आजचा कुंभार समाज संत गोरा कुंभारांना आदर्श मानतो. तोच आपल्या मुळांचा इतिहास शोधत वेद आणि पुराणांतल्या कथांमध्ये शोधतो. पण कुंभारांचा इतिहास वेदांपेक्षाही हजारो वर्ष जुना आहे. त्याचे पुरावे आपल्या महाराष्ट्रातही आहेत.
पाषाणांतून उगवलेल्या संस्कृतीला ‘अश्मयुग’ म्हटलं जातं. तेव्हा माणूस शिकारी आणि पशुपालक अवस्थेत होता. या काळात दगडाची हत्यारं, तासण्या, टोचण्या, रंगीबेरंगी दागिने बनवले जात. सभोवतालच्या उपलब्ध नैसर्गिक साधनांना कष्टानं जीवनोपयोगी बनवण्याची ही कला मानवी बुद्धीची एक झेपच होती. याच काळात माणूस दगडांबरोबरच मातीचाही कल्पकतेनं उपयोग करायला शिकला. ती कला म्हणजेच कुंभारकाम.
आज माणसाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधनं आहेत. दगडी हत्यारं आणि मातीच्या भांड्यांची खापरं. भारतात कुंभारकलेची सुरुवात किमान तीस हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व काळापासूनच्या कुंभारकामाचे नमुनेही आपल्याला मिळतात. त्या खापरांवरून त्या काळातील पर्यावरण, पिकं याचीही माहिती मिळते. हातानं घडवलेली मडकी आणि वस्तूंपासून कुंभारकामाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर चाकाचा, आव्यांचा कल्पकतेनं आणि विज्ञानदृष्टीनं उपयोग केला गेला, याचा सलग आलेख आपल्याला पाहायला मिळतो.
सिंधूसंस्कृती निर्माण होण्याआधी आणि वेदांची रचना होण्याच्या आधीच्या कालखंडापासून अश्म संस्कृतीबरोबरच ही मृत्तिका संस्कृती अस्तित्वात होती. मानवी जीवन सुखमय करण्यात या संस्कृतीचा मोठा वाटा आहे. आता नवनवीन शोधांनी पर्याय दिले असले, तरी कुंभारांचा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. ते खर्या अर्थानं निर्माणकर्ते आहेत. मातीला कौशल्यानं घडवत आव्यांत विशिष्ट प्रकारची धग देत हव्या त्या रंगांची मातीची भांडी बनवणारे हे आद्य वैज्ञानिक आहेत.
कुंभारकामाचा शोध अपघातानं लागलेला नाही. वस्तू ठेवण्यासाठी वेली, बांबूच्या कामट्या यांचा उपयोग करून बुरुडकाम समांतर अस्तित्वात होतं. पण द्रव पदार्थांचं काय करायचं, हा प्रश्न होताच. आद्य माणसानं चिखलाला आकार देत काही वस्तू बनवल्या. या वस्तू वाळवून काही प्रमाणात प्रश्न सोडवला तरीही त्या वस्तू तेवढ्या उपयुक्त नव्हत्या. बनवलेल्या वस्तू भाजल्यानं अधिक टणक आणि टिकाऊ होतात हे माणसाच्या कालांतरानं लक्षात आलं. यातूनच माती बनवण्याची प्रक्रिया आणि विज्ञान विकसित झालं. हवी तेवढी उष्णता निर्माण करण्यासाठी आव्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लावला. आवा म्हणजे मडकी भाजायच्या भट्ट्या. खरंतर या शोधाला थर्मोडायनामिक्समधला म्हणजे उष्मागतीशास्त्राचा पहिला शोध म्हणता येईल. याच शोधातून पुढं धातू गाळणार्या भट्ट्यांचा शोध लागला. चाकाचा शोध लागला असला तरी त्याचाच उपयोग करून हव्या त्या आकाराच्या वस्तू बनवता येतात, हाही त्याच संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा.
सिंधू संस्कृतीत असंख्य कलात्मक मातीची भांडी सापडलीत. महाराष्ट्रातही दहा हजार वर्षांपूर्वीचे कुंभारकामाचे अवशेष आढळलेत. पाचाड इथल्या गुहांत मध्याष्मयुगातील इ.स.पूर्व ९०००मधील दगडी हत्यारं मिळाली. त्याबरोबरच खापरंही मिळालीत. आजवर हाती आलेला हा सर्वात जुना पुरावा. पुढं उत्खननं होत जातील तसे त्याहूनही जुने पुरावे हाती येण्याची शक्यता आहेच. याचाच अर्थ आजपासून किमान अकरा हजार वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्र कुंभारकामात प्रवीण होऊ लागला होता. माणूस स्थिर झाला तशी या व्यवसायाची व्याप्ती अजून वाढत गेली. साहजिकच कुंभारकामात कुशल असणारे लोक या व्यवसायात शिरले. पुरातन कुंभारांच्या कलेचे नमुने भारतात सर्वत्र मिळालेले आहेत. त्यातून माणसाचा इतिहास शोधण्याच्या कामातही या समाजानं हातभार लावलेत.
