‘टाळ, मृदंग, तुळशीमाळा आणि टिळा म्हणजे विठ्ठल नाही. तर जन्मजात भोगांतून मुक्ती देण्याचा समन्यायी विचार म्हणजे विठ्ठल. हे सांगण्याचा प्रयत्न संतांनी कळवळून केला. ही कळकळ आपल्या हृदयाला पूर्ण ताकदीनं अद्याप भिडलेली नाही, हेच दाखवणार्याी घटना आपल्या आसपास सतत घडत असतात...’ जनाबाईंच्या निमित्तानं आपल्या डोळ्यांमध्ये नव्यानं अंजन घालणारा हा लेख.
संत जनाबाई असा उच्चार झाला, की आपल्या सरावलेल्या कानांना, डोळ्यांना आणि मनांनाही ‘नामयाची जनी’ हेच संबोधन पटकन जाणवू लागतं. ते तसं ठीकही आहे म्हणा, कारण वर्षानुवर्ष आपण तेच आणि तसंच तर ऐकत आलोत. खुद्द जनाबाईंच्याच कानामनाला, दृष्टीस्पर्शाला आणि सर्व संवेदनांना नामदेवांच्या अस्तित्वाचं अस्तर आहे, असं त्यांच्या रचनांमधून दिसत राहतं. नामदेवांचा वियोग पांडुरंगालाही सहन झाला नाही आणि म्हणून त्यानं देवळाबाहेरच थांबायचं ठरवलं; रखुमाईनं विनवल्यावर ‘तयाविण मज दाही दिशा ओस| न लगे चित्तास गोड काही|’, असं उत्तर देवानं दिल्याचं सांगून
‘जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची| म्हणोनिया त्याची झाले दासी|’, असं त्यांनी स्वतःच जाहीर केल्यानं त्यांचं असणं हे नामदेवांशी जसं जोडलं गेलेलं आहे, तसंच त्यांचं दासीपदही जगजाहीर झालेलं आहे.
आपल्याकडे संतरचनांबाबत, संतांच्या जगण्या-वावरण्याबाबत लिहिता-बोलताना पारलौकिक कल्पनासृष्टी आणि भक्तिरसाचा महामूर वापर केला गेला आहे. त्यात विसंगत असं काही नसलं, तरी संतांनी जे म्हटलं आहे किंवा त्यांना जे म्हणायचं आहे त्याचा सुसंगत विचार आपण दूर लोटतो आहोत, असं मात्र वाटत राहतं. त्यांची प्रत्येक गोष्ट अलौकिक आहे, त्याला ईश्वरी स्पर्श झालेला आहे आणि त्यांच्या आनंदाचं किंवा खरं तर जगण्याचंच सर्व निधान हे परमेश्वरातच आहे, अशा मनोरचनेचा पगडा आपल्यापैकी बहुतांशांवर आहे. हा परमेश्वरही देवळातला, दगडाच्या मूर्तीतला! सगुण, निर्गुण अशा दोन्ही अंगांनी मांडणी होत असली, तरी मुख्य आधार सगुण साकार चौकटीचाच घेतला जातो हे वास्तव आहे. या मनोरचनेत देऊळ, त्यातील गाभारा, गाभार्यातील मूर्ती, त्या मूर्तीचं पूजन, पूजेअर्चेची सामग्री व्यापून उरलेली आहे. त्याला जोडून अर्थातच देवाच्या मूर्तीची देखभाल आणि पूजा करणारे बडवे नि उत्पातही आलेच. खुद्द संतांनी त्यांचे अडथळे जुमानले नसले, तरी या ठरीव आणि साचेबद्ध मनोरचनेमुळे अगदी आताआतापर्यंत हे अडथळे टिकून राहिले नि त्याचबरोबर ‘मनी नाही भाव, देवा मला पाव’ अशा वर्गवारीतल्या भक्तांची पंढरीला जाणारी गर्दी दर आषाढीला फुगत राहिली. या वाढत्या संख्येमुळे भागवत धर्माचा प्रसार महाराष्ट्रात वाढत असल्याची भाबडी समजूतही रुजली आहे अन् त्याच्या जोडीला महाराष्ट्रीय लोकांचं दिवसागणिक टोकाचं असहिष्णू होत जाणंही वाढत आहे. अगदी खरं खरं सांगायचं, तर एकेक संवेदना काढता पाय घेऊ लागल्या आहेत.
