पंढरीचा पांडुरंग हा त्याच्या भक्तांच्या रोजच्या जगण्यात येतो. भावभावनांसह तो लोकजीवनात नांदत राहातो. याच पद्धतीनं जनाबाई आणि पांडुरंग यांच्यातील नातं जात्यावरच्या ओव्यांतून उलगडत जातं. सवती मत्सराच्या भावनेतून पांडुरंग-रुक्मिणी आणि जनाबाई हा ‘लव्ह ट्रँगल’ गावोगावच्या महिलांनी मनोहारी पद्धतीनं रंगवला आहे.
सासुरवासापेक्षाही नाजूक दुखणं सवतीचं! सासुरवासाचं दुखणं जसं सीतेच्या रूपानं स्त्री गीतांत येतं, तसं सवतीचं दुखणं आणखी एका निमित्तानं या गीतांत येतं. हे निमित्त आहे जनाबाईंचं! संत जनाबाईंचं!
जनाबाई ‘नामयाची दासी जनी’ या अभंगातल्या नाममुद्रेमुळं सर्वांच्या ओळखीच्या आहेत. वारकरी संतमेळ्यातल्या संतांमध्ये ज्ञानेश्वरमाऊली आणि नामदेव हे अग्रगण्य आहेत. दामाशेटीपुत्र नामदेव शिंप्याच्या घरी राहणारी, काबाडकष्ट उपसणारी दासी जनी. तसं तिचं काम, तिचं जगणं, तिची स्त्री-जात, तिचं दासीपणं सगळंच उपेक्षित. सगळंच नगण्य, पण आपल्या प्रबळ भक्तीनं जे दुर्बळ सबळ झाले, त्यात जनाबाई अग्रगण्य ठरल्या.
स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास|
साधुसंती ऐसे मज केले॥
असं त्या अभिमानाने सांगतात. ‘दळिता कांडिता’ त्या विठ्ठलमय झाल्या. स्वतःचं दासीपण, जनीपण विसरून विठ्ठलरूप झाल्या. ‘झाडलोट करी जनी| केर भरी चक्रपाणी|’ किंवा ‘दळण्याच्या मिषे विठ्ठल सावकाशे’ दळू लागला. जनाबाई रानात शेणी वेचायला गेल्या, तरी विठ्ठल पितांबराचे सोगे खोचून त्यांच्यामागं शेणी वेचीत हिंडू लागला. जनाबाई न्हायला बसल्या, तर हळुवार हातांनी वेणी उकलू लागला. इतकंच नाही तर
जनी बैसली न्हायाला | पाणी नाही विसणाला |
घागर घेऊन पाण्या गेली | विठू मागे धाव घाली |
असा विठ्ठल जनीसंगे दरक्षणी राहू लागला, असं जनाबाईच आपल्याला अभंगातून सांगतात. इतकंच नाही, तर मला क्षणभरही सोडून गेलास, तर ‘तुला रुखमाईची आण|’ म्हणून त्या विठ्ठलाला शपथ घालतात. विठ्ठलापायी जनाबाई इतक्या वेड्यापिशा झाल्या की, जनलज्जा सुटली, लोकमर्यादा संपली. कुणाची पर्वाच राहिली नाही. मग त्याच मुक्तपणे सांगू लागल्या की,
डोईचा पदर आला खांद्यावरी | भरल्या बाजारी जाईन मी॥
अशी सगळी जनमर्यादा सोडून जनाबाई विठ्ठलासाठी वेड्या झाल्या. भक्त आणि भगवंत यांचं हे अद्वैत सर्व संतांनी थोड्याफार फरकानं अशाच शैलीत सांगितलं आहे.
पण इतर संत आणि जनाबाई यांत एक फरकही आहे. जनाबाई एक स्त्री आहे आणि विठ्ठल देव झाला तरी एक पुरुष आहे. निर्गुणानं घेतलेलं ते सगुण रूप स्त्री – मनात इतकं रुजलं आहे की, मग विठ्ठल आणि जनाबाई यांच्या अनोख्या नात्याचं गूढ पारंपरिक ओवीगीतात स्त्रियांनी अनेक परींनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाभाविकच त्यांचं प्रापंचिक अनुभवात रमलेलं मन प्रापंचिक भूमिकेतूनच या नात्याकडं पाहातं.
जनाबाईंसारख्या एका स्त्रीच्या हरकामात दंग असलेला देव पारंपरिक ओवीगीतातून परोपरीनं रंगवला आहे. जनाबाईंचा निवास गावाबाहेर गोपाळपुर्यात. देव गावातून उठून सारखा जनाबाईच्या मागं मागं हिंडतो आहे.
