मायमराठीतील सर्वात थोर साहित्य ‘अभंग’ या छंदात निर्माण झालं. त्या अभंगांचे निर्माते असण्याचं श्रेय संत नामदेवांना आहे. त्यांनी फक्त अभंगाची निर्मिती केली नाही, तर त्याची छंदशास्त्रीय मीमांसाही केली. अभंगांतून पुढे वारकरी परंपरेतील भजन आणि कीर्तनाचा जन्म झाला. त्यातूनच मराठी माती कसदार झाली. सांगताहेत प्रा. नि. ना. रेळेकर…
प्राचीन मराठी वाङ्मयाचा युगारंभ ओवी आणि अभंग या दोन देशी म्हणजेच मराठमोळ्या अक्षर-छंदांनी झाला आहे. मराठी ओवी ही अभंगाच्या आधी जन्माला आली. चालुक्य राजघराण्यातील सोमेश्वर राजानं इ.स. ११२९च्या सुमारास रचलेल्या आपल्या ‘मानसोल्लास’ अथवा ‘अभिलषितार्थ-चिंतामणि’ या ग्रंथात ओवीचा उल्लेख करून ती जनमानसापर्यंत पोहोचल्याचाही निर्देश केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी कवित्वानं आणि रसिकत्वानं सुसंस्कारित झालेल्या ज्ञानशील ओवीला ‘तेणें आबालसुबोधें। वोवीयेचेनि प्रबंधे। ब्रह्मरससुस्वादें। अक्षरें गुंथिलीं।।’ असा परतत्त्वस्पर्श केला आणि ‘ओवी ज्ञानेशाची’ या नामाभिधानानं ती कृतार्थ झाली.
मराठी भाषेच्या पूर्वकालातील या वाङ्मयीन पार्श्वभूमीवर, भगवद्भक्तीत तल्लीन झालेला आणि गेयतेचे जन्मदत्त वरदान लाभलेला मराठी अभंग संतशिरोमणी नामदेवांच्या मुखातून प्रथमतःच अवतरला आणि वारकरी संस्कृतीत भजन-कीर्तनाच्या नव्या प्रबोधन युगाचा शुभारंभ झाला. ‘शतकोटी तुझे करीन अभंग।’, अशी प्रतिज्ञाच संत नामदेवांनी विठ्ठलासमोर केली आणि या लोकोद्धारक सत्कार्याचा वसा मराठी-हिंदी या उभय भाषांत अभंगरचना करून आयुष्यभर सांभाळला. पराकोटीच्या समर्पित भावभक्तिपोटी नामदेवांनी पांडुरंग-विठ्ठलावर शतकोटी अभंग रचण्याची शपथ वाहिल्याचं आत्मनिवेदनपर अभंगांचं परिशीलन करताना आपल्याला कळून येतं.
‘चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी। वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला।।’ या सात कडव्यांच्या अभंगात संत नामदेव सांगतात, चंद्रभागेच्या तीरावर (पुराणिकाच्या मुखातून) वाल्मिकी ऋषींनी शतकोटी ग्रंथ केल्याचं मी ऐकलं. (मी माझ्या विठ्ठलावर असा ग्रंथ केला नाही या विचारानं) माझ्या चित्ताला अत्यंत दुःख झालं आणि माझं सर्व आयुष्यच वाया गेलं (असं मला वाटलं) त्याच भावावस्थेत राउळात जाऊन, विठ्ठलाला विनवून सांगितलं, की वाल्मिकींनी (शतकोटी) रामायण रचलं आहे. मी जर तुझा खराखुरा भक्त असेन तर, देवा ‘शतकोटी तुझे करीन अभंग।’ हा माझा पण तू सिद्धीला ने. त्यावर पांडुरंग म्हणाले, ‘नामया माझं तू ऐक.’ (वाल्मिकीच्या) काळात माणसांना भरपूर आयुष्य होतं. (त्या तुलनेने) आताच्या काळात, त्यांच्या आयुष्याचा कालावधी फारच कमी आहे. नामदेव (देवाला उद्देशून) म्हणतात, की माझी (शतकोटी अभंगरचनेची प्रतिज्ञा) पूर्ण झाली नाही तर ‘जिव्हा उतरीन तुझ पुढें।’