संवेदना अशा पातळ होऊ लागल्यावर संतांनी जे भोगलं त्याचे अगतिक सामाजिक संदर्भ उजळण्याची गरज न वाटणं स्वाभाविक होऊन जातं. चोखा, बंका आणि जनाबाई यांनी लिहिलेला शब्द हा निव्वळ भक्तीचा आविष्कार नव्हे, तर तो तेव्हाच्या भाषेनुसार ‘यातिहीन’ किंवा ‘वर्णहीन’ असलेल्या ‘नीच’ जातींचा आक्रोशही आहे, हे सत्य प्रथम आपण स्वीकारायला हवं. अनाथ, पोरकी जनी नामदेवांच्या घरी आश्रित होती. तिला संतपद सहजी किंवा बहुमानानं मिळालेलं नाही. जातिव्यवस्थेच्या उतरंडीत खाली असलेल्या जातींच्या लोकांना जे जे भोग भोगावे लागतात, ते जनाबाईंनीही भोगले आणि त्याबाबत मनात उठलेलं काहूरही अस्वस्थ होत मांडलं आहे. नामदेवांच्या घरातल्या स्त्रियांसंदर्भात त्या म्हणतात, ‘राजाई गोणाई| अखंडित तुझे पायी| मज ठेवियले द्वारी| नीच म्हणोनि बाहेरी| अखंडित तुझे पायी’, या छोट्याशा वाक्यातूनही जनाबाई त्या घरासाठी करत असलेल्या अविरत काबाडकष्टांचं दर्शन होतं.
दळण, कांडण, केरवारे, धुणीभांडी, शेणगोठा यातच दिवस सरणारा. जनाबाईंची जागा कोठे? तर दरवाजाच्या बाहेर. का? तर नीच जातीची म्हणून! ज्यांची संवेदना अद्याप मेलेली नाही, त्यांना इथं चोख्याची पायरी आठवली, तर ते स्वाभाविक आहे. देवळाच्या बाहेर असलेला एक अनघड दगड म्हणजे चोखा महाराची जागा. त्याला आत प्रवेश नाही. दर्शनमात्रे सुख नाही. रूप पाहता लोचनीचा परमानंद नाही. त्यानं दुरूनच कळस पाहावा. जनीनं माजघरात शिरू नये. स्वयंपाकघर भ्रष्ट करू नये. तिनं दारापाशीच थांबावं. जनाबाईंच्या अभंगांबद्दल, भक्तीबद्दल बोलताना त्यांच्या वाट्याला आलेल्या या अपमानकारक वास्तवाचा उल्लेख टाळता येत नाही आणि टाळूही नये. केसाला तेल नाही, फणी नाही, आंघोळ नसल्यानं अंग मळलेलं अशी जनाबाई डोळ्यांसमोर आणली, तर ‘श्रम बहु झाला जीवा| आता सांभाळी केशवा॥ कोण सखा तुजविण| माझे करी समाधान॥ हीन दीन तुझे पोटी| जनी म्हणे द्यावी भेटी॥’ या ओळींमागे विषमतेचे कंगोरे आणि त्यामुळे झालेल्या जखमाच दिसतील.
