संत गोरा कुंभार हे तेव्हाच्या संत मांदियाळीमध्ये वयानं सर्वात वडील होते. ते गृहस्थाश्रमी असले तरी वृत्तीनं विरक्तच राहिले. त्यांचा आध्यात्मिक अधिकारही मोठा होता. त्यांच्या काही अभंगांमधून त्यांनी संत नामदेवांना शंकराचार्यप्रणीत अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आहे. गोरोबांची उपलब्ध काव्यरचना अगदीच अल्प आहे. त्यांचे सुमारे वीस अभंग सकलसंतगाथेत समाविष्ट आहेत. त्यातून अद्वैत साक्षात्काराचं दर्शन होतं.
अद्वतै सिद्धी होण्यासाठी द्वैताचा निरास होणे आवश्यक आहे. आद्य शंकराचार्य आपल्या सर्व वाङमयातून द्वैताचा निषेध करतात किंवा द्वैत हे कसे मिथ्या आहे, हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ‘विवेकचुडामणि’ या त्यांच्या प्रकरण ग्रंथातील पुढील उदाहरणे याच प्रकारची आहेत.
यथा कदा वापि विपक्षीदेष ब्राह्मण्यनन्तेडप्यणुमात्रभेदम्।
पश्यत्यथामष्य भयं तदेव यद्विक्षित भिन्नतया प्रमादात्॥
याचा अर्थ, क्वचितच एखाद्या वेळी विद्वान साधकानं अनंत असलेल्या या ब्रह्माच्या स्वरूपात अणुमात्र भेद पाहिला तर त्याच वेळेला त्याला भय प्राप्त होतं. कारण तो प्रमादामुळं ब्रह्मामध्ये भेद मानतो.
क्रियासमभिहारेण यत्र नान्यादितिश्रुति:।
ब्रवीति द्वैतराहित्यं मिथ्याध्यासनिवृत्तये ॥
म्हणजेच, ’यत्र न्यानाति’ ही श्रुती अज्ञानामुळं होणार्या मिथ्या अध्यासाची निवृत्ती व्हावी म्हणून सर्व क्रियांचा समारोप करताना द्वैताचं शून्यत्वच प्रतिपादन करते.
निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदाकृत:। असं धृवपद असलेले चार श्लोक आचार्यांनी ‘विवेकचूडामणि’मध्ये सलग लिहिलेले आहेत. आचार्यांनी अद्वैताचा पुरस्कार आपल्या भाष्यग्रंथातून, प्रकरणग्रंथातून, स्तोत्रांतून वारंवार केलेला आहे. किंबहुना अद्वैताचा पुरस्कार करण्यासाठीच त्यांनी वाङमयनिर्मिती केली असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये. ‘विवेकचूडामणि’मध्ये ते म्हणतात, हे शिष्या, तू आपली इंद्रिये ताब्यात ठेवून मन शांत करून प्रत्यगात्म्यामध्ये निरंतर मग्न राहा आणि अनादि अविधेने उत्पन्न केलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा ‘एक सद्वस्तूच सर्वत्र आहे’ अशी भावना ठेवून तिचा नाश कर. तसंच
मायामात्रमिदं द्वैतमद्वैतं परमार्थत:।
इति ब्रुते श्रुती: साक्षात्सुषुप्तावनुभूतये ॥
याचा अर्थ हे द्वैत म्हणजे केवळ माया होय. परमार्थात अद्वैत ही वस्तूच सत्य होय असं साक्षात श्रुति सांगते आणि ते गाढ झोपेत सर्वांना अनुभवाला येते. तसंच परमेश्वर सर्वव्यापक आहे, हे सांगताना शंकराचार्य म्हणतात,
यदिदं सकलं विश्वं नानारूपं प्रतीतमज्ञानात् ।
तत्सर्वं ब्रह्मैव प्रत्यस्ताशेषभावनादोषम् ॥
म्हणजेच, हे जे सर्व विश्व अज्ञानामुळं अनेक रूपांचं दिसतं ते सगळं चित्रातील ‘जग सत्य आहे’ हा भावनेचा दोष नाहीसा झाल्यानंतर सर्व जग ब्रह्मच आहे, असा साक्षात्कार होत असतो.
जग हे परमात्म्यापासून वेगळं असं नसतं. पृथक असत्याची जी प्रचिती येते ती दोरीवरील सापाप्रमाणे मिथ्या आहे. एका वस्तूवर ज्या वेळी दुसर्याच वस्तूचा आरोप होतो त्यावेळेला ती दुसरी वस्तू खरी असते का? नाही, तर अधिष्ठानभूत पहिली वस्तूच भ्रमामुळं तशीच भासते. या ज्ञानानं अंत:करणातील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्या कर्माचा क्षय होतो. असं झालं म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही प्रसंगी स्वस्वरूपाचं स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणानं होऊ लागतं.