शतकोटी अभंगरचनेचा असा महासंकल्प नामदेवांनी विठ्ठलापुढे केला होता. त्यांच्या मनात त्या महासंकल्पाचे विचारचक्र सुरू असतानाच, त्या रात्री झोपेत त्यांना एक स्वप्नवत अनुभूती आली. त्या दिव्यानुभूतीला त्यांनी पुढीलप्रमाणे शब्दरूप दिलं आहे –
अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ।।१।।
अभरांची संख्या बोलिले उदंड। मेरू सुप्रचंड शर आदि ।।२।।
सहा साडेतीन चरण जाणावे। अक्षरें मोजावीं चौकचारी ।।३।।
पहिल्यापासोनि तिसऱ्यापर्यंत। अठरा गणित मोज आलें।।४।।
चौकचारी आधीं बोलिलों मातृका। बाविसावी संख्या शेवटील
दीड चरणाचें दीर्घ तें आक्षर। मुमक्षु विचार बोध केला।।६।।
नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी। प्रीतीनें खेचरी आज्ञा केली ।।७।।
या अभंगाचा भावार्थ : (श्रीनामदेवमहाराज सांगतात) अभंगरचनेची कला माझ्या ठायी नाही. त्याबाबतीत मी नेणता आहे. त्या केशिराज विठ्ठलानं प्रेमभरानं (ती मला) सत्वर अवगत करून दिली. प्रत्येक अभंगचरणात किती अक्षरसंख्या असावी याविषयी (माझ्याशी देव) सविस्तर बोलले. (दोन) चरणांच्या मध्यभागी ठळक उभा दंड असावा. सहा अक्षरांचा एक याप्रमाणं तीन पूर्ण चरण आणि शेवटचा (चार अक्षरांचा) अर्धा चरण त्यात असावा, हे जाणून घ्यावयास मला सांगितलं. याप्रमाणे अक्षरे मोजून, त्या चार चरणांचा एक चौक (कडव्याच्या स्वरूपात) करावा. पहिल्या (सहा अक्षरी) चरणापासून ते (दुसऱ्या आणि) तिसऱ्या (सहा अक्षरी) चरणापर्यंत, एकूण अक्षरांची संख्या मोजून, त्याचे गणित (बेरीज) केल्यास ती अठरा होते. या आधीच चार चरणांच्या चौकाविषयी (कडव्याविषयी) आणि त्यातील अक्षरसंख्येविषयी सांगितलं असल्यानं एकूण चौकाची (म्हणजे कडव्याची) अक्षरसंख्या बावीस एवढी शेवटी होते. याप्रमाणे ‘दीड चरणाचे दीर्घ तें अक्षर।’, याची जाणीव देऊन भक्ताला तोषवील असा बोध (देवाने संत नामदेवांना) केला. संत नामदेव सांगतात की त्या श्रीहरीनं मला स्वप्नात अभंगछंद (सविस्तर) शिकविला. मी जागा झाल्यावर श्रीविसोबा खेचरांना या अलौकिक स्वप्नानुभवाविषयी सांगताच (त्यांना आनंद झाला आणि) त्यांनी त्यानुरूप अभंगरचना करण्याची प्रेमानं मला (संत नामदेवांना) आज्ञा केली.
या अभंगाच्या आशयाचा विचार केल्यावर नामदेवांच्या ऊर्जस्वल प्रतिभेला अकस्मात अभंगछंदाचे स्फुरण झाल्याचं स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं. या आपल्या नव्या अभंग-छंदाची नेमकी छंदःशास्त्रीय अक्षररचना सर्वांना कळावी या उद्देशानं प्रस्तुत अभंग लिहून, त्यांनी स्वतः आदर्श उदाहरण घालून दिले. हा अभंग संत नामदेवांच्या जीवनात, वारकरी संप्रदायाच्या एकूण अभंगवाङ्मयात आणि प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. या अभंगाची दखल अभ्यासकांनी आणि मराठी छंदःशास्त्रकारांनी आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतलेली नाही.