अध्यात्म अनुभूती म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा’ नव्हे, तर भगभगीत वास्तवाचे चरचरीत चटके देणारा अनुभव असतो ही समज आपल्याकडे अद्याप पुरेशी विकसीत व्हायची आहे. टाळ, मृदंग, तुळशीमाळा आणि टिळा म्हणजे विठ्ठल नाही. तर जन्मजात भोगांतून मुक्ती देण्याचा समन्यायी विचार म्हणजे विठ्ठल हे सांगण्याचा प्रयत्न संतांनी कळवळून केला. मात्र एकीकडे पंढरीतली गर्दी वाढत असली, तरी ही कळकळ आपल्या हृदयाला पूर्ण ताकदीनं अद्याप भिडलेली नाही हेच दाखवणार्या घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. ‘सदाचार हाच धर्म’ अशी वचने अथवा सुविचार आपण सतत वापरतो. पण सदाचाराची व्याख्या काय? कुटुंबाशी, माणसाशी माणसासारखं वागणं हे सज्जनाचं लक्षण, असं सांगून जनाबाई स्पष्टपणे निर्वाळा देतात,
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी|
अखंड द्वेष करी सज्जनांचा|
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ|
तयाचा विटाळ मातंगीसी|
वैष्णव तो एक चोखामेळा महार|
जनी म्हणे निर्धार केला संती|
लंपट, द्वेष्टे, थोरांना छळणारे, अहंकारी, ज्ञानाचा तिरस्कार करणारे हे उच्चवर्णीय असले, तरी त्यांचा विटाळ मातंग, म्हणजे शूद्रांनाही होतो आणि या तत्त्वानं चोखामेळा हे जन्मानं महार असले, तरी तेच खरे वैष्णव आहेत, असं त्या म्हणतात. ‘वैष्णवजन तो तेणे कहिये, जे पीड पराई जाणे रे’ म्हणणारे महात्मा गांधी यापेक्षा काही वेगळं सांगत नाहीत. नामदेवांच्या दारात आयुष्य घालवलेली, काबाडकष्ट करणारी, थकलीभागली अशी एक कथित हलक्या जातीची बाई हे निक्षून सांगते, तेव्हा तो केवळ अध्यात्मबोध राहत नाही, तर ही व्यवस्था मला अमान्य आहे आणि वैष्णवाची व्याख्या काय, ते तुम्ही पाखंडी लोक नव्हे तर मी ठरवणार, हा ठामपणा त्यात दिसतो. जातीप्रथा, त्यातील विषमता, त्यातून वाट्याला आलेले भोग याविषयी जनाबाई फक्त तक्रारी करत नाहीत किंवा डोळ्यांतून आसवंही गाळत नाहीत. त्या न्यायी समाजरचनेचं तत्त्वच त्यांच्या काव्यातून मांडतात. तिथंच त्या थांबत नाहीत. जाती आणि सोवळेपणाला त्या धारेवर धरतात. त्यातला पोकळपणा उघड करत म्हणतात,
यातिहीन चोखामेळा| त्यासी भक्ताचा कळवळा|
त्याचा झाला म्हणीयारा| राहे धरी धरी थारा|
देव बाटविला त्याणे| हांसे जनी गाय गाणे|…
जनाबाईंचं हे हासणं विद्रोहाचीच ठिणगी आहे. ही ठिणगी एकदाच विस्फारून अंतर्धान पावत नाही, ती धगधगत राहते आणि नंतर मुक्तीचं गीत मोठ्या आत्मविश्वासानं गाते. देवाचं पदक चोरलं असा आळ जनाबाईंवर ब्राह्मण घालतात, तेव्हा त्या लिहितात, ‘पदक विठ्ठलाचे गेले| ब्राह्मण म्हणती जनीने नेले|’…
अगे शिंपियाचे जनी| नेले पदक दे आणूनी|
देवासमोर तुझे घर| तुझे येणे निरंतर|
म्यां नेले नाही जाण| सख्या विठोबाची आण|
वाकळ झाडूनि पाहती| पडले पदक घेऊनि जाती|
जनीवरी आली चोरी| ब्राह्मण करिती मारामारी|
धाविन्नले चाळीस गडी| जनीवरी पडली उडी|
दंडी लावल्या काढण्या| विठोबा धांव रे धावण्या|
ऐसा येळकोट केला| जनी म्हणे विठो मेला|
चोरीचा आळ घेऊन एकट्या जनाबाईवर चाळीस ब्राह्मण धावून येतात आणि देवाला त्याचं काही नाही, यावरून ‘विठो मेला’ असं लिहिणं हे जनाबाई आणि विठोबाचं तादात्म्यच आहे असं नव्हे, तर रूढ कल्पनांना धक्का लावत प्रत्यक्ष देवाचीही गय न करणारी जनाबाई इथं दिसते. आणखी एका अभंगात तर त्या म्हणतात, ‘अरे विठ्या विठ्या| मूळ मायेच्या कारट्या|’
याला कोणी विरोधभक्ती म्हणेलही, पण हे शब्द म्हणजे कृतिहीन भाव, कर्मकांडी भक्ती नि बेगडी अध्यात्माचे नुसतेच लाडिक नि शाब्दिक बुडबुडे यांना जाळून टाकणारे अंगार आहेत. अलीकडच्या काही दशकांत सत्संगाच्या नावाखाली गुळगुळीत अर्थहीन बरळणं तेवढं जोरात चालू असलेलं दिसतं. प्रवचनात जीव, मोक्ष, आस, मायबाप, सत्कर्म असे शब्द पेरले, की तो उपदेश होतो अशी बोलणार्याची आणि श्रवणभक्ती करणार्यांचीही पक्की धारणा बनलेली दिसते. या पोकळपणातूनच मुखी देवाचं नाव, कपाळी गंध टिळे, वर्षाकाठी दोनचार यात्रा आणि नित्याची पोथीपठणे असली, तरी माणसं स्वतःच्या कुटुंबात, संसारात विलक्षण हाव धरून आणि अधिकारानं वागताना दिसतात नि सार्वजनिक जीवनात जातपातीची उतरंड, रूढींच्या नावाखाली स्त्रियांच्या होणार्या अवहेलना, कर्मठपणाकडे झुकणारी कर्मकांडं आणि विज्ञानाला नकार देणारी तत्त्वं यांचा पुरस्कार करतात आणि बरेचदा त्यात स्वतःही सहभागी झालेली दिसतात.
