‘आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला’, अशी करुण विनवणी करणार्या जनाबाईंना देवानं म्हणजेच पंढरपुरानं सांभाळलं. या भूलोकीच्या वैकुंठात काबाडकष्ट करत जनाबाई संतपदाला पोहोचल्या. वारकरी विचारांना वेगळ्या उंचीवर नेणार्या या माऊलीच्या पाऊलखुणा तिच्या या कर्मभूमीत सापडतात का, त्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
काही तरी वेगळाच अनुभव होता तो. मुलंच मुलं. लहान. मोठी. तान्ही. पाळण्यातली. रांगणारी. चालणारी. जेवणारी. रांगेत उभी राहिलेली. अनोळखी नजरेनं बघणारी. ओळखीचं हसणारी. वासरासारखी जवळ येणारी. त्यांचा किलबिलाट, त्यांचा तो स्पर्श, लक्षातूनच जात नाही. त्यांच्यात एक मोठं गोड तान्हुलं होतं. काही दिवसांचं, पण अंध. म्हणून आईबापानं टाकून दिलेलं… मला माझा मुलगा आठवला. गहिवरून आलं. मला असं कधी झालं नव्हतं. पंढरपुरात येऊन अनेकदा विठोबाचं दर्शन घेतलंय. त्यावेळीही असं ‘आतून काही तरी हलल्याचं’ जाणवलं नव्हतं. गाडगेबाबा म्हणायचे, ‘देव दगडात नाही, तर माणसात असतो’. त्याची प्रचितीच आली. संत जनाबाईंच्या कर्मभूमीत अर्थात पंढरपुरात जनाबाईंचा शोध घ्यायला गेलो होतो. तर तिथं हा नवरंगे बालकाश्रम दिसला. दोन मजली दगडी इमारत. येणार्या अनाथाला बाहू पसरून कवेत घेण्यासाठी १८५७ पासून उभी आहे. लोखंडी निळ्या गेटला एक तीन फुटांचा छोटा दरवाजा. मंदिराच्या गाभार्याच्या दरवाज्यासारखा. देवासमोर वाकून, नम्र होऊन जावं, हा या छोट्या दरवाज्यांचा उद्देश. मीही ‘देवाघरच्या फुलांना’च भेटायला जात होतो!
मुंबईच्या प्रार्थना समाजाकडून चालवल्या जाणार्या या अनाथाश्रमात सध्या चाळीस तान्ही बाळं, सव्वाशे मुलं-मुली, पंचवीसेक निराधार महिलांना आधार मिळालाय. त्यांच्या अनाथ होण्याची कारणंही अनेक. घटस्फोट, अनौरस, गरिबी, पालकांचा मृत्यू, नवरा किंवा मुलांनी वार्यावर सोडलेल्या महिला. त्यांच्या संख्येत रोजच वाढ होतेय. सर्वांना इथं सावली मिळते. साठीचे शिडशिडीत वासुदेव दर्शनेकाका आश्रमाचे कार्यकारी अधिकारी. ते माहिती देत होते. म्हणाले ‘पांडुरंगाच्या कृपेनं समाजात दानशूर आहेत म्हणून चाल्लंय सगळं’.
मी नुकताच रितेश देशमुख यांचा ‘लई भारी’ सिनेमा पाहिला होता. त्याचा पगडा मनावर होता. आई मुलाला पांडुरंगाच्या पायावर वाहते आणि तो निराधार मुलगा पंढरपुरात वाढतो, अशी स्टोरी. तसल्या प्रथेतूनच या बालकाश्रमाची निर्मिती झाली का, असं दर्शनेकाकांना विचारलं, तर त्यांनी वेगळीच गोष्ट सांगितली. म्हणाले, ‘ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पंढरपुरात लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी नावाचे एक न्यायाधीश राहत होते. एके दिवशी संध्याकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात फिरत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. खाली वाकून पाहिलं तर एका कपड्यात गुंडाळलेलं अर्भक. त्याला ते घरी घेऊन गेले. सांभाळलं. अशा इतर अनाथांनाही आपण सांभाळलं पाहिजे, असं त्यांच्या मनात आलं आणि ही संस्था उभी राहिली. सध्या मुंबईचा प्रार्थना समाज संस्थेची देखभाल करतो. मुलं मोठी झाल्यावर त्यांना मुंबईत शिक्षणासाठी पाठवलं जातं.’
