संत जनाबाईंनी कविता करण्याचा उद्देश डोळ्यापुढं ठेवून कविता केलेली नाही. त्यांची कविता म्हणजे त्यांच्या हृदयातील भक्तीतरंगाचे उद्गार होत. अंत:करणात येणारे भक्तीचे उमाळे त्यांनी शब्दांतून व्यक्त केले. त्यामुळंच त्यांचं काव्य भावकवितेचा प्रत्यय देणारं, जगण्यातील अनुभव सांगणारं आणि लोकमनाशी अत्यंत तरलपणानं जोडणारं ठरलं.
जनाबाईंच्या कवितेत उत्तुंग कल्पनाविलास, भव्य-दिव्य विचार आणि प्रतिभेची उंच झेप नसली तरी अंतरीचा ओसंडून जाणारा भक्तिभाव आहे, जीवनातील अनुभूतींचं हळुवार चित्रण आहे. विठ्ठलावर असलेली अनन्यनिष्ठा आहे. नामदेवांप्रमाणं प्रेमळ, आपलेपणाची वाणी आहे आणि सरळ, सुबोध शब्द योजना आहेत. त्यामुळं त्यांच्या कवितेत प्रासादिकता, माधुर्य, भावनेचा ओलावा आणि सुबोधता या काव्यगुणांचा मनोहारी मिलाफ आहे. जनाबाईंच्या भक्तिमय व्यक्तिमत्वाशी त्यांच्या भावुक कवितेचं नातं आहे. त्यामुळं त्यांच्या कवितेत एक प्रकारचा जिवंतपणा प्रत्ययास येतो.
जनाबाईंच्या कवितेला अलंकारांनी नटण्याचा सोस नाही; पण काही कवितांत सहज स्वाभाविकपणे अलंकार येतात आणि ते आशयाशी चटकन एकरूपही होतात. त्यांच्या कवितेवर संत ज्ञानदेव-नामदेव यांच्या कवित्वाचा प्रभाव पडलेला जाणवतो. त्यातल्या त्यात नामदेवांच्या वाणीचा प्रभाव अधिक असल्याचं पहावयास मिळतं. असं असलं तरी जनाबाईंच्या आपल्या म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाचंही एक वेगळेपण कवितेतून प्रत्ययास येतं. कवितेची भाषा साधी आणि सरळ, मनाला भावणारी आहे. त्यांच्या कवितेतील उत्कट भक्तिभावाच्या आविष्कारात स्त्री मनाचा जिव्हाळा आहे. कोमल आर्तता आहे, वत्सलता आहे. थोडक्यात, जनाबाईंच्या अंत:करणातील भक्तिमय सहजता, जिवंतपणा हाच त्यांच्या कवितेचा आत्मा आहे; त्यामुळंच त्यांच्या कविता हृदयाला भिडतात.
त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातून प्रकटणारं त्यांचं निरागस, स्वच्छ स्त्रीमन होय. जनाबाईंच्या या स्वच्छ मनातून स्फुरलेल्या कविता त्यांच्या जीवनाशी आणि मनाशी एकरूप झालेल्या आहेत. संत जनाबाईंच्या भावविश्वाबरोबर त्यांच्या पारमार्थिक जीवनाचा आविष्कार कवितेतून झालेला आहे. आत्मनिवेदनपर कविता या दृष्टीनं अभ्यासनीय आहेत. त्यांची ही रचना अत्यंत आत्मनिष्ठ आहे. अंत:करणातील जिव्हाळा कवितेतून व्यक्त होतो. अंतर्मनाची तळमळ, व्याकुळता व्यक्त होत असल्यानं, त्यांच्या कवितेचं स्वरूप भाव कवितेसारखं बनलेलं आहे. त्यांच्या कवितेतील भावचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या मनाचा प्रवास आपल्याला अभ्यासता येतो आणि मग त्यातून त्यांची ‘क्षमा करावी देवराया| दासी जनी लागे पाया|’, अशी मुमुक्षू अवस्था प्रकट होते.
डोईचा पदर आला खांद्यावरी| भरल्या बाजारी जाईन मी॥ असा निर्धार करून जनाबाई विठ्ठलाचा ध्यास घेतात. त्यांच्या व्याकुळ मनाला पंढरपूरची ओढ लागते. त्यांच्या या स्वरूपाच्या काही कवितांतून त्यांच्या साधकावस्थेचं चित्र उभं राहतं. मनाची तगमग आणि तळमळ कवितेतून व्यक्त होते आणि भाविकाला आर्तता आणि व्याकुळतेचा प्रत्यय देते. जनाबाईंच्या कवितेतून घडणारा आत्माविष्कार उत्कट दर्शन देणारा आहे, त्यांच्या आत्माविष्काराचं स्वरूप सहज आणि स्वाभाविक आहे.
