वर्क इज वर्शिप

डॉ. सदानंद मोरे

संतांच्या वागण्यात उच्चनीचतेच्या भावनेला स्थान नाही. ही भावना कालांतरानं समाजात दृढ झाली. संत गोरा कुंभारांसह सर्वच संत मंडळींचं आपापसातलं नातं बंधुभावाचं होतं. त्यांच्या भगवंताशी असलेल्या नात्यातही हाच भाव व्यक्त होतो.

गोरोबा काका असा ज्यांचा गौरवानं उल्लेख होतो ते तेर गावाचे रहिवासी गोरोबा. ते कुंभाराचा व्यवसाय करत. मातीची मडकी घडवण्याचं काम करताना त्यांचं हरीनामचिंतन अखंड चालू असे. संतांच्या मांदियाळीत त्यांचा स्वत:चा अधिकार सर्वमान्य असल्यामुळं इतर संतांचा पारमार्थिक अधिकार ठरवण्याचं कामही त्यांच्याकडं सर्वानुमते सोपवलं जाई. त्यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते हेच.

वडीलकीच्या नात्यानं लोक त्यांच्याकडे पाहायचे. सल्ला मागायचे. गोरोबा हे सर्व संतांमध्ये वडील संत म्हणून परिचित होते. त्यांचे अभंग अगदी थोडे उपलब्ध आहेत. गोरोबांसह नरहरी सोनार, सावता माळी, सोपानकाका, मुक्ताबाई यांचेही थोडे थोडेच अभंग उपलब्ध आहेत. पण या संतांनी त्या काळात केलेली कामगिरी इतकी महत्त्वाची होती की लोकांच्या मनात ते रुतून राहिले. संतांच्या आयुष्यातल्या काही घटनांमुळं ते कथारूपानं समाजात चिरंजीव झालेले आहेत.

एकदा चिखल तुडवताना भजनात दंग झालेल्या गोरोबांनी पायाखाली आलेल्या तान्ह्या मुलालाही तुडवलं, अशी कथाही अजरामर आहे. या घटनेला कुणीही चांगलं म्हणणार नाही. पण तरीही या चमत्कार कथा आपल्याला एक ‘मोराल’ सांगतात. त्यातून काहीतरी संदेश मिळतो. या घटनेतून गोरोबांची त्यांच्या कामावर आणि नामावर असलेली निष्ठा दिसते. वारकरी संतांनी त्यांच्या कामातच ईश्वर पाहिला. काम करता करताच ते ईश्वराचं नाव घ्यायचे. काम सोडून भक्ती करा, असं ते म्हणत नव्हते. पण याच कामात माणूस इतका तल्लीन होतो की तो जग विसरून जातो. ‘वर्क इज वर्शिप’ हा त्यातला महत्त्वाचा संदेश या कथेतून घेता येईल. या त्या अर्थानं संस्कृती कथा आहेत. या दृष्टिकोनातून त्याकडं पाहायला हवं. एका विशिष्ट पातळीवर या कथा नीतीकथाही बनतात.

गोरोबा काकांच्या तीन अभंगांतून त्यांच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाकडं पाहता येतं. त्यातला पहिला अभंग,

केशवाचे ध्यान धरुनि अंतरी ।
मृत्तिकेमाझरी नाचतसे ॥
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळी ।
नेत्री वाहे जळ सदगदित ॥
कुल्लाळाचे वंशी जन्मले शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्त ॥

गोरोबांनी कुंभार जातीत जन्म घेतला होता. मातीची मडकी आणि इतर वस्तू घडवणं हा या जातीचा परंपरागत व्यवसाय होता. तुकाराम महाराजांच्या अभंगात ‘घडा माती वाहे गोरा कुंभाराची’ असा उल्लेख आहे. याचे दोन अर्थ सांगता येतात. पहिला, देवाच्या दृष्टिकोनातून श्रमाला सुद्धा एक प्रतिष्ठा आहे. दुसरा, परमात्म्याच्या दृष्टिकोनातून एक भक्त एखादा व्यवसाय करतो म्हणून तो मोठा. किंवा दुसरा एखादा भक्त दुसरा एखादा व्यवसाय करतो म्हणून तो कनिष्ठ, असं नाही.