कै. वि. का. राजवाडे यांच्या १९२६मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मराठी छंद’ या पुस्तिकेत ज्या छंदात भंग नाहीत तो अभंग, असं म्हटलं आहे. अभंगांविषयी लिहिताना राजवाड्यांनी चतुराईने ‘अभंग छंदाला इतर संस्कृत वृत्ताप्रमाणे गण, मात्रा व नियमित अक्षरे असतात, असं नामदेवाला विसोबा खेचराने सांगितलं होतं, असं पदरचं एक विधान अर्थात सहेतुकपणे घातलेलं आहे. वस्तुतः या अभंगात कुठेही हा अर्थ निघत नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही कै. राजवाड्यांना वैदिक छंदोरचनेशी नामदेवांच्या अभंग-छंदाचं नातं जोडायचंच असल्यानं त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने या अभंगार्थात काल्पनिक भर घातली आहे. अभंगाचे प्रकारभेद करतानाही वैदिक छंदपरंपरेचा वारसा सांगणारी नावंच अभंगप्रकारांना देण्याची दूरदृष्टीही त्यांनी दाखविली आहे. ‘छंदोरचना’कार माधवराव पटवर्धनांनी कै. राजवाडे यांच्या या पुस्तिकेवर ‘राजवाडे यांनी काही कल्पकता दाखविली असली तरी त्यांचे विवेचन साधार, सोपपत्तिक आणि निर्णायक वाटत नाही. कामात निष्काळजीपणाही झाला आहे.’ अशा शब्दांत दिलेला हा अभिप्राय, पुरेसा बोलका आहे.
स्वतः माधवराव पटवर्धनांनी आपल्या ‘पद्प्रकाश’ या आटोपशीर पुस्तकात आणि ‘छन्दोरचना’ या प्रबंध-ग्रंथात अभंगावर आणि अभंगछंदावर कोणतंही स्वरूप-लक्षणात्मक विवेचन केलेले नाही. पटवर्धन यांच्या ‘छन्दोरचना’तील छंदःशास्त्रीय विचारांचा पुरस्कार करणारे डॉ. ना. ग. जोशी यांनी मराठी छंदोरचनेचा विकास, मराठी छंदोरचना (लयदृष्ट्या पुनर्विचार) आणि तुलनात्मक छंदोरचना ही तीन व्यासंगपूर्ण पुस्तकं लिहून मराठी भाषेत छंदःशास्त्राच्या अभ्यासाचा एक आदर्शच निर्माण केला आहे. त्यातील ‘मराठी छंद’ या पुस्तकात ‘ओवी-अभंग’ या उपशीर्षकाखाली, या दोन महत्त्वाच्या मराठी छंदांचे काहीशा विस्तारानं छंदःशास्त्रीय विवेचन केलं आहे. त्यात त्यांनी ‘ओवी’चे मालात्मक रूप ‘अभंग’ नावाने ओळखले जाऊ लागले, असं विधान केलं आहे.
राजवाडे, पटवर्धन इत्यादी छंदःशास्त्रकारांच्या दृष्टिपथात न आलेल्या; पण ‘अभंगाची कळा’ या अभंगाएवढ्याच तोलामोलाचा असणाऱ्या नामदेवांच्याच ‘मुख्य मातृकांची संख्या।’ या आणखी एका अभंगाचे रूपदर्शन घेणे उचित ठरेल. कारण तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात नामदेवांनी अभंग-छंद निर्माण करून त्याची छंदशास्त्रीय मीमांसाही केल्याचं या अभंगातून दिसून येतं. मराठी छंदःशास्त्राच्या, साहित्यशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. अभंग-छंदाची मायकूस संत नामदेवांची देशी मराठीच आहे, हे निर्विवादपणे इथे सिद्धच झालं आहे. अभंगांआधी कित्येक वर्षे रूळलेल्या मौखिक आणि ग्रांथिक ओव्यांची अशी छंदःशास्त्रीय मांडणी या कालापर्यंत कुणीही केलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर संत नामदेवांचे हे अभंगविषयक छंदःशास्त्रीय योगदान मराठी छंदोरचनेचा नवा इतिहास घडविणारे आहे.
