नामदेवनो गुजरात

धवल पटेल

नरसी मेहता हे गुजरातचे आद्य संतकवी. त्यांच्यावरचा नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. नामदेव आणि नरसी या भावबंधाच्या पायावरच महाराष्ट्र आणि गुजरात हा भावबंधही उभा राहिला आहे, याची नोंद घ्यायला हवी. सांगत आहेत, अहमदाबादचे पत्रकार धवल पटेल.

गुजरातेत कुठेही जा संतकवी नरसी मेहतांचा प्रभाव दिसून येतोच. वैष्णव जन तो या त्यांच्या काव्यामुळे तर आज ते भारतभर पोहोचले आहेत. आपल्या रसमधुर भक्तिकाव्यानं गुजरात-राजस्थानातीलच नव्हे, तर समस्त भारतीय भाविकांची मनं मोहून टाकली आहेत. ते गुजरातीचे आद्यकवी म्हणूनही गौरवले जातात. पण गुजराती न कळणा-यांना देखील मोहवून टाकेल इतकं त्यांचं काव्य सहजसुंदर आणि भावपूर्ण आहे. त्यांच्या उदयानंतरच खऱ्या अर्थानं गुजरातेत भक्तिकाव्याची सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या लीलागायनात हरवलेला हा कविराज अनेक सारस्वतांना स्फूर्ती देऊन गेला. जनमनावर त्याच्या भक्तिगीतांचा विलक्षण ठसा उमटला.

महाराष्ट्राला नरसी मेहता माहीत आहेत, ते महिपतीबुवा ताहिराबादकरांच्या ‘भक्तविजया’मुळे. त्यात वारकरी संतांबरोबरच नरसींचंही चरित्र आहे. त्याशिवाय नामदेवांचीच नाममुद्रा घेऊन काव्य करणा-या विष्णुदास नामा या सोळाव्या शतकातील कवीनंही नरसींचं चरित्र मराठीत लिहिलं आहे. नामसाधर्म्यामुळे ते नामदेवांच्या नावावरही चढवण्यात आलं आहे. पण नामदेव हे नरसींचे पूर्वसूरी आहेत, यात आता कोणालाही संशय नाही. नरसींच्या गीतांत नामदेव, कबीर यांच्याविषयींचा आदरभाव व्यक्त झालेला आहे. नामदेव-कबीरांनी आपल्याला वाट दाखवली, असं ते म्हणतात. ‘आपी कबीर अविचल वाणी, नामदेव हरिशुं प्रीत्य।‘, अशी नरसींची कबीर-नामदेवांविषयीची कृतज्ञ भावना दिसते. ‘हारमाळा’ या नरसींच्या गाथेत नामदेवांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे.

‘भक्ति-वश विठ्ठलो, संत साथ मळ्यो’ म्हणजेच भक्तिभावानं विठ्ठल वश होतो, हे सांगताना ते नामदेवांची साक्ष काढतात. पंढरपूरचा उल्लेखही ते आदराने करतात,

‘पांडरपुर नगर छे एक, तेह माहि नामो सोइ विसेख ।’

पंढरपुरातच नामदेवांच्या हट्टासाठी विठ्ठल एकदा दूध प्याला, ही लोककथा नरसींना माहीत आहे. ‘नामिचे हाथ तिं दूध पियूला’ असं त्यांनी या प्रसंगाचं वर्णन केलं आहे.

नरसींच्या वाणीवरील महाराष्ट्राचा प्रभाव केवळ नामदेव आणि पंढरी यापुरताच मर्यादित नाही. मराठी भाषेचाही स्पष्ट ठसा त्यांच्या पदावलीवर उमटला आहे. ‘चो’, ‘ची’, ‘चुं’ या षष्ठीच्या मराठी प्रत्ययांचा त्यांनी मुक्तपणानं वापर केला आहे. त्यांच्या जवळ जवळ प्रत्येक पदाच्या अंतिम चरणात असे प्रयोग आढळतात :

नरसोयाचो स्वामी दै आलिंगन, विरह ताप समावे रे।
नरसैयाचा स्वामी कहुं तमने क्षणुं, अळगो न थाये रे।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. नामदेवांच्या नाममुद्रेचा स्पष्ट ठसा त्यांच्या नाममुद्रेत दिसेल. नामदेवांच्या हिंदी पदावलीचंही त्यांनी पठण केलं असलं पाहिजे. त्या मराठी-प्रभावित हिंदीची अगदी सहज जाणवणारी छाप नरसीवाणीवर आहे.