आमचं बोलणं सुरू असताना एक लहानगी येऊन हळूच बिलगली. मला आत्तापर्यंत वाचलेली बाल जनाई आठवली. तिच्या मायबापानं तिला असंच पंढरपुरात सोडून दिलं होतं. अनाथपण सोसत या जनाबाई संतपदाला पोचल्या. पंढरपूरभर त्यांच्या पाऊलखुणा शोधायच्या होत्या. म्हणून त्या चिमुकलीच्या डोक्यावरून हात फिरवत आश्रम सोडला.
जनाबाईंच्या मंदिराकडं निघालो. विठ्ठल मंदिरापासून २०० मीटरवरील टेकडीवजा उंचवट्यावर एका भव्य वाड्यात हे संत नामदेव आणि जनाबाईंचं मंदिर आहे. चंद्रभागेकडं जाण्यासाठी अनेक गल्ल्या ओलांडून गेल्यावर तो पेशवेकालीन वाडा लागला. त्याचा मुख्य सभामंडप १५ फूट उंच चबुतर्यावर आहे. त्यात श्री विठ्ठल मंदिर आहे. चंद्रभागेच्या पुराखाली सगळं पंढरपूर गेलं तरी उंचीमुळं विठ्ठल मंदिर, नामदेव मंदिर आणि हरिदास टेकडी पाण्याखाली जात नाही. वाड्यात प्रवेश केल्यावर लगेचच नव्या बांधणीचं एक मंदिर दिसलं. तेच संत नामदेव आणि जनाबाईंचं मंदिर. शनिवारवाडा जळाल्यानंतर उरलेल्या लाकडांतून या वाड्याची बांधणी केल्याचं समजलं. जनाबाई याच ठिकाणी राहत होत्या, वावरत होत्या, काम करत होत्या, असं सांगण्यात आलं. मंदिरासमोरच्या बाकड्यावर नामदेव महाराजांचे १६वे वंशज केशव महाराज नामदेव महाराज नामदास आमची वाट पाहत बसले होते. कपाळाला गंध, उपरणं, अंगात कोपरी, धोतर. मृदूभाषी व्यक्तिमत्त्व. ते आम्हाला मुख्य सभामंडपातील विठ्ठल मंदिरात घेऊन गेले. मंदिराच्या एका कोपर्यात आम्ही जनाबाईंबद्दल जाणून घेण्यासाठी नामदास महाराजांसमोर बसलो. जनाबाई आणि नामदेव यांची भेट कशी झाली, याची एक वेगळीच कहाणी नामदास महाराजांकडून ऐकायला मिळाली. ते म्हणाले, ‘जनाबाईंचे आई-वडील वारकरी होते. आषाढी एकादशीला पंढरपूरला आलेल्या जनाबाईंना देवाचा साक्षात्कार झाला की, आता पंढरपूर सोडून जायचं नाही. याच वेळी मंदिरात नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तनानंतर जनाबाईंनी नामदेवांना विनंती केली की, मला तुमची दासी करून घ्या. मुलीचा हट्ट आई-वडिलांनीही पुरवला आणि तिला नामदेवांच्या घरी सोडून ते पुन्हा गंगाखेडला निघून गेले.’
आमचं बोलणं सुरू असताना तिथं पंढरपूरचे नगरशेठ यांचे वंशज महेश कवठेकर आले. त्यांच्या पूर्वजांकडे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा खजिना सांभाळण्यास होता. विषय जनाबाईंच्या जातीचा निघाला. कवठेकर मूळचे मराठवाड्यातले. ते म्हणाले, ‘गंगाखेडचे म्हणजे जनाबाईंच्या गावचे. जनाबाई या धनगर समाजाच्या होत्या, असं अनेक जण मानतात. त्यांची पूजा करतात. जनाबाईंचे वडील धनगर समाजाच्या व्यक्तीकडे दास होते. त्यामुळं जनाबाई आणि त्यांच्या कुटुंबाला धनगर जात लावण्यात आली. अर्थात त्याला पुरावा नाही. जनाबाई नरसी बामणीला गेल्याच नाहीत. नामदेवांचा जन्म पंढरपुरातलाच’, असं सांगत कवठेकरांनी त्यासाठी काही अभंगांचे दाखलेही दिले.
जनाबाईंचं आयुष्य पंढरपुरात गेलं म्हणतात, मग जनाबाईंच्या इथं काय स्मृती आहेत, असं नामदासमहाराजांना विचारता, ते म्हणाले, पंढरपुरात जनाबाईंचा मठ नाही. नामदेवमहाराज मंदिरात त्यांची एक मूर्ती आहे आणि एक गोपाळपुरात. बाकी काही विशेष नाही. अनेक पंढरपूरकरांनीही हेच सांगितलं.
