‘ज्ञानयाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेखा’, अशी अवतार परंपरा वारकर्यांयमध्ये सांगितली जाते. महाराष्ट्रातील नामदेव-ज्ञानदेवांचं ठीक आहे, पण उत्तरेतले कबीर महाराष्ट्रात कसे काय आले? याचं उत्तर, संत जनाबाईंमुळं! या दोन्ही संतांच्या झालेल्या, न झालेल्या भेटीतून मानवतेचा एक मोठा सेतू बांधला गेला. जो हजारो वर्ष टिकणारा आहे.
मुळात इतिहासाच्या हिशेबानं संत कबीर आणि संत जनाबाई यांची भेट जुळू शकत नाही. कारण जनाबाईंचा जन्म इसवी सन १२६३च्या आसपासचा, तर कबिरांचा जन्म इसवी सन १३९८च्या दरम्यानचा. अर्थात वारकर्यांना या सनावळ्यांचं काहीही पडलेलं नाही. कबीर आणि जनाबाईंच्या अनेक कथा ते कीर्तन, प्रवचनातून सांगतात, ऐकतात. कबिरांचा उल्लेख असलेले अभंग भक्तिभावानं गातात. इतिहासातलं साल जरी जुळत नसलं तरी कबीर महाराष्ट्रात आले होते, राहिले, फिरले होते याचे खूप सारे संदर्भ बोलण्या गाण्यातून मिळतात. खुद्द कबीरपुत्र संत कमाल यांची समाधी आणि मठ पंढरपुरात आहे. वारकर्यांच्या भगव्या पताकेच्या सोबत आपली पांढरी पताका फडकावत पंढरीच्या वाटेवर चालणारे कबीरपंथी महाराष्ट्रभर आहेत.
शंभरहून वगैरे अधिक वर्षांचं अंतर असताना वारकरी कबीर आणि जनाबाई हा सांधा जुळवतात. त्यामागची प्रचलित कथा अशी आहे, की कबीर राहायचे थेट काशीमध्ये. हिंदू धर्माच्या चलनवलनाचा ठेका असलेल्या वाराणसीच्या पंडितांमध्ये. धर्माचा अर्थ उलगडून सांगण्याचा, उपदेश करण्याचा सर्व अधिकार त्यांनाच. स्त्री-शूद्रांनी त्यांच्या आसपास फिरकूही नये. अशा काळात महाराष्ट्रात संत नामदेव-ज्ञानदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून स्त्री-शूद्रांना अधिकार दिला. त्यांना कीर्तन, प्रवचन, अभंगरचनेतून व्यक्त व्हायला व्यासपीठ दिलं. संत जनाबाई म्हणजे या थोर उदार विचारधारेचं प्रतीकच. त्या एकतर महिला. जातीनं शूद्र. व्यवसायानं दासी. म्हणजे पंडित, विद्वानांच्या दृष्टीनं पूर्ण बेदखल. अशा स्त्रीला संत नामदेव आणि त्यांचा वारकरी संप्रदाय मानाचं स्थान का देतो, हे पाहायला कबीर पंढरपूरला आले.
कबीर पंढरपुरात आल्यानंतरच्या अनेक कथा वारकरी सांगतात. त्यातली एक म्हणजे त्यावेळी चंद्रभागेला महापूर आला होता. पूर ओसरण्याची वाट पाहत लोक दोन्ही काठांवर उभे होते. कबिरांनी मात्र सरळ त्या पुराच्या पाण्यातून सरळ चालत जाऊन चंद्रभागा ओलांडली. कबिरांच्या या सामर्थ्यानं लोक अचंबित झाले. हेच कबीर जनाबाईंच्या घरी पोचतात तेव्हा जनाबाईंचं दुसर्या महिलेशी कडाक्याचं भांडण सुरू असतं. भांडण कशावरून, तर शेणाच्या गोवर्यांच्या वाटणीवरून. मग भांडण पाहायला आलेल्या या बाबांनाच अर्थात कबिरांना या दोघी न्यायनिवाडा करायला सांगतात. आमच्या दोघींच्या गोवर्या ओळखून वाटून द्या, अशी विनंती करतात. त्यावर एकसारख्या दिसणार्या या दोघींच्या गोवर्या ओळखाव्यात कशा, या संभ्रमात पडलेल्या कबिरांना जनाबाई सुचवतात, ‘एकेक गोवरी कानाला लावा. ज्यातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐकायला येईल त्या गोवर्या माझ्या!’ कबीर तसं करतात आणि आश्चर्यचकीत होतात. खरोखरच काही गोवर्यांमधून विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला येत होता. इथं आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या बळावर भरलेली चंद्रभागा पार करणार्या कबिरांचं गर्वहरण होतं, अशी कथा रंगविली जाते. अर्थात या कथेच्या मुळाशी गेल्यावर एक लक्षात येतं, ते म्हणजे, तत्कालीन कर्मकांडांना विरोध म्हणून संत नामदेवांनी प्रचलित केलेल्या, सर्वसामान्यांना सहज करता येणार्या ‘नामस्मरणा’सारख्या सोप्या गोष्टीवर संत जनाबाई आणि कबिरांचं झालेलं मतैक्य. कबिरांची भक्ती होती, निर्गुण निराकार. तर जनाबाईंची भक्ती कमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या सगुण साकार विठोबाची. याबाबत सविस्तर बोलताना पंढरपूरचे हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, ‘परखडपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कबिरांनी वारकरी संतमंडळात सहभागी झालेल्या दादू पिंजारी यांना सगुण भक्ती करत असल्याबद्दल जोरदार खडसावलं होतं.’
