सत्यशोधक पंडित

डॉ. सदानंद मोरे

महात्मा फुलेंच्या पश्चात सत्यशोधक चळवळीला दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यापैकी एक असलेले धोंडिराम कुंभार वारकरी परंपरेशी नातं जुळवू पाहत होते. त्यांनी गोरोबांना नक्की अभ्यासलं असणार. पण इतिहासाला त्याची माहिती नाही.

आपला समाज जातिव्यवस्थेवर आधारलेला आहे, ही गोष्ट मान्य करावीच लागते. त्यामुळंच कोणत्याही गोष्टीचा, प्रश्नाचा विचार करताना त्याची एक जातीय बाजू देखील असते आणि ती विचारात घ्यावी लागते. त्यामुळंच आपल्या जातीत कोण नायक, महानायक होऊन गेले हा विचार त्या जातीतले लोक करतात. त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो, हेही पाहिलं जातं.

तथाकथित कनिष्ठ जातींच्या मंडळींसाठी हा प्रश्न तर जास्त महत्त्वाचा ठरतो. कारण उच्च जातींना मिळणार्‍या साधनांमुळं क्षमता असलेल्या लोकांना विकास करण्याची संधी मिळते. ते मोठे होतात. अशी संधी निम्न स्तरातील लोकांना मिळत नाही. तशी साधनं आणि परिस्थितीही त्यांना न मिळाल्यामुळं क्षमता असूनही ते मागे पडतात. त्यांच्यातल्याच कुणी परिस्थिती अनुकूल नसतानाही कष्टाच्या, पराक्रमाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर काही एक स्थान मिळवलं, तर असे लोक त्या जातीसाठी नायकठरतात. त्यांच्या जातीला अस्मिता देतात. किंबहुना ते अस्मितेचं प्रतीक बनतात. अभिमानाचा भाग बनतात. मग असंही म्हटलं जातं की संबंधित व्यक्ती मोठी होती; पण तिच्यावर विनाकारण जातीचा शिक्का बसलाय. खरंतर ती व्यक्ती सगळ्या समाजाची असली पाहिजे, पण जातीच्या वर्तुळात त्या व्यक्तीला अडकवलं, असेही आक्षेप घेतले जातात. हे आक्षेप खरे आहेत. त्यात नाकारण्यासारखं काही नाही. तरीही तुम्ही काहीही करू शकत नाही. हे ‘सोशल डायनॅमिक्स’ आहे.

याचं एक चांगलं उदाहरण देता येईल. पंढरपूरला कैकाडी महाराजांचा मठ आहे. निम्नस्तरातील जातीतून ते पुढं आले होते. त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात नाव कमावलं. त्यांचे विचार अगदी तळागाळापर्यंत पोचले. त्यांनी गाडगेबाबांचं काम पुढं नेलं. त्यांच्या पंढरपुरातल्या मठाला किमान पन्नास वर्ष तरी झाली असतील. या मठात मोठमोठ्या लोकांचे पुतळे आणि मूर्ती आहेत. पूर्वीच्या काळी होऊन गेलेला एखाद्या जातीतला संत आणि आधुनिक काळात त्या जातीत होऊन गेलेला कुणी मोठा माणूस. ही पुतळ्यांची मांडणी अशा पद्धतीची आहे की आधुनिक काळातला माणूस हा त्या जातीत जुन्या काळी होऊन गेलेल्या मोठ्या पुरुषाचा अवतार आहे. हे सगळं मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो. अशा पद्धतीच्या मांडणीमुळं आपण काय करत आहोत, ही व्यवस्था बळकट करत आहोत का? असंही वाटलं.

पण तुम्ही आम्ही काय करणार? तथाकथित खालच्या स्तरातील साधनांपासून वंचित असणार्‍या जातीतल्या लोकांसमोर आदर्श ठेवायचे असतील तर हाच मार्ग आहे. त्यातूनच या जाती कधी कधी आक्रमक होतात. आपल्या स्वतःच्या नायकावर कुणी ‘क्लेम’ केला तर त्यांना ते आवडत नाही. त्यातूनच एका जातीतील नायक दुसर्‍या जातीतील लोक स्वीकारत नाहीत. सगळ्या लोकांना स्वीकारार्ह असतात, अशा महापुरुषांची जी जात असते, त्यातल्या लोकांनाही वाटू लागतं की हे आपल्या जातीतले आहेत, तर मग त्यांना धरून ठेवलं पाहिजे.

