संत गोरा कुंभारांचे मोजके वीसेक अभंगच उपलब्ध आहेत. पण एकेक अभंग तगडा आहे. साध्या सोप्या शब्दांत त्यांनी अद्भुत तत्त्वज्ञान सांगितलंय. साध्या माणसांचं जगणं सोपं करण्याचं काम गोरोबांच्या अभंगांनी सातशे वषं केलंय.
प्राचीन ॠषीमुनी साधनेत असताना समाजापासून अलिप्तही रहात. पण संत मात्र समाजाच्या पातळीवर येऊन प्रबोधनाचा वसा आणि वारसा सांभाळत शेवटच्या श्वासापर्यंत केवळ समाजासाठी जगत राहिले. ‘बुडताहे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणुनिया॥’ अशी त्यांनी सर्वांना हाक दिली. कळवळ्यातून तळमळ निर्माण झाली आणि ती तळमळ शब्दरूपानं आसमंतात निनादली. ज्ञानदेवांपासून निळोबापर्यंत या संतांची एक साखळी निर्माण झाली. या सोनेरी साखळीपासून अनेक वैचारिक अलंकार बनत गेले. या अलंकारांनी महाराष्ट्राच्या विचार परंपरेला सजवलं. शब्दब्रह्माचा जागर, उत्तर आणि दक्षिण भारतातही उमटत राहिला. विशेषतः नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात उदयास आलेल्या संतमांदीयाळीनं हे पवित्र कार्य अतिशय अंतःकरणापासून केलं. याच संतमांदियाळीमध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ जुनेजाणते अधिकारी संत म्हणजे संत गोरा कुंभार. सगळ्या संतांचे आवडते गोरोबा काका.
गोरोबा काकांचं काय वर्णन करावं? संत नामदेवराय त्यांच्यासाठी ‘वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारू।’ असं संबोधन वापरतात. वैराग्याचा मेरू! ऐहिक सुख आणि लौकिकाचा मोह सोडून देतानाही ‘मी सोडलं’ याचा अभिमान असतोच. माणसं सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा सोडून देतात. पण ‘हे मी सोडलं’ हेच मोठेपणानं मिरवतात. हा असतो केवळ त्याग. पण हे सोडणं मन, बुद्धी, भावना यांच्यापासून होतं. ‘हे मी सोडलं’ हेही विसरलं जातं, तिथपासून वैराग्य सुरू होतं.
गोरोबा काकांना संत नामदेवराय, संत निळोबाराय त्यांना ‘वैराग्याचा मेरू’ संबोधतात. कारण काकांच्या अंतःकरणात या लौकिक गोष्टी शिल्लक राहिल्याच नव्हत्या. त्यांचं हृदय अलौकिक भक्तिप्रेमानंदानं भरून गेलं होतं. प्रेम भरलं जातं, तिथं ऐहिक भौतिक गोष्टींचं मूल्य संपतं. मनात हृदयात प्रेम भरून गेलं की आसमंतात सगळीकडे प्रेम दिसू लागतं. प्रेमोदय म्हणजेच तर भक्ती. काकांच्या आयुष्यातील अनेक विषयांमध्ये एवढा एकच शब्द वारंवार आढळून येतो, ‘प्रेम’.
संत एकनाथ महाराज लिहितात,
प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ ।
विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥
मृत्तिका भिजवी भाजना कारणे ।
प्रेमयुक्त नाचणे नाम मुखी ॥
नाथांना एका अभंगाच्या दोन चरणांमध्ये दोन वेळा प्रेम या शब्दाचा उल्लेख करावा लागला. गोरोबा काकांच्या अभंगरूप चरित्राची सुरुवात करतानाच नामदेव आपली भावना अनायास सांगून जातात.
