खरे चमत्कार

डॉ. अशोक कामत

प्रवचनकार, कीर्तनकार आपली कथा रंगवण्यासाठी संतांचे म्हणून काही चमत्कार सांगत असतात. त्यापैकी सगळेच खरे नसतात. आपण संतांचे खरे चमत्कार ओळखायला हवेत. त्यादृष्टीनं ‘संत नामदेव चरित्र’ अत्यंत अभ्यासनीय आहे. सांगताहेत नामदेवांविषयी देशातील सर्वाधिक अधिकारी अभ्यासकांपैकी एक, डॉ. अशोक कामत.

संतांनी टाळकुटेपणा केला. निष्क्रियता शिकवली. समता आणली नाही. समाजपरिवर्तन केलं नाही. ते गतकाळाचे पुजारी झाले. त्यांनी भारतावर झालेल्या आक्रमणांचा प्रतिकार केला नाही, असे काही आक्षेप स्वातंत्र्यपूर्वकाळातील काही राष्ट्रवादी मंडळींनी आणि पुढेही काही अभ्यासकांनी घेतले. त्यांना प्रसिद्धीही पुष्कळ मिळाली. फार पूर्वीच या मंडळींना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी चोख उत्तरे दिली होती.

संतसाहित्यावर बोलताना त्यांच्या काळाचा, तत्कालीन एकूण परिस्थितीचा विचार करून काही मांडणारे कमी. काहींचे सारे वळणच पाश्चात्त्य शिक्षण प्रभावाचे असते. कुणी आजचे बुवामहाराज आणि संत यांना एकच मानून चालतात. त्यामुळे प्रकृती आणि विकृतीतील नेमका फरक जाणून घेण्यात ते कमी पडतात.

संतांनी आपली आत्मप्रौढी मिरवावी, पांडित्यप्रदर्शन करावे म्हणून लिहिलं नाही. ते कवी असण्यापेक्षा आचारवंत कार्यकर्ते आहेत. साहित्य हे त्यांचं एक साधन होतं. त्यांनी क्रांती केली, असा त्यांचा दावा नाही. त्यांनी स्वतःपासून क्रांतीचा आरंभ केला. त्यामुळे समाजपरिवर्तनास मदत झाली. अज्ञान कमी झालं. समता, बंधुता वाढली. ही एक वस्तुस्थिती आहे. संतांनी लोकभाषा, लोकछंद आणि लोकमाध्यमं स्वीकारून समाजप्रबोधन केलं. याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला नामदेवांच्या जीवन कार्यातून पाहता येतं.

नामदेवविषयक विसंवादः

नामदेवराय आपल्या पूर्वजीवनात दरोडेखोरी करीत, अशी एक कथा सांगतात. ही बहुदा उत्साही लोकरंजक कीर्तनकारांनी घातलेली भर आहे. यामागे लोकांना चमत्काराकडून नमस्काराकडे नेण्याचा हेतू असेल. पण एखाद्या संताच्या जीवनप्रवासात अशाप्रकारे दंतकथन घुसडण्याचं काहीच कारण नाही. मध्ययुगीन मराठी वाङमयेतिहासाच्या काही मान्यवर इतिहासकारांनाही या कथेची नोंद करण्यामध्ये संकोच वाटला नाही. काही पंडितांनी, सारस्वतांनी तसेच चित्रपटकर्त्यांनीही त्यांचाच कित्ता गिरवला. जागरूक नामदेव शिंपी समाजाने अशाच एका वादग्रस्त चित्रपटाविरुद्ध प्रभावी आंदोलन केलं. पं. ना. पाटसकर यांनी अभ्यासपूर्ण पुस्तिका करून त्याचा समाचार घेतला. नामदेवांना दरोडेखोर म्हणून रंगविण्याचा खटाटोप व्यर्थ ठरला. ‘चंद्रमा जो अलांछन’ या नामदेव समाजोन्नती परिषदतर्फे प्रकाशित ग्रंथात या वादाचा सारा इतिहास देण्यात आला आहे.

