दळिता कांडिता

रुपाली पेठकर

संत जनाबाई या नामदेवरायांच्या घरच्या दासी. आजच्या भाषेत मोलकरीण. मग आजच्या मोलकरणींना त्यांच्याशी आपलं नातं वाटतं का? सर्व संतांचे व्यवसाय आज करणारे त्या त्या संतांशी स्वतःला जोडून पाहतात. तसं जनाबाईंच्या बाबतीत का होत नाही? केवळ त्यांची खरी जात आपल्याला माहीत नाही म्हणून? आजच्या मोलकरणींशी साधलेला मोकळा संवाद.

देवाशी एकरूप होऊनही माणसांकडून ज्यांच्या वाटेला उपेक्षित जिणं आलं त्या संत जनाबाईंचा खडतर प्रवास आजही संपलेला नाही. संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून त्यांचं उभं आयुष्य गेलं. शेणगोठा, भांडीकपडे, दळणकांडण या त्यांनी जन्मभर केलेल्या कामाचा वारसा चालवणार्‍या महिला आजही आहेतच. आपल्यापैकी अनेकांच्या घरात आहेत. पण फक्त त्यांचं जनाबाईंशी नातं सर्रास सांगण्याची पद्धत आपल्याकडं नाही. त्यामुळं ते आपल्याला कळू शकत नाही एवढंच.

नामदेव शिंपी, सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनार अशा सगळ्या संतमंडळींचे व्यवसाय आज करणारे त्या त्या संतांशी आपलं नातं सांगतात. पण जनाबाईंचं असं नाही. त्या नामदेवांच्या घरच्या दासी, आजच्या भाषेत मोलकरीण. पण आजच्या मोलकरणींपैकी कोणीच जनाबाईंशी नातं सांगताना आढळत नाही. त्याचं कारण जात. प्रत्येक संताचं वाटप आपण त्याच्या गावगाड्यातल्या व्यवसायानुसार नाही, तर जातीनुसार करून घेतलंय. सर्वच जातींनी. यात कोणताच अपवाद नाही. अगदी ज्या ब्राह्मण समाजानं संत ज्ञानेश्‍वरांना जन्मभर ब्राह्मण म्हणण्यास नकार दिला, तोच ब्राह्मण समाज आज त्यांना ‘आपले’ म्हणून मिरवतो आहे. अपवाद फक्त जनाबाई. कारण त्यांचं संतपदी पोचणं आपल्याला पुरेसं ठरलं नाही. त्यांची नक्की जात आपल्याला माहीत नाही. त्यामुळं त्यांच्याशी थेट नातं सांगणारी जात जमात आपल्याकडं नाही. पण त्यांच्या कामाचा, व्यवसायाचा वारसा आजही चालवला जातोय. मोलकरणी सर्वत्र आहेत. ‘स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ या जनाबाईंनी दिलेल्या आश्‍वासनाची त्यांना खूप आवश्यकता आहे. त्यांचे कष्ट कधीच संपत नाहीत. त्यांच्या कामाला आजही सन्मान मिळत नाही. जनाबाईंच्याच शब्दांत सांगायचं तर एक पांडुरंगच त्यांचा पाठीराखा आहे.

या विषयावर काम करताना सुरुवातीलाच मला आठवली ती आमची पहिली मोलकरीण. मोलकरीण या शब्दाला परंपरेनं अनेक चांगले वाईट पूर्वग्रह जोडलेले आहेत, त्यामुळं त्याला पर्याय म्हणून ‘डॉमेस्टिक वर्कर’ किंवा त्याचं हिंदी भाषांतर घरेलू कामगार हे शब्द आजकाल लिहिताना सर्रास वापरले जातात. पण त्याऐवजी ज्यांचं काम मोलावर ठरवलं जातं त्या मोलकरणी, या अर्थाने मोलकरीण शब्द या लेखात वापरलेला आहे. तर माझी पहिली मोलकरीण आठवण्याचं कारण त्यांचं नाव, जनाबाई.

खूप वर्षांनी मी जनाबाईंना भेटले. त्यांच्याविषयी मला खरं तर कधीच फारसं काही माहीत नव्हतं. त्यांचं शांत आणि स्वच्छ काम करणं, माझ्यासाठी पुरेसं होतं. त्या एकदा एका घरात काम करून तिथला एसी लावून झोपल्या अशी आवई उठली आणि आमच्या इमारतीतील त्यांची सगळी कामं गेली. पण आजही माझ्या सासरच्या मूळ घरी त्याच काम करतात. तिथे कधीही त्यांची तक्रार आली नाही. आज ते आठवताना विठ्ठलाचे दागिने चोरल्याचा खोटा आळ आलेली जनीच माझ्यासमोर उभी राहिली. तेव्हा किंवा आता, घरातली सगळ्यात बारीकसारीक कामं करणार्‍यांवर आळ घेणं सोयीचं असावं बहुतेक.