आपल्याकडं जात आणि व्यवसाय एकत्र आले. जातिव्यवस्थेत केवळ श्रमांची विभागणी होण्याऐवजी श्रमिकांची विभागणी होऊन तिच्यात उच्चनीच भाव शिरला आणि त्यामुळं अनेकांवर अन्याय झाला. त्यांना वेगवेगळ्या भौतिक आणि आध्यात्मिक लाभांपासून, अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं. प्रत्यक्षात देवाकडे आणि संतांकडे उच्चनीच भेदभाव नाही. हे आणखी स्पष्ट करून सांगता येईल.

‘आला भागासी तो करी व्यवसाव । परी राहो भाव तुझ्यापायी॥’ अशी आध्यात्मिक भूमिका संतांनी सिद्ध केलीय. स्वत:च्या उपजीविकेसाठी आणि समाजाच्या धारणेसाठी काही कर्म करावी लागतात. ती करताना कोणत्याही प्रकारचा गंड न बाळगता परमात्म्याची भक्ती करायची. या भक्तीसाठी पोथ्यापुराणांची, उपकरणांची उच्चवर्णीय उपदेशकाची गरज नाही. अध्यात्म आणि धर्म या गोष्टी केवळ मानसिक आहेत.

‘मनोमय पूजा । हेचि आवडे पंढरीराजा ॥’

गोरोबाकाका या अभंगातून हेच स्पष्ट करतात, ‘मी कुंभाराच्या कुळात जन्म घेतला, तो शरीर या पंचमहाभौतिक वस्तूच्या रूपानं. त्यामुळं भौतिक पातळीवर कुंभाराचाच व्यवसाय करावा लागणार, हे उघड आहे. परंतु मी भक्त होण्याचा, हरिभक्ती करण्याचा निर्णय घेतला.’

भक्ती ही मानसिक बाब असून, संतांनी तिला ज्ञान आणि कर्म या मार्गांप्रमाणं जातिपातींची अट घातलेली नाही वा अडसरही ठेवलेला नाही. त्यामुळं ‘मी माझ्या शरीरानं माझं कार्य करत असताना माझ्या भक्तीच्या व्यवहारात खंड पडत नाही. मातीच्या वस्तू बनताना तिला आकार द्यावा लागतो. त्यासाठी ती हाताळण्याजोगी मऊ बनवावी लागते. तिच्यात पाणी घालून चिखलाचा गारा करून तो तुडवावा लागतो’,अशी गोरोबांची भूमिका आहे. त्यामुळंच गोरोबांचं चिखल तुडवणं हे भजनाचं नृत्य व्हायचं. हृदयात विठ्ठलध्यान आणि मुखानं विठ्ठलनाम घेत ते त्या रंगात नाचू लागत. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत.

मुकिया साखर चाखाया दिधली ।
बोलता हे बोली बोलवेना ॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद ।
आपुला आनंद आधाराया ॥
आनंदी आनंद गिळोनी राहाणे ।
अखंडित होणे न होतिया ॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणे ।
जग हे शहाणे करणे बापा ॥

परमात्मा विठ्ठलाच्या भक्तीमुळं जी अवस्था प्राप्त झाली, जी उच्च कोटीची आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झाली. तिचं वर्णन करायला जावं तर त्यासाठी शब्दच सापडू नयेत, भाषा अपुरी पडावी असा अनुभव संतांना आला आणि तोही त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केला. ‘काय सांगो झाले काहीचिया बाही’ हे तुकोबांचं वचनही शब्दांची मर्यादा सूचित करणारं आहे.

गोरोबांनी जी अवस्था प्राप्त केली, तिला अध्यात्मशास्त्रात ‘जीवनमुक्ती’ असं म्हटलं जातं. या अवस्थेत जो आनंद मिळतो, तो वाचेनं सांगायला गेलं तर मुक्या माणसानं साखर खावी आणि त्याला ती खूप गोड लागावी, आवडावी; पण तो मुका असल्यानं त्याला त्या अनुभवाचं वर्णन करता येऊ नये तसा काहीसा प्रकार गोरोबांच्या बाबतीत घडला. म्हणजे बोलता येत असूनही त्यांना मुक्याप्रमाणं मौन व्हावं लागलं. इथं त्यांचा शब्दच खुंटला, अनुवाद करणं अशक्य झालं. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असं तुकोबांनी म्हटलं आहे. त्याच धर्तीवर ‘आनंदी आनंद गिळोनी राहाणे’ असं गोरोबा सांगतात.