पंढरपूरहून चारेक किलोमीटरवरील गोपाळपुरा इथं जनाबाईंचा संसार दाखवतात, पण ते काही खरं नाही, असं सांगत नामदास महाराज म्हणाले, ‘गोपाळपुरा आणि विष्णूपद या ठिकाणी जनाबाई शेणी म्हणजे गोवर्या वेचायला जायच्या, एवढाच उल्लेख त्यांच्या अभंगात आहे. जनाबाई आणि दामाशेटी गोपाळपुरात राहत होते, या गोपाळपुरातील लोकांच्या म्हणण्याला काही पुरावा नाही.’ जनाबाई पंढरपुरात नामदेव मंदिरात राहत होत्या याला पुरावा आहे. गोपाळपुर्यातील गुरव हे नामदेवांचे शिष्य होते. कालांतरानं आणि काही अडचणी आल्या म्हणून जनाबाईंशी संबंधीत काही गोष्टी त्यांच्या ताब्यात गेल्या. त्यांनी त्या तिथं मांडल्या, असं कवठेकरांनी सांगितलं.
गोपाळपुर्यात आज जो दगडी वाडा दिसतो, ती पूर्वी गढी होती. ती पुष्पावती नदीकाठावर दीडशे वर्षांपूर्वी बांधली गेली. आता पुष्पावती नदी लोप पावली आहे. गोपाळपुर्याजवळील सध्याचा जुना पूल हा नाल्यावर नसून, तो जुन्या पुष्पावती नदीवर असल्याचं कवठेकर म्हणाले. मग गोपाळपुर्यात जनाबाईंचा संसार दाखविण्यात येतो, ते काय आहे, असं विचारता नामदास महाराज म्हणाले, ‘पंढरपुरात पैसे काढण्यासाठी वाट्टेल ती देवस्थानं दाखवली जातात. अशी अनेक मंदिरं उभारण्यात आली आहेत. वारीच्या काळात भाविक गोपाळपुरात जातात. त्यांना दाखवण्यासाठी ते सगळं तयार करण्यात आलं आहे. जनाबाईंचं या मंदिरात काहीही नाही. जनाबाईंचं स्वतंत्र असं चरित्र नाही. नामदेवरायांच्या आयुष्याशी त्या एकरूप होऊन गेल्या होत्या. नामदेवराय विठ्ठलाचे भक्त आणि जनाबाई नामदेवरायांच्या भक्त. त्यामुळं स्वतः विठ्ठल जनाबाईंच्या मदतीला यायचा. विठ्ठल मला का भेटला, तर मी नामयाची सेवा केली म्हणून, असं जनाबाईंनीच लिहून ठेवलंय. जनाबाईंसोबत विठ्ठल कामं करायचा, दळण दळायचा, शेणी वेचायचा यांवर आजच्या युगात विश्वास ठेवला जात नाही. श्रद्धा ठेवली तर आहे, नाही तर नाही..,’ असं नामदास महाराज उद्गारले.
गप्पा आटोपल्यानंतर नामदास महाराजांसोबत नामदेव मंदिराचा फेरफटका मारण्यास निघालो. त्यावेळी विठ्ठलाची सायंकाळची आरती सुरू होती. आरतीत परकर-पोलकं घातलेली एक मुलगी उभी होती. अनाथ असावी. पुन्हा बाल जनाबाई आठवल्या! मंदिरात संत जनाबाई आणि नामदेवांच्या जीवनाशी निगडीत काही प्रसंग मुख्य गाभार्याच्या दरवाज्यावर संगमरवरी मूर्तींमध्ये कोरले आहेत. त्यात जनाबाईंसोबत पांडुरंग दळण दळतो आहे. नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग डोलत असल्याचं दाखवलं आहे. वाड्याची भटकंती झाल्यानंतर बाहेरच्या नामदेव मंदिरात जाऊन नामदेव आणि जनाबाईंचं दर्शन घेतलं. पंढरपुरात आल्यापासून पहिल्यांदा जनाबाई दिसल्या. मंदिरातील काळ्या पाषाणमूर्तीच्या रूपात. अर्थात मंदिरात मुख्य मूर्ती नामदेवांची आहे तर डाव्या हाताला ही जनाबाईंची पुरातन मूर्ती आहे. ही मूर्ती किती वर्ष जुनी आहेत, हे कोणाला माहीत नाही. नवीन नामदेव मंदिर बांधण्यापूर्वी ही मूर्ती मुख्य मंदिराच्या कोपर्याला एका कोनाडावजा देवळात होती. सुमारे १४० वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तेव्हा ती मूर्ती तेथून काढून नामदेव मंदिरात आणल्याचं नामदास महाराजांनी सांगितलं. आता त्या कोनाड्यात शंकराची पिंड असून, ते मंदिर शंकराचं झालं आहे.