जातीतील महापुरुषांना, मंडळींना आपल्या पुरतं बांधून ठेवण्याची मानसिकता असं काम करते. ही ‘सोसायटल फॅक्ट’ आहे. हा शब्द पहिल्यांदा डरखाइमनं वापरला. तो समाजशास्त्रज्ञ होता. समाजात आढळणारी ही वस्तुस्थिती पूर्णतः सामाजिक असते. ती व्यक्तींनी निर्माण केलेली नसते. ही वस्तुस्थिती निर्माण होण्यासाठी भूतकाळातील एखाद्या व्यक्तीनं त्या दिशेनं पाऊल टाकलं असेल. असंही म्हणता येईल. पण वर्तमानकाळातल्या व्यक्तींनी ती निर्माण केलेली नसते. उलट आजच्या वर्तमानकाळातल्या व्यक्ती त्या पावलाचा अवलंब करतात, तेव्हाच वस्तुस्थिती खर्‍या अर्थानं जन्माला येते. किंबहुना वर्तमानकाळातल्या व्यक्ती ही वस्तुस्थिती असणार्‍या वातावरणातच जन्माला येतात. ‘विच एक्झिस्ट इंडिपेंडंटली ऑन मॅन अ‍ॅण्ड विच हॅज अ कोअर्सिव्ह पॉवर’ या अर्थानं या वस्तुस्थितीत एक ताकद असते. जातीव्यवस्था ही सुद्धा अशीच एक वस्तुस्थिती आहे. हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर धोंडिराम कुंभार यांच्या कर्तृत्वाकडे पाहायला हवं.

महात्मा जोतिराव फुले यांच्या पश्चात सत्यशोधक समाजाचा किल्ला लढवण्याचं काम सामुदायिकरीत्या झालं. जोतिरावांच्या नेतृत्त्वाची पोकळी भरून काढणारे त्यांच्या तोलामोलाचं व्यक्तित्त्व लगेचच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा करणंही चुकीचंच ठरेल. इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा अनुभव येतच नाही, असं नाही; पण एक तर ती लगेचच होईल असं नाही आणि दुसरं असं, की परमेश्वरानं महापुरुष निर्माण केल्यानंतर त्याचा साचा तो मोडून टाकतो, असंही म्हटलं जातं.

पण याचा अर्थ जोतिरावांच्या नंतर सत्यशोधक समाजाचं कार्य केलेले लोक मोठे नव्हते, असा मात्र नाही. ते जोतिरावांइतके मोठे नव्हते, त्यांचं नेत्तृत्व सर्वांनीच स्वीकारावं असं नव्हतं, एवढाच त्याचा अर्थ. कृष्णाजी पांडुरंग भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे हे दोघं या संदर्भात ठळकपणे पुढं येतात. लोखंडे, भालेकरांच्यानंतर प्रबोधनकार केशवराव ठाकरे, ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी केली हे खरं आहे. हे दोघेही उत्तम पत्रकार होते. ठाकरे तर प्रभावी वक्तेसुद्धा होते; परंतु चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्य त्यांच्या ठायी नव्हती.

दुसर्‍या बाजूला आगरकरप्रभृती उच्चवर्णीय सुधारकरांच्या बाबतीतही काही वेगळी अपेक्षा करता येणार नाही. धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या विधवाविवाहाच्या पुरस्कर्त्यालासुद्धा आपल्या मूळ उद्दिष्टाला आणि कार्यक्रमाला मुरड घालून स्त्रीशिक्षणापुरतं मर्यादित व्हावं लागलं. सुधारणांच्या आगरकरी प्रकाराला आगरकरांच्या पश्चात त्यांच्यासारखं नेतृत्व लाभलं नसलं, तरी फुलेप्रणीत सत्यशोधक समाजाला मात्र करवीर शाहू छत्रपतींच्या रूपानं एक समर्थ पर्याय प्राप्त झाला, असं म्हणता येतं.

