणि लोकभावनेतून समोर येते आणि ती म्हणजे परमेश्व रानं सर्व जाती सोडून अस्पृश्य जातीमधल्या लोकांनाच अधिक उत्कटतेनं जवळ घेतलं आणि आपलंसं केलं, ही गोष्ट मनावर ठसते.
तमीळ संतपरंपरेनंतर कालक्रमानं अकराव्या-बाराव्या शतकात महाराष्ट्रातील म्हणजेच मराठी भाषा संस्कृतीला वळण देणार्या् भागवत धर्मातील संतपरंपरेचा उल्लेख करायला हवा. येथे आपण पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य वर्गातील संतांचा विचार करतो आहोत. महाराष्ट्रात ज्ञानदेव-तुकारामांच्या बरोबर तेराव्या शतकातील चोखामेळा आणि त्याच्या कुटुंबाचा उल्लेख करायला हवा. चोखामेळा, त्याचा बंडखोर मुलगा कर्ममेळा, त्याची बायको सोयराबाई, बहीण निर्मळा आणि मेव्हणा बंका असा सगळा परिवार पांडुरंगाच्या भजनी आहे आणि त्याचवेळी स्वत:च्या मानवी अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात चोखामेळानं केलेली मांडणी आणि त्याच्या मुलानं जणू पुकारलेलं बंड हे खरोखर अभूतपूर्व आणि म्हणूनच मानवी हक्कांच्या इतिहासातील पहिलेवहिले उच्चार आहेत, असं मला वाटतं. काहींना हे अप्रस्तुतही वाटेल, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा धर्मांतराचा पर्याय चोखोबांच्या काळात ज्ञात असता अथवा तो मार्ग लक्षात आला असता तर चोखोबांनी जरी नाही, मात्र कर्ममेळानं धर्मांतर केलंच असतं, असं मला वाटतं.
चोखामेळाचं स्थान संतपरंपरेत महत्त्वाचं मानलं गेलं असलं तरी आणि बराच काळ अस्पृश्य समाजातही या संताला आदराचं स्थान दिलं गेलं असलं तरी विसाव्या शतकातील मानवमुक्तीचा लढा उभा करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मात्र चोखामेळापेक्षा आपल्याला तुकाराम अधिक जवळ असल्याचे सांगतात, तेव्हा याचा विचार करावा लागेल. मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोडजवळ असलेल्या अस्पृश्य बांधवांनी त्यांच्या जागेत चोखामेळाचं मंदिर उभं करण्याची तयारी केली होती. त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांना निमंत्रित करण्याचं ठरवलं. बाबासाहेबांनी त्यांना सल्ला दिला की, जो चोखामेळा ईश्वरराच्या दाराशी उभे राहून करुणा भाकतो, त्याच्यापेक्षा ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’, असं सांगणारा तुकाराम आपल्याला अधिक जवळचा आहे. शिवाय हिंदू धर्मातून बाहेर पडायचं ठरविल्यामुळे तुम्ही देहूरोडला मंदिराऐवजी बुद्धविहार उभारा, असं सांगितलं. त्यानुसार तेथील अस्पृश्य बांधवांनी बुद्धविहाराची उभारणी केली.
अर्थात बाबासाहेबांना चोखोबांचं अभंग लेखन, त्यांचं जीवनचरित्र या सर्व गोष्टींबाबत विशेष आस्था नि आदर होता, यात शंका नाही. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी यांनी रामानंद पंथ आणि कबीर पंथ या दोन्हींचा अभ्यास केलेला होता. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये या संबंधातील पंथाच्या लोकांच्या बैठका होत असत. शिवाय घरातील सर्व भावंडं प्रार्थना करीत असत. या प्रार्थनेत कबिराचे दोहे, तुकारामाचे आणि चोखोबांचे अभंग, गीतेतील काही श्लोरक सुभेदारांनी म्हटल्यानंतर त्यांच्या मागोमाग ही सगळी मुलं म्हणत होती. जेवणापूर्वी ही प्रार्थना करण्याची सक्ती वडिलांनी केली होती, असं आंबेडकरांनी पुढे सांगितलं होतं.
