जना जगण्याचा आधार

सुषमा देशपांडे

काबाडकष्टाचं आयुष्य जगत केवळ संतमांदियाळीतच नव्हे, तर स्त्रीमुक्तीच्या इतिहासात जनाबाईंनी अढळ स्थान निर्माण केलंय. स्त्रीवादी कार्यकर्त्यांबरोबरच खेडोपाड्यातील सर्वसामान्य महिलेला जनाबाई आधार देतात. त्यांचे अनुभवाचे बोल या आयाबायांच्या सतत सोबतीला असतात. ‘बया दार उघड’ या नाटकातून गावलेल्या या जनाबाई.

‘बया दार उघड’ या संत स्त्रीयांच्या अभंगावरील आधारीत नाटकात जना तिच्या अभंगांच्या माध्यमातून साकारण्याचा मी प्रयत्न केला असला तरी जनावर लिहिताना नेमकं कुठून सुरुवात करावी, हे मला समजत नाही. लोभस जना मोहात पाडणारी आहे. खरं तर जना आसपास इथं तिथं भरून राहाते. खेडोपाडी फिरताना जना भेटत असते. दमा आणि कुरूंड या आईवडिलांची एकुलती एक लेक, मात्र लहान वयात आईवडील परलोकवासी झाल्यानं ती लहानाची मोठी झाली दामाशेटकडे, अर्थात संत नामदेवांच्या घरी. नामदेवांच्या घरात ती काम करायची. घरची मोलकरीणच ती. अविवाहीत होती जना. अशा जनाचं आयुष्य फुललं ते तिच्या आणि विठ्ठलाच्या तिनं साकारलेल्या नात्यात.

विठ्ठल कोण? विठ्ठल हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, असं मला वाटतं. या सर्व संत स्त्रीयांनी विठ्ठलाच्या आणि त्यांच्या नात्यावर रचलेल्या अभंगातून गुंफलेली वीण विलक्षण आहे. स्त्री चळवळीचा इतिहास पंधराव्या शतकापासून मांडला जातो. जना ही काही शतकं त्या पूर्वी जन्मलेली, मात्र तिचे अभंग आजही आपल्याशी नाळ जोडतात.

‘स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास, साधूसंता ऐसे केली जनी’ हे किती सहज आणि सोप्या पद्धतीनं रचते ती. आपल्या जडण घडणीचा तिला ‘इगो’ नाही. अर्थात हा इगो कोणत्याच संताला नाही. म्हणूनच त्यांना संतत्व प्राप्त झालं आहे. स्त्री म्हणून जन्म घेतल्यानं उदास होऊ नये, हे खरंच आजच्या समाजात पोचलं आहे? ‘मुलगी नको’ म्हणणारा समाज आज पाहताना जना तेराव्या शतकात हे मांडते, याचं महत्त्व आपल्या लक्षात कधी येणार?

‘जेथे मुक्ती नाही म्हणे, जनी न पाहे त्यांची वदने’ ही ओळ वाचताना जनानं वापरलेला ‘मुक्ती’ हा शब्द वाचून मी चक्रावून गेले होते. एक स्नेही मला म्हणे, जना हे आध्यात्मिक मुक्तीबद्दल बोलत आहे. स्त्रीमुक्तीबद्दल नाही. मला वाटतं, मुक्ती ही मुक्ती असते. स्वत:पासूनही मुक्त होणं ही संकल्पना खूप खोलवर पोचते तिच्या लिखाणातून. जना जो मुक्त नाही अशा व्यक्तीचं मुखदर्शनही नको म्हणते! खोलवर पोचलेला हा मुक्तीचा अर्थ सहजपणे आपल्यापर्यंत पोचतो.

जना खरं पाहाता काबाडकष्ट करत होती, पण तिच्या रचनांमध्ये वेगळाच गोडवा आहे. जबरदस्त आंतरिक ताकद आहे. नामदेवांना तिनं कडेवर घेतलं असणार, त्यांचा सांभाळ केला असणार. पुढं मात्र नामदेवच तिचे गुरू झाले. विठ्ठलाच्या आणि तिच्या नात्यासह नामदेवांचा उल्लेख तिच्या अभंगात सतत येत रहातो. ‘संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेमकळा’, असं म्हणताना संत कुटुंबात असण्याबद्दल तिची नम्रता जाणवते. विठोबासोबतच्या नात्यात ती ‘प्रेमकळा’ हा शब्द वापरते. प्रेमकळा या शब्दातून तिचं आणि विठ्ठलाचं घट्ट नातं आपल्यापर्यंत पोचतं.