आमच्या जनाबाई देखील जनाबाईंसारख्याच मूळ परभणी जिल्ह्यातल्या. तिथल्या एका मातंग समाजातल्या हंगामी व्यापार्‍याची ती मुलगी. पंढरपूरची मोठ्या एकादशीची वारी करून माझे वडील घरी आले आणि माझा जन्म झाला म्हणून माझं नाव जनाबाई ठेवलं, असं त्या अभिमानानं सांगतात. पुढे त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी ज्ञानेश्‍वर आणि पुतण्याचं नाव सोपान ठेवल्याचंही सांगितलं. शाळेत ही पोरं गेली की ‘या संतांनो’, असं शिक्षक गमतीनं म्हणायचे, हे सांगताना त्यांना हसू आवरत नव्हतं. आपण दलित असलो तरी बौद्धधर्म स्वीकारलेला नाही. आपण हिंदूच आहोत, असं स्पष्ट करत त्यांनी सुरुवात केली, ‘आमच्यात देव आहेत ना. विठ्ठलाचा फोटो किंवा मूर्ती असतातच आमच्या सगळ्या लोकांच्या घरात. मी, माझ्या ज्ञानेश्‍वरनं, सोपाननं आणि धाकट्या मुलानं तर माळदेखील घातलीये. आम्ही मटान वगैरे काही खात नाही. शिवाय देवी, गोवर आल्या तर आम्ही सटवाईला ‘पान’पण ठेवतो सातव्या दिवशी. पण ते वारी वगैरे कधी जमलं नाही. आमच्या बाजूला आमच्या समाजातलीच एक बाई संतांबाबत चांगलं सांगायची. मुक्ताबाई, सगुणा, सावित्री अशी नावं तिच्याकडून ऐकली. पण जनाबाईंबद्दल काही आठवत नाही. पण माझं नाव एका संताचं आहे, याचा मला आता आनंद वाटतोय. कधी ना कधी मी एकदा नक्की वारी करून पांडुरंगाबरोबर जनाबाईंचंही दर्शन घेऊन येईन’.

भोळ्याभाबड्या समजुतीनुसार त्यांनी देव, अंधश्रद्धा आणि वारकरी परंपरा सगळं एकत्रच करून टाकलं होतं. ते वेगळं आहे, हे त्यांना सांगणारं कुणी नसावंच. कारण प्रत्यक्षात वडील लहानपणी गेल्यानंतर त्यांचा या परंपरेशी काही संबंध उरला नाही. जनाबाई कोण होत्या, त्यांचं नाव आपल्याला का दिलं, हे त्यांना ठाऊक नाही. वडिलांचा आसरा संपला आणि  सासरी  आल्यावर त्या अखंड जनाबाईंसारखं मोलकरणीचं जिणं जगत आहेत. त्यात या जनाबाईंना त्या जनाबाई समजून घेणं झालं नाही, एवढं मात्र खरं. स्वतः दलित असून डोंबिवलीतल्या बाह्मण घरांच्या थेट स्वयंपाकघरांमध्ये त्या वर्षानुवर्ष काम करत आहेत. त्यामागे मराठी मातीत संतांनी रुजवलेलं समतेचं तत्त्वज्ञान आहे, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं. जनाबाई समजून घेतल्या की ते समजू शकेल कदाचित.

