रिविजिटिंग जनी

अमृता मोरे

आजघडीला महाराष्ट्रातल्या कुठल्याही विशीपंचविशीतल्या मुलामुलीला संत जनाबाई कोण होत्या असं विचारलं, तर नावामागे संत आहे म्हणजे संतच होत्या, असं उत्तर मिळायची भीती आहे. मग या पिढीपर्यंत जनाबाई पोचवायलाच हव्यात. त्या कशा आणि कोणत्या रूपात पोचायला हव्यात? अर्थात सिनेमा आणि टीव्ही हीच नव्या पिढीची माध्यमं आहेत.

टेलिव्हिजनच्या कार्यक्रमांसाठी काम करत असताना यापूर्वी जनाबाईंविषयी वाचलेलं, लिहिलेलं होतं. पण ते त्यांच्या ढोबळ चरित्रापुरतंच मर्यादित होतं. अर्थात जनाबाईंचे काही अभंग माहीत होते. आणि त्यावरून माझ्या मनात त्यांच्याविषयीची एक प्रतिमाही तयार झालेली होती. माझ्या मनात जनाबाईंची जी प्रतिमा आहे, ती संत जनाबाई म्हणून नाहीच आहे मुळी. तर ती आहे जना नावाच्या एका बाईची, जनीची. मला वाटतं जनाबाईंकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार्‍या कुणालाही हीच प्रतिमा सापडत जाते. माझ्या मनातली ही जनाबाईंची प्रतिमा आणि आत्तापर्यंत पडद्यावर किंवा रंगमंचावर उतरवलेल्या जनाबाई यात खूप फरक आहे. प्रभातनं संत जनाबाईंवर एक चित्रपट काढलेला आहे. चित्रपटाच्या नावावरूनच तो संतपट आहे हे उघड आहे आणि प्रत्यक्षात तो सिनेमा पाहिल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होतं.

दादासाहेब फाळकेंनी चित्रपटाचं तंत्रज्ञान भारतात आणल्यानंतर सुरुवातीला चरित्रपटांची आणि त्यातही संतपटांची संख्या जास्त होती. त्यातले अनेक चित्रपट आजही पाहिले जातात. बहुसंख्य मराठी माणसांना संत माहिती आहेत ते ‘प्रभात’च्या चित्रपटांमधूनच, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. काही तुरळक अपवाद वगळता नव्या पिढीला तर संत ज्ञानेश्‍वर ते संत तुकाराम ही मंडळी पहिल्यांदा भेटतात ती प्रभातच्या चित्रपटांमधूनच. आणि त्यानंतर मराठीच्या पाठ्यपुस्तकांमधून. पण प्रभातच्या चित्रपटांमधून भेटलेल्या संतांच्या त्याच खर्‍याखोट्या प्रतिमा बहुसंख्यांच्या डोक्यात पक्क्या बसतात.

‘प्रभात’नं नेहमीच्या पठडीनं ‘संत जनाबाई’ नावाचा सिनेमा काढला आहे. त्यात विठ्ठलाचे अनेक चमत्कार, जनाबाईंचे होणारे हाल, त्यांचा सोशिकपणा आणि भक्ती हेच दिसतं. जनाबाईंच्या व्यक्तिमत्त्वातला तडफदारपणा त्यात कुठे सापडत नाही. जनाबाईंवर स्वतंत्र नाटक कोणी केल्याचं ज्ञात नाही. संत नामदेवांवरील नाटकात जनाबाई या अनेक पात्रांमधल्या एक पात्र म्हणून रेखाटल्या गेल्या आहेत. पण त्या तेवढ्याच. अलीकडे सुषमा देशपांडेंनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं स्त्री संतांवरचं ‘बया दार उघड’ हे नाटक बरंच वाखाणलं गेलं. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. पण हे नाटक फक्त जनाबाईंवरचं नाही. अर्थात, या नाटकाच्या निमित्तानं खर्‍या जनाबाई काही लोकांपर्यंत निश्‍चितच पोहोचल्या असणार. पण पुन्हा प्रायोगिक नाटक म्हटल्यावर ते लोकांपर्यंत पोहोचण्याला मर्यादा येतातच. त्यामुळे थोडक्यात बहुसंख्यांना जनाबाई माहीत नसण्याची आणि ज्यांना माहीत असेल त्यांना ती फक्त नामदेवांच्या घरची दासी म्हणूनच माहीत असण्याची शक्यता जास्त आहे.

