मनगटावर तेल घाला

डॉ.श्यामसुंदर मिरजकर

स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारणार्याय सनातनी परंपरेच्या प्रचंड प्रभावाच्या काळात जनाबाई वावरत होत्या. त्या या सगळ्याविरुद्ध कमरेला पदर खोचून मैदानात उतरल्या. बंडाची पताका फडकावत, त्यांनी लेखणी-वाणीचा दांडपट्टा सपासप चालवला. आता तुम्हाला काय करायचंय ते करा. ‘मनगटावर तेल घालून बोंबलत बसा’, असं त्यांनी कर्मठांना ठणकावलं.

जनाबाई ज्या काळात वावरतात, तो काळ जातिवर्णव्यवस्थेचे प्राबल्य असण्याचा काळ आहे. तत्कालीन वैदिक परंपरेप्रमाणं स्त्रिया या शूद्रवर्णीय आहेत. धर्ममार्तंडांच्या दृष्टीकोनातून शुद्रांचं विहित कर्म हे त्रैवर्णिक पुरुषांची सेवा करणं आहे. इतकंच नव्हे, तर शूद्र हे ज्ञान घेणं, शस्त्र धारण करणं, वाणिज्य कर्म करणं आणि धार्मिक कर्मकांड करणं या अधिकारांपासून वंचित आहेत. त्यांना ज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही. त्यांना धार्मिक क्षेत्रात प्रवेश बंदी आहे. त्यांनी स्वतःचं डोकं वापरायचं नाही, विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा नाही, असे निर्बंध आहेत. स्त्री शुद्रांप्रमाणंच असल्यानं तिलाही अशी बंधनं आहेत. स्त्री असल्याकारणानं ज्ञानप्राप्ती, धार्मिक क्षेत्रातील वावर अशा अनेक बाबींपासून वंचित राहावं लागतं. म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या स्त्री असण्याला दोष देणं, हे त्या काळात प्रत्ययी घडत असलं पाहिजे.

ही स्त्री-शुद्रांवर असणारी बंधनं धुडकावण्याचं काम नामदेवादी संतांनी जाणीवपूर्वक केलं होतं. ‘नाही यातिकुळ उंच नीच भेद| भाव एक शुद्ध पाहातसे॥’, अशी नामदेवांची घोषणा होती. कोणत्याही यातिकुळातील शुद्धभाव असणार्‍या स्त्री-पुरुषांना वारकरी संप्रदायात प्रवेश होता. ज्ञानाचा, भक्तीचा, लेखनाचा अधिकार होता. त्याचं मूर्त रूप आपणास जनाबाईंच्या रूपानं पहावयास मिळतं. म्हणूनच त्या आत्मविश्‍वासपूर्वक म्हणतात, ‘स्त्रीजन्म मिळाला म्हणून उदास होण्याची आता गरज उरली नाही. साधुसंतांनी या विचाराप्रत, भावस्थितीप्रत मला आणलं आहे. मी संतांनी अंकित केलेली, त्यांच्या घरची दासी आहे. विठोबानं भक्तिसुखाची प्रेमकळा दिली आहे. यापूर्वी दासीपुत्र असणार्‍या, म्हणजे माझ्याच कुळातील सात्विक विदुराचा अंगीकार देवानं केला. तुझं कुळ कोणतं, अशी विचारणा न करता वेश्येचाही उद्धार केला. नामस्मरणानं त्यांना तिन्ही लोकांत श्रेष्ठत्व मिळवून दिलं. आता जे ऋषींचं (ज्ञान, कार्य यांच्याबद्दल आदर न बाळगता त्यांचं) कुळच शोधतात, त्यांना रौरव नरकात जागा मिळते. मी नामयाची जनी मात्र भक्तीसाठी सादर झालेली आहे. माझे आराध्य दैवत विटेवरी आहे.’ दासी असणारी स्त्री म्हणून वाट्याला येणारी अवहेलना, अपमान जनाबाईंना सतत डाचत असला पाहिजे. मात्र जेव्हा संतसंगतीनं त्यांना आत्मविश्‍वास येतो, त्या लिहू बोलू लागतात, तेव्हा त्यांचा स्वर हा एकाचवेळी आत्मसन्मानाचा आणि विद्रोहाचा असतो. स्वतःचं श्रेष्ठत्त्व मिरवणार्‍या उच्चकुलीनांवर त्या आघात करतात. जनाबाईंचा हा अविष्कार अचंबित करणारा आहे.