तिथून निघताना मनात आलं, मोठ्या वृक्षाखाली छोटं झाड तग धरत नाही. या ठिकाणी तर दोन मोठे वटवृक्ष. एक खुद्द पांडुरंग आणि दुसरा त्याचा लाडका भक्त नामदेव. अशा ठिकाणी एका स्त्रीला, दासीला कुठून महत्त्व मिळणार? अर्थात मंदिरातून बाहेर पडताना मन प्रसन्न होतं. लोकमानसात रुजून बसलेल्या महाराष्ट्रातल्या थोर कवयित्रीच्या प्रतिभेला याच जागेवर धुमारे फुटले. याच ठिकाणी तिनं शेकडो अभंग रचले. अज्ञानात बुडालेल्या समाजाला दिशा दिली. जनाबाईंच्या या भूमीला आपण भेट दिली. त्यांच्या मूर्तीसमोर माथा टेकवता आला, याचं समाधान तुडुंब होतं. आता पाहायचा होता, गोपाळपुरा…
दुसर्या दिवशी भल्या सकाळीच गोपाळपुरा गाठला. शहरापासून गोपाळपुरा चार किलोमीटरवर. रस्त्यानं नवबौद्ध वस्ती लागली. मुस्लिम वस्तीही दिसली. मग हिरवीगार शेती सुरू झाली. पूल लागला. त्यावरूनच एक छोटा किल्लावजा टेकडी दिसली. त्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचला. तिथं एक छोटं मंदिर होतं आणि एक मोठा दगडी डेरा. जनाबाईंचा ताकाचा डेरा. डेर्याजवळ अनेक भाविक उभे होते. आम्हीही तिथं गेलो. फोटो काढले. त्या दगडी डेर्याला पितळी आवरण होतं. त्यात एक भली मोठी सजवलेली काठी. काठीला दोरी बांधलेली.
सावळ्या ये रे बा पांडुरंगा|
सावळ्या रामाच्या ढवळ्या गायी॥
असे अभंग म्हणत तिथला गुरव एकेका भाविकाला त्या दोरीनं डेर्यातील पाणी घुसळायला सांगायचा. मग दक्षिणा देण्याचं आवाहन करायचा. अनेक वर्षांपासून त्या छोट्या मंदिराची आणि जनाबाईंच्या डेर्याची सेवा इथली गुरव मंडळी करतात. त्यातील एक दत्तात्रय गुरव म्हणाले, ‘जनाबाईंनी भक्तीच्या जोरावर पाण्यातून लोणी काढलं होतं. ते लोणी पांडुरंगानं खाल्लं आणि नंतर त्या पाण्याचं तूप झालं. हा डेरा ७०० वर्षांपूर्वीचा आहे आणि हे मंदिर पांडुरंगाच्याही पूर्वीचं आहे!’ गुरवांनी संत नामदेव आणि जनाबाईंच्या भेटीची एक आख्यायिका सांगितली. ‘पूर्वी गोपाळपूर म्हणजे दिंडीरवन होतं. इथं नामदेव राहत होते. नामदेवांचे वडील दामूशेटी मोळ्या विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गोपाळपुरातून दररोज ते विठ्ठलाला नेवैद्य घेऊन जात. एके दिवशी ते बाहेर गावी गेले असल्याने देवाला नैवेद्य देण्याची वेळ नामदेवांवर आली. त्यावेळी त्यांना देवाचा दृष्टांत झाला. ‘जनाबाई नावाची मुलगी मंदिरात रडत बसली आहे. तू तिचा दासी, बहीण म्हणून सांभाळ कर.’ नामदेव लगोलग मंदिरात गेले, तर त्यांना रडणारी जनाई भेटली! नामदेवांमुळंच जनाबाईंना भक्तीची गोडी लागली. नामदेवांना भेटायला संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तुकाराम महाराज, संत गजानन बाबा या ठिकाणी आले.’ गुरवबाबांनी बाराव्या, सोळाव्या शतकातील संतांना नामदेवरायांना भेटायला एकत्र आणलं होतं. मी काही हरकत घेतली नाही. बाबा पुढं सांगत राहिले. ‘आषाढी वारीनंतर गोपाळपुरात सर्व वारकर्यांचा काला होतो. त्यानंतरच सर्व पालख्या गोपाळपुरातून माघारी जातात, असं गोपाळपूरचं महत्त्व आहे.’ गोपाळपुर्यात गुरवांची सुमारे ४० घरं आहेत. त्यातील काही जण नोकरी, व्यवसाय, शेती करतात. ‘जनाबाईंच्या संसाराच्या देखभालीसाठी भाविकांकडून आम्ही दोन-पाच रुपये मागून घेतो. त्यातूनच मंदिराचा कारभार चालतो. भक्त देईल त्यावरच हे मंदिर चालवतो. त्यातून काही उरलं तर ते आमच्या पोटाला’, असं गुरवबाबांनी सांगितलं.