इधर उधर क्या देखत हो| दादू चुरावे पांव॥
दादू भडवा क्या चुरावे| विषय हात ना पांव॥
असे कबीर जनाबाईंच्या सगुण साकार भक्तीवर मात्र, प्रसन्न होतात. एवढंच नव्हे तर ‘राम कृष्ण हरी’ हा बीजमंत्रही स्वीकारतात. त्यांच्या अनेक दोह्यांमधून त्याचा उद्घोष करतात. कारण ‘तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे| सगुण निर्गुण एकू गोविंदू रे’ याचा प्रत्यय त्यांनी संत जनाबाईंच्या चर्चेत, सहवासात घेतला. शिवाय ‘अरे अरे विठ्या| मूळ मायेच्या कारट्या’, असं देवालाच ठणकावणार्या जनाबाईंच्या धडाकेबाजपणाचं कबिरांना मोठं कौतुक वाटलं. ते त्यांनी कसं व्यक्त केलं असेल, हे कबिरांच्याच एका दोह्यामध्ये थोडा बदल करून तनपुरेमहाराज म्हणतात,
कबीर कबीर क्या पुकारे| जाये चंद्रभागा के तीर॥
एक जनाबाई के प्रेम मे| बह गये कोट कबीर॥
सगुण भक्तीबद्दल सांगताना तनपुरे महाराजांनी नामदेव आणि कबीरपुत्र कमाल यांच्या दोन कथा सांगितल्या. पहिल्या कथेत नामदेव महाराज थंडीच्या दिवसांत रस्त्यानं जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला पडून असलेला दगड दिसतो. त्यांना वाटतं, आपल्याला एवढी थंडी वाजते तर या दगडाला किती थंडी वाजत असेल, म्हणून ते त्या दगडाच्या अंगावर आपल्या अंगावरचं वस्त्र घालतात. तर देव पूजेसाठी भल्या सकाळी फुलं आणायला गेलेल्या कमाल यांना फुलांवर साचलेले दवबिंदू दिसतात. त्यांना वाटतं, आपण या फुलांना तोडतो आहोत, म्हणूनच ती अश्रू ढाळतायत. त्यामुळं ते फुल न तोडताच घरी जातात. वारकरी संतांच्या सहवासात आल्यानं निर्गुणभक्ती करणार्या कबिरांच्या मुलाच्या विचारात कसा बदल घडला, हे या कथांमधून सांगितलं जातं. अर्थात वारकर्यांचं तत्त्वज्ञान काय आहे, तर ते सगुण-निर्गुण, जातीय, लिंगभेदाच्या पलीकडं जाणारे समतेचे, मानव मुक्तीचे विचार आहेत. म्हणून तर
उंच निंच काही नेणे हा भगवंत| तिष्ठे भाव भक्त देखोनिया॥
नामयाची जनीसवे वेची शेणी| धर्मा घरी पाणी वाहे झाडे॥
चर्म रंगू लागे रोहिदासा संगे| कबिराच्या मागी विणी शेले॥
या काकडआरतीतील अभंगामध्ये कबिरांचा गौरवपूर्ण उल्लेख येतो. विठ्ठल स्वतः भक्ताच्या मदतीला धावून जातो, हा सर्व भक्तांचा सार्वत्रिक अनुभव आहे. जनाबाईंसाठी गोवर्या वेचू लागणारे भगवंत कबिराला शेले विणू लागतात, असं तुकोबाराय या अभंगातून सांगतात. जशी नदी समुद्राच्या शोधात जाते तसंच भक्त-भक्ताचं आणि भक्त-देवाचं नातं असतं. याच आर्त ओढीनं कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरपूरला आले. विषमतावादी वर्णव्यवस्थेविरोधात महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत समतेचा धागा गुंफणारे नामदेव आणि उत्तरेतून जनाबाईंच्या भक्तीचं महात्म्य ऐकून पंढरपूरला येणारे कबीर यांच्यात मतेचा धागा आहेच. तो पुन्हा एकदा अधोरेखित करावा लागणार आहे, असं गाडगेबाबांचा वारसा चालवणारे तनपुरेबाबा नमूद करतात.