परस्वाधीन असणार्‍या स्त्रीनं आत्मसन्मानपूर्वक उभं राहणं, हे फार मोठं स्थित्यंतर आहे. लौकिक जीवनात जनाबाई शुद्र वर्णातल्या, कोणत्यातरी खालच्या मानल्या जाणार्‍या जातीतल्या आणि त्यातही पुन्हा दुसर्‍याच्या घरच्या दासी आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर असं निम्नस्थान असणार्‍या जनाबाई नामदेव-ज्ञानदेवांच्या संगतीत वाढल्या. त्यामुळं त्यांना आत्मविश्‍वास लाभला. स्त्री म्हणजे अध्यात्माच्या मार्गातील धोंड, ही प्रचलित धर्ममान्यता जनाबाईंनी उधळून लावली. त्यांनी भक्तीच्या, अध्यात्माच्या क्षेत्रात गती प्राप्त केली. जनाबाईंचा हा प्रवास सहजसाध्य नव्हताच. तत्कालीन धर्ममार्तंडांनी, शास्त्री-पंडितांनी आक्षेप घेतले, जनाबाईंना धर्मद्रोही, पाखंडी ठरविलं असलं पाहिजे. हजारो वर्ष धर्मानं घालून दिलेली मर्यादा, आखून दिलेली लक्ष्मणरेषा उधळून लावण्याचं काम ही ‘दासी जनी’ करत होती. विद्येचा अधिकार नसणार्‍या शुद्र जनाबाई लिहीत होत्या, गात होत्या, आपलं विचारधन इतरांना वाटत होत्या. त्यामुळं तत्कालीन ब्राह्मण पंडितांचा रोष, शिव्याशाप त्यांना सहन करावे लागत होते. या ब्रह्मवृंदाच्या विरोधाला आव्हान देण्याची, उघड संघर्ष करण्याची भूमिका जनाबाईंनी स्वीकारली. त्यांच्या या संघर्षात्मक भूमिकेचा सर्वात सुंदर अविष्कार या अभंगात झाला आहे. म्हणून जनाबाईंच्या संपूर्ण लेखनाच्या केंद्रस्थानी ‘डोईचा पदर आला खांद्यावरी’ हा अभंग गृहित धरला पाहिजे. या अभंगातील जनाबाईंचा विद्रोहस्वर आकाशातील विजेसारखा कडाडून उठणारा आहे. ती म्हणजे.

डोईचा पदर आला खांद्यावरी |
भरल्या बाजारी जाईन मी ॥
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा|
आतां मज मना कोण करी॥
पंढरिच्या पेठे मांडियेले पाल|
मनगटावर तेल घाला तुम्ही ॥
जनी म्हणे देवा मी झाले वेसवा|
रिघालें केशवा घर तुझें॥

या अभंगात वाच्यार्थ आहे, रूढार्थ आहे आणि संकेतार्थही आहे. डोईचा पदर ही परंपरेनं स्त्रीला विशेषतः बहुजन स्त्रीला घालून दिलेली मर्यादा आहे. ब्राह्मण स्त्रिया डोक्यावर पदर घेत नाहीत. परंतु बहुजन स्त्रियांना कटाक्षानं हा संकेत पाळावा लागत होता. तिच्या या कृतीतून तिची मर्यादाशीलता दिसून येत होती. परंपरेनं घातलेली, लादलेली बरी-वाईट बंधनं पाळणारी स्त्री ही कौतुकास पात्र होती. आजही भारतीय स्त्री म्हटलं की, डोक्यावर पदर घेऊन हसतमुखानं उभी असणारी नम्र आणि शालीन स्त्री असा सांस्कृतिक आभास काही मंडळी निर्माण करीत असतात.