सिंधू संस्कृतीच्या काळात या व्यवसायाची मोठी भरभराट झाली होती. या काळात कुंभांवर नक्षीकामाबरोबर लोककथाही चितारून चिरंतन केल्या गेल्या. एका हुशार कावळ्यानं पाणी तळाला गेलेल्या माठात खडे टाकून आपली तहान भागवली. ही लोकप्रिय कथा सिंधू संस्कृतीतील गुजरातमधील एका पुरातन स्थळावरील माठावर चितारली गेली होती. अर्थात ही कथाही तत्कालीन कुंभारांनीच निर्माण केली असणार आणि आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं असणार, हे उघड आहे. एवढंच नव्हे तर तत्कालीन शिवशक्तीप्रधान धर्मकल्पना, पिंपळाचं असलेलं महत्त्व अशा गोष्टी कुंभारांनी मातीच्या भांड्यांवर चित्रित केल्या आहेत. त्यामुळं आपल्याला तत्कालीन धर्मसंकल्पनांचाही परिचय होतो. त्या अर्थानंच कुंभार हे इतिहासाचे वाहकही ठरलेत.
महाराष्ट्रात जोर्वे, इनामगांव अशा ठिकाणांवर प्राचीन आव्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. विशेष म्हणजे इसवीसन पूर्व दोन हजारमधील आव्यांची रचना आणि आजही प्रचलित असलेल्या पारंपरिक आव्यांच्या रचनेत फारसा फरक नाही. म्हणजेच थर्मोडायनॅमिक्समध्ये गाठलेली उंची परंपरेप्रमाणे आजच्या कुंभारांनीही जपलीय. त्यांनी त्याचे शास्त्रीय नियम लिहून ठेवले नसले तरीही ते त्यांना माहीत असल्याखेरीज हे होणं शक्य नाही.
श्रेणी अथवा निगम संस्थेचा जन्म सिंधू काळातच झाला. श्रेणी संस्था म्हणजे समान व्यावसायिकांच्या आजच्या कमर्शियल चेंबर्ससारख्या संस्था. कुंभारांच्या श्रेण्या त्या काळापासून अस्तित्वात असल्याचे संकेत आपल्याला सिंधू संस्कृती काळातल्या मुद्रांवरून आणि कुंभांशी जवळीक साधणार्या चित्रांवरून मिळतात. कुंभारांच्याही अशा श्रेण्या देशभर होत्या. श्रेण्यांना ठेवी घेण्याचे आणि कर्ज देण्याचे अधिकार होते. तसंच चलनी नाणी पाडण्याचेही अधिकार होते. भारतात दहाव्या शतकापर्यंत प्रत्येक व्यवसायाच्या अशा स्वतंत्र श्रेण्या असत. प्रसंगी राजाला कर्ज देण्याचं काम या श्रेण्या करत. इतका धनाचा पूर त्यांच्याकडे वाहत असे. गुप्त सम्राटांनी श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घेतल्यानंतर आणि सरंजामी युगाचा उदय झाल्यानं श्रेण्या कमजोर झाल्या. त्या श्रेण्यांचंच पुढं जात पंचायतींत रूपांतर झालं. कुंभार जातीचा उदय त्यातूनच झाला.
कुंभार समाजाला पूर्वी प्राकृतात ‘कुलाल’ असं नाव होतं. ते तिसर्या शतकानंतर संस्कृतच्या परिचयानं कुंभार झालं. कुंभार त्या काळातही रांजण, सुरया, गाडगीमडकी, खापराचे तवे, मद्यपात्रे, मद्यकुंभ ते फुलदाण्या निर्मितीचं काम करत असत. धातूच्या वस्तू पूर्वी तशा दुर्मीळ होत्या. तशाच त्या महागही असल्यानं मातीची भांडी हीच सामान्यांची मोलाची सोय होती. त्यामुळं या व्यवसायाला बरकत होती.
बौद्ध जातक कथांत आपल्याला याचे असंख्य संदर्भ मिळतात. या श्रेण्यांना राजदरबारी मोठा मान असे. श्रेणीच्या अनुमतीखेरीज कोणताही राजा कर, व्यापार किंवा कोणत्याही प्रकारचं नियंत्रण लादू शकत नसे. एका अर्थानं ही व्यवसायाला स्वातंत्र्य देणारी व्यवस्था होती. नवीन कारागीर घडवण्यासाठी या श्रेणी प्रशिक्षण देण्याबरोबर मालाचा दर्जा आणि किंमत ठरवण्याचंही काम करत. श्रेण्यांचा कारभार लोकशाही पद्धतीनं चाले. श्रेणी प्रमुखास ‘ज्येट्ठी’ अशी संज्ञा होती आणि तो निवडून आलेला असे. प्रत्येक श्रेणीचे नियम असत आणि ते पाळणं श्रेणी सदस्यांना बंधनकारक असे.