आज व्यापक अर्थानं चोखामेळा जागतिक साहित्यात किमान ओळखीचा तरी झाला आहे. मात्र दलितत्वामुळे आणि जातीमुळे येणारं दु:ख आणि वेदना एकविसाव्या शतकातही कमी झाली आहेत, असं म्हणणं धाडसाचं आहे. (खैरलांजी, सोनई, खर्डा यांचा उल्लेख फक्त करतो, चर्चा करणं या लेखात अपेक्षित नाही.)
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत देवदासी असलेल्या संत कान्होपात्रेचं स्थानही महत्त्वाचं आहे. काळजाला घरं पाडणारे तिचे अभंग आजही आपण ऐकू शकतो. पंढरीच्या विठुरायाची जशी जनी, तशीच ही कान्होपात्रा लाडकी होती. या दोन्ही संतकवयित्रींनी मराठी भाषेची कूस समृद्ध केली आहे.
उत्तरेतील भारतीय संतपरंपरेत संत रविदास यांचं स्थान विशेष महत्त्वाचं आहे. साधारणत: पंधराव्या-सोळाव्या शतकातील सामाजिक क्रांतीची भाषा करणारा, समाज सुधारणावादी पण अस्पृश्य समाजातील संत म्हणून रविदासांचं स्थान आहे. उत्तर प्रदेशातील चर्मकार समाजात जन्मलेल्या रविदास यांनी समसमाजाची कल्पना मांडून नव्या क्रांतिकारक पर्वाची सुरुवात केली, असा उल्लेख मूलनिवासी बहुजन समाजाच्या वेबसाईटवर गौरवानं केलेला आहे. सेवाभावातला मानवतावाद रविदासांनी आपल्या जीवनकार्यातून शिकवला, असं मानलं जातं. त्यांना स्वत:ला अस्पृश्यतेची झळ बसली होती आणि म्हणून त्यातून हताश न होता सर्वांप्रती प्रेम आणि करुणा हा विचार मांडत त्यांनी आपल्या विद्रोही भूमिकेची आखणी केली. भारतात ब्राह्मणी आणि पुरोहितवादी व्यवस्थेला ज्यांनी मजबूत आव्हान दिलं, त्यात रविदास अग्रणी होते, हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे.
या ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देताना त्यांनी मूर्ती बाजूला करून निराकार आणि निर्गुण ईश्व राची कल्पना मांडली. दुसरी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे आपण कनिष्ठ नाही, छोटे नाही, हे खणखणीत सांगून अस्पृश्यांचा पारंपरिक पोशाख नाकारला. प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देताना त्यांनी टिळा लावला, जानवं घातलं, उत्तरीय आणि धोतर नेसून आपली प्रतिमा उभी केली. ते स्वत: चर्मकार समाजातील असल्यामुळे जोडे शिवण्याचा जो व्यवसाय होता, तो या जीवनक्रमातही त्यांनी सुरू ठेवला होता.
शूद्रातिशूद्र समाजातील रविदास हे पहिले संत होते की ज्यांनी उत्तर भारतातील प्रभावी आणि मजबूत अशा ब्राह्मणी वर्चस्वाला मोठा धक्का दिला. त्यांनी ‘बेगमपूर’ या नावानं अशा एका राज्याची कल्पना मांडली की जेथे जातीधर्माच्या आधारावर भेदभाव केले जाणार नाहीत. रविदास यांना तेथील गुरु रामानंद यांनी दीक्षा दिली, असं काही अभ्यासक सांगतात. याच रामानंदांनी कबिरांनाही दीक्षा दिली होती, असंही सांगण्यात येतं. तथापि, रविदास यांना जयदेव, नामदेव आणि कबीर यांची प्रेरणा मिळाली होती, असंही अभ्यासक नव्या संशोधनाच्या आधारे सांगत आहेत.
पंजाबातही रविदास यांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. पंजाब आणि उत्तर प्रदेशात रविदास डेरा (मठ किंवा आश्रम) म्हणून अनेक ठिकाणी दलित जाणीवा सक्रीय करणारी केंद्रे स्थापन झाली आहेत. भारताचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांनीही काही ठिकाणी रविदास डेरा स्थापन करण्यासाठी सहकार्य केलं होतं. या केंद्रांमुळे सर्वाधिक अनुसूचित जातीचा वर्ग असलेल्या पंजाबात दलितांना नवी ओळख मिळाली आणि त्यांच्या सामाजिक भूमिकेला बळही मिळालं.
