माहेरात पोरकी

माणिक मुंढे

मराठवाडा म्हणजे संतभूमी. वारकरी चळवळीतील बहुतेक संत इथलेच. संत जनाबाईही गंगाखेडच्या म्हणजे मराठवाड्यातल्याच. पण मराठवाड्यात त्यांच्या पाऊलखुणा फारशा सापडतच नाहीत. मराठवाड्याला आपल्या लेकीचं माहेरपण काही करता आलेलं नाही. त्यामुळं पंढरपुराला माहेर मानणार्याा जनाबाईंना त्यांचं मूळ माहेर पोरकं झालेलं आहे का?

जनाबाई गंगाखेडच्या. मी पिंपळदरीचा. त्या गोदाकाठी जन्मल्या. मी मासोळीच्या. गंगाखेड सोडलं की झोल्याच्या आसपास मासोळी कुठंतरी स्वत:ला गोदेत विसर्जित करते. पुढं त्या एक प्रवाह होऊन आंध्रात जातात आणि तिथून अरबी समुद्र. जनाबाईंनी गंगाखेड सोडलं त्यावेळी त्या पाच एक वर्षांच्या होत्या म्हणतात. पुढं विठ्ठलाचं पंढरपूरच जनाबाईंचं गाव बनलं. जनाई त्यानंतर कधीच गंगाखेडला परतल्या नाही म्हणतात. कबीरांच्या भाषेत ‘जग मुक्तीचे माहेर’ लिहिणार्‍या जनाबाईंना एकदाही माहेरची आठवण झाली नसेल?

जनाबाईंचा शोध घेत फिरायला निघालो तो पहिल्यांदा गंगाखेडमध्ये पोहोचलो. पाचवी ते सातवी अशी दोन वर्ष मी गंगाखेडला शाळेला होतो. त्यावेळी गंगाखेडचं बस स्टँड म्हणजे माणसांचं वारूळ. त्या बस स्टँडवर चितारलेलं एक चित्रं आठवलं. एक बाई जात्यावर दळतेय आणि एक निळा माणूस तिला दळू लागतोय. तिथंच मोठ्या अक्षरात लिहिलेलं, संत जनाबाईचं जन्मस्थान, गंगाखेड! ते चित्र आता तिथं नव्हतं. अक्षरं होती. बस स्टँडही आता ओस पडलंय. जनाबाईंच्या गावच्या मुख्य रस्त्यावर ‘वडाप’च्या गाड्यांचा गोंगाट, धूळ. मी बालमैतरांना विचारतो, जनाबाईंचं घर कुठंय रे इथं? ते म्हणाले कसलं आलंय घर? मंदिर आहे. पण लय घाणंय तिकडं. गोदाकाठानं जनाईचं मंदिर विचारत विचारत एका मोठ्या मंदिरासमोर येऊन उभा राहिलो. मंदिर नाहीचंय ते, लग्नसभारंभासाठी वगैरे मोठा हॉल बांधावा तसं. आत गाभारा. त्यात मूर्ती वगैरे. त्या गाभार्‍यात जाताना अगदी दाराच्या वर मंदिराच्या व्यवस्थापन मंडळींची नाव लिहिलीयत. त्यातली बहुतांश नावं माझ्या ओळखीची. का तर ती माझ्या गावचीच आहेत. त्यात मुख्य नावांमध्ये एक नाव होतं ज्याच्यावर दोन जणांच्या ‘मर्डर’चा आरोप होता. गावात त्याचे दोन बिअर बारही आहेत. परिसरात त्याला ‘महाराज’ म्हणून ओळखतात. विशेष म्हणजे ज्यांचा मर्डर महाराजाच्या भावांनी केलेला त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शरीरं मी स्वत: प्रत्यक्ष पाहिलेली. जनाबाईंचं मंदिर हेच घर असेल तर आपल्या घरावर या खुनी माणसाचं नाव पाहून जनाबाईंना काय वाटत असेल?

