मडकी बनवण्याचं तंत्र बदललयं. पण त्यासाठी माती लागते आणि कुंभारही. म्हणनूच आजच्या कुंभाराच्या चेहर्यामत गोरोबांचा शोध घेतलाय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी. युरोपातल्या द हेग शहरातून ‘रिंगण’साठी गोरोबा काकांचं चित्रं काढण्यासाठी त्यांनी काळाच्या डोहात बुडी मारलीय.
मध्ययुगीन काळापूर्वी जाऊन कितीही संशोधन केलं तरी संतांचं चरित्र आणि तोंडवळा शोधणं म्हणजे एक महाकर्मकठीण काम. एकोणिसाव्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागला. पण पाच ते दहाव्या शतकात फक्त भारतातच नाही तर महाराष्ट्रातही शिल्पकला विकसित झाली होती. अजिंठा, वेरूळ, औंढा नागनाथ मंदिर, कार्ला आणि भाजे इथली अनेक गुंफा शिवमंदिरं ही त्याची ओळखीची उदाहरणं आहेत. जेजुरीच्या जवळचं भुलेश्वर मंदिर हे त्याचं फारसं माहीत नसलेलं पण चांगलं उदाहरण. त्यावरच्या मूर्तीकामाचे नमुने उत्कृष्ट दर्जाचे आहेत. मानवी शरीरासोबत प्राण्यांची शिल्पही तिथं प्रमाणबद्ध रीतीनं कोरलीय. हे पाहिल्यावर जाणवतं की संत परंपरेतल्या एकाही मंदिरात अशा दर्जाचं काम पाहायला मिळत नाही.
औंढा नागनाथ मंदिराचं बांधकाम सातव्या ते अकराव्या शतकात झालं. याच काळात पांडुरंग-विठ्ठलाच्या संकल्पनेची वीट दखनी समाजामध्ये फेकली गेली. महाराष्ट्रात विसोबा खेचरांच्या उपदेशानं नामदेव, गोरा कुंभार यांच्यासारखे समकालीन संत वारकरी पंथाच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरले. शैव विचारसरणीचे लोक हरिनामाचा अंगिकार करू लागले. हा विचार परिवर्तनाचा काळ कलेच्या दृष्टीनं मात्र उपेक्षित राहिला.
एकीकडे समृद्ध शिल्प घडवण्याची परंपरा आणि दुसरीकडे आज कसलाही पुरावा नसलेले पंथ आणि संप्रदाय यांची पायाभरणी, असा तो काळ होता. नामदेवांना विसोबांसारखे गुरू लाभले. तरीही ना विसोबांचं शिल्प, ना नामदेवाचं. निवृत्ती, ज्ञानदेव, चांगदेव, चक्रधर अशा समाज परिवर्तन करणार्या कोणत्याही व्यक्तीची रूपात्मकता वास्तव रूपानं ना कोणत्या शिल्पकारानं घडवली, ना चित्रकारानं चितारली. बारावं ते एकोणिसावं शतक या काळात महाराष्ट्रात परकीय आक्रमणं होत राहिली. समाजातील विचारसरणी बदलत गेली. राजवटी बदलल्या. धार्मिक विचारांची सरमिसळ झाली. तरीही कला आणि शास्त्रं यांची मांडणी विस्कटली नाही. कारण स्थानिक कलाकार जन्माला येणं कधीच थांबत नाही. तरीही मूर्तिकला आणि चित्रकला बाराव्या शतकापासून महाराष्ट्रात लोप पावल्यासारखी वाटते. नाहीतर आज आपल्याला संतकवींचं निदान मुखदर्शन होतं तसं पाहायला मिळालं असतं.
ज्ञानदेव, नामदेव, विसोबा खेचर आणि गोरोबा कुंभार यांना एकत्र जोडणारा दुवा हा ज्ञानदेवांची समाधी म्हणायला हवा. माऊलींनी १२९७ला समाधी घेतली. तेव्हा गोरोबा तीस वर्षांचे होते. त्याकाळची समाजरचना पाहता संसाराला लवकर सुरुवात झाल्यानं ते प्रौढ झाले होते. चमत्कार आणि अंधविश्वासाला बळी जाणार्या समाजात ज्ञानदेवांनी वेगळा पायंडा घालून दिला, तरीही समाज अशा विषयांच्या गर्तेत सतत ओढला जातो. संतांनी समाजाला ज्ञानी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण समाज पुन्हा पुन्हा त्याच वळणावर येऊन थांबतो. ज्ञान अपुरं पडतं. असेच आजचे प्रश्न तेव्हाही पडत होते. त्या प्रश्नाचं उत्तर तुकोबांच्या गाथेत मिळतं. माणसाची स्वभावधारणा बदलण्यासाठी अंतर्बाह्य झगडावं लागतं. त्यासाठी फक्त उपदेशच पुरेसे ठरत नाहीत. तर अंतर्ज्ञानाची आरोळीही ऐकावी लागते.
‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे‘ या प्रसिद्ध अभंगात गोरोबांच्या याच आरोळीचे पडसाद ऐकू येतात.
बोलता आपली जिव्हा पै खादली ।
खेचरी लागली पाहता पाहता ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥
या अभंगातून गोरोबांची एकाग्र प्रतिमा उभी राहते. ती एकाग्रता त्यांच्या व्यवसायाला पूरक अशी आहे. गोरोबा या अभंगात सांगतात, निर्गुण पांडुरंगाच्या भेटीला सगुनासंगे आलो, तेव्हा कुठं गुणांनी भारून गेलो. रूपाविषयी, स्वत:ला काही बाही बोलू नये, असं सांगत सांगत ते तिसर्या पदात एकाग्रतेकडे वळतात. योगाची ओळख असणार्यांसाठी खेचरी योगमुद्रा समजणं कठीण जाणार नाही. त्यामुळंच तर विसोबांना खेचर ही पदवी मिळाली होती. योगाभ्यासातील खेचरी मुद्रा गुरुपरंपरेत सर्वत्र ज्ञात असावी, असं गोरोबांच्या काळात या अभंगामुळं कळतं. खेचरी मुद्रा म्हणजे जिव्हा टाळूकडे फिरवून श्वसनमार्गापर्यंत खेचून नेणं आणि ताणून धरणं. श्वसनमार्ग बंद करून पाहणं, अवयवांवरील ताबा सिद्ध करणं.
इथं नामदेवांच्या भेटीतून सुखाची कशी भेट झाली, असं गोरोबा शेवटी सांगतात. गोरोबांनी नामदेवाला कच्चं मडकं म्हटलं हे वारकरी संप्रदायात चवीनं चघळलं जातं. परंतु गोरोबांच्या अभंगात सापडलेल्या दुव्यांचं विश्लेषण किंवा चिकित्सा होत नाही. संतांचं माणूसपण विसरलं जातं आणि चमत्कारिक प्रसंगाचं वर्णन जास्त उपरोधानं चर्चिलं जातं. हा कमी लेखण्याचा उपद्व्याप अशा अनेक उदाहरणांवरून सिद्ध होतो. पण या अभंगातून तरी दिसतं की नामदेव हे कर्तृत्वानं, कीर्तनानं गोरोबांपेक्षा जास्त लोकप्रिय होते. इथं तुलना करण्याचा प्रश्न नाही. पण या अभंगातून तसं आढळतं खरं.
तेराव्या शतकात राहणीमानाच्या नुसार तसंच व्यवसायाच्या निकडीखातर वेगवेगळे पेहराव असायचे. त्याबद्दल मी प्रत्येक संताच्या चित्राविषयी नमूद करत आलोय. मातीच्या कामात अंगभर कपडे घालून काम केलं जात नव्हतं. त्यासाठी तोकड्या कपड्यांची जरूर असे. स्त्रियांचे कपडे आणि पुरुषांचे कपडे यात फरक होता. मातीनं कपडे खराब होणारच. मग पगड्या घालून कुंभाराच्या चाकावर कसं बसणार? असे साधे प्रश्न पाहणार्याला सुद्धा पडायला हवेत. पण सगळ्या संतांना एकाच वेशात गुंडाळणार्या समाजचित्रकारांनी आणि त्याचं दिग्दर्शन करणार्या धुरिणांनी लक्षात घ्यायला हवं की सर्वच संत एकाच वेशातले नाहीत. त्यांचं ध्रुवीकरण व्हायला नको. संतांची विविधता त्यांच्या व्यवसायातून आली आहे. त्यांचे अनुभव त्यांच्या रोजच्या व्यवहारातून आले आहेत.
