हाती थापटणे अनुभवाचे

अभय जगताप

वारकरी संप्रदायाचा इतिहास ज्या काळापासून आपल्याला ज्ञात आहे, त्यातल्या पहिल्या टप्यात जी संत मांदियाळी झाली त्याला अभ्यासक ज्ञानदेव-नामदेवांची प्रभावळ म्हणून ओळखतात. या प्रभावळीत संत गोरोबाकाका, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज आदी मंडळींचा समावेश आहे. गोरोबाकाकांचं किंबहुना सर्वच संतमंडळींची चरित्रं नामदेवरायांमुळं आपल्यासमोर आली आहेत. ज्ञानदेवादी भावंडं आणि संत नामदेवराय यांचं चरित्र जितक्या तपशिलानं उपलब्ध आहे, तशी या सर्वच मंडळींची सविस्तर चरित्रं उपलब्ध नाहीत. त्यांच्या जीवनामधले काही प्रसंग आपल्याला नामदेवरायांसारख्या समकालीन आणि संत एकनाथांसारख्या उत्तरकालीन संतांमुळं ज्ञात आहेत. यामध्ये साधारण त्यांचं वास्तव्याचं ठिकाण, व्यवसाय, चमत्कारवजा काही कथा आणि त्यांची समाधी, निर्वाण अशी ढोबळ माहिती उपलब्ध आहे.

याशिवाय उपलब्ध आहे ते त्यांचं साहित्य. यामध्ये सुद्धा ज्ञानदेव-नामदेव यांचं साहित्य जितक्या प्रमाणात उपलब्ध आहे, तेवढ्या प्रमाणात  सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई वगैरे ज्ञानदेवांची भावंडं आणि गोरोबाकाका, नरहरी महाराज वगैरे संत मांदियाळीतील अन्य संतांचं साहित्य उपलब्ध नाही. आपल्याला माहीत आहेत, असं वाटणार्‍या संत नामदेव यांच्या उत्तरेतल्या कर्तृत्वाची गाथा आपल्यासमोर येते तेव्हा त्यांच्याबद्दलही पूर्ण माहिती नव्हती, याची जाणीव होते.

वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवांना ‘माऊली’ संबोधलं जातं, त्याप्रमाणे गोरोबांना ‘गोरोबा काका’ असं संबोधलं जातं. संतपरंपरेत सोपानदेवांचाही उल्लेख वारकरी मंडळी सोपान काका असा करतात. नामदेवांच्या अभंगात मुक्ताबाईंच्या तोंडी गोरोबा काका असा उल्लेख आढळतो. (म्हणे मुक्ताबाई भाजले कि कोरे । काकाचे उत्तर सत्य मानू ॥) १९२८ साली प्रसिद्ध झालेल्या केतकरांच्या ज्ञानकोषात उल्लेख आहे की ‘हा भगवद्भक्त सर्व संतमंडळांत पोक्त असल्यामुळं यास गोरोबा काका किंवा नुसते काका म्हणत.’

संख्येच्या आणि विषयाच्या मर्यादेमुळं गोरोबा काकांचे अभंग कीर्तन, प्रवचनात निरूपणाला घेण्याचं प्रमाण अत्यल्प आहे किंवा जवळ जवळ नाही. संख्येच्या मर्यादेमुळं गोरोबा काकांच्या अभंगांचा स्वतंत्र छापील गाथा प्रचलित नसून सकळ संत गाथेमध्ये सर्व संतांसोबत गोरोबा काकांच्या अभंगांचा समावेश आहे. गोरोबा काकांच्या चरित्रातील कथा मात्र कीर्तन, प्रवचनात आवर्जून सांगितल्या जातात. यापैकी एक कथा म्हणजे गोरोबाकाकांनी केलेल्या संत परीक्षेची. ज्यामुळं त्यांना संतपरीक्षक असं म्हटलं जातं. दुसरी चमत्कार कथा आहे, चिखल तुडवण्यात मग्न असलेल्या गोरोबाकाकांकडून त्यांचं स्वतःचं मूल तुडवलं जातं आणि पुढं नामदेवरायांच्या कीर्तनात ते जिवंत होतं. गोरोबाकाकांच्या बहुतांश चित्रांमध्ये आणि मूर्तींमध्ये हाच प्रसंग साकारला आहे.

