गोराजी का लंगर

रवींद्र केसकर

संत गोरा कुंभार हे आता देशभरातल्या कुंभार समाजाचं दैवत बनतंय. जम्मू शहरातलं मंदिर त्याचं उदाहरण आहे. देशभर जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या राज्यात संत नामदेवांची देवळं आहेत. त्यानंतर आता संत गोरा कुंभारही उत्तर भारतात लोकप्रिय होऊ लागले आहेत.

संत गोरा कुंभार हे आता देशभरातल्या कुंभार समाजाचं दैवत बनतंय. जम्मू शहरातलं मंदिर त्याचं उदाहरण आहे. देशभर जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या राज्यात संत नामदेवांची देवळं आहेत. त्यानंतर आता संत गोरा कुंभारही उत्तर भारतात लोकप्रिय होऊ लागले आहेत. देशाच्या थेट उत्तर टोकाला जम्मू शहरात आजपासून ३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संत गोराजी कुंभार यांच्या मंदिराला आता हजारो भाविक नित्य भेट देत आहेत. जम्मू शहरातील इंदिरा गांधी चौकातील गोराजी कुंभार यांचं मंदिर आता देशभरातील पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण म्हणून हळूहळू उजेडात येऊ लागलं आहे. या देवळाला झळाळी देण्यासाठी जम्मू सरकारनं मागील वर्षी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. भाविकांच्या निवासाच्या सोयीसह अद्ययावत असलेलं हे मंदिर पुढील काळात पाचमजली करणार असल्याचं मंदिर संस्थानचे जनरल सेक्रेटरी सतिशचंद फतिया यांनी सांगितलं.

जम्मू शहरात प्रजापती कुंभार समाज लक्षवेधी संख्येनं वास्तव्यास आहे. समाजाचं संघटन मोठं आहे. त्यातून समाजातील धुरिणांना समाजाच्या संघटनेला चालना देण्यासाठी एक मंदिर निर्माण करण्याची शक्कल सुचली. संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत गोरा कुंभार होऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यासाठी व्यवसायानं इंजिनियर असलेले समाजाचे अध्यक्ष अयोध्याकुमार मनावा यांनी पुढाकार घेतला. उत्स्फूर्तपणे अनेकांनी आर्थिक हातभार लावला.

जानेवारी १९८६ साली जमून शहरात पहिल्यांदा या मंदिराच्या माध्यमातून संत गोराजी कुंभार यांची प्रत्यक्ष ख्याती पोचली. मूर्तीला आकार आला. चिखल तुडवत असताना विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबा काकांच्या मूर्तीला आता नित्यनेमानं भजलं जातं. दरवर्षी युवा संमेलन, नारी संमेलन आणि समाजाचं वार्षिक संमेलन असे तीन मोठे कार्यक्रम मंदिरात साजरे होतात. २७ फेब्रुवारी हा मंदिराच्या वार्षिक संमेलनाचा दिवस आहे. यादिवशी हजारो भाविकांसाठी इथं लंगर पेटविला जातो. दिवसभरात किमान चारशे किलो तांदूळ शिजवला जात असल्याचं फतीया सांगतात. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी या मंदिरात भाविकांसाठी लंगरदेखील लागतो. आपल्यासाठी गोरोबा किंवा काका असणारे गोरा कुंभार जम्मूत मात्र गोराजी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा लंगर म्हणजे भंडारा ‘गोराजी का लंगर’ म्हणून ओळखला जाऊ लागलाय.

फतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर साडेचार हजार चौरस फूट जागेवर साकारण्यात आलंय. मंदिरात सध्या पाच खोल्या, स्नानगृह, स्वच्छतागृह आणि सुसज्ज असं भव्य सभागृह आहे. बाहेरून आलेल्या भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था इथं चोख केली जाते. राज्य सरकारनं हा भूखंड खास गोराजी कुंभार यांचं मंदिर साकारण्यासाठी निःशुल्क दिलाय. महाराष्ट्रातून भाविक आल्यानंतर साक्षात गोराजी कुंभार यांचं दर्शन झाल्याचा आनंद मिळत असल्याची भावना इथं असलेले प्रजापती समाजाचे कार्यकर्ते व्यक्त करतात.

0 Shares
माऊलींच्या गावात काका कालातीत एकाग्रता