मी जातिपल्याडची

पराग पाटील

महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवण्याची आपली मानसिकता आपण रोज अनुभवतो. जे महापुरुषांचं तेच संतांचंही. प्रत्येक संत कोणत्या ना कोणत्या तरी जातीचे बनून उरले आहेत. अपवाद फक्त संत जनाबाईंचा, ज्यांची नक्की जात आपल्याला माहीत नाही. ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळंच तर जनाबाई सगळ्यांच्याच आहेत.

जी गोष्ट भल्याभल्यांना जमली नाही ती जनाबाईंना जमली. इतिहासाला जनाबाईंची जातच माहीत नाही. केवढी मोठी गोष्ट. लोकविलक्षणच.

ब्रॅण्ड कॉन्शिअस जमाना आहे. संतांना जातीच्या ब्रॅण्डची लेबलं लावणारे लावतातच. त्यात आपण कुठे जाऊन ज्ञातिपार जनाबाईंच्या जातीच्या संशोधनाची मढी उकरा, असा विचार मनात अर्थातच पहिला येणं स्वाभाविकच.

संताला कुठली आलीय जात? आपल्या आध्यात्मिक परंपरांमध्ये या सर्व इहवादी व्यवस्थेतून वर उठतो तो संत. तरीही  जनाबाईंची जात या विषयावर कशासाठी लिहायचं?

जनाबाईंच्या बाबतीत हीन किंवा शूद्र जातीचं आत्मभान त्यातून स्वयंस्पष्ट भक्तीमार्गानं संतपदाला पोचवणारा आध्यात्मिक काव्याविष्कार वगैरे मुद्दे सरावाच्या लिखाणानं गाठीशी होतेच. जनाबाईंची जात शोधण्याच्या नस्त्या उद्योगांचं समर्थन या मुद्द्यांमुळं होत असलं तरी मनाचं समाधान होत नव्हतं.

या संदर्भातल्या वाचनाच्या निमित्तानं दा. बा. भिंगारकर, रा. चिं. ढेरे, राजा ढाले, र. बा. मंचरकर, श्यामसुंदर मिरजकर या वैचारिक लेखन करणार्‍या संशोधकांच्या जनाबाईंच्या जातीविषयक थिअरीजही समजल्या. त्यातून जनाबाई महार होत्या, मातंग होत्या, कुणबी होत्या, गोपाळ समाजाच्या होत्या, धनगर होत्या याबाबतचे दावे-प्रतिदावे समजले. एवढंच.

जनाबाई शूद्र होत्या याबद्दल वाद नाही, त्या अतिशूद्र होत्या का किंवा अमुक एकाच जातीच्या होत्या का याचा शोध घेण्याचा प्रयत्न या विद्वानांनी का केला, हेच पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की या प्रयत्नांमागे संकुचित जातीय अभिनिवेश नक्की नाही. ना ‘रिंगण’मध्ये हा विषय घेण्यामागे तसा उद्देश आहे. ऐतिहासिक व्यक्तीची ज्ञातीविषयक मांडणी करण्याचा आणि त्या विषयावर काटेकोर डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसतो.

आता डॉक्युमेंटेशन करायला जावं तर ऐतिहासिक काही पुरावे नाहीत. संत जनाबाईंच्या नावे जे काही साडेतीनशे अभंग आहेत तेच ऐतिहासिक दस्तावेज. शिवाय नामदेवांचं विपुल साहित्य, नामदेवांच्या पत्नी राजाई यांच्या रचना आणि इतर संतांच्या अभंगांतून मिळणारे संदर्भ यातून जनाबाईच्या जातीचा संदर्भ काढणं खरोखरीच अवघड आहे.

स्वतः जनाबाईंच्या अभंगातून शूद्र आणि दासी याशिवाय काही संदर्भ लागत नाही. नामदेवांच्या रचनांमध्ये जनाबाईंचा फारसा उल्लेख येत नाही. राजाईंच्या रचनेतही जनाबाईंचा उल्लेख नाही. राजाईंच्या रचना म्हणजे ‘आहे मनोहर तरी’ पद्धतीचं फेमिनिस्ट लिखाणही आहे. त्यात नामदेवांच्या विठ्ठल नादामुळं संसाराची झालेली दशाही त्या मांडतात. आपल्या चौदा जणांच्या कुटुंबात राजाई पंधराव्या जनाबाईला धरत नाहीत. असं असलं तरी जनाबाईंच्या अभंगात येणारा एक उल्लेख आश्‍चर्याचा आहे. जनाबाईंवर देवाचं पदक चोरल्याचा आरोप होतो, त्या प्रसंगाचा वर्णन करणारा दीर्घ अभंग आहे. त्यात पंढरपुरातले ब्राह्मण तिला म्हणतात,