त्या काळात साखर, मध आणि विविध प्रकारचे तेल रांजण भरून भरून शेकडो गाड्यांतून दूर दूरच्या बाजारपेठांत नेलं जात. अशा शेकडो गाड्यांच्या एकेक तांड्यांचं वर्णनही आपल्याला जातककथांत मिळतं. कुंभार त्या काळी किती श्रीमंत असावेत, हे सद्दलीपुत या एका कुंभाराच्या वर्णनावरून लक्षात येतं. या सद्दलीपुताचे पाचशे आवे होते. तो विविध प्रकारची मातीची भांडी गंगानदीच्या काठावर असलेल्या विविध बंदरांवरून ठिकठिकाणी नेई. कुंभारांनी आणि त्यांच्या श्रेण्यांनी जलाशय, विहार, मंदिरांना आर्थिक देणग्या दिल्याचे अनेक शिलालेख भारतभर उपलब्ध आहेत. सातवाहन काळातील शिलालेख त्या दृष्टीनं उल्लेखनीय आहेत.
मानवी संस्कृतीच्या उत्थानात अशा पद्धतीनं कुंभार समाजाचं एक महत्त्वाचं स्थान आहे. याच समाजात संत गोरा कुंभार झाले. ऐहिक संस्कृतीबरोबरच आध्यात्मिक संस्कृतीचाही त्यांनी जागर केला. कुंभार कामातील विविध अवस्था त्यांनी रूपकांच्या रूपानं पुढं आणल्या. ते महाकवी होते, असंच म्हणावं लागेल. १२६७ते १३१७ या त्यांच्या काळापर्यंत श्रेणी संस्था लयाला गेली होती. सतत पडणारे दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेमुळं सर्वच समाजांवर आर्थिक आरिष्ट कोसळलेलं होतं. जात व्यवस्थेनं कठोर रूप धारण केलं होतं. असं असलं तरी कुंभार कामाचा व्यवसाय तग धरूनच होता. याचं कारण म्हणजे मानवी जीवनातील त्याची असणारी अपरिहार्यता.
धार्मिक कामाला लागणार्या पणत्यांपासून, देवमूर्तींपासून ते पाणी साठवण्यासाठी लागणारे माठ आणि घरबांधणीचं साहित्य कुंभारच पुरवत होते. असं असलं तरी श्रेणी काळात उत्पादित मालाच्या किंमती ठरवायचे अधिकार जवळपास नष्ट झाले होते. थोडक्यात उत्पन्नावर मर्यादा आलेल्या होत्याच. शिवाय करांतही वाढ झालेली होती. यादव साम्राज्याचीही पडझड सुरू झाली होती. एका अर्थानं महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथीचा हा काळ आहे. याच काळात विठ्ठलाच्या भोवती संतांची मांदियाळी तयार झाली आणि वारीची परंपरा सुरू झाली, हा योगायोग नाही. निर्गुण मातीला आकार देऊन सगुण करत मानवसेवा करणार्या कुंभारांच्या नसानसांत ते अध्यात्म होतंच. हेच अध्यात्म अत्यंत उत्कटतेनं गोरोबा काकांच्या अभंगांत उतरलेलं दिसतं. गोरोबांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला, तरी श्रमांना त्यांनी सोडलं नाही. किंबहुना त्यांचा भक्तिवाद पलायनवादी नव्हता. चमत्कारांची पुटं दूर केली की वास्तव दिसू लागतं. या नजरेनं गोरोंबांच्या संदर्भातील काही कथा पाहिल्या तर त्यातून त्यांची कामावरील निष्ठा आणि प्रेम दिसेल.
आदिम काळापासून मातीतून शिल्पं घडवणारा कुंभार समाज समस्त मानवजातीला उपयुक्त अशा अर्थकारणाला चालना देत राहिला. कला आणि संस्कृतीलाही घडवत राहिला. या समाजातून अनेक तत्त्वज्ञ, महापुरुष घडले असण्याची शक्यता आहे. संत गोरोबांच्या जीवन चरित्राबाबतच फारशी विश्वसनीय माहिती मिळत नाही तर त्यापूर्वीच्या थोरांची कशी माहिती मिळणार? आज गोरोबांचं स्मरण केवळ कुंभार समाजच करताना दिसतो. पण कुंभार नसते तर मानवजातीचाही इतिहास अज्ञात राहिला असता, हे इतरांनी लक्षात घेतलं पाहिजे. मातीची शिल्पं घडवणार्या याच समाजानं भावभक्तीची शब्दशिल्पं घडवणारा गोरोबा काकांसारखा महान संत दिला, याचं स्मरणही ठेवलं पाहिजे.
सत्यशोधक पंडित गोरोबांचे अभ्यासक