पण जोतिरावांपासून शाहू महाराजांकडे नेतृत्वाचं संक्रमण होताना घडून आलेला महत्त्वाचा बदल म्हणजे वेदांविषयीचं धोरण. स्वतः जोतिरावांचा वेद आणि वेदप्रामाण्य यांना तीव्र विरोध होता. इतकंच नव्हे, तर त्यांची विचारधारा, त्यांचं इतिहासलेखन अशा अनेक गोष्टी या विरोधावरच आधारित होत्या, याचा उल्लेख यापूर्वी करण्यात आलेला आहेच. तथापि, एवढं असूनही वेदनिष्ठ दयानंद सरस्वतींसारख्या धर्मसुधारकाला सहकार्य करण्याइतका लवचिकपणाही त्यांच्यात होता. फुले यांच्या मृत्यूनंतर विशेषतः शाहू महाराजांच्या उदयानंतर वेदांचा अधिकृतपणे स्वीकार करण्यात आला. त्या वातावरणातही काही सत्यशोधकांनी जोतिरावांचा वेदविरोधाचा वारसा चालू ठेवला. मुकुंदराव पाटलांसारखे सत्यशोधक प्रसंगोपात्त वेदांवर टीका करत राहिले; पण वेदांना पूर्ण लक्ष्य करून त्यांची चिकित्सा करणारा विचारवंत म्हणजे पंडित धोंडिराम नामदेव कुंभार.

ही तत्कालीन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर हे धोंडिराम कुंभार नेमके कोण होते? असा प्रश्न पुढं येतो. पण आज धोंडिराम कुंभारांचे चरित्र तपशील समाधानकारकपणे उपलब्ध नाही. तथापि, सत्यशोधक समाजाच्या १८७६च्या अहवालात उल्लेख असलेले आणि १८७५मध्ये पुण्याला आलेल्या इंग्लंडच्या युवराजाला उद्देशून स्वागतपर पद रचणारे, जोतिरावांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथात जोतिरावांशीच प्रश्नरूपाने संवाद साधरणारे धोंडिबा तेच हे असावेत, असं अभ्यासकांचं मत आहे. ‘गुलामगिरी’ जून १८७३मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर लगेचच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्या वेळी धोंडिराम हे केवळ जिज्ञासू श्रोते होते. त्यानंतर वीस वर्षांनी १८९३, १८९६ आणि १८९७ या तीन वर्षांत त्यांनी अनुक्रमे सलग ‘सत्यदर्पण’, ‘वेदाचार’ आणि ‘तमाशा’ ही पुस्तकं लिहिली.

त्यापैकी ‘वेदाचार’ हे पुस्तक वेदांशी संबंधित आहे. ते वाचलं म्हणजे वीस वर्षांपूर्वीच्या एका जिज्ञासू श्रोत्याचं रूपांतर एका पंडितात झाल्याचं पाहून आदरयुक्त आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शिवाय ‘पंडित’ ही पदवी त्यांनी खुद्द शंकराचार्यांबरोबर केलेल्या जाहीर वादात मिळाली, अशीही नोंद आहे. त्यानंतर अशा प्रकारचा वाद एका शतकानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला; पण सप्तर्षींना अशी पदवी वगैरे काही मिळण्याऐवजी तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. यावरून शतकापूर्वीचे लोक अधिक सहिष्णू होते, असं म्हणावं काय?

धोंडिराम कुंभारांच्या ‘वेदाचार’ या पुस्तकाची प्रत प्रसिद्ध अभ्यासक विजय सुरवाडे यांच्याकडून डॉ. य. दि. फडके यांच्यामार्फत बाबा आढावांना उपलब्ध झाली. त्यांनी ती प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे या पुस्तिकेत धोंडिरामांचा उल्लेख ‘ज्येष्ठ शृंगेरी कुडलगीचे स्वामी जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या संस्थानचे सुरसुभे‘ असा करण्यात आलेला आहे. तो विस्मयकारक आहे. ही मजल धोंडिरामांनी कशी मारली, याचा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा.