तसं पाहता जनाबाईंच्या आयुष्याची एक सलग गोष्ट किंवा पट उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याच रचनांवरून, समकालीन संतांच्या काही रचनांवरून आणि इतर उपलब्ध माहितीवरून त्यांच्या आयुष्यातले प्रसंग रेखाटावे लागतात. तत्कालीन प्रेक्षकांच्या भावना आणि श्रद्धा पाहता ‘प्रभात’नं काढलेल्या चित्रपटात किंवा जनाबाईंवरच्या इतर कोणत्याही कलाकृतीत या प्रसंगांवर भर देण्यात आला असेल तर त्यात वावगं काहीच नाही. पण मुळात जनाबाई या चित्रपटात दाखवलेल्या किंवा त्यांच्या चरित्रातल्या लोकप्रिय झालेल्या चमत्कृतीपूर्ण प्रसंगांच्या पलीकडची स्त्री आहे. आज महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी परंपरेची मुळं आपण किती मागे जाऊन शोधतो? फार फार तर ताराबाई शिंदेंपर्यंत. पण खरंतर ती जनाबाईंपर्यंत जाऊन सहज शोधता येतात.

जनाबाई या आपल्याला माहीत असलेल्या आपल्याकडच्या पहिल्या ध्येयवादी महिला होत्या, असं म्हणायला हवं. संत साहित्याच्या आणि स्त्रीवादाच्या काही अभ्यासकांनी यापूर्वी मांडणीही केलेली आहे. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’, असं म्हणणार्‍या जनाबाईत मला आजची ध्येयवादी तरुणी दिसते. समाजाची, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ती आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहते. भले मग जनाबाईंचं ध्येय त्यांचा विठ्ठल असेल. पण आपण एक स्त्री आहोत आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं ध्येय असायलाच समाजानं बंदी घातलीय, हे नाकारून त्या तेच करतात जे त्यांना हवंय. जनाबाई त्यांच्या समकालीन पुरुष संतांच्या कार्याचं कौतुक करतात. त्यांना आपला सखा संबोधतात. प्रसंगी त्यांची एखादी चूकही दाखवून देतात. एवढं साहस त्या साध्या मोलकरणीकडे कुठून आलं असेल, असं राहून राहून वाटतं. हे पडद्यावर दिसलं तर आजच्या तरुणीला ते आपलं वाटणार नाही का?