जीव हा एकदेशी म्हणजेच खंडित आहे. तो कोणीच नाही. त्याचं अस्तित्त्व नगण्य आहे. पण गोरोबा आता ज्या मुक्तावस्थेत आहेत, त्यात हा एकदेशीपणा संपुष्टात येऊन ते परब्रम्हाप्रमाणंच व्यापक आणि अखंड झाले आहेत.

गोरोबांसारखी अवस्था झालेल्या अनेकांना हीच जीवनाची इतिकर्तव्यता, हाच परमपुरुषार्थ यापलीकडं काही मिळवायचं नाही, काही करायचंही नाही, असं वाटतं. गोरोबा आणि त्यांच्या सुहृद संतांच्या बाबतीत असं घडत नाही. आपण जिथं पोचलो आहोत तिथं सर्वांनी पोचावं, आपल्याला झालेला लाभ सर्वांना व्हावा असं त्यांना वाटतं, ‘सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोवती तरुवर चंदन करतिचि जाये ॥’ या एकनाथोक्तीप्रमाणं सर्व जगाला शहाणं करावं असं त्यांना वाटतं आणि त्यासाठी ते झटतात.

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तव झालो प्रसंगे गुणातीत॥
मज रूप नाही नाव सांगू काई ।
झाला बाई काई बोलू नये ॥
बोलता आपली जेव्हा पै खादली ।
खेचरी लागली पाहता पाहता ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली केसी ॥

संत नामदेवरायांच्या अधिकाराची ग्वाही देणारा हा गोरोबा काकांचा अभंग आहे. तेराव्या शतकातील साधुसंतांचे एकमेकांशी कसे हृद्य संबंध होते, याची जाणीवही या अभंगातून होते.

गोरोबा काकांनी नामदेवरायांच्या मस्तकावर थापटणं मारत त्यांची परीक्षा घेतली आणि त्यांचं मडकं कच्चं ठरवलं, अशी एक कथा प्रचलित आहे. या कथेच्या सत्यत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा अभंग आहे.

परमार्थ मार्गात परमात्म्याच्या निर्गुण निराकार रूपाची महती सांगण्यात येत असते. वारकरी संप्रदायात सगुणनिर्गुणाचा भेदच मिटवण्यात आला आहे. सगुणाची उपासना करता-करता मला सहजच निराकाराचं ज्ञान झालं आणि मी सत्व, रज आणि तम गुणांच्या म्हणजे प्रकृतीच्या पलीकडं पोचलो, असं गोरोबा सांगतात. या अवस्थेचं वर्णन शब्दांनी करणंसुद्धा अवघड असल्याचं ते म्हणतात. खेचरी नावाची योगसाधनेमधील एक कठीण मुद्रा आहे. तिचा अनुभव त्यांना आला. उपमा देऊन झाल्यास सांगायचं झाल्यास बोलता-बोलता आपली जीभ आपणच खाऊन टाकली तर ती खाताना अनुभवलेल्या चवीचं वर्णन आपण करू शकणार नाही. तसा काहीसा हा प्रकार आहे.

आता यात नामदेवरायांचा संबंध कुठं येतो? नामदेव हे सगुणोपासनेसाठी प्रसिद्ध होते. निर्गुणाच्या आहारी न जाता सगुणभक्ती कशी टिकवायची याची हातोटी त्यांना साधली होती. गोरोबा म्हणतात की, सगुण निर्गुणाची सुखानुभूती नामदेवांमुळं शक्य झाली. निर्गुणोपासनेसाठी सगुणाचा त्याग करायची आवश्यकता नसल्याची खातरी पटली. ‘तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुणनिर्गुण एक गोविंदु रे ॥’ या ज्ञानदेवांच्या उक्तीचा अनुभव नामदेवांमुळं येतो हा इत्यर्थ. भक्तीमार्गात सांगितल्या जाणार्‍या सगुण-निर्गुणाची देव-घेव या दोन संतांमध्ये झालेली आहे. आपल्याकडेच सगळ्या गोष्टी असतात असं नाही. जे नाही, ते त्यानं दुसर्‍याकडून घ्यावं, हा गुण आपल्याला संतांमध्ये दिसून येतो. संतांनी दाखवलेला हा बंधुभाव लक्षात घेतला पाहिजे.

0 Shares
कालातीत एकाग्रता माटी कहे कुम्हारसे