गोरोबा काकांचं समाधी मंदिर आणि राहतं घर इथं सुरू असणार्याा परंपरांचा हा धांडोळा
तेरचं संत गोरा कुंभार समाधी मंदिर रोज पहाटे चार वाजता उघडतं. त्यानंतर काकडा आरती होते. नित्य पूजा होऊन साधारण सहा वाजण्याच्या सुमारास आरती होते. दुपारी समाधीला नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याचं एक वैशिष्ट्य आहे. नैवेद्याच्या आधी गावामधून कामट्याची डालगी म्हणजे टोपली फिरवली जाते. गावातल्या अनेक घरांतल्या गृहिणी स्वयंपाक करताना पहिली भाकरी आणि एक चमचा भाजी गोरोबा काकांसाठी वेगळी ठेवतात. टोपली आणणारे लोक ‘आणा गोरोबा काकांचा नैवेद्य’ अशी हाळी देतात. घरोघरच्या गृहिणी काढून ठेवलेला नैवेद्य पाटीत ठेवून टोपलीला नमस्कार करतात. अशा टोपल्या मंदिरात आल्या की गोरोबा काकांच्या समाधीला नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यानंतर हा प्रसाद मंदिरातील सेवेकर्यांना आणि दर्शनाला आलेल्या यात्रेकरूंना वाटला जातो.
रात्री नऊच्या सुमारास हरिपाठ होतो. त्यानंतर आरती आणि शेजारती होते. यानंतर पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मंदिर बंद होतं. दर महिन्याच्या वद्य एकादशीस रात्री मंदिर बंद होत नाही. चातुर्मासात नित्यक्रमासोबत सकाळी पूजेनंतर आरती होण्याआधी गाथा भजन होतं. भागवत, ज्ञानेश्वरीचं पारायण आणि दुपारी भावार्थ रामायण यांचं पारायण होतं.
चैत्र वद्य पक्षात गोरोबा काकांचा समाधी उत्सव साजरा केला जातो. चैत्र वद्य दशमीला उत्सवाची सुरुवात होते. एकादशीला मुख्य महापूजा होते. चैत्र वद्य त्रयोदशी हा गोरोबा काकांचा समाधी दिवस. या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान समाधी वर्णनाचं कीर्तन होतं. समाधी वेळेस गुलाल आणि पुष्पवृष्टी केली जाते. ही कीर्तनसेवा पंढरपूर इथले तुकोबारायांचे विद्यमान वंशज असलेल्या देहूकर मंडळींकडे आहे. दुसर्या दिवशी काला होऊन उत्सवाची सांगता होते. या काल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम नरसिंह मंदिरात होतो. यासाठी गोरोबाकाकांची पालखी नरसिंह मंदिरात येते. इथं काल्याचं कीर्तन होऊन दहीहंडी फोडली जाते. हंडी फोडल्यावर गोरोबाकाकांची पालखी पळवत लगेच मंदिराकडे परत आणली जाते. यावेळेस पालखीसोबत फक्त पालखी उचलणारे भोई आणि विणेकरी एवढीच मंडळी उरतात. अक्षय तृतीयेनंतर प्रक्षाळ पूजा होऊन उत्सव संपतो. दशमीपासून प्रक्षाळ पूजेपर्यंत मंदिर अहोरात्र दर्शनासाठी खुलं असतं.
समाधी उत्सवानंतर तयारी सुरू होते उटीच्या वारीची. उन्हाळ्यामध्ये विविध देवस्थानांमध्ये देवाला चंदनाची उटी केली जाते. तेरमध्येही वैशाख वद्य एकादशीला चंदन उटी होते. रोज थोडं थोडं चंदन उगाळून वाळवून ठेवलं जातं. वीसेक दिवस उगाळून ठेवलेल्या चंदनात हळद आणि अष्टगंध मिसळून समाधीवर चंदनानं गोरोबाकाकांचं चार ते साडेचार फूट उंच रूप साकारलं जातं. कधी उभ्या, कधी घोड्यावर बसलेल्या अशा वेगवेगळ्या रूपात उटी केली जाते.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. गोरोबा काकांची पालखी मात्र कार्तिकी वारीला पंढरपूरला जाते. पालखीचं प्रस्थान दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी होतं. प्रस्थान समाधी मंदिरातून न होता गोरोबा काकांच्या राहत्या घरातून होतं. पालखी सर्वात आधी समाधी मंदिरात येते. नंतर पुढच्या प्रवासाला निघते. गोरोबाकाकांच्या पालखीला निरोप देण्यासाठी गावातल्या माहेरवाशिणी आवर्जून येतातच. पण माहेरी गेलेल्या सासुरवाशिणी सुद्धा भाऊबीज लवकर करून गावात परततात. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात अजूनही रथाचा वापर होत नाही. पालखी पूर्वापार पद्धतीनं खांद्यावर वाहून नेली जाते. पालखीचा मार्गसुद्धा पूर्वापार ठरलेला आहे. हिंग्लजवाडी, वरुडा, उस्मानाबाद, भातांब्रे, वैराग, येवला, खायराव कुंबर, अनगर, रोपळा असा नऊ दिवसांचा मुक्काम करत दहाव्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचते. कुठं शेतातून, कुठं नदीतून अशा परंपरेने ठरलेल्या आडमार्गानं पालखीची वाटचाल असते. गोरोबाकाका याच मार्गानं पंढरपूरला जात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ग्लोबल गाव महाराष्ट्राचा वारसा