१९३८ मध्ये आलेल्या ‘संत जनाबाई’मधील जनाबाईंची भूमिका हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या अभिजात गायिकेनं केली होती. त्यांच्या भगिनी कमलाबाई बडोदेकर आणि बंधू सुरेश बाबू हे देखील या चित्रपटात त्यांच्याबरोबर होते. सुरेश बाबू आणि विष्णूपंत पागनीस यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं होतं. मो. ग. रांगणेकर या चित्रपटाचे लेखक आणि गीतकार होते. नारायण देव्हारे आणि नानासाहेब सरपोतदार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘प्रभात फिल्म कंपनी’नं १९४९चा ‘संत जनाबाई’ हा चित्रपट सुरुवातीला ‘संत नामदेव’ या नावानंच पडद्यावर आणायचा, असं ठरवलेलं होतं. नामदेवांना डोळ्यासमोर ठेवूनच शिवराम वाशीकरांनी या चित्रपटाची कथा तेव्हा लिहिली होती. वसंत पेंटर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. पण नंतर ही योजना बाजूला पडली. नामदेवांची कथा जनाबाईंना महत्त्व देऊन नव्यानं लिहिण्यात आली. ग. दि. माडगुळकरांनी ती लिहिली. लेखक बदलला जाताच या चित्रपटाचा दिग्दर्शक बदलला गेला. वसंत पेंटर यांच्याऐवजी गोविंद घाणेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक बनले. पण नामदेवांच्या भूमिकेतील अभिनेता तोच राहिला. विवेक त्यात नामदेव होते आणि हंसा वाडकर जनाबाई. सुधीर फडके या चित्रपटाचे संगीतकार होते. गदिमांनी लिहिलेली वीस गाणी या चित्रपटात होती. हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदीतही होता. हिंदीत या चित्रपटाचे संवाद आणि गाणी पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिली होती. १९४९लाच ‘सुरम्य चित्र’तर्फे नामदेवावरील ‘संत नामदेव’ हा चित्रपट पडद्यावर आला होता. जयराम शिलेदार या चित्रपटात नामदेव बनले होते. तर जनाबाईंची भूमिका सुमती गुप्ते यांनी केली होती. १९५१चा ‘विठ्ठल रखुमाई’ आणि १९६३चा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे दोन चित्रपट अनेक संतांची गर्दी झालेले चित्रपट होते. जनाबाई या दोन्ही चित्रपटांत होत्या. ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपट शत्रुजीत पॉल यांनी आपल्या शत्रुजीत फिल्म्सतर्फे निर्माण केला होता. स. म. शुक्ल त्याचे लेखक आणि गीतकार, मा. कृष्णराव संगीतकार आणि दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शक होते. सुलोचनाबाईंची या चित्रपटात जनाबाईंची भूमिका साकारली होती. ती साकार करत असताना त्यांनी या चित्रपटाचं चित्रण पाहायला जमलेल्या गर्दीला देखील प्रभावित केलं होतं. विठ्ठलाचा कंठा चोरल्याच्या आरोपावरून जनाबाईंना सुळावर चढवलं जातं, या दृश्याचं चित्रण कोल्हापूरजवळच्या कव्हेरी या खेड्यात केलं जात होतं. रस्त्यावरून त्याची मिरवणूक चालली होती. त्याच्या मध्यभागी जनाबाईंच्या पेहरावातील सुलोचनाबाई होत्या. पांढरेशुभ्र वस्त्र, कपाळाला टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात मंजिर्या नि मुखात हरिनाम, जनाबाईंचं हे अखेरचे दर्शन सर्वजण अत्यंत दुःखित अंतःकरणानं घेत होती. कोणी धाय मोकलून रडत होतं तर कोणी पूर्वसूचना दिल्याप्रमाणं मधेच येऊन जनाबाईंच्या पायावर लोटांगण घालीत होतं. ते वातावरण आणि सुलोचनाबाईंच्या चेहर्यावरील भाव पाहून खेड्यातील बायाबापड्यांना हा सारा प्रकार खराच वाटला. अनेक स्त्री-पुरुष ते दृश्य पाहण्यासाठी तेथे जमले होते. त्या दृश्याशी ते एकदम समरस झाले होते. यामुळं त्यांच्या गालावरून आसवांचा पूर वाहायला लागला. सुलोचनाबाईंना साक्षात जनाबाई समजून त्यांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं. याशिवाय फाऊंटन म्युझिक आणि सुमीत म्युझिक या कंपन्यांनी सीडीच्या स्वरूपात जनाबाईंच्या जीवनावर टेलिफिल्म तयार केलेल्या आहेत. फाऊंटनसाठी राजेश निमकर तर सुमीतसाठी राजू फुलकर हे त्याचे लेखक, दिग्दर्शक आहेत.
मराठी रंगभूमीवर संत मीराबाई (मीरा मधुरा), कान्होपात्रा (संगीत संत कान्होपात्रा) यांच्या जीवनावर आधारित नाटकं सादर झाली. परंतु जनाबाई मात्र मराठी रंगभूमीवर अवतरल्या नाहीत, ही खेदाने नमूद करावी अशी वस्तुस्थिती आहे.
संदर्भ : इसाक मुजावर लिखित ‘संतपटांची संतवाणी’
रिविजिटिंग जनी जनाबाईंच्या संदर्भखुणा