आज अशा अनेक जनाबाई छोट्या मोठ्या शहरांमध्ये काम करत आहेत. काही संघटना मोलकरणींची मोट बांधून, त्यांना घरेलू कामगार असं संबोधून त्यांचे हक्क आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळं कळतं की जसा काळ बदलतोय तसं मोलकरणींच्या प्रश्‍नांचं स्वरूपही बदलत आहे, पण प्रश्‍न संपत नाहीत. त्यामागील असुरक्षिततेचं भयही संपत नाही. त्यातलं सगळ्यात मोठं भय असतं ते काम गमावण्याचं. हे समजून घेण्यासाठी मी भारती शर्मांकडे पोचले. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातल्या मोलकरणींसाठी काम करणार्‍या ‘महाराष्ट्र महिला परिषदे’च्या त्या संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी बरीच माहिती सांगितली. भारतातील प्रत्येक राज्यातील मोलकरणींचे प्रश्‍न हे वेगळे आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागांत आजही मोलकरणीनं भांडी घासली की त्यावर पाणी टाकून ती वापरायला घेतली जातात. घरातल्या गडीमाणसाची बायको हीच त्या घरची हक्काची कामकरीण असते. पण आता गावात सर्वच प्रकारच्या मजुरांची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्यांना सन्मानानं वागवण्यास सुरुवात झाली आहे. इथं शहरांमध्ये मदतीचा हात – हेल्पिंग हॅण्ड – म्हणून मोलकरणींकडे पाहिलं जाऊ लागलं आहे. इथं गावांसारखे जातीयतेतून निर्माण होणारे प्रश्‍न क्वचितच उभे राहतात. त्यांना वागणूकही बरी मिळते. पण शहरांत राहण्याचे इतर प्रश्‍न बिकट आहेत.

भारतीताईंना भेटायला गेले तिथं आठ-दहा मोलकरणी एकत्र आल्या होत्या. मी विचारताच त्या भडाभडा बोलू लागल्या. ‘आम्हाला महिन्याला किमान दोन रविवार तरी पगारी सुट्ट्या हव्या आहेत’, असं वयानं सीनियर असलेल्या सुनंदा भड सांगत होत्या. ‘बघा नोकरीवाल्या बाया महिन्यातून चार नायतर आठ दिवस सुट्टी घेतात. त्यांना घरातली कामं करावीच लागतात. आम्ही फक्त दोनच रविवार सुट्टी मागतो, तर काय चूक आहे?’ सुनंदाताई विचारत होत्या. ‘वर्षातून एकदा गावी जाण्यासाठी महिनाभर फुल पगारी सुट्टी हवी’, अशी मागणी प्रेमला रोहिले यांनी सांगितली. ‘प्रत्येक मालकीणबाई वेगवेगळ्या वेळी गावी जातात. त्यांना वाटतं आम्हाला तेव्हा सुट्टी मिळतेच की. पण तुम्हीच सांगा, आम्हालापण आमच्या गावी, लग्नकार्यासाठी जावं वाटतंच ना. मग तुमच्या घरी मरमर राबणार्‍यांना एक महिना सुट्टी फुल पगारी मिळाली, तर काय चूक आहे?’, असा हक्क विद्या गुरव मागत होत्या. ‘आम्ही काय मोठाल्या हास्पिटलात जात नाही. इथल्याच डॉक्टरकडे दवादारू घेतो. मग सगळ्या मालकिणींनी मदत केली, तर आम्ही लवकर बरे होऊ आणि लवकर कामावर परत येऊ.’ मनात कितीही असलं तरी त्या मालकिणींशी ही गोष्ट सहजासहजी बोलू शकत नाही. कारण या सगळ्या मागण्यांपेक्षा महत्त्वाची असते त्यांची नोकरी. एखादी मोठी सुट्टी घेऊन आल्यानंतर पुन्हा तीच कामं मिळतील याची हमी तरी हवी, असं या मोलकरणींचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्याच्या मागे कामं गमावण्याची, पैसा तुटण्याची भीती असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासून उभे असल्याचं मोलकरणी मिळून सांगतात.

त्यात जर एखादी मोलकरीण एकटी आणि नवीन असेल तर तिला मिळेल त्या पैशातून सुरुवात करावी लागते. सविता आता ठाण्याला असते पण सहा वर्षांपूर्वी पुण्यात तिनं कामाला सुरुवात केली. लग्न झाल्यावर नवरा काही दिवस बरा वागला तिचा. नंतर नुसती मारझोड करी. गरोदर राहिली की मूल पाडायला लावी. वरून एक सवत आणून ठेवली होती. ‘बाई काहीपण सहन करेल पण सौतन नाही सहन करत, ताई. मी सोडला त्याला. नंतर माझे हाल कुत्रं खाईना असे झाले होते. तेव्हाच पुण्यात वारीचा मुक्काम होता. तेव्हा जरा खायला, प्यायला मिळालं लोकांकडून. मी म्हटलं जाऊया लोकांबरोबर. पुढचे काही दिवस खायला तरी मिळेल. तेव्हा एका सायबानं विचारलं आमच्या इथे काम करणार का? मी हो म्हटलं. मग त्यांच्या ओळखीतून पुढे लोकांची कामं मिळत गेली. मी वडार्‍याची आहे. महिन्याचे ‘ते’ चार दिवस मला सुट्टी मिळते. पण त्रास कमी झाला नाय. नवरा येऊन जाऊन मारझोड करतो. दुखलं खुपलं तर बघायला कोणी नसतं.’ या सगळ्यात संत जनाबाईंबाबत तिला विचारल्यावर ती खूप सहज म्हणाली, ‘मला नाही माहीत संत बिंत. जनाबाईंच्या मदतीला इठोबा आला होता. तोच काबाडकष्टाचा मार्ग मलापण त्यानंच दाखवलाय.’ नंतर ती शब्दांत सांगू शकत नव्हती पण तिला म्हणायचं असावं, विठ्ठल हे कष्टकर्‍यांचं दैवत आहे.