गोपाळपुर्यावरी| जनाबाईची झोपडी|
हाती धोतराचा पिळा| देव निघती तातडी॥
नामयाच्या घरी| जनी झाडलोट करी|
देव केराच्या पाट्या भरी॥
दळिता कांडिता| देवाहाती आले फोड॥
जनाबाई बोले| केली वैकुंठाची जोड॥
जनाबाई धुणं धुवायला गेल्या तरी पांडुरंग मागं मागं फिरतोच आहे.
जनाबाई धुनं धुई| इट्टल दरडी उभा|
त्याहीच्या पीर्तीला| दंग झाली चंद्रभागा॥
अशी दोघांच्या प्रीतीची चर्चाही या ओव्यांत अनेक प्रकारे आली आहे.
इट्ठल म्हनीती| नाही जना करमत|
मी जातो आंघुळीला| कर धुण्याचं निमित्त॥
आता इथं विठ्ठलच जनाबाईंसाठी वेडा झाला आहे.
रावळापासून| गोपाळपुराला सुरंग|
येरझारा घाली| जनीसाठी पांडुरंग॥
हे वेड केवळ भक्तासाठी आहे का? की त्याच्याही पलिकडचं काही नातं आहे? संशय यावा, असं हे नातं दिसतं.
इट्टल मनईती| चल जना माडीवरती|
रुक्मिन नाही घरी| दोघं बोलू घडीभरी॥
वस्तुतः रुक्मिणी देवाची लाडकी, प्रीतीची राणी, पण चोरुन जनीशी बोलावे, असं देवाला का वाटावं? जनी रुक्मिणीपेक्षाही जवळची का वाटावी? रुक्मिणी देवाचं परोपरीनं मन सांभाळते, तरी देवाला जनीच प्रिय वाटते.
रुक्मिन जेवू वाढी| निराशा दुधामधी केळं॥
देवाला आवडतं| जनाचं ताक शिळं॥
देवाच्या फराळाला| रुक्मिन देती दूध-फेन्या॥
देवाला आवडती| जनाच्या ताककण्या॥
इतकं करून भागत नाही, तर बिचार्या रुक्मिणीनं चारी ठाव जेवण वाढलं तरी देवाचं लक्ष जनीकडेच.
रुक्मिन जेवू वाढी| पोळी ठेवती काढून॥
दे गं जनाला वाढून | सावळे रखुमाई॥
अखेर रुक्मिणी झाली तरी ती वैतागणार नाही तर काय?
देव बसले जेवाया| पोळी ठेविती ताटाआड॥
रुक्मिन म्हनती| देव जनाचं किती येड॥
असा देवाचा जनीपाशी सगळा जीव. मग रुक्मिणीच्या मनात देवाबद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. त्यात भरीला भर म्हणून आणखी एक घटना घडली.
रुक्मिन मनी| कांबळ का हो खांद्यावरी॥
अग इसरुन आलो| शाल जनीच्या मी घरी॥
आता बायको कितीही समजूतदार झाली तरी खडाजंगी भांडण होणार नाही, तर काय होणार? कोणत्याही प्रामाणिक, प्रेमळ पण स्वाभिमानी बायकोसारखी रक्मिणीही अशी संतापली,
रुक्मिन मनी| देवा तुम्हाला लाज थोडी॥
जनीच्या मंदिरात| वाकळाची काय गोडी॥
‘अहो, तुम्हाला काही लाजलज्जा? तुमचं नातं मला काही निर्मळ दिसत नाही’, असा एकूण रुक्मिणीचा सूर –
रुक्मिन मनिती| देवा तुमचा येतो राग|
जनीच्या काजळाचा| दुशालीला काळा डाग॥
रुक्मिणीनं सरळ सरळ गंभीर आरोप केलेला आहे आणि मग संतापलेल्या पत्नीनं पतीची खरडपट्टी काढावी, तशी खरडपट्टी काढलेली अनेक ओव्यांतून रंगवली आहे. ‘अहो, तुम्हाला काही शरम? सारखे जनीच्या वाड्यावर काय जाता? तिच्या मागं मागं काय हिंडता? तिच्याशी गुलूगुलू गप्पा काय करता? तिची वेणी – फणी काय करता? ती धुणं धुवायला लागली, तर टक लावून काय बघत बसता? अहो, ती तुमची भक्त हे मलाही माहीत आहे. तुमची भक्त म्हणून मी तिच्याशी कधी दुरावा धरला का? उलट मीही प्रेमच केलं. मी तिला धर्माची बहीणच मानत आले, पण तुमचं लक्षण काही मला बरं दिसत नाही’.