एका श्लोकात शंकराचार्य सांगतात, अशा परिस्थितीत काही सांगावयाचं असं काय उरलेलं आहे. जीव स्वत: ब्रह्मच आहे आणि ब्रह्माद्वितीयम् अशी श्रुती असल्यामुळं हे सर्व जग ब्रह्मरूपानं नटलेलं आहे. ज्ञानानं संपन्न बुद्धी झालेले लोक बाह्य म्हणून भासणार्या गोष्टींचा पूर्ण त्याग करून सतत ब्रह्मरूपच होऊन चैतन्याचा आनंद घेत राहतात हेच अंतिम तत्त्व होय.
जीव आणि सर्वजगत ब्रह्मरूपच होय. मोक्ष म्हणजे अखंड स्वरूपात राहणं हेच वेदांतानं सांगितलेले सिद्धांत होत.ब्रह्म हे सोन्याप्रमाणे अविकारी आहे.भ्रमामुळे अलंकार भासतात असं शंकराचार्य पुढील श्लोकात सांगतात,
यद्विभाति सदनेकधा भ्रमान्नामरूपगुणविक्रियात्मना ।
हेमवत्सयमविक्रियं सदा ब्रह्म तत्वमसि भावयात्मनि ॥
याचा अर्थ, ब्रह्म हे भ्रमामुळं नाम, रूप, गुण, इत्यादी अनेक स्वरूपानं भासत असतं. पण ते स्वत: नेहमी सोन्याप्रमाणे अविक्रिय असतं, असं ब्रह्म तू आहेस, अशी भावना आपल्या ठिकाणी कर.
शंकराचार्यांच्या‘विवेकचूडामणी’तील आशय संत गोरोबायांच्या अभंगांतून कसा आविष्कृत झाला आहे, हे उदाहरणासहित पाहणं योग्य ठरेल. या वर्णनाला स्वानुभवाची जोड आहे. ते सांगतात, परब्रम्हाला नाम, रूप नाही.
नाही जया रूप नाही जया ठाव ।
तेचि व्याले सर्व सांगतसे ॥
एकपणे एक एकपणे एक ।
एकाचे अनेक विस्तारिले ॥
हे विश्व म्हणजे एकाच परब्रह्माचा विस्तार आहे. तिथं अनेकत्व नाही एकत्व आहे.
काया वाचा मन एकविध करी ।
एक देह धरी नित्य सुख ॥
अनेकत्व सांडी अनेकत्व सांडी ।
आहे ते ब्रह्मांडी रूप तुझे ॥
‘निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ या प्रसिद्ध अभंगातही गोरोबा सांगतात,
अनेकत्व नेले अनेकत्व नेले ।
एकले सांडिले निरंजनी ॥
एकत्व पाहता अवघाचि लाटिके ।
जे पाहे तितुके रूप तुझे ॥
गोरोबांच्या काव्यात विषयांचं किंवा भावभावनांचं वैविध्य फारसं नाही. अद्वैत साक्षात्काराची अनुभूतीच त्यांच्या अभंगातून प्रगट झाली आहे. या साक्षात्कारानुभूतीचं वर्णन त्यांनी संत नामदेवांजवळ केलंय.
नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा ।
आवरण आरूपा कोण ठेवी ॥
तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जाण ।
रहित कारण स्वयंप्रकाश ॥
जीवनमुक्त होण्यासाठी अद्वैताचा उपदेश करताना गोरोबा सांगतात,
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त ।
सुखरूप अद्वैत नामदेवा ॥
अद्वैताचा सुखानुभव शब्दात सांगता येत नाही. तो अवर्णनीय आहे. मुक्या व्यक्तीला साखर खायला द्यावी आणि स्वाद विचारावा, त्याला तो सांगता येत नाही. तसाच हा अद्वैताचा अनुभव, आनंद आहे. इथंमूकास्वादनवत् या नारदभक्तिसूत्रातील वचनाचा मोठ्या चपखलपणे उपयोग केल्याचं जाणवेल.
मुकिया साखर चाखाया दिधली ।
बोलता हे बोली बोलवेना ॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद ।
आपुला आनंद आधाराया ॥
गोरोबांना आत्मा-परमात्मा,जीव-जगत-जगदीश्वर यांच्यातील ऐक्य मान्य होतंच. याशिवाय देव-भक्त, सगुण-निर्गुण,भक्त-भक्त अशा अन्य स्तरांवरील अद्वैत अभिप्रेत होतं. म्हणूनच गोरोबा नामदेवांना अद्वैताचा बोध करून देत असावेत. याही अर्थानं ते अद्वैतवादी होते, असं म्हणता येईल. म्हणूनच तेराव्या शतकातील या संत मांदियाळीत जातपात आड येऊ शकली नाही. अद्वैताच्या प्रवाहामुळं हे शक्य झालं. आद्य शंकराचार्यप्रणीत अद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायाभरणी करण्याचं महत्त्वपूर्ण काम यादवकालीन संतांनी केलं.
हाती थापटणे अनुभवाचे समाजाला घडवणारे संत