ठाणे शहरालगतच्या मुंब्र्यात राहणार्‍या प्रेमलाताई सांगतात, ‘आमच्या इथल्या घरेलू कामगार या प्रामुख्यानं डोंबिवली, ठाणे आणि मुंब्र्यात काम करतात. मुंब्र्यात खोजा मुस्लिमांच्या घरात प्रामुख्यानं काम करतात. तर डोंबिवली ठाण्यात प्रामुख्यानं नोकरी करणार्‍या बायकांच्या घरात काम असतं. त्या बक्षीस म्हणून सणावाराला शे-दोनशे रुपये देतात. तर खोजा लोक हे व्यापार, धंदेवाले असतात. त्यांच्या बायका घरीच असतात. त्यांच्याकडून जुन्या साड्या, मिठाई मिळते. वर्षानुवर्षांचं काम आणि त्यातून निर्माण झालेलं विश्वासाचं नातं यातूनच हे काम टिकून राहतं. पगार काही फारसा वाढत नसेल, पण सणावाराला घरातून मिठाईचा पुडा, थोडे पैसे मिळतात. वेळेला आगाऊ रक्कमही मिळू शकते. त्यामुळे अशी कामं धरून ठेवण्यात फायदा असतो.’ पण या मिठाईच्या पुड्यापेक्षा आणि जुन्या साड्यांपेक्षा एखादा पगार जर जास्त दिला, तरच आम्हाला त्याचा आधार होईल, असंही त्यांना वाटतं.

अशा कामांमध्ये सहा महिन्यांतून दोन चार दिवस दांडी झाली तरी कामं गमावण्याची फारशी भीती उरत नाही. पण कधी दांड्या जास्त झाल्या तर पगार कापून घेतला जातो. याशिवाय त्यांच्या आजाराची जबाबदारी ही काही त्या घरमालकिणीची नसते. दुर्दैवानं कुटुंबाचंही याकडे दुर्लक्षच असतं. तिच्याच पैशांवर घर चालत असतं पण स्वतःची कमाई दारूत ओतणार्‍या त्यांच्या नवर्‍यांचाही ती केवळ घराला हातभार लावते, असाच दावा असतो.

