संस्कृतीच्या पायाचा तडा

भालचंद्र नेमाडे

आपली साहित्यिक-सांस्कृतिक मुळे ही संतसाहित्यात असल्याचं देशी भान अलिकडच्या काळात भालचंद्र नेमाडेंनी आणून दिलं. नेमाडे आणि त्यांच्या लिटल मॅगझिनवाल्या सहकार्यां नी आधुनिकतेचा दावा करणार्यान समकालीन प्रस्थापितांविरुद्ध बंड करून संतपरंपरेचा झेंडा पुन्हा एकदा रोवला. घरात पिढ्यानपिढ्यांची विठ्ठलभक्ती असलेल्या नेमाड्यांच्या सर्व लेखनावर संतांचा दाट प्रभाव आहे. स. भा. कदम यांच्या अभंगगाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा भाग.

रा. स. भा. कदम ह्यांनी संपादित केलेला ‘श्रीसंत चोखामेळा महाराज यांचे चरित्र व अभंगगाथा : सोयराबाई, कर्ममेळा, बंका व निर्मळा यांच्या अभंगांसह’ हा ग्रंथ चोखामेळ्याचा अभ्यास करणार्याय कोणासही अनिवार्य ठरला आहे. त्यापूर्वी चोखामेळा कुटुंबीयांचे सर्व अभंग त्र्यंबक हरी आवटे यांच्या श्रीसंतगाथा (आवृत्ती, इंदिरा प्रेस, पुणे, १९२३) ह्या वारकरी संप्रदायात लोकप्रिय असलेल्या गाथांच्या दुसर्या भागात एकत्र उपलब्ध होते. नेहमीप्रमाणे ह्याही संतमंडळींची हस्तलिखिते कोठे उपलब्ध नाहीत. ह्यांची मूळ शुद्ध महारी बोली उपलब्ध संहितेत व्यक्त होत नाही व ह्या भाषेवर नको ते पुस्तकी भाषेचे संस्कार झालेले दिसतात. छापलेल्या अभंगांशिवाय बरेच अभंग असंग्रहित व लिखित स्वरूपात आढळतात. ते एकत्र जमवून ह्या कुटुंबीयांबद्दल आणखी माहिती मिळवून चिकित्सक आवृत्त्या काढायला भावी संशोधकांना भरपूर वाव आहे.

रा. स. भा. कदम हे इतके प्रसिद्धीपराङ्मुख वाङमयसेवक आहेत की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीसारखा त्यांचा शोध घेऊनच ते सापडले. अत्यंत वृद्धापकाळातही त्यांची चोखोबावरची भक्ती कमी झालेली नाही. आपल्या ह्या गाथेच्या जुळवाजुळवीबद्दल ते अजूनही नम्रतेने आणि प्रामाणिकपणे बोलतात. अशा नाना थरातल्या साहित्यप्रेमी माणसांमुळेच साहित्याला खरी परंपरा लाभते आणि ती बळकट होत जाते याचा प्रत्यय त्यांना भेटल्यावर होतो. ह्या मूळ कोकणातल्या साध्याभोळ्या वारकर्याेला चोखामेळा कुटुंबियांची स्वतंत्र गाथा सिद्ध करावी, अशी प्रेरणा आळंदीचे वारकरी श्रावणबुवा गंगाधर कांबळे ह्यांच्याकडून मिळाली. त्याचप्रमाणे शिगवणचे सखाराम धोंडिबा शिंदे ह्यांनी आपल्या कल्पनाचक्षूंनी चोखामेळा महाराजांचे रंगीत चित्र काढून ह्या मूळ आवृत्तीला प्रासादिक रूप दिले. शिवाय चोखोबांच्या पंढरपूर व मंगळवेढे येथील समाध्या, तसेच पंढरपूरची १९६९ सालापर्यंत उभी असलेली दीपमाळ अशी छायाचित्रे त्यांना बारामतीचे छायाचित्रकार तानाजी श्रीपतराव काळे यांनी पुरवली. ह्या सर्व कानाकोपर्यापतल्या लोकांचे आपल्या वारकरी परंपरेवरचे प्रेम मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखे आहे. असे पुस्तक छापणे हा एक वारसा जपण्याचा थोर प्रघात ह्या सर्वांना वाटत होता.