अगे शिंपियाचे जनी| नेले पदक दे आणुनी॥

म्हणजे पंधरावी वेडीपिशी जनी नामा शिंप्याच्या घरात इतक्या एकरूप झाल्या होत्या, की त्यांची ओळख शिंप्याची जनी अशीच बनली होती. अभंगात उल्लेख असलेले ब्राह्मण तिला शिंपी म्हणूनच ओळखतात. साडेसातशे वर्षांपूर्वी जातीच्या अशा ओळखी तुटणं सोपं नव्हतं. पण ते नामयाची दासी म्हणून जनाबाईंच्या बाबतीत तरी तुटलं होतं.

गंगाखेडच्या करुंड आणि दमा या शूद्र दाम्पत्याच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला, असा उल्लेख संशोधनातून पुढे येतो. जनाच्या लहानपणीच आईचं निधन झाल्यामुळं दमानं आपल्या मुलीला नामदेवांचे वडील दामा शेटी यांच्याकडे आणून ठेवलं. जातीय मापदंड लावले तर या आख्यायिकेत दमा आणि दामा शेटी यांच्यातील सामाजिक स्तर समान असावा असं अधिक वाटतं. शिंपी समाज त्या काळात शूद्र या वर्गवारीतच होता. जनाबाईंनी छोट्या नामदेवाला अंगाखांद्यावर खेळवलं, असंही म्हटलं जातं. म्हणजे जनाबाईंचं अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य असणं ही संकल्पना याबाबतीत फारशी टिकताना दिसत नाही. तरीही जनाबाई आपली वेदना नोंदवतातच. तक्रार आहे ती थेट विठ्ठलाच्या पायाशी,

राजाई गोणाई| अखंडित तुझे पायी॥
मज ठेवियले द्वारी| नीच म्हणोनि बाहेरी॥

याचा आधार घेऊन राजा ढाले त्यांना अतिशूद्र म्हणजे दलित मानतात. त्यांच्या थिअरीप्रमाणे जनाबाई या पंढरपूरपासून चार-पाच किलोमीटर अंतरावरच्या गोपाळपुर्‍यात राहात होत्या. त्या नामदेवांच्या घरात राहात नव्हत्या. गोपाळपुरा हा महार समाजातली पोटजात असलेल्या गोपाळ समाजाचा रहिवास होता.

अर्थात याबाबतीतही स्पष्टपणे काही पुरावे हाती येत नाहीत. समाजप्रबोधन पत्रिकेच्या ताज्या अंकात श्यामसुंदर मिरजकर यांनी एका लेखात त्याचा प्रतिवाद केला आहे. ते म्हणतात, ‘शिंपी हे पूर्वापार कडक जातिप्रथा पाळणारे होते. त्या काळात एका अस्पृश्य मुलीला दामाशेटी हे व्यापारी गृहस्थ स्वतःच्या घरात थारा देतील, असे वाटत नाही.’ जनाबाईंचे अभ्यासक दा. बा. भिंगारकरही जनाबाईंना आधीच्या सर्व महत्त्वाच्या अभ्यासकांप्रमाणे फक्त शूद्र मानतात, अतिशूद्र नाही. पण त्यांनी गाथेत नसलेला आणि औंधच्या भवानी ग्रंथालयातून शोधलेला एक अभंग दिला आहे. त्यानुसार विटाळ होईल म्हणून जनाबाईंना विठ्ठलमंदिरात येण्यासाठी मज्जाव केला जात असे,

आले व्रत एकादशी| जनी गेली राउळाशी॥
बुक्का घेऊनिया माळा| पाणी भरोनी भोपाळा॥
येता दुरोनी देखिली| अवघी घामाघूम झाली॥
होईल देवासी विटाळ| जाली फराळाची वेळ॥
फुलें माळा विखुरली| तुंब्याची ते गत जाली॥
देही प्रेमाचें भरीत| देवा जोडी दोन्हीं हात॥
नेत्री अश्रूंचिया धारा| केला संकल्प सारंगधरा॥
जनी बाहेर घातली| थोर गहिंवरे दाटली॥