पुढं ते सांगत राहिले. ‘आमचे आजोबा १०८ वर्षांचे होऊन वारले. त्यांनी सांगितलं होतं की, जनाबाई या वंजारी समाजाच्या होत्या. त्यामुळं आम्हीही त्यांना वंजारी समाजाच्या मानतो.’ गप्पा झाल्यावर मीही जनाबाईंच्या डेर्यातलं पाणी घुसळलं. गुरवांनी नेहमीचा अभंग म्हटला. मग आम्ही मोर्चा मुख्य टेकडीकडं म्हणजे गोपाळपुर्यातील त्या ऐतिहासिक दगडी वाड्याकडं वळवला. सुमारे ५० मीटरची चढण आहे. तिथं दुचाकी किंवा कार घेऊन जाता येतं. दुसर्या बाजूला १००-१५० पायर्यांची वाट आहे. २० ते २५ फूट उंचीची तटबंदी असलेला तो वाडा भव्य वाटला. प्रवेश केल्यावर तर जेजुरी गडावर आल्यासारखंच वाटलं. वाड्याचं बांधकामही तसंच. गोपाळपुरात प्रवेश करण्यासाठी एक पूल आहे. तो पूल आणि हा वाडा हैदराबादचा राजा नामदेवरायानं १८६९मध्ये बांधून दिला आहे. तसं सांगणारा संस्कृत, उर्दू, कानडी, तेलगू आणि इंग्रजी भाषेतला शिलालेख पुलाच्या मध्यभागी लावलेला आहे. वाड्यात मध्यभागी गोपाळकृष्णाचं मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाप्रमाणंच मूर्ती, पण बासरी वाजविणारा, डोक्याला मोराची पिसं लावलेला देव. श्रीकृष्णाचंच रूप. विठ्ठल मंदिरातील बडव्यांप्रमाणं इथं गुरव आहेत. तेही भाविकांकडून पैशांची मागणी करतात. मला जनाबाईंचा संसार पाहायचा होता. गढीवर गेल्यावर तिथं कमलाकर गुरव भेटले. त्यांनी मला सर्व ठिकाणांवर फिरवत सविस्तर माहिती दिली. गोपाळकाल्याचा हंडा दाखवून आषाढी एकादशी झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या इथंच येऊन गोपाळकाला करतात, असं सांगितलं. हंड्यापासून उजव्या बाजूच्या तटबंदीला लागून काही खोल्या बांधलेल्या आहेत. त्या खोल्या म्हणजे वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत. त्याच रांगेत ‘संत जनाबाईंचा संसार’ असं लिहिलेली खोली होती. आत गेलो. तिथं दगडाच्या मडक्यांच्या पाच उतरंडी होत्या. भाकरी ठेवण्याचं दगडी टोपलं, चूल होती. त्या सगळ्यांवर हळद, कुंकू वाहिलं होता. फुलांच्या माळा होत्या. पैसे टाकलेले होते. पाच फूट उंच दगडी चौथर्यावर हे सर्व ठेवलेलं होतं. वर भिंतीवर जनाबाई आणि विठ्ठलाची चित्रं होती. दुसर्या एका खोलीत जनाबाईंचं जातं होतं. त्याला पितळी आवरण घातलं होतं. जात्यामागं आरसा होता. येणारा भाविक जातं फिरवतो आणि गुरवांना दक्षिणा देऊन जातो. तिथं एक भुयारी मार्गही आहे. त्यात दक्षिणा टाकल्याशिवाय जाता येत नाही. तिथं पांडुरंग आणि जनाबाई यांची मूर्ती आहे. जनाबाई रुसून आल्यानंतर या भुयारात बसल्या होत्या. त्यावेळी पांडुरंगानं त्यांची विनवणी केली, अशी अख्यायिका ऐकायला मिळाली. खाली दहा फूट खोल एक खोली आहे. तिथं जाण्यासाठी एक चिंचोळा दरवाजा आहे. आठ-दहा पायर्या खाली गेल्यावर एक छोटी खोली आहे. त्या खोलीच्या डाव्या हाताला एक न्हाणीघर आहे. दुसर्या बाजूला जनाबाई आणि पांडुरंगाच्या मूर्ती आहेत. जनाबाईंच्या मूर्तीला साडी गुंडाळली आहे. अष्टगंध आणि कुंकू लावलं आहे. गळ्यात फुलांची माळ आणि पायाजवळ पैसे पडलेले होते. विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यातही तशीच फुलांची माळ, कमरेला धोतर, डोक्यावर चांदीचा मुकूट होता. मंदिरातील सर्व मूर्ती दाक्षिणात्य पद्धतीच्या आहेत. राजा नामदेवरायानं वाड्याचा जीर्णोद्धार केल्याचा तो प्रभाव असावा. भुयारातील अंधारात वीजेचा एक छोटासा दिवा होता. त्याच्या प्रकाशात फक्त त्या दोन मूर्ती दिसत होत्या. बाकी अंधार.