मंदिराच्या आत दोघेजण उभे होते. तिथलेच वाटत होते. मी जनाबाईंबद्दल विचारायला लागलो. तर उत्तर एका शब्दातली. एक जण म्हणाला, त्यांचं चरित्र लिहिलंय एकानं, ते विकत मिळेल. किंमत होती, अडीचशे रुपये. त्यांनी पन्नास रुपयेच घेतले.

वेड्यापिशा जनाबाईंना सांभाळणार्‍या नामदेवांचा गाव मराठवाड्यातच आहे. नरसी नामदेव. तिथं त्यांचं घरही आहे. त्यांची ओळख सांगणारी भावकी आणि वंशजही. दुसर्‍या दिवशी हिंगोली जिल्ह्यातलं नरसी नामदेव गाव गाठलं. हे नामदेवाचं मूळ गाव. अगोदर ते नरसी बामणी नावानं ओळखलं जायचं. आता नामदेवांच्या नावानं. जाताना परभणी, जिंतूर वगैरे करत गेलो. भर उन्हाळा. पारा चाळीशीच्या पार. येलदरी धरणाच्या आटलेल्या पाण्यातील चिखलाच्या भेगा दुष्काळाची भेसुरता दाखवत होत्या. रस्त्यानं अधून मधून एखादं लग्नाचं वर्‍हाड, झाडपाला खाणार्‍या शेळ्या, ‘बोअर’ मारण्यासाठी निघालेल्या अजस्र मशिनी, मधातच मोसंबीच्या वाळलेल्या बागा, धुर्‍यावर एकटं पडलेलं देऊळ आणि त्यावर भणानणारी भगवी पताका. निसर्गाचं असं कोरडंठाक रूप असणार्‍या प्रदेशातच संत जन्म का घेत असतील?

नामदेवाचं गाव तसं म्हटलं तर विदर्भ, मराठवाड्याच्या शिवेवर. गावात पोहोचल्यावर पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकवणार्‍या संत नामदेवांच्याच गावात आपण आहोत, यावर विश्‍वास बसत नाही. सगळीकडे खड्डे, अस्वच्छता. डोक्यावर ‘गमजा’ टाकून बीडी फुंकत कोलटेकणी बसलेली माणसं. मंदिराजवळ एक पाटी. उजव्या बाजूला गेलात तर नामदेवाचं घर, डाव्या बाजूला गेलात तर मंदिर. पाहिलं मंदिर. पण जनाईची म्हणून काही जागा, खुणा दिसल्या नाहीत. मुख्य मंदिराच्या पाठीमागं गेलो तर तिकडं काही जण स्वयंपाकपाणी करत होते. जवळच एका बाईनं लेकराला पायावर धरलेलं, मंदिराच्या एका भिंतीवर नामदेवांची महती सांगणारा मोठा पण स्वयंपाकाच्या धुरानं काळवंडलेला फलक. काही वयस्कर बायका माईकवर डोळे झाकून ‘ग्यानबा-तुकाराम’ म्हणत होत्या. सगळीकडं चक्कर मारून मंदिरात टेबल टाकून बसलेल्या दोघांना विचारलं, इथं जनाबाईचं काही आहे का? ते नाही म्हणाले.

मग तसाच गाडी घेऊन एका अरूंदशा रस्त्यानं नामदेवांच्या घरासमोर आलो. एक-दोन मजली सिमेंटचं बांधकाम दिसत होतं. गेटवर पंजाबीत काहीतरी लिहिलेलं. हिंदीतही होतं. भगत नामदेवजी का जन्मस्थल. मी डोक्यावर रूमाल बांधला आत गेलो. दाढीधारी नामदेवांचं दर्शन घेतलं. तिथं एक शीख माणूस होता. पठाणकोटचा. त्यांच्याशी गप्पा जमवल्या. मीच त्याला जनाबाईंविषयी सांगितलं. त्यानं ते कान देऊन ऐकलं.