तर कबीर आणि जनाबाईंची प्रत्यक्ष भेट व्हायला कशाला हवी? संत तुकाराम महाराज आणि भगवान बुद्धांची काय प्रत्यक्ष भेट झाली होती का? तरीही त्यांनी बुद्धाच्या विचारांचं अनुसरण केलंच ना? असा सवाल करत ‘कलियुगी बौद्धरुप धरी हरी| तुकाराम शरीरी प्रवेशला॥’ या संत बहिणाबाईंच्या अभंगाचा दाखला सातार्याचे हभप डॉ. सुहास महाराज फडतरे देतात. त्यांच्या मते समता-समन्वयाची वारकरी विचारधारा महत्त्वाची आहे. म्हणूनच संत नामदेवांनंतर तब्बल ४०० वर्षांनी संत तुकाराम महाराज ‘नामदेवे केले स्वप्नामाजी जागे|सवे येवूनीया पांडुरंग’, असं सांगतात. नामदेवरायांनी केलेली शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा मला पूर्ण करण्यास सांगितली, असं तुकोबाराय म्हणतात. अशाच रितीनं जनाबाई आणि कबिरांच्या बाबतीतही म्हणता येईल. याशिवाय वैदिक परंपरेनं शूद्र ठरवलेल्या स्त्रीनं भक्तीच्या, अभ्यासाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करावं, हेच कबिरांना प्रेरणादायी वाटत असणार, असं फडतरे महाराज म्हणतात. म्हणून तर संतांच्या अभंगांमध्ये आणि खुद्द कबिरांच्या दोह्यांमध्ये परस्परांचा गौरवपूर्ण उल्लेख येतो. एका दोह्यामध्ये कबीरमहाराज जनाबाईंचा आत्यंतिक सन्मानानं उल्लेख करतात.
जनी जनी कुछ कहे नामदेव की दासी|
कहत कबीर सुन भाई साधु| जनी सब संतोंकी काशी॥
दुसर्या एका दोह्यामध्ये
जिधर देखे उदर भरा| मौजूद उन्होंका बोलबाला है॥
नामा दर्जी बडा हटेला| आपसे दूध पिलाये है॥
बंदा उन्होंका नारा, म्हादा| जनी खाना खिलाया है॥
असा संत नामदेव कुटुंबासोबत कबीर जनाबाईंचा उल्लेख करतात. कबीर आणि जनाबाईंच्या भेटीचा अर्थ एवढाच घ्यायचा की, हे दोघेही समतेची पताका खांद्यावर घेऊन पुढे जाणारे होते. त्यांना समाजात समता, मानवता आणि न्याय प्रस्थापित करायचा होता. धर्माच्या, परंपरेच्या नावावर होणारं शोषण थांबवायचं होतं. गुलामगिरीचं जोखड तोडायचं होतं. आणि आपण सर्व एकाच देवाची लेकरं असताना भेदाभेद कशासाठी, हा प्रश्न वैदिक परंपरेला उपस्थित करायचा होता. वैदिक परंपरेच्या विरोधात उभे राहताना कबीर समविचारी किंवा आदर्शाच्या शोधात होते, तो आदर्श त्यांना जनाबाईंच्या रूपानं मिळाला.
तुमं कतं ब्राह्मण, हम कत शूद्र| हम कत लोहू, तुम कत दूध॥, असा प्रश्न वैदिक, ब्राह्मणी परंपरेला उपस्थित करणार्या कबिरांना वारकरी संप्रदायानं आपलं मानलं.