आपल्या काबाडकष्टावर तिनं रचलेले अभंग तर वेडंच करतात. त्यातून जनाला तिचा विठ्ठलच मदत करतो, ही कल्पनाच खूप गोड आहे. हीच जना विठ्ठल तिला आंघोळीला गार पाणी आणून देतो म्हणते. तिची पाठ चोळून देतो. केसातल्या उवा मारून टाकतो; अर्थात तिच्या खाजगीपणातही विठ्ठल भरून पावलाय. म्हणूनच की काय, जना विठ्ठलाला माय, बाप, सख्याचा तर दर्जा देतेच पण सहजपणे ‘न्हाऊ घाली माझा सखा’ म्हणते. त्यातला निर्मळपणा मनाला खूपच भावतो. सखा न्हाऊ घालतो ही संकल्पना जनानं १३व्या शतकात साकारली आहे.

जनाच्या आणि विठ्ठलाच्या नात्यातला उत्कट प्रसंग तिनंच रचला आहे. विठ्ठल एके रात्री तिच्याकडे येतो आणि रात्रीची वेळ आहे. जना म्हणते ‘सुख शेजे पहुडले| जनी म्हणे गुज बोल॥’ ते दोघं कशा गप्पा मारत असतील ते अक्षरश: डोळ्यासमोर येतं. गप्पा मारता मारता दोघांना झोप लागते. पहाटे विठ्ठल उठतात आणि देवळात परतात, पण गळ्यातलं पदक जनीकडे विसरून जातात. यामध्ये जनीवर चोरीचा आरोप येतो. जनाला ठाऊक आहे, चोरी आपण केलेली नाही, पण लोकांना काय सांगणार! जना लोकांच्या विनवण्या करते, लोक ऐकत नाहीत, जणू आरोप सिद्धच होऊ लागतो. शेवटी जना विठूचाच धावा करू लागते. पण विठ्ठल खूप वेळ तिच्या मदतीला येतच नाही. मग जना त्याला ‘विठो मेला’, असं म्हणते. या तिच्या रचना वाचताना ‘विठो मेला’ हा तिचा आक्रोश कानात घुमतो आपल्या. या रचना मुळातून वाचायला हव्यात. मग विठ्ठल तिच्या मागे उभा राहतो आणि ती जणू त्याच्या असण्यानं विरघळून जाते. ते दोघं एकरूप वाटू लागतात.

एका पत्रकारानं नाटकातील या प्रसंगावर लिहिताना म्हटलं होतं, ‘सुषमा आधुनिकतेचा आव आणते, पण मोकळेपणाने जना व विठ्ठल एकत्र झोपले म्हणण्यास कचरते.’ एक स्त्री आणि पुरुष यांचे विवाहबाह्य संबंधात झोपले म्हणताना आधुनिकपणा तो काय! जना-विठ्ठलाचं नातं शारीरिक नात्याच्या खूप पुढचं आहे, खोल आहे, हक्काचं आहे. खरंच हे नातं समजून घ्यायची आपली क्षमता आणि पात्रता नाही, असं वाटू लागतं. आजच्या स्त्री-पुरुष मैत्रीत जनाकडून खूप शिकण्यासारखं आहे. एका अभंगात जना म्हणते, ‘एकमेका अलिंगन| नामा म्हणे जनी धन्य॥’ आलिंगन देण्याची पद्धत ही आजची नाही, असं म्हणायला हरकत नाही.

जनाच्या एका अभंगानं मी अक्षरश: अवाक झाले होते. विठ्ठल हा देव आहे असं मानलं जातं. अशा विठ्ठलाचं आणि जनाचं माणूस पातळीवरचं नातं ती चितारते. ‘देव खाते देव पिते| देवावरी मी निजते॥’ या अभंगात पुढे ‘देवासवें व्यवहारीते…’ म्हणते ही! जनानंच चितारलेलं हे नातं तिला जगण्याची वेगळीच ताकद देतं. तिचं जगणं फुलवतं. ही ताकद केवढी असते हे तिचे अभंग वाचताना पावला पावलागणिक जाणवत राहातं.