प्रस्तुत अभंगात जनाबाई म्हणते, ‘माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला आहे.’ आता पदर खांद्यावर अनावधानानं, वार्‍यानं आला आहे काय? तसं असतं, तर तिला ते जाणवल्या क्षणीच तिनं तो नीट केला असता. परंतु, इथं पदर आपोआप खांद्यावर आलेला नाही, तर तिनं तो मुद्दाम आणला आहे. कोणतीही स्त्री भांडणाच्या, संघर्षाच्या, कृतिशीलतेच्या पावित्र्यात जाते, तेव्हा ती डोक्यावरचा पदर खांद्यावर घेऊन नीटपणे कमरेला खोचते. येथे जनाबाईंना स्पष्टपणे, निर्धारानं स्वतःवरील बंधनं, मर्यादा झिडकारायच्या आहेत. त्या इतर कोणी नसताना, गुपचूप पदर खांद्यावर घेतात असंही नाही. तर जाणीवपूर्वक पदर खांद्यावर घेतात. पुढच्याच चरणात त्या असं म्हणतात की, मी असा पदर खांद्यावर घेऊन भरल्या बाजारात जाईन. म्हणजे डोईवरचा पदर खांद्यावर घेण्याचा बंडखोरपणा त्यांना अख्ख्या गावाच्या साक्षीनं करायचा आहे. बाजारात स्वतःच्या गावातील आणि शेजारच्या गावातील लोक जमलेले असतील. अशा सार्वजनिक ठिकाणी, सर्वांना कळेल अशा प्रकारे ही बंडखोर कृती करायची आहे.

या भरल्या बाजारात त्या कोणाशी थेट भांडण काढतात काय? तर नाही. हातात टाळ आणि खांद्यावर वीणा घेण्याचं त्यांनी ठरवलं आहे. माझ्या या कृतीला कोण मनाई करतो ते मी पाहतेच, असा त्यांचा स्वर आहे. पूर्वपरंपरेनं स्त्रीला भक्तीचा, अध्यात्माचा अधिकार दिलेला नव्हता. तिला उपासनेच्या, अध्यात्माच्या क्षेत्रात येण्यास बंदी होती. परंतु वारकरी संतांनी तिला तो अवकाश, ती संधी मिळवून दिली. तिला अभंग लेखन, गायन याला प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं. त्यामुळंच जनाबाई सनातन्यांच्या विरोधात संघर्षसिद्ध झाल्या आहेत. भरल्या बाजारात येऊन अभंग गायन, वादन करण्याचं धारिष्ट्य दाखवत आहेत.

जनाबाईंचा पुढचा इरादा अजून चकित करणारा आहे. ती म्हणते, ‘मी पंढरपूरच्या पेठेत दुकान मांडले आहे. कोणाला माझ्या नावाने बोंब मारायची असेल, तर त्याने खुशाल तसे करावे.’ जनाबाईंच्या काळात पंढरपूर हे पेठेचं, बाजाराचं गाव झालं होतं. या गावात अनेकांची वर्दळ वाढली होती. असा एक सरळ अर्थही येथे आहे. त्याच बरोबर दुसरा अर्थ असा, की पंढरपूर ही भक्तीची पेठ निर्माण झाली होती. श्रीविठ्ठलाचा, नामदेवादी संतांच्या कीर्तनाचा लौकिक वाढला होता. दासी असणार्‍या जनाबाई जेव्हा बाजारात दुकान मांडतात, तेव्हा त्यांच्याजवळ विकण्यासाठी किंवा वाटण्यासाठी काय आहे? तर तो आहे वारकरी संप्रदायाचा आचार-विचार! नामस्मरणाची संता देऊन भक्तिमार्गाचा विकास करणं हे या संतांचं काम आहे. जेव्हा वारकरी संप्रदायाचं दुकान उघडलं जाईल, तेव्हा इतरांची धर्माची दुकानं ओस पडतील. अशा वेळी वैदिक सनातनी जनाबाईंच्या नावानं ओरडणार, शिव्याशाप देणार हे स्वाभाविकच होय. मात्र जनाबाई त्याची पर्वा करत नाहीत. तुम्ही खुशाल माझ्या नावाने बोंब मारा, असं त्या म्हणतात, कारण त्या आता वेसवा झाल्या आहेत, म्हणजेच त्यांनी मर्यादा सोडलेलीच आहे. आणि विठ्ठलाच्या घरात घुसल्या आहेत. जेव्हा एका समर्थ माणसाचा, त्याच्या प्रभावळीचा आधार मिळतो, तेव्हा घाबरण्याचं कारण उरत नाही. जनाबाईंना श्रीविठ्ठल आणि संतमंडळाचा आधार आहे. त्या बळावर त्या आपल्या विद्रोहाचा स्वर टिपेच्या स्वरात उच्चारत आहेत.