मंदिराचं दर्शन घडविणार्या कमलाकर गुरवांनी गोपाळपूरची आख्यायिका सांगितली. ‘गोपाळपूर हे पंढरपूरच्या आधीचं ठिकाण. भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून या ठिकाणी आले होते. द्वारकेत वास्तव्य करणार्या श्रीकृष्ण भगवंताला १६ हजार १०८ बायका होत्या. त्यापैकी रुख्मिणीसह आठ मुख्य राण्या होत्या. भगवंताच्या मांडीवर कोणी राणी बसली असेल आणि त्याचवेळी रुख्मिणी आली की, ती राणी उठून जात असे. एकदा इंद्राची पत्नी शची हिनं श्रीकृष्णाची तपश्चर्या केली. ती राधेच्या रूपानं आली. सिंहासनावर बसलेल्या श्रीकृष्णाच्या मांडीवर जाऊन बसली. तेवढ्यात रुख्मिणी त्या ठिकाणी आली, पण राधा कृष्णाच्या मांडीवरून उठली नाही. रुख्मिणीला राग आला आणि ती पंढरपुरातील दिंडीरवनात येऊन रूसून बसली. रुख्मिणी रुसण्याचं निमित्त होतं. भगवंताला पुंडलिकाला भेटायचं होतं. म्हणून श्रीकृष्ण बालरूपात बालगोपाळांसह गोपाळपुर्यात आले. त्यांनी या ठिकाणी गोपाळकाला केला. त्यानंतर ते खाली जवळच असलेल्या विष्णूपदाला गेले. हे ठिकाण चंद्रभागा नदीत आहे. तिथं श्रीकृष्णानं बाळगोपाळ आणि गाईंना गुप्त केलं. आजही तिथं कृष्णाच्या पावलाच्या आणि गाईंच्या खुरांच्या खुणा दिसतात’, कमलाकर गुरव सांगत होते. पुढं विष्णूपदावरून भगवंत पुंडलिकाच्या भेटीला गेले. ‘तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे.’ पुंडलिक म्हणाला, ‘आता माझे आई-वडील झोपले आहेत. मी त्यांची सेवा करतोय. तू तोपर्यंत या वीटेवर उभा राहा. आई-वडील उठल्यावर भगवंतानं विचारलं, आता वर माग. त्यावर पुंडलिक म्हणाला, तुझ्या भेटीला येणार्या साध्या भोळ्या भक्तांचा उद्धार कर आणि तुझ्या नावापूर्वी भक्तांनी माझा उच्चार करावा, असा वर दे. देवानं तो दिला. त्याप्रमाणं आजही श्रीविठ्ठलाचा जयघोष करताना ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल…’ म्हणतात. पुंडलिकासाठी पांडुरंग अजूनही विटेवर उभा आहे. तर रुख्मिणी दिंडीरवनात वास्तव्य करून आहे. पंढरपुरात कुठंही विठ्ठल-रुख्मिणी एकत्र असणारं मंदिर नाही. याचं मूळ या गोपाळपुर्याच्या कथेत आहे. त्यामुळं गोपाळपुर्याचं महत्त्व अबाधित आहे. इथं गोपाळकाला केल्यानंतरच पंढरीची वारी पूर्ण होते, असं मानतात. एकादशीचं महत्त्व पंढरपुरात तर त्यानंतर येणार्या पौर्णिमेचं महत्त्व हे गोपाळपुरात आहे.’