जनाच्या निमित्तानं अजून एक किस्सा आठवला. एक स्नेही म्हणे, जनाचे अभंग हे जनाच्या नावानं आहेत मात्र जनाचे नाहीत. नामदेवांनी लिहिलेले असावेत. मी शोध घ्यायला सुरुवात केली. पण पुरावा काय आणि कसा शोधणार? अभ्यासकांच्या लेखांतूनही पुरावा असा सापडत नव्हता. ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्री पुरूष तुलना’ हे पुस्तक जोतिबा फुल्यांनी लिहिलेलं आहे, या प्रकारची टीका पूर्वी ऐकली होती, पण जनाचा काळ खूप जुना… स्वत:चं डोकं खात होते आणि जनाच्या अभंगांत डुंबलेही होते. एका क्षणी जनाचा अभंग पुन्हा पुन्हा वाचत होते आणि हा अभंग डोक्यात घोळू लागला,

डोईचा पदर आला खांद्यावरी|
भरल्या बाजारी जाईन मी॥

…आणि डोक्यात लख्ख उजेड पडला. या रचना जनाच्याच आहेत. डोक्यावर पदर घेण्याची प्रथा नाकारून तो पदर खांद्यावर आला म्हणताना, जना भरल्या बाजारी विठ्ठलाच्या दिशेने तर निघाली आहेच पण ती विठ्ठलाच्या नावानं मी वेसवा अर्थात वेश्या झाले, असं म्हणते आहे. तिला कोणाचीच फिकीर नाही. तिचा मार्ग तिला माहीत आहे. हे वाचताना मला जाणवलं, कोणताही पुरुष घरच्या स्त्रीच्या नावानं असं लिहिणार असेल तर तो तिच्या तोंडी, ‘मी झाले वेसवा…’ असं म्हणणं केवळ अशक्य आहे. हे भावनांचं प्रकटीकरण स्त्रीचंच असू शकतं. नामदेवांच्या रचनांमध्ये जनाचा उल्लेखही सापडत नाही ते नामदेव तिच्या नावाने असं का लिहितील?

जना भेटत राहाते… भेटावी वाटते… जना महाराष्ट्रातील संत परंपरेतच नाही तर स्त्री चळवळीत अढळ स्थान पटकावून बसली आहे. या संत कवयित्रीला फक्त स्त्री संत परंपरेत मोडणं म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखं होईल, असं मला वाटतं. कारण जना सर्व स्त्रियांच्या जगण्याचा आधार झाली आहे.

————————

विदुषी

मागील तीन-चार दशकांत जनाबाईंवर संशोधनात्मक आणि समीक्षात्मक असूनदेखील सकस लेखन करणार्‍या विदुषी म्हणून डॉ. सुहासिनी इर्लेकरांची नोंद घ्यावीच लागेल. १९६५ साली प्रबंधलेखनासाठी जनाबाईंच्या अभंगांचा अभ्यास त्यांनी मांडला. पुढे ‘संत जनाबाईंचे निवडक अभंग’ हे मूळ पुस्तक आणि नंतर त्याची सुधारित आवृत्ती आली. शिवाय ‘प्राचीन मराठी संतकवयित्रींचे वाङ्मयीन कार्य’ या पुस्तकातही जनाबाईंवरचं सविस्तर विवेचन आहे. ‘यादवकालीन मराठी काव्यसमीक्षा’, ‘संत कवी आणि कवयित्री : एक अनुबंध’, ‘महदंबेचे धवळे’ आणि ‘आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव’ या पुस्तकांमध्येही त्यांनी जनाबाईंविषयी लिहिलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेल्या ‘संत जनाबाई’ या ग्रंथात त्यांचं जनाबाईंचं चरित्र, काव्य आणि कर्तृत्व याविषयीचं चिंतन सविस्तर आलं आहे. जनाबाईंच्या अभ्यासकांना आज तो ग्रंथ टाळून पुढे जाता येत नाही. बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या सुहासिनी इर्लेकर या मध्ययुगीन मराठी साहित्याच्या अभ्यासक म्हणून ख्यातनाम होत्या. शिवाय त्यांचे दहा कवितासंग्रहही प्रसिद्ध झालेले आहेत. २००१ साली कंधार येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. २८ डिसेंबर २०१० रोजी त्यांचं वयाच्या ७८व्या वर्षी निधन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

0 Shares
जनीमय झेलम जनी गाय गाणे