नामदवेरायानां आपल्या कार्याचा, भक्तीचा नकळत अहकांर झाला आहेआणि त्यांचं मन पंढरपुरातील विठ्ठलाच्या स्वरूपात गुंतले असून भगवंताच्या विश्वव्यापक रूपाची खूण अजून पटली नाही, असं सर्व संत मंडळींना वाटलं. त्यांना जाणवलेली ही गोष्ट नामदेवरायांनासांगण्याची जबाबदारी वयानं ज्येष्ठअसलेल्यागोरोबा काकांनी पार पाडावी, असंठरलं.गोरोबा काकांचे या ठिकाणी नामदेवांच्या अभंगातमुक्ताबाईंच्यातोंडीआलेलेवर्णन बघितलंम्हणजे त्यांच्याकडे ही जबाबदारी का देण्यात आली, हेलक्षात येतं.

गोरा जुनाट पै जुने ।
हाती थापटणे अनुभवाचे ॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी ।
वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥

गोरोबा काकांनी सर्व संतांची परीक्षा करून नामदेवरायांचं मडकं कच्चं आहे, असं मत दिलं. यामुळं नाराज होऊन नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगानंही त्यांना गुरू करण्याचा सल्ला दिला. औंढ्या नागनाथ इथं नामदेवांची विसोबा खेचरांची भेट झाली. देव नाही अशी कोणती जागा नाही, देव सर्वत्र भरून उरला आहे, असा उपदेश त्यांना मिळाला. याचं वर्णन नामदेवांनी ‘सद्गुरूनायके पूर्ण कृपा केली । निजवस्तू दाविली माझी मज ॥’ असं केलं आहे. या कथेबद्दल आधुनिक काळात काहींना यामध्ये नामदेवांना गौणत्व देण्यासाठीच मुद्दाम ही कथा निर्माण केली की काय असं वाटतं.

याबद्दल काही वारकर्‍यांशी बोलल्यावर लक्षात आलं त्याप्रमाणं वारकर्‍यांची दृष्टी मात्र यावरून नामदेवांना गौणत्व आलं आहे, असं मानत नाही. देव भेटणं आणि कळणं या दोन भिन्न गोष्टी आहेत, एवढंच यातून सूचित होतं. तेर इथं राहणारे, ज्यांनी गोरोबाकाकांचं चरित्र लिहिलं असून त्यांच्या प्रवचन कीर्तनात गोरोबाकाका केंद्रस्थानी आहेत, असे हभप दीपक खरात म्हणाले. ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा धूसर आहेत. शिवाय या कल्पना अनेकदा कालपरत्वे, स्थलपरत्वे, व्यक्तिपरत्वे बदलतात. संतचरित्रातले चमत्कार हेतुपूर्वक केलेले नाहीत, ते ओघानं झालेले आहेत. या चमत्कार कथांकडं प्रतीकात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. श्रद्धावंत याची समीक्षा करत नाहीत, ती करूही नये असंच मीही म्हणेन’, असंही त्यांनी सांगितलं.

काकांच्या काही चरित्रकारांनी हा प्रसंग तेरमध्ये, काहींनी पंढरपुरात घडल्याचं लिहिलं पण हा प्रसंग आळंदीमध्ये घडला. यास पुरावा संत नामदेवांचे शब्द,

न पुसता संता निघाला तेथुनी ।
पैलपार इंद्रायणी प्राप्त झाला ॥

या कथेत इंद्रायणी नदीचा उल्लेख आहे. त्यावरून ही कथा आळंदी परिसरात सिद्धेश्वर मंदिरात घडलेली आहे. शिवाय तेरहून आळंदीला जाताना गोरोबा काका आपलं थापटणे सोबत घेऊन नक्कीच गेले नसणार. या परीक्षेतही गोरोबा काकांनी प्रत्यक्ष थापटणं हातात घेऊन परीक्षा केली नाही. ‘हाती थापटणे अनुभवाचे’ असा उल्लेख आहे. एरवी मडकं तपासताना ज्याप्रमाणं थापटणं वापरतात ते आणि तसं नव्हे, तर इथं अनुभवाचं थापटणं अशी शब्दरचना केली आहे. नामदेवरायांना झालेला किंचितसा अहंकार दूर व्हावा, हीच या मागची त्यांची भावना आहे. ही भावना सुद्धा वैयक्तिक नसून अन्य संतमंडळींची सुद्धा आहे. नामदेवरायांचा अहंकार लयास जाऊन ‘विठ्ठल जळी स्थळी भरला । रिता ठाव नाही उरला ॥ आजी म्या दृष्टीने पहिला । विठ्ठलची विठ्ठल ॥’ अशी त्यांची अवस्था झाली.

0 Shares
वारकऱ्यांचे गोरोबा काका अद्वैताचा मार्गदर्शक