स्त्री-पुरुष समता, जातिभेद निर्मुलन आणि मानवतेचं तत्त्वज्ञान घेऊन जीवन जगणार्या वारकरी संतांना केंद्रस्थानी ठेवून कबिरांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचं कार्य केलं. जनाबाई आणि कबिरांमध्ये वैचारिक ऋणानुबंध असा आहे, असे विचार फडतरेमहाराज व्यक्त करतात.
कबिरांची थोर परंपरा पुढं चालवण्यासाठी पंढरपुरात संत कबीरमठ स्थापन झाला. त्या मठाचे हभप विष्णू महाराज कबीर या मठाच्या स्थापनेची कहाणी सांगतात. ती अशी, ‘पंढरपूरला भेट दिल्यानंतर कबीर महाराज पुन्हा काशीला गेले. त्यानंतर नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेसाठी काशीला गेले. आपल्या घरी आलेल्या या संतांचा पाहुणचार करण्याचं कबिरांनी ठरवलं. पण घरची गरिबी. मग या देवस्वरूप असणार्या अतिथींच्या पाहुणचारासाठी कबीर आणि कमाल या बापलेकानं चोरी करायचं ठरवलं. त्यावर नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंगही आहे. आवश्यक शिध्याची चोरी केल्यानंतर या दोघांनी वाण्याला जागं केलं आणि त्याच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. वाण्यानं दोघांपैकी कमाल महाराजांना पकडलं. त्यावेळी कमाल महाराज कबीर महाराजांना म्हणाले, आता राजा मला सुळावर देईल. तुम्ही माझं शीर घेऊन जा आणि पाहुण्यांना पाहुणचार करा. त्याप्रमाणं कबीर महाराज शीर घेऊन घरी आले. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांसाठी जेवण केलं. कबीर-कमालांच्या चोरीची तक्रार राजाकडे गेली. राजानं कमाल महाराजांच्या उपलब्ध धडालाच सुळावर देण्याचे आदेश दिले. सुळावर देण्यासाठी धड बांधलं होतं. संत पाहुणचार घेऊन माघारी परतत होते. त्यावेळी सुळावरचं ते धड संतांना नमस्कार करू लागलं. चौकशी केल्यावर कबिरांना नामदेव महाराजांनी सगळी हकिकत सांगितली. संतांनी कबिरांना ते शीर घरातून आणायला सांगितलं. आणि संताच्या कृपेनं शीर धडाला जोडलं गेलं. कमाल महाराज पूर्ववत झाले. त्यानंतर कमाल महाराजांनी उर्वरित सर्व जन्म या संतांच्या सहवासात घालविण्याचं ठरवलं. त्यानुसार ते सर्व संतासोबत पंढरपुरात आले. त्यांनी पंढरपुरात कबीर मठाची स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रात कबीरपंथी विठ्ठलभक्तीची परंपरा सुरू आहे.’
एका अभंगात उल्लेख आहे की, ‘एकादशीला संताचा मेळा झाला आणि दास कबीर संताचा चेला झाला’. कबीर महाराजांचे काशीत जेव्हा निधन झालं. काशीमध्ये निधन झाल्यावर मोक्ष मिळतो. काशीजवळच्या ‘मघर’ला ‘गाढव काशी’ म्हणतात. तिथं मृत्यू झाल्यावर माणूस पुढील जन्मी गाढव होतो, अशी समजूत होती. अशा चुकीच्या समजुती, रूढी मोडून काढण्यात आयुष्य घालवलेल्या कबिरांनी शेवटच्या क्षणीही मघर काशीविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी तिथं गेले. चादर पांघरून झोपी गेले आणि तिथंच त्यांनी प्राण त्यागले. त्यावेळी त्यांचा अंत्यविधी हिंदू की मुस्लीम पद्धतीनं करावा याविषयी अनुयायांमध्ये मोठा वाद झाला. पंढरपूरहून कमाल महाराज त्याठिकाणी गेले. कबीर महाराजांच्या अंगावरची चादर काढण्यात आली तेव्हा चादरी खाली तुळशी, सब्जा आणि फुलं निघाली. फुलं आणि सब्जा मुस्लीम अनुयायांनी घेतली तर तुळस हिंदूंनी घेतली. त्या फुलं आणि सब्जाची समाधी काशीत आहे, तर तुळशीवर पंढरपुरातील कबीर मठात समाधी बांधण्यात आली. कालांतरानं कमाल महाराजांनीही या ठिकाणी संजीवन समाधी घेतली.