प्रस्तुत पहिल्या आवृत्तीतील दीपमाळ आज पंढरपुरात कोण्या अमराठी बागायतदाराने मोडून साफ केली, याची दखलही गेल्या तीस वर्षांत कोणी घेतलेली नाही. एकूण वारकरी पंथातले सत्त्व कसे नाहिसे होत आले आहे हे यावरून दिसते. बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्याची वारकर्यांवना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरवलेले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते. परंतु केवळ स्वतःच्या आविष्कारसामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो. हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तीदायक वाटत राहील, असे वाटते.

चोखामेळा आणि त्याचे कुटुंबीय हे केवळ वारकरी विठ्ठलभक्त म्हणून किती महत्त्वाचे असतील ते असोत, मराठी वाङ्मयीन संस्कृतीची तिच्या उगमापासूनची एक मोठी मर्यादा स्पष्टपणे दाखवत राहाण्याचे ऐतिहासिक कार्य ह्या मंडळींनी निश्चिपत पार पाडले आहे. चोखामेळा हा मराठी समाजाच्या प्रारंभीच्या जातीजमातींच्या कडबोळ्यातला, भक्कम एकजिनसीपणाचा आधार देणार्याा सुरुवातीच्या काही थोर प्रतिभावंतापैकी तो एक प्रमुख नायक आहे. त्याच्याबद्दल त्याचा क्रांतिकारक गुरुमित्र नामदेव याच्यापासून तर महादेव गोविंद रानडे यांजपर्यंतच्या सर्वच प्रतिभावंतांनी मुक्तपणे प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ज्याच्याबद्दल असे अत्यादराचे उद्गार सतत सातशे वर्षे निघत असूनही त्यातली अपराधी भावना लपवता येत नाही, असा हा एकमेव मराठी धर्माचा संस्थापक आहे. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे साने गुरुजींनी उपोषण करेपर्यंत चोखामेळा अत्यंत शांत चित्ताने मराठी समाजाच्या सात शतकांच्या कोतेपणाची सरळ उभी रेषा दाखवीत एकटा उभा आहे. भाषेतून आत्माविष्कार करण्याची मौलिकता कशी चिरंतन असते याचे उदाहरण म्हणून चोखामेळ्याचे अभंग सुरुवातीपासूनच मराठीत उपलब्ध होते.

चोखोबाने सामाजिक क्रांतीचे दरवाजे इतक्या आधी ठोठावूनही त्याच्या आयुष्याबद्दल, प्रतीकपर दंतकथा सोडल्यास, फारशी अस्सल माहिती उपलब्ध नाही. अनेक संतकवी, कवयित्री, महिपती, मोरोपंत, छोटेमोठे चरित्रकार, श्री. म. माटे, साने गुरुजी इत्यादी सर्वांनी त्याच्या संपूर्ण शुद्धत्वाची, भलेपणाची ग्वाही दिली आहे. असे असून चोख्याला मराठी संस्कृतीत जितके मध्यवर्ती स्थान मिळायला पाहिजे, तितके कधीच मिळालेले दिसत नाही. फार काय पाठ्यपुस्तकात वाचाव्या लागलेल्या त्याच्या एक-दोन अभंगापलिकडे फारशी माहिती नसलेले विद्वान खूप आहेत. खुद्द वारकरी पंथातही त्याच्याबद्दलच्या, प्रत्यक्ष स्वर्गलोकातले अमृत शुद्ध करण्यासारख्या भाकडकथांमागचा लौकिक अर्थ ध्यानात न घेता त्या रंगवून सांगणारे कीर्तनकार सगळेच आहेत.