इतक्या वेळ शांत असलेल्या गंगाबाई नावाच्या एक आजी म्हणाल्या, ‘वर्षानुवर्ष काम करून आमच्या मोलकरणीच्या जातीला सांध्याची दुखणी असतातच. नाना प्रकारच्या पावडरी वापरल्यानं त्वचेचे विकार होतात. तसंच म्हातारपणी थकलो म्हणून पोरं, सुनाही नीट खाऊ पिऊ घालत नाहीत. आयुष्यभर वाटेला शिळंपाकंच असतं.’ पण त्या स्वतःदेखील भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करताना दिसत नाहीत. पोटाची दोन वेळची खळगी भरावी आणि आपल्या पोरीबाळींनी शिक्षण घ्यावं. त्यांनी जनाबाईंच्या या पंथात पडू नये, म्हणूनच त्यांची धडपड सुरू असते. याबाबत सुनंदाताई सांगतात, ‘इथे मोलकरणींच्या मुलीच परत मोलकरणी झाल्याचं चित्र दिसत नाही. नव्या मोलकरणींचा जन्म हा जास्त करून लग्नानंतर होतो.’ सासरची गरिबी, घरातल्या पुरुषाची व्यसनाधीनता आणि नवर्‍याच्या निधनानं किंवा सोडल्यानं एकटीचं उरणं यामुळं मोलकरणीचं काम करावं लागतं. मग शिक्षणाचा अभाव, कंपन्यांत कारागिरी करण्यासाठीचं कौशल्यं नसणं, यातून मोलकरणीच्या कामाला पर्याय नसतो. त्यात काही नव्यानं शिकावं लागत नाही. जे स्वतःच्या घरी करत असतात, तेच दुसर्‍याच्या घरी करावं लागतं. आम्हाला कधी दिवाळीचा बोनस मिळत नाही. मालकांची खुशी आणि दानधर्म म्हणून जे काही पैसे मिळतील तेवढीच वरकमाई. पूर्वी मोलकरीण म्हणून काम करणार्‍या पण सध्या पोळीभाजीची टिफिन बनवणार्‍या अलकाताई सांगतात, ‘आमचा कोणताही विमा नसतो. नोकरी गेली तरी नुकसानभरपाई मिळत नाही. ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड या सगळ्या तर खूप दूरच्या गोष्टी आहेत. हक्काचंही मिळतंच असं नाही. रेशन कार्डावरचं स्वस्तातलं धान्य आता कुणाच्याच हाती लाभत नाही. स्वतः धंदा करावा यासाठीची कोणतीही कला कोणी शिकवत नाही. राहतो त्या झोपडपट्ट्या स्वच्छ नाहीत. स्वच्छ पाणी नाही. उलट पोटभर चांगलं खाणं नसल्यामुळे आजार मागे लागतात. कंबर, गुडघे यांचा भुगा होतो. टीबीसारखा आजार असलेल्या तर कितीतरी बायका आहेत.’ त्यांचा सूर हताशपणाचा होता.

साधारणतः या सगळ्यावर न्याय मिळवायचा असेल तर संघटित होणं आणि युनियन बांधणं हा त्यावरचा रामबाण उपाय. पण अजूनही कंपन्या किंवा ऑफिसांत काम करणार्‍यांसारख्या मोलकरणींच्या संघटना उभ्या राहताना दिसत नाहीत. या घरकामाला मुळात काम म्हणून मान्यता नाहीच. हक्कासाठी फारच अकांडतांडव केला तर कामं जाण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळं केवळ मालकीण आणि मोलकरीण यांच्या विश्‍वासावरच हे नातं आधारलेलं आहे. प्रत्येकीचा काम करण्याचा वेग वेगळा, यामुळं हे काम तासांवर मोजता येत नाही. प्रत्येकीची काम करण्याची पद्धत वेगळी त्यामुळं त्याची गुणवत्ता ठरवता येत नाही. प्रत्येक बाईचा स्वभाव आणि प्रश्‍न वेगळे असतात. या कामात वेळेची लवचिकता असते. आपल्या घरातील स्वयंपाकपाणी, मुलं सांभाळून काम करता येतं, ही यातली जमेची बाजूही असते. किंबहुना संसारातली गरज ही त्यांची प्रेरणा असते, विठ्ठल असतो.