जनाबाई आमच्याच असा दावा परंपरेनं करणारी अनेक जातीची मंडळी आहेत. जनाबाईंच्या जन्मगावी म्हणजे गंगाखेडला मंदिराजवळच्या धनगर गल्लीत त्यांना धनगर मानतात, रंगारी गल्लीत रंगारी मानतात, नवबौद्ध त्यांना महारच मानतात शिवाय त्यांचं साळवे असं आडनावही सांगतात. पंढरपुरात त्या परंपरेनं धनगर असल्याचं मानलं जातं. जनाबाईंचं घर असणारा गोपाळपुरा. त्याच्या या नावातच गोपाळ आहे. त्याचा रूढ अर्थ धनगर किंवा गवळी मानला जातो. पण गोपाळ हा भटका समाज महारांचीच एक पोटजात असल्याचं ढाले यांनी मुंबई इलाख्याच्या ब्रिटिशकालीन गॅझेटियरचा आधार देऊन मांडलं आहे. जनाबाई मातंग असल्याची मान्यता वारकर्‍यांच्या एका मोठ्या वर्गात आहे. मातंगांना तर तशी खात्रीच आहे. त्यानुसार त्यांनी आळंदी येथे एक मंदिरदेखील बांधलं आहे. याशिवाय त्या कुणबी असाव्यात असाही तर्क काही ठिकाणी सापडतो. त्या काळात मोलकरणीचं काम प्रामुख्यानं कुणबिणी करत असत, याचा आधार या तर्काला आहे.

असे तर्क खूप आहेत. पण ते सारे तर्कच. कारण जनाबाई त्यावर काहीच बोलत नाहीत. आपल्यासोबतच्या सगळ्याच संतांबद्दल भरभरून लिहिलंय. पण त्या स्वतःबद्दल फारसं लिहीत नाहीत. स्वतःच्या जातीबद्दल तर नाहीच नाही. याचा थोड्या वेगळ्या पातळीवर विचार जरूर करता येईल. जनाबाईंना आपल्या शूद्र जातीचं आत्मभान नक्कीच आलं होतं. आधीच पोरकेपण. त्यातून नामदेवांच्या घरात आश्रित म्हणून राहावं लागलं. शूद्र जातीमुळं भक्तिमार्गातले अडथळे त्यांना जाणवले असणार. त्यातून नामदेव महाराजांसारख्या संतश्रेष्ठाचा सहवास आणि रूढी-कर्मकांडाला बाजूला सारून नामस्मरणातून विठ्ठलभक्तीचा आविष्कार ही मोठी बंडखोरीची वाट त्या काळातल्या समाजाला दिसलेली. धर्ममार्तंडांनी देवाच्या दारी डावललेल्या लोकांना त्यांच्या रूढी-कर्मकांडांना बायपास करून भक्तीची ही नवी वाट दाखवण्याचं मोठंच काम नामदेवांनी केलं. त्या वाटेचा प्रभाव जनाबाईंवर पडला नसता तरच नवल. या संतांच्या गोतावळ्यांमध्ये त्या वयानं केवळ वडील नव्हत्या तर बुद्धिमानही होत्या. सर्व संतांशी कनेक्टेड होत्या. स्वतः रचना करत होत्या. आध्यात्मिक पातळीवर संतपदाचा दर्जा त्यांनी मिळवला. चातुर्वर्ण्यात राहून अंतर्गत बंडखोरीची परंपरा मोठी आहे. नामदेव काय किंवा जनाबाई काय किंवा त्यांना समकालीन असलेले अनेक संत ही बंडखोरी करत होते. आणि या बंडखोरीला दाद देण्याचा समजूतदारपणा आठशे वर्षांपूर्वीच्या समाजामध्येही होताच.

त्यामुळंच जनाबाईंना अतिशूद्र ज्ञातीचा सिद्धांत लागू होणं पचत नाही. स्त्री आणि अतिशूद्र असं कॉम्बिनेशन त्या काळात संतपदासाठी स्वीकारलं जाणं कठीण होतं. चोखोबांना आणि सोयराबाईंना त्यांच्या आध्यात्मिक उंचीमुळे संतपद मिळालं, पण त्यांना गावकुसाबाहेरच ठेवलं गेलं. जनाबाईंच्या बाबतीत इतकं डावलणं झालं नसावं. निदान तसे उल्लेख नाहीत.