प्रेम अंगी सदा वाचे भगवंत।
प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा॥
इथं तर एकाच चरणात दोन वेळा उल्लेख ‘प्रेम’ या शब्दाचा आहे. गोरोबा काका हे आपल्या एका अभंगात म्हणतात,
केशवाचे ध्यान धरूनि अंतरी ।
मृत्तिके माझारी नाचतसे॥
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ ।
नेत्री वाहे जळ सद्गदित॥
एवढं प्रेम की मातीमध्ये भजनानंदात बेहोश नाचताना ‘अंतरात केशवाचे ध्यान’ स्थित रहायचं. वारंवार विठ्ठलाचं स्मरण व्हायचं. तेव्हा कंठ दाटून यायचा, सद्गदित व्हायचा. डोळ्यातून प्रेमातिरेकाने अश्रूधारा वाहू लागायच्या. प्रेमच प्रेम. ते म्हणतात,
केशवाचे भेटी लागलेसे पिसे ।
विसरले कैसे देहभान ॥
झाली झडपाणी झाली झडपाणी ।
संचरले मनी अधीरूप ॥
विठ्ठलाच्या भेटीसाठी माझी पिसे लागल्यासारखी अवस्था झाली होती. माझं देहभान विसरलं गेलं होतं. देहातं मूल्य राहिलं नव्हतं. त्याच्या सावळ्या रूपाचा माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणात असा संचार झाला होता की मी झपाटला गेलो होतो. गोरोबा काकांनी स्वतःचं केलेलं वर्णन प्रेमच प्रेम दाखवणारं. म्हणूनच तर ‘पंढरीरायाचा प्रेमभांडारी’ असणार्या लडिवाळ भक्त नामदेवांना गोरोबा काकांच्या या प्रेमभक्तीपुढं नतमस्तक होऊन म्हणावं लागलं की,
नामदेव त्यासी करी विनवणी।
ठाव दया चरणी तुमचिया॥
हेचि तुम्ही आता मज द्यावे दान।
आठवीन गुण वारंवार॥
असे अधिकारी साधुपुरुष गोरोबा काका. ते जगलेच केवळ ‘जग हे करणे शहाणे बापा ।’ या आपल्या अनुभूतीपूर्ण ब्रीदवाक्यास सत्यात उतरवण्यासाठी. प्रतीक म्हणून नामदेवांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपल्या सगळ्यांनाच बोध दिला.
श्रवण नयन जिव्हा शुद्ध करी।
हरिनामे सोहंकारी सर्व काम॥
मग तुझा तूचि दिवटा होसीगा सुभटा।
मग जासील वैकुंठा हरिपाठे॥
परमार्थपथ म्हणजे वेगळं काही नाही, बाबांनो. जीवनमार्गावरून चालताना फक्त श्रवण, नयन, जिव्हा शुद्ध असू द्या. चांगलं ऐका, चांगलं पहा, जिभेनं चांगलं बोला. संतांनी आम्हाला परमार्थ सोपा करून दिलाय. आम्ही तोच विद्वत्ता प्रदर्शनासाठी कठीण करून सांगतो, लिहितो. ‘हरिनामे सोहंकारी सर्व काम’ म्हणजे सगळी कामं कर. ते तुझं कर्तव्य आहे. फक्त ते करताना प्रभुनामाचा संस्कार सोबत असू दे. मग ‘तुझा तुचि दिवटा होसिगा सुभटा।’ मग तुझा प्रकाशदीप तूच बनशील. तुझा मार्गदर्शक तूच होशील. साध्या साध्या शब्दात हे विशाल तत्त्वज्ञान गोरोबाकाका सहजपणे सांगून जातात.