प्रस्तुत ‘वेदाचार’ ही पुस्तिका रचनेच्या दृष्टीनं जोतिरावांच्या ‘गुलामगिरी’शी नातं सांगणारी आहे. पं. धोंडिराम कुंभार आणि बॉम्बे रायफलच्या चौथ्या पलटणीचे जमादार लक्ष्मणराव गोपाळराव सावंत देसाई इनामदार यांच्यातील हा संवाद आहे. देसाई यांनीच ही पुस्तिका प्रकाशित केलीय. ‘वेदाचार’मध्ये धोंडिराम कुंभारांचा रोख मुख्यत्त्वे वैदिक धर्मात यज्ञाच्या प्रसंगी करण्यात येणार्‍या पशुहिंसेवर आहे. ‘वेदाचार’ची सुरुवात धोंडिराम अकरा चरणांच्या इरसाल स्वरचित अभंगानं करतात. त्यातील काही ओळी –

पाहिले हे वेद आणि वेद धर्म ।
कळो आले वर्म शोधिताना ॥
शोधिताना सर्व हा ब्रह्मघोटाळा ।
आला हा कसला याज्ञिकांचा ॥
याज्ञिक ते सर्व भ्रष्ट व खादाडे ।
फोडिताली हाडे घाणेरडे ॥
तुमचे तुम्हीच ओळखा भ्रष्टांना ।
तुम्हा यजमाना बाटविले ॥
बाटविले जग धोंडिराम म्हणे ।
पाहुनिया घेणे वेदश्रुत्यां ॥

पुस्तिकेचा समारोपही अभंगानंच करण्यात आला आहे. तो जोतिरावांच्या शिकवणुकीशी सुसंगतच आहे.

ब्राह्मणेतर हिंदु बांधवांना ।
माझी ही सूचना आहे थोडी ॥
इंग्लिश राजाचा माना उपकार ।
जयजयकार करा त्याचा ॥
देई विद्यादान सर्वांसी समान।
कधी मोठे सात लेखी नाही॥
सर्वांवर सम सम कृपादृष्टी।
करी ज्ञानवृष्टी सर्वांवरी॥
भरत खंडात राजे बहु झाली।
नाही विद्या दिली कोणी आम्हा॥
शूद्रा अतिशूद्रां ठेविले पशूंत।
भटाच्या अंकित राहोनिया॥
जयजयकार त्या महाराजीचा।
दिली आम्हा वाचा बोलायला॥
धन्य राणीबाई तुझ्या या राज्यात।
या अज्ञानाप्रत दिले ज्ञान॥
ऐकण्याचे वेद आम्हा होती बंदी।
या राज्यात संधी सापडली॥
वेदशास्त्रे सारे वाचुनि पाहिली।
भ्रांति ते उडाली अज्ञान्यांची॥
वाचुनि पाहता भ्रमाचा भोपळा।
आलासे कंटाळा याज्ञिकांचा॥
लोपलेले गुप्त बाहेर पडले।
नेत्र उघडले या राज्यात॥
धोंडिराम नित्य गुणा ते वाखाणी ।
म्हणे धन्य राणीबाई तूचि॥

धोंडिरामांच्या विवेचनाची चर्चा करण्यापूर्वी वेद आणि सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा संबंध उलगडणार्‍या आणखी एका मुद्द्याचा खुलासा करणं उचित होईल. वेदांचं प्रामाण्य मानताना उत्तरकालीन ब्राह्मणांनी स्वतःला अनुकूल अशी वैचारिक व्यूहरचना केली. त्यानुसार वेदांमधील यज्ञीय हिंसेची आणि कर्मकांडाची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकायची आणि उपनिषदांमधील उच्च दर्जाच्या ब्रह्मज्ञानचर्चेचं श्रेय क्षत्रियांना द्यायचं. असं केलं म्हणजे यज्ञांवर टीका करणार्‍या उपनिषदांबरोबर आणि यज्ञविरोधी गौतम बुद्ध या क्षत्रिय वर्णाच्या धर्मसंस्थापकालाही आपलं म्हणता येतं.