स्वतः नामदेवांनीच आपल्याला स्फुरलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण काव्यरचनेला प्रथमतः ‘अभंग’ या नावानं संबोधलं. त्यानंतरच मराठी वाङ्मयात ‘अभंग’ ही संज्ञा रूढ झाली. आपल्या या काव्यरचनेला ‘अभंग’ हे नाव देण्याचे कसं स्फुरण झालं तेही त्यांनी, आपल्या एका अभंगाद्वारे प्रकटपणे सांगितलं आहे, तो अभंग पुढीलप्रमाणे –
मुख्य मातृकांची संख्या। सोळा अक्षरें नेटक्या ।।१।।
समचरणीं अभंग। नव्हे ताळ छंदोभंग ।।२।।
चौक पुलिता विसर्ग। गण यति लघु दीर्घ ।।३।।
जाणे एखादा निराळा। नामा म्हणे तो विरळा ।।४।।
या अभंगाचा भावार्थ : मुख्यतः वर्णमालेच्या दृष्टीनं पाहिलं तर (अभंगाच्या प्रत्येक कडव्याची) अक्षरसंख्या नेमकी सोळा असते. हा अभंग (विठ्ठलासारखाच) समान-चरणांचा असून, त्यात तालाचा आणि छंदाचा कुठेही भंग नसतो. तसंच तो चौक, पुलिता (पुरस्ता-ज्जोती), विसर्ग, गण, यती, लघु, दीर्घ (इत्यादी पूर्वील संस्कृत-प्राकृत छंदःशास्त्रीय बंदिस्त) रचनानियमांनी बांधलेला नसतो. हे सर्व काव्यरचनेचे पूर्वील छंदःशास्त्रीय नियम जाणणारा (आणि त्याप्रमाणे काव्यरचना करणारा) एखादाच कुणी विरळा जाणकार असतो, असं संत नामदेव सांगतात. त्यांच्या या सार्थ नामकरणामुळे सर्व संतांच्या अशा स्वरूपाच्या भक्तिकाव्याला सरसकट ‘अभंग’ या नावानेच संबोधण्याचा प्रघात पडला.
या अभंग-काव्याला नामदेवांनी शेवटच्या कडव्यात ‘नामा म्हणे’ अशी स्वतःची नाममुद्रा उमटवून अभंगाला आपली एक खास अशी ‘निजखूण’च प्राप्त करून दिली. नामदेवांनी घडविलेली ही ‘नाममुद्रा’ अभंगकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण झाली. अर्थात ही नाममुद्रा कधी त्या संतांच्या प्रचलित नावांची, तर कधी अभंगरचनेसाठी त्यांनी धारण केलेल्या पर्यायी नावांचीही आढळून येते. संत नामदेवांच्या नामा, नामया, नामदेव, विष्णुदास नामा इत्यादी नाममुद्रा दिसून येतात. संत ज्ञानदेवांच्या ज्ञानदेव, ज्ञाना, निवृत्तीदास, बापरखुमादेवीवर इत्यादी नाममुद्रा त्यांच्या अभंगांत वाचावयास मिळतात. संत एकनाथांनी तर आपली नाममुद्रा म्हणून, आपल्या एकनाथ या नावापेक्षा, सद्गुरुस्मरण करणाऱ्या ‘एका जनार्दनी’ या पर्यायी नाममुद्रेचा सर्वाधिक उल्लेख केला आहे. वारकरी संतांच्या अभंगांतील ‘नाममुद्रा’ म्हणजे, त्यांचा ‘कॉपीराइट’चा (साहित्यनिर्मिती – प्रकाशनाचा) अधिकारच दर्शविणाऱ्या आहेत, असं आजच्या ग्रंथप्रकाशनाच्या परिभाषेत म्हणता येईल.