नामदेवराय अयोनिज होते. त्यांचा जन्म एका शिंपल्यातून झाला, असा चमत्कार पेशवेकालीन संतचरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकरांनी नोंदवून ठेवला. यासाठी कोणताही आधार नाही. नामदेवांचं जन्मस्थान आणि समाधिस्थान यांच्याविषयीही एकवाक्यता नाही. नरसी, घुमान आणि पंढरपूर असे तीन पक्ष दिसतात. नरसीच्या बाजूने प्रमाणे अधिक सादर झालेली आहेत. समाधी मात्र पंढरपूर येथेच घेतली असावी. त्यादृष्टीने बरीच प्रमाणे दाखवता येतात. या मतमतांतरांतूनच नामदेव एक की अनेक अशी चर्चा करण्यासाठी काही मंडळींना वाव मिळत गेला.

वस्तुतः नामदेवरायांचं बालभक्त असणं, श्रीज्ञानेदेवादी भावंडांसमवेत त्यांचे उत्कट संबंध असणं, महाराष्ट्राबाहेर विशेष करून उत्तर गुजरात, पंजाब, हरियाणा अशा पश्चिमोत्तर भारतात त्याच्या प्रभावखुणा आजही दाखवता येणं, हे दुर्लक्षिण्यासारखं नाही.

संतांचे चमत्कार :

संत नामदेवांनी देऊळ फिरविलं, त्यांच्या हातून देवानं भोजन केलं, याहीपेक्षा त्यांनी ज्ञानदेवांदी भावंडांची सदैव पाठराखण केली, त्यांचं जीवनचरित्र कथन केलं, यात अधिक चमत्कार जाणवायला हवा.

नामदेवकाळात उत्तर सुलतानशाही सर्वत्र नांदत होती. दक्षिण भारतातही इस्लामचं धार्मिक, राजकीय आक्रमण सुरू झालं होतं. यवनांच्या अन्याय्य वागण्यामुळे सारा समाज अस्वस्थ झाला. दोषांनी झाकोळून गेलेल्या कलियुगात देवावतारच काय तो जनांना तारू शकेल. पाखंड जेव्हा फार वाढतं तेव्हा पापांचा निरास करण्यासाठी हरिनाम स्मरण हेच एक श्रेष्ठ साधन ठरतं, हे सगळं परखडपणे सांगणं, यात नामदेवांचा चमत्कार आढळायला हवा…

राजे भ्रष्ट यवन झाले। ठायीं ठायीं दोष घडले ।
मग मीही अवतार घेतले। कलिदोष हरावया ।।
… यवनसंसर्ग कठिण ।…

संतसाहित्यातून व्यक्त झालेली इस्लामविषयीची ही प्रतिक्रिया वर वर सौम्य वाटली तरी ती भेदक आहे, नेमकी आहे. नामदेवगाथेत तत्कालीन हिंदू मुसलमान समाजाचं चित्रणही विदारक आहे. ‘एक बैसती अश्वावरी। एक चालती चरणचाली ।। एक जेविती मिष्ठान्न । एका न मिळे अन्न ।। किंवा तुम्हा घरी बोचकी लुगडीं । आम्हां घरी पोरे उघडी ।।, असं ते दीनदुबळ्यांचं दुःख, संघर्ष सहज चितारून जातात.

संत नामदेव हे अभंग गायक वारकरी आद्य कीर्तनकार आहेत. त्यांची अभंगसंपदा ही त्यांच्या कीर्तनरंगातून सहजी उद्भवलेलं भक्तिकाव्य आहे. समाजातील अनेक दुष्टवृत्तींची नोंद त्यांनी अचूकपणे घेतली आहे. तत्त्व पुसावया गेलो वेदज्ञांशी । तव भरले तयापाशी विधिनिषेध।। किंवा स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञांशी । तव भरले तयापाशी भेदाभेद।। हे ते रोखठोक सांगतात. भक्तिविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत सांगत असतानाच हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां । झाकू मोह दुःखा निरसू तेणें ।। हेही ते सांगतात. साधनेच्या नव्या वाटा प्रशस्त करत जातात. एक ऐतिहासिक जाण त्यांच्यापाशी आहे. त्यांनी पुंडलिकाविषयी तपशील दिले आहेत. ज्ञानदेवादींचं सारं चरित्रच सादर केलं आहे. ते चोखोबा परिवार तसंच जनाबाईंचे गुरू आहेत. तुकोबांचे ते पूर्वावरतारच आहेत. तुकोबारायांनी त्यांच्याविषयी दिलेले तपशील फार बोलके आहेत.