धोंडिरामांनी वेदांचा तपशीलवार अभ्यास केल्याचं दिसून येतं. तो त्यांनी वेदांच्या इंग्रजी भाषांतरावरून केला, असं म्हटलं तरी त्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा चांगली आत्मसात करावी लागली असणार, हे उघड आहे. इंद्रादी वैदिक देवदेवतांवर धोंडिरामांनी नैतिक मुद्द्यांवरून टीका केली आहे. हिंसेच्या संदर्भात ते म्हणतात, की ‘वेदांत असा एखादा भाग सापडणार नाही, की त्यात यज्ञमिशे हिंसा नाही.’

धोंडिराम अगोदर यज्ञाची रचना स्पष्ट करतात. यज्ञात चार अग्नी, एकोणीस प्रकारचे पुरोहित, पंधरा पानं व स्थानं, अठ्ठावीस यज्ञशाळाप्रकार आणि अठरा अनुष्ठानं, असा एकूण संभार असतो. यानंतर वेदांमधीलच ब्राह्मण ग्रंथांच्या आधारे धोंडिराम यज्ञक्रियाच्या स्वरूपाकडे वळतात. ‘अध्वर्यू’ (मुख्य पुरोहित) त्या पशूस शामित्र शाळेत (पशू वधविण्याची शाळा) नेऊन त्याचे उत्तरेस पाय करून पाडितो. पशूस पाडल्यानंतर ‘शमिता’ (पशूस वधणारा खाटिक ऊर्फ कसाब) हा त्या पशूचा गळा दाबून व मुष्टिप्रहार करून मोठ्या क्रूरतेनं प्राण घेतो. पुढं या पशूचा शमिताभट कसाबानं प्राण घेतल्यावर इडासुनुवर (पशू फाडण्याचा लाकडी कुद्यावर) पशूस टाकून हातात स्वधिनी (सुंशा) घेऊन त्याने पशूस फाडतात आणि त्याचं मांस काढून त्याचा होम करतात (भाजतात). त्यातून काही जळूनही जातं, शेष राहिलेले मांस पुरोहित आणि सर्व ब्राह्मण मंडळी वाटून घेतात.

पंडित धोंडिरामांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांची भाषा आव्हानात्मक आहे. मागे यवन राजानं सर्व वेदांचं खंडन केलं. त्या उपरांत जैन, बौद्ध, इंग्लिश, जर्मन लोकांनी त्याचा तर्जुमा केला आणि आता शेवटी मी सत्यशोधक पंडित धोंडिराम नामदेव तर त्याचं खंडनच काय, परंतु खंडन करून वरती मुंडणही करण्यास सिद्ध झाले आहेत.

धोंडिरामांनी यज्ञीय हिंसेचे खूप तपशील पुरवले आहेत. ते सर्व इथं द्यायची गरज नाही. जोतिरावांनी लावलेली इतिहासाची संगती त्यांना मान्यच आहे. पुस्तिकेत त्यांनी स्वतः याविषयी रचलेल्या आणि अस्पृश्यांचे नेते गोपाळबाबा वलंगकर यांनी चतुशृंगी इथं भरलेल्या परिषदेत गायलेलं पद उद्धृत केलं आहे. त्याचा समारोप ‘जाळा खोटी शास्त्रे सत्योपदेश करा। दिली सूचना तुम्हा पंडित धोंडिरामांनी॥’ असा आहे. पुढं डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’चं दहन केलं, त्याचं हे पूर्वसूचन म्हणायला हरकत नाही.

जोतीरावांचे चेले असलेल्या धोंडीरामांना जोतीरावांचीसर्वच मतंमान्य होती, असंसमजायचंकारण नाही. तुकोबा वगळता इतर वारकरी संतांना मानायला जोतीराव तयार नव्हते.धोंडीराम मात्र या संतपरंपरेचे चाहते आहेत. धोंडीराम हिंदी भाषेतही कविता करत. त्यांचं एक हिंदी पद ‘वेदोचार’मध्येसमाविष्ट आहे. त्याचा समारोप लक्षणीय आहे.