जनाबाईंच्या सगळ्या रचनांमध्ये आपण स्त्री आहोत याविषयीचा एक प्रकारचा अभिमान डोकावत राहतो. किंवा त्या किमान आपल्या स्त्रीत्वाबद्दल न्यूट्रल तरी आहेत. त्यांना स्त्री असण्याचा जराही कॉम्प्लेक्स नाही. आपल्या बरोबरच्या स्त्रियांना त्या प्रसंगी उपदेशही करतात. त्या म्हणतात, ‘स्त्री जन्म म्हणवुनि न व्हावे उदास’. आणि असं असलं, तरी त्या त्यांच्या स्त्रीसुलभ भावनाही अगदी मोकळेपणानं व्यक्त करतात. ‘मरोनिया जावे बा, माझ्या पोटी यावे’ असं म्हणत त्या ज्ञानेश्‍वरांना आपल्या पोटी मूल म्हणून जन्म घ्यायची विनंती करतात. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता जिथे शिकल्यासवरलेल्या, स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रियांनासुद्धा आपण स्त्री आहोत याविषयी गंड वाटावा, शल्य वाटावं अशी स्थिती दुर्दैवानं आजही आहे. तिथे तेराव्या शतकातली ही जनी मात्र ह्या सगळ्याच्या पुष्कळ पलीकडे पोहोचलेली दिसते. आत्ताची परिस्थिती आणि समस्या जास्त जटिल आहेत असं गृहीत धरलं, तरीसुद्धा जनाबाईंचा आपल्या स्त्रीत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकमेवाद्वितीय होता हे मान्य करावंच लागेल. बाई म्हणून समाजानं आपल्यावर लादलेली बंधनं आपण झुगारतो आहोत. आणि त्यामुळे समाज आपल्यावर कोणत्याही थराला जाऊन टीका करू शकतो, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्या म्हणतात, की ‘तुम्ही मला वेश्या म्हटलं तरी चालेल, पण आता विठ्ठलाच्या घरी जायला निघाली आहे. तुम्हाला माझ्याविषयी करायची ती बोंबाबोंब तुम्ही करू शकता.’ साडेसातशे वर्षांपूर्वी या बाईमध्ये इतका बेडरपणा, इतका विद्रोहीपणा आणि असा ‘आय डोण्ट केअर’ अॅटिट्यूड कुठून आला असेल, हा प्रश्‍न पडल्यावाचून राहवत नाही.

पण मग पुढचा प्रश्‍न असाही पडतो, की आज ही जनी खरंच कोणाला माहितीये? आज ही जनी नेमकी कुठे आहे? त्यांच्या चारशे रचनांमध्ये आहे म्हणावं, तर त्याही आता वारकरी आणि अभ्यासकांपलीकडे फारशा कोणाला माहीत नाहीत. आपण मोठ्या अभिमानानं सांगतो, की आपले ज्ञानेश्‍वर, तुकाराम जगभर पोहोचले आहेत. त्यांच्या अभंगांची, ओव्यांची जगभर अनेक भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत. पण महाराष्ट्रातल्या किंबहुना जगातल्या स्त्रीवादाची मुहूर्तमेढ रोवणारी ही जनी आजच्या मराठी तरुणांनाच जिथं माहीत नाही, तिथं ती जगभर कधी आणि कशी पोहोचायची?

खरंतर सध्या जनाबाई जगभर पोहोचवण्यासाठी अत्यंत पोषक परिस्थिती आहे. टीव्ही आणि मोबाईलची दिवसेंदिवस वाढत चाललेली स्क्रीन साईज आणि शंभर कोटींच्या नफ्याची मोठी होत चाललेली यादी, या दोनच गोष्टी आपली विज्युअल डिमांड किती आणि कशी वाढत चाललीय ते अधोरेखित करायला पुरेशा आहेत. अगदी मराठी चित्रपटांच्या संख्येतही लक्षणीय म्हणता येईल, अशी वाढ होताना दिसतेय. असंख्य वाहिन्या आणि मल्टिप्लेक्समुळे काही अंशी पर्यायही वाढलेत. आज प्रत्येक जण आपल्याला जे हवं ते पाहू शकतो. प्रेक्षकांना चॉईस आहे, असं एकंदर चित्र दिसतंय. पण अर्थात निवड उपलब्ध पर्यायांमधूनच होऊ शकते. मग असं असताना साडेसातशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या जनीला भेटायचा पर्याय आपण जगासमोर ठेवायला काय हरकत आहे?

भारतीय चित्रपटांच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिलं, तर गेल्या एक-दोन दशकांत चरित्रपटांनी काहीशी बॅक सीट घेतली होती, असं म्हणायला हरकत नाही. शहीद भगतसिंगांपासून सरदार पटेलांपर्यंत आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत चरित्रपट अधूनमधून येत राहिले. पण फारसे दखलपात्र ठरले नाहीत. मात्र गेल्या पाच-सात वर्षांत आपल्या आदर्शांकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची, आपल्या इतिहासात पुन्हा डोकावून पाहण्याची गरज भासू लागलेली दिसतेय. जगभरात बोकाळलेला दहशतवाद आणि बळावत चाललेल्या हिंसक प्रवृत्तींना टक्कर देण्यासाठी नव्या दृष्टीनं भूतकाळ खणून पाहिला पाहिजे, असा काहीसा सूर आजूबाजूला जाणवतोय.