विठ्ठलाच्या भावभक्तीत तल्लीन झालेल्या संत नामदेवांच्या मुखातून, गेय स्वरूपात अभंग प्रकट झाले. हाती वीणा घेऊन, ते उभ्यानं विठ्ठलासमोर आपले अभंग, देहभान विसरून गाऊ लागले. गाता गाता नाचूही लागले. विठ्ठलाच्या राउळाप्रमाणेच चंद्रभागेच्या वाळवंटातही ते वीणा घेऊन अभंग गात नाचत असत. भक्तिरसाचा वर्षाव करणारे त्यांचे भावोत्कट अभंग, अवतीभवतीच्या भाविक जनांच्या कानावर पडताच, ते त्यांनी मन भरून ऐकले. सोपी, रसाळ शब्दरचना आणि गायन सुलभता यांचा प्रभाव या भक्तभाविकांवर पडला आणि ते थरारून गेले. त्या भक्तिभरल्या भावावस्थेत तेही हाती टाळ घेऊन, संत नामदेवांच्या मागोमाग अभंग म्हणून लागले. वीणेच्या स्वरात आणि टाळांच्या गजरात गायल्या जाणाऱ्या अभंगाला, मृदंगाच्या ठेक्याची साथ लाभली. टाळ-मृदंग-वीणेच्या तालासुरात उभ्याने अभंग गाता गाता हे सर्व विठ्ठल भक्त, संत नामदेवांबरोबर नाचू लागले. वारकरी संप्रदायाच्या भजनाला असा प्रारंभ झाला. ‘भजन करा रे हरिहरा। नारायणा शिवशंकरा। माझे बोलणें हें अवधारा। भेद न करा दोघांचा।।’ असा हितोपदेश आपल्या अभंग-भजनातून संत नामदेव करीत होते. पंढरीच्या पंचक्रोशीत या वारकरी अभंग-भजनाचे ध्वनी-प्रतिध्वनी उमटत होते. एव्हाना तत्कालीन सर्व संत अभंगाचा सोपा अक्षरछंद आत्मसात करून रचना करू लागले होते. या अभंगांचं वेगवेगळं गेय रूपबंध संतवाणीतून अभिव्यक्त होऊ लागलं. प्रतिभावंत वारकरी संतकवींनी एवढी वैविध्यपूर्ण आणि विपुल अभंगनिर्मिती केली आहे, की त्यातून नवे नवे छंद प्रकट झाले. संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, नरहरी सोनार, सोयराबाई आदींचे अभंग मराठी जनामनावर प्रभाव गाजवू लागले. पंढरीची वारी करणा-या वारक-यांच्या मुखांत संतांचे हे अभंग रुळले.
अभंग हाच वारकरी भजनाचा आत्मा, प्राण आणि देह आहे. या भजनाचं अंतर्बाह्य स्वरूपच अभंगमय असल्यानं अभंग आणि त्याला मुखरित करणाऱ्या वीणा, टाळ, मृदंग या नादसाधनांशिवाय वारकरी भजन अस्तित्वात येऊ शकत नाही, याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. वीणा, टाळ, मृदंग या वारकरी भजनसाधनांचा एकत्र उल्लेख त्या काळात केवळ संत नामदेवांच्या अभंगातच आढळतो.