हमची वार कां बधिर होईला?
आपुला भक्त कां वीसरि गेला?
आपुला मंदिरमा हो, सखी जालवले दीवडो।
घणे दहाडले, पीयु पाहुणला आव्या, आदर गोरवा दीजे।

गुजराती साहित्याच्या इतिहासकारांनी नरसीवरील नामदेवांचं ऋण मान्य केलं आहे.
डॉ. प्रभात लिहितात : ‘कृष्ण-काव्य-रचयिताओंकी परंपरामें नामदेवका नाम भी गिनाया जाता है। गुजरातके नरसिंह मेहता जैसे भक्तकवियोंवर इनका बहुत अधिक प्रभाव पडा था। उन्होंने इनसे छाप की पद्धती ही ग्रहण नहीं की थी, उनके ‘हारसमे’ के पदोंमे संबोधनकी रीति और उनकी आर्त भावना पर नामदेवकी छाप दिखाई पडती है।‘

नरसींना एका दक्षिणी साधूचा गुरूप्रसाद लाभला होता, अशा अनेक कथा रूढ आहेत. त्यावरून ते दक्षिणी संतांच्या संपर्कात होते, हे स्पष्ट होतं. हा वारकरी संप्रदायाचाही प्रभाव असण्याची शक्यता आहे. कारण नरसींचा निजखूण असणारी तुळशीची माळ, सर्व जातींमधे विशेषतः अस्पृश्यांमधे जाऊन केलेला विचारांचा प्रसार, स्थानिक भाषेतून केलेली अत्यंत सोपी काव्यरचना, शाकाहाराचा आग्रह, शैव वैष्णव आणि सगुण निर्गुण भेदांमधला समन्वय ही वारकरी परंपरेची वैशिष्ट्यं नरसींकडे स्पष्टपणे दिसून येतात. नरसी हे आपल्याच परंपरेतले एक आहेत, अशी सर्वसाधारण भावना याचमुळे वारकरी संप्रदायात साधारणपणे दिसून येते.

नामदेवांनी आपल्या तीर्थाटनात गुजरातला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. त्यांच्या पहिल्या तीर्थयात्रेत तर ज्ञानेश्वरांसह सगळा संतमेळाही त्यांच्यासोबत होता. या प्रवासात त्यांनी द्वारका, प्रभासपट्टण आणि जुनागढ या तीर्थस्थळांचा उल्लेख केलेला आहे. जुनागढ हे नरसींचं गाव. नामदेवांनी केलेल्या तीर्थयात्रा या सर्वसाधारणपणे नाथपंथीयांच्या ठरलेल्या मार्गानेच केल्याचं मानलं जातं. त्यामुळे पुढच्या तीर्थयात्रांमध्येही गुजरात विशेषतः जुनागढ हा त्यांचा ठेपा असण्याची दाट शक्यता आहे. पण आज त्याच्या काहीही खुणा गुजरातेत सापडत नसल्याचं नामदेवांच्या ज्येष्ठ अभ्यासक वीणा मनचंदा सांगतात.

नामदेव जिथे गेले तिथल्या भाषेत त्यांनी रचना केल्या. त्यामुळे त्यांच्या भाषेत गुजराती, राजस्थानी शब्द असल्याचंही अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे. नामदेवांची एकूण काम करण्याची पद्धत पाहता ते गुजरातेत जाऊन तिथं आपला प्रभाव पाडणार नाहीत, हे शक्य वाटत नाही. फक्त नरसीच नाही तर इतरही अनेक गुजराती संतांनी आपल्याला वारकरी परंपरेशी जोडलेलं दिसतं, हा नामदेवांचा प्रभाव मानायला हवा. नामदेव तिथल्या लोककाव्यात येतात. गुजरातीत संतांच्या कथा लिहिल्या गेल्या तेव्हा नामदेवांच्या कथाही त्यात होत्याच. नामदेवांवर गुजरातीत पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच नामदेवांच्या चमत्कारांच्या कहाण्यांवर आधारित एक सिनेमाही गुजरातीत असल्याचं जाणकार सांगतात. महाराष्ट्रासारखंच गुजरातमध्येही नामदेव हे जुन्या पिढ्यांतील एक प्रचलित नाव आहे. तसंच गुजरातमधला सर्व पोटजातींमधील शिंपी समाज नामदेवांना आपला आदर्श मानतो. या समाजातील काही पोटजाती आपला उल्लेख नामदेव समाज असाही करतात. अहमदाबाद, सूरत, बडोदे या आणि इतरही गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये शिंपी समाजाच्या ज्ञातिसंस्था आहेत. त्यांच्या नावात नामदेवांचा उल्लेख आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात हा सांस्कृतिक भावबंध आज दृढ झालेला आहे. गुजरातेत जन्मलेल्या चक्रधरांमुळे महाराष्ट्रात प्रबोधनाची पहाट उगवली आणि महाराष्ट्राच्या नामदेवांनी नरसींच्या रूपानं गुजरातेत भक्तीचा मळा फुलवला, याची नोंद महाराष्ट्र आणि गुजरात या सांस्कृतिक भावबंधाचा विचार करताना या परंपरेला टाळून कुणालाच पुढं जाता येणार नाही.

(संदर्भ : ‘श्रीनामदेव दर्शन’ आणि ‘श्रीनामदेव : एक विजयगाथा’)

0 Shares
म्हारो नामदेव आमचं नाव नामदेव!