राजकुमार हिरानींनी ‘लगे रहो मुन्नाभाई’मधून महात्मा गांधी रिविजीट करून तो ट्रेंड परत आणला. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय विचारसरणीची मंडळी हा प्रयोग करून पाहताना दिसतायत. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे ओम राऊत यांचा ‘लोकमान्य’ हा चित्रपट. तसंच गेल्या काही वर्षांत तुकारामांवर, बालगंधर्वांवरही चित्रपट येऊन गेले. अगदी दादासाहेब फाळकेंवरही. यातले काही थेट चरित्रपट होते, तर काही त्या व्यक्तिरेखांच्या अनुषंगानं मांडलेली कथा. टेलिविजनवरही काही अंशी हाच ट्रेंड पाहायला मिळतोय. एकीकडे हिंदी चॅनल्सवर रामायण, महाभारत, महादेव, हनुमान, महाराणा प्रताप, झाशीची राणी यांच्यावरील मालिका तयार होतायत. तर इकडे मराठीत शिवाजी महाराज, रमाबाई रानडे, खंडोबा, तुकाराम पुन्हा ठोठावले जातायत. यामागे निव्वळ आर्थिक गणितं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण कुठेतरी मेकर्सना या विषयांना आणि इतिहासातल्या अशा व्यक्तिरेखांना हात घालावासा वाटतोय, प्रेक्षकांनाही ते पाहावंसं वाटतंय हे खरं. सध्या रंगभूमीवर मात्र असा ट्रेंड आलाय असं म्हणायला तितकासा वाव नाही. मराठी प्रेक्षकांना सॉक्रेटिसचं दर्शन घडवल्यानंतर अतुल पेठेंनी दोन वर्षांपूर्वी महात्मा जोतिबा फुलेंचंही पुनर्दर्शन घडवलं. अर्थात या यादीत नसलेले इतरही अनेक प्रयोग झाले असतीलच. पण थोडक्यात रिविजिटिंग इन आहे हे नक्की.

मग या व्यक्तिरेखांच्या पुनर्मांडणीत त्यांच्याकडे एका नव्या अँगलनं पाहताना प्रेक्षक म्हणून आपण आजच्या काळाशी त्यांची संगतीही तपासून पाहतो. जनाबाई त्या पातळीवर मला आजही निश्‍चितच रिलेवंट वाटतात. तसं पाहता ‘प्रभात’च्या काळापेक्षा आजघडीला चित्रपटाचं तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय की जनाबाईंच्या आयुष्यातले चमत्कार, आख्यायिका जास्त विश्‍वासार्ह रंगवता येतील. एवढंच काय, अगदी थ्रीडीतही पाहता येतील. पण जनाबाईंची वेणीफणी करणारा आणि तिच्याबरोबर जात्यावर धान्य दळणारा पांडुरंग बघण्यापेक्षा पांडुरंगावर हक्क सांगत आपल्यावर होणार्‍या अन्यायाची दाद मागणारी जनाबाई बघणं आजच्या प्रेक्षकाला जास्त आवडेल. तंत्रज्ञानाबरोबरच तो दृष्टिकोनदेखील आता अभ्यासकांनी विकसित केलाय. चोरीचा आळ आल्यावर देवभोळेपणानं नुसतीच देवाकडे गार्‍हाणं गाणार्‍या जनाबाई पाहण्यापेक्षा एक प्रामाणिक आणि सच्चा माणूस म्हणून आक्रोश करणार्‍या जनाबाई जास्त भावतील. आपण स्त्री आहोत आणि तत्कालीन समाजानं ठरवलेले तथाकथित शूद्र आहोत म्हणून आपल्याला कमी लेखणं, आपल्याला इतरांसारखे हक्क नसणं, हे कसं अयोग्य आहे, ते निडरपणे सांगणार्‍या जनाबाई जास्त आपल्या वाटतील.