माय मेली, बाप मेला| आता सांभाळी विठ्ठला॥
मी तुझे गा लेकरूं| नको मजसी अव्हेरू॥
नाही केली तुझी सेवा| दु:ख वाटतसे जीवा॥
नष्ट पापीण मी हीन| नाही केले तुझे ध्यान॥
आपल्या उणिवा देवानं लक्षात घेऊनही आपल्याला जवळ करावं, आपला उद्धार करावा, अशी विनवणी त्या विठ्ठलाला करतात. राग आणि प्रेम विरोधी असलेल्या भावनांची प्रत्ययकारी अभिव्यक्ती त्यांच्या काही कवितांतून स्वाभाविकपणे दिसते. अस्वस्थ मनाला जनाबाईंनी आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली आहे.
थोडक्यात, जनाबाईंची कविता आत्मनिष्ठ आहे, त्यातील आत्माविष्कार, त्यांच्या मनाचे भावविश्व साकार करणारे आहे. संत नामदेवादी संतांविषयीचा आदरभाव, विठ्ठलविषयीचा भक्तिभाव आणि परमार्थाच्या वाटचालीतील अनुभव त्यांच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहेत. प्रभावी आत्माविष्कार हे त्यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे.
रसोत्कटता संत जनाबाईंच्या कवितेचा एक महत्त्वाचा वाङ्मयीन विशेष आहे. त्यांच्या रचनेतून तर त्यांचं मन भक्तिभावानं ओसंडत असल्याचा प्रत्यय येतो. जनाबाईंच्या मनात उचंबळून येणार्या भावना शब्दरूप घेऊन कवितेतून व्यक्त होत असल्यानं त्या सरस बनल्या आहेत. त्यांच्या काव्याच्या शब्दांना भक्तिरसाची उभारी मिळालेली आहे, त्यातूनच त्यांच्या कवितेत रसोत्कटतेचा प्रत्यय येतो. जनाबाईंच्या कवितेत भक्ती, शांत, वत्सल आणि करूण रसांचा परिपोष झालेला आहे. त्यातल्या त्यात करूण रसांनी जनाबाईंची कविता अधिक ओथंबलेली आहे. ‘तुजवाचूनी विठ्ठला| कोणी नाही रे मजला|’, अशी आर्त विनवणी करून जनाबाई विठ्ठलाची करूणा भाकतात.
भक्तिरस हा तर काव्याचा प्रधान रस आहे. ‘विठ्ठलाचा छंद| वाचे गोविंद॥’, अशी जनाबाईंची अवस्था असल्यानं त्यांच्या प्रत्येक उद्गारातून भक्तीचा प्रत्यय येतो. भक्तिभावातून जनाबाईंच्या कवितेची निर्मिती झालेली असल्यानं, प्रत्येक कविता भक्तिभावानं ओथंबलेली आहे. भक्तिरसाचा प्रत्यय देणारी त्यांच्या कवितेची काही उदाहरणे अशी,
जिव्हा लागली नामस्मरणी| रिते माप न भरी गोणी|
नाम विठोबाचे घ्यावे| मग पाऊल टाकावे॥
देव देखिला देखिला| नामे ओळखुनी ठेवला|
तो हा विटेवरी देव| सर्व सुखाचा केशव॥
देव भक्ताचा अंकित| कामे त्याची सदा करीत|
त्याचे पडो नेदी उणे| हीत रक्षिता आपण॥
जनी म्हणे भक्तिभाव| देवदास ऐक्य जीवन॥
जनाबाईंच्या काव्यात भक्तिरस, काही पोषक सहचारी भावांसह स्त्रवताना प्रत्ययास येतो. जनाबाईंच्या रचनेत वात्सल्य रसाचा तर ठायी ठायी प्रत्यय येतो. तो असा,
विठू माझा लेकुरवाळा| संगे गोपाळांचा मेळा॥
किंवा
मी वत्स माझी गाय| न ये आता करू काई॥
येई माझिये हरिणी| चुकले पाडस दासी जनी॥
किंवा
कां गे निष्ठुर जालीसी| मुक्या बाळाते सांडिसी॥
तुज वाचोनिया माये| जीव माझा जावो पाहे॥
मी वत्स माझी माय| न ये आता करू काई॥
प्राण धरलिये कंठी| जनी म्हणे देई भेटी॥
देव आणि भक्त यांच्यातील नातं म्हणजे आई आणि लेकरू असं संत सांगतात. या नात्यातूनच संतांच्या काव्यात वत्सल रसाचा परिपोष झालेला आहे. जनाबाईंच्या कविताही याला अपवाद नाहीत. भक्तिरसाबरोबरच शांत रसही त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतो.
