संत ज्ञानदेव आणि संत जनाबाईंच्या भेटीला वारकरी चळवळीच्या इतिहासात मोठं महत्त्व आहे. सामाजिक दृष्ट्या उच्चवर्णीय असलेल्या व्यक्तीनं एका शूद्र दासीशी बरोबरीनं बोलावं, हे आश्चर्याचा धक्का देणारं होतं. अर्थात एका ज्ञानियानं दुस-या ज्ञानाबाईला केलेलं ते अभिवादन होतं. पण या भेटीमुळं समाजात समतेचा पाया घातला गेला.
इसवी सन १२९१ हे वर्ष नामदेव आणि जनाबाई यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले, कारण या वर्षी ज्ञानदेव आणि नामदेवांची प्रथम भेट झाली. जनाबाईंनाही ज्ञानदेवादी मंडळींचा सुखद सहवास तेव्हापासून लाभला आणि त्यांच्या जीवनात सुखाचे नवे प्रवाह वाहू लागले. ज्ञानदेवांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या. ज्ञानदेवांची मंगल दृष्टी, अमृतमय वाणी आणि चैतन्यमय रूप पाहून जनाबाईंचे मन आनंदनिर्भर झाले.
ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांनी अध्यात्मचिंतनयुक्त अशी अभंगसृष्टी निर्माण केली. तशीच नामदेवांनी भक्तिभावयुक्त अशी दुसरी अभंगसृष्टी निर्माण केली. किंबहुना ज्ञानदेव मंडळाच्या अभंग निर्मितीमुळे तत्कालीन काव्याचा चिंतनाकडे झुकलेला तोल नामदेव आणि जनाबाई यांच्या अभंगांमुळे भक्तीकडे खेचला गेला. त्या योगाने साहजिकच ज्ञान व भक्ती यांचा समतोल प्रस्थापित झाला, याचे श्रेय नामदेवांइतकेच जनाबाईंना दिले पाहिजे.
ज्ञानदेवांना नामदेवांच्या सगुण भक्तीचे अतिशय आकर्षण वाटे. नामदेवांच्या या भक्तीचा आपण अनभुव घेऊ शकत नाही, याची ज्ञानदेवांना हुरहूर वाटते. नामदेवांनासुद्धा ज्ञानदेवांप्रमाणे श्रेष्ठ ज्ञानी मनाच्या आत्मानुभव विश्वाची आपणास प्राप्ती व्हावी, असे वाटे. त्यातूनच तीर्थावळीच्या अभंगांचा जन्म झाला. जनाबाईंना ज्ञानदेवांबद्दल विलक्षण आदर वाटतो. त्यांनी तो आपल्या ज्ञानदेवविषयक अनेक अभंगांत व्यक्त केला आहे. एका अभंगात जनाबाई म्हणतात :
ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानश्वेर॥ मरोनिया जावें। बा माझ्या पोटी यावें॥
ऐसे करी माझ्या भावा। सख्या माझ्या ज्ञानदेवा॥ जावे ओवाळूनी। जन्मोजन्मी दासी जनी॥
ज्ञानदेवांचा मोठेपणा हा निव्वळ जनाबाईंच्या स्तुतीचा भाग नसून तो त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीचा भाग असतो. त्या अभंगांवरून ज्ञानदेवांचे श्रेष्ठत्व तर कळून येतेच; पण त्याशिवाय जनाबाईंना ज्ञानदेवांबद्दल वाटणारा परमावधीचा आदरही व्यक्त होतो. जनाबाई ज्ञानदेवांना आईहुनही मोठा समजतात. त्यांच्याप्रमाणे सर्व वारकरी आजही ज्ञानदेवांना ‘माऊली’ म्हणून हाक मारतात. ज्ञानदेवांचे मोठेपण वर्णन करताना जनाबाई पराकोटीला जाऊन विचारतात, ‘किती सांगो’ कितीही वर्णन केले, कितीही उपमा, दृष्टान्त दिले, तरी ते वर्णन अपूर्णच राहते, इतका
जिव्हाळा, प्रेम, आदर, ममत्व ज्ञानदेवांबद्दल जनाबाईंना वाटते. त्या ज्ञानदेवांना साधा मानव मानायला तयारच नाहीत. त्यांच्या मते ज्ञानदेव अवतारी पुरुष होते. त्या म्हणतात :
महाविष्णचूा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर॥
एकट्या ज्ञानदेवांबद्दलच नव्हे, तर त्यांच्या सर्व भावंडांबद्दलही जनाबाईंची हीच भावना आहे. निवृत्ती हा सदाशिवाचा अवतार, सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार आणि मुक्ताबाई आदिशक्ती होत्या. ज्ञानदेवांना जनाबाई माता म्हणतात. आपण पाडस आणि ज्ञानदेव हरिणी आहेत. आपण वासरू आणि ज्ञानदेव गाय या दोघांची भेट लवकर होत नाही, म्हणून जनाबाई दु:खी-कष्टी होतात. त्या ज्ञानदेवांना धाव घेऊन लवकर भेट देण्याची विनंती करतात. जनाबाईंच्या जीवनात ज्ञानदेवांनी चैतन्याची पेरणी केली असल्यामुळे त्यांना ज्ञानदेव बहीण, आई, बाप, सखा, गुरू वाटतात.
ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या वेळी जनाबाईंना नामदेवांबरोबर आळंदीला जाण्याची संधी मिळाली असावी. एका अभंगात जनाबाई आळंदी, इंद्रायणी नदी यांचे वर्णन करून ज्ञानाबाई आईने दुडूदुडू धावत येऊन आपणास भेटावे, असे म्हणतात. अशा भेटीसाठी आपला जीव कासावीस झाला आहे. तेव्हा आपला कळवळा येऊ द्यावा, अशीही त्यांची विनंती आहे. हा अभंग ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतर लिहिला असावा. जनाबाई आपल्या समर्पणाच्या अभंगात आपणास आपल्या भक्तीचे श्रेय मिळाले, पांडुरंग आपल्याला भेटावयास आला, असे वर्णन करतात आणि याचे श्रेय त्या ज्ञानदेवांना देतात. जनाबाईंनी ज्ञानदेवांच्या मुखाने विठ्ठलाला आपल्या अभगांबंद्दल केवढा जिव्हाळा वाटतो, याचे वर्णन केले आहे. प्रसंग होता असा, एकदा निवृत्तीनाथांना आढळले, की विठ्ठल मंदिरात नाही. म्हणून त्यांनी विठ्ठल कोठे आहे, याची चौकशी केली. विठ्ठलाला हे कळले, तेव्हा त्याने ज्ञानदेवांस खुण करून निवृत्तीनाथास सांगू नकोस, म्हणून सांगितले. पण ज्ञानदेवांना आपल्या विठ्ठलाचे भक्तप्रेमाचे वर्णन केल्यावाचून राहवले नाही. तेव्हा त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितले, की विठ्ठल जनाबाईंबरोबर दळण दळू लागण्यास गेला आहे. असे सांगून त्यांनी गौप्यस्फोट केला व विठ्ठलाबरोबर जनाबाईंचे मोठेपणही सविस्तर वर्णन करून सांगितले. या नाट्यमय प्रसंगात विठ्ठल, निवृत्ती, ज्ञानदेव ही पात्रे जनाबाईंचा गौरव करण्याकरिता अवतरली आहेत, असे दिसते.
ज्याला स्वत:ला काहीही अशक्य नाही, अशा विठ्ठलाने स्वत: ज्ञानदेवांपुढे जनाबाईंसाठी वरदानाची याचना करावी, यात विठ्ठलाने केलेला ज्ञानदेवांचा गौरव तर आहेच; पण त्याचबरोबर या योगाने जनाबाईंची आणि त्यांच्या अभंगवाणीची प्रतिष्ठा खूप उंचावते. पांडुरंगाने जनाबाईंसाठी ज्ञानदेवाजवळ जो वर मागितला, त्याला ज्ञानदेवांनी ‘तथास्तु’ म्हटले असले पाहिजे. म्हणूनच जनाबाईंच्या अभंग-वाचनात, पठणात, मननात, गायनात आणि चिंतनात पांडुरंग भरून राहिलेला आढळतो. जनाबाई नित्य वाचनात नसल्या, तरी श्रवणात ज्ञानश्वेरीशी चिरपरिचित असाव्यात. ज्ञानदेव व त्यांची भावंडे यांच्या जन्मतिथी जनाबाईंनी एका अभंगात वर्णन केल्या आहेत. तसेच ज्ञानदेवांनी समाधी केव्हा घेतली याचीही नोंद जनाबाईंनी करून ठेवली आहे. त्या म्हणतात,
बारा शते अठरा। दुर्मुख संवत्सर।
तिथी गुरुवासर। त्रयादेशी॥
शरदऋतु कृष्णपक्ष कातिर्कमास।
बैसे समाधीस। ज्ञानराज।
जनाबाईंचे ज्ञानदेवांबद्दलचे अभंग वाचताना असे वाटते, की आपण नामदेवांची दासी आहोत, याचा त्यांना विसर पडला असावा. येथे जनाबाईंना एक अपूर्व, तेजस्वी, अलौकिक असे अनुभवविश्व सापडले असावे, असे वाटते. त्या अनुभवविकासाची भाषा बोलतात. ही त्यांची ज्ञानानुभवाकडे घेतलेली झेप वाटते. जनाबाईंच्या काव्यावर ज्ञानदेवांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि काव्याचा खूपच प्रभाव पडला आहे. उलटपक्षी जनाबाईंच्या भक्तिकाव्याने ज्ञानदेवही बरेच प्रभावित झाले आहेत. ते म्हणतात : ‘जनीचे हे बोल, स्वानदांचे डोल.’ या सर्वांचे कारण एकच, की जनाबाईंचे अंतर्बाह्य जीवन व काव्य यांना परतत्त्वस्पर्शाची दिव्यता लाभली होती. ज्ञानदेवांना जनाबाई आणि त्यांचे काव्य याबद्दल असे वाटते, की प्रत्यक्ष विठ्ठल प्रसन्न होऊन जनाबाईंचा दास झाला आणि सर्व लोक म्हणू लागले, ‘देव राबे दासी घरी…’
(‘संत कवयित्री जनाबाई : चरित्र काव्य आणि कामगिरी’ या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या पुस्तकातील संपादित लेख)
स्वरूपाचा पूर आला बह गये कोट कबीर