बाहेर येऊन उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी दुकानातून एक गमजा घेऊन डोक्याला गुंडाळला. येताना परत मला नामदेवांच्या घरासमोरच एक महादेवाचं मंदिर होतं. तिथं एक म्हातारा माणूस बसला होता. मी त्याला नामदेवांचं घर शीखांच्या ताब्यात कसं, असं विचारलं. तो म्हणाला इथं काही गुरवाची की शिंप्याची घरं होती, त्यांनी विकलं. नांदेडच्या एका शीख नेत्या बाईनं धमकीच दिली. पाहिजे तेवढा पैसा घ्या आणि ही जागा सोडा. मग काय यांनी तर घरंच बांधून घेतली. मी विचारलं, तुम्हाला जनाबाई इथं नरसी नामदेवला येऊन गेल्याचं कुठल्या कीर्तनकारांनं वगैरे सांगितल्याचं आठवतंय का? तो नाही म्हणाला.

जनाबाई स्वत:च्या किंवा नामदेवांच्या जन्मगावी एकदाही आल्या नसतील? नरसीतून बाहेर पडताना नामदेवांची अभंगगाथा घेतली. त्यांचं एक छोटेखानी चरित्रही घेतलं. सरळ औढ्यांच्या रस्त्याला लागलो. म्हटलं बघुया नामदेवांचे गुरू विसोबा खेचरांच्या गावात तरी जनाबाईंबद्दल कुणी काही माहिती देतंय का? नरसी ते औंढा नागनाथ तासाभराचं अंतर. मुख्य रस्त्याला लागताना नरसीच्या बाहेरच एका मोठ्या गुरूद्वाराचं बांधकाम चाललेलं. हे नामदेवांसाठीच. मला क्षणभर वाटलं, या शीख बांधवांना सांगावं, मराठीतल्या इतर संतांचंही असं करून द्या काहीतरी!

मी तीन ज्योतिर्लिंगं बघितलीत. परळीचा वैजनाथ, सौराष्ट्रात अरबी समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेला सोमनाथ आणि हा औढ्यांचा नागनाथ. असं वाटलं, इथं वर्षानुवर्ष काहीही बदललेलं नाही. बदलच झाला असेल तर परिसराच्या बकालपणात. तो भरपूर वाढलेला दिसला. मंदिरात गर्दी वगैरे प्रचंड. काहीजण ‘गिर्‍हाईकांच्या’ शोधात. आलेल्यांच्या डोक्यावर मोरपंखी टोप ठेवून पैसे मागणारे. एकाच्या हातावर वीस रुपये ठेवत विसोबा खेचरांची समाधी विचारली. ‘ती काय तिकडं बाहेरच्या बाजूला…’, असं त्रोटकपणे सांगून तो पुढच्याला टोपी घालण्याच्या कामात गुंतला. समाधीकडं पोहोचलो. मंदिराच्या परिसरातच, पण वाळीत टाकल्यासारखे विसोबा खेचर. ‘आयुष्य भविष्य नाही तुझिये हातीं, हे अवघें अंतीं जायजणें’, असं लिहिणार्‍या नामदेवांचे गुरू. ज्ञानी होते पण अहंकारी. ज्ञानेश्वरादी भावंडांची हेटाळणी करायचे म्हणतात. पण ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानदेवांचे पाईक झाले. त्यांच्याच सांगण्यावरून सोपानदेवांनी विसोबा खेचरांना दीक्षा दिली. पुढं गोरा कुंभारांकडे नामदेवाचं ‘डोकं कच्चं’ असल्याची परीक्षा झाल्यानंतर विसोबा नामदेवांचे गुरू झाले. असं सांगतात, की विसोबांच्याच सांगण्यावरून नामदेवांनी देश पालथा घातला? गोरोबाकाकांच्या उस्मानाबादमधील तेर गावी हा संतमेळा जमला असावा. परीक्षेच्या वेळी गोरोबाकाकांकडे जमलेल्या संतमेळ्यात जनाबाई असल्याचा उल्लेख नाही. हे संतमंडळ विसोबा खेचरांना भेटून किंवा नामदेवांच्या मूळ गावाहून किंवा जनाबाईंच्या गंगाखेडहून किंवा चोखामेळांच्या विदर्भातून परतत असावीत, त्याच वेळी ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा अभंग जनाबाईंना सुचला असावा, असं क्षणभर वाटून गेलं.