व्यवसायात आणि वेषात वेगळेपणा असला तरी त्या सगळ्यांनी भक्ती मात्र विठोबाचीच केलीय. विठ्ठलभक्ती हा त्यांचा केंद्रबिंदू ठरतो. आविष्कारित होताना कलाकार आणि कवी एकाच वेळेस बाह्यकेंद्री तसंच अंतर्केंद्रीही असतो. हे होताना निसर्गनिर्मित नियमाचं पालन होतं. मात्र बुद्धीच्या आकलनाचे आविष्कार मानवी विचारांनी विकसित होत जातात. त्याच विचारक्रियेत गोरोबा लिहितात,
‘तव झालो प्रसंगी गुणातीत’.
गोरोबांचा चेहरा आठवताना त्यांचा व्यवसाय, ते करत असलेल्या आकारांची निर्मिती, त्यांनी घडवलेल्या कामाची कुशलता, त्याच्यासाठी लागणारी एकाग्रता यांचा विचार डोळ्यापुढं दिसत राहतो. त्यांचं वय पन्नासच्या आतील दाखवणं हा विचार चित्र चितारण्यापूर्वी करणं क्रमप्राप्त असतं. ते कामात मग्न आहेत, हा चित्राचा विषय बनतो. बाकी रेखाटन झाल्यावर कागदावर रचना तयार होते. अनेक हालचालींनुसार रंगांची, छाया, छटांची योजना निर्माण होते. ते पूर्वनियोजित असू शकत नाही. चित्राची मांडणी खुलवताना मनात येणार्या संवेदनांचा तो एक भाग असतो. चित्रकार चित्राशी एकाग्र होऊन चित्रातील रंगांचा दर्शनी प्रभाव अनुभवत असतो. चित्राचा विषय आणि रंग यांना एकत्र गुंफण्याचा हा प्रयत्न अंतर्बाह्यही असतोच.
वास्तवदर्शी चित्र काढताना चित्रातील पोतही तितकाच महत्त्वाचा असतो. मातीचा पोत, चाकाचा पोत, चिखलाचा पोत, हे सर्व पोत एखाद्या शैलीतील चित्र रंगवताना सांभाळावे लागतात. खुबीनं ते चितारावे लागतात, हे करताना ते चित्र फक्त आकर्षकच का होतं, त्याचीही पार्श्वभूमी चित्रकारानं अनुभवलेली असते.
पैठणसारखं महत्त्वाचं धर्मपीठ गोरोबांच्या जवळ होतं. साहजिकच तिथं घडणार्या घटना कानावर येत असणार. ज्ञानदेवांची कीर्ती १२९०च्या आसपास महाराष्ट्रभर झाली होती. गोरोबांना पंढरीच्या वारीत अशा संतांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळाली असणार. त्यात संतांच्या दिंड्या गावोगाव फिरत असत. तो काळ हरिनामाच्या गजराच्या प्रसाराचा होता. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्या तळागाळातील व्यक्तींचा विकास बौद्धिक उन्नतीनं झाला. गावोगावी अशा ज्ञानी संतांच्या समाधी आठ शतकांहून जास्त काळ टिकून आहेत, हेच त्यांच्या संदेशाचं फलित का समजू नये.
गोरोबांच्या मडकी बनवण्याच्या चाकाला आज यांत्रिक पर्यायही सापडला आहे. पण तो चिखल, ती माती तेरणा नदीच्या काठचीच वापरावी लागते. मडकी, विटा एकविसाव्या शतकातही त्याच मातीच्या घडवल्या जातात. मग तोच व्यवसाय करणार्या आजच्या कुंभारातच ‘गोरोबा’ आपल्याला दिसायला हवा. मला तरी तो दिसतो. कारण काळ गतीनं फिरतो. आपल्याला दृश्यानं, प्रतिभेनं त्याच देखाव्याचा भास पुन्हा पुन्हा देत राहतो. तो तेराव्या शतकातही होत होता, तसाच आज एकविसाव्या शतकातही होत राहतो. तेव्हाच्या काळाचं शब्दांकन गोरोबांनी केलंय. आज आपण ते स्वरांनी बांधून संतांच्या अभंग काव्यपंक्ती म्हणून गात असतो. तसंच त्या काळाचं शब्दांकन रंगरेषांनी बांधून कागदावरही उतरवता येऊ शकतं.
गोराजी का लंगर वर्क इज वर्शिप