प्रस्तुत अभंग म्हणजे जनाबाईंची लेखनविषयक आणि कार्यविषयक भूमिका आहे. त्यांची भक्ती भावभोळी नाही तर डोळस आणि प्रखर तेजस्वी आहे, असं दिसून येतं. स्वतःची कृतिशीलता जनाबाईंनी अनेक अभंगांतून मांडली आहे. त्याचप्रमाणं सनातनी वैदिक ब्राह्मणांवर टीकाही केली आहे. एका अभंगात त्या म्हणतात,  ‘तुम्ही बाळा-भोळ्यांना ठकविता, ते आमच्यापाशी चालणार नाही. तुम्ही नामजपाचा गर्व धरता, वाचेने सोहं सोहं, म्हणजे परमेश्‍वर मीच आहे, अशी गर्जना करता. तुमच्यापाशी आशा, तृष्णा आहे. ती नाहीशी झाल्याशिवाय खरे ज्ञान, ईश्‍वरप्राप्ती मिळत नाही.’

अन्य एका अभंगात जनाबाई म्हणतात, ‘जे नम्रतेशिवाय स्वतःची योग्यता मिरवतात, ते ब्रह्मसुख कधी मिळवतील? जे डोळे झाकून खोटे-खोटे ध्यान करतात, त्यांना केशव कसा मिळेल? काही स्वतःला संत म्हणवितात आणि नग्न हिंडतात, त्यांच्या अंतरीची स्थिती मात्र खडबड असते. म्हणजे खर्‍या ज्ञानाचा, जितेंद्रीय अवस्थेचा अभाव असतो.’ एके ठिकाणी विश्‍वाच्या स्वरूपाची जाण नसणार्‍या अधिकारी ब्राह्मणांना त्या भिकारी म्हणतात आणि पंडित हे कुत्र्याप्रमाणे नको त्याच्यामागे लागल्याचं सांगतात.

जे भक्तिसुख, जी ईश्‍वर स्वरूपाची जाणीव ब्राह्मणांना नीटपणे कळाली नाही, ती जनीला मिळाली असल्याचं त्या म्हणतात.

ब्राह्मणाचे पोर| मागे दूध रडे फार॥
माता म्हणे बालकासी| दूध मागे देवापाशी॥
क्षिराब्धीची वाटी| म्हणे जनी लावी होटी॥

ज्यांच्या घरात परंपरेनं ज्ञान, ईश्‍वरोपासना चालत आली आहे. त्यांना त्यातील आनंद, सुख नीटपणे मिळत नाही. परंतु दासी जनीला मात्र ते भरभरुन मिळतं.

वरील अभंगातील कथन हे साधेसरळ वाटेल. जनाबाईचा अधिकार मोठा असल्यानं ते सत्यही मानता येईल. परंतु, ज्या काळात जनाबाई हे लिहीत होत्या, तो काळ पाहता, एका यत्किंचित दासीनं ब्रह्मवृंदाला कमी लेखणं, हे दुःसाहसच म्हणावं लागेल. परिणामी, तिला ब्रह्मवृंदाच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

आम्ही स्वर्ग लोक| मानू जैसा ओक॥

वैदिकांनी स्वर्ग या कल्पनेचा अफाट विस्तार करून भोळ्याभाबड्या सामान्यांना ठकवलं. एका बाजूस वास्तव जीवन हे मोहमाया आहे, असं म्हटलं, तर दुसर्‍या बाजूस स्वर्गाचं आमिष दाखवलं. स्वर्ग आणि त्याच्याही पुढे जाऊन मुक्ती कोणाला मिळते, तर जो वर्णाश्रम धर्माचे नियम तंतोतंत पाळतो त्याला. खरं तर, स्वर्ग हाही एक प्रकारचा मोहच आहे. स्वर्ग आणि मुक्ती या मानवी जीवनातील अत्युच्च मानलेल्या साध्याबद्दल वारकरी संतांची भूमिका मात्र तुच्छतेची आहे.