अशा आशयाच्या शेकडो ओव्या आहेत. पण या सगळ्या ओव्यांचं एक वैशिष्ट्य आहे. साधारणपणे असं दिसतं की, आपल्या नवर्याचं चित्त दुसर्या कोणत्या स्त्रीमध्ये गुंतलं आहे किंवा दुसर्या स्त्रीनं त्याचं मन आकर्षित करुन घेतलं आहे, असा संशय जरी बायकांना आला, तरी त्या ‘दुसर्या’ स्त्रीला… संभाव्य सवतीला दोष देतात. शिव्या – शाप देतात त्या ‘दुसर्या’ स्त्रीला. आपला नवरा दोषी आहे, असं त्यांना वाटत नाही. (बहुधा वाटत असलं तरी भीतीनं, त्याचं मन राखण्यासाठी त्या उघड तसं दाखवीत नसाव्यात) इथं मात्र अगदी वेगळा प्रकार दिसतो. रुक्मिणीला सतत जनीचा संशय येतो, पण ती जनाबाईंना मुळीच दोष देत नाही. ती सगळा दोष देते तो आपल्या नवर्याला- विठ्ठलाला. कारण जनाबाई त्याच्या घरी क्वचितच येतात. विठ्ठलच जनाबाईच्या घरी पुन्हा पुन्हा जातो आहे.
काठी या घोंगडीच्या| म्होरं वाटेनं कोन जातो?
पिरतीचा पांडुरंग| जनीचं धुनं धुतो॥
विठ्ठल म्हने| चल जने गवताला|
चंद्रभागेच्या वताला| फार पोवना दाटला॥
असं देवाचं सगळंच वर्तन संशयास्पद आहे.
बरीच आदळआपट करून झाल्यावर शहाण्या, समजूतदार बायकोसारखी रुक्मिणी शांत होते. देवाशी गोडीगुलाबीनं वागून स्वतःच स्पष्टपणे विचारावं आणि मनीची शंका फेडून घ्यावी, असं ती ठरवते. रात्रीच्या वेळी देवाच्या तळव्याला दही – लोणी लावताना ती हळुवारपणे मुद्द्याला हात घालते.
इट्टलाच्या पाया| रुक्मिनी लावती दही॥
खरं सांगा इठ्ठला| जना तुमची कोन व्हावी?
इट्टलाचं पाय| रुक्मिन घेई तळहात॥
खरं बोला स्वामी| जनीचं काय नातं?
रुक्मिन म्हनती| देवा गळियाची आन॥
जना तुमची व्हावी कोन| माझी धर्माची बहीन॥
रुक्मिणीचा राग, संशय, धुसफूस सगळं देवाला कळतं. देव समजूत काढतो.
इट्टल म्हनती| नको रुक्मिन राग धरु|
जना धर्माचं लेकरु| आलं थार्याला पाखरू॥
इट्टल म्हनती| का गं रुक्मिन कपटी|
जना बहीन धाकटी| आपल्या दोघामधी॥
देवानं हळुवारपणे रुक्मिणीसह जनाला आपल्या प्रपंचात सोज्वळ नात्यानं सामावून घेतलं. ‘अग बाई, जनी हे एक ‘परदेशी पाखरू’ आहे. ‘बिनआईबापाचं पोरकं लेकरू’ आपल्या आसर्याला आलं आहे. ती मला ‘पाठची बहीण’ आहे. तेव्हा तिची ‘वेणी घालणं’, तिचं ‘न्हाणं – धुणं करणं’ हे मोठा भाऊ म्हणून माझं कामच आहे. अग, ती माझं एकट्याचंच नव्हे, तर तुझंसुद्धा ‘धर्माचं लेकरू’ आहे. तू आणि सत्यभामा माझ्या ऐश्वर्याच्या सहभागी आहात. तुमची लेणी – लुगडी, वेणी – फणी मोठ्या कौतुकानं रोज होते. पण रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्या माझ्या जनीचं कौतुक माझ्याशिवाय कोण करणार? तिला उपाशी ठेवून माझ्या घशाखाली घास उतरत नाही. तिला थंडीवार्यात कुडकुडताना पाहिलं की, माझी शालही टोचते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जनी माझ्याजवळ मुळी कधी काही मागतच नाही. अगदी निर्लेप, निरहंकारी, निर्लोभी, निर्मळ चित्तानं ती माझ्याकडे आली आहे. अग, ते ‘भावरथाचं लेकरू| चुकलं वाळवंटी|’ अशा जनीला आपल्याशिवाय कोण आहे बरं? तर तू राग नको धरू. तूही माझ्याबरोबर चल तिच्या झोपडीत. आपण दोघंही गोपाळपुर्यात गेलो ना तर माझ्या जनीला अपरंपार सुख होईल आणि त्या निर्मळ मनाचं ते सुख तशाच निर्मळ मनानं तू अनुभवलंस, तर तुलाही त्याची गोडी कळेल’.