समाजहिताच्या दृष्टीनं कठीण होतं ते सोपं करण्यासाठी संतांनी आपलं संपूर्ण जीवितकार्य घालवलं. संतांनी परमार्थही सोपा केला. संतांनी भक्तीही सोपी केली. आणि संतांनी भगवंतही आम्हाला पेलेल असा सुलभ करून दिला. पूर्वी देव म्हणजे अनेक नियम, बंधनं. दुरून दर्शन, स्पर्श नाही. संतांनी आम्हाला आमचा देव दिला. तो अनिर्बंध होता, ज्याला चरणस्पर्शच काय अगदी आलिंगनही देता येत होते. पूर्वी देवांना कमळपुष्पमाला, गुलाबपुष्पमाला. आमचा देव, तुळशीहार गळा. पूर्वी देवांना चंदनाचे लेप, आमच्या भाळी साधा बुक्का; जो चुलीतला कोळसा वाटून एखाद्या फडक्यातून चाळला तरी तयार होतो. या देवाचा आम्ही धारण करायचा अलंकारही सोपा, तुळशीची माळ. कुठं शोधण्याची गरज नाही, प्रत्येक अंगणात तुळस होती. तुझ्याकडं घोडागाडी नाही, तुला देवाकडं जायचयं. पंढरीची पायी वारी सांगितली. तुझं शरीर थकेल. तू वृद्ध होशील, तेव्हा तुला चालता यायचं नाही. मग ‘ठायीच बैसोनी करा एकचित्त।’ फक्त ‘आवडी अनंत आळवावा।’ देवासाठी काही कठीण सायास अट्टाहास करण्याची गरज नाही. इथं सगळं सोपं आहे. फक्त हवा आहे भाव. कारण देव भावाचा भुकेला, हाचि दुष्काळ तयाला.
गोरोबा काकांच्या अभंगातून गीतेचं दर्शन होतं. वेद-उपनिषदांचा स्पर्श घडतो. पुराणांशी संबंध जडतो आणि सुभाषितांशी संवाद होतो. ‘केशवाचे भेटी लागले पिसे।’ या अभंगात गोरोबाकाका म्हणतात, माझ्या हृदयात, मनात, अंतःकरणात तो येऊन स्थानापन्न झाला. आता मी ‘न लिंपेचि कर्मी न लिंपेचि धर्मि। न लिंपे गुणधर्मि पुण्यपापा॥’ तेव्हा आता मी कोणत्या कर्मात लिप्त होणार नाही. कर्म मला बांधू शकणार नाही. आता आम्ही कर्माच्या पुढं आलो. ते खूप मागं राहिलं. मी धर्मातही आता बद्ध नाही. गीताही उद्घोषणा करते, ‘सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज॥’ गोरोबा काका नमूद करतात, ‘न लिंपेचि धर्मी।’ धर्मही आमच्यासाठी लहान झालाय. उपनिषदांमध्ये धर्माची एक व्याख्या येते, ‘धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा। यतो धर्मस्ततो जयः॥’ धर्मामुळं जगात प्रतिष्ठा प्राप्त होते. जिथं धर्म असतो, तिथं विजय असतो. गोरोबा काका म्हणतात, धर्मामुळं प्रतिष्ठा मिळत असेलही, पण आम्हाला कुठं अपेक्षा आहे प्रतिष्ठेची तरी? धर्माच्या ठिकाणी विजयश्री असेलही, पण आम्ही जय-पराजयाच्या पुढं आहोत. पाप-पुण्याच्या गुणधर्माचा आता आम्हाला स्पर्शही होणार नाही. आता आम्हाला पाप-पुण्यंच राहिलं नाही.
म्हणून ‘म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त।’ मी जीवनमुक्त झालो, तेही अगदी सहज. जीवनमुक्तीसाठी आम्हाला अट्टहासच करावा लागला नाही. माऊली ज्ञानदेवांचा ‘स्थितप्रज्ञ’ म्हणजेच गोरोबा काकांचा जीवन्मुक्त! ही संतांची आत्मानुभूती होती, आत्मस्थिती होती; आणि जे सगळ्यातून मुक्त झाले, ज्यांनी जीवनमुक्त झाल्याची घोषणा केली. त्यांना आज आम्ही जातीधर्माच्या संकुचित चौकटीत बद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहोत. ते मुक्त होते. मुक्त आहेत. आमच्या बांधण्यानं ते बांधले जाणार नाहीत, पण आम्हाला हे कळलं पाहिजे की, आम्ही संतांना कुण्या एका जातिधर्मापुरतं मर्यादित करणं योग्य आहे?