साडेसातशे वर्षांपूर्वी ‘डोईचा पदर आला खांद्यावरी’, असं म्हणण्याची हिंमत दाखवणारी एक साधी बाई किती तेजस्वी असेल? आपल्या विचार, भूमिका आणि कृतीवर विश्‍वास असलेली कोणतीही व्यक्ती जशी तेजस्वी दिसते, तशीच ती दिसत असणार. तिच्यासारखी धैर्याची, बंडखोर आणि कणखर बाई गरीब बिचारी नक्कीच दिसत नसणार. एक प्रेक्षक म्हणून मला आज तथाकथित संतत्वाच्या ‘प्रभाती’ प्रतिमेच्या जनाबाईंपेक्षा या तडफदार जनीला भेटायची इच्छा आहे. आणि फक्त माझीच नाही, तर सगळ्या जगाची त्या जनीशी भेट व्हावी, असं मला वाटतं.

पण इतिहासातल्या स्त्रियांवर नाटक-सिनेमे करण्याची पद्धत आपल्याकडे नाही आणि जगभरही नाही. जागतिक सिनेमातही इतिहासातल्या स्त्री व्यक्तिरेखांवर फारसे चित्रपट बनलेले नाहीत. अगदी आत्ता मार्गारेट थॅचरवर आलेला ‘द आयर्न लेडी’, किंवा व्हिक्टोरिया, एलिझाबेथ, क्लिओपात्रा यांच्यावरचे सिनेमे वगळता स्त्रिया तशा जागतिक पातळीवरही दुर्लक्षितच राहिलेल्या आहेत. सत्तर-ऐंशीच्या दशकात कधीतरी रझिया सुलतानवर एक हिंदी चित्रपट आला होता. पण असे दोनचार अपवादच. अगदी आपल्याकडे पाहिलं, तर राजमाता जिजाबाईंना आपण इतकं मानतो, पण चित्रपट काढताना तो शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून काढला जातो. ना कस्तुरबांवर असा काही चित्रपट निघालाय, ना झाशीच्या राणीवर. फार पूर्वी ब्लॅक अँड व्हाईटच्या काळात सोहराब मोदींनी झाशीच्या राणीवर सिनेमा केला होता. पण त्यातही झाशीच्या राणीपेक्षा सोहराब मोदींचा राजगुरूच जास्त दाखवला होता. मृणाल कुलकर्णींनी नुकताच ‘रमामाधव’ बनवला. पण तोही काही रमेच्या दृष्टिकोनातून नाहीच. अर्थात त्याचा तसा उद्देशही नव्हता.

कोणत्याही नाटक, चित्रपट, मालिकेत जेव्हा नायिका चितारायची असते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आयुष्यात नाट्य असावं लागतं. आणि ती व्यक्तिरेखा म्हणून अतिशय सक्षम लागते. ‘अ वूमन विथ सबस्टन्स’ ही ती कळीची फ्रेज. आपण जर जनाबाईंकडे एखाद्या कलाकृतीची प्रोटॅगोनिस्ट म्हणून पाहिलं, तर तिच्या आयुष्यात नाट्य तर अगदी खचून भरलेलं आहे. अँड येस… शी इज डेफिनेटली अ वूमन विथ सबस्टन्स. आणि म्हणूनच आपली ही जनी तिच्या प्रखर स्त्रीवादी जाणिवांनिशी पडद्यावर कधी येतेय याची रास्त प्रतीक्षा. गुलजारांनी मीरा हिंदी सिनेमात आणली, त्यापेक्षाही एक पाऊल पुढे असायला हवी आमची जनाबाई.

0 Shares
अभंगांची गाणी पडद्यावरचा इतिहास