इथं जनाबाई आणि नामदेव भेटीची आता चौथी गोष्ट ऐकली. वारीसाठी आलेले जनाबाईंचे आई-वडील प्लेगसारख्या रोगानं पंढरपुरात दगावले. त्यांची पोरकी झालेली मुलगी मंदिरात रडत बसली होती. त्या निराधार मुलीला दामूशेटींनी घरी आणलं. तिचा सांभाळ केला. याच वाड्यात दामू शेटी परिवारासह राहात होते. वाड्यासमोर जनाबाईंची झोपडी होती. देवाचं पदक चोरल्याच्या आरोपावरून जनाबाईंना सुळावर देण्याची शिक्षा झाली. पण सुळाची फुलं झाली. सर्वांना जनाबाईंची महती कळली. त्यानंतर देवावर रुसून जनाबाई गोपाळपुर्यातील नामदेवांच्या वाड्यातील तळघरात जिथं सध्या गोपाळकृष्ण मंदिर आहे, तिथं येऊन बसल्या. जनाबाईंची समजूत काढण्यासाठी स्वतः पांडुरंग आले. त्यांनी जनाबाईला समजावलं. मी माझा शेला विसरायला काही वेडा नाही. जगाला तुझी महती कळावी, म्हणून मीच हे सगळं घडवून आणलं, असं पांडुरंगानं जनाबाईंना सांगितलं. ही आख्यायिका सांगत कमलाकर गुरवांनी त्या जमिनीखालच्या तळघराचं महत्त्व पटवून दिलं.
त्यानंतर खाली आलो. तिथं हार, प्रसादाची दुकानं फुलली होती. सर्वात लक्ष खेचून घेणारे होते, तिथले फोटो स्टुडिओ. तिथं जनाबाईंच्या वेषात फोटो काढून मिळत होते. एका मिनिटात. जनाबाईंसारखा वेष परिधान करायचा आणि कृष्णाच्या पुतळ्यासोबत फोटो काढून घ्यायचा, असा उपक्रम. असे सहा फोटो स्टुडिओ तिथं दिसले. कॅसेट-सीडींनी गच्च भरलेल्या दुकानांत जनाबाईंवरच्या दोनच सीडी मिळाल्या. दुकानदार म्हणाला, ‘आता ‘सीझन’ नाही. वारीत येतील भरपूर सीड्या’. शेजारचं पुस्तकाचं दुकान बंद होतं.
या ठिकाणाहून गोपाळपुरात येण्यासाठी पुष्पावती नदीवरील पुलावर थांबलो. पुलाच्या मध्यभागी १८६९मध्ये लावलेला तो शिलालेख वाचला.
त्यानंतर आम्ही विष्णूपदाकडे मोर्चा वळविला. विष्णूपद हे भीमा म्हणजे चंद्रभागा नदीत आहे. त्यापूर्वी एक मंदिर लागतं. याच मंदिराच्या ठिकाणी जनाबाईंसाठी सूळ उभारण्यात आला होता, असं सांगितलं गेलं. पण मंदिर खूप उंचावर आहे. सूळ वाळवंटात रोवण्यात आला होता, अशी आख्यायिका आहे. असो. इथं शेतात झाडाखाली मंदिर बांधलं असून, त्या ठिकाणी एका पाषाणावर एकाच पावलाची खूण आहे. ते पाऊल श्रीकृष्णाचं असल्याचं मानण्यात येतं. मंदिराच्या बाहेर भिंतीवर भगवान श्रीकृष्ण आणि जनाबाईंचं चित्र आहे. त्यानंतर खाली नदीपात्रात ५० मीटर चालत गेल्यावर दगडी खांबांचं एक छत केलं आहे. या छताखाली भगवान श्रीकृष्णाच्या पावलाच्या आणि गाईंच्या खुरांच्या खुणा आहेत. तिथं एक महाराज होते. त्यांच्या शेजारील कोनाड्यात संगमरवरी शंख, चक्र, गदाधर भगवान विष्णूची मूर्ती आहे. या दगडी छताखाली बाळगोपाळांच्या आणि गायींच्या खुरांचे ठसे उमटलेले आहेत. इथंच श्रीकृष्णानं गोपाळ-गायींना गुप्त केलं, असं मानतात.
गोपाळपुरा दर्शन झाल्यानंतर पंढरपुरातील संत कबीरांच्या मठात दाखल झालो. तिथं कबीर आणि जनाबाईंच्या भेटीची कथा ऐकली. पंढरपुरातील गोविंदपुर्यात हा मठ आहे. तिथं पन्नाशीतले विष्णुदास कबीर महाराज भेटले. कपाळाला उभा अष्टगंध आणि लाल गंधांच्या कॉम्बिनेशनचा टिळा. कोपरी, धोतर आणि उपरणं. क्षणभर वाटलं, संत कबीर यांच्यासारखेच दिसत असतील का? जनाबाईंची महती ऐकून कबीर कसे पंढरपुरात आले, त्यांचा मुलगा कमाल पंढरपुरातच कसा स्थायिक झाला, कबिरांनी जनाबाईंना ‘सब संतन की काशी’ कसं म्हटलं, याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं. संत कबीर संत नामदेवांच्याच काळात होऊन गेल्याचा दावाही त्यांनी केला. शिवाय नामदेवमहाराजांचा जन्म पंढरपुरातच झाला, यावर ते ठाम होते.