जनाबाई म्हणतात, ‘आम्ही स्वर्गलोकाला एखाद्या व्यक्तीने केलेल्या ओकारी (उलटी) प्रमाणे मानू. कारण, आम्ही पंढरीचे सुख अनुभवले आहे.’ ओकारी ही सर्वस्वी त्याज्य असते, तसा आमच्यासाठी स्वर्गलोक आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचं झालं तर सनातनी ब्राह्मण मृत्यूनंतरच्या स्वर्गाचे दाखले देतात. तर वारकरी पृथ्वीलाच स्वर्ग बनवण्याची आकांक्षा बाळगतात. साधारणतः याज्ञिक हे धन, मान, संतती यासाठी धडपडतात. जनाबाई या गोष्टी नाकारतात. विठोबाचं ध्यान, भक्तीचं सुख ही एकच गोष्ट मिळाली तरी पुरे, असं त्यांचं म्हणणं आहे.

काही ब्राह्मण पितरांना मोक्षप्राप्ती करून देतो, असं सांगून सामान्यजणांना लुबाडतात. त्याचंही वर्णन जनाबाईंनी आपल्या अभंगात केलं आहे. ब्राह्मणांस गाय दान दिल्यास तिची शेपटी धरून पूर्वज स्वर्गात जातात, असं सांगायचं. त्या मोबदल्यात हवी ती दक्षिणा उपटायची, असे उद्योग ही ब्राह्मण मंडळी करीत. अनंत जन्म-मृत्यू होताना, जे दुःख होतं त्याहून जास्त दुःख, मृत्यूनंतर सद्गती न मिळाल्यानं होतं, असं सांगून लोकांना घाबरविण्याचा प्रकार हे पुरोहित करतात. परिणामी,

‘भांबावले जन धावे आटाआटी| सांडुनिया कोटी अनंत पद॥’, अशी लोकांची अवस्था होते. परंतु जनाबाई म्हणतात, ‘मुक्तीसाठी मरावे लागत नाही; जे भक्ती करतात. त्याच्या पायी मुक्ती लागते.’

देवा देई गर्भवास| तरीच पुरेल माझा आस॥
परि हे देका रे पंढरी| सेवा नामयाचे द्वारी॥

असं जनाबाईंचं मागणं आहे. वारकरी संतांनी अनेक अभंगांतून भक्तिसुखासाठी आनंदानं पुनर्जन्म मागितला आहे. स्वर्ग आणि मुक्ती नाकारण्याचा बंडखोरपणा केला आहे.

श्री विठ्ठल हा भक्तांच्या हाकेला धावून येतो, असं मिथक संतांनी का निर्माण केलं? त्याची दोन कारणं आहेत. सामान्यतः विविध देव-देवतांबद्दल सामान्य माणसाच्या मनात आदरयुक्त भीती असते. देवाबद्दल अद्भुत वलय निर्माण करण्याचं कार्य अगोदरच्या सनातनी परंपरेनं केलं होतं. संतांनी हे वलय मोडलं. साक्षात विठ्ठलाचं मानुषीकरण केलं. म्हणून संतांचा विठ्ठल कुणाचाही नाश करण्यासाठी येत नाही, तर तो अडचणीत सापडलेल्या भक्ताला मदत करणार्‍या सज्जनाच्या रूपात येतो. खरं तर जनाबाईंचाच अनुभव असा आहे की, ‘ज्याचा सखा हरी| त्यावरी विश्‍व कृपा करी॥’ म्हणजेच ज्या छोट्या-छोट्या कामासाठी विठ्ठल येतो, ती कामं कुणीतरी सज्जन स्त्री-पुरुष करतात. जनी त्या सर्व मदतकर्त्यांना विठ्ठलाच्या रूपात पाहते.