आध्यात्मिक बंडखोरीच्या भावनिक कल्लोळात त्यांनी आपलं शूद्रपण मिरवलं. पण जातीचा उल्लेख टाळला. भागवत धर्माची पताका फडकावणार्‍या या बंडखोर संतांच्या मांदियाळीचं नेतृत्व जरी ज्ञानेश्‍वरांकडे असलं तरी नियोजन आणि अंमलबजावणीचे पडद्यामागचे सूत्रधार नामदेवच होते आणि नामदेवांचं शक्तिकेंद्र जनाबाईंकडे होतं. हे सगळं कोऑर्डिनेशन जनाबाईच करत होत्या. अगदी संत कबीरांचा आणि त्यांचाही संपर्क झाल्याचे उल्लेख आहेत.

ज्या विविध जबाबदार्‍या जनाबाईंनी पार पाडल्या आहेत त्या पाहता आठशे वर्षांपूर्वीच्या सामाजिक रचनेत अतिशूद्र स्त्रीला इतका वाव मिळण्याची शक्यता धूसर वाटते. अर्थात शूद्र आणि अतिशूद्र या संकल्पनांमध्ये वाद निर्माण करण्याचं आपल्याला कारण नाही. आठशे वर्षांपूर्वी एक निराधार शूद्र जातीची, दासी असलेली स्त्री अत्यंत भक्तिभावपूर्ण अलवार रचना करते, सेवापरायणतेचा आदर्श ठेवत भक्तिमार्ग चोखाळून संतपदाला जाते, सर्व संतांचा सांभाळ करत त्यांच्यात समन्वय साधणारी प्रशासकीय कुशलता प्राप्त करते, संतांची नेटकी चरित्ररचना करून त्यांचे अचूक डॉक्युमेंटेशन करते आणि एवढं करून अतिशय नजाकतीनं आपल्या जातीचा उल्लेख येणार नाही याची काळजी घेते. हे सारंच अलौकिक आहे.

असं वाटतं की जनाबाई त्यांच्या काळाच्या इतक्या पुढे होत्या की त्यांनी आवर्जून आपल्या जातीचा उल्लेख टाळला असावा. जनाबाई नावाची एक ज्ञातिपार संत होऊन गेली महाराष्ट्रात हीच ओळख जाणीवपूर्वक जनाबाईंनी जपली. म्हणूनच केवळ संत म्हणून नाही किंवा कवयित्री म्हणून नाही तर आध्यात्मिक वातावरणातही स्त्रीवादी मूल्यांची म्हणजे बाई या जातभानाची सहज पायाभरणी केलेल्या जनाबाईंसमोर नतमस्तक होण्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

———————————-

कास्ट ऑफ ऑल शेम

ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसनं १९९१ साली ‘वुमेन रायटिंग इन इंडिया’ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला होता. सुसी थरू आणि के. ललिता यांनी त्याचं संपादन केलं होतं. त्यात संत जनाबाईंवर दोन पानांचं टिपण आहे. या प्रकल्पाच्या मराठी भाषेच्या संपादक विद्युत भागवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात हे टिपण तयार झालं असावं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे नुकतेच दिवंगत झालेले कादंबरीकार विलास सारंग यांनी जनाबाईंचे दोन अभंग इंग्रजीत अनुवादित केले आहेत. त्यापैकी ‘डोईचा पदर आला खांद्यावर’ या अभंगाचा ‘कास्ट ऑफ ऑल शेम’ या शीर्षकाचा अनुवाद सोबत आहे. लिटल मॅगझिन चळवळीचं संतसाहित्याशी असलेलं नातं दाखवणारा हा आणखी दुर्लक्षित दाखला. शिवाय अंजली यार्दी यांनीदेखील जनाबाईंचे काही अभंग इंग्रजीत अनुवादित केल्याचे संदर्भ सापडतात. याच विषयी एक नोंद करायला हवी ती म्हणजे, हेमा राईलकर यांनी जनाबाईंचे अभंग जर्मनीत नेले आहेत आणि ते पुस्तकरूपानं प्रकाशितही झाले आहेत.

Cast of all shame,
and sell yourself
in the marketplace
then alone
can you hope
to reach the Lord.

Cymbals in hand,
a veena upon my shoulder,
I go about;
Who dares to stop me?

The pallav of my sari
falls away ( scandal!);
yet will I enter
the crowded marketplace
without a thought.

Jani says, My Lord,
I have become a slut
to reach your home.

0 Shares
भक्तीतरंगाचे उद्गार सेवा हेच धर्ममर्म