इट्टल मनीतो| का गं रुक्मिन बोलना|
गोपाळपुरा जाया| रथ जागंचा हलेना॥
अजून रुक्मिणीच्या मनातली अढी गेलेली नाही. निर्लेप, निखळ प्रेमाचं स्वरूप तिला अजून कळलेलं नाही. ‘मैं तो प्रेम दिवानी, मेरा दरद न जाने कोय|’, असं म्हणणार्या मीरेच्या शुद्ध प्रेमाची ही जात प्रपंचात पत्नीच्या भूमिकेत अडकलेल्या रुक्मिणीला कशी कळावी? पत्नीपदात पतीकडून काही अपेक्षा आहेत, असतातच. ते प्रेम ‘निरपेक्ष’ असूच शकत नाही. देवाला ओढ असते ती ‘निरपेक्ष’, ‘शुद्ध’ प्रेमभावाची! ते प्रेम मिळतं ते फक्त उत्कट भक्ताकडून! अशा भक्ताच्या प्रेमाचं सामर्थ्यच देवाला खेचून स्वतःकडे घेऊन येतं. पोथ्या-पुराणांत आणि कर्मकांडात देव नाहीच, देव आहे उत्कट प्रेमभावात. सर्व संतांना तो सापडला आहे. कबीरदासजी म्हणतात,
पोथी पढी पढी जग मुआ | पंडित हुआ न कोय |
ढाई अच्छर प्रेम का | पढै सो पंडित होय ॥
‘प्रेम’ या अडीच अक्षरांत (ढाई अच्छर) परमेश्वर भरला आहे. अशा प्रेमासाठी देवच वेडापिसा होतो. अशा भक्ताचं किती कोडकौतुक करू आणि किती नको, असं देवाला वाटतं. संत ज्ञानेश्वरांनी भक्तियोगाचं विवेचन करताना फार सुंदर मांडणी केली आहे. देवानं चार हात धारण केले तेच मुळी अशा निर्मळ, उत्कट प्रेम करणार्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी.
भुजावरी दोनी| भुजा आलो घेवोनी|
आलिंगावेयालागोनी तयाचे आंग॥
जनी आणि विठ्ठल यांची प्रीती या जातीची आहे. देवच सांगतात, प्रियकराला जशी आपल्या प्रियेची उत्कट अभिलाषा असते, तिची सगळी काळजी घ्यावीशी वाटते, तशी मी माझ्या भक्ताची काळजी घेतो. जनाबाईंची काळजी देव घेतो ती या भूमिकेतून!
आश्चर्य असं की, श्रीज्ञानदेवांचं विवेचन तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून अक्षरबद्ध झालं आहे. परंतु पारंपरिक स्त्रियांच्या ओव्यांतला विठ्ठल – रखुमाई – जनाबाईंच्या प्रेमकहाणीचा त्रिकोण लोकप्रतिभेनं रंगवला आहे. अगदी उत्स्फूर्तपणे, अभावितपणे तो स्फुरलेला आहे.
अलौकिक ईश्वरनिष्ठा सामर्थ्य लौकिकाचे रंग घेऊन लोकसाहित्यात अवतरते. रुक्मिणीला जनीचं आणि विठ्ठलाचं नातं सांगताना ‘बहीण’, ‘लेकरू’ असे शब्द जरी देवानं वापरले असले, तरी हे नातं वर्णनातीत आहे. रुक्मिणी साधी प्रापंचिक, अविद्येनं, अज्ञानानं ग्रासलेली.
देव इट्टल मनी| नाही रुक्मिनीला ग्यान|
आपल्या दारावून| जनी गेली अबोल्यानं॥
जनाबाईला देवाचा संसार उध्वस्त करायचा नाही, हे रुक्मिणीला अजून कळतच नाही. पण रुक्मिणीला ज्ञानी करणं, हेही देवाचंच काम. म्हणून रुक्मिणीसह देव जनीकडे निघाले.
भरली चंद्रभागा| पानी चाललं वाहून|
जनाच्या भेटीसाठी देव| जाती रुक्मिनी घेऊन॥
चंद्रभागेला आलेल्या भक्तिगंगेच्या पुरात रुक्मिणीच्या मनातला हा (सवती) मत्सर वाहून जायलाच हवा, हेही ओवी – गीतं गाणार्या स्त्रियांना उमगलं आहे. हे शहाणपण किती मोठं आहे!
धगधगती ठिणगी लोककहाणी जनाईची