प्रत्यक्ष देवाशी भक्तीच्या साहाय्यानं थेट नातं जोडलं जाऊ शकतं, असं संतांनी म्हटलं. देव धावत येतो, अशा कथा रचल्या. देवाला माय-बाप म्हटलं. त्यामुळं जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे ईश्‍वरोपासना, पूजाअर्चा या क्षेत्रातली मध्यस्थ पुरोहितांची हकालपट्टी झाली. संतांनी ब्राह्मण पुरोहित नाकारला. मध्यस्थ नाकारला. संपूर्ण वारकरी संप्रदाय मध्यस्थाशिवाय देवाशी स्वतःचं थेट नातं सांगू लागला. समाजाची ही मानसिकता घडविण्याचं काम संतांच्या या चमत्कार वाटणा-या मिथक कथांनी केलं. ‘विठो माझा लेकुरवाळा म्हणत’ जनाबाईंनी अनेक संतांच्या संदर्भातील मिथककथा रंगविल्या.

जनी म्हणजे देवाधिदेव| एक विठ्ठल पंढरीराव॥

श्री विठ्ठलामध्ये सर्व देवदेवता सामावल्या आहेत, अशी घोषणा करून समाजाची बहुदैवत उपासनेतून मुक्तता करणं, हे वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सर्व संतांनी आपापल्या परीनं त्याची उद्घोषणा केली. म्हणून त्या म्हणतात, ‘नामस्मरण ही सारभूत गोष्ट आहे. बाकी सारे असार आहे. म्हणून बाकी सर्व व्रते-उद्यापने बाजूस सारा आणि विठ्ठलाचे स्मरण करा. कारण पंढरीराव विठ्ठल हाच देवांचा देव आहे.’

अनंत लावण्याची शोभा| तो हा विटेवरी उभा॥
पितांबर माळ गांठी| भाविकासी घाली मिठी॥

असंही वर्णन जनाबाई करू लागतात. या ईश्‍वराचा, वारकरी उपासनेचा स्वीकार सर्वांनी करावा, असा उपदेश त्या करतात.

चला पंढरीसी जाऊ| रखुमादेवीवरा पाहूं ॥
हातीं टाळी मुखीं हरी| गात जाऊं महाद्वारी॥
स्नान करूं भिवरेसी| पुंडलिका पायापाशीं॥
डोळे भरुन पाहुं देवा| तेणे विसरुं देहभावा॥
ऐसा निश्‍चय करुनी| म्हणे नामयाची जनी॥

जनाबाईंनी वर्णन केलेली वारकरी परंपरेची भक्तिसाधना, कीर्तन पद्धती सव्वासातशे वर्षांनंतरही तशीच आहे. उत्कट भक्तिभावना, सगुणोपासना याचा मनःपूत आनंद त्यांनी घेतला. सर्वांना वाटला. परंतु त्या सगुण साकार रूपात जनाबाई अडकून राहिल्या नाहीत.

देव खातें देव पितें| देवावरी मी निजतें॥
देव देते देव घेते| देवासवे व्यवहारितें॥
देव येथें देव येथे| देवाविणें नाही रिते॥
जनी म्हणजे विठाबाई| भरुनि उरलें आंतरबाही॥

अशा शब्दांत त्यांनी देवाच्या सर्वव्यापी अस्तित्त्वाचा अनुभव मांडला. ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग दाखवून जनाबाईंनी अध्यात्माच्या क्षेत्रातील ठराविकांची मक्तेदारी नाकारली. जनाबाईंच्या तोंडून अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची भाषा ऐकून ब्रम्हवृंदांचा तीळपापड झाला असेल. रागाचा पार चढला असेल, हे निश्‍चित!

सुखे संसार करावा| माजी विठ्ठल आठवावा॥

सनातनी परंपरा, ब्रह्मचर्य, संसार, संन्यास आणि वानप्रस्थ अशी आश्रम व्यवस्था मानते. जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर संसारत्याग करून संन्यास घ्यायचा. ईश्‍वरसान्निध जाण्यासाठी उपासना करायची, असं सांगितलं आहे. घर-संसार म्हणजे मोहमाया असा पारंपरिक विचार आहे. ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी मोहमायारूपी संसाराचा त्याग ही पूर्वअट आहे.