जनाबाईंनी संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार अशा अनेक संतांचं चरित्रं अभंगांतून सांगितलंय. त्या जनाबाईंना या संतांच्या गावी गेल्या नसतील? तसा उल्लेख किंवा पाऊलखुणा मात्र दिसल्या नाहीत.

औंढ्यातून निघून दैठण्यात पोहोचलो. दैठणा हे ठाकूरबुवांचं गाव. संत दत्तबुवा ठाकूर यांची समाधी इथं आहे. ते संत नामदेवांचे चुलत बंधू. त्यामुळं दैठणाला धाकटं पंढरपूरही म्हणतात. गंगाखेड-परभणी रोडवर जवळपास दहा एक हजार लोकसंख्येचं हे गाव. आश्चर्य म्हणजे मराठाबहुल भागात हे राजपुतांचं गाव आहे. ठाकूर कुटुंबियांनी जवळपास सव्वाशे वर्षापेक्षा जास्त काळ दिंडीची, पालखीची परंपरा जपलीय. माऊलींच्या पालखीच्या समोर या दिंडीचा २३ नंबर असून, माऊलींच्या पालखीच्या घोड्याच्या पाठीमागे तिसरा नंबर लागतो.

तुकोबाराय-निळोबाराय-मल्हाप्पा आणि संत दत्तबुवासाहेब ठाकूर अशी ही गुरु-शिष्य परंपरा. या परंपरेतले सगळ्यात मोठे संत म्हणजे नामदेवबाबा ठाकूर. ज्यांची वेळापूरला समाधी आहे. तिथं पंढरपूरला निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगणही होतं. नामदेवांचे बंधू हरीबाबा ठाकूर यांची समाधी लोहगावला आहे. तिथं अजून मोठं मंदिर आहे. इथं ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत पाहायला मिळाली. दत्तबुवांना ती गोदावरीतून मिळाली, असं सांगितलं जातं. ठाकूरबुवांच्या मंदिराच्या शेजारी मशीद आहे. त्यासमोर गुलेरबाबा यांची कबर आहे. शेजारी आणखी एक मंदिर आहे, धीरजगिरी महाराजांचं. ते संन्याशी होते. गुलेरबाबा आणि धीरजगिरी महाराज दोघेही दत्तबुवासाहेबांसोबतच इथं आले, असं सांगितलं गेलं. ठाकूरबुवांच्या वंशजांशी बोलताना मला एक आश्चर्य वाटलं ते म्हणजे, दैठण्याचे राजपूत हे ‘ओपन’मध्ये आहेत आणि त्यांची पुढची पिढी ‘एसटी कॅटेगरी’त म्हणजे आदिवासी. त्यामुळं बहुतांश मंडळींना सरकारी नोकरी मिळालीय. हे न पचणारं पण वास्तव. मनात आलं, जनाबाई कोण असतील? या प्रश्‍नाचं उत्तर मिळेल न मिळेल, पण जनाबाईंच्या पाऊलखुणा इथंही दिसल्या नाहीत.