कबीर महाराजांची परंपरा भक्तांनीच पुढं चालवली. कमाल महाराजांनंतर १३ ते १४ पिढ्या या ब्रह्मचार्यांच्या गेल्या. आम्ही मूळचे कोल्हापूरचे कदम. आमच्या सात पिढ्या कबीर महाराजांच्या सेवेत आहेत. आमचे पूर्वज विठ्ठल महाराज या परंपरेत आले. त्यांचाच वारसा मी चालवत आहे, असं विष्णू महाराजांनी सांगितलं. त्याचप्रमाणं मठातील कबिरांच्या गादीवर कोणी बसत नाही, भरतानं जसं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य सांभाळलं, तसा या ठिकाणचा कारभार केला जातो, असंही ते म्हणाले.
नामदेव महाराजांच्या काळात संत कबीर होते, असं विष्णू महाराज ठामपणे म्हणतात. संत जनाबाईंची ओळख झाल्यानंतर कबीर महाराज नामदेवांच्या घरी आले. पाहुणचार झाल्यानंतर नामदेव महाराज, जनाबाई यांनी कबीर महाराजांना श्री विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घडवलं. तेव्हा
थाडे वीटपर विकट कर कटीपर, पितांबर धारी|
शंखचक्र दो हात बिराजे गोवर्धन गिरिधारी॥
असं गहिवरून उत्स्फूर्तपणे कबिरांनी देवाचं वर्णन केलं. मग नामदेव-जनाबाईंनी कबिरांना वाळवंटात नेलं. तिथं पुंडलिकाच्या मंदिराजवळ अवघ्या संताचा मेळा जमला होता. कबीर महाराजांनी या मेळ्याचा उल्लेख केला आहे. या वेळी
नामदेव कीर्तन करी| पुढे देव नाचे पांडुरंग॥
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर|
सावध होई देवा ऐसे बोले कबीर॥
असा जनाबाईंचा अभंग आहे. याच कीर्तनाच्या वेळी संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आदी सर्व होते असा उल्लेख नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगात केला आहे. संत कबीर आणि संत सेना महाराज हे दोन्ही संत रामानंद स्वामींचे शिष्य होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना विठ्ठलपंताना अनुग्रह दिला तो या रामानंद स्वामींनीच. त्यामुळं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत कबीर यांचा कालखंड एकच होता. कबीर महाराज पंढरपुरात आले त्यावेळी त्यांचं वय ८० वर्षे असावं, असा अंदाजही विष्णुबुवा कबीर महाराजांनी व्यक्त केला.
पंढरपूरप्रमाणंच संत ज्ञानदेवांच्या आळंदीतही ज्ञानदेव माऊलींच्या मंदिराशेजारीच कबीर महाराजांचा मठ आहे. सध्या चैतन्य कबीरबुवा या मठाचा कारभार पाहतात. त्यांचे आठवे पूर्वज रामदासबाबांनी कबीर कीर्तीमंदीर मुख्य मठात अध्ययन केलं होतं. आळंदीतील मठ १७६५मध्ये उभारला असून, माऊलींची भक्ती करणं, वारकर्यांची समतेची विचारधारा पुढं नेणं यापेक्षा आमच्या कबीरपंथाचं काम वेगळं नाही, असं चैतन्यमहाराज सांगतात. भारतात सुमारे २५ हजार कबीरमठ असून, महाराष्ट्रातील सर्वात मोठा मठ औरंगाबादमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं. वारणासीमध्ये पंडितांनी धर्म काबीज केला होता. कबिरांनी भक्ती आणि ज्ञानाचा संगम एकत्रित करून तो प्रवाह अधिकारहीन बहुजनांसाठी वाहता केला. तोच सशक्त प्रवाह त्यांना चंद्रभागा, इंद्रायणीच्या तटी आढळला. त्याचा शोध घेत कबीर महाराष्ट्रात आले, असं चैतन्यमहाराजांनी नमूद केलं. कबीर, जनाबाईंना अपेक्षित असणार्या विचारांचं वारकरी सांप्रदायात पुनरुज्जीवन करण्याची गरजही त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केली.
बा माझ्या पोटी यावे पंधरावी ती जनी