नवी मुंबईत काम करणार्‍या कौसल्याबाईंना मात्र जनाबाई त्यातल्या त्यात माहीत आहेत. त्या पुण्याजवळच्या. माहेरी गावी आणि सासरी कुर्ल्यातल्या चाळीत, दोन्ही ठिकाणी वारकरी प्रभाव आहे. कीर्तनात, सप्त्यात इथं तिथं जनाबाईंच्या गोष्टी ऐकल्यात, ‘जनाबाई आमचीच. आमच्यासारखंच दिवसरात काम करणारी. एकदा तिनं थापलेल्या गोवर्‍या नामदेवांनी चोरल्या. एवढे मोठे संत पण त्यानंही आपल्या दासीच्या गोवर्‍या चोरल्या. जनाबाईला संशय आला. ती म्हणाली, ज्यातून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल त्या गोवर्‍या माझ्या. कुणीबी चोरलं तरी कष्टाची चोरी होऊ शकत नाही. देव मेहनतीच्या बाजूनं असतो.’ कौसल्याबाईंचं ऐकून सगळ्याजणी टाळ्या वाजवतात. त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळंच हसू दिसतं. खरं तर जनाबाईंच्या गोवर्‍यांतून विठ्ठलनाम ऐकू येतं, ही सर्रास कबिरांच्या संदर्भात सांगितली जाणारी आख्यायिका. ती कौसल्याबाईंना नीट आठवतही नाही. जनाबाईंची प्रत्येक गोष्ट ही नामदेवांशी जोडलेली असेल असं समजून त्या इथं नामदेव घुसवतात. पण त्यांनी त्यातून शोधलेलं मर्म मात्र बावनकशी असतं. तेव्हा वाटतं कौसल्याबाईंइतक्या का होईना पण जनाबाई पोचायला हव्यात. त्या जनाबाई त्यांना बळ देऊ शकतात. पण ते बळ आजवर कुणीच मिळवून दिलं नाही. इतर संतांचं नाव घेऊन आपापल्या कामांना प्रतिष्ठा मिळवण्याचं काम सगळ्यांनी केलं. मोलकरणींच्या बाबतीत असं घडलं नाही. कधी जनाबाईंना मोलकरीण म्हणून मोलकरणींसमोरचा आदर्श बनवण्यातच आलं नाही. सर्व विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी मोलकरणींच्या संघटना बांधल्या. पण जनाबाई आणि मोलकरणी हा सांधा कुठंच जोडण्यात आलेला दिसत नाही. जनाबाईंच्या नावानं मोलकरणींची संघटना कुठंही नाही. मोलकरणींनी एकत्र येऊन कधी जनाबाईंचं देऊळ बांधल्याचं ऐकिवात नाही. जनाबाईंच्या नावानं घरेलू कामगारांसाठी एखादी योजना असावी, असं सरकारातल्या कुणाला कधी सुचलं नाही. रोजच्या रगाड्यात पिचून जाणार्‍या या कष्टकरी महिलांपर्यंत आजवर जनाबाईंची प्रेरणा कधीच कुणी मिळवून दिलेली नाही. असं कुठे होऊ शकेल का? परिस्थिती बदलेल का?

मी सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघते. मी दारातून बाहेर जाताना मला भारतीताईंचा आवाज ऐकू येतो, ‘तुम्हाला बचतगटांसाठी नवी नवी नावं हवी असतात ना! आता पुढच्या गटाला संत जनाबाईंचं नाव देऊ या. आपल्याच त्या. आपल्या हक्कांसाठी लढायची ताकद तरी मिळेल…’

जनाईच्या लेकीचं लेकरू

२८ मे २००८. चुरगळलेली नऊवारी साडी…चेहर्‍यावर वार्धक्याच्या खुणा… हातात मळकट वटकळी…आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या ऑफिसजवळ ताटकळत उभ्या असलेल्या माऊलीला आपल्या लेकराला एक भेट द्यायची होती. पंढरीच्या सावळ्या विठूला या माऊलीनं थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एक लाख शंभर रुपयांची भेट दिली. मंगळवेढा तालुक्यात एका छोट्याशा गावात राहणार्‍या सोनाबाई श्रावण फाळके होत्या त्या. केरसुणी विकून या ७६ वर्षांच्या माऊलीनं आपल्या मुलीसाठी पै-पै गोळा करून एक लाख रुपये जमविले होते. मात्र अचानक मुलीचा मृत्यू झाल्यावर एवढ्या पैशांचं करायचं काय म्हणून त्यांनी आपलं दुसरं लेकरू असलेल्या विठ्ठलाला मनातील भक्तीचा ठेवा पैशाच्या रूपानं देण्यासाठी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर गाठलं. माझ्या लेकराला देनगी करायची हाय, असं फाळके यांनी मंदिराच्या कर्मचार्‍यांना सांगितलं. पिशवीतील वळकटी सोडल्यावर कर्मचार्‍यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यात शंभरच्या नोटांची अनेक बंडलं होती. ती त्यांनी एका पतसंस्थेत थोडंथोडं करून जमवली होती. माझ्या लेकराला, माझ्या देवाला, देनगी द्यायची हाय, असं सांगून ती माऊली काही क्षणांतच तेथून निघून गेली. नंतर मंदिर समितीनं सोनाबाईंना शोधून काढलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आग्रह करून त्यांचा सत्कार घडवून आणला. तेव्हा त्या म्हणत होत्या, माझा फटू कशाला काढताय, माझ्या लेकराला पैसं दिलं हाय.

माझें अचडे बचडे| छकुडे गे राधे रुपडे| असं म्हणत जगन्नियंत्या विठ्ठलाला आपलं मूल मानून लाड करणार्‍या जनाबाईंची ती भावना आजही जिवंत आहे. सोनाबाई या जनाबाईंच्या लेकीनं विठ्ठलाला लेकरू मानून ते सिद्ध केलंय.

– सचिन कसबे

0 Shares
जनीला नाही कोणी माहेरात पोरकी