याउलट वारकरी परंपरा संसार सुखाचा करण्यावर भर देते. संसार आणि ईश्‍वरोपासना एकाच वेळी करता येते, असं हे सांगणं आहे. म्हणूनच जनाबाई ‘सुखी संसार करावा| माजी विठ्ठल आठवावा॥’, अशा स्पष्ट शब्दांत ही नवी भूमिका मांडतात. जनाबाईंच्या सगळ्या अभंगांत प्रपंच आणि घरातील विविध कामं भरून राहिली आहेत. इतकंच नव्हे तर विठ्ठल त्यांना घरकामात सर्वतोपरी मदत करतो. याचा दुसरा अर्थ असा की, घर-संसार त्याज्य नाही. प्रत्यक्ष देवालाही हा संसार नाकारता आला नाही. या संसारात अलिप्त भावनेने वावरुन भक्तियोग साधता येतो, अशी मांडणी जनाबाई करतात.

पदक विठ्ठलाचे गेलें| ब्राह्मण म्हणती जनीनें नेले॥

जनाबाईंवर घेण्यात आलेला चोरीचा आळ हा त्यांच्या चरित्रातील महत्त्वाचा प्रसंग आहे. एक यत्किंचित शुद्र दासी कवित्त्व करते, अध्यात्माची आणि तत्त्वज्ञानाची भाषा बोलते. हे सनातनी ब्रह्मवृंदाला सहन झाले नाही. म्हणून येनकेन प्रकारे जनाबाईंना बदनाम करायचं त्यांनी ठरवलं. त्यातून विठ्ठलाचं पदक हरवणं आणि त्याचा आळ जनीवर येणं, असा प्रसंग घडल असावा. जनाबाईंनी तेरा चरणांच्या एका अभंगातून हा प्रसंग वर्णिला आहे.

हे कुभांड रचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपयोग झालेला आहे तो जनाबाईंच्या अभंगाचाच! जनाबाईंनीच आपल्या अभंगात असं लिहून ठेवलं आहे की, रात्री देव गडबडीनं येतो. जनीच्या सुखशेजेवर पडून तिच्याशी गुजगोष्टी करतो. गुज बोलता बोलता त्याला झोप येते. पहाटे गडबडीनं जनी देवाला उठवते. उजाडलं म्हणून सांगते. पदक माळा तिथेच टाकून जनीची वाकळ घेऊन (कदाचित तोंड लपवत) देव पळत सुटतो. इकडे महाद्वारी भक्त आल्यावर त्यांना कळून चुकतं की, देव्हार्‍यात चोरी झाली. काय घडलं, याचा शोध घेता घेता हे सर्वांना कळतं की ‘देव राबे दासी घरी’. ही बातमी सर्वत्र पसरते. दासी जनीची थोरवी प्रगट होते. जनाबाईंच्या वरील मिथकात्मक अभंगांचा आधार घेऊन पुढचा चोरीचा आळ रचण्यात आला असावा, असं वाटतं.

जनाबाई हा प्रसंग असा लिहितात, “एकदा विठ्ठलाचे पदक हरविले. ब्राह्मण म्हणतात, ते जनीनेच नेले आहे. ते जनीस म्हणतात, ‘अगे शिंप्याच्या जनी, नेलेले पदक आणून दे. देवासमोरच तुझे घर आहे. तुझे मंदिरात सातत्याने येणे-जाणे आहे.’ तेव्हा जनी विठोबाची शपथ घेऊन सांगते मी नेलं नाही. तेव्हा तिची वाकळ झाडून पाहतात. त्यातून खाली पडलेलं पदक घेऊन जातात. नंतर जनीवर चोरीचा आळ आणला जातो. ब्राह्मण तिला मारू लागतात. चाळीस गडी माणसे जनीला मारू लागतात. तिच्या दंडाला काढण्या बांधल्या जातात. तेव्हा जनी विठोबाचा धावा करते. चंद्रभागेत सूळ रोवला जातो. जनीला बोलावलं जातं. ती हातानं टाळी वाजवत, मुखानं विठ्ठलनाम घेत तिथं पोचते. काही लोक म्हणतात, उशीर झाला, आता जनीला सुळी द्या. जनी मोठ-मोठ्यानं विठ्ठलाचा धावा करते, तो येत नाही, म्हणून मेला की काय, असं म्हणते. तेव्हा त्या सुळाचं पाणी होतं. दासी जनी धन्य आहे, असं म्हटलं जातं.”