रविदास यांच्या ३९ रचना शीख धर्मियांच्या आदि ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याखेरीज आणखी ८ रचना फतेहपूर संग्रहात समाविष्ट आहेत. रविदासांचं चरित्र सतराव्या शतकात नाभादास, प्रियादास आणि अनंतदास यांनी लिहिलं असून, त्याच्या रचना आणि जीवनपट यांचा तपशील त्यात मिळतो. या चरित्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदासाच्या रचनाही मुख्यत: भक्तीप्रवण आणि परमेश्व राची आस बाळगणार्याच अशाच आहेत. रविदासांनी आपल्या गुरुच्या नावाचा उल्लेख कोठेही केलेला दिसत नाही, मात्र त्यांनी अनेक ठिकाणी सद्गुरु असं म्हटलं आहे.
रविदासांच्या विद्रोही विचारांबाबत असं सांगितलं जातं की, त्यांनी वर्णाश्रम आणि वेद यांना नाकारलं होतं. एका अर्थानं गौतम बुद्धांनी मांडलेल्या विचारांचंच प्रतिबिंब रविदासांच्या एकूण वैचारिक भूमिकेत स्वच्छपणे दिसतं. मात्र आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली तेव्हा मात्र रविदासांना मानणारा उत्तर भारतातील चर्मकारांचा मोठा वर्ग त्यापासून दूर राहिला. आजही चर्मकार समाज रविदासांची मंदिरं आणि त्यांचे मठ यात आपली शक्ती बघत असला, तरी काही प्रमाणात तेथे याचंही कर्मकांड सुरू आहे आणि धार्मिक गोष्टींना अधिक प्राधान्य दिलं जात आहे, असं आजचं वर्तमान आहे.
अस्पृश्य समाजातील संत परंपरेत वीर कक्कया या ढोर समाजातील संत पुरुषाचा उल्लेख करायला हवा. हा समाज मुख्यत: महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरच आहे आणि संख्येनं नगण्य स्वरूपात. ढोर असा शब्द नसून तो डोह म्हणजे जलाशय असा शब्द आहे आणि जलाशयाजवळ वस्ती करणारा समाज म्हणजे डोर, त्याचंच अपभ्रंशित रूप म्हणजे ढोर. चर्मकार समाजापैकीच हा वर्ग मानला जातो. चामड्यापासून मोट, कासरा आणि चाबूक तयार करणं ही यांची कामं. साधारणत: कर्नाटकातील शैव पंथीय बसवेश्वकराच्या कालखंडातच कक्कयांचा जीवनक्रम येतो. बसवेश्वतरांनी ज्याप्रमाणं जाती विषमता मोडून समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या समाजाचं स्वप्न बघितलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला, या लढ्यात कक्कया बसवेश्वचरांबरोबर सतत राहिले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात समतेचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न बसवेश्वटरांच्या बरोबरच वीर कक्कयांनीही केला. त्यांना मानणार्यार ढोर समाजानं सामाजिक भूमिकेबरोबरच धार्मिक भूमिकेचाही स्वीकार केला आणि मग वीर कक्कयांना संतांचं महात्म्य देण्यात आलं. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात कक्कयांना लढाईत वीरमरण आलं, असं जाणकार सांगतात.
एकूणच अस्पृश्य समाजातील संतपरंपरेनं जे योगदान दिलं आहे, त्याचा अजूनही अभ्यास होण्याची गरज आहे. काळाच्या परिप्रेक्ष्यातून पाहात असताना तत्कालीन समाजव्यवस्थेत या संतांनी जो उच्चार केला, जी बंडखोरी धार्मिक चौकटीला न जुमानता केली, विद्रोहाची जी भूमिका मांडली, त्यामुळेच अनेक चळवळी आणि आंदोलनं आधुनिक काळात उभी राहू शकली, ही कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. चोखोबांनी आणि रविदासांनी जे भांडण इथल्या प्रस्थापित धर्मव्यवस्थेशी केलं, त्यामुळेच या व्यवस्थेला आपली चौकट मोडता आली नाही, तरी ती खिळखिळी झाल्याचं नक्कीच जाणवलं. अजूनही या संतांच्या वारश्याचं मोल लक्षात घेऊन पुढे जाता येणं शक्य आहे, असं वाटतं.
अनंतभट्टाच्या निमित्ताने अमर अगाध अभंग