ऐसी विश्रांती लाभली| आनंद कळा संचरिली॥
तेथे सर्वांग सुखी झाले| लिंग देह हरपले॥
विठ्ठलानं दर्शन देताच मनात उचंबळलेल्या भावना शांत झाल्या आणि शांत रसात न्हाऊन निघाले, असा प्रत्यय या कवितेतून येतो. विठ्ठलाच्या, कृष्णाच्या खेळकर वर्णनात हास्यरस, परमेश्वराच्या गूढ रूपाच्या वर्णनात अद्भूत रसाची निर्मिती त्यांच्या कवितेतून होताना दिसते. थोडक्यात जनाबाईंची कविता रसोत्कटतेचा प्रत्यय देणारी आहे. त्यांच्या प्रेमळ अंत:करणातून कविता अवतरलेल्या असल्यानं या कविता भावगंगा आणि रसगंगेतून न्हाऊन निघाल्या आहेत, असं म्हणता येईल.
जनाबाईंची आगळी वेगळी वर्णन शैली आहे. कवितेतील घटनाप्रसंगांची वर्णनं चित्रमय आहेत. गोकुळातील कृष्णांच्या बालक्रीडेचं केलेलं वर्णन पुढीलप्रमाणे चित्र उभं करतं.
वैकुंठाचा हरी| तान्हा यशोदेच्या घरी॥
रांगतसे हा अंगणी| माथा जावळाची वेणी॥
पायी पैंजण आणि वाळे| हाती नवनीताचे गोळे॥
धन्य ते यशोदा ते माय| दासी जनी वंदी पाय॥
अशी चित्रमयता त्यांच्या काव्यातून पाहावयास मिळते. या दृष्टीनं त्यांच्या ‘हरिश्चंद्र आख्यान’ आणि ‘थालीपाक’ या रचना प्रत्ययकारी बनल्या आहेत. वर्णनातील अकृत्रिमता, वर्णन कुशलता आणि समर्पक शब्द योजना असे काही विशेष त्यांच्या वर्णन शैलीचे सांगता येतात.
जनाबाईंच्या वर्णनशैलीचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांच्या वर्णनातून व्यक्त होणारं त्यांचं मन हा होय. जनाबाईंच्या हृदयातील मातृत्वाचा भाव कृष्णलीला वर्णनातून प्रत्ययास येतो. ‘हरिश्चंद्र आख्यान’ आणि ‘थालीपाक’ या रचनांतून जनाबाईंच्या मनातील भावविश्वाबरोबरच जीवनानुभवांचीही अभिव्यक्ती होते. दैनंदिन जीवनातील अनुभव घेत असताना त्यांच्या मनात येणारे विचार, भावना त्यांच्या काव्यातील वर्णनातून स्वाभाविकपणे व्यक्त होत असतात. स्त्रीमनाचे सर्वच पैलू त्यांच्या वर्णनशैलीतून कवितेत अवतरतात, तेव्हा त्यांची कविता उत्कटतेचा प्रत्यय देते. प्रेमळ हृदयाची प्रासादिक अभिव्यक्ती म्हणजे संत जनाबाईंच्या कविता होय.
जनाबाईंच्या कवितेमध्ये स्वाभाविक अलंकाराचं सौंदर्य आहे. अनुप्रास, यमक या शब्दालंकाराप्रमाणंच रूपक आणि दृष्टांत असे अर्थालंकारही कवितेला सौंदर्य प्राप्त करून देतात. या अलंकारांची सहज आणि स्वाभाविक योजना कवितेत झालेली आहे. त्यामुळे तर त्यांच्या कविता अधिक सुंदर झालेल्या आहेत. ‘जळ कोपे जळाचरा’, ‘तुळशीचे वनी| जनी उकलिते वेणी॥’ अशी अनुप्रास योजना नादमाधुर्याचा प्रत्यय देणारी आहे. स्वाभाविक यमक योजनेची तर असंख्य उदाहरणं जनाबाईंच्या कवितेत पाहावयास मिळतात. ‘प्रेमभावे तुम्ही नाचा| राम रंगे रंगो वाचा॥’ अशा अलंकाराची योजना हा तर जनाबाईंच्या कवितेचा विशेष आहे.