जनाबाईंकडे हे कृत्रिम, नाटकी, वरवरचं प्रकरण नाही. जे मनात तेच त्यांच्या ओठांत. ज्याच्यावर आत्यंतिक प्रेम आहे, त्यावरच आपण अधिक संतापतो हे खरं असलं, तरी जनाबाईंचं हे व्यक्त होणं केवळ इतक्याच वैयक्तिक पातळीवर नेऊ नये. त्यांनी शब्दबद्ध केलेल्या भावना या तत्कालीन समाजरचना आणि त्यातून निर्माण झालेली दुःखंच प्रतिबिंबित करतात हे लक्षात घ्यायला हवे. त्या नुसती दुःखं मांडूनही थांबत नाहीत, तर त्यातून होणारा जिवाचा तळतळाटही न घाबरता मांडतात. देवालाही गप्प राहा, तुझं मोठेपण आमच्यामुळंच आहे, असं ठणकावणं, म्हणजे हाडामांसाचा माणूस आधी आणि देव नंतर असं क्रांतिकारी तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याची पहिली पायरी आहे. त्या म्हणतात,
नाही अंगी थोरपण| मिथ्या धरिसी गुमान|
रागा येऊनि काय करिसी| तुझे बळ आम्हांपाशी|
नाही सामर्थ्य तुज हरी| जनी म्हणे धरिला चोरी|
जनाबाईंच्या अभंगांत त्यांनी केलेल्या कष्टाची, दगदगीची वर्णनं येतात. जातं धरणं, धुणी भांडी, कांडणं, सारवणं अशी सारी कामं जनाबाईंसाठी विठोबा स्वतः करतो, अशी एक समजूत आपल्याकडे पिढ्यानपिढ्या आहे. ती स्वाभाविक आहे, कारण खुद्द जनाबाईच अनेक अभंगांतून तसं सांगतात.
जनी जाय पाणीयासी| मागे धांवे हृषिकेशी| असे उल्लेख अनेकदा सापडल्यानं खुद्द पांडुरंग जनीचं जातं ओढत असे किंवा गोवर्या थापून देत असे, अशा कल्पना आणि त्यातून आख्यायिका तयार झाल्या. त्या इतक्या रुजल्या, की त्या सत्य घटनाच आहेत असं मानणार्यांची संख्या अजिबात कमी नाही. अशा चमत्कृतीत अडकल्यानं जनाबाईंनी मांडलेला एक धारदार विचार आपल्या सगळ्यांपासून काहीसा दूरच राहिलेला दिसतो. तो विचार असा, की ही कामं, हे कष्ट तर कधी संपणारे नाहीत. ते करावेच लागणार. असं जर आहे, तर ते करणं हेच देवाचं काम आहे आणि हे एकदा मानलं, की ते करण्यासाठी तुमच्या अंगी हत्तीचं नव्हे, तर खुद्द देवाचं बळ येतं.