मनात प्रश्न शिल्लक होतेच. संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्र. द. निकतेसर पंढरपुरात राहतात. त्यांना भेटायला गेलो. निकतेसर नामदेव सेवा मंडळामार्फत पत्राद्वारे नामदेव गाथा अभ्यासक्रम चालवतात. संत नामदेवांवर त्यांची महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राबाहेर, पंजाबात व्याख्यानं झाली आहेत. पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’नंतरच्या तणावाच्या परिस्थितीत त्यांनी अमृतसर आणि घुमानला भेट दिली होती. म्हणालो, ‘जनाबाईंचं आधारभूत चरित्रच सापडत नाही. महिपतीबुवांचा सर्व संताच्या चरित्रावर जो ग्रंथ आहे, त्यात जनाबाईंना दामाशेटींकडे सुपूर्द करण्यासाठी जनाबाईंच्या वडिलांना दृष्टांत होतो, अशी कथा येते. जनाबाई पंढरपुरात आल्या तेव्हा किती वर्षांच्या होत्या, याबाबत विविध मतं आहेत.’ त्याबाबत निकतेसर म्हणाले, ‘अभंगांतून जनाबाई नामदेवांपेक्षा मोठ्या आणि आख्यायिकांमधून लहान वाटतात. ते काहीही असो. नामदेव आणि जनाबाई ही एक अभेद्य जोडी आहे. ती एक नाही, चार युगांपासून एकत्र आहे. समर्पित जीवनाचा आदर्श म्हणजे जनाबाई. जनाबाईंनी पंढरपुरातच समाधी घेतली. नामदेवांच्या कुटुंबाच्या समाधीच्या वेळी जनाबाईंनीही समाधी घेतली. जनाबाई पंढरपुरात राहात होत्या की गोपाळपुर्यात हा मुद्दा नाही. त्या नामदेव कुटुंबाच्या अविभाज्य घटक होत्या, हे महत्त्वाचं. अभंगांमधून भोळ्या जनाबाईंचं दर्शन होत असलं, तरी ते अभंग मोठं तत्त्वज्ञान सांगणारे आहेत. कुंडलिनी जागृत कशी करावी, हे जनाबाईंनी एका अभंगात लिहून ठेवलंय. त्यामुळं त्यांना खरं तर योगिनीच म्हणायला हवं.’
‘आषाढ वैद्य त्रयोदशीला नामदेवांनी समाधी घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या सर्व कुटुंबानं समाधी घेतली. त्यांचे आई-वडील, पत्नी राजाई, चार मुलं नारा, विठा, म्हादा, गोंदा, तीन सुना गोडाई, येसाई, साखराई, आऊबाई आणि दासी जनाबाई. नामदेवांची थोरली सून लाडाई गरोदर असल्यानं माहेरी गेली होती. समाधी सोहळा पार पडल्यानंतर ती पंढरपूरला आली. त्यावेळी तिला मुलगा झाला. तिनं पांडुरंगाच्या चरणावर त्या मुलाला अर्पण केलं. इथून पुढं तूच याचा सांभाळ कर म्हणाली. त्या मुकुंद नावाच्या मुलापासून आज १७वी पिढी पंढरपुरात नामदास म्हणून नामदेव-जनाबाईंच्या सेवेत आहे.’ पंढरपुरात जनाबाईंचं मंदिर किंवा मठ का नाही, या प्रश्नावर निकतेसर म्हणाले, नामदेव ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी जनाबाई, असं समीकरण आहे. आपला स्वतंत्र मठ किंवा मंदिर असावं, असं स्वतः जनाबाईंनाही वाटलं नसणार.
निकतेसरांचा निरोप घेऊन पंढरपुरातून निघालो. एसटीचा रात्रीचा प्रवास होता. डोळ्यापुढं दोन दिवसांचं जनाबाईंचं पंढरपूर फिरत होतं. त्यात जनाबाई होत्या. दासीपद गळ्यात घेऊन काबाडकष्ट उपसणार्या, नामदेवांचं चरित्र लिहिणार्या, अभगांतून जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणार्या, ज्ञानदेवांच्या संगतीत योगविद्या साध्य करणार्या, तपस्वी, आत्ममग्न, स्वामीनिष्ठ, अनाथ, कष्टी जनाबाई दिसल्या. ‘पंढरीच्या पेठेत पाल ठोकणार्या’ स्वतंत्र जनाबाई काही नाही दिसल्या!
ठायीठायी जनाई सेवा करीन मनोभावे