आपल्या मनातील भाव, कल्पना आणि विचार सांगण्यासाठी जनाबाई समर्पक अशा दृष्टांतांची स्वाभाविक योजनाही कवितेत करतात. त्यांच्या काव्यातील दृष्टांताचं एक उदाहरण असं –
नोवरीया संगे वर्हाडीया सोहोळा|
मांडे, पुरणपोळ्या मिळे अन्न॥
किंवा
पक्षी जाय दिगंतरा| बाळकासी आणी चारा॥
दृष्टांताप्रमाणंच जनाबाईंच्या कवितेतील रूपक योजनेतून सौंदर्यही प्रतीत होतं. दळणाच्या जात्यावर त्यांनी योजलेलं सांग रूपक आशयाला अधिक संपन्न करताना दिसतं-
जहाज तारिले| शेवटी उगमासी आले॥
भाव शिडासी लाविला| नाम मरारा सोडिला॥
किंवा
निकरीचे नाणे| शुध्द ब्रह्मीचे ठेवणे॥
असं त्यांच्या काव्यातील रूपकांचं स्वरूप आहे. याशिवाय काव्यात अतिशयोक्ती, स्वभावोक्ती असेही काही अलंकार आहेत. त्यांच्या काव्याला अलंकारांनी नटण्याचा सोस मात्र नाही. जनाबाईंच्या काव्यातील प्रतिमासृष्टी सुबोध आणि सुलभ आहे. त्यांच्या काव्यातील प्रतिमा त्यांच्या भावविश्वाचे आणि जीवन जगण्याचे संदर्भ सांगणार्या आहेत. जनाबाईंच्या प्रत्यक्ष जीवन जगण्यातून, सभोवतीच्या परिस्थितीतून आणि त्यांना आलेल्या जीवनानुभवातून ही प्रतिमासृष्टी साकार होते. अर्थात त्यामुळं त्याच त्या प्रतिमा कवितेत येतात हेही खरं आहे. जनाबाईंच्या प्रतिमासृष्टीचं स्वरूप पुढील रचनेतून लक्षात येतं –
सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके|
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला॥
जीवशीव दोनी खुटे गे प्रपंचाचे नेटे गे|
लावूनी पाची बोटे गे, तू ये रे बा विठ्ठला॥
या रचनेतील जाते, खुंटा, दळण, आधण यांसारख्या प्रतिमा स्त्रीजीवनाशी संबंधित आहेत. याशिवाय हरिणी, गाय, पाडस, रांड, रंडकी, मढे, अंगण, वांझेची संतती, माहेर, वर्हाडी, मांडे, पुरणपोळ्या, आंधळ्याची काठी, माय-बाप, माय-लेकरू, गाय-वासरू यांसारख्या लौकिक जीवनातील प्रतिमा जनाबाईंच्या रचनांतून येतात. त्यांच्या पारमार्थिक जीवनातून, भक्तिभावातूनही काही प्रतिमा काव्यात आल्या आहेत. याचं एक उदाहरण असं –
पक्षी जाय दिगंतरा| बाळकासी आणी चारा॥
घार हिंडते आकाशी| झाप घाली पिल्लापाशी॥
वानर हिंडे झाडावरी| पिली बांधुनी उदरी॥
तैसी आम्हासी विठ्ठल माये| जनी वेळोवेळा पाहे॥
थोडक्यात, जनाबाईंच्या काव्यात प्रतिमांना भक्तिभावाची उंची आहे. लौकिक जीवनाचं अधिष्ठान आहे. आणि मुख्य म्हणजे या प्रतिमा बाळबोध वळणाच्या आहेत.
जनाबाईंच्या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेतील शब्दकळा. दैनंदिन जीवनातील, नित्य वापरातील, बाळबोध पण अर्थपूर्ण शब्दांतून साकार होणार्या कविता म्हणूनच आगळ्यावेगळ्या वाटतात. त्यांच्या या शब्दांना नाद आहे. ध्वनीमुळे लय आहे आणि मुख्य म्हणजे लौकिक जीवनात या शब्दांचा वापर आहे. कैचा, काया, वाचा, चोखट, शिळा, धनवंत, नर्ककुंडी, दळण-कांडण, टांकसाळ, पारख, चांदी आटविणे, संसाराची बेडी, ध्वजा, चौरसीचे झोके, दासी, रांड-रंडकी, चुडा, सदा, नि:संग, वाया, पाय-चुरणे, रंभा पाठीशी लागणे, बरवा, लेकुरवाळा, नोवरी, वर्हाडी, कवणे, अंबोल्या सांडून भीक मागणे, माये, सखये, गडणे, पदरी घेणे, उचित, हासे करणे, आंधळ्याची काठी, जार, यार, सखा, दंडवत, घरदार बोळविणे, साजणी, शीण येणे, जिणे, परिसा, दुणेदार, परदेशी, भवजळ, डोई, पाटी, गांजणे, विसाण, पाखडणे, गुज, इंगळाची खायी इत्यादी शब्द मराठीच्या बोलीशी नाते सांगणारे आहेत, त्यामुळंच जनाबाईंच्या कवितेत एक प्रकारचा जिवंतपणा प्रत्ययास येतो.
साऱ्या सख्या जनीच्या मी जातिपल्याडची