कॉ. गोविंदराव पानसरे,
हे ‘रिंगण’ तुम्हाला अर्पण करत आहोत. तुमच्या हौतात्म्याला समर्पित. त्यानिमित्तानं तुमच्यातला विवेकाचा निखारा आमच्यात जळता राहावा म्हणून.
आधी डॉ. दाभोलकरांचा खून झाला. नंतर तुमचा. त्याला आता नऊ महिने होत आलेत. तेव्हा आम्ही सगळे हादरलो, रागावलो, चरफडलो, अस्वस्थ झालो. आता आपापल्या कामात बुडालो आहोत. कधीतरी आठवलं की वैताग होतो तेवढाच. हे असं चालायला नको, आम्ही शांत बसायला नको, हे माहीत आहे. कळतं, जळतं पण वळत नाही. तुम्ही आमच्यासाठी शहीद झालात, पण आमचं सगळं छान, शांत, मस्त सुरू आहे.
संत जनाबाईंचं हे ‘रिंगण’ तुमचंच आहे. तुम्ही देव मानत नसाल, पण जनाईला मानत होतात, हे आम्हाला पक्कं माहीत आहे. जनाबाईंचीच विवेकाची पताका तुम्ही जन्मभर खांद्यावर घेतली होती. त्यामुळंच तुम्हाला संपवण्यात आलं. जनाबाईंसाठी चंद्रभागेच्या वाळवंटात बडव्यांनी उभारलेल्या सुळाचं पाणी झालं होतं. तेच बडवे तुम्हाला छत्रपती शाहूंच्या कोल्हापुरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून गेले. डॉक्टरांनाही मारणारे तेच होते. सूळ आता साडेसातशे वर्षांपूर्वी होते तसे पातळ उरलेले नाहीत. पाणी आलं, ते आमच्या डोळ्यात. फक्त दोनचार दिवसांसाठीच. आता सुकलंय सगळं.
कॉम्रेड, पुढच्या वर्षीचं ‘रिंगण’ कुणाला अर्पण करावं लागेल, त्याची तयारी अविवेकाच्या मंडपात सुरू असेल. इथे विवेकाच्या मंडपात त्याचं कुणाला काहीच दिसत नाही. फक्त अहंकाराचे आणि आळसाचे टेंभे भकाभका जळत आहेत. तरीही एक सांगायचंय, तुमच्या खांद्यावरची विवेकाची पताका खाली पडू देणार नाही. ते निशाण फडकत ठेवण्यासाठी आम्हा तरुणांची लढाई सुरूच राहील. विवेकाची दिवाळी साजरी होणारच, जनाबाईंच्या साक्षीनं शब्द देतो आहोत तुम्हाला.
सचिन परब
श्रीरंग गायकवाड