गोरोबा काका एका अभंगात म्हणतात, ‘देवा तुझा मी कुंभार।’ मी कुंभार असेन पण त्याअगोदर मी तुझा आहे. तुझा असणं माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं. मी कुंभार त्यानंतर. तुकोबा म्हणाले, ‘यातायाती धर्म नाही विष्णुदासा । निर्णय तो ऐसा वेदशास्त्री॥’ गोरोबाकाका म्हणाले, ‘कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥’ माझं शरीर जन्मलं कुलालवंशात. पण माझी ओळख विचाराल तर ‘हरिभक्त’ हीच माझी ओळख आहे.
गोरोबा काकांच्या काही अभंगात शब्द साधे सरळ वाटतात, तरी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं ते आकाशाहूनही उत्तुंग आणि सागरापेक्षाही अथांग, सखोल आहेत. कदाचित यामुळंच कीर्तन प्रवचनातून निरूपणासाठी या अभंगांना क्वचितच घेतलं जातं. या अभंगांची भावगर्भितता एवढी अनाकलनीय आहे की, गोरोबा काकांच्या शब्दांचा खरा अर्थ गोरोबा काकांनाच माहीत!
गोरोबा काकांचे अभंग त्यांच्या अं:तकरणातली भक्ती घेऊन प्रकट होतात, तिथं सहज, सुलभ, प्रवाही वाटतात. पण काकांच्या चरित्रातलं वैराग्य, आचरणातील कठोर निष्ठा आणि संतपरीक्षकाचा गुणधर्म उमटतो, तिथं त्यांचे अभंग गंभीर, आशयघन होऊन जातात. नामदेवरायांना उद्देशून प्रकट झालेल्या अभंगांत हे प्रकर्षानं जाणवतं. उदाहरणार्थ,
एकमेकामाजी भाव एकविध ।
असे एक बोध भेदरहित॥
किंवा
स्थुल होते ते सूक्ष्म पै झाले ।
मन हे बुडाले महासुखी ॥
तसंच
वंदावे कवणाशी निंदावे कवणाशी ।
लिंपावे गगणशी कवण लिंपी ॥
गोरोबा काकांच्या अभंगांचं चिंतन खूप मोठं आहे. गोरोबा काका आपल्या अभंगात सगुण निगुर्णाची चर्चा करतात. गोरोबा काका आपल्या अभंगातून आत्मापरमात्मा याविषयी बोलताना दिसतात. ‘तू मज ओळखी तू मज ओळखी।’ ते जीव ब्रह्म ऐक्याविषयीही सांगताना आढळतात, ‘एकत्व पाहता अवघेचि लटिके । जे पाहे तितुके रूप तुझे ॥’ काका आपल्या अभंगातून एकच ईश्वरी चेतना असल्याचा संकेत देतात. एवढंच नाही, तर गोरोबा काका माया भ्रांतीविषयीही निवेदन करतात. तेच द्वैत-अद्वैताविषयी आपले विचार व्यक्त करतात. तसंच ते आपल्या अभंगात विदेही स्थितीबाबतची अनुभूती कथन करतात, ‘सरीतेचा ओघ सागरी आटला । विदेही भेटला मनामन ॥’ ते आपल्यातल्या गुह्य चैतन्याबाबतही मार्गदर्शन करतात. अनाहत नाद, सत्राविचे नीर, खेचरी मुद्रा अशा शब्दावरून त्यांची योगमार्गाच्या ज्ञातेपणाची साक्ष सहज पटते.
तरीही ‘म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे । जग हे करणे शहाणे बापा ॥’ या त्यांच्या शब्दांतून स्वतः जीवनमुक्त झाल्यानंतरही जगाविषयीची तळमळ दिसते. जनमानसाला शहाणे करण्यासाठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय जाणवतो. तेव्हा वैराग्यमहामेरू गोरोबा काकांची महत्ता शब्दातीत असल्याची साक्ष अंतःकरण देतं.
गोरोबा : एक मुक्तचिंतन निर्गुणाचे रूपडे सगुणाचे