आदिअंती अवघा विटाळ संचला
सोवळा तो झाला कोण न कळे

किंवा
उपजले विटाळीं मेले ते विटाळीं

असे कालदर्शी विचार मांडणारे चोखोबांचे अभंग सूत्र म्हणून घेऊन संपूर्ण कीर्तन त्यावर कोण्या हरदासी बुवाने केलेले आमच्या ऐकिवात नाही. एकूण ही कर्मठ जातीयतेची कीड वारकरी तत्त्वज्ञानाला मुळापासूनच पोखरत आली आणि चोखामेळा ही मराठी संस्कृतीची जन्मखूण ठरली. पुढे आंबेडकरी भीमटोला बसून ह्या उदारमतवादी देखाव्याचा शेवट झाला आणि वारकर्यां्नी वाळवंटी मांडलेला हा समतेचा खेळ संपुष्टात आला. कोणी असे म्हणेल, की ह्या समतेच्या क्रांतीसाठी गावगाड्याला पर्यायी ठरेल अशा नव्या अर्थव्यवस्थेची व नव्या उत्पादन साधनांची गरज होती. ही परिस्थिती औद्योगिक क्रांतीतून उत्पन्न होणार्यात नागरी समाजामुळेच शक्य झाली. हा युक्तिवाद कितीही खरा असला तरी वारकरी परंपरेचा आध्यात्मिक वांझपणा मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. ही आध्यात्मिकता सामाजिक प्रश्नां कडे पाठ फिरवत राहिली. यात काही संशय नाही.

चोखामेळ्याने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्नं त्याच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळ्याने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबियांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्नच विचारुन ठेवले. त्यामुळे चोखामेळ्याच्या कुटुंबियांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे, कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. ‘‘पंचही भूतांचा एकचि विटाळ’’ म्हणून घटापटाची चर्चा करणार्यांगची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वतःच्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.

चोखामेळ्याच्या अभंगांवरून तो अत्यंत परिपक्वबुद्धीचा, योगीवृत्तीचा, बहुश्रुत, ‘बहुत हिंडलो देशदेशांतर | परि मन नाही स्थिर झाले कोठे’ असा अनुभवसमृद्ध, ‘बहुत तीर्थ फिरोनिया आलो | मनासवे झालो वेडगळचि’ असा स्वतःच्या विवेकशीलतेवर दृढ विसंबून राहणारा अस्सल भक्तिमार्गी संत असल्याचे पटते. त्याची भक्तिमार्गावरची अढळ श्रद्धा, अत्यंत शुद्ध चारित्र्य, इतर भक्तांचा त्याला येणारा कळवळा – अशा सर्वच बाजूंनी चोखा उत्तुंग व्यक्तिमत्व दाखवतो, ‘दूर हो दूर हो’, असे म्हणणार्याम वारकर्यां चा तो मनःशांती ढळू न देता उल्लेख करतो. दारिद्य्र, आरोप, आळ, अवहेलना, छळ, शिक्षा हे सगळे संयमाने व्यक्त करताना त्याने आपली थोर नैतिकता किंचितही ढळू दिली नाही, हे ऐतिहासिक सत्य आपल्याला भाषिक दस्तऐवज आणि वास्तुस्मारक अशा दोन्ही पुराव्यांवरून स्पष्ट होते.

मंगळवेढ्यात कुसू बांधण्यासाठी पकडून नेलेल्या वेठबिगार महारांमध्ये हा कवीही होता. ‘‘अंतकाळी मज केले परदेशी’, असे त्याने म्हणून ठेवले आहे. कुसू ढासळून त्याखाली चूर झालेल्या अनेक महारांमध्ये आपला एक थोर नायकही सापडला हे कळताच जन्मभर अस्वस्थ राहिलेल्या अखंड चळवळ्या नामदेवाने पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारी पायरीशी दिलेली हक्काची जागा सांभाळत सातशे वर्षे चोखा तिथेच राहिला. ही दंतकथा ऐतिहासिक असो की नसो, ती आपल्या सामाजिक नैतिकतेचे चिरंतन प्रतीक ठरते. ह्या महाद्वारापाशी चोखा नेहमी गहिवरुन उभा राहात असे, हे त्याने स्वतःच नोंदवलेले आहे. वास्तुस्मारक आणि दस्तऐवज ह्या दोन्ही पुराव्यांनी चोखामेळा आपल्या संस्कृतीच्या पायातच वाढत गेलेला तडा नेहमीच दाखवत राहील. त्यामुळे चोखामेळ्याचा अभ्यास मराठीत नेहमीच एक धडा म्हणून महत्त्वाचा राहील.

0 Shares
एक ग्लोबल संत आमुचे आम्ही वायां गेलों