पुढं निघालो बाभळगावला. तिथं माऊलींचे अश्व आहेत. म्हणजे ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात या गावातील अश्‍व जातात. ती सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. तिथं संजय रणेर भेटले. म्हणाले, ‘घोड्याचं सगळं माझा पुतण्या बघतो.’ मग घोडा बघायला गेलो. तिथं एक उमदा काळा घोडा बांधलेला होता. गावातले वारकरी याला वारीला नेतात आणि आणतात, अशी माहिती मिळाली. वारीच्या रिंगणात दोन अश्व असतात. एक मोहिते पाटलांचा आणि दुसरा रणेर यांचा. मोहिते पाटलांच्या अश्वावर स्वार असतो, तर रणेर यांच्या या अश्वावर देवांची वस्त्रं असतात. प्रत्यक्ष माऊलीच या अश्‍वावर विराजमान होतात, अशी श्रद्धा आहे. बोलण्यातून कळलं की, माई नावाच्या कुणीतरी बाईंनी ही अश्वाची परंपरा सुरू केली. विचारलं, घोड्याचीच परंपरा आहे का? घोडी नाही चालत? तर रणेर नाही म्हणाले. इथल्या वारकर्‍यांमध्ये, तुमच्या पूर्वजांकडून जनाबाईंबद्दल काही ऐकायला मिळालंय? ते म्हणाले, एवढंच की त्या गंगाखेडच्या होत्या.

जनाबाईंच्या शोधात फिरताना काही वारकरी परंपरा माझ्या कुटुंबापर्यंतही पाझरल्याचं जाणवलं. गुलेरबाबांची कबर पाहिल्यानंतर माझ्या घरची परंपरा प्रकर्षानं जाणवली. आमच्या गावात हबीबदा आणि गफुरदा असे दोन भाऊ होते. आमचं पहिलं लादणीचं घर त्यांनीच बांधलेलं. ते जाऊनही आता बरीच वर्ष लोटलीयत. हबीबदाची मुलं झाली की वारायची. मग त्यातलं एक पोरगं माझ्या आजीनं वटीत घेतलं. योगायोगानं ते वाचलं. त्याचं नाव फकीर आहे. आता आमच्या घरात कुठलाही सोहळा असो की लग्नसमारंभ. फकीरला मूळ असतं. म्हणजे भाऊबंदांना जो मान तोच फकीरला. वडिलांनी, चुलत्यांनी ही प्रथा चालवली. आता फकीरचा मुलगा मोठा आहे, त्याचा आमच्याकडे वावर असतो. मी तर असा फिरत असतो पण चुलत्याचा मुलगा आहे तो या सगळ्या गोष्टी आवर्जून बघतो. फकीरच्या घराकडूनही हे पाळलं जातं. आमच्या गावात डोला बसायचा. रंगीबेरंगी काठ्या भाजून संध्याकाळी उशिरापर्यंत डोल्यात सगळा गाव एकमेकांच्या हातात हात घालून विस्तवाभोवती फेर धरायचा. त्या डोल्याला लागणारं सामान नामदेवबाबांच्या घरी असायचं. आता डोला बसत नाही. गावात पीर आहे तिथं अजूनही नवस फेडले जातात. पण हे आता विरळ होत चाललंय.

गावातच संत मोतीराम महाराजांची समाधी आहे. त्यांचं गुरू घराणं म्हणजे ठाकुरबुवांचं घराणं. परभणी जिल्ह्यात मोतीराम महाराजांच्या समाध्या अनेक गावांत सापडतील. ते मूळचे पालम तालुक्यातल्या फळ्याचे. मारवाडी. आडनाव काकाणी होतं. त्यांचा काळ साठपूर्वीचाच, स्वातंत्र्यानंतरचाच. कुठलाही मोबदला न घेता सेवा करणारे कदाचित ते शेवटचेच संत म्हणायला हवेत. त्यामुळं या भागात एका मारवाडी माणसाला देवत्व लाभलंय.