सत्यशोधक धोंडिराम कहे पछानो इनको पुरे
क्योंत लगे हो नादमें बम्मन बहुरूपे ये सारे॥

वेद, वेदांच्या वेगवेगळ्या शाखा, यज्ञाचे विविध प्रकार, वेगवेगळे पुरोहित, विविध यज्ञ आणि त्यात विहित असलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या आहुती, वेदांचे भाष्यकार इ. गोष्टींची सूक्ष्म माहिती जमवताना धोंडिरामांना बरेच परिश्रम झाले असणार, यात शंका नाही.

जोतिरावांच्या ‘गुलामगिरी’मधले दुसरे संवादक हेच धोंडिराम असतील, तर त्यांनी जोतिरावांचं शिष्यत्व सार्थक केलं असंच म्हणावं लागतं. जोतिरावांची वेदसमीक्षा त्यांनी तार्किक टोकाला भिडवली. वेद अनादि आहेत ते खरं का, या सावंतांच्या प्रश्नाला धोंडिरामांनी दिलेलं अभंगात्मक उत्तर असं,

वेद आदिकाळादिचे।आम्ही वेदांच्या आदिचे॥
समाज सत्यशोधक। असेच वेदबाधक।
सत्य तेथे हो असत्य। वेद असत्य हे सत्य।
सत्यशोधक ही सभा । वेदांपूर्वी तिची प्रभा॥
गुरुज्ञान होत कृपे। वेदासह सर्व सोपे॥
वेद धोंडिरामापुढे। काय गरीब बापुडे॥

‘वेदाआधी तू होतास’ याही बाबूराव बागूल यांच्या कवितेशी नातं सांगणारा धोंडिरामांचा हा अभंग आहे.

बाबूराव बागूल हे अलीकडच्या काळातले कवी. पण संत परंपरेतल्या गोरा कुंभारांशी त्यांचं काही नातं होतं का? हा धागा मात्र नेमका जुळवता येत नाही. धोंडिराम कुंभार यांनी अभंग रचना केली. त्यातून स्वतःची वाट अधोरेखितही केली. त्यांचं मोठेपण त्यांच्या अभंगांतून व्यक्त होतं. ते उघडपणे गोरा कुंभार यांच्याच ज्ञातीतले आहेत. गोरा कुंभारांनी त्यांच्या ज्ञातीत जो आध्यात्मिक आणि धार्मिक अधिकार मिळवला, त्यावर ज्ञानेश्वरादी भावंडांसह सर्व संतमंडळाचं एकमत होतं. ते सर्वांचे स्नेही होते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चार भावंडांना तर त्यांचा मोठा आधार होता. त्यांचा अधिकार इतका मोठा होता की त्यांचं म्हणणं संतांच्या मांदियाळीत अंतिम आणि प्रमाण मानलं जायचं. संत मंडळींना तपासून पाहा, असं त्यांना सांगितलं जायचं. हे तपासणं प्रतीकात्मक आणि सांकेतिक असलं तरीही त्यांचा अधिकार सर्वमान्य होता, यात शंका नाही.

असाच अधिकार गोरा कुंभार यांच्या नंतर महाराष्ट्रातल्या कुंभार समाजातील व्यक्तींपैकी कुणी मिळवला, तर त्याचं उत्तर धोंडिराम कुंभार हे असू शकतं. पण दुर्दैवानं कुंभार समाजाच्या लोकांना त्यांनी मिळवलेल्या अधिकाराबाबत माहीत नाही. त्यांचं नाव फारसं पुढं आलेलं नाही. इतिहासाच्या अभ्यासकांपुरतंच ते मर्यादित राहिलं, ही वस्तुस्थितीही मान्य करावी लागते.

0 Shares
समाजाला घडवणारे संत वेदांपेक्षा जुनं कुंभारकाम