असंच बळ अंगाशी बाळगत या समाजरचनेत कित्येक शतकं कष्टकरी वर्ग राबत आला आहे. त्याच्या मोबदल्यात त्याला ना विसावा, ना आपुलकी मिळाली. जर मिळालंच काही तर चोरीचं किंवा अप्रामाणिकपणाचं बालंट. जनाबाई या कष्टकरी वर्गाच्या प्रतिनिधी आहेत. कष्ट, अपमान, उपास, निंदा, गरिबी या सगळ्यांना पुरून उरून हा वर्ग जगाची उभारणी करत राहिला कारण कष्ट हेच त्यानं देवाचं रूप मानलेलं आहे. जनाबाई देवाला म्हणतात, ‘जाय जाय राऊळासी| नको येऊ आम्हांपाशी|’ का म्हणतात त्या असं? आणि नाही, मी तुझ्यासोबतच येणार, असं विठ्ठल तरी का म्हणतो? याचं मर्म समजून घेतलं पाहिजे. देव देवळात असतो तो सवर्ण लोकांसाठी. वर्णहीनांना तेथे प्रवेश नाही. पण खरा देव त्यांच्याबरोबरच असतो, देवळात नाही, असं जनाबाई ठासून सांगतात. चोखामेळा यांचं उदाहरण देऊन त्या म्हणतात,
चोखामेळ्याची करणी | तेणे देव केला ऋणी|
लागा विठ्ठलचरणी| म्हणे नामयाची जनी|
चोखामेळा यांनी देवाला ऋणी केलं असं म्हणणं हे चोख्यामेळा यांच्याप्रती आदर व्यक्त करणं तर आहेच, पण देवाची मातब्बरी आम्हाला काय सांगता, कारण तो तर तुम्ही ज्यांना सदा लाथाडलं त्यांच्यापाशीच असतो आणि नुसता असतो असं नाही, तर तो त्यांचा ऋणी असतो कारण हे जग त्यांच्या कष्टावरच उभं आहे हे तुमच्या बुद्धीला समजत नसलं, तरी देवाला ते चांगलंच माहीत आहे.
जनाबाई या वैयक्तिक मोक्ष, पुण्यसंचय असल्या भ्रमाच्या स्वकेंद्री जाळ्यात अडकणार्या नव्हत्या, तर पूर्णतः ऐहिक आणि सामूहिक अनुभूतींना कवेत घेऊन मनातील दुःख त्यांनी मांडलं. चोखामेळा यांच्याबाबतची त्यांची जशी बंधुत्वाची भावना, तशी ज्ञानेश्वरांबाबत सख्यत्वाची भावना दिसते. ही भावना समताधिष्ठित समाजाच्या स्वप्नातूनच आलेली आहे, कारण जनाबाई नावाच्या अस्पृश्य महिलेमधील अलौकिक संतपण जाणणारा तो सखा ज्ञानदेव होता. त्या म्हणतात,
ज्ञानाचा सागर| सखा माझा ज्ञानेश्वर|
मरोनिया जावें| बा माझ्या पोटी यावे|
ऐसे करी माझ्या भावा| सख्या माझ्या ज्ञानदेवा|
पुढील जन्मी आपल्या पोटी ज्ञानदेव जन्माला यावा, अशी आकांक्षा मनात बाळगणारी जनाबाई ही निःसंशय दूरदृष्टीची होती. तिच्यानंतर साडेसातशे वर्षांनी सनातन समाजानं नीच ठरवलेल्या समाजात एका साध्या कुटुंबात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जन्माला आले.
सल फक्त इतकाच आहे, की वेदना आणि कष्ट यांतून एक ज्ञानमय आणि न्यायावर आधारित जग निर्माण केलेल्या या माणसामधलं संतपद केवळ आपल्या ‘जाती’चं म्हणूनच बव्हंशी ज्ञानेश्वरांना वंदनीय मानणार्या ब्राह्मण समाजाला अद्यापही समजलेलं नाही. ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा जनाबाईंचा प्रसिद्ध अभंग आहे. त्यातील सर्व अठरापगड जातीचे संत विठूमाऊलीपाशी बिलगले आहेत आणि जाती गळून ते फक्त विठ्ठलमय झालेले आहेत.
जात्याभिमानरहीत समाजाचं, भेदाभेद संपून केवळ मनुष्यत्व उरण्याचं हे स्वप्न आहे. यातली विठूमाऊली म्हणजे आपली समाजरचना. प्रत्येकानं तिच्या अंगाखांद्यावर लेकराप्रमाणे खेळावं आणि तिनंही लेकरांना मोठ्या मायेनं खेळू द्यावं, हे जनाबाईंचं मागणं जरा ‘लई’च होतं की काय?
जनी म्हणे लव्ह ट्रँगल