त्यांचंच शिष्यत्व सांगायचे मारोतराव महाराज. त्यांना आम्ही मोठे महाराज म्हणायचो. मला लहानपणी त्यांची फार भीती वाटायची. गावच्या सप्ताहात ते दोन-तीन दिवस मुक्कामाला असायचे. दहा गावातले लोक त्यांच्या दर्शनासाठी लोटायचे. पण नंतर ते बदनाम झाले. त्यांची गादी आता त्यांचा नातू चालवतो. पण त्याला आता फक्त मराठा गावातच बोलावलं जातं. माझ्या गावात आता त्याचा नेम नाही. भजन, कीर्तनं आताही होतायत. पण त्यासाठी जातीतलेच कीर्तनकार बोलवण्याची प्रथा पडतेय. ठाकूरबुवांच्याच परंपरेतले प्रल्हाद शास्त्री अगोदर कीर्तनाला यायचे. त्यांचा नेम ठरलेला असायचा. आता तो नेम त्या त्या जातीतल्या कीर्तनकारांकडे जातोय. काही हरिद्वारला जाऊन शास्त्री होतायत. भगवानगडावरचे नामदेव शास्त्री अशांपैकीच एक. ते राजकीय वादात पडून धमक्यांची भाषा करतात. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना भगवानगडाचं कर्तेधर्तेपण दिलं, आता ते पंकजा मुंडेंना राजकीय बळ देतात. राजकीय गड म्हणून अशा स्थळांना आणि महाराजांना उभं केलं जातंय. सातारकर, निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तनं होतात पण ते लाख रुपयांच्या खाली येत नाहीत म्हणे. त्यातही त्यांना एका फेरीत दोन-तीन तरी सुपार्‍या लागतात. औरंगाबादला वैजापूर तालुक्यात रामजिनी महाराजांचं मोठं प्रस्थ असल्याचं ऐकलं. ते हेलिकॉप्टर वापरतात असं कळालं. अहमदपूरचे शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत. मी त्यांना शाळेत असल्यापासून पाहत आलोय. लिंगायत समाजातलं ते सर्वात मोठं व्यक्तीमत्व आहे. वय झालंय पण ते देशभर फिरतात अगदी पंजाबपर्यंत वगैरे.

लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर सायगाव आहे. तिथला मान एकवेळ मुसलमानाला असतो एकवेळ ब्राह्मणाला, अशीही एक परंपरा आहे. पण वारी, वारकरी परंपरा आता जातीजातीत टोकदार होताना दिसतेय. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर मराठवाड्यात अनेक ठिकाणी चौकांना त्यांचं नाव दिलं जातंय. देवादिकांच्या फोटोंच्या दुकानांत विक्रीसाठी मुंडेंचेच जास्त फोटो दिसतात. मराठवाड्यातली वारकरी परंपरा अशी जाती जातींत विभागली जाताना दिसली तरी एक गोष्ट अजूनही विभागली गेलेली नाही, ती म्हणजे ‘ग्यानबा-तुकाराम’चा घोष.

मराठवाड्यात संतांची पंरपरा शोधत फिरताना मनाला फार काही ‘पॉझिटिव्ह’ वाटलं नाही. ज्या जनाईला संतत्व बहाल आहे तिच्याच परंपरेत घोडीला महत्त्व नाही. म्हणजेच रणेर यांच्या अश्वाची परंपरा एका माईनं सुरू केली पण तिथं मादीला दुय्यम मानलं गेलंय. कीर्तनासाठी किती महाराज जनाबाईंचा अभंग घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. हे मराठवाड्यातच आहे असं नाही. श्रीनगरच्या हजरत बल दर्ग्यात गेलो होतो. तिथं दर्ग्याच्या मुख्य भागात बायकांना जायला बंदी आहे. आश्चर्य म्हणजे जगप्रसिद्ध हजरतबल दर्ग्याची निर्मितीच इनायत बेगम नावाच्या महिलेनं केलीय. मुंबईत हाजी अलीच्या दर्ग्यातही अलिकडे ही प्रथा पाडली गेलीय. जनाबाईंचंही असंच समजायचं का? ज्या मराठवाड्याचं नाव जनाबाईंनी दुमदुमत ठेवलं तिच्या वाट्याला तरी अशी उपेक्षा यायला नको होती.

0 Shares
दळिता कांडिता यार