वरील अभंगातून काही गोष्टी स्पष्ट होतात. ब्राह्मण जनाबाईंवर चोरीचा आळ ठेऊन त्यांना मारहाण करतात. जनाबाईंना ठार मारण्याचाही त्यांचा हेतू असतो. परंतु शेवटी यशस्वी होत नाहीत. कारण ज्या सुळावर त्यांना बळी द्यायचं, त्या सुळाचंच पाणी होतं. कदाचित असं झाले असावं, संत म्हणून ख्यातकीर्त झालेल्या जनाबाईंवर ब्राह्मणांनी चोरीचा आळ घेतला असावा. गावच्या राजाला (पाटील) आपल्या गटात सामील करून घेऊन जनाबाईंना सुळी देण्याचं निश्‍चित केलं असावे. त्याच वेळी ही वार्ता सर्वत्र पसरली. लोकांनी गर्दी केली. जनाबाईंना काढण्या बांधून सुळाकडे नेताना त्यांनी विठ्ठलाचं गुणगान सुरू केलं. त्या प्रसंगाचं वर्णन करताना नामदेव एका अभंगात लिहितात.

माझा देवा तुला आला हो कंटाळा|
आळ हा घातला मजवरी॥
समजले मज, होते तुझे मनी|
नसावी ही जनी पांडुरंगा॥
करितां कामधंदा तुज आला शीण|
कंटाळले मन देवा तुझें॥
कासयासी बोल ठेवूं तुज देवा|
प्रारब्धाचा ठेवा फळा आला॥

अशा प्रकारचं जनाबाईंचं बोलणं ऐकून अनेकांची अंतःकरणं द्रवली असतील. लोकांना जनाबाईंचा सत्वशील स्वभाव माहीत असल्यानं त्यांनी तिची बाजू घेतली असेल. परिणामी, नाइलाजानं जनाबाईंना संपवण्याचा बेत रहित करावा लागला असेल. अंतिमतः ‘जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल’ या वचनाचा विजय झाला असेल. तपशील काहीही असो. जनाबाईं ब्रह्मवृंदाच्या षड्यंत्रात बळी पडल्या नाहीत. त्या लिहीत राहिल्या, भजन गात राहिल्या. वारकरी संतमंडळात त्यांना आदराचं स्थान मिळालं. पुढे दीर्घायुष्य लाभलेल्या जनाबाई कदाचित नामदेवांच्या बरोबरच समाधिस्थ झाल्या.

नामदेव-ज्ञानदेवांचा संस्कार घेऊन वाढलेल्या जनाबाई स्वतःचा स्वर प्रकट करत राहिल्या. स्त्रीत्त्वाचा अस्सल आविष्कार मराठीत प्रथमच धाडसानं व्यक्त करण्याचं कार्य जनाबाईंनी केलं. त्या काळाच्या संदर्भात त्यांनी केलेली बंडखोरी अत्यंत तेजस्वीपणे चमकते, कडाडून उठते. म्हणूनच जनाबाई विद्रोहाची अग्निशिखा वाटतात.

———————————

जनाबाईंचे साहित्य वैश्विक

‘जणू काही विश्वसाहित्याची एक मोठी कोठी असून, तिच्या किल्ल्या प्रबळ पाश्चात्य भाषांतील लोकांच्या ताब्यात असल्याचे भाबडे मराठी लोक मानतात. गेल्या शंभर वर्षांतील मराठी समीक्षेचा आढावा घेतल्यास टेनिसन-ब्राऊनिंगपासून एलिअट बेकेट अशा त्या मानाने दुय्यम दर्जाच्या साहित्यिकांची थोरवी मानणारे भाबडे मराठी विद्वान भीतभीतच तुकारामाची विश्वसाहित्यात गणना करताना दिसतील. पंचतंत्रे, उपनिषदे, रामायण, महाभारत, कथासरितसागर, गाथासप्तशती, भर्तृहरी, कालिदास, शूद्रक, विशाखदत्त, दंडिन, बाण आणि नंतर आधुनिक भाषांमधील म्हाईंभट, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई यांच्या जोडीचे (आपल्याला माहीत नसलेले) कितीतरी साहित्यिक आपल्या साहित्यचर्चेत क्वचितच आढळतात.’

(ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या ‘टीकास्वयंवर’ या ग्रंथात संत जनाबाईंचा केलेला गौरवपूर्ण उल्लेख.)

0 Shares
लोककहाणी जनाईची विठू माझा लेकुरवाळा