टाळ विणे मृदंग वाजती अपार। नारद तुंबर गीत गाती।।…
टाळ विणे मृदंग सुस्वर गायन। कोंदले गगन दाही दिशा।।
सामुदायिक अभंगगायनातून वारकरी सांप्रदायिक भजनांचे फड उभे राहिले आणि अठरापगड जातीचा समाज, विठ्ठलभक्तीच्या छत्रछायेखाली एकवटला. संत तुकारामांनी त्याचा उल्लेख केला आहे तो असा,
सिंपियाचा पोर एक खेळिया नामा। तेणें विठ्ठल बसवंत केला रे।
आपुल्या संवगडिया सिकवून घाईं। तेणे सतत फड जागविला रे।
एक घाईं खेळता न चुकेचि कोठें। तया संत जन मानवले रे।।
संत नामदेवांनी आपल्या तीर्थावळीच्या अभंगात, संत ज्ञानदेवांना ‘भजनाचे लक्षण’
सर्वभूती दया सर्वभावें करुणा। जेथें मीतूंपणा मावळला।
भजन तया नांव वाटे मज गोड। येर ते काबाड वायाबीण।।
अशा प्रकारे सांगितले आहे. नामदेवांनी प्रवर्तित केलेल्या अभंग-भजनाला त्यांनीच क्रमशः स्वयंशिस्त प्राप्त करून दिली. अभंग म्हणणारे आणि अभंग म्हणावयास सांगणारे वीणेकरी नामदेव आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला उभ्या असलेल्या टाळकऱ्यांच्या मधोमध उभे राहत. मृदंगी वीणेकऱ्याच्या उजव्या बाजूकडील टाळकऱ्यांच्या रांगेत मध्यभागी त्यांच्या किंचित पुढे उभा असे. ‘जय जय रामकृष्ण हरी।’ या नामघोषानं नामदेव भजनाला सुरुवात करीत. काही वेळ हा नामघोष टाळकऱ्यांसह केल्यावर, ‘अवताराची राशी तो हा उभा विटेवरी। शंखचक्रगदापद्मसहित हरी।।’ असा एखादा रूपाचा अभंग ते म्हणत. टाळकरीही त्यांच्या पाठोपाठ तो अभंग म्हणत. तो पूर्ण झाल्यावर वीणेकरी नामदेव एखाद्या टाळकऱ्याला खुणावून त्याला पाठ असलेला अभंग म्हणावयास सांगत. त्याच्यामागून सर्वजण तो अभंग गात. अशा पद्धतीने भजनाची प्रथा दृढ झाल्यावर पुढे पुढे नामदेव आपला स्वतःचा अभंग म्हणून झाल्यावर स्वतः विवरण करू लागले. आपल्या अभंगविवरणाला आधार देण्यासाठी ‘प्रमाण’ म्हणून इतर संतांचे अभंगही ते प्रेमादराने म्हणू लागले. त्यांच्या दोन्ही बाजूला उभे असणारे टाळकरी नामदेवांच्या अभंगनिरुपणाला अनुरूप असा अन्य एखादा अभंग आठवला की त्यातील अभंगचरण (कडवे), अकस्मात गाऊ लागत. त्या वेळी निरूपणकार संत नामदेव श्रोता होऊन, त्या टाळकऱ्यांचे अभंगचरण ऐकत आणि त्यांचं गाऊन झाल्यावर त्या अभंगचरणांच्या आशयाच्या अनुषंगानं आपल्या निरूपणाला अनुरूप असं वळण देत.
संत नामदेवांच्या या नव्या अभंगनिरूपण पद्धतीतून, वारकरी कीर्तन परंपरेचा उदय झाला. संत नामदेवांच्या बहु-आयामी प्रतिभेनं, अभंग-कीर्तनाच्या स्वरूपात ही दिगंत गरूडझेप घेतली आणि वारकरी धर्मसंस्कृतीला लोकोद्धाराचं विश्वव्यापक लोकविद्यापीठ मिळालं. संत नामदेवांनी प्रथम मराठीत अभंगरचना करून, समूहभक्तिप्रधान सर्वसमावेशक वारकरी भजन, वीण-टाळ-मृदंगाच्या साथीनं उभं केलं आणि त्याचा क्रमविकास त्यांनी वारकरी कीर्तनात केला. वारकरी कीर्तनाचा प्राणाधार अभंगच आहे. अभंग-भजनानेच वारकरी कीर्तनाचा आरंभ होतो आणि ‘जय विठ्ठल श्री विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल।। या संत नामदेवांच्या अभंग-भजनानंच वारकरी कीर्तनाची समाप्ती होते.
नामदेवराया, तुम्ही हवे आहात! पहिला कीर्तन कुळवाडी