आद्य अस्पृश्योद्धारक म्हणूनही नामदेवांचा विचार करता येईल. यादृष्टीनं त्यांचा महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील शिष्यपरिवार ध्यानी घ्यायला हवा. गुरू गोरखनाथांची उत्तरेत प्रचारित गोरखबानी आणि नामदेवांची मराठी-हिंदी वाणी एकत्र अभ्यासली गेली तर अनेक प्रकारे नामदेवकाव्याची महती स्पष्ट करता येईल. भारतात निर्गुण संतकाव्य आणि उदारविचारी संतभक्त परंपरा निर्माण करण्याचं मूळ श्रेय गुरू गोरक्षनाथांना दिलं जातं. त्यानंतर हा वारसा अधिक समर्थ समृद्ध करण्यात नामदेव, ज्ञानदेवांचा वाटा मोठा आहे, हे स्पष्ट आहे. पुढे हिंदीत महात्मा कबीर, रविदास, सहजोबाई, दादू दयाळ, पलटूदास, मलूकदास अशा अनेक कवींनी समाजजागरणाचं कार्य केलं. पंजाब आदी प्रदेशांत दीर्घकाळ राहून नामदेवरायांनी काही मूलभूत स्वरूपाचं समाजधारणेचं काम केलं होतं. त्यातूनच हिंदी संतमत आणि पुढे शीख गुरूपरंपरा बळकट होण्यासाठी उपयोग झाला.

नामदेवांचं हिंदी काव्य फार महत्त्वाचं आहे. त्यातूनच उत्तरेत निर्गुणसंतपरंपरा निर्माण झाली. या संतांच्या मांदियाळीनं विशुद्ध चैतन्यतत्त्वाचं चिंतन, बाह्याचारांचा निषेध, गुरुभक्ती, सहजसाधना, संतसंग, जातीपातींचा विचार न करता माणूसधर्माचा उद्घोष असं अतिशय मूलगामी स्वरूपाचं चिंतन मांडलं आहे. भारतात गावोगावी पदयात्रा करीत नामदेवांनी ही संतपरंपरा बलवान केली. सर्वसामान्य माणसांत आत्मविश्वास निर्माण केला. भक्तीच्या नावाखाली दुराचार केला जात होता, त्याला शह दिला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणत भारतसंचार करणारे नामदेव उदात्तमंगल विचार प्रकट करणारे वैष्णवांचे कुळपुरूष ठरतात.

नामदेवांचा खरा चमत्कार त्यांची देशयात्रा आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या आणि एकूण देशाच्याही लोकभाषेतून जनजागरण केलं. उदात्त विचारांची मांदियाळीच देशात तयार व्हावी म्हणून आंतरभारतीय कार्य सर्वप्रथम केलं, हा खरा चमत्कार आहे. आज महाराष्ट्राबाहेर त्यांनाच अधिक मान्यता आहे, हे विसरून चालणार नाही. नामदेव हिंदी वाङमयेतिहासात अमर झाले. हिंदीच्या आदिकाळात त्यांनी जी रचना केली ती अभ्यासली की जाणवतं, तेच उत्तरेला ज्ञात असलेले पहिले तत्त्वचिंतक जनकवी आहेत. त्यांच्या हिंदीत आजच्या खडी बोली हिंदी राष्ट्रभाषेचं पूर्वरूप पाहता येईल.

आतंर भारतीचे प्रणेते- काही देवाळवी घडविले गेले. देवानं नामदेवांसाठी काही चमत्कार करून दाखविले, त्यांच्यासाठी मेलेली गाय जिवंत केली आणि क्रुर सुलतानाच्या तावडीतून त्यांना सोडवलं, प्रसंगी त्यांचं घर आकारुन दिलं, त्याच्यासाठी औंढ्या नागनाथाले देऊळच फिरवलं..या दंतकथा लोकांच्या आठवणीत आहेत. किंवा असंही म्हणता येईल, सामान्य जनता देवमाणूस आणि चैतन्यतत्त्व स्पष्ट करून सांगण्यासाठी आपल्या निवेदनात वापरलेली त्यांची एक शैली आहे.

तेराव्या शतकात देशात गावोगावी सद्विचार सांगणे हा खरा चमत्कार आहे. तो नामदेवरायांनी करून दाखवला त्यामुळे कथाकीर्तनकार सांगत असलेल्या त्यांच्या चमत्कारांपेक्षा तो महत्त्वाचा आहे.

0 Shares
नामा म्हणे तुझें सोलीन ढोपर थेम्सतीरावरून चंद्रभागा पाहताना